जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, October 15, 2009

पातळ पोह्यांचा झटपट चिवडा


जिन्नस
  • पातळ पोहे पाव किलो
  • पाऊण वाटी शेंगदाणे
  • अर्धी वाटी डाळे
  • मूठभर काजू
  • तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून, बारा-पंधरा कडीपत्त्याची पाने
  • सहा-सात चमचे तेल, चवीनुसार मीठ व एक चमचा साखर
  • एक चमचा धणेजिरे पूड, पाव चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट व तीन चमचे तीळ

मार्गदर्शन

पातळ पोहे चाळून घ्यावेत. पाव किलो पोह्याचे तीन भाग करून एक भाग एका वेळी कढईत घेऊन मध्यम आचेवर भाजावे. सारखे हालवत राहावे. पोहे हाताला चांगले गरम लागले की लागलीच थाळीत/पातेल्यात काढून घ्यावे व दुसरा भाग भाजावा. सगळे पोहे भाजून झाले की मीठ व साखर घालून व्यवस्थित मिसळून बाजूला ठेवावे. कढई प्रत्येक भाग भाजताना स्वच्छ करून घ्यावी.

आता कढईत तेल घालून तापले की नेहमीप्रमाणे मोहरी- हिंग - हळदीची फोडणी करावी. त्यात मिरची व कडीपत्ता घालून ते तडतडले की तीळ घालून हालवावे. मिनिटभराने शेंगदाणे घालून भाजावे. तीन-चार मिनिटांनी डाळे आवडत असल्यास खोबऱ्याचे पातळ काप घालून अजून तीन मिनिटे हालवावे. मग काजू, लाल तिखट, धणेजिरे पूड व गरम मसाला घालून दोन मिनिटे हालवून ही फोडणी पोह्यांवर घालावी. कढईत थोडे पोहे घालून सगळे तेल शोषून घ्यावे. नंतर पोहे व फोडणी एकजीव करावी. कमी तेलात व अतिशय झटपट व चविष्ट चिवडा तयार.

टीपा

पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास चिवड्याला येतो. तसेच प्रत्येक वेळी भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती स्वच्छ पुसून घेऊनच दुसरे पोहे भाजावेत. पोह्यांवर फोडणी टाकली की कमीतकमी सात-आठ मिनिटे व्यवस्थित हालवून एकजीव करावे.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !