जाता जाता एक नजर इथेही........

Monday, May 4, 2009

दहा पैशातले स्वर्गसुख

पाचवीत म्हणजे माध्यमिक शाळेत पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी बदलल्या. अभ्यास वाढलाच पण त्याबरोबरीने मजेच्या कक्षा विस्तारल्या. प्राथमिक शाळेत असताना फाटकाच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. चिंचांचे आकडे, चनियामनिया, बडीशोपेची फुले, गोळा, चणे-शेंगदाणे, झालेच तर बटाटे वडा अशा सगळ्या हाका मारून मारून बोलवणाऱ्या चिजा चाखायला मिळू लागल्या होत्या. पहिल्या दोन तीन शनिवारातच कळले की मधल्या पंधरा मिनिटाच्या सुटीत एक इडलीवाला येतो. कसे कोण जाणे पण हा एकमेव फेरीवाला आमच्या शाळेत आत येई. आमचे बरेचसे शिक्षकही नियमित ह्या इडल्या खात.

शनिवारी सकाळी सात वाजता शाळा भरे. पहिले दोन तास पिटी. सकाळी सकाळी सर सगळ्य़ांना चांगले ताबडवीत. मग गणिताचा तास की मधली सुटी. गणिताच्या तासातला शेवटचा अर्धा वेळ सगळे घंटेकडे कान लावून चुळबूळ करीत बसत. घंटा वाजली रे वाजली की अर्धा वर्गतरी धुमतकाट पळत तळमजला गाठे. एका डब्यात इडली दुसऱ्यात चटणी केळीची पाने अशी मांडामांड करून अण्णा तयारीत असे. आम्ही पोरे अक्षरशः तुटून पडत असू. दहा पैशाला दोन लुसलुशीत इडल्या त्यावर भरपूर चटणी. ( दहा पैशाला दोन इडल्या मिळत हे ऐकून माझा पोरगा झीट येऊन पडला. ) सकाळी सकाळी काही खाता आलेले त्यात पिटी करून दमलेले आम्ही प्रथम डोळ्यानेच ह्या इडल्या खात असू. पोटात कोकलणारे कावळे नुसत्या ह्या वासानेच उडायला लागत. दोन इडल्या कुठल्या कोपऱ्यात जात ते कळतही नसे त्यामुळे किमान तीन-चार इडल्या हव्याच.

इडलीवाला चार डबे भरून इडल्या दोन डबे भरून चटणी आणी. परंतु बारा-तेरा वर्गाच्या पोरांना ते कसे पुरणार. सायकल वरून त्यापेक्षा जास्ती त्याला आणता येत नसे. त्यामुळे नेहमीच ह्या खायला मिळत असे नाही. मग रडू येई. हे दहा पैसे जमवायला दोन दिवस चालत घरी जावे लागे. १९७५-७६ सालापर्यंत बीइएसटीचे हाफ तिकीट पाच पैसे होते. मी तर संपूर्ण आठवडा संध्याकाळी घरी चालत जाई तीस पैसे जमा करी. मग ह्या तीन इडल्या काहीतरी आंबटचिंबट खाई. अहाहा... स्वर्गसुख होते ते.

7 comments:

  1. लहानपण आठवलं. इंग्रजी चिंचा , बोरकुट, आणि रानमेवा. म्हणजे चिंचेची फुलं वगैरे पण मिळायचं आमच्या शाळे समोर.. खुपच सुंदर झालंय पोस्ट..अगदी डॊळ्यापुढे उभा राहिला अण्णा...

    ReplyDelete
  2. :) धन्यवाद महेंद्र. कसलीतरी एक पांढरी भुकटीही मिळायची पण आता मला त्याचे नाव आठवत नाही.

    ReplyDelete
  3. फ़ारच सुरेख लिहिलेय.अगदी डोळ्यासमोर आले.आमच्या शाळेसमोर पण असेच मिळायचे.बोरे ,चिंचा,बडिशेपेची फ़ुले आणि बरेच काही..जुना काळ डोळ्या समोरुन गेला.अण्णा सारखा आमच्या शाळेचा बाबु होता..त्याच्या हातचे समोसे मुंबई सोडल्या वर आज पर्यंत खायला मिळाले नाहीत.जुन्या गोष्टींची मजाच वेगळी नाही का?

    ReplyDelete
  4. हो गं उमा,शाळेचे सगळेच न्यारे व आनंदी जग होते. फारच कमी कटकटी नुसती धमाल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  5. ठाण्याची डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा आणि माझ घर ठाणे पूर्वेला. मला अजून आठवतय मी घरून बसने यायच्या ऐवजी चालत यायचो तिकीटाचे पैसे वाचवायला आणि मग तिकीटाच्या पैशामधून मग हा असा खाऊ खायचा ... जुने दिवस आठवले सगळे...

    ReplyDelete
  6. :)रोहन. माझा मुलगा सरस्वती मराठी मंदीर मध्ये होता काही वर्षे. तूही ठाण्याचाच तर.

    ReplyDelete
  7. होय .. मी जन्मापासून ठाण्याचा.. आजही ठाण्यालाच राहतो ... आपल्यात १ नाही तर २ दुवे आहेत समान ... :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !