जाता जाता एक नजर इथेही........

Monday, October 12, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........५

गोखलेकाकूंना घेऊन गेलेले परत आले पण एक नवीनच अडचण ओढवली. त्या डॉक्टरने दुसऱ्या दिवशी परत बोलावले होते. टाके घातले होते त्यात ' पू ' तर होत नाही ना हे एक आणि माकडाचे चावण्याने तापबीप आला तर. एकतर बुद्धगयेला काहीच पाहून झाले नव्हते. या प्रकरणात सगळा वेळ ताण निर्माण होऊन कटकटीत फुकट गेला होता. भरीत भर आता राहावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मामा थोडे वैतागले होते. रात्री पुन्हा पटण्याला परतायचे असे ठरलेले असल्यामुळे महाराज व त्याचा हरकाम्या सगळा स्वयंपाक तयार ठेवणार होते. आता एकंदर चाळीस माणसांचा स्वयंपाक फुकट जाणार म्हणजे. बरं राहायचे म्हटले तर कुठे इथपासून सुरवात. मग जेवण-चहा-नाश्ता आलेच.

यात भर पडली ते सगळ्यांच्या निरनिराळ्या सुचवासुचवीची. कोणी म्हणू लागले की गोखले फॅमिली व अजून एक दोन जणांनी राहावे इथे आणि डॉक्टरला दाखवून उद्या परतावे. बाकीच्यांनी आता जे काही जमेल ते पाहून ठरल्याप्रमाणे रात्री पाटणा गाठावे. तर कोणी म्हणू लागले सगळे बरोबरच राहू. गोखल्यांना एकट्याला सोडून जाणे चुकीचे आहे. असेही संध्याकाळ झाली होती. तेव्हा उद्याच उरलेल्या गोष्टी पाहून जाऊ पटण्याला. इतकी तोंडे एकदम बोलायला लागल्याने खूप गदारोळ माजला. शेवटी मामांनी टाइम ऑउट घेतले. सगळे जरा शांत झाले तसे मामा म्हणाले, " गोखलेंना सोडून जाणे मलाही प्रशस्त वाटत नाहीये. तेव्हा आपण मुक्काम करूयात. इथे बऱ्याच धर्मशाळा आहेतच तेव्हा ती सोय होईल फक्त जेवणाचे कसे जमवता येईल ते पाहतो. तुम्ही सगळे फिरा इकडे तिकडे मी येतोच. " असे म्हणून मामा व त्यांच्याबरोबर लेले व नाईक काका गेले.

" अहो.... अहो मी काय म्हणते.... ऐका नं जरा.... " आमच्या आईने सुरवात केली तोच तिला थांबवत बाबा म्हणाले, " मला माहीत आहे तू काय सांगणार ते. मला ही असली झेंगटं बिलकुल झेपत नाहीत आणि आवडत नाहीत माहीतेय ना तुला. तरीही कशाला सांगतेस. लेले, नाईक जोडगोळी गेलीये ना. करू देत त्यांना. मी आपली दोघं आणि जी येतील तितकी पोरे घेऊन पुन्हा एकदा आक्रमण करतो आणि पायऱ्या पादाक्रांत करून शिखर गाठतोच. मस्त व्यूह दिसेल वरून. तू येतेस तर चल तू पण नाहीतर बसा ’ सास्वांच्या व सासरच्या मंडळीचा ’ तुमचा खास आवडता विषय घेऊन. ’ तुझ्याशी जमेना अन तुझ्यावाचून करमेना ’ अशी तुम्हा यच्चयावत बायकांची गत आहे. अगदी आमच्या मातोश्रीही सुटल्या नाहीयेत त्यातून. चालू दे तुमचे, आम्ही येतोच. " असे म्हणून बाबांनी आम्ही दोघे, गिरीश, चित्रा , गायतोंड्याची रवी व नितू, शेट्यांचा अशोक व चित्राच्या कडेवर काळेंची गौरी इतक्यांची फौज घेऊन कुच केले. मुले तयार होतीच शिवाय खाली आलो की प्रत्येकाला एक एक पेरू व दोन दोन लिमलेटच्या गोळ्यांचे आमिष होते. वानरसेनेशी गनिमी काव्याने मुकाबला करून आम्ही फत्ते केलीच
.

हळूहळू अंधारून येऊ लागले आणि कानाशी गूं आवाज सुरू झाले. पाहता पाहता जिकडे तिकडे मोठाले डास फिरू लागले. तसे भराभर जीने उतरून खाली पोचलो. आधीच दिवसभर हत्तीरोग झालेली माणसे पाहून मनात थोडी भीती बसली होतीच ती आता फारच जाणवू लागली. मग सगळ्यांचे तांडव सुरू झाले. लहान मुलांचे स्वतःभोवती गोल गोल फिरणे व मोठ्या माणसांचे सारखे अंग झटकणे व चापट्या मारणे. भयंकर विदुषकी प्रकार, एकीकडे हसूही येत होते आणि दुसरीकडे भीतीमुळे अंगविक्षेप थांबेनात. अर्धा पाऊण तास हा प्रकार चालू राहिला. तोवर मामा आले.

आणि आम्ही एका धर्मशाळेत गेलो. तिथे सात-आठ खोल्या मिळालेल्या. भाडे अगदी नाममात्र होते. फक्त रु. ५/- गाद्या, उश्या व जाड चादरीही दिल्या त्यांनी. प्रत्येकाला एक बादली गरम पाणीही मिळणार होते. मुळात धर्मशाळा स्वच्छ होती. आणि तिथे बाजूलाच एक खानावळ होती. राईसप्लेट फक्त रु.१/- त्यात लेलेंनी त्याला पटवले, " शिंच्या मुलांचे कसले रे रुपया रुपया घेतोस? ती पोट्टी जेमतेम घास घास चिवडणार अन उठणार की रे. तेव्हा त्यांचे फार तर पन्नास पैसे लाव तू. " मग थोडी खिचातानी करत शेवटी खानावळवाला मानला. नाईककाकांनी अगदी रंगवून हा संवाद सगळ्यांना सांगितला. लागलीच लेलेकाकूंच्या चेहऱ्यावर , " आमचे हे आहेच मुळी हुशार. उगाच वायफळ पैसे गेलेले त्यांना मुळीच खपत नाहीत." बायकोच्या डोळ्यातले कौतुक पाहून लेलेकाका अगदी कृतार्थ झाले. आमच्या आईचे तोंड उगाचच उतरले.
नाही म्हणजे तिलाही वाटत असणार मनातून, कधीतरी ह्यांनीही करावे की असे पण..... त्याला पाहिजे जातीचे आणि आमचे बाबा म्हणजे निवांत प्रकरण. तिने रागारागाने झटकलेली मान मी बरोबर पाहिली. बाबांनीही पाहिली असणारच पण आम्ही निवांत....... हा... हा..... मग हातपाय धुऊन सगळे जेवायला गेले. सगळीकडे डासांची फौज होतीच बरोबर. आम्ही जेवत होतो ते आमचे रक्त पीत होते.

जेवून सगळे परत आले. धर्मशाळेचे सिलींग जवळ जवळ १४/१५ फूट उंच होते. परत आलो तोवर लाइट लागले होते. ओवरीत शिरताच जवळ जवळ सगळी मुले किंचाळली. प्रत्येक लाइटच्या भोवती शेकडो किडे-डास घोंघावत होते. १२/१३ फुटांचे किड्यांचे जथेच्या जथे निरनिराळे आवाज करत गोल गोल फिरत होते. कोणीच पुढे जायला तयार होईना. ही भिंत भेदून जाणारच कसे. पुन्हा जो जाईल त्याला हे किडे चावणार किमान अंगावर तर चढणारच ना. मी तर इतकी भेदरले होते की बस. मग तो धर्मशाळेवाला काही घोंगडी घेऊन आला. ती पांघरून एक एक करत सगळे खोल्यांमध्ये शिरले. दार लागलीच बंद करून घेतले कारण आतला दिवा लागताच ही फौज आत घुसणार ना. गोखलेकाकू अगदी बिचाऱ्या झाल्या होत्या. नंतर त्यांना कोणी काही म्हटले नसले तरी मनातून सगळे त्यांनाच दोष देत असणारच याची त्यांना खात्री होती.

मुले काय मोठे काय किती वेळ असे कोंडून बसणार ना मग आमचे खेळ सुरू झाले. घोंगडे पांघरायचे आणि या मोहोळातून पळत सुटायचे. एक जण पळत असेल तेव्हा इतर मुले लांबून पळणाऱ्याची मजा पाहायची आणि खिदळायची की दुसरा शूरपणा करायला धावे. मोठेही आपापले गृप जमवून बसले आणि मग गप्पा सुरू झाल्या. मग कधीनुक सगळे झोपून गेले. मधून मधून तुरळक डास मारल्याचे व ईईई..... मार मार... असे आवाज उठत राहिले.

उजाडले पण कोणीच उठले नाही. अगदी मामाही झोपलेलेच होते. घर सोडून आता दोन आठवडे होत आल्याने मधूनच घराची आठवण येऊ लागलेली होतीच. तशात मोठी माणसेही मंदिरे पाहून कदाचित कंटाळलीच असावी. पुन्हा बुद्धमंदिरात जायचे कोणी नावच घेतले नाही. उगाच इकडम तिकडम चालू राहिले. अकरा वाजता गोखलेकाकू व मंडळी डॉक्टरकडे जाऊन तासाभरात आलबेल असल्याची खात्री व औषध घेऊन परत आली. पुन्हा एकदा खानावळ वाल्याकडे स्पेशल राईसप्लेटवर ताव मारून थोडी वामकुक्षी व भरपूर लाल पेरू घेऊन सगळे परत पटण्याला निघाले.

इकडे महाराज आधी थोडा काळजीत पडला. पण त्याला सवय असणार अशा घोळांची. सगळे अन्न कडकडीत गरम करून नीट झाकपाक करून तो व हरकाम्या सिनेमाला पळाले. सकाळी उठल्या उठल्या पुन्हा चुलाणं पेटवून अन्न गरम करून ठेवले. पटण्याला पोचलो तोवर सात वाजले होते. सगळे ताजेतवाने होईतो भराभर महाराजने पाने घेतली. ताजा ताजा शिरा मात्र केला त्या दरवळात आपण कालचेच अन्न जेवतोय हे कोणाला जाणवलेही नाही.
बायकांमध्ये चर्चा चालू होती, " बाई बाई, काय गं केले असेल इतक्या अन्नाचे? बरे फेकायला जीवही होत नाही. बहुतेक वाटले असेल भिकाऱ्यांना, चला तेवढेच पुण्य. " हा.... हा... हा...... सिलीगुडीत गेल्यावर लेलेकाकांनी महाराजला बरोबर घोळात घेऊन खरे वदवून घेतलेच आणि पाठही थोपटली तू पण आमच्यातलाच की रे म्हणत.

एव्हांना आम्ही सिलीगुडीत असायला हवे होतो. टाईमटेबल सारखेच चुकत होते. त्यामुळे रिझर्वेशनही फुकट जाऊ लागले. मग हाल ठरलेले. तरी बरे त्यावेळी रिझर्वेशन ला फक्त पन्नास पैसे /रुपया पडत होता. नाहीतर लेलेकाकांनी शेवटी उतरताना सगळा हिशोब मामांच्या हातावर ठेवला असता आणि अगदी खास नाकांत बोलत विचारले असते, " बोलां मामां आता याचे कायं करतां? " एकदाचे आम्ही सिलीगुडीला निघालो.

4 comments:

  1. sahich chalalay ki!!! Lele kaka mastach...kobra na!!!!

    ReplyDelete
  2. हो गं तन्वी, लेले म्हणजे अगदी एकारान्त कोब्रा. असेही नाकात बोलायचेच पण भडकले किंवा टोमणे हाणत असले की अस्सल एकारन्ती सूर बरकां. त्यांच्याकडूनच मी शिकले," हें असें बोलायलां बघ ". नाहीतर आम्ही देशस्थ. तरी बरं एकही संधी मिळाली नाही त्यांना नाहीतर देशस्थांचे पुरे खानदान काढून ठेवले असते त्यांनी. ही ही...संधी मिळाली की हाणलेच शालजोडीतले लेलेंकाकांनी.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !