जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, April 7, 2009

मी, इस्त्री आणि शेखर

रविवार संध्याकाळ ही दर आठवड्यातील माझी वैतागवेळ आहे. दरवेळी मी ठरवते शुक्रवारी रात्री झोपण्याआधी इस्त्री करून टाकायची. पण कुठेतरी माशी शिंकतेच. राहू दे ना आज, अगदी कंटाळा आलाय. उद्या शनिवार संपूर्ण पडला आहे. त्याहून पुढे पूर्ण रविवारही पडला आहे. असे म्हणता म्हणता शेवटी नेहमीचीच वेळ येते, रविवार संध्याकाळ. नाईलाजाने मी इस्त्री करायला घेते. इथे आल्यापासून मायदेशाला आणि तिथल्या अनेक गोष्टींना मी खूप खूप मिस करते आहे. नवरा आणि मुलगा तर नेहमीच चिडवत असतात, तू राहतेस इथे पण मनाने भारतातच असतेस. अगदी खरे आहे त्यांचे. आता हेच पाहा ना, तिथे असताना मला फारसे कधी आठवतच नाही इस्त्री केलेली. आमचा शेखर होताच ना....

लक्षात आले ना, अहो शेखर म्हणजे आमचा इस्त्रीवाला. माझा स्वभाव धरसोड करण्याचा नाही. त्यामुळे मोलकरीण, दूध-पेपर-फुलपूडी-वाले आणि आमचा इस्त्रीवाला शेखर वर्षोनवर्षे तेच आहेत. माणसे कधी ना कधी थोडा वेडेपणा करणारच हे मी गृहीत धरलेले असल्याने थोड्याफार कुरबुरी झाल्या तरी आम्ही एकमेकांना टिकवून धरले आहे. शेखर, आम्ही ९१साली ठाण्यात राहायला गेल्यापासून आमच्याकडे येतोय. लाल केस, बारीक अंगकाठी, जेमतेम पाच फूट उंची, पाठीवर कपड्यांचे गाठोडे अन सायकल. दररोज संध्याकाळी आठच्या सुमारास बेल वाजली की हमखास हाच. पहिले दोन चार दिवस मी त्याला अगदी मोजून कपडे दिले, डायरीत लिहून ठेवले. नंतर लागोपाठ मला वेळ नव्हता मग त्याला एकदा आत बोलावून सांगून टाकले, हे आमचे इस्त्रीचे कपाट, ह्यापुढे तूच आत येऊन कपडे घेत जा. तसेच तारेवरचेही कपडे घ्यायचे हेही दाखवले. बस, नंतर गेल्या १७/१८ वर्षात पुन्हा मला कधीही ह्या कामाकडे पाहावेच लागले नाही.

शेखरला दार उघडले की पुढचे सगळे पद्धतशीर काम करून हा निघून जाई. कपडे किंचित दमट असले तर, "ताई काळजी नका करू मी माझ्या घरी वाळत घालतो, आणतो उद्याला. " आता तुम्हीच सांगा, नुसती इस्त्रीच नाही तर कुठले घ्यायचे, कुठून घ्यायचे, चकाचक इस्त्री हे सगळे हसतमुखाने कोण बरे करून देईल. आता कोणी म्हणेल काय इथे इस्त्री करून मिळत नाही का? मिळते ना, पण आमचा शेखर कसा मिळायचा. बरे नुसतीच इस्त्री नाही, कपड्यांना डबल मशीन मारून देईल, पायजमे शिवून आणेल, कशाचेही अल्टरेशन असू दे, का साडीला फॉल लावायचा असू दे. शेखर आहेच.

इथून गेलो की त्याला फोन करायचा अवकाश पुढच्या अर्ध्या तासात पठ्ठ्या हजर. "ताई-दादा कधी आलेत? बरे आहात ना? आठवण येते काय माझी? चला चला कपडे नेहमीच्या जागीच आहेत ना? आत्ता आणतो कडक इस्त्री मारून." " हो रे बाबा, तिथेच आहेत. कपड्यांना आणि मलाही तुझी नेहमीच आठवण येते. आता पुढचा महिनाभर मला इस्त्रीतून सुटका. " इति मी. तिथून निघायच्या दिवशी नवरा सगळे कपडे कडक इस्त्री करू घेतो. त्याची तीन आठवड्यांची सोय होते, तोवर मी पोचतेच. अन पुन्हा ते रविवार संध्याकाळचे चक्र सुरू होते. मी आणि इस्त्री दोघी एकमेकींशी जमवून घेतो पण मनातून शेखरची वाट पाहतो.

2 comments:

  1. लहानशा गोष्टीतलं पण सुख खुप मोठं असतं..

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेंद्र.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !