जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, October 20, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........१०


ओरिसा प्रशासनाच्या एकदम खिळखिळ्या झालेल्या बसने आम्ही साधारण दोन तासात जगन्नाथपूरीला पोचलो. हे अंतर ६०/७० किमी इतके असले तरी बसमध्ये कोंबलेली माणसे व बसची अवस्था तिला ताशी ३० किमीच्या पुढे काही जाऊ देत नव्हती. आमची सगळ्यांची अवस्था बससारखीच खिळखिळी झाल्यावरच आमची सुटका झाली. गायतोंडे आजींना मामांचा अगदी राग राग आला होता. पण बिचाऱ्या काही बोलल्या नाहीत. शेवटी मामाच म्हणाले, " आजी, अहो दोन-चार शिव्या देऊन टाका मला. नाही म्हणजे उगाच राग कोंडून ठेवाल आणि पुन्हा आम्हा सगळ्यांना एक झटका द्याल. त्यापेक्षा मी तयार आहे......होऊन जाऊ दे, काय? " तसे सगळे जोरात हसले.

रात्र चांगलीच झालेली त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्न नव्हताच. दिवसभर वणवणही बरीच झाली होती. मस्त जेवण आणि गाढ झोप याची नितांत गरज होती. लेलेकाकांनी एकदम कोकणस्थी पवित्रा घेत विचारले, " मग काय मामा, आज कुठे आमची बुडे आपटताय. नाही म्हणजे आता आम्ही एकदम तयार झालोत बरं का तुमच्या धर्मशाळेच्या पवित्र्याला. तेवढे जेवणतरी चांगले घाला म्हणजे बिस्तरे घालतो आणि आनंद आनंद म्हणत झोपतो. " खरे तर धर्मशाळा जरी असल्या तरी भयंकर आबाळ/त्रास झाला असे काही घडले नव्हते. मान्य आहे की एकत्र कुटुंब पद्धती सारखे आम्ही राहत होतो पण त्यातही एक मजा होती. मुलांची तर बिलकुल कुरकूर नव्हती. नाही म्हणायला मोठ्या बायकांची जरा गैरसोय होत असे.
मामांना लेलेकाकांनि हाणलेले शालजोडीतले कधी नव्हे ते काळेकाकांना झोंबले. त्यांनी पटकन मामांची बाजू घेत म्हटले, " काहो लेले, विसरलात का गढीतली सुंदर सोय. असा पाहुणचार की फाईव्ह स्टारही त्यापुढे झक मारतेय. उगाच आपलं बोलायचं. अहो एक माणूस चाळीस माणसांचा बोजा घेत सगळं करतंय त्याला नावाजायचं सोडून वर हाणताय. मामा पुढच्या वेळेस लेले कट बरका. " तशी इतरांनीही त्यांची री ओढली. लेलेकाका हडबडले. " अरे काय उगाच कावकाव करता, मी आपली गंमत करत होतो. मामा व्हा की पुढे...... "

आम्ही सगळे स्टँडपासून पायीच निघालेले. अंधार होता काही कळतही नव्हते कुठे चाललोय. एका मोठ्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या घरात मामा घुसले. आम्ही सगळे तिथेच थबकलो. मामा आत दिसेनासे झाले आणि दोन मिनिटातच भरभर धोतर घातलेली दणकट चार माणसे आली व खूप आवभगत करत आम्हाला आत घेऊन गेली. मामांच्या ओळखीच्या पंड्यांचे घर होते हे. आधीही मामा बरेचदा येऊन गेलेले असल्याने चांगली ओळख होती. हातपाय धूवुन पानावरच या सगळे तोवर झोपायचीही सोय करून ठेवतो असे ते पंड्येकाका मोठ्या आवाजात म्हणाले. इतके सुग्रास जेवण आज रात्री मिळणार आहे हे सकाळी सांगितले असते कोणी तर त्याला वेड्यातच


काढले असते नक्की. खास ओरिसी जेवण होते. अनेक पदार्थ, हे खाऊ का ते खाऊ. मग मिठ्ठा दही आले. श्रीखंडाचा प्रकार पण थोडा वेगळा. यावर फळे घातलेली. आहा... मस्तच होते. जेवण आटोपले तोवर बिछाने तयार होते. एका खोलीत दोन कुटुंबे असे सगळेजण मावून गेले. जेवणासाठी प्रत्येकी रुपया व राहण्यासाठी सगळ्यांचे मिळून वीस रुपये. हे लिहिताना मलाच खरे वाटत नाही.

सकाळी घंटानादाने फार लवकर उठलो. झोपणे शक्यच नव्हते इतका आवाज होता. पटापट आवरून साधाच डालमा-पुरी व मालपोवा खाऊन आम्ही निघालो. अगदी काशी विश्वेश्वराची आठवण यावी अशीच इथली स्थिती होती. जागोजागी प्रचंड कचरा, घाण, गुरे, चोहोबाजूनी हल्ला करणारे पुजारी/पंड्ये. मामांनी सगळ्यांना खबरदार केले होते. शिवाय कोणीही पूजा करायची नाही हे निक्षून बजावले होते. यावेळी मात्र त्यांचे म्हणणे कोणी डावलले नाही.


जगन्नाथाचे मंदिर हे ओरिसातील मोठे व प्रसिद्ध मंदिर आहे. अकराव्या शतकात बांधलेले हे भगवान कृष्णाचे मंदिर. मंदिराच्या भिंतीवर व खांबावर अप्रतिम कोरीवकाम आढळते. जवळ जवळ ४,००,००० स्के फूट इतका मोठा परिसर असून ठळक १२० मंदिरे आहेत. मंदिराचा कळस हा एका उंचावलेल्या पाषाणावर असून २१४ फूट उंच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराला सिंहद्वार हे नाव असून द्वारावर प्रचंड मोठ्या दोन सिंहाच्या मूर्ती आहेत. इतके मंडप, ओवऱ्या, अनेक द्वारे आणि मंदिरे आहेत की अक्षरशः हरवून जायला होते. हत्तीद्वार, व्याघ्रद्वार व अश्वद्वार ही अजून तीन द्वारे आहेत. मुक्ती मंडपात दररोजची पूजा अर्चना होते. डोल मंडपातील दगडातून कोरलेले शिल्प, कमानी पाहण्यासारख्या आहेत.


जगन्नाथाची मूर्ती व बरोबरीने बलभद्र व सुभद्रेचीही मूर्ती आहे. जून महिन्यात येथे ’ रथ यात्रा ’ उत्सव भरतो. दोन लाखांपेक्षा जास्ती लोक सामील होतात. शिवाय अक्षय तृतीयेला ’ चंदन यात्रा” व ज्येष्ठ पौर्णिमेला ’ स्नान यात्रा ’ भरते. ’ डोलो यात्रा व झुला यात्रा ’ याही आहेतच. मंदिराचे स्वयंपाक घर हे भारतातील सगळ्यात मोठे स्वयंपाकघर असून या मंदिरातील प्रसाद-जेवण हे स्वतः देवी महालक्ष्मी बनवते असा समज आहे. जर खाण्यात काही दोष असेल तर मंदिराच्या स्वयंपाकघरात एक कुत्रा येतो. जर असे घडले तर बनवलेले अन्न् लागलीच पुरून टाकतात व नवीन प्रसाद बनवतात. शेजारीच असलेल्या गंगा व यमुना या दोन्ही विहिरींचेच पाणी स्वयंपाकासाठी वापरले जाते.

या मंदिरात फिरताना गया-बुद्धगयेची वारंवार आठवण आली. हत्तीरोग झालेली खूप माणसे इथेही सारखी दिसत होती. शिवाय मंदिरात प्रचंड संख्येने विधवाही दिसत होत्या. आम्ही जगन्नाथाचे दर्शन घेऊन ओवरीत कोरीवकाम पाहत असतानाच अचानक काळेकाकूंच्या अवतींभोवती बऱ्याच विधवांनी कोंडाळे केले आणि काकूंना कळायच्या आत कडेवरच्या आमच्या बाळ गौरीला त्यातली एक ओढू लागली. काकू मोठ्याने ओरडल्याने सगळ्यांना कळले पण मदतीला जाता येईना. जवळ जवळ वीस पंचवीस बायकांनी कोंडाळे केले होते त्यामुळे काकालोकांना आत घुसताही येईना. भयंकर आरडाओरडा झाल्याने शेवटी त्या बायका घाबरल्या व तोवर आमची आई, गायतोंडे काकू, शेट्ये व नाईक काकू आत घुसल्या होत्या. अक्षरशः हाणामारी झाली. आरडाओरडा ऐकून मंदिराचे पंड्येही धावत आले व त्या बायकांना हाकलून काढले. गौरी फार घाबरली होती. मोठ्याने किंचाळत होती नंतर बराच वेळ. काळेकाकू व काका एकदम शॉक मध्ये गेलेले. हा धक्का सगळ्यांनाच खूप त्रास देऊन गेला. गायतोंडे आजी पटकन म्हणाल्या, " जग्गनाथा तुझ्या दर्शनाला म्हणून आलो आणि हे काय अक्रीत घडत होते रे. जातो बाबा आम्ही इथून." सगळ्यांनी भराभर नमस्कार केला. जेवढे पाहून झाले तेवढेच पुरे आता निघा असे म्हणत मंदिरातून निघालो.

जगन्नाथ मंदिरापासून अवघ्या दोन किमीवर ' स्वर्गद्वार ' बीच आहे. असे म्हटले जाते की हे ठिकाण म्हणजे स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे इथे प्रचंड संख्येने भक्तगण दिसून आले. अगदी अलाहाबादची आठवण झाली. जोतो डुबकी मारतोय, जयघोष करतोय. थोडी भीतीच वाटली. नुकताच गौरीच्या पळवण्याचा प्रसंग घडला असल्याने सगळे घाबरलेले होते. इतकी गर्दी पाहून पुन्हा पोरे हरवतील या भीतीने लगेच इथून सगळे निघाले.


तिथून निघालो ते एकदम चिलका जलाशय पाहायला गेलो. १,१०० स्के मीटर इतका मोठा जलाशय असून महानंदी नदीतले पाणी यात येते. संपूर्ण आशियातील मोठ्ठे सरोवर असून काही भागात खारे पाणी तर काही भागात गोडे पाणी आढळते. एकंदर ३५ पेक्षा जास्त जिवंत झरे असून जलाशय चिखल व निरनिराळ्या १५८ पेक्षा जास्त समुद्रीजीव, वनस्पती, पक्षी, जलचर व जनावरे दिसून येतात. पाणी फार खोल नसल्याने येथे मासेमारी जोरदार चालते. किनाऱ्यावर छान थंडगार वाळू होती. बरेच वेगवेगळे पक्षी उडताना दिसत होते. मामा म्हणाले की कधी तरी डॉल्फिनही दिसतात म्हणे. अर्थात आम्हाला काही दिसले नाहीत.


मग बच्चेकंपनी ज्याची कधीपासून वाट पाहत होती त्या पुरीच्या प्रसिद्ध बीचवर आम्ही गेलो. पांढरी वाळू, अतिशय स्वच्छ किनारे, व नितळ सुंदर चकचकते पाणी. आजही पुरीचा समुद्र डोळ्यासमोर दिसतो. किंचित हिरवट-निळसर झाक असलेले स्वच्छ पाणी. तळ नीट दिसत होता. खेकडे, बारीक शिंपल्यांमधले किडे व इतर काही जीव. जागोजागी शंखशिंपले, मग काय मुले वाळूत पाण्यात नुसती लोळत होती. मोठी माणसे आधी नाही नाही म्हणत होती खरी पण आमच्या बाबांनी जो काही सूर मारला तसे हळूहळू सगळे काका व मागोमाग काकूही उतरल्या. मला तर वाटते संपूर्ण ट्रीपमधील हा सर्वोत्तम काळ होता. मामांनीही डुबकी मारलेली होतीच. मग चेंडू, रिंग हे खेळ सुरू झाले. प्रत्येक घराने एक एक किल्ला बनवला. त्यावेळी आमच्याकडे कॅमेरा नव्हता ना, नाहीतर हे सगळे फोटोत तरी पकडून ठेवले असते. मनसोक्त पाण्यात तीन तास डुंबून थोड्या अनिच्छेनेच सगळे बाहेर आले. या नादात गौरी रडणे कधीच विसरून गेली. काका-काकूही हसत होते. तोवर संध्याकाळ झालीच आणि आवरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


पुन्हा दोन तास अंग मोडून एकदाचे भुवनेश्वरी येऊन पोचलो. आता उद्या सकाळी डायरेक्ट गाडी पकडायची आणि सिकंदराबाद गाठायचेय तेव्हा आवरून घ्या. महाराजने आज ओरिया पध्दतीने जेवण बनविले होते. त्यामुळे तो सारखा म्हणू लागला की आधी जेवून घ्या मग आवरा हो. म्हणजे मलाही भांडी आवरायला होतील. त्याला उत्सुकता होती त्याने केलेले जेवण सगळ्यांना आवडते का नाही ते पाहायची. जरा वेगळा डालमा व मोठे लच्छेदार पराठे, आचार, खिचडी व मिठा भात केला होता, तोंडीलावणे म्हणून वांग्याचे काप व कोशिंबीर होती. शिवाय इथले दही अतिशय गोड व घट्ट तेही होतेच. समस्त महिलावर्गाने महाराजची पाठ मनापासून थोपटली. जेवण अंगावर आले तरी आवरणे भाग होतेच. आम्ही मुले झोपून गेलो पण मोठी माणसे आवरून झोपेतो बरेच वाजले.

भुवनेश्वर ते सिकंदराबाद हा जवळ जवळ सतरा तासांचा प्रवास. ११०० किमी अंतर. संपूर्ण दिवस व अर्धी रात्र ट्रेनमध्ये जाणार होती. जर वेळेवर पोचली तर आनंदच मानावा लागेल कारण हमखास लेट होणारा प्रकार. पहाटे लवकर उठून आवरून भुवनेश्वर सोडले व ट्रेन पकडली. चक्क हेही रिझर्वेशन मिळाले. सगळे खूश. गाडी अगदी वेळेवर सुटली.......

6 comments:

  1. मस्त गं.....मुळात आपला देश सर्वार्थाने ईतका संपन्न आहे की कधी कधी वाटतं की आपण किती मिस करतोय....

    ReplyDelete
  2. चिल्का सरोवराचे फोटो मस्त आले आहेत... फोटोंमुळे प्रवास देखणा होतोय :). सिकंदराबाद स्टेशन येण्याची वाट बघतेय :) ....

    ReplyDelete
  3. तन्वी खरेच आपला देश सर्वार्थाने संपन्न आहे.

    ReplyDelete
  4. आभार रोहिणी. सिकंदराबाद स्टेशन....हा..हा...:(

    ReplyDelete
  5. तुमच्या कडे कॅमेरा नव्हता ना, मग हे फोटो कुठले?
    बाकी लिखाण मात्र मस्तच हं...एकदम स्वतःच तिथे जाऊन आल्यासार्कहं वाटतं...आता कुणी इतक्या मोठ्या ग्रूप ने जात नाही आणि गैरसोय अशी हसतमुखाने सहनही करत नाही!

    ReplyDelete
  6. अश्विनी अग फोटो आपल्या गुगलबाबाची देण गं.:)
    आणि खरेच मला असा एकही प्रसंग आठवत नाही की आमची भयंकर गैरसोय झाली.शिवाय सगळेजण जणू एका घरातलेच असल्यासारखे झाले होते.आजकालही जेव्हां ट्रेक्स किंवा हे डलहौसी/मनाली/हिमालया इत्यादी सगळ्या वयाचे एकत्र असे गृप्स जातात ना त्यांनाही धमाल येते. अर्थात आता धर्मशाळेत कोणी उतरत नसेल बहुदा.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !