जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, October 10, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........२


अलाहाबाद फोर्ट

शेट्येकाकूंना ताप भरल्याने त्यांना व काकांना न घेता आम्ही बाकीच्या मंडळींनी अलाहाबादमधील काही गोष्टी पाहिल्या. अगदी बारीक सारीक तपशील तर मला फारसा काही आठवत नाही. अलाहाबादचा किल्ला चांगलाच लक्षात राहिला. यमुनेच्या उत्तर तिरावर १५८३ दरम्यान अकबराने हा किल्ला स्वतःच्या देखरेखेखाली बांधवून घेतला होता. या किल्ल्याच्या बाहेरील दगडी भिंती किंवा तटबंदी म्हणूयात अवाढव्य आहे व अतिशय प्रशस्त किल्ला आहे.

किल्ल्यात ' अशोक खांब 'आहे. हा खांब पाहण्यास इथे खास गर्दी नेहमीच होत असे. याची उंची १०.६ मीटर असून हा २३२ इसपू मध्ये बांधलेला आहे. शाळेमध्ये हे इसपू आले की हमखास आमचा घोळ ठरलेला. इतिहास मला आवडायचा पण सनावळी आल्या की आम्ही धारातीर्थी. मला नेहमी प्रश्न पडे, इतक्या पराक्रमी-शूर लोकांनी गाजवलेले शौर्य, महान कार्य लक्षात ठेवणे महत्त्वाचे की ते कधी झाले होते ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे. जरा एखादा आकडा चुकला की लागलीच दोन मार्क गेलेच समजा.

प्रसिद्ध सरस्वती कुंडही इथेच आहे. या कुंडात सरस्वती नदीतून पाणी येते असे काही म्हणतात तर काहींचे म्हणणे हे असत्य आहे. झाले यावरून लेलेकाका व नाईककाकूंचे जुंपले. दोघेही इतिहासाचे शिक्षक. कोणीच माघार घेईना. शेवटी शाळेत गेल्या गेल्या इतिहास खणून काढतोच आणि पुरावाच टाकतो तुमच्या समोर असे म्हणत लेलेकाका तरातरा निघून दुसऱ्या टोकाला असलेल्या एका महालात गायब झाले.

किल्ल्याच्या एका बाजूला जोधाबाईचा महाल आहे. आम्ही बराच वेळ त्या महालाची सुंदर कलाकुसर, सजावट पाहत असल्याचे मला अजूनही आठवते. तिथेच ' पातालपूर मंदिर ' व त्यात ' अक्षय वाट ' आहे. जमिनीखाली असलेली ही ' अक्षय वट ' पाहायला आम्ही गेलो खरे पण सगळी पोरे लागलीच वर पळून आली. आता मलाही गिरीषचे म्हणणे पटू लागले होते. सारखी ऊठ सूट मंदिरेच काय दाखवतात हे.

काकूंच्या आजारपणामुळे आणिक एक दिवस मिळाला व लागलीच आम्ही अलाहाबाद म्युझियम पाहायला गेलो. हे म्युझियम प्रचंड मोठे आहे. १८ गॅलऱ्या असून मोठी मोठी सुंदर दगडी शिल्पे व कोरीवकाम आहे. तसेच राजस्थानी कलाकृती व खूप जुनी नाणीही पाहिल्याचे आठवते. इथेच तैलरंगातील अप्रतिम चित्रेही आहेत. हे म्युझियम पाहताना इतके चाललो की पाय दुखू लागले. आणि सारखे सारखे हे पाहा ते पाहा झाल्याने सगळी मुले कंटाळली. घरी जाऊया ची भुणभूण सुरू झाली. भुकेने पोटे खपाटीला गेलेली आणि पायात गोळे आलेले. शेवटी आनंदभवन पाहून परतायचे ठरले.

आजही मला उगाचच त्या आनंदभवनचा राग येतो.
आनंदभवन म्हणजे चाचा नेहरूंचे( घराण्याचे ) घर. नुकतेच म्हणजे १९७० साली श्रीमती इंदिराजींनी ते भेट दिले होते व त्याचे म्युझियम मध्ये रूपांतरण झालेले. ते पाहायला अलाहाबादच्या इतक्या जुन्या व अप्रतिम म्युझियमपेक्षाही जास्त गर्दी होती. नेहरूंच्या, इंदिराजींच्या व परिवारातील अनेक जणांच्या खाजगी गोष्टीच इथे आहेत. नेहरूंची स्टडी व महात्मा गांधीजींची खोलीही आठवतेय. एकदाचे हे सगळे पाहून आम्ही धर्मशाळेत परतलो. तोवर मामांच्या महाराजाने साधेच पण सुंदर जेवण तयार ठेवले होते. ते जेवून सगळी मंडळी डाराडूर झोपली.

आता शेट्येकाकूंना बरे वाटू लागेल होते. मग मामा म्हणाले आज पाटणा गाठूया. गरम गरम सांजा व आल्याचा चहा घेऊन आपापली बोचकी सांभाळत सगळ्यांची वरात सिटी स्टेशनवर पोचली. आमचे बुकींग बहुतेक आदल्या दिवशीचे असणार कारण जेव्हां गाडी आली तेव्हा कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी अवस्था झाली. मामांनी सांगितले होते की काहीही झाले तरी सगळे गाडीत चढा. ज्या मिळेल त्या डब्यात चढा मग एकदा गाडी सुटली की पाहू. त्याप्रमाणे अर्धे लोक जीजान लगाके नेहमीच्या लोकलच्या सवयीने चढले. आम्ही व अधिकारी मंडळी एकत्रच होतो. हुडकत हुडकत मामा आले तेव्हा कळले की एकूण चार फॅमिलीज चढल्याच नाहीत.

पाटणा-पाटलीपुत्र नावाने ओळखले जाते. मगधाची राजधानी. नुकतेच मी वाचले होते. शिवाय नालंदा विद्यापीठ इथेच असल्याने मला जरा जास्तच आपुलकी वाटत होती. गुरूकल पद्धतीबद्दल बरेच काही एकले होते. प्रवास सुरवातीला त्रासदायक झाला खरा पण मग नेहमीप्रमाणे जेव्हां आम्ही चढत होतो तेव्हा आम्हाला अडवणारी मंडळी एकदा का आम्ही त्यांच्या कळपातले झालो म्हटल्यावर एकदम सामंज्यसाने वागू लागली. नंतर पुढच्या प्रत्येक पुढच्या स्टेशनावर आम्ही त्यांच्यातले झाल्याने लोकांना अडवू लागलो. कशी गंमत असते नाही.

एकदाचे पाटण्याला पोचलो. इथेची धर्मशाळाच होती. पण इथे वेगवेगळ्या खोल्या नव्हत्या. एकच भली मोठी खोली होती. त्यात आम्ही पोचलेले सगळे दहा/बारा चौकोनात लक्ष्मूण रेखा आखल्यासारखे आपापल्या चौकटीत सामान टाकून पसरलो. अजून मागे राहिलेले लोक आलेच नव्हते. मामांचा जीव खालीवर झालेला. उलटे परत जाऊ शकत नाही त्यामुळे वाट पाहणे बस. शेवटी एकदाची सगळी मंडळी येऊन पोचली आणि एकदम गदारोळ माजला. जोतो काहीतरी बोलत होता. कोणाचे कोणाला ऐकू येईना. आम्ही सगळी मुले एका भिंतीशी रांग करून टेकून बसून सगळी गंमत पाहत होतो. अर्धातास ही धुमश्चक्री झाल्यावर सगळे थकले आणि गप्प बसले. आपलेच दात आणि आपलेच ओठ त्यामुळे मामांना कोणालाही काही बोलताही येईना. शेट्येकाकू आजारी पडल्या त्याला मामा थोडेच ना जबाबदार होते पण हे कोणी ध्यानात घेईचना. बिचारे मामा.
सकाळी आम्ही गोलघर पाहायला गेलो. याच्या बऱ्याच पायऱ्या १४५ का १५० चढून वर गेलो. आता हे सगळेच बदलले असेल पण त्यावेळी फारशा उंच बिल्डिंग्ज नव्हत्याच. त्यामुळे वरून संपूर्ण पाटणा शहर व गंगेचा अप्रतिम नजारा दिसतो. थंड आल्हाददायक वारा होता. बराच वेळ इकडून पाहा तिकडून पाहा असे करत तिथे घालवला. पायऱ्या उतरताना शर्यत लावून उतरलो. खूपच मजा आली.

तिथेच चाटच्या गाड्या होत्या. मग ' दही चाट ' व ' समोसा चाट ' प्रथमच खाल्ले. आधी आमची मजल फक्त कधीमधी पाणीपुरी इथवरच गेली होती. इतके अप्रूप वाटले आणि चवही ब्येष्ट होती. पण अजूनही आठवतेय ते ' लिट्टी चोखा " त्याचा ते चाटवाले काहीसा वेगळाच उच्चार करत होते. आपली भाकरी-भरीत असते ना त्याच्याशी मिळते जुळते. या लिट्टी/लाट्या असतात ना त्या गव्हाच्या पिठाची जाडसर पुरी बनवून त्यात सत्तूचा भगरा मसाले घालून शिजवतात व या पुरीत भरून ती तळतात. आणि चोखा म्हणजे वांगे कोळशावर भाजून नंतर ते सोलून कुस्करायचे व टोमॆटो, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून त्याचे भरीत बनवायचे आणि ते या लिट्टी बरोबर खायचे. एकदम मस्त प्रकार आहे. इतके सुंदर पदार्थ पोट तुंडूब भरेतो खाऊन सगळे आहारले. नालंदा पाहायला जायचे तर आधी थोडे सुस्तावूयात. मग जाऊ हो चहा घेऊन असे म्हणत आपापल्या चौकटीत लोळले.

फोटो जालावरून
क्रमश:

6 comments:

  1. लय भारी....चार फ्यामिलीज राहिल्या.....वाचतांना तुझ्याबरोबर फिरत असल्यासारखे वाटतेय.....लिही गं पुढचे पटापट...

    ReplyDelete
  2. chhanach chaalali aahe lahanapanechee sahal. itakya divasaanche sahal mhanaje parvaneech vaatalee asel natemvhaa!

    ReplyDelete
  3. मालतिनन्दनOctober 11, 2009 at 6:12 AM

    वाचतो आहे.प्रवासवर्णने हा तसा मनोरंजक प्रकार. आणि हे लेखनही फार मजेच चालले आहे. असेंच चालू दे. माझ्या मुशाफिरीचे रेकॉर्ड मोडावे ही शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. तन्वी अगं इतके लोक खाली राहीलेत म्हटल्यावर मामांचे धाबेच दणाणले गं. आले बाई शेवटी धडपडत. हेहे.

    ReplyDelete
  5. गौरी अनेक धन्यवाद. हो ना त्याआधी मुंबई-गोवा हा चोवीस तासांचा बोटीचा प्रवास हेच काय ते अनुभवलेले.खूपच मजा आली:)

    ReplyDelete
  6. अरुणदादा अरे मी आपले जेवढे आठवेल तसे लिहीण्याचा प्रयत्न करतेय.तशी लहानच होते ना तेव्हां:)बाकी आहे खरा मनोरंजक प्रकार.आशा आहे तसेच वाटत असेल.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !