जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, October 21, 2009

शेव बटाटा पुरी




जिन्नस

  • दोन मोठे बटाटे उकडून हातानेच कुस्करून घ्यावेत
  • एक मोठा कांदा व एक मोठा टोमॅटो बारीक चिरून
  • एक वाटी घट्ट दही
  • एक वाटी साधी/नायलॉन शेव
  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
  • चाळीस पन्नास पुऱ्या ( खाताना मोजू नये असे आई सांगत असे )
  • हिरवी चटणी, आंबट गोड चटणी व लसणाची चटणी
  • पुऱ्यांसाठी- दोन वाट्या सेमोलिना पीठ ( इथल्या इंडियन स्टोअर्स मध्ये मिळते ) नसल्यास दोन वाट्या मैदा व एक वाटी रवा
  • एक क्लब सोड्याची बॉटल/कुठलाही पिण्याचा सोडा
  • चवीपुरते मीठ
  • एक चमचा कडकडीत तेल( -मोहनाकरीता
  • हिरव्या चटणीकरीता - एक वाटी चिरलेली कोथिंबीर, चार/पाच तिखट हिरव्या मिरच्या, बारा-पंधरा पुदिन्याची पाने, एका लिंबाचा रस, एक चमचा चाट मसाला व चवीपुरते मीठ - मिक्सरमधून काढावे.
  • आंबट-गोड चटणीकरीता - दहा/बारा खजूर, लिंबाएवढा चिंचेचा कोळ( तीन चमचे ), चार मध्यम गुळाचे खडे, एक चमचा धनेजिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा शेंदेलोण ( सैंधव ) - मिक्सरमधून काढावे.
  • लसूण चटणीकरीता - आठ/दहा लसूण पाकळ्य़ा, तिन चमचे लाल तिखट व चवीपुरते मीठ - मिक्सरमधून काढावे.

मार्गदर्शन

प्रथम सेमोलिना पिठात/मैदा-रव्याच्या मिश्रणात चवीपुरते मीठ व एक चमचा कडकडीत मोहन घालून एकत्र करून त्यात क्लब सोडा घालून घट्ट भिजवावे. तासाभराने मिश्रण कुटावे किंवा मिक्सरमधून काढावे. कढईत प्रथम तेल नीट तापवून नंतर गॅस मध्यम ठेवून छोट्या छोट्या पुऱ्या बदामी रंगावर तळून घ्याव्यात. पुऱ्या चांगल्या तळल्या जायला हव्यात नाहीतर मऊ पडतात. ओव्हन असल्यास २०० डिग्रीवर प्रीहीट करून बंद करावा व त्यात या तळलेल्या पुऱ्या ठेवाव्यात म्हणजे एकदम कुरकुरीत व फुगलेल्या राहतात.

कोथिंबीर, मिरची, लसूण, पुदिना, लिंबू, चाट मसाला व चवीपुरते मीठ घालून हिरवी चटणी तयार करून घ्यावी.

खजुराचे तुकडे करून त्यात अर्धी वाटी गरम पाणी घालून पाच मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात गूळ, चिंच, धनेजिरेपूड, लाल तिखट व शेंदेलोण( सैंधव ) घालून आंबटगोड चटणी करून घ्यावी.

लसूण बारीक चिरून त्यात तीन चमचे लाल तिखट व चवीनुसार मीठ व जरूरीपुरते पाणी घालून लसणाची ओली चटणी करून घ्यावी.

एका बशीत तळलेल्या सात/आठ पुऱ्या अलगद पोट फोडून ठेवाव्यात. पुरीत प्रथम बटाटा-कांदा-टोमॅटो-दही-शेव- हिरवी चटणी-लसूण चटणी-आंबटगोड चटणी घालून त्यावर कोथिंबीर टाकावी. आवडत असल्यास वरून चाट मसाला भुरभुरून लागलीच गट्टम करावी.


टीपा

पुऱ्या विकत आणल्या तर एक काम कमी व चुकण्याची भीती नाही.

चटण्या अती घट्टही नकोत आणि पाणीदारही नकोत.

दही शक्यतो घट्ट असावे. पातळ असल्यास काही वेळ फडक्यावर घालून पाणी काढून टाकावे.

चटण्या घालताना सढळ हाताने घालाव्यात. पुदिना-मिरची-लिंबांची चव, आंबट-गोड व लसणाची सणसणीत चव मस्त जाणवायला हव्यात. बटाटा गरम असेल तर अजून छान. बटाट्याऐवजी रगडाही वापरता येईल. मात्र तो गरमच हवा, रगड्याचीही सुंदर लागते.

एकदम पाहता बरीच तयारी करावी लागणार असे वाटून थोडे दडपण आल्यासारखे होईलही परंतु एकदा का पहिली शेवबटाटापुरी तोंडात गेली की मग सगळे श्रम वसूल आणि बस खाते जाव.... खाते जाव......

10 comments:

  1. अग लागलीच गट्टम कशी करायची?????? तु तिथे मी असं करत तुझ्या मागे फिरावे असा विचार करतेय मी....
    मस्त मस्त आहे...ईति गौराक्का.
    उद्याच करते आता.....मस्त दिसतय एकदम...

    ReplyDelete
  2. गौराई आईच्या मागे लाग गं...:)तन्वी आता तुला सुटका नाही. गौरीला फूस लावलीये मी....:D

    ReplyDelete
  3. शेव-बटाटा पुरी ... आज अड्डयावर जाउन हल्लाबोल करायला हवा... :D

    ReplyDelete
  4. चला आज कोथरुडला "कस्तुरी" किंवा बालाजीनगरला "रामनाथ" कुठेतरी जायलाच हव. . .शेव बटाटा पूरी झिंदाबाद!!!!. . .काय करता घरी खायचे अजुन दिवस आले नाहीत :). . .अन् स्वतः बनवायला वेळ व कोणाची कंपनी नाही.

    ReplyDelete
  5. रोहन,मग काय चापलीस का जाऊन तुमच्या अड्ड्यावर....:D

    ReplyDelete
  6. मनमौजी हाहा....कस्तुरी का रामनाथ?
    घरी खायचे दिवस कधी येऊ घातलेत? कांदेपोहे सुरू आहेत का? शुभेच्छा!:D

    ReplyDelete
  7. कस्तुरीला निघालो होतो पण टिळक रोडला राजहंस प्रकाशनच पुस्तकांच प्रदर्शन होतो मग काय चांगली अर्धा डझन पुस्तक घेतली. . . बाहेर आलो तर समोर गाडा होता मग तिथेच हाणली शेव बटाटा पुरी!!! मस्त होती!!!कांदे पोहे चालू आहे. . सध्या थोडा कामात आहे,वेळ मिळाला की लिहीन!!!

    ReplyDelete
  8. Swati....पुस्तक खरेदी..सहीच.या अशा प्रदर्शनात रमून जायला होते अगदी. दरवेळी येताना माझी हॆंड्बॆग भरलेली असते:)
    आभार.

    ReplyDelete
  9. भानस. . .माझ्या कमेंटला नाव "स्वाती" का येते आहे???ही कमेंट तर मी केली आहे. . .ओ गुगल वाले.. अहो का लेकरावर असा अन्याय करताय???

    ReplyDelete
  10. मनमौजी बरे झाले रे तू लिहीलेस.मला तर काहीच समजेना. कमेंट तुझीच आहे असे वाटत होते पण ही स्वाती नावाची भानगड काही उलगडेना. म्हणून प्रोफाईलवर जाऊनही पाहिले तर तिथे काहीच नाही.:(
    आता तू पुन्हा कमेंट टाक( या पोस्टवर नको रे टाकू...हेहे ) म्हणजे गुगलबाबाने चूक सुधारलीये का ते कळेल ना:D.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !