जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, October 6, 2009

जळी स्थळी काष्ठी पाषाणी- अव्याहत धावणारी........






आमच्या बाबांना मी नेहमी या गोष्टीवरून रागावत असते. पण खरे सांगू का त्यांची त्यामागची भूमिका मला पटलेली आहे. त्यांच्या वयाकडे पाहता मात्र त्यांनी असे करू नये या मतावर मी ठाम आहे. अमुक दिवशी प्रवास करायचा हे जर ठरलेले असेल तर कुठले वाहन हे ठरले व त्याचे रिझर्वेशन केले की डोक्याचा एक ताप कमी. परंतु बाबांना काही केल्या हे पटत नाही. त्यांचे आपले ठरलेले उत्तर, " अग, इथे दहा मिनिटांवर तर आहे स्टँड. जाऊन उभे राहायचे. ठाणा-मुंबईला जाणाऱ्या गाड्या एका मागोमाग एक चालूच असतात. जी मिळेल ती घ्यावी आणि निवांतपणे जावे. ही बुकिंगची भानगड म्हणजे, एकतर आधी जाऊन तिकिटे काढून आणा. ( रिक्शाला पैसे फुकट घालवा वर वेळही ) मग रिझर्वेशन केलेय म्हणजे वेळेवर जायला हवे नाहीतर गाडी जाईलच शिवाय पैसेही जातील. या भीतीने सारखी घाईघाई करत राहायचे. त्यापेक्षा हे कसे सुटसुटीत. आपल्या मर्जीनुसार आवरले की निघावे, मिळेल त्या गाडीने शांतपणे जावे. काय? " त्यांच्यासमोर बोलायची सोय नाही पण छोट्याछोट्या प्रवासांकरिता बाबांचे म्हणणे पटते मला.

गेल्या दोन वर्षात चार वेळा मायदेशी गेले होते त्या प्रत्येक फेरीत, मनात आले की उठायचे अन सुटायचे या बाबांच्या आवडत्या तत्त्वानुसार मी बराच प्रवास केला. आगाऊ बुकींग करून हाच प्रवास करायला मला आवडले असते हे खरेच पण तसे न केल्याने भयंकर कटकट झाली, वैताग वैताग आला असे सुदैवाने एकदाही न झाल्याने माझी भीड चेपत गेली व हे समीकरण मला आवडून गेले. मात्र या सगळ्याचे निम्मे श्रेय बाबांना असले तरी दुसऱ्या अर्ध्या श्रेयाच्या हकदारामुळे हे जमणे शक्य झाले व पटलेही. तो हक्कदार म्हणजे, " लाल डब्बा+एशियाड "


संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना कुठूनही कुठेही जोडणारी, गोरगरीबांना परवडणारी, स्वस्त व मस्त अत्यावश्यक सेवेत मोडणारी एसटी महामंडळाची अव्याहत चालणारी सेवा. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आजच्या सारख्या खाजगी सेवांचा भडिमार नव्हता. मुंबई-गोवा व मुंबई-कोल्हापूर मार्गावर चालणाऱ्या कोंडूस्कर, नीता व चौगुले यासारख्या काही बसेस सोडल्या तर सर्वत्र एशियाड व लाल डब्बा यांचाच मुक्त संचार होता. एसटी महामंडळाला मानायलाच हवे याबाबतीत. नकाश्यावर सोडाच पण तालुक्याच्या ठिकाणी विचारले तर तिथेही, " अवो , लयी लांब हायसा त्यो पाडा. तुम्ही काहून जाऊन राहिल्ये? गाडी बी नीट जाईना तथवर." अशा रिमोट जागीही लाल डब्बा मात्र जाते. कोंकणातले कुठलेही गाव घ्या, अगदी कुठच्या लांबच्या डोंगर माथ्यावर का असेना दिवसातून दोनदा तरी धुरळा उडवीत जोरात आवाज करीत फर्रर्रर्रर्रदिशी येऊन हमखास थांबेल. एकदम भरवश्याची. आता कधी कधी म्हणीप्रमाणे टोणगा देईलही पण अशा वेळा तुरळक.

लाल डब्बा म्हणजे तुमच्या गंतव्य स्थानापासून अंतिम विसाव्यापर्यंत वाटेत जे जे गाव लागेल तिथे जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार, ख्याली खुशाली विचारणार. काही पाहुणे हवाली करणार तर काही सोबत घेऊन पुन्हा मार्गाला लागणार. त्यामुळे अगदी आडबाजूला गाव असेल किंवा भरपूर वेळ असेल तर लाल डब्ब्याने प्रवास कराच. जर सरळसोट मुंबई-नाशिक, मुंबई-पुणा जायचे असेल तर मात्र एशियाड जास्त प्रिफरेबल. बहुतेक सगळेच शेवटच्या थांब्याला उतरणारे. नाशकात शिरले की हा नाका तो नाका थांबत जाईल पण तोवर नाकासमोर. उगाच वाकडी वाट नाही. ठाणे-नाशिक तुमचे लक थोडे जोरावर असेल तर साडेतीन तासात महामार्ग टच. पुढच्या दहा मिनिटात घरात.


एसटी महामंडळाचे सगळ्यात जास्त कौतुक मला वाटते ते म्हणजे ते ' बेइमान ' नाहीत. तुम्ही एशियाडने प्रवास करत असा नाहीतर लाल डब्ब्याने, एकदा का तिकीट फाडले की ते तुम्हाला नेऊन पोचवणारच. मग मध्ये बस बंद पडो का टायर पंक्चर होवो. रात्र असो किंवा दिवस, ते कुठल्याही प्रवाशाला वाऱ्यावर सोडून जाणार नाहीत. नाहीतर हे वोल्वो वाले व आजकालचे खाजगी एसी बसेसवाले, बस बंद पडली की सगळे प्रवासी रस्त्यावर उभे. मग रात्र आहे का पाऊस आहे यांना त्याचे सोयरसुतक नाही. इतके पैसे देऊन सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोचूच याची शाश्वती नाहीच. यांची बसेस हाकण्यातली बेदरकारी तर सर्वश्रुत आहेच. थोडक्यात इतकाले पैसे देऊन बरेचदा विकतचे दुखणेच पदरात घेतल्यासारखे होते.

काही कामे करायची होती त्यामुळे आईकडे-नाशिकला जायचा दिवस व वेळ ठरवता येत नव्हती. शेवटी आई-बाबांना अचानक जाऊन सरप्राइज करूयात असे ठरवून सकाळी आठलाच घर सोडले व खोपटचा स्टँड गाठला. बाबांचे वाक्य होतेच मनात घोळत. दर दहा मिनिटांनी कुठली ना कुठली गाडी असतेच. जरा जडच बॅग होती शिवाय पर्स व एक हँडबॅगही होती. सामान असले की माझा अर्धा धीर खचतो. सामान हवे असते आणि नकोसेही वाटते या मनाच्या अवस्थेमुळे चिडचिडल्यासारखे होत राहते. तर एकीकडे आई-बाबांना किती आनंद वाटेल हेही उत्साह धरून ठेवायचा प्रयत्न करते. पूर्वी वंदनाच्या समोर स्टँड आहे तिथेच सगळ्या गाड्या येत पण हल्ली काही वर्षांपासून खोपटला नवीन चांगला मोठा स्टँड सुरू झाल्यापासून गर्दी विभागली गेली आहे. त्यातून सकाळची वेळ, फारशी गर्दी नव्हती. रिक्शातून उतरल्या उतरल्या एकदम दोन कुत्री कुठुनशी आली अंगावर पण जरा हडहड केल्यावर पळाली लागलीच.

आठची एशियाड मिळेलच या हिशोबाने मी आले खरी पण ती अगदी डॉटला निघून गेलेली. चौकशी वर जाऊन विचारले तर म्हणे की," ताई, तुम्ही रिक्शातून उतरत होता तेव्हा नाहीका एक एशियाड धुरळा उडवत गेली तीच की आठची नाशिक. आता एकदम नवालाच आहे दुसरी ’ डायरेक्ट ’ गाडी. पण तुम्हाला नाशिकलाच जायचे ना मग ही काय शिर्डी उभी हाय ना समोरच. आत्ता पाच मिनिटात निघलं, जावा की चढून. शिटा बी खाली आहेत उगाच कशाला नऊपर्यंत इथं तडमडत राहायचं अन येळं नासायचा. " एकदम ट्रूथ सांगून तो रिकामा झाला. म्हटले चला इथे बसण्यापेक्षा एसटीत बसावे. किमान रस्त्याला लागलो याचा तर आनंद मिळेलच.

एकदम कुठून इतके गोत जमा झाले कोण जाणे पण दहा मिनिटात बस बरीच भरली व आम्ही निघालो. मजल दरमजल करीत प्रत्येक गावात आत शिरून ’ च्या- पाणी-पेट्रोल ’ भरीत व तालात खडखड करत आमची वरात झोकात चालली होती. घोटिला गाडी गावात न जाता बाहेरच थांबली. पंधरा मिनिटे थांबेल असे म्हणून ढवळ्यापवळ्या गायब झाले. बरीच लोकं वैतागली होती. माझ्या शेजारी एक अत्तराचा बिझनेसवाला बसला होता. सारखा मोबाईल कानाला चिकटलेला होताच व गाडी गावात शिरली की याचे ब्लडप्रेशर चढायला लागे. त्याला खूप घाईने नाशिकला पोचायचे होते आणि बस तिच्याच तालात होती. घोटिला गाडी थांबताच हा उतरला व नाशिककडे जाणाऱ्या खाजगी वाहनांना लिफ्ट मागू लागला. त्याचे नशीब जोरावर होतेच लागलीच लिफ्ट मिळाली आणि तो अंतर्धान पावला.

पंधरा मिनिटाने ' ढ व प ' डुलत डुलत आले. तसे सगळे प्रवासीही पटापट आपापल्या जागांवर स्थिरावले. ढवळ्याने बसचा कान पिळला दोन मोठे मोठे श्वास टाकले व हाळी ठोकली, " कारे, डाग मोजलेस ना? आहेत का सगळे जागच्या जागी, का एखादा तेवढ्यात सांडला?" हे उद्गार ऐकून बसमध्ये सौम्य खसखस पिकली. पवळ्या मागून मोजत मोजत आला आणि गपकन माझ्यापाशी थांबला. मला मोजले आणि शेजारच्या रिकाम्या जागेकडे पाहत म्हणाला, " च्यायचं बेनं, घातलाच घोळ. सांडला रे, एक डाग कमी आहे. मघाधरून फार चुळबूळ करत होतंच, आता कुठे उलथलंय कोण जाणे. आर थांब, गाडी बंद कर. त्याला हुडकून आणतो. " झाले गाडी थांबली.

मी आणि पुढच्या सीटवरील एक मुलगी, आम्हा दोघींव्यतिरिक्त कोणीच त्या माणसाला निघून जाताना पाहिले नव्हते. कंडक्टर उतरणार तोच मी त्याला काय घडले ते सांगितले, लागलीच त्या मुलीनेही दुजोरा दिला. पण कंडक्टर काही पटकन मानेना. तो उतरलाच खाली. दहा मिनिटे इकडेतिकडे शोधून आला पुन्हा आमच्याकडे. मला म्हणाला, " ताई, तुम्ही नक्की पाहिले ना त्याला जाताना? अवो नाहीतर उद्या नसती बलामत यायची. एक डाग मागे राहिला म्हणून ही बोंब उठेल अन डोचक्याला लयी ताप होईल." त्याला चारचारदा सांगितले तेव्हा कुठे शेवटी त्याने घंटी मारली आणि आम्ही निघालो.

राहून राहून मला नवल वाटत होते. एक माणूस यांना न सांगता खुशाल निघून गेला व हा एसटीचा कंडक्टर मात्र त्याला दहा-पंधरा मिनिटे शोधून आला तेही तो गेलाय असे आम्ही सांगत असताना. आम्हा दोघींकडून स्टँपपेपरवर लिहून नाही घेतले एवढेच इतके वेळा वदवून घेतले. नाहीतर ते खाजगी बसेसवाले. अमुक वेळेला या नाहीतर बस गेलीच समजा. तेही शोधतात माणसांना पण इतका ओरडा-आरडा करतील, एखादे वेळी म्हाताऱ्या माणसाला वेळ लागतो, तर कधी टॉयलेटला मोठी रांग असते. पण हे लक्षात कोण घेतोय हो. एस्टी-एशियाड बंद पडलीच तर प्रथम दुसरी बस तरी मागवतील नाहीतर येणाऱ्या-जाणाऱ्या एस्टींना थांबवून एक ना एक प्रवाशाची सोय लावून दिल्याशिवाय कंडक्टर-ड्रायव्हर हलायचे नाहीत. तिकिटेही तीच चालतात.


एसटी-एशियाडवालेही जोरात गाडी चालवतातच. अगदी रस्ता फक्त आमच्यासाठीच असल्यासारखे दामटतात. अनेकवेळा आपण एसटी-एशियाडला झालेल्या भयंकर अपघाताच्या बातम्याही वाचतोच. परंतु प्रमाण निश्चित कमी आहे. हे ड्रायव्हर अतिशय निष्णात आहेत व त्यांच्या चाचण्याही वारंवार होत असतात. त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या तक्रारीही आहेतच, त्यात तथ्यही आहेच. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही असतातच. असे असले तरीही महाराष्ट्रातील लोकांना इच्छित स्थळी पोचवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम इमाने इतबारे गेली कित्येक वर्षे ही सेवा करते आहे. आजकाल तर प्रवासी हा देव हे ब्रीदवाक्य करून, " हात दाखवा एस्टी थांबवा " वगैरे घोषणा व त्यांची अमल बजावणीही जोरदार होते आहे. १९४८ पासून सुरू झालेल्या या सेवेची व्याप्ती आता फारच मोठी झाली आहे. १६,००० पेक्षा जास्त बसेस आहेत.’ शिवनेरी ’ ही वातानुकुलीत सेवाही काही वर्षांपासून सुरू केली आहे. चाकरमाने व सामान्य जनतेला शक्यतितकी सुविधा पुरविणारा ' लाल डब्बा + एशियाड ' खरेच कौतुकास्पद.


16 comments:

  1. सही सही वर्णन केलेस....’ढ’ आणि ’प’ डुलत डुलत आले....ही ही ही!!!!
    ईशानला सांगते बघ तु केले वर्णन, तो त्याच्या बाबाच्या गाडीला जनता गाडी म्हणतो....’त्याचं ही असच आहे घराजवळचे सगळे सडाफटींग कायम गाडीत लादलेले असतात....’
    मस्त लिहीलस लेख!!! बससारखे दणके न बसता हलकफूलकं वाटलं बघ....बाकी घोटी, नासिक वगैरे उल्लेख आले की लय बर वाटतय बघ!!! कसारा घाट का टाळलात हो!!!!
    आता कसारा घाटही मस्त केलाय, यावेळेस आलो तर १० मिनिटात घाट पार.....दोन्ही नवे रस्ते सुऋ आहेत आता.....नक्की जा....थांबून घाटाचे सौंदर्य निवांत पहाता येते...

    ReplyDelete
  2. ekdum nostalgic vhayla jhala ga!! ata maheri geli ki nakki lal dabbyatun pravas karin..aani sanginahi "dha aani pa" la chennai la aalyapasun mala tyancha abhimaan watato..

    ReplyDelete
  3. पुर्विच्या सगळ्या जुन्या पोस्ट्स वाचल्या. छान आहेत... शोमुच गाणं सुद्धा सहिच...

    ReplyDelete
  4. मस्त झाला आहे लेख!!!... ' ढ व प '. . .एकदम सही!!!हा..हा.. . पण आता लाल डबा पण कात टाकतोय!!!! डबा आता हाय टेक होतोय!!

    ReplyDelete
  5. आभार ग तन्वी.अरे वा!एका वर्षात घाटाचे काम झाले वाटते? आता पुढच्या वेळी नक्कीच हा नजारा पाहता येईल.जनता गाडी...हेहे.

    ReplyDelete
  6. मुग्धा अग खरेच मस्त वाटले मला. नक्की प्रवास कर आणि ’ढ व प’ ला निरोपही दे. धन्यवाद ग.

    ReplyDelete
  7. रोहिणी अग छान वाटले तुला पाहून. गडबड आहे वाटते:). अनेक आभार. शोमूला सांगते.

    ReplyDelete
  8. मनमौजी प्रतिक्रियेबद्दल आभार. अरे वा! लाल डबा कात टाकतोय का? आता पुढच्या भेटीत कळेलच. चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा असतो हे महाराष्ट्राकडून शिकावे.बसेस, लोकल्स, सीटी बसेस... नाहीतर इथे:(.वैताग.

    ReplyDelete
  9. बरेच लाल डबे गुलाबी रंगाने रंगवले आहेत. जुन्याच बसेस डागडुजी करुन रंगवुन नव्या केल्या आहेत. बाकी एक गोष्ट नक्की, महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या बसेस इतर राज्यातिल रा.प.च्या बसेस पेक्षा खुपच सुंदर मेंटेन केलेल्या आहेत. गुजराथ, म.प्र, छ.ग. च्या बसेस अगदी पहावत नाहित. आपल्या कडे एशियाड्स पण चांगल्याच ठेवल्या आहेत
    जिथे रस्ता तिथे एस टी हे ब्रिद वाक्य ठेवल्यामुळे खेड्यातल्या गोर गरिबांची खुपच सोय झाली आहे.
    उन्हाळ्याच्या दिवसात ५० पैसे देउन रिझर्वेशन करुन आम्ही प्रवास करायचो. त्या प्रवासावर पण एक पोस्ट होऊ शकते. बाकी पोस्ट मस्त झालंय.. आजकाल प्रवास करण्याची फारशी वेळ येत नाही, पण एस टी इज ग्रेट रिलिफ ...

    ReplyDelete
  10. महेंद्र अनेक आभार. लाल डब्बे गुलाबी रंगाने रंगविलेत,:(.दिल्ली,चंदिगड,जम्मू, कलकत्ता व साउथची बरीच ठिकाणे मी त्यांच्या स्टेटच्या बसेसने प्रवास केला आहे. हॊरीबल प्रकार.खरेच महाराष्ट्रात खूप छान सोय आहे. मला अभिमान वाटतो.इथे आमच्याकडे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट दिसतच नाही.( हे मी फक्त आमच्या गावापुरते म्हणतेय ) तुरळक जो आहे त्याचा उपयोग शुन्य. आपल्याकडे एस टी व लोकल्स आणि बाहेरगावच्या ट्रेन्सने किती प्रचंड सोय आहे ते ती जेव्हा नसते ना तेव्हा जास्त कळते.

    ReplyDelete
  11. मस्तच झालीये पोस्ट.."ढ" आणि "प" एकदम चपखल...:)
    ट्रेकर्सना तर लाल डब्बा किती साथ देते काय सांगु....पेण, पनवेल असे कुठचे कुठचे प्रवास आठवले....एकदा जे एन पी टी ला दादरहुन लाल डब्बाने गेले होतो... "प" च्या पाठची मोठी सीट समोरासमोर सगळा ग्रुप बसुन पत्ते कुटतोय....

    ReplyDelete
  12. यस्स्स...ट्रेकर्स, गृपने सहल करणारे शिवाय लग्नाचे व~हाड बोचकी-बाचकी सगळे कसे अगदी पसरून, मन- मोकळेपणाने प्रवास करू शकतात. हल्ला-गुल्ला,:). धन्यवाद अपर्णा.

    ReplyDelete
  13. भानस,
    एकदम लालेलाल डब्याची पोस्ट वाचून,पुन्हा फिरून आणलंत.मस्तच फिरले.स्टार प्रवाहावर वारी विधान सभेची हा कार्यक्रम असतो,राजकीय गोंधळ असतो पण लाल डबा दिसतो म्हणून ५ मिनटे डब्याचा आदर राखून मग टीवी चानल बदलते.
    दीपावलीच्या आपणास व परिवारास शुभेश्च्या anuja

    ReplyDelete
  14. अनुजा तुम्हा सगळ्यांनाही दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  15. भानस, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. एसटी ही आपल्या महाराष्ट्रासाठी जीवन वाहीनी आहे.

    ReplyDelete
  16. शांतीसुधा, खूप खूप आभार. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !