जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, October 8, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........

प्रवास करायला बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. काही जण आखीव-आयोजित सहली करतात तर काही उठले की सुटले या धरतीवर. ज्यांना अचानक उदभवणाऱ्या अडचणी, रेल्वे- विमान- बसची तिकिटे मिळवणे, प्रत्येक ठिकाणच्या हॉटेल्सचे बुकींग, खाण्यापिण्याचे तंत्र, प्रेक्षणीय स्थळांपर्यत पोचण्यासाठी लागणारे वाहन, वाटाड्या, वगैरे प्रकारातून निर्माण होणारा ताण आवडत नाही/झेपणारा नसतो किंवा आखीव मार्गावरून चालणे जास्त सोपे व सोयिस्कर वाटते असे आणि सीनिअर सिटीझन्स बरेचदा हा पर्याय आवडीने निवडतात, असे सगळे जण आयोजित सहलींचाच रस्ता धरतात.

शिवाय देशाबाहेरील सहलींकरिता हा पर्याय जास्त सोपा व उपयुक्त वाटतो. मात्र प्रत्यक्षात बरेचदा तो त्रासदायक झाल्याचेच अनेक ओळखीच्या मंडळींकडून ऐकलेय. मोठे मोठे नाव असलेल्या आयोजकांनी चार चार महीने आधी पैसे घेऊन, तोंडभरून आश्वासने देऊन प्रत्यक्ष सहलीत प्रचंड मन:स्ताप दिल्याचे अनेक अनुभव ऐकायला व वाचायलाही मिळालेत.


मला स्वतंत्र व आयोजित दोन्ही प्रकारात तितकीच मजा येते. मुळात प्रवास हा नेहमीच आनंददायी असतो. कधी कधी थोडी तारांबळ, तात्कालिक अडचणी निर्माणही होतात पण त्याकडे प्रवासाचा एक भाग म्हणून पाहिल्यास फार मनः स्ताप होत नाही. मार्ग निघतोच. आणि कधीकधी तर अनपेक्षित आनंदही मिळतात. फक्त धीर सोडायचा नाही हे मनाला प्रथमच पटवून ठेवायचे.

आयोजित सहलीचे बरेच फायदे आहेत-बरोबर काही तोटेही आहेतच. हे समीकरण ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर व प्रवासात आपले प्राधान्य कशाला जास्त आहे यावर आधारलेले असते. काही जणांना खाणे-पिणे हे ठराविकच हवे असते. नवनवीन- प्रांतानुसार किंवा उपलब्धतेनुसार वेगवेगळे पदार्थ चाखायची त्यांची तयारी नसते. शिवाय आपण सहलीला निघालोय-म्हणजे मजा करायला मग खाण्यापिण्याचे हाल नकोत बुवा असेही मत असते. काही जणांना सततची धावपळ सोसत नाही. तर काहींना कोण येणार आहे इथे परत परत तेव्हां जेवढे मिळेल तेवढे पाहून घ्या असे वाटत असते. पण या दृष्टीकोनाचा एक मोठ्ठा तोटा म्हणजे जे ते पाहत असतात ते मनापासून पाहतच नाहीत. सारखे लक्ष अजून काय काय बघता येईल याकडे लागल्याने प्रत्यक्षात काहीच बघत नाहीत.
उगाच भोज्याला शिवल्यासारखे करायचे आणि निघायचे.

सगळ्यात अडचण संपूर्ण शाकाहारी लोकांची असते. आपल्याकडे तरी ठीक आहे कुठेही गेले तरी शाकाहारी जेवण मिळतेच. हल्ली इथेही प्रचंड शाकाहारी पर्याय उपलब्ध झालेत. तरी मनात कुठेतरी धागधुग असतेच- मिळेल ना व्हेज काहीतरी का अगदीच ब्रेड-बटर, शिवाय बरेचदा काही मिळाले तरी ते इतके फिके-सपक असते की अजिबात खावेसे वाटत नाही. विशेषतः इथे आई-बाबा येतात त्यावेळी हा अनुभव वारंवार येतो. मात्र गाडी घेऊनच फिरणे होत असल्याने निघताना घरूनच थोडे कोरडे पदार्थ-लाडूचिवडा, पराठे, ठेपले, कोरडा उपमा, रव्याचा केक वगैरे घेता येतात म्हणा.

असेच आम्ही एकदा आयोजित सहलीतून प्रवासास निघालो. आई-बाबा, भाऊ व मी. संपूर्ण एक महिन्याची सहल होती. मी पाचवीत होते. एक महिना हा तसा बराच मोठा कालावधी असल्याने दिवाळीच्या सुटीला जोडून आयोजली होती. सहलीचे आयोजक आमच्याच चाळीत राहणारे होते. ते स्वतः एका शाळेत शिक्षकही होते. त्यांच्या शाळेतले काही शिक्षक व त्यांची कुटुंबीय मंडळी, आम्ही व अजून तीन मामांच्या ओळखीच्याच फॅमिलीज होत्या. एकंदर चाळीस माणसांचा मोठ्ठा गोतावळा होता. आयोजकांना घरीदारी सगळे मामा म्हणत.

३० दिवसांची ट्रीप, खूप खूप ठिकाणे पाहायला मिळणार होती. एकतर मी आणि भावाने इतका मोठा सलग प्रवास कधीच केला नव्हता त्यामुळे आम्हाला फारच आनंद झाला होता. दिवाळीच्या सुटीचा अभ्यासही या प्रवासात करावा लागणार ही एकमेव दुःखाची बाब सोडली तर बाकी धमालच होती. बहुतेक सारा प्रवास रेल्वेनेच करणार होतो. ' धुरांच्या रेषा हवेत काढी ' म्हणत आम्ही मामांबरोबर ते नेतील त्यात्या गावाला निघालो.
दिवाळी प्रवासात होणार असल्याने आईने फराळाचे सगळे पदार्थ करून घेतले होते. म्हणजे ते ' तहान लाडू-भूक लाडू ' आहे ना ते शब्दशः खरे झालेले. एका मोठ्या पुष्ट्याच्या खोक्यात चिवडा-चकली-बेसन लाडू- रवा लाडू व शंकरपाळे- तिखटाचे व गोडाचेही. शेवटी जेव्हां सगळे संपेल तेव्हा खोका फेकून देऊ म्हणजे परतताना एक डाग कमी.

मामांनी निघायच्या दोन दिवस आधी एक मीटिंग घेऊन मोठे असो की लहान सगळ्यांनी मी सांगेन ते ऐकायचे अशी सूचनावजा तंबीच दिली होती. सगळ्यांनी अगदी जोरजोरात माना हालवून हमी भरली. प्रवासाचा दिवस उजाडला, आवरा आवरा चा एकच गोंधळ उडाला. आमच्या बाबांच्या टिपीकल देशस्थी घोळाला आई फार घाबरत असल्याने त्यादिवशी तिने बाबांना एक मिनिट चैन पडू दिले नाही. आणि मामांचे घर तीन खोल्या सोडून असल्यामुळे तेही डोक्यावर बसलेलेच होते. " निघाले का जोशी? चला चला, गाडी जाईल निघून. मग मोठ्ठा घोळ होईल. जोशी अहो जोशी....... " म्हणत त्यांनी जो धोशा सुरू केला की हे ऐकण्यापेक्षा स्टेशनवर जाऊन नकाशे विकत घेऊन प्रवासाच्या मार्गाचे संशोधन करणे जास्त बरे असे वाटून आमचे बाबा व अर्थात बरोबर आम्हीही चक्क वेळेआधी अर्धा तास लवकर फलाटावर पोचलो.
गाडी लागलेलीच होती. आमची रिझर्व बोगी हुडकून आम्ही चाळीस माणसांनी तिच्यावर हल्ला बोल केला.

गाडी सुटेतोवर बरेच जण स्थानापन्न झाले. काही जण उगाच खाली उभे होते तर काही वॉटरबॉटल्स भरत होते. तेव्हा हे बिसलरी वगैरे प्रकरण नव्हतेच. बाबा आलो गं म्हणून गायब झालेले. गाडीचा हॉर्न वाजायला लागला तसे आईचा जीव खालीवर होऊ लागला. पण असे गायब फक्त आमचे बाबाच नसल्याने तिच्या वैतागण्याच्या सुरात इतर बायकांचे सुर ही मिसळलेले. इकडे आम्हां मुलांनाही सारखे प्लॅटफॉर्मवर उतरावेसे वाटत होते पण कोणी उतरू देईल तर ना? दोघातिघांनी चांगले चार-सहा फटकेही खाल्ले त्यापायी. ट्रिप सुरू होतानाच रडारड सुरू झाली. अर्थात या रडण्याला कोणाच्याही आईने भीक घातली नाहीच वर दोन दणके अजून घातले.
म्हणजे मोठी माणसे गेली तर चालतात अन आम्हाला मात्र........ सगळे मोठे लोक एकदम पार्शलच असतात यावर सगळ्या मुलांचे एकमत झालेच वर ट्रीप संपेतो त्यावर शिक्कामोर्तबही झाले.

शेवटी एकदाचे सगळे आले पळत आणि गाडी सुटलीही. मामांनी पुन्हा एक मीटिंग घेतली. प्रत्येकाच्या हातात ठिकाणे-राहण्याची सोय-जेवणाचे मेन्यू- आणि सूचना असे पत्रक ठेवले. स्वयंपाकी बरोबरच असल्याने जेवणाची काळजी नव्हती. मामांना खात्री होती की सगळे या पत्रकाप्रमाणे पार पडेल. कारण एकतर अर्धे त्यांच्या शाळेतले शिक्षक-सहकारी व त्यांचे कुटुंबीय होते व दुसऱ्या चार फॅमिलीज ही एकदम जवळच्या ओळखीतल्या. म्हणजे एक प्रकारे घरातल्यांचीच ट्रीप असल्यासारखे. ह्म्म्म्म.... काश ऐसा होता. आगे आगे देखो मामाजीं होता हैं क्या.......


क्रमश:

14 comments:

  1. गुड. घरची आठवण झाली. देशस्थी हे बाबांना लावलेलं विशेषण छान होतं.

    ReplyDelete
  2. अरे वा.. १ महिन्याची सहल ... मस्तच. पण सहल गेली कुठे होती??? आता पुढचे भाग मुंबईमध्ये जाउन वाचतो :D हा बघा निघालो इकडून ...

    आणि मी सुद्धा कुठेही जाताना स्वतः प्लान करून जातो. त्यातच खरी मज्जा येते मला.

    ReplyDelete
  3. railway platform ch varan khupach mast. mala mazya lahanpani kelela pravas ekadam athavala. masatach.

    khup chan lihita tumhi.

    ReplyDelete
  4. तू पुन्हा क्रमश: केलेस बघ.....लिही पटापट पुढे...बाकी देशस्थी घोळाचे काय बोलावे....
    आम्ही मात्र ते आखिव रेखीव कॅटेगिरी बरं का!!!

    ReplyDelete
  5. एक महिना ट्रिप म्हणजे खुपच मजा आली असेल... ( तुमच्या आईला तेवढच टेंशन आलं असेल :-) ).. वाचतेय. पुढचा भाग येऊ द्या

    ReplyDelete
  6. साधक आभार.आमचे बाबा म्हणजे टिपिकल घोळकर,हेहे.

    ReplyDelete
  7. रोहन सहल गेली होती कुठे? हाहा...सांगतेय सांगतेय , गाडी सुरू तर होऊ दे. निघालास का तू? Happy Journey and have a safe flight.

    ReplyDelete
  8. आश्विनी अनेक आभार.

    ReplyDelete
  9. अभि प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  10. तन्वी हो गं, देशस्थी घोळ म्हणजे...:D. पण मी नाही बा त्यातली.इकडून क~हाडे ना आणि आजीकडून कोके त्यामुळे सगळ्यांनी तू माझ्या गटात करून ओढले. मी टुकटूक करत माझा वेगळाच पंथ धरला.हेहे.लहान मुलांना घेऊन आखिव कॆटेगरी जास्त बरी वाटते ना.

    ReplyDelete
  11. रोहिणी होय, काहीसे तसेच झाले खरे.आभार.

    ReplyDelete
  12. एक महिना.. बापरे.. आमच्या मुली तर दहा दिवस झाले की बाबा घरी जाउ या आता कंटाळा आला म्हणतात. मजा आलि असेल नां? पुढचं पोस्ट येउ दे लवकर..

    ReplyDelete
  13. महेंद्र,आपल्या लहानपणी सहली इतक्या कुठे रे होत. गावाला आजोळी जाणे हीच पर्वणी. अर्थात आम्हांला तेच हवे असायचे. अरे या सहलीत इतका प्रवास केला की पुढे नावच काढले नाही. हीही...म्हणजे पाहणे कमी आणि प्रवासच जास्त.पण मजाही आलीच. मोठ्ठा गृप ना.आपसातच जास्त धमाल.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !