जाता जाता एक नजर इथेही........

Monday, October 26, 2009

ताई, आतां फुडलं विलेक्शन कधी व्हईल हो......

" ताई, अवो आता फुडलं विलेक्शन कधी व्हईल हो? " माझी मोलकरीण मला विचारत होती. आधीच माझं डोकं सटकलेलं. त्यात मी एकदा दुर्लक्ष केलं, कोणी मला हाक मारीत नव्हतं तरी उगाचचं आले आले म्हणत तिच्यासमोरून पळ काढला. मला भीती वेगळीच, वड्याचा राग वांग्यावर निघायचा आणि ती अर्धे घासलेले भांडे दाणकन सिंकमध्ये आपटून " कशापायी आरडताय? मला न्हाई झेपायचं, मी चाल्ली . " म्हणत सरळ निघून जायची. आणि मग दुसरी बया मिळेतो धुणी-भांडी-केरवारे---जाऊदे बाई, कामे संपतात का कधी? पण ही बया हा माझा अनुल्लेख समजेल तर ना. ती पेटलेलीच. आताच तर इलेक्शन संपलेय. गेला महिनाभर नुसते रण माजले होते. त्याचा धुरळा अजून उडतोच आहे तोवर हिला पुन्हा विलेक्शन कशाला हवे झालेय हे काही मला समजेना.

१९९६ -१९९८-१९९९ अशी तीन लागोपाठ लोकसभेची इलेक्शन्स व मध्ये मध्ये विधानसभा झालंच तर ऑफिसच्या सोसायटीचे, आमच्या बिल्डिंगच्या कार्यकारिणी सभेच्या निवडीचे, आमच्या ठाणे जनता बँकेचे अशी एकावर एक इलेक्शने होऊन होऊन मी भयंकर बेजार झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ९९च्या इलेक्शनची मेली कुठच्या कोपऱ्यात आलेली ड्युटी करून जीव मेटाकुटीला आलेला. ठाणे निवासी म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कुठेही फेका. आता ठाणे जिल्हा केवढातरी मोठा. पालघरच्या माणसाला भिवंडीला टाकतील, भिवंडीवाल्याला ठाण्यात तर ठाण्यातल्याला मरत पाठवतील वसईला. हा असा घोळ घालण्यामागे काय कारण दडलेय हे आयोगवालेच जाणोत, आम्हा सगळ्यांना मात्र यातून त्यांना मिळणारा आसुरी आनंदच दिसत असे. उठा लेको पहाटे दोन वाजता आणि सुटा ज्या मिळेल त्या वाहनाने. जाऊ दे, विषयांतर होतेय. काय करणार फार छळ केलाय ना या प्रकाराने.

एकतर लेकरू लहान त्यात हे लोकांच्या दारोदारी जाऊन नावे गोळा करा, सारखे निरनिराळ्या ट्रेनिंगना जा आणि मग या दोन दिवसांच्या ड्यूट्या व मागून येणारी मतमोजणी. शनीवार-रवीवारही आमची ड्युटी सुरूच. शिवाय ह्या मतमोजणीच्या वेळी फारच गोंधळ चालत. बाहेर ही माणसे, त्यांचा आरडाओरडा. आम्ही आत कडीकुलपात. लवकर संपले तर बरे नाहीतर रात्रही तिथेच. पुन्हा ते कुठल्या एरियात आहे यावरही अनेक प्रकार अवलंबून असत. इलेक्शन तर आटोपले होते पण ही ड्युटी लागलेली होतीच. त्यामुळे अजून संपूर्ण मुक्ती मिळालेली नव्हती.
आता ह्या सगळ्या ताणाचा, वैतागाचा राग माझ्या बाईवर निघू नये म्हणून मी तिच्या प्रश्नाला बगल देऊ पाहत होते. पण हिचे टुमणे काही संपेना.

" ताई, अहो ऐका तरी. कोण बी हाकारत नाहीये तुम्हास्नी. कधी व्हईल म्होरलं विलेक्शन? "

" का गं, तुला कशाला हवेय इलेक्शन? दोन दिवसांपूर्वीच तर मत देऊन आलीस ना? निदान रिझल्ट तरी लागू दे की. " मी अगदी सौम्य आवाज ठेवून हसू आणत तिला विचारले.

" अवो मत देऊन आल्ये की. पर त्येचा काय उपेग? गेल्या वर्साला त्याच्या दोन वर्स मागं बी दिल्यालंच न्हवं का मत. मग त्याउप्पर झालीच की दोन विलेक्शनं. म्हनूनशान तर कवाधरून विचारून राह्यली न्हवं का तुम्हास्नी की आता म्होरलं कधी व्हईल."

च्यामारी! हिला काय खेळ वाटतोय की काय? आपलं तुरतुर जायचं, नांव सांगायचं, नखाला शाई लावून घ्यायची, घड्या घालायच्या, डब्यात कागद सारला की सार्थक झाल्यासारखं घरी यायचं असाच आविर्भाव. पुन्हा त्या दिवशी कोणाकडेही कामाला जायचं नाही. खाडा तोही हक्काचा. तुम्हास्नी सरकारं सुट्टी देतंय नव्हं का? मग आम्हास्नीपण त्येच काम करायचंय म्हटल्यावर सुटी नग का? काय बोलणार यावर. तरी मी तिला यावेळी सुनावलंच, " मला सुटी आहे का? नाही नां, मग तुला पण मिळणार नाही. " त्यावर, " ताई, तुमचं आक्शी बरुबर हाये परं असं एकाकडे जायाचं अन दुसरीकडे खाडा असं नाय बा जमायचं मला. त्या समद्या बाया मला लय बडबडतील. तव्हां म्या काही यायची न्हाई. " असे म्हणून ही सरळ चालती झालेली.

आता मला फार उत्सुकता लागली. ही इतके वेळा का विचारत्येयं पुढचे इलेक्शन कधी. " सुनिताबाई अगं मला कळू दे तरी तू का विचारते आहेस ते? तिकडे लोकसभेत आणि इकडे विधानसभेत कोणी का येईना तुला काय गं फरक पडतोय? सांग बरं आपला मुख्यमंत्री कोण आहे? बघ तेही तुला माहीत नाही. " मला मध्येच तोडत ती म्हणाली, " अवं ताई, मला काय करायचंयं, त्यो म्येला कोणी बी असनां. तुम्ही म्हणता ते आक्शी बरूबरं. मला काय बी फरक पडत न्हाई. आव जनतेला फरक पडावा म्हणून ह्ये लोकं कधी काही करत्याल इतकी वेडी आशा बाळगायला म्या काही भाबडी न्हायं. त्यांचा सगळा जीव खुर्चीत अन पैक्यात. गरीबाच्या टाळूवरचं लोणी खातील अनं माड्या चढवतील. पर हिकडे डाळींचा कहार झालाय, राशन दुकानात काय बी गावनां झालंय. इज न्हाई की पियाचं पाणी नाही पर ह्यास्नी तुझं माझं करण्यावाचून अन एकदुसऱ्याची लफडी-भालगडी काढण्यावाचून फुरसत मिळेल तव्हा ना. जाऊ दे वं ह्याचं काय बी दुःक नाय मला. अवो हे रोजचंच हाये. पर तरी बी मला विलेक्शन आवडतात."

" पुन्हा तेच. आता हे सारं तुला कळतंय ना मग तरी पुन्हा पुन्हा कशाला हवेयं गं तुला इलेक्शन? "

" ताई, चला बरं माझ्या घरी आत्ता. न्हाई म्हणू नगा. घोटभर च्या घ्या. चांगलं आलं घालून करत्ये. चला.. "

मला हो नाही म्हणायला न देता सुनिताबाई चक्क हाताला धरून तिच्या घरी घेऊन गेली. एका खोलीच्या मध्ये भिंत घालून दोन खोल्या केलेल्या. झोपडी असली तरी वर कौल होती व अर्ध्या पक्क्या भिंती होत्या. स्टूल देऊन बसवले. मी पाहत होते, स्वयंपाकाच्या जागेत एक उंच फडताळ होते. त्यात सगळे पितळेचे चकचकीत डबे नीट लावलेले खाली स्टीलची ताटं-वाट्या-पेले.... पाहता पाहता लक्षात आले की सगळे काही सेटच्या स्वरूपात होते. एकदम डझनावारी. हंडे, बादल्या, स्टीलचे पिंप,टेबल फॅन, फ्रीज,टीव्ही ही होता. तोवर चहा झाला. मला चांगल्या भारी कपात देऊन म्हणाली , " घ्या. पाहा जमतोय का तुम्हास्नी?
ताई आता कारनं दाखवत्ये ती पाहा. हे जे सगळे डझनावारी पेले, भांडी दिसताहेत ना ती गेल्याच्या गेल्या विलेक्शनला ती बाई नव्हती का हुबी तिन्ये दिली. शिवाय मला साडीबी मिळाली व्हती. म्या काही शिक्का मारला नाही तिच्या नावाफुडे. पर चांगली व्हती. बिचारी त्या वक्ताला पडली. या वक्ताला पुन्हा आलती हात जोडत अन ह्यो फॅन व रोख पैसे देऊन गेली. या वक्ताला मात्र मी तिच्याम्होरच शिक्का मारल्याय. असं करत करत तिने बरेच काही मला दाखवले. हे अमुक ने दिले ते अमूकने.

शिवाय म्हणाली की मोठ्या दोन्ही पोरांना कामबी मिळाली. ह्येच की घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो/पत्रक/ विलेक्शनची कार्डे वाटायची. भिंतीवर कागदं चिकटवायची. उमेदवार आला की त्याच्या नावाचा जय करत बोबंटायचं. दुसऱ्याच्या सभेला जाऊन याच्या नावाचा जयजयकार करायचा. खायलाप्यायला त्योच घालत होता वरून चांगलं पैसेबी मिळत होतं. अवं असं बी ही पोरं नुसती माझ्या जीवावर बसून खात्यात. वर मारामाऱ्या, शिवीगाळी करत फिरत्यात.... नुसता मेला कहार मला. त्यापरीस ह्ये ब्येस नव्हं का? जितक्ये जास्त उमीदवार उभे राहतील तितका आम्हांस्नी फायदा होतोय.

अन ताई गंमत सांगू का, अवं मेल्यं एकबी कामाचं न्हाई. त्येंना वाटतंय त्ये मतांसाठी गोड गोड बोलून आम्हास्नी गंडवत आहेत त्ये समजत न्हाई. परं यांचं बारसं ज्येवलयं म्या. तिकडे मतदान केंद्रावर जावंच लागतंय हो, यांच्ये पंटर लोक असतात ना पहाऱ्यावर आमच्या. पर आत जाऊन म्या सगळ्यांवर शिक्का मारून ठेवत्ये. मरा तिकडे. कोनालाच बी माझं मत म्या द्यायाची न्हाई. असं मी काही येकली नाही करत आम्ही समदेच करतुया. माल मिळतो ना तो घ्यायाचा बस. अवं ह्या चोरांची लंगोटी न्ह्यायी परं तिचं सूत तर हाती लागतंय अन वर बदाबदा सगळी आपटतातच. मग जो सत्तेवर येईल त्यास्नी कंचातरी बवाळ खडा करून खाली खेचत्यात की पुन्यांदा विलेक्शनची जत्रा भरतेय. की आमच्या दारात तोंडावर जनतेचा कळवळा, माणुसकी फासून, ग्वाड ग्वाड बोलत कांबळी-पैकं घेऊन हात जोडूनशान वोटांची मागनी करत उभं राहतंय. काय ? म्हनून मला पंचाईत पडलीये की आता म्होरलं विलेक्शन कधी व्हईल. "

यावर मी काय बोलणार,. " अग चहा झकास झालायं गं. उद्या ये वेळेवर " असे म्हणत मी घरी आले. " लोकशाहीचे " किती सोपे गणित आहे तिचे. आपल्या जीवनात, कोणीही आले - गेले त्यामुळे काहीही फरक कधीच पडणार नाही हे सत्य तिला पटवून घ्यावे लागलेलेच नाही कारण ते मुळी तिला मान्यच आहे. नाहीतर आपण. दरवेळी मनात कुठेतरी अपेक्षा ठेवून प्रयत्न करतो. नवीन माणसे, नेतृत्वबदल, तरुण रक्त, पक्षाचे धोरण एक ना दोन गोष्टींना बळी पडतो व नेते निवडून देतो. निवडून आलेले नवीन काही चांगले करणे सोडाच उलट होते तेही बिघडवून टाकतात. आणि आधीच्यांपेक्षाही जास्त स्वतःची तुंबडी भरतात. शेवटी असाहयपणे उघड्या डोळ्यांनी चाललेला आणखी मोठा गोंधळ, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार पाहत पुन्हा पुन्हा त्यावर हिरीरीने वांझ चर्चा करत संताप संताप करत राहतो. पुढच्या इलेक्शन पर्यंत.


21 comments:

 1. लेख लई ब्येस झालाय बरं का !

  ReplyDelete
 2. छान झाला आहे लेख...निवडणूकिचि एका वेगळ्या कोनातून तिसुद्धा मजेशीर ओळख झाली.

  ReplyDelete
 3. देवेंद्र प्रतिसादाबद्दल आभार.

  ReplyDelete
 4. सही आहे ना...मला वाचताना वाटलंच होतं साधारण काय वाढुन ठेवलं असणार ते...लोकशाहीचा विजय असो. दुसरं काय??? लोकांचं (म्हणजे त्यां राजकारण्यांचं) लोकांनी (म्हणजे त्यांच्या ठेकेदारांनी) लोकांसाठी (म्हणजे ज्यांना खरंच फ़ायदा होईल त्यांच्यासाठी) चालवलेलं राज्य..आपला संबंध आहे का सांगा??

  ReplyDelete
 5. हेरंब स्वागत व अनेक आभार.:)

  ReplyDelete
 6. लोकशाहीचा विजय असो!....अपर्णा अगं हे साटलोटं जोवर संपत नाही तोवर हे असचं चालणारं. असाही त्यांचा जनतेशी संबंध नाही आणि जनतेला याचीच सवय झालीये. उद्या खरेच कोणी आपला वाली उभा राहीलाच व यांच्या तावडीतून सुटलाच तर त्याच्या लोककल्याणाने जनतेलाच भोवळ यायची.:)

  ReplyDelete
 7. धन्यवाद गौरी.

  ReplyDelete
 8. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर आहे खरे मनोरंजक पण यात आपण सुशिक्षित (?)मध्यमवर्ग भरडला जातो ग!!! लेख बाकी झक्कास!!! तुझी कामवालीच(कल्पनेतली) येत राहिली डोळ्यासमोर

  ReplyDelete
 9. वा! एकदम मजा आली वाचताना. असही जाणवत नेहमी की श्रीमंत आणि मध्यमवर्गाला ’अलिप्त’ राहण्याची चैन करता येते. गरीबांवर वेगळे दबाव असतात पण ते हुषारीने मार्ग काढतात त्यातून..

  ReplyDelete
 10. एकदम तडका लेख झाला बगा!!!

  ReplyDelete
 11. त्या कामवाल्या बाईला पण समजलं लोकशाही म्हणजे काय ते.. खरंच कठिण आहे...

  ReplyDelete
 12. तन्वी अग तेच तर मी शेवटच्या पॆरात मांडलय ना.भरडले तेही जातातच गं पण ते आपल्यासारखे मुंडके तुटलेल्या कोंबडीसारखे तडफडत राहत नाहीत.हे असेच असणार तेव्हां त्यातून कसा फायदा होईल हे चटकन ओळखून अंमलबजावणीस लागतात.

  ReplyDelete
 13. aativas स्वागत व आभार. खरे आहे भरल्यापोटी अलिप्तपणा दाखवता येतो परंतु यासारख्यांची रोजची हातातोंडाची लढाई ना.

  ReplyDelete
 14. महेंद्र, ते वाटता आहेत मग आम्ही का घेऊ नये? शिवाय नंतर आमच्या वाटेचं खाऊनच वसुली होणार आहे ना....साधा सरळ हिशोब आहे तिचा.:)

  ReplyDelete
 15. मनमौजी, प्रभावित प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

  मनमौजी यावेळी तुमचेच नाव आलेय बरं का.....:)

  ReplyDelete
 16. आईला देतो हा लेख वाचायला.. ती पण इलेक्शन ड्यूटया करून अशीच वैतागली आहे. शाळेत मुलांना शिकवायचे कमी आणि ह्या अश्या ड्यूटया करायच्या शिक्षकांनी... बाकी एण्ड भारी आहे.

  बाकी अपर्णाची कमेंट आवडली भारी. *लोकांचं (म्हणजे त्यां राजकारण्यांचं) लोकांनी (म्हणजे त्यांच्या ठेकेदारांनी) लोकांसाठी (म्हणजे ज्यांना खरंच फ़ायदा होईल त्यांच्यासाठी) चालवलेलं राज्य*

  ReplyDelete
 17. रोहन, आई नक्की सहमत होईल बघ.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !