जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 22, 2011

प्रिय...

सगळीच जातात तसाच तूही उज्ज्वल भवितव्यासाठी दूर गेलास. मी मात्र तिथेच.... तशीच! तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच ! तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. " ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का? तू आरामात बस शेजारी. आणि पिशव्या उचलेन गं मी. " असे म्हणत व्यायाम करून पीळदार होऊ लागलेले दंड दाखवणारा तू. अखंड पडणाऱ्या बर्फाचे ढीग उपसण्यासाठी जामानिमा करून बाहेर पडताच, " वेडाबाई, हो घरात. तू संध्याकाळपर्यंत बसशील टुकूटुकू करीत. त्यापेक्षा मस्त तिखट काहीतरी खायला कर. मी फडशा पाडतो या चमचमणाऱ्या थंड भुशाचा. " असे म्हणून कानात सुंकली अडकवून एका लयीत स्नो उपसणारा तू.

जात्याच गोड व कसदार गळा तुझा. पाचव्या वर्षीच स्वत:हून गाणे शिकायला जाऊन बसलास. तल्लीन होऊन तुझे एक एक राग आळवणे, माझ्या शेपटाला धरून हेलकावे देत ताना घेणे. " स्वरगंगेच्या काठावरती " मुळात तसे अवघडच गायला, त्यात तुझा सुटलेला मराठी वाचनाचा हात.... तरीही शब्द न शब्द माझ्याकडून वदवून तो अचूक उच्चारण्यासाठी घोटून पक्का होण्याची दक्षता घेऊन केलेली गाण्याची प्रॅक्टिस. पुढे पुढे तर तू एकाग्र होत गेलास त्यात. एकलव्यासारखा !

एक ना दोन.... अगदी जन्मलास तेव्हांपासूनच्या अनंत आठवणी..... पोतडी भरभरून.... निगुतीने एकावर एक ठेवलेल्या. नुसती निरगाठ उकलायचा अवकाश, उसळी मारून पृष्ठावर येतात... येतच राहतात.... डोळ्यांवाटे सांडत राहतात. त्याही तुझ्याच सारख्या... कधी अवखळ तर कधी तरल. भोवती फेर धरून एकदा का घुमायला लागल्या की मी माझीच राहत नाही..... तुझ्यातली मी... माझ्यातला तू.... पाहता पाहता दोघेही तादात्म्य पावतात. उरते ती आश्वस्त जाणीव!

कधीकधी मला भीतीच वाटते माझ्यातल्या तुझ्यावरच्या ओनरशिपची. तुला बोलूनही दाखवलेय मी अनेकदा.... त्यावर तुझे खळखळून हसणे.... " ममा, तू पण नं वेडीच आहेस. भीती काय वाटायची आहे त्यात. अगं तुझी ओनरशिप सदाचीच आहे माझ्यावर. तो तुझा सार्वभौमिक हक्क आहे. त्या ध्रुवपदासारखी तू माझ्यासाठी अढळ आहेस, असणार आहेस. भितेस काय! उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का? मग? आणि ती फक्त तिलाच नाही तर तुलाही हवीहवीशीच आहे. कधीतरी तात्पुरता त्रास होतो, अगदी कटकटही होते पण काही वेळ गेल्यावर लक्षात येते की आईचे सांगणे योग्यच होते. अगं, उलट तू जर मी मोठा होतोय म्हणून.. मला स्पेस देण्यासाठी अंतर राखू लागलीस ना तर मात्र मी कोलमडेन. " किती सहज शांत करून जातोस तू माझे मन.... ही हातोटी तुला नेमकी साधलेली ! मी तुझी नस न नस ओळखते की तू माझी.... आताशा हा प्रश्नच संपलेला !

तू जात्याच लाघवी. जीव लावणारा, हळवा, समंजस. तसा थोडासा मनस्वीही आहेस पण तापट नाहीस. तुला राग खूप येतो, पण तू कधीच तांडव केल्याचे मला आठवत नाही. सुतारपक्ष्यासारखे एकसुरात तुझे म्हणणे मांडत राहतोस. तासनतास.... न थकता..... टक टक.... टक टक.... कधी गंमत वाटते तर कधी तुझ्या या एकसुरी सपाट आवाजातल्या टकटकीचा मनस्वी राग येतो मला. तू मात्र आपला हेका सोडत नाहीस... वाद घालणे तुला मनापासून आवडते. चर्चेच्या एकामागोमाग एक फैरी, कुठलेही आवाजाचे चढउतार न करता... तुला पटलेला मुद्दा समोरच्याला पटेपर्यंत केलेला अथक प्रयत्न... आणि एकदा का समोरच्याला मनापासून ते समजले-पटले की तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली कळतनकळतशी स्मितरेखा. वादासाठी वाद तू कितीही वेळ घालू शकतोस. पण त्यात आक्रस्ताळेपणा, चिडचिड कधीच नसते. नवल वाटते मला.... इतका संयम तोही तुझ्या वयाला... असाच राहा बरं बाळा! या जगात संयमाची नितांत गरज आहे.

या सुट्टीत तुला घरी यायला जमले नाही. आताशा तुझ्यामाझ्या सहवासाचे गणित फक्त उन्हाळा व नाताळाशीच निगडित झालेय. बाकी सगळा वेळ असतो तो रखरखाट. तुझी आठवण प्रत्येक क्षणी मी काढते असा माझा दावा नाही.... माझ्यातूनच आलेला तू माझ्यापासून वेगळा असू शकत नाहीस म्हणूनही असेल कदाचित! परंतु माझ्या प्रेमाचं, मायेचं तुला ओझं होऊ नये म्हणून तारतम्याची सोबत हवी... सुसंवादाचे मळे अखंड फुलत राहण्यासाठी ओनरशिप धुक्यासारखी विरायला हवी. तुला आवडत असली तरीही....!

आज सकाळपासूनच जीवाला हुरहुर लागली आहे. कळतं पण वळत नाही.... तगमग वाढू लागलेली... वाटले लिहावे तुला... खरं तर तुला माहीत नसलेले असे माझ्यापाशी काहीच नाही.... म्हणूनच तुझ्यासाठी नाहीच रे, माझ्यासाठी...!

बाळा, तू खूप दूरवर जा. अगदी जाता येईल तितकं! अनोळखी वाटा शोधण्यातला आनंद तुला अपरंपार मिळू दे. बळकट पाय आणि तरल मनाचे पंख यांची साथ तुला मिळू दे. माझे डोळे तुझ्या मागोमाग येतच राहणार, पण मागे वळून तू त्यांच्याकडे बघू नकोस. काळजीच्या काट्यानं, तुझ्या चैतन्यावर मला चरा देखील उमटवायचा नाहीये!

तू पुढे पुढे जा. तुझ्या आनंदाचं चांदणं वाटेवर पडलं असेल ते मी वेचत राहीन. तुझ्या यशाचा उत्सव माझ्या मनभर साजरा होईल. तू कितीही दूर असलास तरी माझा हात तुझी पाठ थोपटू शकेल. तेवढ्यापुरतीच माझी आठवण ठेव; कारण पराक्रमाच्या वाटेवर, अगदी जिवलगाच्या शाबासकीची सम फार आवश्यक असते. तेवढ्यापुरताच आठवणींच्या समेवर ये. मधल्या तलवलयांत तू मनमुक्त ताना घे. स्वत:ला कौल लावून.

स्वत:चा आतला आवाज, गर्दीच्या कोलाहलातही जपू शकलास, तर तुला स्वत:ची फार सुंदर सोबत मिळेल. त्यात मीही सामावलेली असेन. तुझा आवाज ही माझ्या आतल्या आवाजाची हाक असेल. तुझ्या माझ्या आवाजांच्या या दोन बिंदूंत एक आपलं दोघांचं आयुष्य सामावलेलं असेलं. हातामधली तेजाची ज्योत विझू न देता, उलट आपल्यातल्या सत्वाचं तेज त्यात ओतायचं. ज्वाला प्रज्वलित ठेवायची. वाट पुढे पुढे जातच असते; आणि त्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर पळायला उत्सुक अशी तुझी दमदार पावलं आणि त्या पावलांच्या ठशात माझे पाय हलकेच ठेवत तुझ्या गतीला गाठायचा आटोकाट प्रयत्न करणारी माझी पावलं.

प्रिय, हे पत्र मी तुला उद्देशून लिहिलं असलं तरी ते मी तुला पाठवणार नाही. ते या कागदावर असंच पडून राहील. कोशात झोपलेल्या फुलपाखरासारखं. हे पत्र खरं तर मी माझ्यासाठीच लिहितेय. जे मी तुझ्याशी कधी बोलले नाही ते बोलण्यासाठी.

कधीमधी तू हे पत्र जाणू शकशील या कल्पनेनंच हा एकतर्फी संवाद मला दुतर्फी वाटायला लागतो. तू ऐकतो आहेस या भासानंच बंद दरवाज्याची कुलुपं निखळून पडायला लागतात.

ह्या ओळी तुझ्या डोळ्यांची खूप वाट पाहतील. डोळ्यांतून मनात झिरपायची वाट सापडली तर हे पत्र तुला पोहोचेल. पण हे पत्र तू कधी वाचलंच नाहीस, तर या बलाकमाला अनंत आकाशात उडून जातील. कागद रिकामा होईल. इथं हे पत्र नांदत होतं याचा पायरव सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही!

31 comments:

  1. काही भावना बोलायला गेले तर आपल्या आपल्यालाच हास्यास्पद वाटतात - पण लिहिण्याचे मात्र तसे होत नाही. हा फरक नेमका कशामुळे पडतो? कदाचित बोलणे व्यक्तीनिष्ठ राहते पण लिहिणे मात्र सार्वजनीन आणि सार्वकालिक ठरते म्हणून? - मलाही माहिती नाही.

    ReplyDelete
  2. हम्म्म्म. कशी आहेस ? अतिशय सुंदर लिहिलं आहेस...आणि म्हणून पहिला प्रश्र्न हा आला...कशी आहेस ?

    तरल...हळुवार...त्यला सुरेख शब्दांची साथ.

    लेक होती ना एक वर्ष परदेशी...त्यावेळी मी एकटीच इथेतिथे घरात फिरत असायचे...आणि अजून दोन तीन वर्षानंतर मॅडम लग्न करून गेल्या....की मग तेच करायचंय.... :) :)

    ReplyDelete
  3. या लेखाला कुठलंही विशेषण दिलं तरी कमीच वाटतंय. एव्हढंच म्हणेन, माझी आई माझ्याशी बोलतेय असं वाटलं. मस्त!!

    ReplyDelete
  4. फार तरल भावना प्रकट केल्यास शब्दातून....
    मोगरयाचा सुगंध जणू कोणी मुठीतून लपवून आणलेला, काढून दाखवतंय .....

    ReplyDelete
  5. किती सुरेख गं...अगदी माझ्याच भावना! पण मुलांना नक्की काय वाटतं कोणजाणे आपल्या बद्दल!
    त्यांना सारखं बोलून बोलून, मागे लागून लागून, चुरशीचा भाग बनण्यासाठी पळायला लावून आपण तरी मनात केव्हढी कटुता वाढवत जातो. डोळ्यात पाणीच आलं. माझ्या नंदनचा चेहेरा डोळ्यासमोर आला. किती रागवते मी त्याला रोज!

    अश्विनी

    ReplyDelete
  6. भाग्यश्री, हे वाचताना का कुणास ठाऊक बऱ्याच दिवसांपूर्वी आपलं फोनवर झालेलं संभाषण आठवलं... तेव्हा कुठूनतरी व्यायामाचा विषय निघाला होता... आठवलं?

    ReplyDelete
  7. khupach sundar....shabdach apure.........

    ReplyDelete
  8. खूप सुरेख लिहल आहेस श्रीताई ....योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत... अगदी भावूक करून टाकलस ग ...

    ReplyDelete
  9. अप्रतिम, सुंदर वगैरे वगैरे सगळीच विशेषणं तोकडी पडतील या लेखाचं वर्णन करायला !!

    पंधरा वर्षांनी हेच पत्र कॉपीपेस्ट करून ब्लॉगवर टाकेन माझ्या :))

    ReplyDelete
  10. सविता, लिहीतांना भावना जितक्या सुसंबध्द व संयत स्वरुपात मांडता येतात तितके बोलताना कदाचित त्याला जास्त वैयक्तिक व अति भावनिक कडा जास्त चटकन तयार होतात. शिवाय ऐकणारा वाचणार्‍या इतके शांतपणे ते घेऊ शकत नाही. आकलनही वाचलेल्या ओळींचे जितके सखोल होते तितके कानावर पडलेल्या शब्दांचे होत नाही. कारण लगेच विचारचक्र सुरू झालेले असते... बरीच गुंतागुंत आहे खरी या दोहोत... एकदा कागदावर उतरवायला हवी... :)

    ReplyDelete
  11. अनघे, मुद्दाम लगेच उत्तरले नाही. आधीच डोळे भरून आलेले त्यात काहीबाही लिहून जायची...:(

    आज एकदम छान आहे गं ! हा पोरटा कधीचाच गेलाय... तरी सवय म्हणून होत नाहीच. जाऊ दे. मी मुळी सवय करून घ्यायचे नाहीच असेच ठरवलेय आताशा... बेदम आठवण काढायची... अगदी त्याला उचक्या लागून बेजार होईतो... :D:D

    ReplyDelete
  12. मेघना... :):)’आई” च्या भावना सारख्याच ना गं!

    आभार्स!

    ReplyDelete
  13. शशांक, अनेक आभार. तुम्हाला पोस्ट आवडली, आनंद झाला!

    ReplyDelete
  14. अश्विनी, अगं मुलांना कळतं गं आपण का त्यांना सारखे टोकतो ते.आणि चुरशीचा भाग म्हणशील तर कधी कधी नाईलाज होतो आपलाही... :( कारणमिमांसा समजावून सांगितली नं तर कळते त्यांना चटकन... शिवाय त्यांचे वयच आहे नं राग येण्याचे. येऊ देत. पुढे जाऊन तेही हेच करणार आहेत...:)

    खूप छान वाटले तू लिहीलेस. अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
  15. हो हो आठवतेय तर मला, श्रीराज तेव्हां आस्मादिकांचे शुभमंगल अगदी हाकेच्या अंतरावर आलेले... आणि म्हणून जिम जोरावर होते... काय? :P:P

    रच्याक, आता जिमनेच गाशा गुंडाळला असेल ना... :D:D:P

    ReplyDelete
  16. शीतल आभार्स गं!

    ReplyDelete
  17. देवेन, अरे मीच इतकी भावविवश झाले होते नं... की एकटाकी लिहून गेले. :) आभार्स रे!

    ReplyDelete
  18. हेओ, कसं नं पिढ्या नं पिढ्या अखंड सुरू असलेलं चक्र आहे हे.

    धन्सं!

    ReplyDelete
  19. श्री,मन हळवं केलेस बघ..जास्त काय लिहु...

    ReplyDelete
  20. भानसताई काय अप्रतिम लिहिलं आहे. वाचताना पुरुष असूनही डोळ्याच्या कडांवर थेंब जमून आले. मैत्रिणीला वाचून दाखवून जेव्हा संपले तेव्हा ती ढसाढसा रडली. एका आईच्या अगदी आतून आलेले आतले शब्द. नात्याचा अर्थ प्रवाहीपणे मांडून मनाचा ठाव घेणारे शब्द आणि वाचून पूर्ण झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहणारे हे शब्द फक्त आईच लिहू शकते. मान गये....मी नोकरीनिमित्त गाव सोडल्यानंतर आईची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आली. बास...यापुढे आणखी काय लिहू...

    ReplyDelete
  21. कसं होतयं पाहीलंस ना प्रसाद, जेव्हां आपल्यापाशी ते असतं तेव्हांही आपण शक्य तितका वेळ देतच असतो पण कदाचित अजूनही जास्त देऊ शकलो असतो हे आज जाणवतं. मग जाणीवपूर्वक प्रवास सुरू होतो... काजव्याचे क्षण मनात जपून ठेवण्याचा... :)

    आभार्स रे, तुमचे दोघांचेही !

    ReplyDelete
  22. चुकलं माझं तायडे, नासिकला असतानाच पाहिली होती तुझी ही पोस्ट पण घाईगडबडीत वाचायची राहिली.... तिथेच वाचली असती तर चटकन आईच्या कुशीत शिरता आलं असतं..... आता पोस्ट वाचली आणि आईच्या आठवणीने डोळे पाणावले बघ....

    आईची प्रिय आणि प्रिय असलेल्या मुलांची आई दोन्ही भूमिकेत मन हळवं झालं बघ.....

    माझ्या भाच्याने वाचले का हे पत्र ? नसेल वाचले तर मी कळवते त्याला की तुझी वाट पाहाणारी आई बघ कशी हळवी झालीये....

    सुंदर पोस्ट तायडे....

    ReplyDelete
  23. ही पोस्ट इतकी हळुवार आहे की आणखी काही बोलायला शब्दच नाहीयेत ग...गेले काही दिवस तुझ्याशी बोलताना जे जाणवत होतं ते यातून पुरेपूर कळलं...
    पोस्ट टाकलीस हे अशासाठी बर केलंस आम्हाला आता जे क्षण मिळताहेत त्याचा आनंद घेता येईल...आणखी काही वर्षांनी आम्ही तुझ्या जागी असू...

    ReplyDelete
  24. तन्वी, त्याला मी सांगितलेच नाही... :).

    अगं, मन इतके काठोकाठ भरुन आलेले की कधी कागदावर इतके उतरवून गेले समजलेच नाही.

    आभार्स गं!

    ReplyDelete
  25. अपर्णा, हो गं. क्षण कसे भरभर निसटून जात राहतात... बरेचदा कामांच्या नादात आणिक नको ते त्रास करून घेऊन आपण खरे सुखाचे दिवस चिडचिडत राहतो... :(

    धन्यवाद!

    ReplyDelete
  26. khupach surekh...dolyat pani aalyaavachun rahile naahi.
    maajhi mulagi ajun chaarach varshachi aahe pan udya ti mothi jhaali ki tila maajhi evadhi garaj vatanar naahi ha vichaar karun man galbalte.tyach barobar apanahi aaplya aaila sodun asech aalo yaachi jaanivahi hote.
    lekh vaachlyavar lagech aaila phone kela tevha thode bare vatale.

    Pushpa

    ReplyDelete
  27. पुष्पा, भावना पोचल्या आनंद झाला! अनेक धन्यवाद! :)

    ReplyDelete
  28. :(
    आईची जाम आठवण येऊ लागली एकदम..कधी एकदा जाऊन तिला भेटतो असं झालंय आता..

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !