जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 9, 2009

सगळ्यांचे प्रिय बटाटेवडे


बटाटेवडे - नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटते. खरे ना? अनेक ठिकाणी यांची चव आपण चाखलेली आहे. त्यातल्या काहींची चव आपल्या खास आवडीची असते. मग त्यासाठी आपण घरापासून लांब का जवळ हे न पाहता हमखास व वारंवार तिथे जातोच. पण ही चैन मायदेशातच आहे ना? इथे खायचे तर आयते-मायते मिळण्याचे ख्वाब मायदेशाच्या वारीसाठी ठेवून स्वतः कष्टायलाच हवे . खपून वडे करून घरच्यांना खायला द्यावेत आणि उत्सुकतेने त्यांच्या डोळ्यात पावतीची उत्स्फूर्त दाद शोधावी तर, " अग छानच झालेत गं पण ते आपल्या अमुकतमुक सारखे नाही. " थोडक्यात हॉटेल/गाडीवरच्या सारखे लागत नाहीत असे बोलत सारे मटकावून टाकतात . मग मीही म्हणते, " हं, बरोबरच आहे, कसे आवडणार? यात सडके बटाटे नाहीत की घाम.... ‍" जाऊदे बाई. उगाच काहीतरी डोळ्यासमोर येऊ लागते. मग मी चंग बांधला आणि सगळ्यांना असे बटाटेवडे खिलवले की आता म्हणतात की, " अग मायदेशात गेल्यावर तू कर गं हे इतके सुंदर वडे मी त्याला ( आवडीच्या ठिकाणवाल्याला ) खिलवतोच. तोही पावती देईल. " मी मनात म्हणते हो ना नक्की देईल पण ते चांगले झाल्याची का त्याला कधी नव्हे ते आयते स्वादिष्ट वडे चापायला मिळाले याची.

जिन्नस

 • सहा मोठे बटाटे उकडून
 • एक मध्यम कांदा चिरून
 • सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • सात-आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून, आल्याचा रस दोन मोठे चमचे
 • सात-आठ कडीपत्त्याची पाने तुकडे करून, मुठभर कोथिंबीर चिरून
 • दोन वाट्या बेसन, एक चमचा तांदूळाचे पीठ
 • दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा हिंग
 • चवीनुसार मीठ, फोडणी व तळण्याकरीता तेल

मार्गदर्शन

बटाटे उकडून घेऊन गार झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. हातानेच कुस्करले तर जास्ती चांगले परंतु पीठ होता नये. एका भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ ), तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीनुसार मीठ एकत्र करावे. त्यात प्रथम अर्धे भांडे पाणी ओतून सगळ्या गठूळ्या फोडून मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ असता नये. म्हणून हळूहळू पाणी वाढवावे. साधारण इडलीच्या पिठाइतपतच असावे. एकजीव करताना व केल्यावर एकाच दिशेने फेटावे. ( थोडी हवा निर्माण होईल-तसेच मिश्रणात मोहन किंवा साधे तेल अजिबात घालू नये ) दहा मिनिटे फेटून झाकून ठेवून द्यावे.

कढईत दोन चमचे तेल घेऊन चांगले तापल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यात चिरलेल्या मिरच्या, कडीपत्ता, लसूण, अर्धी कोथिंबीर टाकून तीन मिनिटे मध्यम आचेवर परतून त्यावर कांदा टाकावा. दोन मिनिटे कांदा परतून त्यावर कुस्करलेले/चिरलेले बटाटे टाकून सगळे नीट एकत्र करून आच बंद करावी. जर लागलीच वडे तळायला घेणार असल्यास आल्याचा रस, उरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने मिश्रण एकत्र करून मध्यम आकाराचे गोळे वळून घ्यावेत. ( सगळे एकाच वेळी वळून घेतल्यास तळताना सोयीचे पडते )

मोठ्या आचेवर कढईत तळण्यास पुरेसे तेल घेऊन चांगले तापवून घ्यावे. तोवर पुन्हा तयार बेसनाचे मिश्रण एकाच दिशेने फेटावे. तेल तापले की आच मध्यम ठेवावी. आता बटाट्याचे वळून ठेवलेले गोळे बेसनात घोळून हलकेच कढईत सोडावेत. सोनेरी रंगावर तळून टिश्यूपेपरवर टाकून अनावश्यक तेल टिपून घ्यावेत. हिरवी/लाल चटणी, तळलेली मिरची, सॉस बरोबर किंवा नुसतेच मात्र गरम गरम खावेत.

टीपा

आवरणासाठी बेसनघोळ बनवताना तेल/मोहन घातल्यास वडे जास्ती तेल पितात असा स्वानुभव आहे. ( तसेच ते घालण्याची अजिबात गरजही नसते ) एकाच दिशेने मिश्रण फेटल्याने त्यात हवा तयार होते त्यामुळे आवरण घट्ट-फुगलेले न होता पातळ व हलके होते.
तांदुळाच्या पिठामुळे आवरणाला थोडा कुरकुरीतपणा येतो.
फोडणीमध्ये कांदा असल्याने वडे तळायला घेण्याच्या वेळीच त्यात मीठ घालून गोळे करून घ्यावेत. आधीच मीठ घातल्यास मिश्रणास पाणी सुटून ते पातळ होईल.
आल्याच्या रसाने वडे अतिशय स्वादिष्ट होतात. आल्याचे तुकडे घातल्यास ते सगळ्या मिश्रणाला नीट लागत नाहीत म्हणून रस घालावा.

11 comments:

 1. सुन्दर दिसतायत वडे!! फेडेक्स केले असते तर चालले असते. आम्हीही मिटक्या मारत खाल्ले असते. :D रेसेपी ट्राय करेन.

  बेसन इथे बर्याचदा चांगले मिळत नाही. मग बेसनाच्या ऐवजी डाळ भिजवून आणि मिक्सरमध्ये वाटून वापरतो. अशी भिजवलेली डाळ आणि तू म्हणालीस तसे थोडेसे तान्दळाचे पीठ वापरून कवर खमंग खुसखुशीत होते.

  he raam आता मात्र वडे करण्याशिवाय गत्यंतर नाही. धारा लागल्यात बघ. जग वाहून जायचे सगळे आता वडे केले नाहीत तर. हाहाहा.

  ReplyDelete
 2. प्रभावित, अग इतकी अप्रतिम दाद मिळाली. माझ्या मेहनतीचे सार्थक झाले. तू म्हणतेस ते खरेच आहे, इथे बरेचदा बेसन कडवट मिळते. मला फेडेक्स करायला आवडले असते गं पण...ह्या अंतराचे काय करावे,:P.
  करून पाहा आणि मला फोटू तरी पाठव,हाहाहा.

  ReplyDelete
 3. माझा विक पॉइंट आहे वडे आणि बटाटा भजी.. मेरे ओव्हरवेट होनेका राज.. बटाटावडा...!!!
  काही गोष्टी मराठी माणुस कधिच विसरु शकत नाही. त्यातली एक म्हणजे बटाटेवडा.. पाव नसेल तर दोन स्लाइसमधे टाकुन पण छान लागतो. तोंडाला पाणि सुटलंय.. आत्ता उठुन बाहेर जातो आणि एक मस्त पैकी वडापाव खाउन येतो.. :D

  ReplyDelete
 4. मी इकडे कामाला आलो की तुम्ही हे असे पोस्ट करत असता ... हे असे बटाटेवडे बघून माझा काय झाले असेल सांगायला हवे का ... :D

  ReplyDelete
 5. मला भूक लागलेली असतांनाच ह्या असल्या पोस्ट का दिसतात देव जाणे.....असो शेवटी जाणार तर आपण सगळे भारतात...त्यामुळे नाईलाजाने आत्ता स्वत: करते पण नासिकला मात्र तुझ्याकडे येणार खायला..........

  ReplyDelete
 6. फ़ोटो पाहुन कलिजा खलास झाला. मायदेशात नसताना नेहमीच आयते मिळणार्या बटाटावडयाच्या आठवणीने सुस्कारे सोडले जातात. आज एक जादा सुस्कारा ..........ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म......मला आयता बटाटावडा (बोंडु बिंडु नाही) कुठे मिळेल इथे???????? :(

  ReplyDelete
 7. हाहाहा. महेंद्र,बाहेर जाऊन खाल्लास का खरचं वडा?:)
  रोहन, सॊरी सॊरी.माझ्या लक्षातच नाही राहीले.:P

  तन्वी, यस्स्स. आपण मस्त धमाल करू गं. नाशिकला तू येच माझ्या घरी.:)

  अपर्णा,धन्यवाद. आमच्या भागात कधी चक्कर मारलीस तर नक्की माझ्याकडे मिळेल तुला आयता गरम गरम वडा.

  ReplyDelete
 8. laay bhari :)

  bhook lagli mala aata :D

  ReplyDelete
 9. भानस,
  झकास दिस्ताहेत वडे...जबरदस्त भूक लागली..गरमागरम वडे आणि झणझणीत लसणीची चटणी..आहाहा..अप्रतिम कॉंबिनेशन!!

  ReplyDelete
 10. वैदेही आभार. यस्स्स्स, लसणाची झणझणीत चटणी आणि लसलशीत गरम बटाटावडा.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !