जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, October 11, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........४

सगळी मंडळी रुळली होती. सहवासाने भीड चेपलेली. सुरवातीला एकाच शाळेतील सहा जण असल्याने ते व त्यांच्या घरचे लोक खूपच सावध किंवा ज्याला फॉर्मल म्हणता येईल असे वागत होते. पण हा आव तरी किती दिवस टिकणार ना. त्यामुळे छोटे छोटे गट तयार होऊ लागले होते. मुलांमध्ये या गोष्टीला फारसा वाव नव्हता. मामांनी घेतलेल्या क्लासमुळे जरी सगळे पटापट तयार झाले तरीही अंघोळीवरून कुरबुरी झाल्या. मॅटॅडोर मध्ये बसताना मग शेट्येकाकूंनी राजेकाकू व नाईककाकूंना मुद्दाम आपल्या गाडीत बसू दिले नाही. तेव्हा हे सगळे कानावर पडले असले तरी कधी ते जाणवले नाही पण लक्षात मात्र राहून गेले.


नालंदा विद्यापीठ

जवळ जवळ तीन तासांनी नालंदाला पोचलो. पोरेटोरे मांडीवर असे बसून मोठी माणसे चांगलीच अवघडून गेली होती. नालंदा विद्यापीठाचा परिसर एकूण १४ हेक्टर इतका मोठा आहे. ' नालम ' म्हणजे ' कमळ 'व ' दा ' म्हणजे ' देणे ' या दोन शब्दांचा अर्थ ' कमळ देणारे '. ' कमळ ' हे ' विद्येची देवता सरस्वतीचे ' प्रतीक असल्यामुळे जे ' ज्ञान देते ' ते ' नालंदा '. अर्थात या नावाच्या अर्थाबद्दल बरेच मतभेदही आहेतच. देशादेशातून आलेले दहा हजार विद्यार्थी व दोन हजार शिक्षक इतका प्रचंड पसारा होता. राजा अशोक, हर्षवर्धनाने इथे अनेक मंदिरे, विहार, आश्रम बांधले.

भव्य पिरॅमिडस व भगवान बुद्धाच्या अनेक मुद्रा व जागोजागी बांधलेले छोटेमोठे स्तूप येथे पाहावयास मिळाले. लाल गडद रंगाच्या विटा वापरून केलेले सगळेच बांधकाम भव्यदिव्य आहे. भोवताली बागाही आहेत. फारच लहान होते मी त्यामुळे अनेक गोष्टी नजरेतून सुटल्या, त्यांचे महत्त्व, अर्थही फारसा कळत नव्हता. पुन्हा जायचा योग अजूनतरी आलेला नाही. पण जायची फार इच्छा मात्र आहे.

नालंदा मध्ये पाहण्यासारखे बरेच असल्याने पाचसहा तासात पाहून होणे शक्यच नव्हते. मग तिथून जवळच असलेल्या राजगीर गावात आम्ही एका मोठ्याश्या गढीत मुक्काम केला. मामा बरेचवेळा येथे येऊन गेलेले असल्याने अशा काही ओळखी बांधलेल्या होत्या. गढी खूप मोठी होती. खोल्याही हवेशीर व प्रशस्त होत्या. त्या काकूंनी खाण्यापिण्याची अगदी चंगळच करून टाकली. अगदी आग्रह करकरून सगळ्यांना वाढू लागल्या. मग काय प्रथम जरा भिडस्तपणे खाणारे आम्ही तुटूनच पडलो. चालून चालून दमलेले सगळे रात्री छज्जावर गोधड्या अंथरून जाड जाड घोंगडी पांघरून गुडुप झोपलो. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आग्रहाने त्यांनी गरमागरम पुऱ्या व मेथीची भाजी आणि त्यावर कलाकंद खायला घालूनच आम्हाला सोडले. अनपेक्षितपणे घडलेला इतका प्रेमाने केलेला पाहुणचार आजही आठवतो.

मग पुन्हा नालंदाला गेलो. दिवसभर जितके पाहता आले तितके पाहून संध्याकाळी पुन्हा मॅटॅडोरने तीन तास प्रवास करून रात्री पटण्याला धर्मशाळेत परतलो. मुले तर गाडीतच पेंगली. कसेबसे दहीभात खाऊन लुडकलो ते डायरेक्ट मामांच्या, " चाय चाय गरम, चलो चलो उठो उठो आज गया-बुद्धगया जाना हैं। चाय चाय.... " हाकाऱ्याने जाग आली. एकतर एकाच भल्या मोठ्या खोलीत सगळे झोपत, बसत असल्याने बायकांची फारच पंचाईत होत होती. नशीब न्हाणीघर व संडास वेगवेगळे होते. नाहीतर एकदा का राजेकाकू व नाईककाकू बाथरुममध्ये घुसल्या की उरलेल्या तिसऱ्या बाथरुममध्ये चार चार अंघोळी उरकल्या जात पण यांचे काही आटोपत नसे. सारखे कपडे धूत बसायच्या.
किती ठोकले तरी या बाहेर येईनात तसे गिरीशने बाहेरून कडी लावून टाकली.

अंघोळी झालेले खोलीत कपडे आवरत होते तर काही नाश्ता उरकत होते. मुले ओसरीत खेळत होती. या दोघींचे एकदाचे उरकले पण बाहेरच येता येईना. मग खूप दार ठोकले, आवाज दिले शेवटी रडकुंडीला आल्या. मुलांना आवाज येत होते पण गिरीशच्या धाकाने सगळे तोंड दाबून हसत बसले. तिसऱ्या बाथरुममध्ये नेमकी आमची आई गेलेली. यांचे चढे आवाज ऐकून ती भर्रर्रर्रकन आवरून बाहेर आली व एकदाची कडी काढली. मग सगळ्या मुलांचा उद्धार झाला आणि रोख बिचाऱ्या शेट्येकाकूंवर होता. गंमत म्हणजे यातले त्यांना काहीच माहीत नव्हते.

विष्णूपद मंदिर
पटण्यापासून दक्षिणेला १०० ते ११० किलोमीटरवर गया आहे. तिथेही आम्ही मॅटॅडोरनेच गेलो बहुदा. गयेला पोचलो तेच मुळी विष्णूपद मंदिरात गेलो. फाल्गू नदीच्या तिरावर वसलेले हे मंदिर इंदौरच्या देवी अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा बांधवून काढले आहे. या मंदिरात भगवान विष्णूची पावले आहेत. आपल्या जिवंतपणीच आपले पिंडदान इथेच करता येते. फाल्गू नदीत किंचितही पाणी नव्हते. अशी आख्यायिका आहे की सीतेने फाल्गू नदीला शाप दिल्याने हिचे संपूर्ण पाणीच आटून गेले. आता तिथे फक्त वाळू व खडक-कातळच दिसतात. त्याचवेळी सीतेने वडाच्या झाडाला अक्षयतेचे वरदान दिले. म्हणून मग याचे नाव अक्षयवट पडले. येथे एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे. पारंब्या जमिनीत जाऊन जाऊन याचा घेर अवाढव्य झालेला आहे. काही जणांनी हा पिंडदानाचा विधी तिथे केला असावा. कारण आम्ही बराच वेळ तिथे होतो.

गया व बुद्धगया दोन्ही ठिकाणी माझ्या स्मरणात राहिलेल्या दोन गोष्टी. एक म्हणजे तिथे प्रचंड संख्येने विधवांचा वावर आहे. संपूर्ण पांढरी वस्त्रे व पांढरी कपाळे, केस तुटके भादरलेले अश्या भरपूर जाडजूड बायका मंदिरात जिकडेतिकडे वावरत होत्या. दुसरे म्हणजे फक्त या दोन्ही गावात हत्तीरोग झालेली खूप माणसे पाहिली. एकच पाय हत्तीसारखा मोठा झालेल्या बाया, पुरूष व लहान मुले पाहून भीती वाटली. कशामुळे होते असे मोठ्या माणसांनी विचारले असता एका विशिष्ट प्रकारच्या डासाच्या चावण्याने हा रोग होतो असे कळले. मग काय त्या दोन्ही तिन्ही रात्री व दिवसाही इतके ओडोमस आयांनी आम्हा पोरांना चोपडले की पुढे बरेच दिवस हा ओडोमसचा वास आमचा पिच्छाच सोडेना.

महाबोधी मंदिर विशाल बुध्द मंदिर

बुद्धगयेला महाबोधी मंदिर व ९४ फूट उंचीचे विशाल बुद्ध मंदिर पाहिले. अजूनही बुद्धाची भव्य मूर्ती स्मरते. इथे बरेच काही पाहिले असले तरी फारसे आठवत नाही मात्र अगदी जशीच्या तशी आजही आठवते ती गोखले काकूंची झालेली वाईट अवस्था. झाले काय की मामांनी सकाळीच सगळ्यांना निक्षून सांगून ठेवले होते की कोणीही जवळ खाण्याची वस्तू ठेवायची नाही. बुद्धाच्या मंदिराच्या खूप साऱ्या पायऱ्या चढून आम्ही जात होतो. या मंदिराच्या दरवाज्याशीच बऱ्याच लाल पेरू व शेंगदाण्याच्या गाड्या उभ्या होत्या. पेरूचा वास सर्वत्र पसरला होता. बऱ्याच जणांनी पेरू व शेंगदाणे घेतले पण लागलीच खाऊन संपवले. गोखले काकूंनी पिशवीत जपून ठेवले. पटण्याला गेलो की खाऊ.

पायऱ्या चढायला लागलो तेव्हाही मामांनी विचारले, " अरे कोणाकडे पेरू/ शेंगदाणे शिल्लक नाहीत ना? असतील तर टाकून द्या. " पण त्या काहीच बोलल्या नाहीत. जिने चढता चढता एकदम नाइककाकांच्या पुढ्यात एका मोठ्या माकडाने उडी मारली. लागलीच दुसरे, तिसरे पाहता पाहता दहा/बारा मोठी छोटी माकडे पटापट जिन्यावर अवतरली. आमची तर गाळणच उडाली. झू मध्ये लांबून पिंजऱ्यात बंद माकड पाहणे वेगळे आणि मो ठी मोठी नखे, विचकणारे दात व आपल्या अगदी जवळ येऊ पाहणारी ही माकडे इतकी उग्र होती की अनेक जणांनी किंकाळ्याच फोडल्या.

मामांनी ओरडून सांगितले की उगाच घाबरून ओरडू पळू नका. ते काहीही करणार नाहीत. त्यांना सवय आहे माणसांची. फक्त कोणीही चुकूनही त्यांना काहीही खायला मात्र देऊ नका. पण मोठी माणसे...... ऐकतील तर ना? गोखलेकाकूंनी माकड जवळून जावे म्हणून पिशवीत हात घालून एक पेरू काढला व त्याला दिला. ते पाहताच कठड्यावर झोके खाणारे मोठे माकड हात पसरून त्यांच्या पुढ्यात उभे ठाकले. तोवर त्यांची थरथर वाढलेली. कसाबसा त्यांनी आणिक एक पेरू काढला व त्या मोठ्याच्या हातावर ठेवला. मग काय माकडांनी त्यांना घेरले व पिशवी ओढू लागले. त्या सोडेनात तशी एका माकडाने पटदिशी त्यांच्या एक कानशिलात ठेवून दिली. आणि दुसऱ्याने बोटाला कडकडून चावा घेतला. दोन बोटे अक्षरशः लोंबू लागली. गिरीश मोठ्याने रडू लागला. गोखले काका व माझे बाबा माकडांना हाकलायचा प्रयत्न करत होते पण काकूकडची पिशवी हिसकावून घेतल्यावरच आली तशी एका क्षणात सगळी वानरसेना गायब झाली.

गोखलेकाकूच्या बोटांमधून रक्ताची धार लागलेली. तसेच सगळे पळत खाली आलो व काकूंना घेऊन दोघेतिघे डॉक्टरकडे गेले. आम्ही बाकीचे त्यांची वाट पाहत मंदिरातच थांबलो. दोन तासांनी ड्रेसिंग व स्टिचेस घालून गेलेले परत आले. काकूंच्या गालावर माकडाचा पंजाच्या काळ्यानिळ्या खुणा चांगल्या दहा-बारा दिवस टिकल्या.

मामांनी नको म्हणून सांगितले होते, तरीही....



फोटो जालावरून
क्रमश:

8 comments:

  1. कसलं सार्थ नावं आहे ,’नको म्हटले होते ना....’ म्हणजे मामांनी नको म्हटलेली बाब करा आणि भोगा कर्माची फळं.....
    मजा येतेय आणि माहितीत भर पडतेय....
    बाकी माणसात फरक असला तरी माकडं मात्र सारखेच सगळीकडॆ आपल्या सप्तशॄंगीला किंवा सोमेश्वरला पण असेच पिडतात की ते सगळ्यांना....

    ReplyDelete
  2. भानस ...
    एवढ्या वर्षानंतरही झालेला हा उत्तरेचा प्रवास अजूनदेखील लक्षात आहे...छान चित्रण केले आहेस...
    आजच ईतर 3 ही पोस्ट वाचल्या....तुमचे मामा तर सॉलिडच आहेत...ते अगोदर फिरले होते का सर्व ठिकाणे?..बर सूचना करून देखील ही मोठी माणसे एक्तील तर ना ईति (शेट्येकाकू, गोखलेकाकू)...
    पुढील भागाची वाट पाहतोय लवकर पोस्ट कर...

    ReplyDelete
  3. sahajach ne mhaTalaMy tase, sahalimadhye roj ek tari 'nako mhatale hote na...' cha prasaMg ghadatoy ki!

    ReplyDelete
  4. वाचताना मजा येते आहे. . .त्या सोबत खूप सारी नवीन माहिती पण मिळते आहे!!!bargerse

    ReplyDelete
  5. तन्वी,अग दरवेळी आम्ही आलो की वणीला जातोच. माहेरून आमची कुलदेवता. माकडं कसली पिडत असतात लोकांना.

    ReplyDelete
  6. गणेश मामा या सगळ्या ठिकाणी आधी जाऊन आलेले होते.त्यांच्या परीने धोके सांगत होते पण.....ही ही.थोडं थोडं लक्षात आहे तेच लिहीण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही सगळे वाचताय पाहून धीर आला रे.धन्यवाद.:)

    ReplyDelete
  7. हो गं गौरी,इतकी माणसे व इतके दिवस म्हटल्यावर दररोज काय ठिकाणे पाहायची काही चेंज हवा ना. हा..हा...हा...... बरे वाटले आवर्जून लिहीलेस.

    ReplyDelete
  8. मनमौजी प्रतिक्रियबद्दल आभार.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !