जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, October 28, 2009

निचरा.......

" अहो, जरा एक मिनिट ...."
मी वळून पाहिले तर साधारण साठीच्या जवळ पोचलेल्या बाई आमच्या रुममध्ये डोकावत मला बोलवत होत्या. रुबीमध्ये बाबांची काल दुपारीच अँजोप्लॅस्टी झाली होती. तेव्हापासून बाबा अर्धवट गुंगीतच होते. पायावर वजन ठेवलेले. चोवीस तास पाय हालता नये. रात्री आईला जबरदस्तीने काकूच्या घरी पाठवून मी बाबांचा पाय धरून बसून होते. इथला आयसीयू वॉर्ड बराच मोठा आहे. पार्टिशन्स घालून केलेल्या रूम्सही प्रशस्त आहेत. अगदीच एक माणूस जेमतेम शेजारी उभा राहील अशी अवस्था नाही. सोबत थांबणाऱ्यासाठीही पडता यावे म्हणून छोट्या कॉटस आहेत. स्टाफही बरा आहे. शेवटी कुठेही गेले तरी थोडे डावे-उजवे असायचेच.

डाव्याबाजूच्या रूम मध्ये एक तरुण मुलगा होता. त्याला झोपेचे इंजेक्शन दिल्याने तो गाढ झोपलेला. उजव्याबाजूच्या रूममध्ये आजी होत्या. ब्याऐंशी-पंच्यांऐंशीच्या. रात्रभर ओरडत होत्या. आयसीयूमधली रात्र ही वॉर्डमधल्या रात्रीपेक्षा खूपच वेगळी असते. अतिशय चमत्कारिक थंड शांतता भरून राहिलेली. कुठेतरी नकळत भीती प्रवेशते. मंद दिवे, एसी बऱ्यापैकी जोरात सुरू असतो. नऊच्या आसपास सगळ्यांना शेवटचे डोस दिले, बिपी चेक केले, चार्ट भरले की नर्सेस-रात्रपाळीचे डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स, वॉर्डबॉय/बायका सगळ्यांचा राबता जवळपास थंडावतो.

पेशंट आपापल्या खोल्यांत अर्ध-पूर्ण गुंगीत आणि सोबतची माणसे आपल्या माणसांची बिकट अवस्था पाहत लवकर बरे वाटू दे चा जप करत कधी सकाळ होते ची वाट पाहत बसलेली. एक बरे आहे की इथली सकाळ साडेचारलाच होते. काकड आरतीला जसा देवाचा गाभारा धुपाच्या-फुलाच्या सुवासाने, समया-पणत्यांच्या उजेडाने लख्ख उजळून निघतो. संपूर्ण चराचरांत पक्षांची किलबिल, सुर्याची कोवळी लालस किरणे, अल्हाददायी प्रसन्नता भरून राहते ना तशीच आयसीयूतली सकाळ मला भासते. रात्रीचा थिजलेला थंडपणा एकदम संपतो आणि लगबग सुरू होते. रात्रीत कुठल्याश्या कोपऱ्यात दबा धरून बसलेल्या काळाला जणू ही लगबग हुसकावून लावते, पळ रे. आता इथे तुला थारा नाही. डॉक्टरांनी अथक परिश्रमाने व ज्ञानाने नवा श्वास फुंकलाय या जीवांमध्ये. काळरात्र संपलीये आता. हे ऐकले की काळ मनातल्या मनात छद्मीपणे हसतो. तेवढ्यापुरते घे जगून आज पण माझ्यावाचून तुला सुटका नाही असे म्हणत तोंड काळे करतो. पाहतापाहता वर्दळ वाढू लागते अन मग हे सारे विचार आपसूक मनाच्या तळाशी ढकलले जातात.

माझेही असेच काहीसे झालेले, बाबांचा पाय हालू नये म्हणून मी रात्रभर घट्ट धरून बसून होते. सोबत ही विचारांची आवर्तने. मनाने व शरीरानेही थकले होते. त्यात पूर्ण रात्र आजींचा हाकारा सुरू होता. एकच नांव त्या सारख्या घेत होत्या. अक्षरशः धोशा लावला होता. रात्रीची भयाण शांतता त्यांच्या त्या आर्ततेने व्हिवळत असलेल्या सुराने अजूनच गडद झालेली. बाबांच्या विचारांबरोबरच वात झालेल्या अवस्थेत असणाऱ्या आजींच्या मनात काय इतके सलतेय हा विचार माझी पाठ सोडत नव्हता. ही ज्योती कोण असावी आणि ती इतकी जवळची असेल तर आत्ता का बरे आजींजवळ नाहीये. तशातच या कोण बरे बाई मला हाक देत आहेत असे वाटून मी त्यांना आत या ना म्हणत रूममध्ये बोलावले.

त्या आत आल्या. बाबांकडे पाहत त्यांनी खुणेनेच कसे आहेत आता असे विचारले. मी बरे आहेत असे खुणावले. तसे चांगलेय चांगलेय असे म्हणत एकदम त्याजवळ आल्या. हळू आवाजात म्हणू लागल्या, " फार त्रास झाला नं तुम्हाला? माफ करा हो. रात्रभर त्या बरळत होत्या तेही मोठ्यामोठ्याने. पण मी तरी काय करणार. त्यांचे तोंड तर बंद करू शकत नाही. शिवाय त्यांना कळतही नव्हते काही. आता जरा वातातून बाहेर आल्यात. कॉफी पाजलीये मी नुकतीच. स्पंजींगही झालेय. थोडी तरतरी आलीये त्यांना. म्हणून आले पटकन तुम्हाला सॉरी म्हणायला." " अहो कशाला इतके कानकोंडे होताय. आजींना काही असे ओरडायची हौस आहे का? ज्या ज्योतिताईंचे नांव त्या घेत होत्या ना त्यांना भेटायचे असेल." तसे मला थांबवत त्या म्हणाल्या, " अहो मीच ती ज्योती. माझेच नाव घेत होत्या त्या. आज पस्तीस वर्षे माझ्या नावाने शंखच करीत आहेत पण तो कमी पडलाय की काय म्हणून या अर्धबेशुद्धीतही अखंड माझाच जप चालू. असेल डोक्यात काहीतरी सुरू. आपली सून किती वाईट आहे, कशी तिला अक्कलच नाही.... जाऊ दे. तुम्ही म्हणाल त्या इतक्या आजारी पडल्यात आणि मी हे काय बोलतेय. तेही आपली काही ओळखदेख नसताना."

पाहू गेले तर म्हणणे बरोबरच होते. पण कुठल्याही व्यक्तव्यामागे खूप मोठी कारणे-अनुभव असतात. दोन मिनिटांच्या संभाषणावर व दिसणाऱ्या परिस्थितीनुसार कोणासंबंधीही अंदाज बांधू नयेत की मते बनवू नयेत. सगळ्यात महत्त्वाचे चुकूनही सल्ले देऊ नयेत व ताशेरेही ओढू नयेत. अशी लिबर्टी कधीही कोणी घेऊ नये हे माझे ठाम मत आहे. मी नुसतेच त्यांच्या हातावर थोपटले. तसे त्या म्हणाल्या, " थोडा त्रास देऊ का हो तुम्हाला? तुमचे बाबा अजून झोपलेत ना म्हणून विचारतेय, जरा आजींकडे लक्ष ठेवाल का? मी पटकन घरी जाऊन त्यांच्यासाठी लापशी करून आणते. त्यांना खूप आवडते. प्लीज. " " अहो जा ना आणि उगाच लावतोड करत पळत येऊ नका. सगळे आहेत आजूबाजूला. आता माझी आईही येईलच मग मी आजींजवळ बसेन तुम्ही या आवरून. " असे म्हणून मी होकार दिला. त्याही आजींना मी येतेच पटकन, काही लागले तर ही आहेच असे सांगून निघाल्या.

दोन मिनिटे आजींशी बोलून आई आली की येतेच तुमच्याजवळ असे म्हणून मी उठतच होते तोच आई आलीही. तिला घरी कुठले चैन पडायला. बाबांची गुंगी कमी झालेली होती. स्पंजिंग सुरू होते. आई म्हणाली तू थांब आजींजवळ मी आता पाहते बाबांचे. पाच मिनिटे शांततेत गेली तोच आजींनी एकदम मुद्द्यालाच हात घातला. त्यांची अँजियोग्राफी झालेली होती. जरा हबकल्या होत्या पण मुळचा कणखर स्वभाव असावा. " अग भिंतीलाही कान असतात हे तर पार्टिशन. हळू आवाजात बोललात तरी मी ऐकले तुमचे बोलणे. ( आजी मी तर काहीच बोलले नाही हो. अर्थात हे मी मनातच बोलले. ) खरे सांग, मी रात्रभर ज्योती ज्योती करत होते का? जळळलं मेलं लक्षण. ( आता हे जळ्ळलं मेलं लक्षण नक्की कोणाला होतं... सुनेला की स्वतःला??? विचारता नये हे असे प्रश्न हे खरे तरी मनात येतातच ना. शिवाय हे असे न सुटलेले प्रश्न फार छळत राहतात नंतर
) ऐकले मी त्यावर ज्योती काय म्हणाली ते. " आता ज्योतीची बाजू घ्यावी तर मला या सासू-सुनेचे काहीच माहीत नाही. काहीच न बोलावे तर आजींना वाटायचे मी एकतर दुर्लक्ष करतेय किंवा काय जहांबाज सासू दिसतेय गरीब बिचाऱ्या सुनेला छळतेय आणि वर आव आणतेय असे म्हणत त्यांना दुष्ट ठरवतेय.

आजींशी यावर मी काय बोलू हे मला समजेना. पण आजींना माझ्या प्रतिसादाची गरज नव्हतीच. आजी आवेगाने बोलू लागल्या, " अग अशी सून मिळायला खरेच भाग्य लागते. पण मला मेलीला हे उमगायला इतकी वर्षे जावी लागली. हे नेहमी म्हणायचे, " कुंदाबाई, अहो दुसऱ्याची लेक आपल्या पोराला सुख लाभावे, घरात नातवंडाची किलबिल असावी. म्हातारपणी लेकीच्या मायेने आपले दुखणे-खुपणे पाहावे अन आता उतारवयात उरलेले जिभेचे चोचले पुरवावेत म्हणून आणलीत. पण तिला लेकीची माया देणे तर दूरच राहिले हो किमान ती आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग आहे हे समजून वागा जरा. किती घालून पाडून सारखे बोलत असता. माझ्या आईने तुला दिलेला त्रास तू तिच्यावर का काढते आहेस? विसरलीस का स्वतःचे दिवस? अग परक्याची पोरं ती. एकही दिवस तिच्यासाठी आपण काही केलेले नाही की खस्ता खाल्ल्या नाहीत तरीही तिच्याकडून तुझ्या अपेक्षा किती. कुंदा, आधी प्रेम लावावे मग आपोआप समोरून प्रेमच मिळते. ते मागावे लागतच नाही. जरा समजून घे."

पण मी कधी ऐकले नाही यांचे म्हणणे. नेहमी ज्योतीला धारेवर धरले. अगदी क्षुल्लक गोष्टीतही तिचा मानसिक छळ केला. हेच भांडे का घेतलेस? ही भाजी अशी का केलीस? पहाटे पाचला उठून सगळा स्वयंपाक करून ती कामावर जाई पण मी चुकून तिला म्हटले नाही की तू फक्त तुमच्या दोघांचा डबा करून जा बाकीचे मी आवरेन नंतर. जणूकाही ज्योती येईतो आमच्या घरात जेवण होतच नव्हते. फार वाईट वाटते पण लेक आणि ती जरा दोन मिनिटे बोलत आहेत असे दिसले ना की मला राग येत असे. लागलीच त्यांच्या मध्ये तोंड घालून एकतर लेकाला किंवा ज्योतीला तरी काहीतरी लागट बोलून त्या दोघांचा मूड मी घालवत असे. कधी पोरीला नावाजले नाही की दिवस असताना तिच्या आवडीचे दोन घास वाढले नाहीत. माझ्या सासूबाईंनी मला केलेला जाच मी ज्योतीकडून फेडून घेत राहिले. हे गेले अन मी एकटी झाले. त्या एकटेपणाचा त्रासही बिचाऱ्या माझ्या सुनेलाच झाला. मी जास्त दुराग्रही झाले. जरा काही मनाविरुद्ध होतेय असे वाटले तरी त्रागा करू लागले, मोठ्याने रडू लागले. मी एकटी आहे हे पाहून माझी सून आता मागच्या सगळ्या जाचाचा वचपा काढेल ही भीती माझ्या मनात खोलवर बसली होती. त्यात आजूबाजूचेही असतातच गं कान भरायला.

पण गेल्या काही महिन्यांपासून मला स्वतःचाच फार राग येतोय. खूप छळले मी पोरीला. आता देवाने थोडेसे दिवस द्यावेत मला म्हणजे मी सुधारीन चूक. तू म्हणशील, म्हातारीला मृत्यूचे भय वाटतेय त्यात आता अंथरुणावर खिळायची वेळ आली तर हाल होतील म्हणून मी खोटेपणाने वरवर पश्चात्ताप झाल्यासारखे बोलतेय. तसे नाही गं, खरेच नाही. जीव जायच्या आधी ज्योतीची क्षमा मागायची आहे. तिला मायेने जवळ घ्यायचेय. गेलेली वर्षे मी तिला परत देऊ शकत नाही पण जाण्याआधी तिच्या मनातली तगमग तरी कमी करेन. हे सगळे तिला सांगायचा मी खूप प्रयत्न केला पण मेली जीभ लुळीच पडते. मन घाबरते, ज्योतीला यातही माझा काहीतरी हेतू आहे असे वाटले तर.... तू सांगशील का तिला हे सारे? जीव फार कासावीस झालाय. तिला कोणीतरी सांगायला हवे गं. तू ओळखीची नाहीस तरीही सगळे बाहेर आले कारण एकच की हे माझ्यासाठी तू रचून-बनवून तिला सांगत नसून खरेच मला असे वाटतेय हे नक्की तिला उमजेल. तशी अतिशय समंजस व हळवी आहे ती. म्हातारीला घेईल समजून.पुन्हा मीच अपेक्षा करतेय ....."

हे वाक्य पुरे होतेय तोच ज्योती आत आली. " आई, मी काही संत नाही की देव नाही. मला तुमच्यामुळे प्रचंड त्रास झालाय तो असा पुसला जाणार नाही की भरूनही निघणार नाही. असे असले तरी वाईट गोष्टी लक्षात ठेवून आधीच निसटून गेलेल्या माझ्या चांगल्या दिवसांमध्ये मी अजून भर मात्र मी घालणार नाही. आजपासून पुन्हा नव्याने सुरवात करूयात. चला ही गरम गरम लापशी खा बरं आधी. खूप वेळ बोललात, धाप लागलीये तुम्हाला. मी ऐकलेय सगळे. तेव्हा आता जीवाची तडफड करू नका आणि पटकन बरे होऊन घरी या. " असे म्हणत ज्योतीताई आजींना भरवू लागली तशी मी दोघींची तंद्री न मोडता हलकेच निघून बाबांकडे आले. आईनेही बरेचसे ऐकले होतेच त्यामुळे तिने," काय गं? ठीक आहे ना आजींना आता?" असे विचारताच मी नुसती हसले.

दोन दिवसांनी बाबांना स्पेशलरूममध्ये हालवले आणि आजींनाही दुसरीकडे. निघताना त्या दोघींचा निरोप मी घेतला. अचानकपणे मी त्या दोघींच्या जीवनातील फार महत्त्वाच्या व हळव्या क्षणांची भागीदार बनले. अप्रत्यक्षपणे त्या दोघींमधला दुवा झाले. आजींच्या वागण्यात मूलग्रामी बदल घडला असेल असे मला वाटत नाही. शिवाय त्यांनी कितीही सांगितले की मी म्हातारी झालेय-एकटी पडलेय म्हणून हा पश्चात्ताप नाही तरीही ज्योतीताईंना कुठेतरी हे वाटणारच आणि बोचणारच. हा बसलेला पीळ सहजी सुटणारा नसला तरी किमान काही हळवे तंतू त्या दोघींमध्ये निर्माण होतील. जात्या जीवाला थोडा दिलासा व ज्योतीताईंना इतक्या वर्षांनी का होईना सासूबाईंना माझी किंमत कळली याचे ओझरते सुख मिळेल अशी आशा आहे.

18 comments:

  1. prajkta खूप दिवसांनी दिसलात.दिवाळीच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. कथा आहे की खरं आहे माहित नाही पण छान आहे....:)

    ReplyDelete
  3. अपर्णा अग सत्य घटनाच आहे ही. सप्टेंबर २००७ मध्ये माझ्या बाबांना रूबीत ठेवले होते. शेजारीच या आजी होत्या. अजून बरेच काही बोलणे झाले पण सगळेच काही लिहीणे शक्य नाही.नावे अर्थातच मी बदललीत व मुख्य मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला.
    आभार.:)

    ReplyDelete
  4. Harekrishnaji देवाच्या कृपेने माझे बाबा छान आहेत आता. नुकतेच दहा दिवसांची काश्मिरसहल करून परतलेत.:) आभार.

    ReplyDelete
  5. सत्यकथा आहे हे समजले, कारण माहित असलेला तुझा स्वभाव. सगळीकडे हेच का घडते गं!!!आपल्या तरूण सुनेचे नवे नवलाईचे दिवस कोमेजून काय मिळते???बरं आजकाल वयोमान वाढले त्यामूळे सुनेला सुना आल्या तरी सासूबाई थकलेल्या नसतात.....
    तु लिहीलेल्या कथेचा शेवट सुखद आहे पण खरं सांगू का ताई मी असे अनेक घर पाहिलेत की जिथे हा गोंधळ संपत नाही.....असो तू लिहीलयेस खुप छान!!!

    ReplyDelete
  6. खरंच अशा वेळची ज्या माणसाचं ऑपरेशन/प्लास्टी आहे त्याची मनःस्थिती आणि इतरांची म्हणजे जवळच्या नातेवाईकांची कशी असते ते शब्दात मांडता येणंच शक्य नाही. त्यातल्या त्यात पेशंट जर वयाने मोठा असेल तर ते अजुन अवघड होतं. जेंव्हा आत ओटी मधे ऑपरेशन सुरु असतं तेंव्हा मनात येतं, की आपण कोणाकोणाचे नुकसान केले, कुणाला फसवले, सगळ्यांची मनातल्या मनात माफी मागत असतो आपण.. असो.. अगदी व्यवस्थित लिहिलाय अनुभव..

    ReplyDelete
  7. तू केलेले हॉस्पिटल चे रात्रिचे आणि सक़ालचे वर्णन आतिशे मार्मिक आहे....मला असलले कही अनुभव आठवले...
    आजिन्चे आणि ज्योतिचे पॅच अप झाले ते बरे झाले....सर्वे सासू लोकना अशी सद्बुद्धि मूलाच्या लगना नंतर यायला हवी , त्तर परिवार सुखी होतिल...म्हांतात ना "बेटर लेट दॅन नेवर...".

    ReplyDelete
  8. फ़ारच छान लिहीले आहेस..मध्यंतरी सकाळच्या पेपर मध्ये एक लेख आलेला..पुरक कोण म्हणुन...सासु सुनेचे नाते,नवराबायकोचे नाते,अशाच अनेक नाते संबंधावर आधा्रीत होता.ही नाती किती एकमेकांशी पुरक हवीत.त्याचीच आठवण आली.

    ReplyDelete
  9. तन्वी, क्रिया प्रतिक्रिया या न्यायाने त्या क्षणांपुरते- आजींचे आजारपण, इतक्या वर्षांचे ज्योतीताईंचा सोशिकपणा व अचानक आजींचे पड खाणे....मी पड खाणे हा शब्द मुद्दाम वापरते आहे. कारण तू म्हणतेस तसे हा सुखान्त शेवट नसून ही उचलेली पहिली स्टेप होती. परंतु खरी परिक्षा पुढे आहे.यात ज्योतीताईंना मार्क्स जास्त जातात--त्यांच्या मनात नक्की आले असणार, आजींची ही उपरती फार काळ टिकेलच असे नाही, तरीही त्यांनी हात पुढे केला. हे फार महत्वाचे वाटले मला. उद्या आजी पूर्वीसारख्याच वागल्या तर ज्योतीताईंना मी आजींना संधी दिली नाही ही खंत वाटणार नाही. असो.
    नातेसंबंध--फार अनाकलनीय व गुंतागुंतीचा प्रकार आहे. असे सुखान्त शेवट प्रत्यक्षात एक टक्का तरी घडत असतील का हा प्रश्न मनात येतोच.

    ReplyDelete
  10. महेंद्र, पेशंट व त्याचे अगदी जवळचे नातेवाईक यांची मनस्थिती फार चमत्कारीक असतेच. प्रत्येकजण वेगवेगळ्या आवर्तनातून एकाच वेळी भिरभिरत असतात. या सगळ्याची जर फिल्म काढली ना तर कदाचित जन्मात न कळलेले आपल्याच माणसाचे एक वेगळेच रूप समोर येईल.बाबांच्या पहिल्या आजारपणात २३ दिवस बाबा आयसीयू मध्ये होते. लिहीन कधी त्यावरही. काय काय अनुभवलेय......
    असो. आज बाबा चांगले आहेत, आनंदात आहेत.ते तसेच राहोत.बस अजून काय हवे.

    ReplyDelete
  11. गणेश फार भयानक रात्री मी अनुभवल्यात रे. जीवांची मृत्यू व जीवन यांच्या सीमारेषेवरील घुटमळ.... ओह्ह्ह...काटा आला अंगावर.

    आजी व ज्योतीताईंचे पॆचअप झाले खरे पण टिकले का नाही कोण जाणे. आशा आहे सूर जुळले असतील.:)

    ReplyDelete
  12. माऊ,खरे आहे. ही नाती एकमेकांशी पुरकच हवीत. आणि नेमकी तीच विसंवादी असतात.:(

    ReplyDelete
  13. निचरा हे योग्य शीर्षक असलेला
    तुझा अनुभव खूप आवडला.
    हॉस्पिटलचे वर्णन अगदी डोळ्यासमोर येते.विशेषतः रात्रीचे शहारा आणणारे वर्णन !
    वेगळ्याच वळणावर भेटलेल्या सास-बहू...एकंदरीत मनाला स्पर्श करून
    जातो.

    ReplyDelete
  14. मधुमती, तुला तर १९९५ पासूनची बाबांची नाजूक परिस्थिती मग मधली दहा वर्षे खूप छान व पुन्हा २००७ हे वर्ष अतिशय तणावाचे हे सारे माहीत आहेच. खूप भयावह दिवस काढलेत गं आयसीयूत... असो.
    प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !