जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 2, 2009

मी, सायकल आणि म्हातारी.....

पाचवी-सहावीत मला सायकल शिकायचे भारी वेड लागले होते. आमच्याकडे तीन चाकी स्कूटर होती. ती घेऊन काही वेळा मी हट्टाने दादरच्या मुख्य पोस्टात पत्र टाकायला किंवा त्याच्या जवळच असलेल्या बर्शन गॅसच्या दुकानात गॅस नोंदवायला जात असे. एका पायाने रस्त्याला रेटे मारत ही स्कूटर पळवायला खूप मजा येई. आंबेडकर रोड म्हणजे अव्याहत ट्रॅफिक, गर्दी. अगदी मध्यरात्री अडीच तिनालाही ह्या रस्त्याला आराम नसे. शिवाय ट्रक ट्रॅफिक जास्त असल्याने आमच्या आईला फार भीती वाटे.

मी किंवा भाऊ सायकल घेऊन कुठेही जायची संधी मिळतेय का शोधत राहायचो आणि ती आम्हाला कसे जाता येणार नाही ह्याची पुरेपूर दक्षता घ्यायची. मग आम्ही कधी भांडून, रडून जायचोच. शेवटी एक दिवस मी आईला म्हटले, " अग बघ माझ्या काही मैत्रिणी तर मोठ्या माणसांची सायकलही चालवायला शिकल्या. आणि तू मात्र मला साधी ही स्कूटरही घेऊन जाऊ देत नाही. अशाने मला कधीच काही येणार नाही. आणि का गं, तूच सांगतेस ना की मी तर तिसरी-चौथीत असतानाच सायकल वरून चार चार मैल जात असे. म्हणजे आजी तुला पाठवीत होती ना? आणि तू मात्र मला....." असे म्हणत मी डोळ्यातून अश्रूंची बादलीच ओतली. कसे कोण जाणे पण आई थोडीशी फसली, किंवा तिने तात्पुरते वेळ मारून नेण्यासाठी असेल पण ह्या वेळच्या सुटीत तुला सायकल शिकवूया असे आश्वासन दिले.

सुटीत आम्ही आजोबांकडे जात असू. रावळगाव छोटेसे, निसर्गरम्य, शांत गाव. माझे आजोबा रावळगाव शुगर फॅक्टरीचे जनरल मॅनेजर होते. तसेच ते अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून येत होते. एकंदरीतच आजोबा म्हणजे मोठ्या हुद्द्याने, प्रेमळ व अपक्षपाती धोरणाने व सगळ्यांना सांभाळून घेणारे असल्याने अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. दिवस रात्र आमच्या घरात माणसांचा ओघ असे. अनेक अडलेपडलेले लोक येऊन बसत. बरेचदा खटले, तक्रारी घेऊन लोक येत. मग त्यांचे निवारण करणे, कधी बाबापुता करून तर कधी दरडावून त्यांची समजूत घालणे प्रकार चालत. अनेकदा लोक चक्क परसदारी येऊन बसत. मग आजी धान्य, पिठं, कधी तेल, तिखट, लोणचे, गुळांबा असे देऊन पाठवणी करी.

संपूर्ण गावात आम्ही गेलो की बातमी पोचत असे. जोशीसाहेबांची नातवंडे आली बरं का सुटीला. आमची कॉलर एकदम ताठ होई. आजोबांना चुकूनही कधी ' मी ' असे म्हणताना ऐकल्याचे मला आठवत नाही. पण आम्ही नातवंडे मात्र एकदम हवेत असू. आम्हाला सगळ्यांना आपण कोणीतरी मोठे असल्यासारखे वाटायला लागे. बरं लोकही खूप कौतुक करत. प्रेमाने घरी घेऊन जात, जेवूखावू घालत. आम्हाला मज्जा वाटे.

ह्यावेळी आजोबांकडे पोचल्या पोचल्या मी आईला आठवण करून दिली, " तू म्हणाली होतीस की सुटीत सायकल शीक म्हणून. अगदी आजपासूनच सुरवात करायची मला. " मी पहिलेच नातवंड म्हणून असेल, पहिल्यापासून अतिलाघवी म्हणून असेल, आजी-आजोबांची अतिशय लाडकी होते. माझी भुणभूण आजोबांनी ऐकली, हाक मारून म्हणाले, " चिंगे, इकडे ये पाहू. आता दोन महिने तुला काय हवे ते मला सांगायचे. नको आईचे डोके खाऊ. सायकलच शिकायची आहे ना? मग त्यात काय मोठे . मी बाबुलालला सांगतो. आठ दिवसात तुला तो तयार करेल. " असे म्हणून त्यांनी बाबुलाल म्हणजे आमच्या बंगल्याच्या तीन वॉचमनपैकी एक व आम्हा मुलांचा अतिशय प्रिय काका, त्याला हाक मारून मला त्याच्या ताब्यात देऊन टाकले.

बाबुलालचा स्वतःच्या पोरांपेक्षा जास्त जीव आमच्यावर होता. त्यामुळे आई एकदम निर्धास्त झाली. भाड्याने गावातून थोडी छोटी लेडीज सायकल बाबुलाल घेऊन आला. आणि माझे धडे सुरू झाले. पहिले दोन-तीन दिवस सायकल पकडणे, पायडल पर्यंत पाय पोचवून पायडल मारणे, हँडल हातातून न सोडणे, ब्रेक, ट्रींगट्रींग ह्याचा उपयोग करायचा असतो हे शिकण्यात गेले. त्यात दोनचार वेळा पडून, रडून झाले. करता करता पाचव्या-सहाव्या दिवशी मला स्वतःहून तोल सावरत सायकलवर चढता येऊ लागले. हँडलही नीट योग्य त्या दिशेला वळवणे जमू लागले. अर्थात हे सारे करताना बाबुलाल सायकल धरून माझ्या बरोबरीने धावत असे. थोडाथोडा कॉन्फीडन्स वाढू लागला होता.

सरतेशेवटी आठव्या दिवशी मला एकटीने सायकल चालवणे जमले. पण काही केल्या ब्रेक मारत जमिनीला पाय टेकवून सायकल जागच्याजागी उभी करणे मला जमत नव्हते. त्यामुळे मी छान एक फेरी मारून येई, अर्थात बाबुलालच्या नजरेच्या टप्प्यातून लांब जायची परवानगी नव्हती. मात्र उतरताना मोठा घोळ होई. बाबुलालच्या जवळ आले की एकतर तो सायकल पकडे आणि मग मी उतरत असे . नाहीतर मी चक्क सायकल वरून उडी मारत असे. पण असे केले की मला दरवेळी लागे शिवाय सायकलचे काहीतरी मोडत असे. मला रडू येई, वाटे आपल्याला येणारच नाही. मग आजोबा समजूत काढत. म्हणत, " चिंगे हट काय मुळूमुळू बायकांसारखी रडतेस. उद्या नक्की जमेल तुला. " रात्री मला स्वप्न पडत, मी लांबवर एकटीच सायकलवरून फिरून आलेय. फाटकापाशी येऊन ऐटीत ब्रेक मारून सायकल थांबवून उतरलेय. आणि सगळे माझ्याकडे कौतुकाने पाहत आहेत.

आता मला सायकल चालवण्यात खूप मजा वाटू लागली होती. बाबुलालही थोडा बिनधास्त झाला होता. पार पाटापर्यंत मला एकटीला जाऊ देत होता. एक दिवस मी सकाळी अकराच्या सुमारास निघाले. एक मोठी चक्कर मारून येऊ जेवायच्या वेळेपर्यंत घरी असे म्हणत पाटावर पोचलेही. उतरणे अजूनही नीट जमत नसल्याने सायकल मी थांबवतच नसे. पाटाजवळून एक फेरी मारून घरचा रस्ता पकडला. रस्त्यात बिलकूल गर्दी नव्हती. जी काय तुरळक माणसे होती ती सायकल येतेय व त्यावर जोशीसाहेबांची नात पाहून आपसूकच बाजूला होत. मनात मला मी राजकन्या असल्या सारखे वाटून अगदी ताठ मानेने सायकल चालवीत होते. तेवढ्यात,

अगदी माझ्यासमोरच पंधरा-वीस फुटांवर गवताचा खूप मोठा भारा डोईवर घेऊन एक आजीबाई तुरतुर चालत होती. अजूनही ब्रेक व ट्रींगट्रींग आणि हँडल ह्याचा एकाच वेळी वापर करणे मला अचूक जमत नव्हते. त्यात कोणीही मध्ये येतच नसल्याने रस्ता हा खाजगी मालमत्ता असल्यासारखी मी वापरत होते. अचानक समोर म्हातारीला पाहून माझी गाळण उडाली. तिच्या बाजूने जावे हा विचारही मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात डोकावला नाही. तिला जाऊन मी जोरदार धडक मारणार व ती आणि मी पडणार. वर माझ्या अंगावर तिचा एवढा मोठ्ठा भाराही पडणार. सायकल मोडणार. सरतेशेवटी माझे सायकल चालवणेच बंद होणार, हे सारे मला डोळ्यासमोर दिसू लागले.

मी चक्क तोंडाने, " ए आज्जे, अग हो ना बाजूला. कळत नाही का तुला मी सायकल घेऊन येतेय. हो की पटकन कडेला. अरे अरे... सांभाळ, अग, अग, पडले पडले..... मेले मेले....." आणि धडाम आवाज झाला. मी तिला मागून जोरदार धडक दिली होती. आजीच्या डोक्यावर एवढा मोठा भारा त्यात तिची पाठ, आता मी मागून येतेय हे तिला कसे कळावे. माझी धडक बसताच ती तोंडावर रस्त्यात आपटली. तिच्या अंगावर सायकल. तोवर मी सायकल सोडून नेहमीच्या सवयीने उडी ठोकली होती. त्यामुळे मला जोरदार खरचटले तरी इतर माऱ्यातून सुटका झाली. तिला मात्र बरेच लागले.

भारा अस्ताव्यस्त पडला होता. तिच्यावर पडलेली सायकल कोणीतरी बाजूला केली. तशी ती तिरिमिरीत उठली आणि जो तोंडाचा पट्टा चालू केला, " कोण गं ती...... , अग काय डोळे फुटले का तुझे? आँ..., मी एवढा मोठ्ठा भारा घेऊन चालतेय ते बी दिसना व्हय तुला? कुठून कुठून येतात अन आम्हाला कहार करत्यात. " असे म्हणत तिने जो काय शिव्यांचा भडिमार सुरू केला. मी मनातून प्रचंड घाबरले होते परंतु वरकरणी आव आणून तिला म्हटले, " ए आज्जे , कशाला गं ओरडतेस? मी काय मुद्दाम तुला पाडलेय का? एक तर तू माझ्या मध्ये आडवी आलीस वर मलाच रागावतेस? " असे म्हणत म्हणत पटकन सायकलवर चढून अशी काय जोरात सायकल पळवली ती एकदम फाटकात येऊनच श्वास घेतला. बरेच दूरपर्यंत तिच्या शेलक्या शेलक्या शिव्या माझा पाठलाग करीत होत्या.....

पुढच्या दोन दिवसात मी ब्रेक मारत नीट सायकल थांबवून उतरायला शिकले तेव्हाच कुठे गप्प बसले. न जाणो पुन्हा तीच म्हातारी यायची माझ्यासमोर आणि यावेळी मात्र मला बुकलून काढत विकट हास्य करीत म्हणायची, " ........... ला सायकल चालवायला हवी होय. थांब आता तुलाच कशी पंक्चर करून ठेवते बघ. "

3 comments:

  1. सायकल शिकणे हा एक मोठा आनंद. मी घरी न सांगता स्कुटर चालवायचो १३ वर्षापासुनच. एकदा तर कार पण चालवली होती. काही गोष्टी जन्मजातच येतात, त्यातलीच एम म्हणजे माझ्या साठी ड्रायव्हिंग..अगदी कोणिही न शिकवता, फक्त पाहुनच आलं मला. आणि मला ड्रायव्हिंग खुप आवडतं! अजुनही!!
    सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता मी पण लिहितो एक लेख माझ्या ड्रायव्हिंग वर.. :) ..

    ReplyDelete
  2. हा!!हा!!हा!!..लेख छान झाला आहे..
    -
    प्रसाद
    (http://prawas.wordpress.com/)

    ReplyDelete
  3. माझा नवराही तुमच्याच राशीतला.त्यालाही अतिरेकी वेड पहिल्यापासूनच ड्रायव्हिंगचे. सोळाव्या वर्षीच डायरेक्ट ट्र्कवरच शिकला. :) आभार.

    प्रसाद अनेक धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !