जोराजोरात ओरडण्याचे, धावत येणाऱ्या पावलांचे आवाज जवळ येऊ लागले तसा मंग्या मारायचा थांबला. शांतपणे उभे राहत त्याने चाकुवरचे पोत्याचे रक्त त्याच्याच शर्टाला पुसले. चाकू बाजूला ठेवून खांबाला टेकून गुडघे पोटाशी घेऊन एकटक तो पोत्याच्या भयचकित डोळ्यांकडे पाहत राहिला. शकीच्या उघड्या, वेदनेने पिळवटलेल्या डोळ्यांमधून प्राण गेल्यावरही खिळून उरलेल्या अत्याचाराच्या भयाण खुणांचा बदला मंग्याने पुरा केला होता. चांदणीला दिलेले वचन पाळले होते.
" अरे खून खून....! बापरे! किती निर्घृण हत्या आहे ही. या पोराने केली आहे? एवढुसा तर दिसतोय. किती खुनशीपणे वार केलेत. ही हरामी अवलाद अशीच निपजायची. आईबाप पापं करतात आणि ही घाण उकिरड्यावर टाकून होतात मोकळे. पकड रे त्याला. कसा पाहतोय पाहा बेरड. पळूनही गेला नाही. किती वार केलेत. इतक्या लहान मनगटात इतकी ताकद आली कुठून... ? चल रे. त्याला घेऊन चल चौकीवर आणि या पोत्याची वासलात लावा. हरामखोर मेला ते बरे झाले. फार माजला होता साला. गेली चारपाच वर्षे शोधत होतो पण कुठे लपला होता कोण जाणे. कधीतरी असाच कोथळा बाहेर येऊन मरायचा होताच. पण इतक्या लहान पोराच्या हातून... ए, मारू नको रे त्या पोराला. मी बोलतो त्याच्याशी. चहा पाजा कोणीतरी त्याला." इन्स्पेक्टर ओरडत होता. " काय रे, आईबाप आहेत का? का उकिरड्याची अवलाद तू? " मंग्याला ऐकू येत होते... मायेला कोणीतरी सांगितले असावे. उर बडवत पळत येताना दिसत होती. आता काय उपयोग येऊन. त्यादिवशी कुठे होतीस माये तू? शकी हाकारत होती तेव्हा कुठे होतीस तू माये? कुठं होतीस?
दिवसाचा, कामाचा, माराचा कोटा जवळपास पुरा होत आला होता. गेले काही दिवस एकाच विचाराने मंग्या भारला गेलेला. त्यामुळे कामात चुका होत होत्या. मार वाढत होता. मंगेशचे मन, शरीर सरावलेले. कामाबद्दल, माराबद्दल त्याची तक्रार कधीच नव्हती. ते तर जन्मापासूनच त्याच्या मागे लागलेले. चार दिवसाच्या, धड डोळेही नीट उघडून पाहू न शकणाऱ्या मंगेशच्या हाडाचा सापळा सुपात घालून त्याला व त्याच्यापेक्षा आठ वर्षाने मोठ्या शकीच्या बखोटीला धरून माय त्या दोघांची बोचकी सिग्नलच्या चौकातल्या पुलाखाली आणून आपटे. तिने व बेवड्या बापसाने रोजचे बारा तासासाठी त्या निष्पाप जीवांना भाड्याने देऊन टाकलेले. शकूची आठवण आली तशी मंगेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले. एखाद्या जीवाची कष्ट करण्याची एक सीमा असते पण शकूच्या बाबतीत सगळे नियम उरफाटेच होते.
रोज सकाळी सात वाजता सिग्नलपाशी माय सोडून गेली की ’ पोत्यादादाच्या ’ रागाच्या व चाळ्यांच्या तावडीत चुकूनही न सापडण्यासाठी ती जीव तोडून धावत राही. सिग्नल लागला रे लागला की सुपातल्या माझ्यासकट जराही न हिंदकळवता ती ते उचलून अतिशय निर्व्याज गोड हसू आणून गाडीवाल्यांपाशी जाई. इतरांसारखे लहानग्यांना चिमटे, चापट्या मारून रडवण्याचे पाप त्या निष्पाप जीवाने कधीच केले नाही. उलट माझ्या गालाला हात लावून ती खुदकन मला हसवण्याचा प्रयत्न करी. बरेचदा मी हसत असे. माझ्यासाठी तो जणू खेळच होता. माथ्यावर रणरणते ऊन, पोटात जेमतेम रडता येईल इतकेच दूध, पाणी मिळत असूनही शकूच्या मायेच्या सावलीत मी बोळकं पसरून, आ.. आ... करत हसत असे. मी असा हसलो की तीही तितकेच गोड हसत गाडीवाल्याकडे, कधी शेजारी बसलेल्या बाईसाहेबांकडे पाही. त्यांच्याही नकळत त्यांच्या खिशातून, पर्समधून रुपया, पन्नास पैसे कधीकधी तर पाच अगदी दहाही रुपये ते देऊन जात. वर किती गोड लेकरं आहेत हो. किती दुष्ट असतील यांचे आई-बाप, अशी अनेक प्रकारचे बोल, तर्क कानावर येत.
इतक्या लहान शकूला सिग्नलच्या लांबीची पुरेपूर कल्पना होती. तिचे त्या ९० सेकंदाचे गणित पक्के होते. एका गाडीपाशी चुकूनही ती पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ रेंगाळत नसे. पसरलेल्या तळव्यावर काही टेकवले जाणार असेलच तर त्याला २५ सेकंद वेळ पुरेसा आहे. माणसाचे मन द्रवणार असेल तर ते पहिल्या दहा सेकंदातच, आमचे हसू पाहून... नंतरचे १० सेकंद, शकूचे पाठीला चिकटलेले पोट व माझा सापळा पाहून कुठेतरी त्या गाडीवाल्याच्या पोटात तुटण्यासाठी व त्यापुढचे पाच हातावर नाण्याचा स्पर्श होण्यासाठी. त्यानंतर उगाच तिथे रेंगाळून हातावर काहीच पडणार नाही हा शकीचा अंदाज फारच क्वचित चुकत असे. जेव्हां तो चुके तेव्हाही ती कधीच गाडी सोडून पुढे गेलेली असे. गाडीवालाच हाका मारून पैसे टेकवी. बरेचदा रुपयाखाली नसतच ते.
तीन गाड्या झाल्या की शांतपणे ती पुलाच्या खाली सरके. सिग्नल सुटलाय, कर्कशं हॉर्न वाजता आहेत आणि मला घेऊन शकी धावतेय असे कधीच झाले नाही. मला मांडीवर घेऊन लगेच ती चार चमचे पाणी पाजी. स्वत:ही दोन घोट पिऊन घेई. शकीच्या आणि माझ्यामध्ये म्हणे दोन पोरं झाली होती मायेला. ती दोघंही गेली मरून याच सिग्नलवर. शकीच्याच सुपात. माय म्हणे दुसरं पोर मेलं तेव्हा शकी पंधरा दिवस तापली होती. तापात बरळत होती. मायेला वाटलेलं हीही ब्याद मरून जाणार आता. पण कशीबशी तगली. आठ दिवसात पुन्हा सिग्नलवर आली. तेव्हा मी नुकताच जन्मलो होतो. ती दोघे तिच्यामुळेच मेली असे शकी सारखी म्हणत असे. त्यामुळेही असेल, मायेला न सांगता थोड्याथोड्यावेळाने मला दूध पाजत असे. पैशाची विभागणी करून खिशात नीट ठेवी. दिवसभर रस्त्यावर धुळीचा, उन्हाचा, पावसाचा, मारा सोसूनही मी मजेत असे. मात्र माय न्यायला आली की ही मजा संपून जाई. आम्ही दोघं दिवसभराची वणवण करून दमलेली लेकरं नजरेस पडताच ती पहिले काय करी तर शकीच्या पाठीत सटकन एक रट्टा मारे. तिचे बखोटे धरून गदगदा हालवतं घाणेरड्या दोनचार शिव्या देऊन किती कमाई झाली हे विचारत सगळे पैसे काढून घेई. शकूच्या अखंड मेहनतीमुळे दिवसाकाठी बरेचवेळा तीस-चाळीस रुपये जमतच. कधीकधी तर पन्नासही मिळून जात. तरीही माय कधीच खूश होत नसे. शकीने आणि मी तिचे इतके कुठले घोडे मारले होते कोण जाणे पण तिने कधीच आम्हाला मायेने कुरवाळल्याचे आठवत नाही. कदाचित कदाचित तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पापे असू आम्ही. जे काय असेल ते असो. फक्त जन्म दिलेला म्हणून माय म्हणायचे तिला.
झोपडीत गेल्यागेल्या बेवडा खाऊन दिवसभर झोपलेला बाप पैशाची वाट पाहत असे. सिग्नलवर तो कधीच येत नसे. एकदा पोलिसांनी त्याला तिकडून पकडून नेल्यापासून त्याने धसका घेतला होता. तिघांची वरात झोपडीत शिरताच मायेच्या मुस्कटात खाणकन भडकवत तिच्या हातातले पैसे तो हिसकून घेई. असे झाले की माय त्याला झोंबायला लागे. ती त्याला ओरबाडी, गुद्दे मारी. एकदोन वेळा तिचे हात झटकून बापूस तिच्या पेकाटात कचकन एक लाथ घाले. एखाद्या वाळवीने पोखरलेल्या लाकडासारखी माय उन्मळून पडे. की पुन्हा एक लाथ पाठीत घालून बाप गुत्त्याचा रस्ता धरे. मला घट्ट उराशी कवटाळून शकी कोपऱ्यात थरथरत उभी असे. बाप नक्की गेला याची खात्री पटली की ती मायेपाशी जाई. मला सुपातून काढून पटकुरावर हळूच ठेवून ती मायेला हाक मारे. तिच्या पाठीवरून पोटावरून, गालावरून हात फिरवत राही. दहापंधरा मिनिटाने माय सुबकत सुबकत उठून बसे. शकीच्या इवल्याश्या बंद मुठीत माझ्या चड्डीत लपवून ठेवलेली, कधी पाचाची कधी दहाची नोट असे. जगण्याची लढाई गनिमी काव्यानेच लढायला हवी हे कोणीही न शिकवता त्या बालजीवाला उमजले होते.
कोणाकोणाच्या घरून मिळालेले बरेचदा शिळे व कधीतरी ताजे अन्न मायेने आणलेले असे. त्यातले निवडक चांगले ती बापासाठी ताटात ठेवून देई. उरलेले ती दोघींच्या पानात घेई. बाटलीत दूध भरून मला पाजल्याशिवाय शकीने कधीच घास खाल्ला नाही. हे सगळे मायेकडूनच मला कळले. माय म्हणते, मी तुला फकस्त जन्म दिला पण ती तुझी खरी माय होती. तसेच असणार. तशी शकी मला आठवतेय ती त्या पांढऱ्या पांढऱ्या चादरीखाली झाकलेली रक्ताच्या काळपट लाल रंगाने माखलेली, डोळे सताड उघडे टाकून ताठरलेली. चार वर्षाचा होतो मी. माझ्या अंगात ताप होता म्हणून मला घरीच ठेवून त्यादिवशी ती एकटीच गेली होती सिग्नलवर. तेरा वर्षाची शकू आजकाल पोत्यादादाच्या नजरेत सारखी येऊ लागली होती. पण एकतर मी सतत बरोबर असे आणि शकूही खूप हुशार होती. जगाच्या थपडा खाऊन बेरकी झालीच होती. कुठे धोका आहे हे ती बरोबर हेरी आणि भराभर दुसरा रस्ता धरी. निसर्ग हळूहळू त्याचे काम करत होता. शकूचे गाल वर येऊ लागलेले. नजरेतील चमक वाढू लागली होती. हडकलेले शरीर किंचित भरत चालले होते. त्याची गोलाई वखवखलेल्या डोळ्यांना अचूक दिसू लागलेली. आजकाल भीक मागतानाही ती काहिशी लांबच उभी राही. पोत्यादादाला अनेकवेळा पोरांना अंगाखाली घेताना पाहिलेले असल्याने ती त्याच्यापासून कायम चार हात लांब राहत असे.
पण तो दिवसच उरफाटा निघाला. माझा ताप वाढलेला. मायेलाही बरं नव्हतं. सर्दीने ती हैराण झालेली. माय घरातच आहे हे पाहून शकू मला न घेताच सिग्नलवर निघाली. आज लवकर येते हा का रे मंगेशा. उगाच चळवळ करू नकोस. गपगार पडून राहा गुमान. येताना तुझ्यासाठी खारी घेऊन येईन. असे मला सांगून ती गेली ती चादरीत गुंडाळूनच परत आली. पोत्यादादाने माझ्या निरागस, निष्पाप शकूचा लचका तोडला होता. एकदा, दोनदा, तीनदा.... पोलिसांचे शब्द कानावर पडत होते, तिने ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडावर हाताचा पंजा इतका घट्ट दाबून धरला होता की ती कधी मेली तेही त्याला कळले नाही. तो तसाच तिला ओरबाडत असताना कोणाचेतरी लक्ष गेले आणि एकच कालवा झाला. त्याच्या वजनाने छातीचा पिंजरा पिचून गेला, इवलेसे शरीर फाटून तुटून गेले. पोलीस म्हणत होते की शकूचा प्राण लगेचच गेला असावा. बरे झाले, शकी लगेच मरून गेली ते. निदान मेल्यावर तिला वेदना जाणवल्या नसतील. पोत्यादादाच्या अंगाखाली असलेल्या तिच्या देहाचे हाल तिथेच शेजारी उभे राहून कदाचित तिने पाहिले असतील. ओठांची हिंपुटी करून हमसाहमशी ती रडली असेल. माये, वाचव गं तुझ्या लेकराला या राक्षसाच्या तावडीतून असे म्हणत तिने टाहो फोडला असेल. सगळेच कसे एकाएकी बहिरे झाले गं शके? क्षणाचीही उसंत नसलेल्या सिग्नलवरच्या एकालाही तुझी किंचाळी ऐकू जाऊ नये... ओरडणारा पोचेपर्यंत पोत्या पळून गेला तो गेलाच. पोलिसांनी बरेच शोधाशोध केली पण कोणी म्हणे तो आंध्रात कुठेशी असलेल्या त्याच्या गावी पळून गेला.
शकीचे उघडे, फाटलेले डोळे दिवसरात्र माझा पाठलाग करत राहतात. कधीकधी वाटे ती माझ्यावर नजर ठेवून आहे. कुठल्याही वाईट मार्गाला मी वळू नये म्हणून ती पापणी लवतच नाही. रात्री पोटाशी पाय घेऊन झोपडीतल्या छताच्या भोकातून दिसणारी ती एकच एक चांदणी शकीच आहे नक्की. आताशा चांदणी मधूनच लाल होते. शकूच्या उघड्या डोळ्यात रक्त उतरते.... शकूला डोळे मिटायचे आहेत. शांत निजायचे आहे. ती बदला मागते आहे? बदला. जायज बदला. तिचा हक्क आहे तो. तिचे हक्काचे एकमेव माणूस म्हणून ती माझ्याकडे आशेने पाहतेय. शकूला शांत निजायचे आहे. मला तिच्या ऋणातून उतराई व्हायचे आहे. पंधरा दिवसांपूर्वी सिग्नलवर दाढी वाढवलेला एक हाडाचा सापळा दिसला. आधी माझे लक्षच नव्हते. पण तो वारंवार शकी मेली त्या जागेकडे जाऊन उभे राहून वेड्यासारखे हातवारे करत काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटत राही. डोके बडवून घेई, थोबाड फोडून घेई. मला शंका येतेय. पोत्या मला आठवतच नाही. शके, उद्या मी त्याला हाक मारणार आहे. हाक ऐकून वळला तर उद्या रातीला चांदणी उगवेल ती धवल... कोमल... स्नेहल... शांत... निर्मळ...
सत्य घटनेवर आधारित कथा आहे ही. तुकड्यातुकड्याने माझ्यापर्यंत पोहोचली. शकू सोडून ज्याने त्याने आपापल्या कर्माची फळे भोगली. परंतु, अशा प्रसंगात खरा दोषी कोण? शकू, मंग्या, पोत्या, माय-बापूस का या प्रत्येकाची परिस्थिती....??? बळी सगळेच गेले. पण हकनाक बळी गेली ती शकू आणि अन्यायाचा बळी मंग्या. म्हणायला.... अन्यायाचा, शकूच्या प्रेमाचा बदला चुकवला त्याने. पण ते केवळ म्हणण्यापुरतेच. उभे आयुष्य नासले ते नासलेच. केवळ परिस्थिती कारणीभूत असते असे बरेचदा म्हटले जाते. काही अंशी खरेही आहे ते. जनावरेही निसर्गाचा नियम शक्यतो तोडताना आढळत नाहीत. मात्र दोन पायाचे माणूस नावाचे जनावर कधी कुठल्याक्षणी कसे वागेल याचा अंदाज बांधणे अशक्यच. एका जनावरातून दुसऱ्याचा जन्म.... त्यातून तिसऱ्याचा.... साखळी अहोरात्र वाढते आहे.... वाढतेच आहे.... शेवट नसलेली... बळी घेणारी... बळी पडणारी.... जीवघेणी....
( खरी नावे बदललेली आहेत )
:(
ReplyDeleteविषण्ण! हीन पातळी गाठण्याचाही कळस माणूसच करू जाणो! :(
कोण माणसं? कोण जनावरं? :(
ReplyDelete...
ReplyDeleteधन्सं आनंदा.
वारंवार पडणारा दुर्दैवी प्रश्न... :(
ReplyDeleteधन्यवाद गौरी.
sunna karun sodnari katha, vachtana angavar kate aalet. dipti joshi
ReplyDeleteआजकाल पेपर ला रोज २ तरी बातस्या असतातच सामूहिक बलात्काराच्या.... हे कुठे जाणार आणि कधी थांबणार.... आतंकवादासारखाच हा पण हाताबाहेर आणि आटोक्याबाहेर गेलेला प्रकार...
ReplyDeleteबाप रे... काय भयंकर लिहिलं आहेस !! वाचवतच नव्हतं !! काय अवस्था झाली असेल त्या शाकीची आणि मान्ग्याची प्रत्यक्षात :(((
ReplyDeleteदिप्ती, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. :) आभार!
ReplyDeleteमाधुरी, अगदी गं. आतंकवाद निदान दारच्यांनकडून होतोय घरच्यांना हाताशी धरून. पण तळागाळापासून अतिशय उच्चभ्रू घराघरातही होणारे अत्याचार रोजचे व सगळ्या सीमा ओलांडणारे. यात शिक्षण व सुसंस्कृत व निरक्षर + असंस्कृत कशाचाही फरक नसतो. सगळेच अनाकलनीय... :(
ReplyDeleteधन्यवाद!
...
ReplyDeleteधन्यवाद हेरंब.
भयंकर :(
ReplyDeleteअशा लोकांना माणूस का म्हणायचे ??
bap re!!!! bhayankar ahe he!!!
ReplyDeleteभयानक...एवढ्याच शब्दात याचे वर्णन करता येईल. लिहिलेय पण अगदी टोकाला जाऊन. कथा म्हणून छान आहे; मात्र प्रत्यक्ष या घटनेचा विचार केला तरी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कथेतील शब्दना शब्द अंगावर येतो. हे अंगावर येणं न पेलणारं असंच आहे. विचार करायला लागलं तरी मेंदू शिणवणारं आहे. ज्यांनी भोगलं त्यांच्याबद्दल हळहळण्याशिवाय हाती काहीच नाही.
ReplyDeleteहैवान म्हणतात ते असेच असावेत... :(
ReplyDeleteBB आभार्स!
श्रीराज, असे अनेक अश्राप जीव हकनाक बळी जातच असतात. शिवाय घटनेच्या मुळाशी जाण्याइतका वेळ कोणाकडेच नसल्याने वरवर जे दिसते तेच सत्य मानून आपण चालतो... :(
ReplyDeleteधन्यवाद रे!
प्रसाद, जितके शक्य होईल तितके साध्या शब्दात लिहीण्याचा प्रयत्न केला. मंग्या-शकीच्या भाषेत लिहीलेले इतके अंगावर आलेले की डिलीट करून टाकले... मनुष्य किती क्रूर वर्तन करतो याची अनेक उदा पाहतो-वाचतो. खैरलांजी आठवले तरी रात्री झोप लागत नाही... असह्य... :(:(:(
ReplyDeleteधन्यवाद!
कुठे भेटली ही माणसं तुला ? माझ्या ऑफिसच्या सिग्नलपाशी एक कुटुंब वसलेले आहे...
ReplyDeleteचांगली पेलली आहेस सत्यकथा...त्या कथेतील भयाणता...
अनघा,ही घटना जुनी आहे. मी याची डायरेक्ट साक्षीदार नाही. माझ्या एका कामवालीच्या ओळखीतून कळली. बहुतांशी खून-अत्याचार ओळखीच्याच व्यक्तींकडून होतात. रॅंडम हत्या वेगळ्याच असतात...
ReplyDeleteआवर्जून अभिप्राय दिलास छान वाटले. धन्यू!
भयानक..
ReplyDeleteआणि तू लिहिलंयस ही असं की अंगावर सर्रकन काटा उभा राहतो..