सगळी बाबाकंपनी तिथेच पत्ते खेळत होती. त्यांच्या आरडाओरड्याचा आवाज अगदी गेस्टहॉऊसच्या गेट पर्यंत येत होता. आम्ही मुले लागलीच आपापल्या बाबांच्या खांद्यावर, मांडीवर रेललो आणि मला मला करत त्यांच्या हातातले पत्ते ओढायला लागलो. अगदी लहान होती ती तर बाबाचे तोंड सारखी स्वतःकडे वळवून बोबडे बोलत बाजारात पाहिलेली खेळणी, फुगे कशी मस्त होती आणि आईने घेऊन दिली नाहीत हे गाल फुगवून फुगवून सांगत होती. तोवर आयाही पोचल्याच होत्या. मग काय काय खरेदी केली व किती स्वस्त मिळवले याच्या बढाया सुरू झाल्या. एकीकडे गेस्टहॉऊसवाल्याने जेवणाची मांडामांड झाल्याची वर्दी दिली आणि आया आपापल्या कारट्यांना पकडून भरवायला बसल्या. बाबालोकही गरम गरम खाऊन घ्या ही बायकोची आज्ञा कधी नव्हे ते शिरसावंद्य मानून पानावर आले. मग सगळेजण जेवणात रंगून गेले.
पोटोबा अगदी तृप्त झाल्यावर नाईककाकूंनी हळूच विचारले, " अहो, आजींची तब्येत कशी आहे आता? ताप उतरला का? नाही म्हणजे ’ गायबुवा-बाई ’ कोणाचेच तोंड दिसत नाहीये ना खाली. " गायबुवा-बाई म्हटल्यावर मोठे काय आम्ही मुलेही खोखो हसलो. काका-काकू असे कसे दिसतील या कल्पनेनेच..... लहान मुलेही संसर्ग झाल्यासारखी काही न कळूनही हसत होती. तेवढ्यात जिन्यावरून काका-काकू उतरून आले. त्यांना पाहताच काळ्यांची जेमतेम दोन वर्षांची गौरी टाळ्या वाजवत म्हणाली, " गायबुवा - बाईंचे तोंड आले, आले. गायबुवा कुक, गायबाई कुक . " त्या दोघांना काहीच समजेना. बाकीचे सगळे पदर तोंडावर घेत/ इकडेतिकडे पाहत हसू दाबत होते. काळेकाकूंनी गौरीच्या तोंडात घास कोंबला तरी पठ्ठीने तोबरा भरलेला असतानाही पुन्हा सुरू केले, " गायबुवा-बाईंचे तोंड आले, आले. कुक कुक.... " मग कोणाला हसू दाबता येईना. तोवर गायतोंडे काका-काकूही हसू लागलेले. मग जरा हसू उतरल्यावर काका म्हणाले, " गौरे, आजीला कुक कर जाऊन, पळ पळ. आई आता बरीच बरी आहे. ताप उतरलाय. थोडा अशक्तपणा आहे पण संध्याकाळी कलकत्त्याची गाडी असेल तर आपण निघू शकतो मंडळी. " आजी बऱ्या आहेत हे ऐकून सगळेच खूश झाले. मग मामांची पळापळ सुरू झाली. सगळ्यांना चंबूगबाळे आवरून तयार राहा असे बजावून लेलेकाकांना बरोबर घेऊन मामा स्टेशनवर गेले.
मामा व लेलेकाका गेले तसे जेवण उरकून सगळे आपापल्या खोलीत सामान आवरू लागले. बाबा व बच्चेकंपनी लोळली व लोळता लोळता रजया ओढून झोपून गेली. मध्ये किती वेळ गेला कोण जाणे एकदम जाग आली ती आईच्या आवाजाने. " अगं ऊठ गं, अहो तुम्हीही उठा. मामा आलेत तिकिटे घेऊन. पण काहीतरी घोळ दिसतोय हो. त्यांनी खाली डायनिंग हॉलमध्ये बोलावलेय सगळ्यांना. चला चला. " मी ऐकले न एकलेसे करून पुन्हा गाढ झोपून टाकलं. भाऊही झोपलेलाच होता.
सगळी मोठी माणसे हॉलमध्ये जमा झाली. संध्याकाळी आठची ट्रेन होती पण सिलीगुडी ते कलकत्ता ६०० किमी अंतर असले तरी एकही डायरेक्ट ट्रेन नाही. ट्रेनने जाऊ शकतो मात्र बरीच बदलाबदली करून एकूण तीन दिवस घेऊन पोचता येते. तेव्हा ते शक्यच नव्हते. एकतर आधीच टाईमटेबल कोलमडले होते. सवाल होता तो गायतोंडे आजींना बसचा प्रवास झेपेल का नाही? जवळ जवळ बारा/चौदा तासांचा बसचा प्रवास एकंदरीत कुणालाच झेपण्यासारखा नसला तरी नाइलाज होता. म्हणून बसचीच तिकिटे आणली होती. " शिंचे टाका झोपून मस्तपैकी आठ-दहा तास. जरा जागे व्हाल तोवर येतंय की कोलकाता. " इति लेलेकाका. मला काही कळले नाही परंतु कुठलीही ट्रेन डायरेक्ट जाणारी नसल्याने बसने जायचेय एवढेच कळले.
इथे धर्मशाळेतच राहणार असलो तरी ही धर्मशाळा छान होती. प्रत्येकाला वेगळ्या खोल्या होत्या खूप प्रशस्त न्हाणीघरे होती. एकदम स्वच्छ व हवेशीर. संपूर्ण प्रवासात मला आवडलेली राहण्याची जागा. माणसांनी ओढायच्या रिक्शाने आम्ही धर्मशाळेत पोचलो. त्या रिक्षावाल्याला पाहून मला " दो बिघा जमीन " मधील बलराज सहानीची खूप आठवण येऊन खूप रडू येऊ लागले होते. पोटे खपाटीला गेलेली, जीवाच्या आकांताने रिक्षा ओढणारे बरेच रिक्षावाले आजूबाजूला दिसत होते. इतके कष्ट आणि पैसे नाममात्र. तेही कटकट करून लोक देत हे आजही आठवतेय.
दुर्गापूजा
चमचम फुलबाजार
कोलकत्त्याला मामांनी बरोबर दुर्गापूजेचे दिवस असतील असेच प्लॅनिंग केले होते. मूळ बेतानुसार आम्ही येथे सहा दिवस राहणार होतो. परंतु शेट्येकाकू, गोखलेकाकू व गायतोंडे आजींच्यामुळे एकूण पाच दिवस फुकट गेले होते. त्यामुळे आता कोलकत्त्यात तीन/साडेतीन दिवसच राहायला मिळणार होते. पश्चिम बंगालची राजधानी - कोलकाता प्रचंड मोठे शहर असून ढोबळमानाने उत्तर-दक्षिण व मध्यभागात विभागले गेलेय. वेळ कमी व अनेक ठिकाणे. त्यात दुर्गापूजेचे शेवटचे चार दिवस असल्याने जिकडे तिकडे प्रचंड गर्दी होती. मोठ्या मोठ्या देवीच्या मूर्ती व देखावे, त्यापेक्षा मोठे तंबू, दर्शनासाठी रांगा व संपूर्ण रात्रभर देवी पाहत फिरणारे लोक. दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे हा तिथला. जागोजागी लाऊडस्पीकर, मोठ्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या. फुलांच्या राशी व गोलगप्पे, चाट व बेंगॉली मिठाईचे ठेले. प्रचंड चहलपहल होती.
हावरा ब्रीज विद्यासागर सेतू
बसच्या प्रवासाने सगळे खरे तर थकले होते पण दिवस फुकट घालवून चालणार नव्हते. त्यामुळे तासाभरात फ्रेश होऊन तयार व्हा म्हणजे आपण लागलीच निघू. हुगळी नदीवरील हावडा पूल प्रत्येकालाच पाहायचा होता. हावरा पूल १९३७ ते १९४३ या दरम्यान बांधला गेलाय. हुगळी नदीवर एकूण चार पूल असून जून १९६५ मध्ये याचे नाव बदलून रवींद्र सेतू असे ठेवण्यात आले. रविंद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाल्यावर त्यांचे नांव या पुलाला दिले गेले. तरीही अजूनही हावडा पूल म्हणूनच हा प्रसिद्ध आहे. इतर तीन पूल म्हणजे विद्यासागर सेतू, विवेकानंद सेतू व नवीनच बांधलेला निवेदिता सेतू. हावडा ब्रिज हा ७०५ मीटर लांब असून ९७ फूट रुंद आहे. संपूर्णपणे स्टीलने बांधून काढलेल्या ह्या ब्रिजवरून दररोज लाखात गाड्या व त्यापेक्षा दहापटीने जास्त लोक प्रवास करतात. आम्ही बराच वेळ इथे थांबलो.
तिथून मार्बल पॅलेस पाहायला गेलो. हा महाल राजा राजेंद्र मुलीक यांनी १८३५ मध्ये बांधला. यातील मार्बल हा खास इटली, नेदरलँड, इंग्लंड व इतर युरोपियन देशांतून आणला गेला. जमिन, भिंती व बरेचसे फर्निचरही मार्बलनेच बनवले असून महालाच्या मागे पसरलेल्या प्रचंड बागेत येशू, मेरी, हिंदू देवांच्या मूर्ती, बुद्ध व कोलंबस यांचे मोठे पुतळे आहेत. तसेच जवळच असलेल्या तळ्यात बदके, मोर पाहायला मिळाले. एकूण ९० देशांतून आणलेल्या दुर्मिळ व मौल्यवान कलाकृती, अप्रतिम तैलचित्रे, पुतळे, अँटीक्स, सुंदर झुंबरे, निळ्या रंगातील दुर्मिळ चिनी फुलदाण्या इत्यादी गोष्टी असून इथे जरूर भेट द्या.
कॊटन कलकत्ता सिल्क कलकत्ता कॊटन कलकत्ता
सिल्क कांथा हॆंड वर्क बेंगॊल सिल्क
मग चौरंगी नावाने प्रसिद्ध बाजारात गेलो. सगळे महिलामंडळ साड्यांच्या दुकानात घुसत होते. पाहावे तिकडे सुंदर साड्या, पांढऱ्या व लाल टिपीकल बेंगॉली बांगड्या व अनेक सिल्कचे कुडते, धोती वगैरे पाहीले. थोडावेळ साड्या पाहताना मजा आली खरी पण आई-काकूंचे आटपेनाच मग बाबा व बच्चेकंपनी, तुम्ही या तुमचे आटपेल तश्या आम्ही पुढे होतो असे म्हणून धर्मशाळेत परतली. इतर काहीही त्यादिवशी पाहण्याचे त्राण नव्हते येऊन जेवलो व जवळपासच्या देवी-रोषणाई पाहायला गेलो. मध्यरात्री कधीतरी परत येऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी मामांनी लवकरच उठवले. गरम गरम पुरी-भाजीचा नाश्ता व गुलगुलीत चमचम खाऊन अनेकदा सुशील दोषींच्या तोंडून ऐकलेले इडन गार्डन पाहायला गेलो. मुंबई म्हणजे ठार क्रिकेटवेडे लोक. आम्हीही पक्के त्यातलेच. वर्ल्डफेमस इडन गार्डन पाहण्याचा योग आला होता. १८६४ साली बांधलेल्या या भव्य स्टेडियम मध्ये एकावेळी ९० हजार लोक बसू शकतात. अनेक महत्त्वाच्या मॅचेसचे साक्षीदार असलेले हे अवाढव्य स्टेडियम पाहताना अक्षरशः तोंडाचा ' आ... ' झाला होता.
तिथून प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियल पाहायला गेलो. १९२१ सालात बांधून पूर्ण झालेले हे मेमोरियल राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ बांधले आहे. संपूर्ण मार्बलने बांधले असून याचा डोम ब्राँझचा असून ती विजयाची निशाणी आहे. या मेमोरियलमध्ये आता म्युझियम केले असून २५ गॅलऱ्या आहेत. येथे भारतीय तसेच पाश्चिमात्य चित्रकारांची सुंदर चित्रे, मुघल शिल्पे, जुनी दुर्मिळ पुस्तके, पोस्टाचे स्टँप्स, नाणी, मूर्त्या व स्केचेस पाहावयास मिळाली.
तिथेच जवळच असलेल्या बिर्ला प्लॅनिटोरियम मध्ये जायचेच असे आमचे बाबा मुंबईपासून घोकत होते. तारांगणात खगोलशास्त्रावर बरीच माहिती मिळाली पण अर्धी डोक्यावरून गेली. मग तिथेच ग्रह-तारे व आकाशगंगा यावर आधारीत एक तासाची एक डॉक्युमेंट्री पाहायला मिळाली. खूपच अप्रूप वाटले. त्यादिवशी रात्री सगळी मुले आकाशात बराच वेळ तारे शोधत होती.
तिथून प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियल पाहायला गेलो. १९२१ सालात बांधून पूर्ण झालेले हे मेमोरियल राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ बांधले आहे. संपूर्ण मार्बलने बांधले असून याचा डोम ब्राँझचा असून ती विजयाची निशाणी आहे. या मेमोरियलमध्ये आता म्युझियम केले असून २५ गॅलऱ्या आहेत. येथे भारतीय तसेच पाश्चिमात्य चित्रकारांची सुंदर चित्रे, मुघल शिल्पे, जुनी दुर्मिळ पुस्तके, पोस्टाचे स्टँप्स, नाणी, मूर्त्या व स्केचेस पाहावयास मिळाली.
तिथेच जवळच असलेल्या बिर्ला प्लॅनिटोरियम मध्ये जायचेच असे आमचे बाबा मुंबईपासून घोकत होते. तारांगणात खगोलशास्त्रावर बरीच माहिती मिळाली पण अर्धी डोक्यावरून गेली. मग तिथेच ग्रह-तारे व आकाशगंगा यावर आधारीत एक तासाची एक डॉक्युमेंट्री पाहायला मिळाली. खूपच अप्रूप वाटले. त्यादिवशी रात्री सगळी मुले आकाशात बराच वेळ तारे शोधत होती.
फोटो जालावरून
क्रमश:
कलकत्ता माझं आवडतं शहर. इथे मी जवळपास दिड वर्ष होतो. इथेच राहुन आसाम, सिक्कीम वगैरे भागाला कामानिमित्य भेट दिली होती. इथलं महाराष्ट्र मंडळ ( हाजरा रोडचं) खुपच सुंदर आहे. मी तिथे बरेच दिवस राहिलो आहे. एकदा तर चक्क दिवाळी करता पण तिथेच होतो. त्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नाना पासुन तर फराळ, आणि नंतर सुग्रास जेवण, सगळी व्यवस्था केलेली होती त्यांनी. छान आहेत आठवणी.. :)
ReplyDeleteचमचम चा फोटो बघुन तोंडाला पाणि सुटलं. माझी अतिशय आवडती मिठाई... माझं आजोळ बनारस चं आणि आईचं कलकत्त्याचं त्यामुळे जन्मापासुनच बंगाली मिठाई खात मोठी झाले. बरिच वर्षे झाली आता चमचम खाऊन. तुमच्या ह्या पोस्ट मुळे सगळ्या आठवणिंना उजाळा मिळाला. अनेक आभार. :)
ReplyDeleteमहेंद्र, आमच्या मामांना या महाराष्ट्र मंडळाबद्दल माहीत नसावे किंवा तेव्हां ती नसतील नाहीतर आमची ही मस्त सोय झाली असती.:) अर्थात कलकत्त्यात खाण्यापिण्याची चंगळ झालीच.
ReplyDeleteरोहिणी, आजोळ बनारसचं आणि आईचं कलकत्ता म्हणजे काय बाबा साड्यांची व खास खास दागिन्यांची रेलचेलच की.:D एकदा का चमचमची चव चाखली की अर्धा बॊउल खल्लास आणि मग आपणही खल्लास. हाहा...मस्त.
ReplyDelete