जाता जाता एक नजर इथेही........

Monday, September 7, 2009

समन्वय.......४

आपण केवळ बाबांमुळे बचावलो नाहीतर अजयसारखीच आपलीही अवस्था झाली असती. या घटनेचा मुलगा व शालिनीवर परिणाम झाला होता. परंतु सुधाकरला मात्र त्यांनी काही सांगितले नाही. मुलाला नोकरी कशी मिळेल ह्या विवंचनेवर मार्ग सापडत नव्हता. एके दिवशी सुधाकर नेहमीसारखा घराजवळील सहकारी बँकेत आपले पासबुक भरून घ्यावे म्हणून गेला. काम झाले तसे मॅनेजरांच्या केबिनमध्ये डोकावला. ही बँक स्थापन झाली तेव्हापासूनच सुधाकरचे तिथे अकाउंट असल्याने मॅनेजर चांगले ओळखीचे होते. गप्पा करता करता ते पटकन म्हणाले, " सुधाकर, मुलगा लागला का नोकरीला? नसेल तर आपल्या बँकेची क्लेरिकल-कॆशियर पोस्टसाठी जाहिरात येतेय दोन दिवसात. पोराला सांगा अर्ज कर, परीक्षा दे. मग पाहू काय करता येईल ते. " त्यांचे आभार मानून सुधाकर घरी आला.

दोन दिवसांनी आठवणीने अर्ज आणून मुलाकडून भरून घेऊन त्याने नेऊन दिला. अभ्यासाला लाग रे मुलाखतीचा कॉल यायला हवा असे मुलाला सांगत राहिला. मुलानेही मनावर घेऊन अभ्यास केला आणि चक्क चांगल्या मार्काने पास होऊन मुलाखतीचा कॉल आला. घरात पुन्हा आशेने जोर धरला. मुलाखतीच्या दिवशी सुधाने पोराला थोड्या सूचना देऊन पाठवले. इथेही जागा पस्तीस आणि मुलाखतीला अडीचशे उमेदवार होते. पाच दिवस मुलाखती सुरू होत्या. मुलाचा नंबर पाचव्या सत्रात होता. उमेदवार आत जात दहा मिनिटात बाहेर येत. मुलाचा नंबर आला, मुलाखत झाली. रिझल्ट लवकरच कळवला जाईल असे सांगण्यात आले होते.

निराश मनाने मुलगा बिल्डिंगमधून बाहेर पडताना अचानक कोणावरतरी धडकला. " अहो, माफ करा हं. लक्ष नव्हते माझे. " " काय रे, तुम्ही आजकालची मुले. कुठे पाहता आणि कुठे चालता. आं जरा...... अरे तू सुधाकरचा छोकरा ना? इथे कशाला आला होतास? आणि असे मूंह लटकवायला काय झाले?" मुलगा गोंधळला पण त्याला अंधुक आठवले काही वर्षांपूर्वी हा माणूस एकदा आपण बाबाबरोबर कुठेतरी गेलो असताना भेटला होता. " मी ना, इथे बँकेचा इंटरव्ह्यूव्ह होता . त्यासाठीच आलो होतो. पण वाटत नाही मला ही नोकरी मिळेल. त्याच नादात होतो आणि तुमच्यावर धडकलो. सॉरी हं. " असे म्हणून मुलगा निघाला.

घरी सगळे वाटच पाहत होते. मुलाने सगळे सांगितले शिवाय दरवाज्यात कोणावर तरी धडकलो बाबा. ते तुम्हाला ओळखणारेच निघाले. " अरे पण नाव विचारलेस का त्यांचे? " मुलाने नकारार्थी मान हालवली. तो विषय तेवढ्यावरच संपला. आता दररोज पत्राची वाट पाहणे सुरू होते. महिना उलटला तसे सगळ्यांचीच आशा संपली. आणि एक दिवशी अचानक कुरियर आले. शालिनीने घेऊन उघडले तर काय, मुलाला सहकारी बँकेत कॅशियर ची नोकरी मिळाली होती. सहा महिन्यांचे प्रोबेशन झाले की परमनंट होणार होता. खूप दिवसांनी घरात आनंद आला. इतक्या खुशीतही, " शेवटी तुमच्याने काही झालेच नाही. माझ्या पोराने स्वतःच नोकरी मिळवली बरं का." असा टोमणा शालिनीने मारलाच. त्यावर सुधाकरने न चिडता हसत हसत म्हटले, " हो गं बाई, पोराने स्वतःच्या कर्तृत्वाने नोकरी मिळवली. मला अभिमान आहे त्याचा."

दिवस आनंदात चालले होते. पाहता पाहता सहा महिने पूर्ण होत आले. पुढच्या महिन्यात एकदा का परमनंट झाल्याची ऑर्डर हातात पडली की लग्नाचे पाहूया असे मनसुबे शालिनी रचत होती. एक दिवस संध्याकाळी आठ वाजले तरी मुलगा बँकेतून घरी आला नाही. सुधाकरने दोन वेळा शालिनीला विचारले, " अग, कुठे जाणार होता का परस्पर? बराच उशीर झालाय. " " येईल हो, भेटले असेल कोणीतरी वाटेत. गप्पा मारताना वेळेचे भान कुठले राहायला या मुलांना. " हे शालिनीचे वाक्य पुरे होतेय तोच बेल वाजली. " शंभर वर्षे आयुष्य आहे पोराला. अहो आता उघडा ना दार? " अं, हो हो म्हणत सुधाकरने दार उघडले, मुलगाच होता.

" अरे, कुठे होतास एवढा वेळ? आणि चेहरा का असा झालाय तुझा? बरे नाही का? काय विचारतोय मी? " " बाबा, फार मोठा घोळ झालाय हो. दररोजसारखीच कॅश टॅली करत होतो सगळे. मीही मोजत होतो तर पंचवीस हजार कमी भरले. मला वाटले मी मोजायला चुकलो असेन म्हणून पुन्हा पुन्हा मोजले पण पंचवीस हजार कमीच भरत होते. मला तर काहीच समजत नाहीये. माझी कॅश कमी भरल्याने मला ऑन द स्पॉट संस्पेंड केलेय. बँकेने चौकशी समिती नेमली आहे, त्यांच्या रिपोर्टवर आता माझी नोकरी अवलंबून आहे. नशीब माझे की त्यांनी मला पोलिसांच्या हवाली केले नाहीये. " मुलगा रडायलाच लागला.

पोराला असे रडताना पाहून सुधाकरने त्याला धीर देत विचारले, " हे बघ रडू नकोस. मला खरे सांग, तू पैसे घेतलेस का? नाही ना? मग चौकशी समितीचा अहवाल येईतो शांत राहा. ते जे विचारतील त्याची खरी खरी उत्तरे दे. घाबरू नकोस. सत्य कधीही लपत नसते यावर विश्वास ठेव. " चोरीच्या आळाने पोरगा खचला होता. नोकरी तर गेल्यातच जमा होती. दररोज तेच तेच प्रश्न व त्यांची तीच तीच उत्तरे देऊन देऊन थकून गेला होता. समितीचा अहवाल आला की ट्रस्टी व बँकेचे पदाधिकारी निर्णय घेणार होते तोवर पैसे सापडतात का याचा शोध घेणे सुरू होतेच. दोन आठवडे भयानक गेले. समितीने अहवाल दिला आणि सोमवारी सकाळी अकरा वाजता दिलीपला बँकेत बोलावले होते.

हा सगळा घोळ सुरू असताना एक दिवस तनेजा सुधाकरच्या केबिनमध्ये डोकावला. सुधाकरचा उदास चेहरा पाहून, " साहेब काय झाले? आज एकदम गुमसूम. मला सांगा काही मदत हवी तर. आणि छोकरा काय म्हणतोय? काम बराबर चालू आहे ना? त्यादिवशी भेटला होता मला इंटरव्ह्यूव्ह नंतर. जॉब मिळाला ना? तुम्ही पेढा नाही खिलवलात." तेव्हा सुधाकरला कळले की मुलगा तनेजावर धडकला होता. मग सुधाकरने झालेली सगळी घटना तनेजाला सांगितली. ती ऐकून, " अरे अरे, कलियुग साहेब कलियुग. पण तुम्ही काळजी करू नका, कर नाही त्याला डर कशाला. " असे म्हणून थोडी सहानुभूती दाखवून तनेजा निघून गेला.

सोमवारी सुधाकर-दिलीप बँकेत आले. मीटिंग तीन तास सुरू होती. मुलगा आत गेलेला, बाहेर अतिशय अस्वस्थ सुधाकर एका जागी बसून होता. दोन वाजता मुलगा व बँकेचे एक ट्रस्टी समोर येऊन उभे राहिले. " बाबा, अहो मी निर्दोष सुटलो. खरंच सांगतोय. अजून एकावर संशय होता पण ते आपल्याला माहीतच नव्हते. तो कबूल झाला. सगळा घोळ त्यानेच घातला होता. उद्यापासून कामावर हजर व्हायचे आहे. शिवाय या सगळ्या दिवसांचा पगार व माझे परमनंट झाल्याचे पत्र लागलीच मिळणार आहे. बाबा बाबा तुम्ही म्हणता तसे सत्य लपत नसतेच. " मुला्ची निर्दोष सुटका व आनंद पाहून सुधाकरच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागेल.

ते पाहून बरोबर आलेल्या ट्रस्टींनी सुधाकरला म्हटले, " सुधाकर तुमच्या सचोटीची ख्याती आमच्या पर्यंत कधीचीच पोचलेली आहे. पैसे खाण्याची सतत संधी असूनही आज इतकी वर्षे तुम्ही कधीच मोहाला बळी पडला नाहीत. आणि हा तुमचा मुलगा अशी चोरी करेल यावर आमचा कोणाचा विश्वास पहिल्या दिवसापासूनच नव्हता. परंतु खरा चोर थोडा बेफिकीर होईल आणि काहीतरी चूक करेलच म्हणून दिलिपला आम्ही संस्पेंड केले. आणि तसेच झाले, बरोबर जाळ्यात सापडला. अहो तनेजाने इंटरव्ह्यूव्हच्या दिवशीच दिलीप तुमचा मुलगा आहे आणि तो नक्कीच लायक असणार हे पटविले होतेच. पण या सगळ्या प्रकरणात तुम्हा सगळ्यांना फार मन:स्ताप झाला. दिलीप तुझी नोकरी व तू पैसे नक्कीच खाल्ले नसशील असे वाटणे ही केवळ तुझ्या वडिलांची पुण्याई आहे. तेव्हा तिला कायम जप. शुभेच्छा! " असे म्हणून ट्रस्टी निघून गेले.

हक्काबक्का होऊन दिलीप वडिलांकडे भारल्यासारखा पाहत होता. पेढे घेऊन दोघे घरी पोचले. देवापुढे पेढे ठेवून नमस्कार करून दिलीपने काय घडले ते सविस्तर शालिनीला सांगितले. बाबांमुळेच नोकरी मिळाली आणि आजही अशा प्रामाणिक माणसाचा मुलगा अशी चोरी करणार नाही असे वाटल्यानेच त्यांनी दुसरा कोणी चोर असू शकतो ही शक्यता विचारात घेऊन हालचाल केली. आणि चोर सापडला. सुधाकरला मिठी मारून, " बाबा तूसी ग्रेट हो." म्हणून दिलीप खुशीत बाहेर गेला. सुधाकरकडे कौतुकाने पाहत, " तुम्हाला चहा देते हं का " असे म्हणत लगबगीने शालिनी आत गेली. अनेक वर्षांनंतर आपल्या प्रयत्नांना यश आल्याचे सुधाकरला जाणवले. उशिरा का होईना पण घरातल्यांना त्याची किंमत कळली होती.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुधाकर बँकेत जायला निघाला तसे, " अहो, आज तुमच्या आवडीची भरली तोंडली दिलीत बरं का डब्यात. संध्याकाळी रूळ सांभाळून ओलांडा आणि लवकर या. आई येणार आहेत आज कुसुमाकडून. लक्षात आहे ना? " असे म्हणून शालिनी अगदी प्रसन्न हसत होती. तिच्याकडे पाहून होहो येतो लवकर अशी मान हालवत सुधाकर बाहेर पडला. जिना उतरताना सुधाकर आनंदाने म्हणत होता, " आई, अखेरीस तुला मला अपेक्षित असलेला समन्वय साधला गेला गं आपल्या घरात. आता तो कायम तसाच राहू दे. बास."
4 comments:

 1. छानच जमलय.....माझा स्वत:चा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की चांगल्या माणसाचे चांगलेच होते.......आवडली कथा आणि तुमची( नको मी तुझीच म्हणते...भाग्यश्रीताई......कारण गाववाले है भाई)लेखनशैली....

  ReplyDelete
 2. तन्वी, धन्यवाद. अग अरेतुरेच छान वाटते:). आणि यस, आपण गाववाले.

  ReplyDelete
 3. छान !!!

  तिसर्‍या भागाच्या सुरुवातीला कथेचा नकारात्मक सुर वाचून थोडं वाईट वाटलं होतं... पण छान शेवट झाला... ज्याचा शेवट गोड ते सारं गोड असतं ना...

  अशा लेखनशैलीतल्या कथा माहेर या मासिकात वाचायला मिळतात (खरं तर मला माहेर या मासिकाच्या ऐवजी मेनका या मासिकाचा उल्लेख करायचा होता :प)

  ReplyDelete
 4. अभिप्रायाबद्दल धन्यवाद सतीश.मलाही शेवट गोड असणारे कथानक जास्त भावते.:)

  गेल्या दहा वर्षात मासिके वाचणे झालेच नाही.गेल्या तीन वर्षात तर एकही मासिक चाळायलाही मिळाले नाही.:( या गोष्टीची लेखनपध्दती आशाताईंनी म्हटल्याप्रमाणे काहीशी जुन्या वळणाची तर काहीशी नवीन झाली आहे.

  मुळात हे कथानक महेंद्रची पोस्ट होती ना,’आयुष्य एवढं स्वस्त झालयं का’ सत्य घटना विशद केली होती. मध्यमवयीन गृहस्थाने अचानक ट्रेनखाली जीव दिला,ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती. माणसाच्या मनाचा थांग लागणे शक्य नाही. भयावह ज्वालामुखी खदखदत असतात. कधी कधी तो परिस्थितीपुढे अत्यंत हतबल होतो, तर कधी त्याच्यात थोडीसुध्दा हिंमत नसते.या घटनेचा परिणाम- ही कथा. असो.
  पुन्हा एकदा आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !