जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, November 14, 2009

कुमरी.....

आज बालदिन. आईकडून अनेक बऱ्यावाईट घटना ऐकल्यात. आज का कोण जाणे सकाळपासून सारखी कुमरीच आठवत होती. वाटले तिलाच लिहावे. आमची आई सिंह राशीची.... अतिशय मानी, तडफदार आणि आमचे बाबा वृश्विक. आता तुमच्या लक्षात आले असेलच. आमच्या घरात कायम फटाके फुटत असतातच. बाबांचे डंख मारणे अन वर मीठ चोळल्यासारखे हसणे आणि ते पाहून आई संतापली की म्हणणे , " अग मी नुसती गंमत करत होतो. ही उगाचच रागावते. जिथेतिथे हिचा सिंह आडवा येतो. " हे ऐकले की सिंह अजूनच गरजायला लागतो........ .

माझ्या आईच्या काही आठवणी.......

मी वर्षाची असतानाच वडील गेले. आई नेहमी म्हणायची हिला ओवाळून द्या फेकून म्हणजे होतील ते बरे. तिचे बिचारीचे बरोबरच होते. मी झाले आणि एकाएकी वडील आजारी पडले. पदरात आठ मुले व एक पोटात. मी जेमतेम वर्षाची होत होते. माझ्याच येण्याने वडिलांना असाध्य रोगाने ग्रासलेय हा आईचा त्यावेळचा त्रागा. अडतीस( १९३८ ) साली कॅन्सरवर मात करणारे-थोडेतरी जीवन वाढेल असेही औषध उपचार वडिलांना मिळाले नाहीत. अन ते वर्षभरात गेलेच.

आई आणि आम्ही सगळे अक्षरशः उघड्यावर पडलो. मरत नव्हतो म्हणून जगत होतो अशी परिस्थिती ओढवली. वडील असताना सुखाच्या राशींवर विराजमान आमची आई घरच्यांनीच होते नव्हते ते लबाडीने लुटल्याने पदरात आठ मुलांना घेऊन देशोधडीला लागली. मला तर काहीच कळत नव्हते. होता होता आम्ही सारे नाशिकला आलो. एका मोठ्या वकिलांच्या वाड्यातल्या दोन खणी जागेत आईने पोरांना घेऊन संसार मांडला. डोक्यात एकच, पोरांना जगवायचे. खूप काही कळत नसले तरी आपण भिकारी नाही. एकवेळ उपाशी राहून दिवस काढू पण कधीही कोणापुढे हात पसरायचा नाही हे त्या वयातही माझ्या मनाने पक्के गिरवलेले.

हे वकिलकाका त्यांच्याच असलेल्या शेजारच्या वाड्यात राहायचे. काकू फारच चांगल्या होत्या. त्यांचा माझ्यावर फार जीव होता. आईला नेहमी म्हणायच्या, " हे तुमचे शेंडेंफळ भारी लाघवी आहे हो. " मी त्यांच्याकडे सारखी जात असे. एखादा दिवस गेले नाही तर त्या हाका मारून मारून बोलावत. आईला विचारीत राहत, " अहो राधाक्का आमची पोर कुठे दिसत नाही ती. करमत नाही हो तिला पाहिल्याशिवाय. हे सुद्धा जेवायला आले तेव्हा विचारीत होते-का गं आज सिंधू दिसत नाही ती. द्या बरं पाठवून. " असे असले तरी जेवणाची वेळ झाली, नुसती कपबशी जरी वाजल्याचा आवाज ऐकला की मी लागलीच तिथून घरी निघून येई. वय वर्षे फक्त पाच. पण माझ्या मनात नेहमी आईचा मान असे. उद्या यांनी आईला हिणवून ऐकवता नये, " राधाक्का तुमची लेक आमच्याकडे खाते पिते. " वकिलीण काकू बरेचदा म्हणत, " अग, जेव ना आमच्याबरोबर. " पण मी ताठ मानेने सांगे, " काकू अहो आई वाट पाहत असेल ना? गरम गरम भाकऱ्या अन वांग्याची भाजी करून, मी जाते हं का. नाहीतर आईला वाईट वाटेल. " प्रत्यक्षात घरी अनेकदा अन्नच नसे.

असेच दिवस जात होते. आईच्या जीवाची घालमेल, दिवस दिवस कसली कसली कामे आणून आमच्या तोंडी घास कसा घालता येईल याची विवंचना तिचे जीवन संपवत होती. एक दिवस मी काकूंच्या घरी बसले होते. तेवढ्यात एक माझ्याच एवढी मुलगी आली. तिला पाहून काकूंनी त्यांच्या मुलीस हाक मारून म्हटले की, " अग आली बरं का कुमारिका. चला आता वाढायला घ्या. " हे एकले आणि मी खाली पळून आले. घरी आल्या आल्या आईला विचारले, " आई अग आत्ता ना काकूंनकडे एक मुलगी आली. अगदी माझ्याचएवढी आहे. त्या म्हणाल्या अग कुमरी आली बरं का.... " आईला काही कळेना ' कुमरी ' म्हणजे काय? मग ती जेवायला आली आहे हे ऐकल्यावर म्हणाली, " हात वेडे, कुमरी नाही काही. कुमारिका म्हण. अग आज मंगळवार आहे ना, त्यांच्याकडे दर मंगळवारी कुमारिका येते हो जेवायला. " हे ऐकले आणि मन अतिशय दुखले, जीवाला लागले माझ्या. पण मी काहीच बोलले नाही.

दोन दिवस गेले. काकूंनी गुरवारी संध्याकाळी हाक मारून आईला विचारले, " राधाकाकू, अहो सिंधूला बरे नाही का? दोन दिवसात पोर फिरकलीच नाही. " आईलाही जाणवले होते की मी काकूंकडे गेले नाहीये. " विचारते हो पोरीला. असेल तिच्या नादात, पाठवतेच. " असे म्हणून आईने मला हाक मारली. " शिंदा ( आई लाडाने मला शिंदाच म्हणत असे), का गं बाय गेली नाहीस काकूंकडे? " " आई, मी आता कधीही काकूंकडे जाणार नाही. तू मला सांगितलेस तरीही जाणार नाही. " " अग पण काय झाले एवढे? कोणी ओरडले का तुला?" मी चिमुरडी असले तरी भयंकर अभिमानी होते हे आईला माहीत होते. " आई मीपण कुमरीच आहे ना गं? मी काकूंकडे रोज जाते. चुकूनही कधीही त्यांच्याकडे जेवाखायला थांबत नाही. मग कुमरी म्हणून त्यांनी मला का नाही बोलावले? आता मी कधीच जाणार नाही त्यांच्याकडे. " हे ऐकले आणि आईने आधी मला हृदयाशी कवटाळले. मग माझी समजूत काढत म्हटले, " अगं ते कोकणस्थ, आपण देशस्थ ना. मग त्यांना कोकणस्थ कुमारिकाच हवी असेल म्हणून नसेल हो तुला बोलाविले. तू रागावून बसू नकोस त्यांच्यावर. "

पुन्हा थोड्यावेळाने काकूंनी आईला हाक मारून विचारले माझ्याबद्दल. आई म्हणाली, " अहो ती ना रूसलीये. तुम्ही तिला सोडून दुसरीच कुमारिका बोलावली ना त्याने ती रागावली आहे तुमच्यावर." " अग बाई, असे झाले का? बरं बरं मी काढेन हो तिचा राग." असे काकू म्हणाल्या. सकाळ झाली. शुक्रवार होता. सकाळीच काकू घरी आल्या. " राधाकाकू, अहो आज आमच्याकडे शुक्रवारची कुमारिका म्हणून सिंधूला पाठवा हो जेवायला. " असे आमंत्रण देऊन माझे गाल कुरवाळून गेल्या. आई म्हणाली, " काय शिंदाबाई, आता जाणार का? " मी ताडकन सांगून टाकले, " आई, त्यांची कुमरी मंगळवारीच झाली आहे. आज त्या उगाचच मला बोलवत आहेत. मी मुळीच जाणार नाही. " आणि मी गेलेच नाही. त्यानंतर मी त्यांच्या घरी कधीच गेले नाही.

आज मागे वळून पाहते तेव्हा वाटते की त्यांनी काही मुद्दामहून असे केले नसेल. तो काळ वेगळा होता. अगदी कोकणस्थ व देशस्थांतही फरक होत असे. पण मी पडले सिंह राशीची, मला अपमान कसा सोसावा? म्हटले तर घटना अतिशय छोटीच आहे. परंतु लहानमुलांनाही फरक कळतोच व जिव्हारीही लागतो.

17 comments:

 1. छान आहेत आठवणी . सिह राशी का तुमची ........हं..

  ReplyDelete
 2. आशाताई सिंह रास माझ्या आईची. तिच्या लहानपणची घटना आहे ही.प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 3. आता नासिकला गेले की काकूंना भेटणार आहे मी , माझे सिंह आणि वृश्चिक दोन्ही राशींच्या माणसांशी सुत जुळते....काकूंकडून अजुन ऐकते लहानपणच्या गोष्टी....
  मुळात मी खेकडा...एकदा धरलेल्या माणसाला सोडत नाही!!!!!
  मस्त लिहलयेस तू!!!!आणि असेच हवे ना गं!!!लहानपणी सहज शक्य असते मतांवर ठाम रहाणे!!!मोठे झालो की तडजोडी सुरु....

  ReplyDelete
 4. व्वाsss! छान झालायं हं लेख

  ReplyDelete
 5. तन्वी अगं जरूर भेट जाऊन आईला. खूश होईल ती. खरे आहे गं, पण आमची आई मात्र जरा अपवादच आहे.:)

  ReplyDelete
 6. अनिकेत प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.

  ReplyDelete
 7. मस्त झालाय लेख .. एकदम वेगळा विषय , वेगळी हाताळणी..

  ReplyDelete
 8. sundar lihiley. lahaan mulaanaa khoop kalate he kharech.

  ReplyDelete
 9. गौरी तुझ्या प्रोत्साहनाने उत्साह वाढतो.:)हो गं, लहान मुलेही घडणा~या घटनांची नोंद व संगती लावत असतात.

  ReplyDelete
 10. mast ch !!!!!!! -Ashwini

  ReplyDelete
 11. फ़ारच छान लिहीला आहेस.खरच अशा गोष्टी बालमनावर ठसुन जातात.तु फ़क्त त्या काळाच्या गोष्टी करतेस श्री ,हे अजुन ही चालत आले आहे.मी पण देशस्थ आहे.पण माझीच मैत्रिण संक्रातीला माझ्या हातच्या वड्या आवडतात म्हणुन ४ किलो तीळाच्या वड्या माझ्याकडुन करुन घेते आणि हळदीकुंकुला मलाच वगळते ..:(का ते..कारण मी कोब्रा नाही..आहे ना मज्जा..इथे जातीपातीचे वाद नकोत म्हणुन जास्त बोलता कामा नये एवढेच...नकळत कोणाच्या भावना दुखावल्या जातील.

  ReplyDelete
 12. माऊ अगं कमालच झाली. आणि इतके असूनही तू कशाला उटारेटा करत तिला तिळाच्या वड्या करून देते आहेस?आपला भिडस्तपणा बरोबर हेरतात गं.छे वाईट वाटले हे ऐकून.

  ReplyDelete
 13. आनंद पत्रेNovember 16, 2009 at 6:49 AM

  खरंय! लहान मुलांना मानापमान बरोबर समजतात!
  छान लिहिलं आहे.

  ReplyDelete
 14. व्रुश्चिक राशिचे डंख मारणे अन वर मीठ चोळल्यासारखे हसणे अगदी अगदी :).... आणि सिंह तर मानी असतातच. छानच झाला आहे लेख. आणि लहान मुलं सगळं बरोबर टिपतात. मला अनुभव येतातच आहेत :). मजा आली वाचताना.

  ReplyDelete
 15. आनंद प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)

  ReplyDelete
 16. रोहिणी अग आमचे बाबा म्हणजे ना, हळूच हळूच डंख मारत राहणार. पुन्हा ते इतरांना जाणवणारही नाही. सगळे म्हणत असतात की किती गं शांत व साधे आहेत.....तो तो आमच्या आईचा तिळपापड होतो.....हाहाहा....
  अगदी लहान मुलेही याला बिलकुल अपवाद नाहीत गं. कशी गाल फुगवून बसतात...गोडू गोडू दिसतात. काय बिशाद गं कोणाची त्यांचे न ऐकण्याची...:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !