जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, June 3, 2009

वर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ!

अमेरिकेत आल्या आल्या काही गोष्टी समजून घेतलेल्या बऱ्या असतात. नाहीतर ते म्हणतात ना, or you will learn it hard way तशी गत व्हायची. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे कॉप, आपला ट्रॅफिक पोलीस हो. आपल्याकडे तुम्हाला माहीत आहेच हवालदाराने पकडले तर काय होते.... आता त्याला कोण जबाबदार वगैरेत आत्ता नको पडायला. तर इथे मामला एकदम वेगळा आहे. आम्ही आलो तेच मुळी एकदम लहानश्या खेड्यात. त्यामुळे मोठ्या म्हणजे, शिकागो, न्यूयॉर्क सारखे जागोजागी कॉप दिसत नव्हते. सुरवातीला फार त्रासदायक प्रकार वाटला नाही. पण लवकरच आमच्या आनंदावर पाणी पडले.

कॉपना जणू कळल्यासारखे त्यांनी अवतींभोवती फिरत राहून आमचा भ्रमनिरास करूनच दम सोडला आणि आमचा दम काढायला सुरवात केली. दबा धरून जागोजागी बसलेले दिसू लागले. कधी गल्लीच्या तोंडाशी असलेल्या पार्किंग लॉट मध्ये तर कधी बोळातच जरा झाडाचा आडोसा पाहून. वळणावर तर हमखास, गनरूपी गळ टाकून साहेब शांतपणे कॉफीचे घुटके घेत विराजमान असत. टर्न घेऊन कोणी आपल्याच नादात चाललेले असले की लगेच टॅंव टॅंव आवाज आणि दिव्यांचा चकचकाट करीत त्याच्या हृदयाची धडकनच बंद पाडून टाकत. काही वेळा तर स्पीड लिमीटच्या पेक्षा चार/पाच माईल्स जरी जास्त वेग असेल तरीही काही जणांना तिकीट मिळालेले पाहिलेय.

आमच्या गावात खरं तर एकच मेन रस्ता. त्यालाच पन्नासचे लिमीट होते. बरेचदा सगळे त्यावरून अगदी साठ-पासष्टनेही गाड्या पळवत. कॉप्सना पर्वणीच असे मग. काही रोड अगदी आतले असूनही अनेक जण धरपकड केल्यासारखे बळी पडत. तीसच्या लिमीटला जर पन्नासने तुम्ही गाडी हाकली तर तो कॉप तरी काय डोके फोडेल. काही ना काही गमती जमती त्यातून घडत असतच.

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे पकडल्यावर अगदी मृदू भाषेत हसून तो बोले, " तुम्हाला माहीत आहे ना मी का थांबवले आहे ते? " आता ह्यावर नाही माहीत म्हणायची सोय नव्हतीच. तरीही काही लोक तसे म्हणत. मग त्यावर अगदी विनम्रपणे तो सांगे, "इथे हे स्पीड लिमिट असताना तुम्ही मात्र इतक्या जोरात गाडी पळवत होतात. त्यामुळे आता मला तुम्हाला तिकीट द्यायला हवे. " जर एखादा चिवटपणे म्हणाला, " हो का? अरे मला तो बोर्ड दिसला नाही. पुढच्यावेळी मी खबरदारी घेईन. " की तो अजूनच स्माईल करत म्हणेल, " असे झाले का? बरं बरं. आता मी तिकीट दिले ना की नक्की तुम्हाला बोर्ड दिसतील. " मग तिकीट देईल आणि वर, "आता सांभाळून जा बरं का. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ." असे म्हणून जखमेवर तिखट- मीठ चोळेल.


पण म्हणून लोक स्पीड लिमीट पाळतात का? छे! ते त्यांना करायचे तेच करतात. त्यातून मग खूप मजेशीर घटना घडतात. माझे सासू-सासरे आमच्याकडे आले असताना मे महिन्यात आलेल्या पहिल्याच लाँग विकेंड ला आम्ही सेंट लुईस ला जायचे ठरवले. आमच्या पासून साधारण तीन तासाचे अंतर होते. सकाळी थोडेसेच लवकर उठून, नाश्ता करून निघायचे. म्हणजे वेळेत सगळे होईल. आर्च पाहून जवळपास थोडे फिरून परत यायचे असे ठरले.

आता ठरवल्याप्रमाणे बेत पार पडले असते तर.... एकतर लवकर उठायचे आणि तेही सुटीच्या दिवशी, इथेच पहिले घोडे अडले. मग अरे उठारे, चला आवरा, आवरा..... मला अगदी डॉ. देशपांडेंची आठवण झाली. मग अगदी त्यांच्या पद्धतीने बापलेकांना हाकारून हाकारून एकदाचे उठवले. तोवर मी व सासू-सासरे तयार झालो होतो. एकीकडे आंब्याचा एगलेस केक, सँडविचेस, वेफर्स, थोडे ज्युसचे व थोडे कोकचे कॅन्स, नॅपकिन्स, प्लेट्स, चमचे आणि पाणी असे मी तयार करून ठेवले. छानपैकी साबुदाणा खिचडी व आल्याचा चहा घेऊन सगळे तृप्त झाले आणि आम्ही घर सोडले. फार नाही ठरल्यापेक्षा दोन तास उशिरा. :)

गाडी जरा पळवतो म्हणजे झालेला उशीरातला थोडासा वेळ भरून काढू असे म्हणत गाव जेमतेम सोडले तोच नवऱ्याने एकदम पंच्याशीवर काटा नेला. त्यावेळी आमची BMW 328i होती. मी आणि नवरा पुढे व सासू-सासरे आणि मुलगा मागे बसले होते. गाव सोडता सोडता एका ब्रिज खालून आम्ही पास झालो आणि नवरा म्हणाला, " वरती ब्रिजवर मामा होता बसलेला, पाहिलास ना? " 'मामा' हे इथे रुळलेले कॉप्स चे प्रचलित नामकरण आहे. ते ऐकले आणि माझे लक्ष गेले स्पीडवर. बापरे!! आम्ही तर वीस माईल्स जास्त होतो स्पीड लिमिटच्या. म्हणजे जर मामाने आम्हाला पाहिले असेल तर आम्ही ठार मेलोच होतो. " अरे जरा हळू चालव ना. आता उशीर तर झालाच आहे. अजून त्यात तिकिटाची भर नको. "

आम्ही एक्स्ट्रीम लेफ्टच्या लेन मध्ये होतो. हे माझे बोलणे पुरे होईतो नवऱ्याने पहिला ब्रेक मारला आणि गाडी एकदम पासष्टवर आणली. बीएम होती म्हणून हे तीन सेकंदात जमले खरे पण तोवर वेळ निघून गेली होती. कॉपने आम्हाला ब्रिजवरूनच स्पॉट केले होते. त्याला फिरून आमच्या पर्यंत पोचेतो जो वेळ लागला त्यात आम्ही जरी स्पीड कमी केला असला तरी उपयोग नव्हता. नवऱ्याने गाडी एकदम राइट लेनमध्ये घेतली, जणू आम्ही त्या गावचेच नसल्यासारखे झालो. पण दुर्दैव, तोही आमच्या मागे आला आणि भसकन त्याने लाइट लावले. :(

नवऱ्याने गाडी साइडला घेतली. आम्ही नेहमीच सीट बेल्ट लावतोच पण आज तर सासू-सासरे व पोरानेही मागे बसलेले असूनही बेल्ट लावलेले होते. माझ्या सासूबाईंना चालायला त्रास होतो म्हणून आम्ही व्हीलचेअर घेतलेली होती ती ट्रंकमध्ये होती. नवरा म्हणाला उगाच गडबड करू नका. स्वस्थ बसा. पाहू काय म्हणतो. दोन मिनिटांनी तो आला. हाय हेल्लो झाले, मग म्हणाला मी पाहिले
तुला ब्रिजवरून. तू ऐंशीच्या पुढेच होतास. मग त्याने ड्रायव्हिंग लायसन्स इन्शुरन्सचे कागद घेतले. स्वतःच्या गाडीत जाऊन काहीतरी खुडबूड करून आला.

कागद परत दिले. मग आम्ही बेल्टेड आहोत हे पाहिले. दोन वयस्कर एक लहान मुलगा आहे हे पाहून थोडा सोबर झाल्यासारखा वाटला. ( असे उगाचच आम्हाला वाटत होते खरे. ) नवऱ्याला म्हणाला ट्रंक दाखव उघडून. नवरा म्हणाला बरं. उघडली तर आत व्हिलचेअर पाहून विचारले ही कोणासाठी आहे? मग नवऱ्याला म्हणाला , " तुला माहीत आहे का? हा लाँग विकेंड आहे ना. म्हणजे झिरो टॉलरन्स झोन आहे तीन दिवस. त्यामुळे तिकीट तिप्पट मिळेल. " म्हणजे बोंबला. एरवी शंभर असेल तर एकदम तीनशे.

नवरा म्हणाला, " बघ इतक्या वर्षात मला तर साधे पार्किंग तिकीटही मिळालेले नाही. आम्हाला उशीर झाला होता निघायला म्हणून मी जरा जोरात जात होतो. पण आता ह्यापुढे एकदम शार्प पासष्ट्वर जाईन. तू मला प्लीज तिकीट नको देऊस." आम्हा सगळ्यांवर पुन्हा एकदा नजर फिरवून नजरेनेच नवऱ्याला सांगत की अरे असे नाही मला करता येणार, तो स्वतःच्या गाडीत जाऊन बसला. पाच मिनिटांनी एक गुलाबी रंगाचा कागद फडकवीत आला. तो नवऱ्याच्या हातात देऊन म्हणाला, " हे घे. तिकीट नाहीये ते. फक्त वॉर्निंग देऊन सोडतोय तुला. आज सेंट लुईस ला जाऊन परत येईपर्यंत तू चुकूनही पासष्ट च्या पुढे जायचे नाहीस. आता मजा करा. तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ. " असे म्हणून आम्हा सगळ्यांना स्माईल देऊन तो निघाला.

नवऱ्याने त्याला हाक मारून ही वॉर्निंग माझ्या रेकॉर्डवर जाणार का ते विचारून घेतले. तेव्हा कळले की त्याने आम्हाला सोडले होते कारण तो ब्रिजवर असल्याने त्याच्या डोळ्यांना जरी कळले असले की आम्ही खूप स्पीड मध्ये होतो तरी त्याच्या गनमध्ये काही आले नव्हते. त्यामुळे त्याच्याकडे प्रूफ नव्हते. बिचारा, नाईलाजाने त्याला आम्हाला सोडावे लागले. आम्ही अगदी थोडक्यात बचावलो होतो. नंतर परत येईतोचा संपूर्ण प्रवास आम्ही अगदी डॉट पासष्टवर केला हे तुम्ही ओळखले असेलच. :)

8 comments:

  1. हा!!हा!!..खर आहे..'मामा'..आम्हीपण कॉपला मामाच म्हणतो..मी पण मागच्या वीकअ‍ॅड्ला लास-वेगास ला असाच जीव मुठीत धरुन गाडी चालवत होतो..असो..मजा आली

    प्रसाद (http://prawas.wordpress.com/)

    ReplyDelete
  2. tumchya bahutek post me wachly-wachto. chan lihita. kautak yache ki tumhi sattyane lihita. keep it up. chan chan liha. aamhala chan chan wachayla milu de.

    ReplyDelete
  3. hahaha bhari!!
    amhala ekda cop ni pakdle.. ani mhanala tumhi 5miles slow chalwtay.. jara jorat chalwa!! LOL

    mastay tumcha blog.. nehemi vachte mi..

    ReplyDelete
  4. प्रसाद अनेक धन्यवाद.
    प्राजक्त खूप छान वाटले,तुम्ही मनापासून लिहीलेत. असाच लोभ राहू द्या.
    भाग्यश्री,अग सेम टू सेम. नवरा आणि मुलगा मला नेहमी धमक्या देत असतात मी ड्रायव्हिंगला बसले की.
    मनापासून आभार. :)

    ReplyDelete
  5. naav avadale lekhache. majhya navaryalahee evadhya varshanantar hallich tikit milale. Tyane class vagiare karun points utaravale. Mala matra donada cop ne asech premal takid deun sodley, ekada speeding sathee aani ekada registration cha sticker badalala naahee mhanoon.

    ReplyDelete
  6. म्हणजे तुही लकी ठरलीस की.:) सीमा, धन्स ग.

    ReplyDelete
  7. भानस,
    आम्ही मुम्बईकर पण त्याना मामाच (पांडू!!!) म्हणतोय...
    पण फरक एवढाच आहे की आमचे मामा थोडेसे अरेराविच्या स्वरात असतात तर तिकदाले मामा मृदु असतात...
    असो......सर्वे मामा लोक सारखेच....
    गणेश

    ReplyDelete
  8. गणेश, मी पण मुंबईकरच.:) आपले मामा प्रथम अरेरावीच्या आणि नंतर खिशाच्या भाषेत.चालायचेच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !