" मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया
जो लिखा था आसूंओंके संग बह गया..... "
" उचल गं बये, उचल पटकन. अगदी ऐकवत नाही मला हे गाणे आता. चार दिवस झाले फक्त हेच ऐकतोय. किटलो... विटलो. आता तुझा अतिरेक झालाय. मी घरी येतोय. च्यायला, हे कोणाला सांगतो आहेस तू? थोड्याच दिवसात तूही पागल होणार आहेस तिच्यासारखा. दोघातिघे वळूनवळून पाहत होते पाहिलेस ना तू? आणि हे सारे या गधडीमुळे. आज तिची अशी तासतो नं की काय बिशाद लागून गेलीये पुन्हा किमान महिनाभर तरी हे फेफरे येईल. त्यापेक्षा जास्त आशा ठेवणे म्हणजे स्वत:ला फसवणे होईल. निदान महिना तरी ती जगेल आणि आईही जगतील. अपना क्या हैं, सईबाई खूश की हम जिंदा वरना सुनते रहो..... मेरा जीवन कोरा कागज कोरा ही ...... "
( दारावरची बेल वाजते... एकदा दोनदा.... अखंड वाजतच राहते. आधी ऐकून दुर्लक्ष केले तरी आता निरुपाय झाल्याने संतापून सई दार उघडते. तो हातात वडापाव घेऊन उभ्या अवीला पाहून अजूनच पिसाळते.)
" अवी, मी दार उघडलेय. आता तो बेलवरचा हात काढ आणि वडापाव टिपॉयवर ठेवून चालता हो. "
( तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अवी आत घुसतो तो थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यावर स्थिरावतो. ते पाहून चडफडत सई दार आपटते आणि तरातरा अवीपाशी येते. चिडून काही बोलावे तोच अवी तिच्यासमोर वडापाव धरतो. गेल्या चार दिवसांपासून धड काहीच न खाल्ल्याने, रडून रडून दमलेली सई त्या वासाने थोडीशी नॉर्मल होते. पटकन अवीच्या हातातला वडापाव ओढून घेत ती एक मोठ्ठा घास घेते. मग अवीच्या शेजारीच ओट्यावर बसत अवीकडे दुर्लक्ष करत वडापाव खाऊ लागते. ते पाहून अवीच्या चेहरा खुलतो. )
" सये, काय भंकस रिंगटोन लावून ठेवला आहेस गं तू. मुळात या अश्या गाण्यांचा रिंगटोन बनवणाऱ्यालाच मी बदडणार आहे. बरं लावलास ते लावलास वर माझा जीव जाईतो तो ऐकवत राहतेस म्हणजे तुझ्या निर्दयीपणाची कमाल झाली. दे तो फोन इकडे मी बदलूनच टाकतो ती कटकट. "
( फोन घ्यायला जातो तशी सई डोळे मोठे करते. अवी थांबतो निमूट पुन्हा शेजारी येऊन बसतो. तशी सई सगळे चित्त केंद्रित करून वडापाव खाऊ लागते. तिला इतके मन लावून खातांना पाहून.... )
" सुटलो. नाही म्हणजे ही इतकीच लाच द्यायचा अवकाश होता हे आधीच कळले असते तर गेले चार दिवस फुकट गेले नसते. अगं, डोळे कशाला इतके मोठे करते आहेस? माझे नाही तुझेच म्हणतोय मी. आपले काय, आपण तर कायमचे रिकामटेकडे. बरं तू खा सावकाश. अजून तीन आहेत गं. "
" बरं बरं कळले बरं का. आणि काय रे, चार कशाला आणलेस? येताना तू हादडून आला असशीलच. "
" तू पण एकदम चमच आहेस गं. चार दिवस गोशात बसली होतीस न तू. दिवसाला एक....... सिंपल हिशोब. बाकी हिशोबाला तू कच्चीच आहेस. साधे कशातून काय वजा करायचे आणि कुठे कोणाला मिळवायचे हे तुला कधी कळलेच नाही. बरं असू दे. ती गणिते तुझे खाऊन झाले नं की मांडू आपण दोघे मिळून. तोवर आईंना मेसेज टाकतो, " काम फत्ते. ग्रहण सुटले. महिनाभर शांती. " आई खूश होईल. "
" अवी, ती माझी आई आहे. तुझी नाही. तिला कसे खूश करायचे ते पाहीन मी. तू कशाला सतत आमच्या मध्ये लुडबडतोस. जो असायला हवा होता तो तर गेला टाकून. आता कोणीही नकोय मला. तूही नको आहेस. जा बरं तू. "
" इतका अप्पलपोटेपणा लहान मूलंही करत नाहीत. वडापाव चापून झाला आता अवीला हाकला. स्वार्थी कुठली. मी इतका धडपडत घेऊन आलो त्याची तुला काही कदरच नाही. " ( सईच्या डोळ्यात टचकन पाणी येते, ते पाहून अवी गडबडतो. पुन्हा चार दिवस की काय या भितीने थोडा आक्रमक होतो. )
" रडा रडा. तुझे डोळे आहेत की जिवंत झरे. तुला वाळवंटात नेऊन ठेवले पाहिजे. " ( हळूच तिच्या गालावरचा अश्रू ओठांनी टिपतो. तसे सई त्याला मागे ढकलते. )
" अगं, मी चव पाहत होतो. इतके रडून रडून त्यातला खारेपणा नक्कीच संपला असणार याची खात्री होतीच मला. चल, मग ठरलं तर. सईबाई वाळवंटात गोड्या पाण्याचे छोटेसे तळे निर्माण करणार. "
" तू पण असा गोडबोल्या आहेस नं अवी.... " ( असे म्हणत येणारे हसू दाबत सई त्याला दोन धपाटे घालते. तशी तिला जवळ घेत..... )
" सये, अगं बाबा टाकून गेला तेव्हापासून तुझ्या मनाचा एक कप्पा अंधारला आहे. जेव्हां जेव्हां त्या अंधारवाटेवर तू धडपडू लागतेस तेव्हा फार एकटी होतेस.... असहाय तडफडतेस, उरी फुटून आक्रोश मांडतेस. तुझ्या ' त्या ' जगात तू कोणालाही प्रवेश देत नाहीस. अगदी मलाही. शेवटी तुझा आक्रोश, तुझे एकाकीपण शब्दामधून स्त्रवू लागते आणि सुरू होतो एक घुसमटलेला प्रवास. एकटेपणाला शब्दांची सोबत मिळण्याऐवजी शब्दांनाच एकटेपणा मिटवून टाकतो.....
परिणिती तुझे ओठ मिटून जातात....
तुझं सगळं जीवन म्हणजे दु:खाचा एक सलग प्रवास. त्या प्रवासात ज्या ज्या कोणी तुला क्षणिक सुखावलं असेल ती सारी माणसं माझ्या दृष्टीने खूप चांगली. त्यांच्या या नकळत केलेल्या कृतीमुळे तू माझ्यापर्यंत पोहोचलीस. तू मला हवीस म्हणून त्यांचे उपकार झालेत माझ्यावर. पण याचबरोबर ज्या ज्या कुणी तुझा उपहास केला, हिणवलं ती सारी माझी शत्रू झालीत. मी मनस्वी द्वेष करतो त्यांचा. करत राहीन. अगं, पण ते तर परके. काठावरून दगड मारणारे. त्यांची कुवत तितकीच आणि लायकी त्याहूनही कवडीची. पण तू का त्यांना साथ देते आहेस? तीही इतकी वर्षे? सातत्याने....?
माझ्या मन:शांतीसाठी तुझं अस्तित्व अपरिहार्य आहे पण तुझ्या जगण्यासाठी मी अपरिहार्य आहे...... ह्याची जाणीव तुला आहेच. मात्र या जाणीवेवर तुझा मनस्वीपणा मात करतो. हे जेव्हां संपेल त्या दिवशी तुझी मानसिक, शारीरिक प्रकृती सुधारेल. तुझा सर्वात जास्त छळ तू स्वत:च करते आहेस. किती काळ दु:ख कुरवाळत बसणार आहेस? हा छळ अनाठायी आहे असे मी म्हणत नाहीये गं.... परंतु यातून काहीही साध्य होतेय का? बाबाचे जाणे तुझ्या हाती नव्हते आणि त्याला थांबवणे तुला साधले नाही. नाही नाही.... मी तुला मुळीच दोष देत नाही. तो त्याचा निर्णय होता. सर्वार्थाने स्वार्थी निर्णय. तुझे काय होईल याचा विचार त्याने केला असेलच हे नक्की. पण त्याचा स्वार्थ मोठा असावा. त्यावेळी त्याला जे संयुक्तिक वाटलं ते त्याने केलं. खरं तर त्याच्यात तेवढंच बळ होतं.... तुला टाकून जाताना तो उरी फुटला नाही की त्यानंतर त्याने पुन्हा एकदाही मागेही वळून पाहिलं नाही. कदाचित त्याच्यात ती हिंमतच नसेल. कदाचित जाणूनबुजून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता तो भोगतोय. जे काही असेल ते असो. पण तो सुखी नक्कीच नसावा. केलेल्या गुन्ह्याची माफी मागण्याची ताकद नसेल त्याच्यात.
खरंय गं... मला सारं कळतंय.... त्याने एक घाव दोन तुकडे केले. खुशाल तुला-आईंना टाकून निघून गेला. स्वच्छंदी सोयिस्कर मार्ग स्वीकारला आणि सुटला. तुला टाकून... पोरकं करून. तू प्रत्येक घावाला मेलीस. परत परत मेलीस. जगाने तुला एकदाही बक्षले नाही. सारं सारं मान्य. त्याची शिक्षा स्वत:ला? आईला? मला? का? त्यापेक्षा जगाला फाट्यावर मारायचेस ना? एकटेपणा... रितेपण.. एकांत... ओहोटी यांना अंत असतो का गं? तुला कंटाळा कसा येत नाही दु:ख कुरवाळण्याचा?? अरे ते वेदनेचे तळे कधीचेच आटलेय.... त्यात पुन्हा पुन्हा तुझ्या आसवांची भर कशाला? तुला माहीत आहे नं, काही काळाने वेदना बोथट होतात... उरतात फक्त व्रण. कालांतराने तेही पुसट होतात. उगाच मला तुझे तत्वज्ञान सांगू नकोस..... काळ नक्कीच दु:ख कमी करत असतो. जग सगळं वेडं आणि तूच काय ती एकटी शहाणी का? मुकाट ऐक मी काय बोलतेय ते.... कधी नव्हे ती अशी संधी तुझ्याही नकळत तू मला देऊ केली आहेस. तेव्हा मन सताड उघडं आणि ती वांझ तडफड बंद करून ऐक.
जेव्हां गोष्टी गृहीत धरल्या जातात तेव्हा त्याची कदरच उरत नाही. तसेच काहीसे तुझे झालेय. पण जीव लावणारी व्यक्ती सर्वस्वाचं शिंपण करून सेतू बांधत असते. ते बंध खरे असतील तर त्या वंचना करणार्या हृदयाचे अश्रू कितीही अहं जोपासला तरी झरतीलच. अन त्या प्रत्येक थेंबागणिक ते मन आक्रंदन करेल. त्यांच्या संवेदना, जाणीवा एकवटतील आणि केव्हांतरी तो ’ अहं ’ लीन होईल. तिच्या वंचनेचा पराभव होईल. पण हे सारं कधी होईल..... तू त्या अंधारयात्रेतून बाहेर पडशील तेव्हा नं..... निदान प्रयत्न तरी कर.
अशी चिडू नकोस गं मी असे म्हणतोय म्हणून. तुझ्याही नकळत तू जोपासले आहेस हे दु:ख. कुठेतरी खोलवर तू आईला जबाबदार धरते आहेस. हा तुझा ’ अहं ’ तुला तिच्याजवळ जाऊ देत नाही हेही दिसत नाही का तुला? तू माझ्यापाशी असतेस तेव्हाही सतत हा कोश तुला मागे ओढत असतो. माझे सोड गं पण आई...... तिचा काय दोष आहे? ती तर दोन्ही बाजूंनी यातना भोगतेय. नवरा मेला तर निदान ढळढळीत वैधव्य घेऊन ताठ कण्याने जगता येईल गं. पण नवरा परागंदा झालाय.... का? कोण जाणे. त्याने जाताना साधी दोन ओळींची चिठ्ठी खरडण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. घरातल्यांनी, समाजाने प्रश्न विचारून विचारून तिची गात्रच बधिर झालीत. ते सगळे कमी होते म्हणून.... तू.... तू ही छळ करावास तिचा? जणू तीच तुला टाकून निघून गेल्यासारखा उभा दावा मांडलास. अगं बाबाच्या नावाची अंघोळ करून ती कधीच मुक्त झाली आहे. तू ही मुक्त हो. स्वत:साठी नको होऊस गं बाई...... आईसाठी तरी? घाबरतेस? नको घाबरूस सये.... अगं, मी आहेच नं साथ द्यायला.... सदैव. फक्त तुझा, तुझ्याचसाठी.... कायमचाच. "
" अवी, तुझी तळमळ कळते रे मला. मी चुकतेय हेही कळतंय. तरीही, मी माझा, आईचा, तुझा छळ करतेय. पण, हे दुष्टचक्र मला थांबवता येत नाही. अवी, मी पुन्हा एकवार प्रयत्न करेन. आईसाठी, तुझ्यासाठी. फक्त तू माझ्याबरोबर राहा. कायमचा. " ( असे म्हणत सई अवीला बिलगते आणि आता पुढचा दौरा कधी याचा अंदाज घेत, अवी तिला थोपटत राहतो. )
( कथाबिज काही अंशी एका सत्यघटनेवर आधारित आहे )
हे असे काही समोर आले कि शब्द थिजून जातात .....! नाण्याला दोन बाजू , त्यापण वेगवेगळ्या ... पण ते नाणे फिर् ल्याशिवाय दुसरी बाजू जगासमोर येत नाही :(
ReplyDeleteलिखाण व त्यातील विचार हे नेहमीप्रमाणेच अंतर्मुख करणारे ....
श्रीताई,
ReplyDeleteखुपच टची आणि वेगळाच विषय आहे कथेचा.
सोनाली केळकर
>>>> जेव्हां गोष्टी गृहीत धरल्या जातात तेव्हा त्याची कदरच उरत नाही. तसेच काहीसे तुझे झालेय. पण जीव लावणारी व्यक्ती सर्वस्वाचं शिंपण करून सेतू बांधत असते. ते बंध खरे असतील तर त्या वंचना करणार्या हृदयाचे अश्रू कितीही अहं जोपासला तरी झरतीलच. अन त्या प्रत्येक थेंबागणिक ते मन आक्रंदन करेल. त्यांच्या संवेदना, जाणीवा एकवटतील आणि केव्हांतरी तो ’ अहं ’ लीन होईल............
ReplyDeleteआहाहा तायडे मान गये!!!
अनेक धन्यवाद राजीव. कधी कधी तर नाण्याच्या दोन बाजूतही अनेक पदर दिसून येतात. तोच माणूस पण अचानक काही अघटित करून जातो.
ReplyDeleteसोनाली, खूप दिवसांनी तुला पाहून आनंद झाला. धन्यू गं. :)
ReplyDeleteतन्वे... :)
ReplyDeleteताई...
ReplyDeleteमला सुचतच नाहीये काय लिहू ते!
मस्त लिहीले आहेस गं...
ReplyDeletehalli tumhi mazya blogkade phirklelea nahit. ka bare?
ReplyDeleteसॉरी. प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला.
ReplyDeleteखरंच.. खूपच अप्रतिम कथा आहे. आणि तू खूप छान शब्दांत ती मांडली आहेस. तळटीपेने अजूनच कासावीस व्हायला झालं. त्या प्रत्यक्षातल्या सई आणि अवीची तगमग लवकरांत लवकर संपो (जर अजूनही संपली नसेल तर) हीच प्रार्थना..
भानस, गोष्टं खरंच सुंदर!...राजीव म्हणतात तसे 'अंतर्मुख' करणारी!! Keep it up!!!
ReplyDeleteवडापावही मस्त वापरलाय, चांगली युक्ती आहे :)
ReplyDeleteश्रीताई, इतकी अवघड मनाची घालमेल लिहिली असूनही तू वापरलेल्या अप्रतिम वाक्यरचनेमुळे आणि भाषेमुळे पोस्ट वाचताना वाचनाचा अस्सल आनंद मिळाला... अविची तडफड अगदी अगदी जाणवली..
ReplyDelete>> आहाहा तायडे मान गये!!! + १०००००
विभी... :)
ReplyDeleteधन्यवाद उमा.
ReplyDeleteप्राजक्त, अरे नजरचुकीने एखादी पोस्ट वाचायची राहून गेली असेल. रागावू नकोस हो. :)
ReplyDeleteहेरंब, कथा सत्यापेक्षा खुपच सुसह्य केली आहे रे. कधी कधी सत्य खोटे वाटावे इतके अतिरंजित असते त्यामुळे सत्य असूनही कोणाचा विश्वास बसत नाही. असो.
ReplyDeleteआभार.
श्रीराज, अभिप्रायाबद्दल आभार.
ReplyDeleteप्रसाद, वडापावचा उल्लेख तू करशीलच ही खात्री होतीच मला. :)धन्यू रे.
ReplyDeleteआनंद, तुझी प्रातिक्रिया पाहून खूप बरं वाटलं. धन्यू रे. :)
ReplyDeleteकथेचा विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि तुम्ही ती लिहिली आहेही ताकदीने...
ReplyDeleteखरच अंतर्मुख करुन टाकणारी पोस्ट आहे ही.पण त्याबरोबरच अश्या अनेक सईंसाठी खुप चांगला संदेश योग्य शब्दात दिला आहेस...
ReplyDeleteटची झालीये कथा..
ReplyDeleteaativas, अभिप्रायाकरीता धन्यवाद.
ReplyDeleteदेवेंद्र, काही सत्य-घटना विसरताच येत नाहीत. परिणाम फार भयंकर असतात त्यांचे. पण म्हणून फरफट किती काळ व किती जणांची.....
ReplyDeleteधन्यवाद रे.
धन्यू गं मीनल. :)
ReplyDeleteहम्म्म... relax...
ReplyDelete