जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 6, 2012

होशियार ! सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो!

 
सगळ्या वृत्तपत्रात मोठ्या मोठ्या मथळ्यात व्हिडिओ-फोटोसहित झळकलेल्या पॅरिस हिल्टनच्या सिध्दिविनायकवारीचा वृत्तांन्त वाचून-पाहून कपाळावरची शीर अशी काही तडतडू लागली. चिडचिड झाली. नक्की कोण कोणाच्या भेटीला गेलेय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पाहून, या नेमेची चाललेल्या या देवभेटीच्या तमाशाचा उबग आला.

तशी अलीकडचीच गोष्ट..... एक वेळ अशी  होती  कि रोज सकाळी कॉन्ट्रॅक्ट बस येण्याआधी मी धावत धावत गाभार्‍यात जात असे. पटकन देवाला नमस्कार करुन ऑफिसला पळायचे. संध्याकाळी उतरल्यावर शांतपणे देवळात जाऊन प्रसाद घेऊन घरी. पुढे शोमू झाल्यावर त्याला प्रथम सिध्दिविनायकाच्याच दर्शनाला नेलेले. कसलीही पळापळ नाही की चलाचलाचा हाकारा नाही. सिध्दिविनायकाला लागूनच डॉक्टर पेंडसेचा दवाखाना आहे. ( आताही असावा ) बाळ शोमूचा तोच डॉक. दर पंधरा दिवसांनी डॉकचे मग बाप्पाचे दर्शन ठरलेले. कधी लाईन लावलेलीही आठवत नाही. तेच आता गेल्यावेळी जिद्द करुन गेले तर दोन तास लाईन लावल्यावर माझा नंबर आल्यावर माझ्यापाशी मूठीत मावेल इतकुसा कॅमेरा होता म्हणून सुरक्षारक्षकाने मला आत सोडले नाही. त्याला म्हटले बाबा रे, फार लांबून आलेय रे. तुझ्याकडे ठेव कॅमेरा. मी नमस्कार करुन येते आणि घेऊन जाईन. जमणार नाही म्हणाला. शेवटी एका फुलवाल्याकडे चक्क रुपये ५०/- देऊन कॅमेरा ठेवायला दिला. लोकंही काय काय धंदे शोधून काढतील तेवढे थोडेच आहे. शिवाय ही  मिलीभगतही  असू शकेल. कोणाकोणाचे कट यात असतील ते तेच जाणोत.

पॅरिसबाईंची थोरवी काय ती वर्णावी. नेसूचे सोडून डोसक्याला गुंडाळून बागडून झाले. अंमली पदार्थांच्या अमलाखाली दे धमाल, कर कमाल अव्याहत चालूच. बापजाद्यांच्या पुण्याईवर फसफसून उतूनमातून झाले. दारू ढोसून गाडी चालवू नको गं राजकन्ये... हा मोलाचा सल्ला बिचारीला कोणीच दिला नाही मग ती काय करणार... बिचारीला त्यामुळे जेलच्या वार्‍या झाल्या. वेगवेगळे धंदे करूनही आताशा कोणी विचारीना झाले म्हणूनशान हे अचानक भारतभेटीचे फ्याड निघाले. आता निघालोच आहोत तर ममईला जायचेच हो राया. ’ यारायांचे बरे फावलेय. तर, ममईमधे मस्ट यादीत टॉपलादेव ’. या या... आय नो. चर्च मध्ये जाते नं मी. स्ट्रेट चालेन. उगाच तुमचे अगाऊ सल्ले नकोत. असेही तिथे आजूबाजूला आपलेच लोकं असणार नं. सो नो वरीज. लेट मी फ्रिकआऊट.


तसे हे तमाशे काही नवीन नाहीच म्हणा. एकेकाळी साधेसुधे खरेखुरे देऊळ असलेल्या देवळात अचानकपणे सेलिब्रेटींनी उपटसुंभासारख्या भेटी देऊन देऊन पुन्हा नव्याने नावारूपाला आणलेल्या मंदिरांनमधे त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमधून वेळातवेळ काढून जाणे. दर वारीला रात्रभर बंदुकी अवतीभोवती घेऊन अनवाणी चालणे काय. राजकारण्यांची थोरवी ती काय वर्णावी...! सध्या कोणी भाव देत नाहीये चला गवगवा करा वारीचा.... जणू देवावरच उपकार. त्यांच्या वरातींची चर्चा देवापेक्षा महान. बिचारा देव राहिला कोपर्‍यात कुठेतरी. त्यालाही आताशा सवय झाली असेल म्हणा. अश्या थोर व्यक्तींच्या चरणांची धूळ समारंभपूर्वक त्याच्या गाभार्‍याला लागणार. त्यासाठी पंधरादिवस चाललेली मंदिरप्रशासनाची धावपळ. गाभार्‍यात त्यावेळी कोण कोण असणार. गेल्यावेळी याचा नंबर लागलेला मग आता यावेळी माझा.... सारख्या चर्चा. सुरक्षिततेची चाचपणी. देवाच्या वाटली का? छे हो ! देव सुरक्षित असणार हे गृहीतकच ! त्याला चोरण्याव्यतिरिक्त काहीही करण्याचे यवनांचे/ब्रिटिशांचे थोडेच नं दिवस आहेत हे. अन चोराची काय बिशादआजदेवाला चोरण्याची.

तर....

... पडद्यामागे जोरदार तयारी होऊन एकदाचातोदिवस उजाडणार. आजची भूपाळी अंमळ लवकरच झाली का असं म्हणत देवही तयारीला लागणार. लवकर आटपा रे बाबांनो ही शाही भक्तभेट. ’ सोसवेना रे तुझी प्रार्थना आता अंमळ द्या हो शांतता ’, म्हणत देव पटापट छान तेलमाखून, शुचिर्भूत होऊन, भरजरी वस्त्रे लेऊन तय्यार. आत्ता येणार मग येणार म्हणत म्हणत देवालाच चांगले चार तास तिष्ठत ठेवून प्रत्यक्ष सोकॉल्ड फेमभक्त अवतरला की ही धावाधाव. पुढेपुढे करणार्‍यांची अहमिका पाहून देवाचा वासलेला ’. सीसीटीव्हीवर दिसत असलेला अगदी मंदिराच्या प्रवेशदारी गाडी थांबल्यापासूनच सुरू झालेला चकचकाट पाहून देवाचे डोळे दिपून विस्फारलेले. आले आलेची खात्रीशीर आवई उठताच पुजार्‍यांनी सावरलेले देवाचे वस्त्र, हार. सारे काही नेटकेची चाणाक्ष नजरांनी केलेली खातरजमा. बाजूला व्हा, बाजूला व्हा असे हातातोंडाने म्हणत बंदुकींसोबत या महान भक्ताचे गाभार्‍यात पाऊल पडताच देवाने स्वत:ला आक्रसून घेतलेले. घाबरून पाय शक्य तितके पोटाशी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या देवाच्या चरणी चकचकाटाच्या, शूटिंगच्या मनासारख्या पोझ जमताच या थोर भक्ताचे मस्तक देवाच्या चरणी टेकलेले.

बोंबला! देव बुचकळ्यात... आता मस्तक तर चरणावर टेकलेय म्हटल्यावर आशीर्वाद देणे क्रमप्राप्त म्हणून आपसूक सवयीने देवबाप्पाचा हात आशीर्वाद देण्याच्या इराद्यात.... पण... आशीर्वाद तर आहेच की याच्याकडे. आता नव्याने काय बरे द्यावे याला... यक्ष प्रश्न? काय नाहीये या भक्ताकडे? फेम, पैसा, जलसा... शिवाय हा कुठे मन्नत मागतोय? त्यातून कोण अमरपट्टा घेऊन तुपकट मिरवणारे तर कोणी पूर्वजांच्या कमाईवर पोसलेल्या देहाच्या कमनीय रेघांवर तमाशाई. असाही हा निव्वळ दिखावाच तर करतोय. हम्म...पण मी देव आहे नं..! म्हणजे दिखाव्यासाठी ठेवलेला असलो तरी अजूनतरी देव्हार्‍यात आहे. उद्याचे उद्या पाहू, आत्ता भक्त दारी उभा आहे म्हणजे आशीर्वाद देणे भाग आहे. असं वाटून देव चरणावरल्या मस्तकाचे अवघ्राण करावे म्हणतोय तर चरणच रिकामे. मस्तक गायब. गाभारा चक्क रिकामा. पुजारीही गायब. सिनड्रॉप शांतता. देव अचंबित ! सवय असूनही देवाची जिद्द सुटत नाहीच. सिन ’ पोटात घ्या म्हणायला येण्याचाच भक्तांनी केलेला सीन पाहून देवाचीच  धडकन ड्रॉप.


अरेच्च्या ! आत्ता पायाशी होता आता कुठे गेला म्हणून देवाची नकळत दुखावलेली नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. गाभार्‍याबाहेर हा गलका. हातांच्या सुरक्षित साखळीत गळ्यात उपरणे, कपाळाला गंध लावून भक्तिभावाने ओथंबलेल्या चेहर्‍यावर पुन्हा विजांचा लखलखाट. अहाहा ! काय ती पवित्रता वर्णावी महाराजा.... भंपक पुण्याईचा  सारा  माझ्यादारीच दिखावा .  आदल्या रात्री हा कुठे बरं खा-प्याला होता ... सीसीटीव्ही... गो बॅक प्लीज... हां... ओबेराय! चेपून प्याला, खाऊन तडसला. नेमका माझ्या पायावर करपट उसासला. उगाच नको तेव्हां पुसापुशी करणारा पुजारी कोणीतरी स्टॅच्यू केल्यासारखा डोळे खिळवून याला चिकटलेला. स्वत: उदबत्ती जवळ ओढावी म्हणून देव हात पुढे करतोय तेवढ्यात या कडेकोट सुरक्षेला भेदून सेलिब्रेटीला पाहायला घुसलेले मागल्याच वाडीतले दहा बाय दहाच्या तुकड्यात राहणार्‍या दहा जणांच्या गरीब कुटुंबातले केविलवाणे पोर. त्याला पाहून पवित्रतेला आलेला खास कमावलेला कळवळा. लगेच पोर कडेवर, कणव चेहर्‍यावर, हात पोराच्या शेंबूड भरल्या गालांवर. देमार चकचकाट! अगदी पोटात तुटले हो बिचार्‍या पोराला पाहून. दत्तक दत्तक...! आश्वासन आश्वासन! चोहीकडूनमहान महानचा घुमत्कार!

वा! काय महान भक्त आहे माझा. नेमेची झालेले असूनही देवालाच उगाच चिवट आशा. असेल थोडा दिखाऊ, माजलेलाही असेल, बापकमाई हा काय त्याचा दोष थोडाच आहे. माणूस आहे नं चुकायचाच.... पण अजून जमिनीवर आहे नं. हेही नसे थोडके. म्हणून देवाची नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. आं ! हे काय? पोर गायब.... हातात ओला टिश्य़ूपेपर.... खसखसून पुसलेली बोटं, भरभर स्वब्रँडचा फवारा. देवाला उगाच प्रश्न... तो पोरगाहीपेडअसेल का? कलियुग रे देवा कलियुग!


झाला  इतका दिखावा पुरेसा आहे याची नीट खात्री करून निघालेला गाड्यांचा ताफा. काळ्याकाचांआड काहीही दिसत नसूनही बाय बाय चे जोरदार हालणारे हात. शेवटच्या गाडीचे टेललाईट अदृश्य झाल्याक्षणी गडाचे दरवाजे बंद. दोन्हीबाजूने एक एक बारकुसे गेट किलकिले. सीसीटीव्हीवर दिसणारी तुडुंब वाहत असलेली भक्तांची रांग पार महाराष्ट्र हायस्कूल युनायटेड वेस्टर्न पर्यंत पोचलेली. सकाळपासून कुठूनकुठून आलेले गरीब भक्त तिष्ठून, उपासून, दमूनभागून गेलेले. गेट उघडलेले पाहून त्यांची उडालेली लगबग. आता देवाचे दर्शन होणार म्हणून सुकलेल्या ओठांवर फुललेले हसू. एकीकडे मनात दर्शन घेऊन घरी जायला किती वेळ लागेलची चाचपणी सुरू. साध्या भक्तांचे बिचारे साधे साधे प्रश्न. आता कंटाळलेल्या सुरक्षारक्षकांची वैतागलेली व जणू समोरचा प्रत्येक अतिरेकीच आहे... ची नजर. देहाची, पर्सची यथासांग चाचपणी झेलून भक्त गाभार्‍यात ढकलला गेलेला. पहाटे पाचपासून निघालेल्या जीवाला मोजून तीस सेकंद गाभार्‍यात वास्तव्य. तेही सतत ढोसकून ढोसकून. पहिली दहा सेकंद ढकलले गेल्याने सावरण्यात, पुढल्याला नजरेनेच माफ कराची विनवणी करण्यात जातात. पुढले दहा सेकंद देवासमोर जिद्द ठेवून उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात पुजार्‍याचा हात शोधून त्याला सोबत आणलेला चढावा देण्यात आणि शेवटल्या दहा सेकंदात देह पुढे अन डोळे शक्य तितके देवावर खिळवून ठेवण्याचा आटापिटा करणारा भक्त गाभार्‍याच्या बाहेर फेकला जातो.


मनगटावरील घड्याळात सहा वाजलेले असतात. देवा याचसाठी केला होता का हो हा अट्टाहास! धरीला तुझ्या चरणांचा ध्यास! तुला प्रिय सेलिब्रेटींचा सहवास! यापुढे पाहीन तुला जालावर! असा निश्चय मनोमनी करत भक्त स्टेशनचा रस्ता धरतो. देव गालातल्या गालात हसतो. कारण त्यालाही मनोमन माहीत आहेच, पुन्हा आपला वार येईल पुन्हा ही रांग लागेल. शेवटी हे बिचारे साधेसुधे भक्तगण देवावर प्रेम करणारे नसून देवाला घाबरणारेच आहेत. तितक्यात सीसीटीव्हीवर विश्वस्तांच्या खोलीतला गलका देवाचे लक्ष वेधतो. " पुढल्या आठवड्यात अंगारिकेला जलसा कुटुंबीय अनवाणी येतेय. तयारीला लागा.... "

 " लंबोदराचे उदर आज अंमळ जास्तीच मोठे दिसतेय का? " पुजार्‍याच्या मनात प्रश्न. त्याला कुठे दिसतोय देवाच्या पोटात उठलेला गोळा... चला देवा, लागा तयारीला ! होशियार ! सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो!

35 comments:

 1. देवा याचसाठी केला होता का हो हा अट्टाहास! धरीला तुझ्या चरणांचा ध्यास! तुला प्रिय सेलिब्रेटींचा सहवास! यापुढे पाहीन तुला जालावर! ........ वा.. हे अगदी मनातले. :)

  एक जमाना होता जेंव्हा भिंतीवरून उडी मारून मी देवळात जात असे. आता कुंपणं घालून ठेवली आहेत सर्वत्र. सर्व पैशाचा तमाशा आहे. मी लग्नानंतर एक दिवस गेलो होतो. तेंव्हच राम राम केला म्हटले रे बाबा, अता पुन्हा येणे होईल असे वाटत नाही. सांभाळून घे. शिर्डी देखील काही वेगळे नाही. :) तिथेही शेवटचा रामराम करून आलोय मी. :)

  शेजारच्या सिद्धिविनायक इमारतीत मामा राहायचा. त्यांच्या इमारतीचे प्रवेशद्वारही त्या संरक्षक भिंतीपलिकडे... आता बोला!!! गाडी नेली की आत न्यायचे वांधे. मग त्यांच्या घरातून एक माणुन ओळखपत्र घेउन खाली येणार. 'आमच्या घरी आलेत हे. येउ द्या गाडी आत.' असे सांगणे... मग गाडी तपसणी वगैरे सोपस्कार.... अखेर आपण आत. हजारो डोळे आपल्यावर.. त्यात 'हा कोण मोठा गाडी घेउन आत जातोय' ही भावना. त्या नजरा चुकवत, रांग मोडत अपण गाडी आरपार न्यायची आणि सोसायटीत लावायची. तिथे आत पुन्हा पोलिस. पुन्हा चौकशी... डोक्याला त्रास झाला आहे सर्व.

  ReplyDelete
  Replies
  1. ह्म्म्म... :( कामनाचीही तिच परिस्थिती आहे. आईचे घर विनायकाच्या मागेच त्यामुळे आम्हाला रोज जायची सवय. आता मात्र खरेच फक्त जालावरच.

   Delete
 2. :) Kay bolayche, jithe jail tithe hich tarha. Shirdi la jaa nahitar Sidhdhivinayak la. He vachun malahi gelyavar kay karayche vichar kela pahije. :(
  Vaait vatale he sarv vachun. Pan ekdam khare aahe.

  -Vidya.

  ReplyDelete
  Replies
  1. वाईट वाटतेच. मी तरी ठरवून टाकलेय यापुढे जायचे नाही. फार त्रास होतो. :(

   आभार!

   Delete
 3. सगळीकडे हेच आहे गं ताई.... :(
  मला तर त्या रांगा पाहिल्या की अगदी नको वाटते... मुळात देव भेटतच नाही अश्याने. सगळा ढकलाढकलीचा अनागोंदी कारभार!!आणि हे असे ’सेलिब्रीटीं’चे कौतूक :(

  मी तर गेल्या कित्येक वर्षात त्र्यंबकला मंदीरात गेलेले नाही, फक्त गजानन महाराज मंदीरात जाऊन परत येते नासिकला !!पोस्ट शब्दश: पटली!!

  ReplyDelete
  Replies
  1. हो गं! सप्तश्रुंगीलाही तेच. :( मीही १९९१ नंतर त्र्यंबकला गेले नाही.

   Delete
 4. तिचा फोटो पेपर मधे पाहिला आणि डोक्यात तिडीक उठली. तिची किती वाहवा, कोणाला किती मह्त्व द्यायचे हे मिडियाला अजिबात समजत नाही.
  आणि इतर मुद्दे पण एकदम पटले. कोणे एके काळी साईबाबाचे दर्शन दहा मिनिटात व्हायचे, आता कमीत कमी दिड तास तरी लागतो. मी तसाही फार देवभोळा नाही, त्यामूळे मला त्रास होत नाही, बाहेरूनच कळसाला हात जोडून ही माझे दर्शन होते, पण लोकं मात्र अगदी खूप मनाला लावून घेतात्.
  टेक्निकली बोलायचं तर मेंदू मधे एंडॉर्फीन ची निर्मीत होण्यासाठी हे सगळे केले जाते, काही लोकं सत्संग, तर काही लोकं रजनीश थिअरी!

  ReplyDelete
  Replies
  1. तर काय. मिडियाला काय रे रोजचे नवीन काहितरीच हवेच असते. गेल्या कित्येक वर्षात गेले नव्हते म्हणून गेल्या भेटीत फार वाटले जावे पण... मनस्त:प झाला नुसता. दर्शन अक्षरश: १५ सेकंद झाले. :(

   धन्यू!

   Delete
 5. माझ्याकडे टीव्ही नाही, वर्तमानपत्र येत नाही त्यामुळे थोडा निवांत आहे.
  तरीही मटावर प्यारिसबाईंचा फोटो दिसलाच.

  ReplyDelete
 6. Jithe asla prakar chalto tithe halli mi nahi jaat, tai. Tyapeksha gharchya devala bhaktibhavane namaskar karna mla jast anand deun jata.

  Aso lekh ekdam 'dashing' zalay :-)

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी अगदी श्रीराज ! देव घरीच आहे आपल्या. :)

   धन्सं रे!

   Delete
 7. Tai, tyapeksha aplya gavatil devlanmadhye kiti chhan vatta naa!

  ReplyDelete
 8. ह्मम्म्म शब्द न शब्द खरा... गर्दी असणार्‍या देवळात जायचे नाही असे ठरवलेले आहेच त्यामुळे देवळात "जलसातून" कोणी जाओ नाहीतर "वर्षातून" काय फरक पडतो?
  एकदा काय झालं देवळात खूप प्रचंड गर्दी झाली. इतकी की अगदी देवाचाही श्वास गुदमरला, मूर्तीला तिथेच उभे करून चालत बाहेर आला. बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला, थोडे चमत्कारही घडवले. बस्स.....देऊळ प्रचंड प्रसिद्ध होऊन बसले. गर्दीचे लोंढे काही कमी होईना. मूर्तीला आत ठेवून देव आपला बसलाय ताटकळत कधी गर्दी कमी होईल आणि कधी मी आत जाईन हा विचार करत!आता असे असेल तर आपण त्याला देवळात कशाला शोधायचे?

  ReplyDelete
  Replies
  1. ब्लॉगवर स्वागत आहे अनघा. :) देवही फार वैतागलाय..

   अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

   Delete
 9. छे छे.. काय हे तुम्हा लोकांचं? त्या बिचाऱ्या 'प्यारी' स म्याम विनायकाच्या दर्शनाला गेल्या आवर्जून आणि तुम्ही नावं ठेवताय. बाईंच्या पुढच्या फ्याशन शो मध्ये आम्ही बाईंच्या वतीने मेणबत्त्या पेटवून णी शे ढ नोंदवणार आहोत !

  ReplyDelete
  Replies
  1. तू मेणबत्त्या लावल्यास की मी पणत्या लावून तुझा णी शे ढ नोंदवेन बघ... :D :P

   Delete
 10. कोण आहे रे तिकडे
  आमच्या मालकीण बाईंना नाव ठेवत आहे.
  तिच्या आजोबांच्या हॉटेलातील आम्ही इमानी चाकर आहोत.
  त्या अत्यंत भक्तिभावाने तेथे आल्या होत्या , डॉलर मध्ये दक्षिणा दिली परत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी ती वेगळीच
  आमच्या म्युनिक मध्ये संगमरवरी गणेशाची मूर्ती ५००० युरो ला मिळते ,यु नो
  देवांचे आंतरराष्ट्रीय बाजार मुल्ये वाढत आहे.
  काही दिवसांनी देवस्थाने जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारात नोंदणीकृत होतील.
  .त्यांचे आय पी ओ निघतील
  आहात कुठे तुम्ही

  ReplyDelete
  Replies
  1. हीही.. होईल बाबा शेअर बाजारात नोंद. असेही देवाला बाजारात विकून कधीचेच झालेय म्हणा.

   आभार्स! :)

   Delete
 11. सर्वप्रथम तुझ्या लिहिण्यातला बदल आवडला. आपल्या भूमिका मांडायला आपण विसरत चाललो आहोत की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. सगळ्याच बाबत इतका अनाकलनिय बदल होत आहेत की मन उद्विग्न होत . पण आपल्या श्रद्धा ठाम असतील तर या गोष्टींचा त्रास होत नाही. श्री गणारायला आपले खरे भक्त कोण ते कळत. त्यामुळे आपण आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जमेल तस जरूर जायचं. कारण तोही आपलीच वाट बघत असतो नाही का ?
  आपला बाप्पा बदललेला नाही बदललीय ती आपली त्याच्या कडे पाहण्याची दृष्टी. तेव्हा त्याच्यावर श्रद्धा ठेऊया . चांगले बदल नक्कीच होतील.
  अशीच भूमिका मांडत राहा. त्याचीच जास्त गरज आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. आपली नाही रे काहिंची बदललीये. :D गणरायाला सगळे कळतेच आहे.

   उद्वीग्नता वाढत चालली की ती कागदावर उतरत जाते. पण बरेचदा त्यातही हताशपणच जाणवतोय.

   धन्यू रे! :)

   Delete
 12. इतका त्रास करून घेऊ नकोस!
  देव समर्थ आहे :-)

  ReplyDelete
 13. सुंदर लिहिलेस बघ.
  ह्या सगळ्या गोंधळामुळे आजकाल देवळात जावेसेच वाटत नाही..सर्व मंदिरांमध्ये हेच असेच बघयाला मिळते.
  बाकी मीडीयाला दुसरा काय उद्योग???

  तुझी पोस्ट ची मेल काही आली नाही मला..तु परवा म्हणाली म्हणुन येउन पाहिले मी..बघ काही घोटाळा झालाय का?

  ReplyDelete
  Replies
  1. मिडीयाके तो क्या कहने... ! :D

   ह्म्म्म्म... चेक करते काय गडबड झाली आहे.

   धन्यू!

   Delete
 14. बाप्रे ही एवढी महत्वाची बातमी न वाचलेली मी एकटीच की काय? उप्स...असो...पण तुझं पटलं...
  मागच्या मायदेशवारीत शिर्डीला जाऊन आल्यावर देवाला म्हटलं बाबा आभार रे दिसलास पण इथून पुढे नाही व्हायची ही दगदग..तोही हो म्हणाला....सिद्धिविनायक रुपारेलला असताना सहज म्हणून जाऊया म्हटलं तरी चालायचं. आता मात्र विचारही करू नये...आपलंच पुण्य कमी समजायचं का हा ढालगज शेलेब्रिटीज पुढे???


  >> नेसूचे सोडून डोसक्याला गुंडाळून बागडून झाले.
  >> पुढल्या आठवड्यात अंगारिकेला जलसा कुटुंबीय अनवाणी येतेय.
  लोळलेय गडबडा..नशीब इथे पाहणारं कुणी नाहीये ते...थांब संध्याकाळी ही पोस्ट जाहीर वाचनच करते.... :)

  ReplyDelete
  Replies
  1. छे गं ! देवच कंटाळलाय त्यांना यात काय ते समजून घे. :D :D

   धन्यू गं ! :)

   Delete
 15. यावरून त्रागा पूर्वी व्यक्त केला होता, त्याची आठवण झाली. सोबत लिंक देत आहे - http://blog.mogaraaphulalaa.com/2010/02/blog-post_02.html

  ReplyDelete
  Replies
  1. कांचन, वाचले गं. चीड येते नाही हे सारे पाहून. :(
   धन्यू !

   Delete
 16. mi Tuljapur chi pan ata sahsa darshnala jat nahi. dev kai deshat manstapa shivay samanya mansache vatyala kahihi nahi. tyamule Devbappa la manatch aathvayche Meena Thayalan

  ReplyDelete
  Replies
  1. Only mine, ब्लॉगवर स्वागत आहे! :)

   अगदी खरं.

   आभार्स!


   Delete
 17. धन्यवाद निखिल! :)

  ReplyDelete
 18. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !