जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, June 6, 2009

आम्ही बीर पितो...

शाळेतून बाहेर पडतानाच बऱ्यापैकी शिंग फुटायला लागलेली असतातच. आपल्याला फार कळायला लागलंय ह्या समजुतीचे पाहिले व्हिक्टिम असते ' आई '. संभाषण कुठल्याही विषयावरचे असू दे, " आई, काय गं तुला तर एवढासुद्धा कळत नाही का? किंवा वेडीच आहेस. मी सांगते ते ऐकत जा जरा. " टाईपचे आगाऊबोल येताजाता उधळले जातात. आईचे कॅरेक्टर मुळातच सोशिक, समंजस, प्रेमळ, त्यागमूर्ती. आमची आईपण तशीच. माझी अशी मुक्ताफळे ऐकून ती समजुतदारपणे म्हणे, " हो गं, खरेच की. तू समजावून सांग ना मला म्हणजे कळेल. " मग काय एकदम टीचरच्या आवेशात मी तिला.....

हळूहळू ही स्टेज मागे पडली. आमची शाळा दहावीपर्यंतच असल्याने अकरावीतच कॉलेजात गेलो. बारावी झाली तोवर रुळलो होतोच. कॉलेज-घर सगळेच दादरमध्ये. कधीमधी हॉटेलमध्येही जायला लागलोच होतो. आमचा बराच मोठा ग्रुप होता. सगळ्यांचे एकमेकांशी जमत असले तरी त्यातही काही जास्त जवळचे असतातच. आम्हा चार मैत्रिणींना एकमेकीवाचून चैनच पडत नसे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी आम्ही एकत्रच सापडणार. FYचे पहिले सेमिस्टर संपले. दादर सर्कल मधले हॉटेल ' स्वागत ' हा आमचा अड्डा होता. सीरियसली, फक्त पोटपूजेकरता आलेले खाली बसत. आणि आमच्यासारखे, टाईमपास करत वरती. मस्त मजा चाले.

स्वागतच्याच बाजूला 'उजाला " नावाचे बार रेस्टॉरंट होते. येताजाता सारखेच ते दृष्टीस पडे. आम्हा चौघींना उगाचच त्याचे आकर्षण वाटे. कधी कधी आमच्या ग्रुप मधली मुले उजालात जात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या भंकसमध्ये काहीना काही तरी वेगळेच ऐकायला मिळे. एकदा आम्ही चौघीच स्वागत मध्ये बसलो असताना, उजाला बद्दल जोरदार चर्चा झाली. शेवटी आपण एकदातरी तिथे जायचेच हा ठराव एकमताने पास झाला.

डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा ह्या उजाला आकर्षणाने उचल खाल्ली. कधी जायचे, घरी काय सांगायचे, किती पैसे प्रत्येकी लागतील, उजालात आपण काय मागवायचे अशा अनेक गोष्टींवर बरीच उलटसुलट चर्चा झाली. बराच खल होऊन शेवटी असे ठरले की प्रत्येकीने पन्नास रुपये जवळ ठेवावेत. आपल्याच ग्रुपमधल्या एकीच्या घरी जातोय असे घरी सांगायचे. उजालात काय ऑर्डर करायची ते तिकडे गेल्यावर ठरवू. एक नक्की होते की तिथे जाऊन बीर प्यायची. मुलांना अनेक वेळा ऐकलेले, बीर प्यायलो, मस्त मजा आली. आणिक पण बरेच काही. आम्हा चौघींनाही ह्या एकटे जाऊन ऐटीत बीर पिण्याची जामच अपूर्वाई वाटू लागलेली.

महिन्याला माझे बाबा पन्नास रुपये पॉकेटमनी देत. उजालात जाण्यासाठी दोन-तीन महिने पैसे जमविणे सुरू असल्याने प्रत्येकीकडे पैसे जमले होते. नाताळ च्या सुटीच्या आदल्या दिवशी दुपारी एक वाजता आम्ही चौघी उजालाची पायरी चढलो. चार चार वेळा मागे पाहत. कोणी ओळखीचे तर नाहीये ना आसपास ह्याची खात्री करून घेत आत गेलो. तिथले वेटर आम्हाला पाहून प्रथम थोडे बावचळले. आम्ही स्वागत मध्ये जायच्या ऐवजी चुकून घुसलो असे वाटून एकाने आम्हाला Next door असे सांगून थांबवण्याचा प्रयत्नही केला. " नही नही, हम सही जगह आये है. " असे पटकन आमच्यातली एकजण म्हणाली. न जाणो आमचा हात धरून बाहेर काढायचे ते
.

Main door पासून जरा लांब थोडे शांत टेबल पाहून आम्ही बसलो. दुपारी एक वाजता बीर किंवा कुठलेही ड्रिंक घ्यायला आमच्या सारख्या वेड्या सोडल्या तर कोण येणार होते? पण तरीही आम्हाला आमचे adventure जी भरके enjoy करायचे असल्याने सावध पवित्रा घेतलेला. वेटर आला. एकदा आमच्या चौघींकडे नीट पाहून त्याने मेनू दिला. फक्त खाण्याचा. बोंबला. आता इथे काय आम्ही खायला आलो होतो का? " ए तू सांग ना त्याला. मी? नाही बाई मी नाही हं सांगणार, तू सांग की. " अशी ढकलाढकली त्यालाच ऐकू गेल्याने न सांगताच त्याने ड्रिंक्स मेनू आणून दिला.

एक मेनू चार डोकी. पाहिले तर चार-पाच बीर होत्या वेगवेगळ्या, आता ह्यातली कुठली घ्यावी ह्याचा खल सुरू झाला. लंडन पिल्सनर, किंग फिशर, हेवर्ड ही नावे पोरांच्या तोंडून ऐकलेली होती. मग एकेकीचे तारे तुटायला लागले. " ए ती हेवर्ड नको गं, ती खूप चढते म्हणे. " " बरंबरं मग कुठली घ्यायची? " शेवटी लंडनला जास्ती मते पडल्याने वेटरला बोलाविले. तो आला, " yess, बोलीये" एकमेकीला कोपराने ढोसत ए तू सांग, मी सांग... चालू होते. अचानक मी संचारल्यासारखे त्याला एकदम स्वच्छ व ठाम आवाजात सांगितले," दोन चिल्ड लंडन पिल्सनर आणि त्याच्याबरोबर पनीर चिली व हराभरा कबाब आण. " मिश्किल हसत तो गेला.

पंधरा मिनिटाने खारे शेंगदाणे, काकडी, गाजर व मुळा याचे सॅलड व उकडून मसाला लावलेले हरभरे आणि पाचसहा पापड आणून ठेवले. पाठोपाठ बीर आली. वेटरने एकदम शायनिंग मारत आमचे ग्लास भरले आणि खाणे आणतोच असे म्हणत रेंगाळत गेला. मग थोडे ऑकवर्ड होत होत पण उत्साहाने आम्ही ग्लासेसचा किणकिणाट करून चिअर्स केले आणि एक मोठा घोट घेतला. एकजात सगळ्यांचे चेहरे कडूजहर झाले. झाडून सगळे वेटर व मॅनेजर आमची मजा पाहत कोपऱ्या कोपऱ्यात उभे होते. उघडपणे ' यक ' असे म्हणायचा मोह आवरत प्रत्येकीने घाईने दुसरा घोट घेतला. तरीही चव तीच,
.

खाणे आले, मस्तच होते. दोन बीर, सगळ्या चकण्याबरोबर तोंडी लावणे असल्यासारख्या आम्ही संपवल्या. आपण बीर प्यायलोय ह्या कल्पनेनेच आम्हाला उझूउझू झाले होते. वेटरने मध्येच एकदा येऊन अजून बीर हवी का अशी चाचपणी केली होती. आम्ही काही दाद दिली नाही. I guess, बीर पिण्यापेक्षा असे बार रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसण्याचीच आम्हाला भयंकर Craze असावी. ती हटके मजा अनुभवायची होती. बील मागविले. किती झाले असेल? अंदाज? फक्त रु.७५/- आम्ही पाच रुपये टीप ठेवली.( साधारण रु.१० ते १२ च्या मध्ये एक बीर बॉटल मिळत होती १९८२ साली.) खुशीत तिथून बाहेर पडलो व घरी गेलो. उजाला व बीरची अपूर्वाई पूर्ण झाली होती.


प्रत्येकी फक्त वीस रुपयेच खर्च आल्याने आमच्याकडे तीस रुपये उरले होते. दुसऱ्याच दिवशी आम्ही स्वागत मध्ये जमलो. भरपूर उजेड, ओळखीचा मेनू व दररोजचे वेटर पाहून इतके छान वाटले की बस. म्हणे उजाला, कसले गं बकवास. नुसता मेला अंधार. काय खातोय पितोय तेही नीट कळत नव्हते. ए ती बीर किती कडू होती गं आणि मेली काही चढली पण नाही. हो ना, तर काय. त्यापेक्षा हे रगडा पॅटीस आणि हा ऑरेंज ज्यूस एकदम झकास आहे ह्यावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. पुन्हा कॉलेज संपेतो आम्ही उजालाकडे चुकूनही पाहिले नाही.

16 comments:

  1. अप्रतिम्...कॉलेजच्या ह्या आठवणी..:-)

    एक आहे तुमचा हा 'कबुली जबाब' तुम्हाला महागात पदणार नाही एव्हडी खबरदारी घ्या म्हणजे झाले..:-)

    प्रसाद-http://prawas.wordpress.com

    ReplyDelete
  2. हा...हा...:)
    धन्यवाद प्रसाद.

    ReplyDelete
  3. आईग्गं! आपण खरच धन्य आहात! :D

    ReplyDelete
  4. :D, आभार यशोधरा.

    ReplyDelete
  5. बापरे.. डायनामाईट कॉंबो आहे तुमचं कॉलेज लाइफ. पण खुपच सुंदर झालाय लेख... कारण मनापासुन खरं खरं लिहिलत नां.. म्हणुन..

    ReplyDelete
  6. धन्यवाद महेंद्र. उगाच मनात रुखरुख ठेवायची नाही, हे करायचे होते पण राहून गेले.:)

    ReplyDelete
  7. वा वा ... आज एकदम वेगळ्याच विषयावरती लिखाण ... हा हा ... मज्जा आली वाचायला ... ;)
    मी एकडेच आहे. भटकतोय आणि कामात आहे जरा सध्या ... पण ब्लॉग अपडेट करायला येतोय २-३ दिवसातून एकदा ... :)

    ReplyDelete
  8. मस्त झालाय लेख, मज्जा आली वाचुन, डोळ्यासमोर चित्र उभे केलेत :-)

    ReplyDelete
  9. सही लिहिलयंस !! मस्त :)

    ReplyDelete
  10. रोहन,असं का? बरं बरं.मला कळेना, मुंबईत गेल्या गेल्या कुठे गायब झालास ते.:) आभार.

    अनिकेत, वैदेही अनेक धन्यवाद.

    ReplyDelete
  11. अशक्य ऽऽऽ

    बाप रे बाप, काय धाडस म्हणावे की अजुन काय ?
    आपला "कबुलीजबाब" फारच अवडला व मस्त एंजॉय केला, बहुतेक प्रत्येकाची स्थिती अशीच होत असावी ...
    मज्जा आली वाचुन ...
    " ए तू सांग ना त्याला. मी? नाही बाई मी नाही हं सांगणार, तू सांग की. " असे टिपीकल डायलॉग्स फार आवडले ..

    सुरेख लेखन ...

    ReplyDelete
  12. छोटा डॊन, धन्यवाद. हो ना, फारच पंचाईत झाली होती.वेटरलाही कसे सांगायचे,कोणी सांगायचे....:D

    ReplyDelete
  13. क्या बात है,अगं माझ्या मैत्रिणीची खूप आठवण करुन दिलीस तू....तिला अशीच एखाद्या बारमध्ये जाउन एकदा तरी ढोसण्याची जबरदस्त इच्छा ;)तिघींनी जायचंच म्हणून ठरवलं ही होतं....पण अजून काही मुहूर्त उजाडलेला नाही. :D
    फन्डू!!!!!!!!!बरं वाटलं, मरगळ गेली वाचून.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सखी!

      वेगवेगळ्या वयातली अशी काही खास आकर्षण गं... अपुरी ठेवायची नाहीत. :D:D

      Delete
  14. lol.. asa saglech plans tharvtat.. pan bahutek paar padlela tumchach asava! mazya maitrinini college samplyavar wine pyaychich mhanun anli hoti, "non alchoholic".. ani mag chadhlyach natak karun zopun geli hoti! :D :D

    ekandarit mast lihlay ha kissa !!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यू गं! :)

      अगं, घरी गेल्यावर नं सारखं वाटायचं की आपली चोरी पकडली जाणार. ते म्हणतात नं खाया पिया कुछ नही... तशी आमची गत झालेली. हीही.. आईला संशय आला असेल पण तिनेच स्वत: तो उडवला असेल.... कारटी इतकाही वाह्यातपणा करायची नाही हो... lol

      Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !