जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 22, 2011

वारली - एक शाश्वतकला

आपल्या भारतात अनेकविध पारंपरिक कला आढळून येतात. अगदी रोज दारी काढल्या जाणार्‍या रांगोळीपासून कलात्मकता व योजना दिसून येते. शिवाय परगणे, प्रांत, शहरे, राज्ये बदलत जातील तसतसा या कलांवरचा प्रभावही बदलत जातो. परंतु या पूर्वापार चालत आलेल्या कला दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहेत. सिंधुसंस्कृती, मोहंजदडो मध्ये मातीच्या भांड्यावर, मडक्यांवर काळपट रंगाने रंगवलेली चित्रे असोत, किंवा पूर्वापार सुरू असलेली बाटिक व लाकडी ठसे वापरून कापडांवर त्यांचे छाप उठवून तयार केलेली राजदरबारी आढळणारी जाजमे वगैरे कलांचा, र्‍हास झालेला आढळतो. त्यामानाने सावंतवाडीची लाकडी खेळणी, सौराष्ट्रामधले कशिदा काम - कच्छी वर्क, निरनिराळे मणी, मोती वापरून केलेली तोरणे, दागिने, हैदराबादचे मीनाकाम, बांगड्या, बिद्रीवर्क, राजस्थानी मांडणा इत्यादी अजूनही तग धरून आहेत. स्क्रीन प्रिटींगने सारा बाजार ताब्यात घेतला असला तरीही बांधणी कापडे व साड्याही आपला जम बसवून आहेत. मधुबनी, तंजावर शैलीही आपले अस्तित्व व स्थान टिकवून आहेत.

या सगळ्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव टिकवून आहे ती महाराष्ट्रातील ' वारली जमातीने ' गेली ११०० वर्षे जपलेली आपली कला. वारली ही महाराष्ट्रातील आदिम जमात. श्री. भास्कर कुलकर्णी यांनी या साध्या, सुंदर, रेखीव केलेतील कलागुण हेरून ही कला समाजापुढे आणण्याचा अनन्य ध्यास घेतला. वारली कला ही स्वतंत्र असून अतिशय संयमाने रेखाटावी लागते. तेव्हा कुठे हा रेखीव व सुंदर आविष्कार जन्म घेतो. वारलींच्या मूलभूत गरजाच अतिशय कमी. जीवनाप्रती, जगण्याप्रती असलेला त्यांचा सरळ दृष्टिकोन त्यांच्या कलेतून पुरेपूर डोकावतो. ' वारली ' ही एक धर्म, प्रथा, श्रद्धा अश्या पारंपरिक गोष्टीत गुंफलेली कला. निरीक्षण, चिंतन व त्यानुसार आकलन होऊन केलेल्या प्रत्यक्ष कृतींचे प्रभावी एकत्रीकरण यांच्या आधारे कला आकार घेते.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी जेव्हां निसर्गातील गोष्टींचा, वस्तूंचाच वापर करून निसर्गाइतकीच निखळ, मोकळी भावपूर्ण चित्रे काढतात तेव्हा त्यातली निर्मळता जाणवल्याशिवाय राहत नाही. ' वारलं ' म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ' वारली ' शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग आहे. वारली चे चित्र काढताना सोपे आकार व पांढर्‍या रंगाचा आकर्षक व कल्पक वापर केलेला दिसतो. केवळ त्रिकोण, वर्तुळं, चौकोन, बिंदू, रेघा सारख्या बेसिक आकारांमधून अतिशय सहजसुंदर चित्रांचा होणारा जन्म. वारली लोकं अतिशय साधेपणाने व आनंदी वृत्तीने जगणारे असून त्यांची कलाही तितकीच साधी व आनंद देणारी. सुसंगत मांडणीतून समोर येणारे या कलासक्त समाजाचे चित्ररुपच.

वारली पाड्यात प्रत्येक घराच्या भिंतीवर आतून व बाहेरून चित्रे काढलेली दिसून येतात. शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर त्यांच्या जीवनाचे, सणांचे, देवदेवता, निसर्ग, चालीरीतींचे प्रतिबिंब मुक्तपणे चित्रित केलेले आढळते. होळी, दिवाळी, लग्ने, रोजच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी - अगदी सकाळी उठल्यापासूनच्या रोज घडणार्‍या घडामोडींची चित्रे दिसतात. पिकाची कापणी, मासेमारी, जत्रा, नृत्ये यांना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चित्रातून तेच व्यक्त केले जाते. पिकाची कापणी झाल्यावर आनंद व्यक्त करताना ' तारपा नृत्य ' केले जाते. सापा-नागाच्या वेटोळ्यासारखे दिसणारे हे नृत्य प्रसंगी आठदहा माणसांचे किंवा अगदी शंभरसव्वाशे जणांना घेऊन केले जाते. मध्यभागी तारपावादक असतो तो तारपा वाद्य वाजवत असतो. ' तारपा ' बांबूची किंवा माडाची पोकळ नळी, माडाची-ताडाची पाती, सुकलेला दुधीभोपळा, मेण व बांबूच्या चिपटीला छेद देऊन केलेल्या जिव्हाळीचा वापर करून बनवले जाते. तुतारीपेक्षा कमी बाक असलेले तारपा वाद्य देखणे आहे. उंबराचा चीक/मेण वापरून बांधणी केली जाते. दोन नळ्यांच्या मध्ये बारीकशी देवनळी असते. हे वाद्य तयार करणे व वाजवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. वाद्य वाजवताना अगदी नाभीपासून हवा भरावी लागते. जराही श्वासावरचे नियंत्रण सुटता नये. तेव्हा कुठे सुरेल सुरावट घरंगळते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत चालणार्‍या तारपा नृत्याचा प्रमुख तारपावादक असतो.

लग्न ठरले की प्रथम देवाच्या नावाने भिंतीवर रेघा ओढतात त्याला ' देवरेघ ' म्हणतात. नंतर नवरानवरीच्या नावाने रेघा ओढून घोड्यावर स्वार नवरानवरी दाखवून चौक लिहिला जातो. याला ' देव चौक ' म्हणतात. तसे पाहिले तर हे सामूहिकच चित्र असते. एकदा का देवचौक रेखाटून झाला की सगळे मिळून चित्र काढतात. वारली काढण्यासाठी वापरण्यात येणारा पांढरा रंग तांदळाच्या पेजेत डिंक मिसळून तयार केला जातो. गेरूने सारवलेल्या जमिनी, शेणाने सारवलेल्या भिंती व त्यावर पेजेच्या पांढर्‍या रंगाने बांबूच्या काड्या, चिंध्या इत्यादींचा वापर करून वारली त्यांचे जीवनच रेखाटतात. ही चित्रे साधे भूमितीचे आकार कल्पकरीत्या गुंफून जिवंत होतात. श्रद्धा, चालीरीती, रीतिरिवाज, प्रथा यांचे यथार्थदर्शन घडवणारी कला. चित्राखेरीज भिंत म्हणजे बिनकपड्याचा माणूसच. म्हणून अशा भिंतीला ' नागडी ' भिंत समजले जाते. ' पंचशिर्‍या ' हा देव पंचमहाभूतांचे प्रतीक असून त्याचा चौक कुटुंबाच्या रक्षणाकरिता चितारतात. तसेच कसलीही बाहेरची बाधा होऊ नये म्हणून ' सूर्यदेव व चंद्रदेवाची ' चित्रे काढली जातात. बहुतेकवेळी एकाच चित्रात सूर्य व चंद्र एकत्र दाखवले जातात.

पाऊस पडावा यासाठी ' कांबडी नाच ' करून वरुण देवाची प्रार्थना केली जाते. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. पेरणीनंतर पंधरा दिवस म्हणजे साधारण नागपंचमीपर्यंत हा नाच केला जातो. ' मांदल नाच ' हा कोणत्याही दिवशी व कधीही केला जातो. मात्र यात स्त्रिया भाग घेत नाहीत. परंतु या नाचाचे प्रमाण कमी होते आहे. तसेच होळी पौर्णिमेच्या आधी माघी पौर्णिमेपासूनच रोज एक छोटी होळी पेटवून नाच केला जातो. ' घोर नाच किंवा टिपरी नाच ' हा दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. कितीतरी वेळा उपाशीतापाशी राहणारे वारली नृत्यांमध्ये मात्र स्वतःला झोकून देतात. अतिशय भक्तीभावे बेभान होऊन नृत्यात रममाण होऊन जातात.

माननीय ' जीवा सोमा म्हशे ' या प्रसिद्ध वारली चित्रकाराने ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. अनेक देशांमध्ये जाऊन चित्रे काढली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. वारलीने समृद्ध केलेल्या भिंती, दालने जगभर आढळून येतात. कलेच्या केलेल्या उत्कट सादरीकरणाचा सहजसुंदर आविष्कार जगभर आपला ठसा प्रभावीपणे उमटवत आहे. ही इतकी जुनी व सुंदर कला शिकण्याचा योग गेल्या दोन वेळच्या मायदेशाच्या भेटीत आला. पहिल्यावेळी केवळ दोन तासांची जुजबी ओळख झाली मात्र गेल्यावेळी माझ्या सुदैवाने श्री. संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. म्हणतात ना, ' चाह है तो राह आपोआप समोर येऊन उभी ठाकते '. तसेच काहीसे झाले. आठच दिवसांनी परतीचे तिकीट असताना अचानक गावकरीत दोन दिवसाच्या देवधर सरांच्या वारली शिबिराची माहिती मिळाली. लगेचच धाव घेतली. सरांनी वारली कलेची समग्र माहिती देऊन वारलींच्या जीवनाची ओळख करून दिली. वारली चित्र कशी काढावीत, ते कसा विचार करतात, त्यांच्या चित्रांमध्ये यथार्थदर्शनाचा विचार नसून भिंतीच्या आतलेही दृश्य कसे दिसेल ते काढले जाते हेही समजावून दिले. सरांच्या मार्गदर्शनाची शिदोरी बरोबर घेऊन घरी परतल्यावर चित्रे काढण्याचा व हा मौल्यवान ठेवा जपण्याचा, साखळीतील एक छोटीशी कडी होण्याचा प्रयत्न.

माझ्यासारख्या सर्वसामान्य परंतु कलासक्त मनांना थोडा नेट लावून प्रयत्न केल्यास सहजी अवगत होणारी निसर्गाचा, जीवनाचा कलाविष्कार प्रभावीपणे दर्शवणारी चित्रशैली सर्जनतेची अनुभूती देऊन जाते.












तारपा नृत्य








( उपरोक्त माहिती श्री संजयसर व जालावरून संकलित )

36 comments:

  1. किती सुरेख! आदिवासींची साध्या गोष्टींमधून चित्रे काढण्याची पद्धत डॉ. कार्व्हर यांच्यासारखिच आहे.

    चित्रे पाहून शेरलॉक होम्सचा डान्सिंग मेन एपिसोड आठवला. :)

    https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/The_Adventure_of_the_Dancing_Men

    ReplyDelete
  2. मस्त.. मस्त.. सर्व प्रसंग कसले ज ह ब ह री ही... चितारले आहेस... :) खूपच आवडले मला. :)
    वारली अगदी लहानपणापासून बघत आलोय मी. पण मला वाटतंय ती ११०० वर्षे काय अजून जुनी असावी. बहुदा किमान ३००० वर्ष जुनी. कारण राजवाडे यांनी वारली जमातीचा वावर इ.स. पूर्व २००० ते १००० असा नक्की केलाय.

    हल्ली सर्व प्रकारची माध्यमे वारलीसाठी वापरली जात असली तरी पूर्वी पांढरा रंग हा फक्त तांदळाच्या पिठात डिंक घालूनच बनवलेला असायचा. आणि रंगवायला शेणाने सारवलेल्या, आणि गेरूचा हात फिरवलेल्या भिंती. जीवा सोमा म्हशे म्हणजे ते डहाणू ला राहतात आणि आजही पुरातन पद्धतीने वारती चितारतात तेच ना?

    ReplyDelete
  3. हे असं कलाकार लोकांनी ब्लॉग लिहिले (आणि कलाकारी चालू ठेवून) की माझ्यासारख्या अडाण्यांना फार कॉम्प्लेक्स येतो ब्वा !! ;)

    ReplyDelete
  4. सगळीच सुंदर आहेत पण ४,५,६ विशेष आवडली !!

    ReplyDelete
  5. खरेच किती कल्पकता व सजीवता आहे. तू दिलेली लिंक पाहिली. :) लयबध्दता!

    राज, अभिप्रायाबद्दल अनेक आभार!

    ReplyDelete
  6. रोहन, हो नं. नक्कीच या आधीपासूनच आस्तित्वात असावी. जाणीवपूर्वक जपणूक साधारणपणे ११०० वर्षांपासून होते आहे असे सरांकडून कळाले.

    हो हो, तेच ते. पुढच्या भेटीत सरांबरोबर वारलीपाड्यावर जाईन.मी काढलेली चित्रे बांबूच्या काडीनेच काढलीत फक्त पांढरा/काळा रंग वापरला.तांदुळाच्या पेस्टने प्रयत्न केला पण कागदावर म्हणून की काय वाळले की तुकडे पडत राहतात. :(

    आभार्स रे!

    ReplyDelete
  7. हेरंब, अजून एक वेगळाच प्रयत्न करायला घेतला आहे... :) छान वाटते ना पहायला. आभार्स!

    ReplyDelete
  8. खुप छान
    माझ्या ब्लॉगचा पत्ता:
    http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  9. सुंदरच !!!!!! सीडीज वर काढलीस नं..मी सुद्धा काढली आहेत...मग्ज वर पण काढ...आणि छत्रीवर काढुन बघ.छत्री उघड्ल्यावर एकदम मस्त दिसते....

    ReplyDelete
  10. प्रशांत ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  11. हो. सीडीवरच केलेय. लॅम्प शेडस वर करतेय. मस्त दिसत आहेत. :) धन्यवाद गं उमे!

    ReplyDelete
  12. वा! मस्त आलीत..
    बाकी हेरंब + १ ;)

    ReplyDelete
  13. वाह श्रीताई.... क्या बात है!!

    एकदम जबरदस्त, सगळे चितारलेले प्रसंग आवडले. मला ही कला शिकायची खुमखुमी आलीय....!!

    ReplyDelete
  14. भाग्यश्री सुंदरच गं!!! सी.डी. वर ही चित्र काढायची कल्पना मला एकदम सहीच वाटली. तुझ्या ह्या लेखातून वारलीबद्दल बरीच माहिती मिळाली. आभार! आमच्याबरोबर हे शेअर केल्याबद्दल.

    ReplyDelete
  15. धन्यू रे आनंद.

    ReplyDelete
  16. सुहास अरे जरूर ट्राय कर. थोडा वेळ लागतो चित्र पुरे व्हायला. :)पण मजा येते.

    आभार्स!

    ReplyDelete
  17. श्रीराज, बर्‍याच गोष्टींवर काढता येते वारली. दिसतेही छानच! :) आभार्स रे!

    ReplyDelete
  18. jaam bhaaree.. :)
    mi T-shirts war rangawalay asala..

    ReplyDelete
  19. छानच दिसते गं! घरातल्या अनेक गोष्टींवर कल्पकतेने याचा वापर करता येईल व दिसेलही उठावदार!

    आभार्स योगिनी... :)

    ReplyDelete
  20. सगळीच चित्रं छान आहेत भाग्यश्री तुमची! खूपच आवडली.वारली चित्रं मी पहिल्यांदा बघितल्यापासूनच ती चित्रं पाहिली की एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं होतं!
    भास्कर कुलकर्णींवरचा एक अंक ’चिन्ह’ने काढला होता तो माझ्या वाचनात अगदी योगायोगाने आला.एका रद्दीच्या दुकानात मिळाला.अफलातून, विचित्र, प्रचंड आर्त असा काहीसा हा माणूस- त्या अंकातल्या लेखांआधारे.जीवा सोमा म्हशेंना त्यांनीच मोटिवेट केलं असाही त्यात उल्लेख होता.

    ReplyDelete
  21. saglich chitre aprtim. pahtana weglya vishwat gelyacha bhas zala. mast. wegla anubhav. sagli chitre save as karun thewli....maitrinila bhet karun deto tychi....khupach mast.........by the way howes london dairy.....aawrjun sanga

    ReplyDelete
  22. आवर्जून अभिप्राय दिलात, धन्यवाद विनायक. :)

    भास्कर कुलकर्णी एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व! एअर इंडियातली नोकरी करता करताच संपूर्ण भारतभर भ्रमंती करत लोककलांचा शोध घेत गेले. मधुबनी व वारली या दोहोंनाही जगापुढे त्यांनीच आणले. अविश्रांत कष्ट करून एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. जहांगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शने भरवली. जिवा सोमा म्हशे व त्यांच्या बांधवांना जगापुढे त्यांनीच आणले. निवृत्तीनंतर डहाणू जवळील” गंजाड ’ या गावी वारली कलेसाठी आपले सर्वस्व अर्पण करून तेथेच राहीले.

    विनायक आपल्याला शक्य असेल आणि अजूनही तो” चिन्हं ’ मधला लेख आपल्याजवळ असेल तर मला स्कॅन करून पाठवाल का? आभारी आहे.

    ReplyDelete
  23. प्रसाद, अरे मी रोज वाचतेय ’ लंडन डायरी ’. मला खूप आवडले तुझे समालोचन. अभिप्रायही दिला आहेच. :) तू लिहीत राहा, त्यामुळे काही हुकलेल्या गोष्टी समजतात.

    धन्सं रे!

    ReplyDelete
  24. खूपच सुंदर व माहितीपूर्ण लिहिले आहेस !!

    ReplyDelete
  25. छान माहिती...आणि चित्र तर मस्तच आहेत...लाजवाब..:)
    आमच्या घरी पण एक चित्र आहे ..माहिते का तुला...:D
    माझ्या कलाकार मैत्रिणीने खास मिशिगन वरून पाठवले होते...तिची आणखी कलाकारी पाहायला तिला एकदा ओरेगावात बोलावून मग दोन्ही मुलांच्या t shirt वर करून एक फोटो सेशन करावा अशी कल्पना ही पोस्ट वाचून आलीय...क्या खयाल है आप का??

    ReplyDelete
  26. राजीव, चित्रे तुम्हाला आवडल्याचे वाचून आनंद वाटला. अभिप्रायाबद्दल आभार्स!

    ReplyDelete
  27. ओरेगावची चक्कर मारण्यासाठी आणखी एक छान छान कारण. खयाल तो बहुत है आनेका, देखना ये हैं की उडान कब भरनी है... फिर तुम जहा कहों चितार देंगे जी! धन्यू गं अपर्णा. :)

    ReplyDelete
  28. तू काढलेली चित्रं मी आधीही पाहिली होती. पण इथे काही नवीन आहेत. सुंदर!!!
    झी मराठीवर एक ’आभास हा’ म्हणून नवी मलिका सुरु झालीय. त्याची नायिका आर्या. तिच्या कुडत्यावर वारली चित्रं आहेत. छान दिसतात. तीन प्लेन कुडते घे आणि एक तुला, एक तुझ्या आईला आणि एक मला असे वारली चित्रांनी तयार कर. कशी आहे आयडिया? तुझं कौशल्य कायम राहील ना तुझ्या आईजवळ आणि माझ्याही जवळ. मला तर सुनेने खास माझ्यासाठी तयार केकेला कुडता म्हणून मिरवता येईल.
    नचिकेत-आई

    ReplyDelete
  29. आई, आयडीयाची कल्पना भारी आहे! पुढल्यावेळी येताना आणतेच करून. :) छान वाटले तुम्हाला आवडल्याचे पाहून. धन्यवाद!

    ReplyDelete
  30. मला जनरली ही चित्रे का कुणास ठाउक आवडत नाहीत ़ड्रेस वर पण तुझी आवडली. भिंतीवर छान दिसतात. माहिती छान.

    बी एम एम च्या बद्दल पोस्ट टाकली आहे. mpmate.blogspot.com var

    Madhuri

    ReplyDelete
  31. बरं बरं पाहते हं का. काही वृत्तांत वाचले मी. :)छानच झाला नं सोहळा ?

    अभिप्रायाबद्दल धन्यू गं माधुरी.

    ReplyDelete
  32. साधे पणा तून दिसणारी सात्विकता या वारली चित्रातून पुरे पूर दिसून येते. तुमचा लेख ही माहिती पूर्ण आहे. चित्रे पण खूपच सुरेख काढली आहेत.

    ReplyDelete
  33. मी मराठी, तुला चित्रं आवडल्याचे ऐकून छान वाटले. धन्यवाद !

    ReplyDelete
  34. ताई, खूप मस्त झालं आहे सगळंच!! मी सुद्धा मागे मातीच्या फुलदाणी वर केलं होतं वारली पेंटींग.

    तू ते सीडीज वर कागद चिकटवून केलेस का?

    ReplyDelete
  35. Confession-मला कलेतलं फारसं कळत नाही..
    पण मस्त वाटतंय सगळे फोटो पाहून.. :)

    ReplyDelete
  36. तुमचा लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. अधिक माहितीसाठी आपण prajaktashree@gmail.com वर आपला संपर्क क्रमांक देऊ शकता का?
    विषय- वारली या विषयावर लेख लिहिण्यासंदर्भात.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !