जाता जाता एक नजर इथेही........

Friday, February 27, 2009

मी म्हणतो...

नेहमीच दिसणारी

मुखवटेच दाखविणारी

यश मिरवणारी

आनंदी, हसणारी....

भावना लपवित, मनातून रडणारी

समाजात उजळ माथी

मनी जनावरागत कृती

परंपरा जपणारी

रूढींना जागणारी....

परसदारी नंदादीप, बालविधवेला नागवणारी

ओठी सदा रामनाम

गुरू माऊलीचे ध्यान

मनी वसे फक्त मी

माझ्यापलीकडे काहीच नाही

माझे घर, माझा संसार

सारे माझ्याकरिताच.....

चिमणीच्या घरट्याचा होत असे मला भार

मी जीव लावला, मैञीही केली

अहो नात्यांची मला सदैव महती

माञ,

सोयिस्कर मी पाठ फिरवली

जेव्हां त्यांच्या डोळ्यांत वेदना तरळली

जाणून आहे मी,

हे सारे व्यर्थ पोकळ आभास

माझ्यातला मी आहे सैतानाचा निवास

तरिहि....

मी म्हणतो मी नाती राखलीत,

बंध जोडलेत आणि मनेही जपलीत....

Tuesday, February 24, 2009

कौतुकास्पद!!!

जानेवारी २००० मध्ये आम्ही अमेरिकेस आलो. मुंबापुरीतील घामाच्या धारांच्या गुलामीतून सुटून एकदम शून्यांच्या खाली तापमान असलेल्या प्रदेशात पोहोचलो. थंडीने दातखीळ बसली आणि पाठीच्या मणक्याचा पार निकाल लागला. हळूहळू आम्ही रुळलो. भुरभूर पडणारा, ऊन असतानाही तुषारासारखा अंगावर रुजणारा बर्फ, शेंबड्या बोरापासून ते मोठ्या गराळ बोरापर्यंतच्या गारांचा मारा कसा होतो आणि कसा लागतो ते अनुभवून झाले. काड्या झालेली झाडे बर्फमिश्रीत पाण्याच्या पुंगळ्या लेऊन समाधी लावून बसलेली असताना अचानक पडलेल्या लख्ख सूर्यप्रकाशाने काचेची होतात हे वर्णनातीत दृश्य डोळे भरून पाहून झाले. चार चार फुटाचा बर्फ दारातून उपसताना कोटाच्या आत वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि नाकातून वाहणारे थंडीचे बक्षीस यात नक्की काय पुसावे हे न कळून काम करीत राहिलो. मजा-सजा ह्यांची बेरीज-वजाबाकी करीत दिवस चालले होते.

नोव्हेंबर महिन्याच्या चोथ्या गुरवारी इथे थँक्स गिवींग साजरे केले जाते. ह्या वर्षी ते २५ नोव्हेंबराला होते. सगळ्यांना सुटी असते. हा दिवस म्हणजे नुसती धमाल. सगळ्यात मोठा सेल ह्यादिवशी असतो. खरेदी करायची असो वा नसो सारेच पहाटेपासून कडाक्याच्या थंडीत आणि ढिगारभर बर्फात उत्साहाने हुंदडत असतात. त्याचप्रमाणे आम्हीही बाहेर पडलो होतो. ही आमची पहिलीच वेळ होती आणि आमच्यासाठी ही तारीख नेहमीच खास आहे. आमच्या सहजीवनाची सुरवात ह्याच दिवशी झाली आहे. हे म्हणाले की आज आपण मोठी खरेदी करायची. झाले, माझ्या पोटात मोठा खड्डा पडला आणि त्याचे प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले. नवरा आणि मुलगा ह्यांच्या एकमतापुढे टिकाव लागणे शक्य नाही हे कळत असूनही मी नन्नाचा पाढा नेटाने लावून धरला होता.

आमच्या छोट्या गावात एकच मोठे मॉल होते. तिथे जवळपास सगळ्या दुकानातून एक चक्कर होईतो दुपार झाली. भुकेची जाणीव काहीच सुचू देईना म्हणून तिथल्याच फूड मॉल मध्ये आम्ही गेलो. प्रचंड गर्दी झालेली. कशीबशी जागा मिळवून भल्या मोठ्या रांगेत उभे राहून ह्यांनी आणि मुलाने सॅंन्डविचेस आणली. खाताना असे ठरले की आपण मोठा दूरदर्शन संच घ्यायचा. ह्या दोघांचा उत्साह जोरदार होताच, आता मला त्यातला ठामपणाही दिसत होता. विचार केला आत्ता काही विरोध नको करायला. आधी दुकानात तर जाऊ, काही डिल्स आहेत का, किमती काय आहेत ते पाहू आणि मग काय ते ठरवावे. ह्या मॉल मध्ये ते दुकान नसल्याने तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. मोठेमोठे कोट, हातमोजे, टोप्या असा जड जामानिमा चढविला आणि बाहेर आलो.

गाडीत बसून दहा मिनिटावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानाच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी लावली. आणि नेहमीच्या सवयीने सीटच्या खाली ठेवलेली पर्स घेण्यासाठी हात घातला. अरे देवा! पर्स गडबडीत फूडकोर्ट मध्येच राहिली होती. डोळ्यासमोर दोन्ही कप्प्यांमध्ये काय आहे हे तरळले. घराच्या किल्ल्या, पाकीट-त्यात पैसे, क्रेडिट-डेबिट कार्डे, चालक परवाना आणि असंख्य फुटकळ गोष्टी. मला माझ्या वेंधळेपणाचा आलेला राग त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस, ह्या साऱ्या गोष्टी हरवल्या तर त्यामुळे होणारा मनस्ताप आणि हे दोघेही किती वैतागतील ह्या साऱ्यामुळे डोळ्यातून धारा वाहू लागल्या. "काय हा बावळटपणा. बरे जाऊ दे आता रडतेस कशाला? आम्ही असे केले असते तर किती बोलली असतीस." इति नवरा. मी चूप. कारण तो म्हणाला तसेच मी केले असते. नवरा म्हणाला चला परत मॉलमध्ये जाऊन पाहू पर्स सापडते का. मला मनातून वाटत होते काही उपयोग नाही, एक तर मॉल मध्ये आज प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही तिथून निघून तिथे पुन्हा पोहचेपर्यंत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेलेला असणार. पण मी काहीच बोलले नाही.

अंतर थोडे होते पण सगळेच फिरत असल्यामुळे गाड्यांची फार गर्दी होती. ति पंधरा मिनिटे संपता संपेना. एकदाचे आम्ही पुन्हा मॉल मध्ये आलो. आम्ही जिथे खायला बसलो होतो तिथे आता दुसरी माणसे होती. त्यांना इथे पर्स सापडली का असे विचारले असता नाही असे उत्तर मिळाले. मी तर केव्हाच आशा सोडली होती. नवरा म्हणाला गिऱ्हाईक मदत कक्षात जाऊन विचारूया. हे आमचे संभाषण जवळच उभ्या असलेल्या सफाई कामगाराने एकले आणि तो म्हणाला, " काळ्या रंगाची पर्स होती का तुझी? " मी हो म्हणताच, " अग आत्ताच मी मदत कक्षात नेऊन दिली आहे. ते देतील तुला. काळजी करू नको, आजचा दिवस सुखाचा जावो " असे म्हणून तो गेलाही. आम्ही मदत कक्षात जाऊन थोडेसे पर्स चे वर्णन करताच तिथे असलेल्या आजीबाईंनी पर्स माझ्या ताब्यात दिली. सारे काही आहे ह्याची खात्री मला करून घ्यायला लावली आणि उरलेला सारा दिवस छान जाईल असे आश्वासनही दिले. तिचे आभार मानून तसेच तिच्याजवळ त्या सफाई कामगाराचेही चारचार वेळा आभार प्रदर्शित करून आम्ही गाडीत बसलो.

आता हे दोघेही माझ्या वेंधळेपणाला व नंतरच्या रडण्याला जोरात हसत होते. " आता खबरदार दूरदर्शन संच घेताना काही कटकट केलीस तर. पर्स मिळाल्याचा आनंद कर. " इति नवरा. हे एवढे रामायण झाल्यावर मी कसलाही विरोध करणार नव्हतेच. मनात मात्र राहून राहून त्या सफाई कामगाराच्या प्रामाणिकपणाला सलाम करीत होते. इतक्या प्रचंड गदारोळात, एवढा वेळ मध्ये जाऊनही माझी हरवलेली पर्स जशीच्यातशी मला परत मिळते हे अतिशय कौतुकास्पद आहे.

काही वर्षांनी ह्या अनुभवावर कडी करणारा प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे आम्ही किराणासामान, भाजी-फळे, वगैरे घेण्यासाठी वॉलमार्ट मध्ये आलो होतो. माझे आई बाबाही बरोबर होते. खूप खरेदी झाली होती. पैसे देऊन आम्ही बाहेर आलो. ट्रॉलीमधून सगळे सामान गाडी मध्ये भरले. घरी आलो. सामान जागेवर लावणे सुरू असताना आईने विचारले, " अग, बागकामाचे सामान कुठे आहे? ति पिशवी गाडीतच राहिली का?" मी म्हणाले नाही. सगळे सामान तर आणले घरात. बील तपासले असता दोन छोट्या कुंड्या, खुरपे, बागकामाचे मोजे आणि झाडे कापायची छोटी कात्री हे सामान बहुदा ट्रॉलीतच राहिले असावे असे वाटले. असे कसे विसरलो असे म्हणत आम्ही सगळे हळहळलो.

नेमके दुसऱ्याच दिवशी काही कारणाने नवरा पुन्हा वॉलमार्ट मध्ये जायला निघाला. घाबरत घाबरत त्याला गिऱ्हाईक मदत कक्षात चौकशी करायला सांगितली. अशा गोष्टीमुळे नेहमी वैतागणारा माझा नवरा बरं म्हणाला. चला निदान घरातच नन्नाने सुरवात झाली नाही. मी बीलही बरोबर दिलेच होते. वॉलमार्ट मध्ये बील दाखवून काल ह्या गोष्टी बहुतेक ट्रॉलीमध्येच राहिल्या आहेत व त्या तुम्हाला मिळाल्या असतील तर पाहाल का? असे विचारले असता हसतमुखाने, " अरे असे झाले का? होते कधी कधी. काळजी नको करूस. मी पाहते काय करता येईल ते. " असे उत्तर आले. नंतर तिने त्या सगळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज केली आणि तेवढे पैसे माझ्या नवऱ्याच्या हातावर ठेवले व ह्यावर्षीच्या बागकामाच्या शुभेच्छा दिल्या. कसलीही कटकट नाही की उपकार केल्याचा भाव नाही. असेही घडू शकते हे खरे वाटत नाही.अजूनही जगात माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो. हि भावना फार मोठी आहे. माणसामधील खरेपणा वाढवण्यास उत्तेजन देणारी. कौतुकास्पद!

Monday, February 23, 2009

चेहऱ्यामागचे सौंदर्य!!

वाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे. 

वेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला... 

वाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता. जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले. वाचून झालेल्या कादंबऱ्या आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी आईला विचारी, पत्र आलेय का? आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.

अखेरीस तो दिवस उजाडला. त्याची सगळी कामे आटोपून रात्री आठ वाजता तो आमच्या घरी आला. दार मीच उघडले. आणि ई.....ऽऽऽ अशी अस्फुट किंकाळी उमटली. ति कशीबशी दाबून मी त्याचे स्वागत केले. थोडावेळ तो बसला, नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी त्याने मला भेट दिली. चहा घेऊन तो गेला. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्या मनात रेखाटलेल्या त्याच्या मूर्तीचा चक्काचूर झाला होता. एक अतिशय सर्वसामान्य व्यक्तित्व.काहीसे कुरुपातच जमा होणारे. जेमतेम 
पाच फूट  उंची, फाटकी शरीरयष्टी, निस्तेज उदास चेहरा, अर्धवट वाढलेली खुरटी दाढी आणि ह्या सगळ्याला न शोभणारा मोठ्ठा गॉगल. धक्का ओसरल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या तोंडून अगदी लहान आवाजात उमटलेली किंकाळी त्याच्या कानाना अचुक एकू गेली होती. दूर्दैव माझे.

ह्या घटनेवर त्याने चुकूनही भाष्य केले नाही. आमचा पत्रव्यवहार अखंड चालू होता. त्यातून हळुहळु मला तो अगदी एकटा असल्याचे जाणवले होते. जीवनाकडून फारश्या अपेक्षा नसणारा साधासुधा पण खूप हळवा, टोकाचा मनस्वी होता. त्याच्या घरच्या लोकांनि त्याच्याशी संबध ठेवला नव्हता. आताशा तो पेणला राहात होता.माझे कॉलेज-कॅरमच्या मॅचेस, इतर छोटेमोठे कोर्सेस ह्यात मी गुंतून गेले असले तरी त्याच्या जीवनातला एकमेव कोवळा तंतू मी असल्याची जाणीव मला झालेली होती. त्याने कधीही हे मला दर्शविले नाही आणि मीही नाही. मी त्याला उदयदा म्हणत असे. ते नाते त्याने मान्य केले होतेच. 

काळ पुढे सरकत होता. माझे लग्न झाले. त्याला येणे जमले नाही. पण त्याचे पत्र आले. माझ्या नवऱ्याची त्याची भेट आधीच झालेली होती. पत्रात खूप शुभेच्छा देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मला जाणे जमले नाही. ह्या दरम्यान पत्रे चालूच होती. त्यावरून तो ठीक असल्याचे मला कळत होते, म्हणजे तशी माझी समजूत होती. माझ्या बाळाला पहायला तो आला. अतिशय खंगला होता. त्याला पाहून मला भडभडून आले. माझे अश्रू पाहून तो कासावीस झाला. सारे काही छान चालले आहे ह्याची ग्वाही देत राहिला.

लेखनातला पूर्वीचा जोम कमी झाला होता. स्वत:चे माणूस नाही,असह्य एकटेपणा, पैशाची चणचण हे सारे त्याचा जीवनरस शोषित होते. एके दिवशी न राहवून मी आणि नवरा अचानक त्याचेघरी गेलो. तो घरात नव्हता. कोणितरी ओळखीच्या मुलाने त्याला आम्ही आल्याचे कळविले. तसा पळतच तो आला. आज इतक्या वर्षांनी माझे घर उजळून निघाले असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिला. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेले. भरभरुन गप्पा मारल्या. त्याच्या सिगरेटस फार वाढल्याचे मला चांगलेच जाणवले, तसे मी बोलूनही दाखवले. त्यावर हसत हसत म्हणाला, "आजकल ये बेजुबानही जान है हमारी, बस इसे हमसे मत छिनों यारों/ कुछही सासें है बाकी,बस उन्हें जी भरके जीने दो प्यारों/" आम्ही त्याचा निरोप घेतला. बस सुटताना त्याचे भरुन आलेले डोळे, त्याची व्याकुळता मला काहितरी सांगू पहात होती. नेमके काय ते मला समजत नव्हते.मी त्याला विचारलेही. त्यावर अग् तुझे सुख पाहून मीही सुखावलोय. तेच डोळ्यांतून झरतेय.असे म्हणाला. त्यातील फसवेपणा मला विषण्ण करुन गेला.


काळ जातच होता. पत्रे चालूच होती. मी माझ्या परीने त्याला उत्साह देत होते, लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत होते. दोन वर्षानंतर त्याची नविन कादंबरी आली. मनापासून लिहिली होती, प्रतिसादही चांगला होता. वाटले आता हा उभारी धरेल. पण तोवर उशीर झाला होता. माझ्या पत्रांना लागलीच उत्तर देणाऱ्या उदयदाचे महिनाभरात पत्र आले नाही. अचानक त्याचे प्रकाशक माझ्या घरी आले आणि उदयदा गेल्याचे सांगितले. केवळ मला त्रास होऊ नये म्हणून त्याने माझ्यापासून अनेक गोष्टी लपविल्या होत्या. त्याच्या शरीराने दगा द्यायला कधीचीच सुरवात केली होती. पैशाच्या अडचणिनेही कोंडित पकडले होते. खूप उधारी साचली. खानावळ वाल्याने त्यासाठी चारचोघात वाभाडे काढलेन्. ते न सोसून त्याच रात्री हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्याने उदयला ह्या सगळ्यातून कायमचे सोडवले. माझ्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करणारा माझा उदयदा एका क्षणात मला पोरके करुन निघून गेला होता. त्याच्या काळजीच्या काट्याने माझ्यावर चरा उमटू नये हा त्याचा प्रयत्न मला आयुष्याचे वैफल्य देउन गेला. 


त्याच्या कुरूप चेहऱ्यामागचे नि:खळ सौंदर्य माझ्यात सामावून गेलेय. कुठल्याही नात्याचे आखीवरेखीव बंध नसलेला उदयदा माझ्या अंतरात अव्याहत आपुलकीचा आनंद गंध उधळतो आहे.

Saturday, February 21, 2009

मी आणि अपघात

माझे बाबा एका नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आर्किटेक्ट होते. नोकरी फिरतीची. प्रत्येकवेळी आम्हालाघेऊन जाणे शक्य होत नसे. अशावेळी आई, मी धाकटा भाऊ मुंबईतच राहात असू. बदलीचा कालावधीसाधारणपणे दोन वर्षाचा असे. १९७२-७८ च्या सुमारास हाती लिहिलेले पत्र आणि आणिबाणी निर्माण झाल्यासतार ह्यावरच सारी भिस्त होती. आजच्या इतकी संदेशवहनाची प्रभावी साधने उपलब्ध नव्हती.घराघरात टेलिफोन्सखणखणत नव्हते. बाबांची बदली झाली की आमचे घर उदास होउन जाई.

अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा ती दुष्ट बातमी बाबांनी एकविली. ह्या वेळी बदली गोव्याला झाली होती आणि चक्ककंपनीतर्फे सदनिकाही मिळणार होत्या. दोन वर्षे तरी राहावेच लागेल हे स्पष्ट झाले होते. जानेवारी मध्ये बाबागोव्याला गेले. एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाली की तुम्हालाही घेऊन जाईन, ह्या बाबांच्या शब्दांनी झालेला आनंदआम्हां तिघांना त्यांच्याशिवाय काढावे लागणाऱ्या दिवसांसाठीचा जीवनरस देऊन गेला. चार महिने भर्रकन् गेले. परीक्षा आटोपल्या. तिथे शाळेत नांव नोंदण्यासाठी दाखला घेणे, पुन्हा परत आल्यावर आमच्याच शाळेत प्रवेशमिळेल ह्याचे प्रॉमिस, रेशनकार्ड, गॅस, इत्यादी भानगडी निस्तरता निस्तरता आईला दिवस कमी पडू लागले. माझाभाऊ दुसरीत आणि मी चौथीत गेले होते. गोव्याला चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा. म्हणजे काय हे मला त्यावेळीकळाले नाही. पण स्कॉलरशिपला मी बसणार होतेच, बोर्डाच्या परिक्षेमुळे मला ही स्कॉलरशिप मिळणार होती. इथल्या मैत्रिणिंना सोडून जायचे हेच एकमेव दु: होते. एप्रिलच्या मध्यात आम्ही बोटीने गोव्याला गेलो.त्यावेळीपूर्ण चोवीस तास लागत असत. बोटीने प्रवास करण्याची पहिलीच वेळ असल्याने खूपच मजा वाटली. बाबाआम्हांला घ्यायला आले होतेच. जमिनीला पाय टेकलेले आहेत हे शरीराने मान्य करायला चांगलाच वेळ घेतला. आमच्या छोट्याश्या ब्लॉकमध्ये येऊन पोहोचलो आणि आम्ही सगळे नविन ठिकाणी एकत्र राहणार ह्याची मलाखात्री पटली.

हळूहळू नवीन परिसर, भोवतालची माणसे, शाळा ह्यात आम्ही रुळलो. शाळा चांगली होती. मैत्रिणिही लागलीचझाल्या. दिवस कसे आनंदाने चालले होते. आमच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक सरळजाणारा आणि दुसरा शॉर्टकट्. श्री. अनंत फंदी यांचे," धोपट मार्गा सोडू नको......" कडे कानाडोळा करुन सगळी मुलेत्याच रस्त्याने येत जात. आम्हीही त्याला अपवाद नव्हतोच. शॉर्टकट गॅरेजमधून जात असे. तिथे नेहमीच छोटेछोटे राखेचे ढिग असत.मुले त्या ढिगांना पायाने ठोकरीत. सगळीकडे मऊ राखेचा धुरळा उडत असे. दररोज मलाहीमोह होत असे. शेवटी एके दिवशी घरी परत येताना एका छोट्या ढिगात मी उजवा पाय घातला मात्र.... दुसऱ्याचक्षणी चारीबाजूने अंगार उसळले. त्या जाणिवेतून बाहेर येउन पाय बाहेर काढेतो उशिर झाला होता. ज्या ढिगात मीपाय घातला होता ती राख धगधगत होती. वरुन दिसत नसले तरी आत गरम निखारे होते. त्यांनी त्यांचे काम चोखबजावले होते. माझा तळवा आणि घोट्यापर्यंतचा पाय जबरदस्त भाजला होता. टरटरुन फोड आले होते. पंधरादिवस शाळेत जाता आले नाही. ते सगळे दिवस मी सारखी आईला विचारी, "आई, सगळेच जण दररोज जे करतहोते तेच मी केले . मग मलाच का असे.....?" ह्याचे उत्तर आईकडे तरी कुठे होते.

आमच्या शाळेची सहल निघाली. मीही आनंदाने निघाले. बसेस पोहोचल्या. चटकमटक खाणे खाऊन सगळ्यांनिआजुबाजूला काय काय करता येईल ह्याचा शोध घेतला. जवळच एक तळे होते. लहानसेच होते. गुलाबी,लाल पांढरा ह्याचे मिश्रण होउन अतिशय आकर्षक कमळें फुललेली होती. मला पोहता येत नव्हते. त्यामुळे मला नेहमीचपाण्याची भीति वाटे. सगळेजण भराभर तळ्याकडे धावलें. थोड्याचवेळात प्रत्येकाने चार-पाच तरी कमळे खुडलीहोती. सगळे एकमेकाला दाखवत होते. मला एक तरी कमळ हवेच होते. शेवटी पुन्हा एकदा मोहोने मला भरीसपाडले. कमळांच्या खाली जाळे असते हे केव्हांतरी एकलेले आठवत होते. सांभाळून काठाकाठाने अगदी जवळचअसणारे कमळ तोडायला मी झुकले मात्र...... पुढच्याच क्षणी जाणवले ते नाकातोंडात शिरणारे पाणी आणि शेवाळें. इतक्या मुलांमधून फक्त मीच पाण्यात पडले होते. पुढे बरेच दिवस मुले-मुली माझ्याकडे पहात एकमेकांनाविचारीत," कमळे तळ्यात वर असतात का आत?" पुन्हा मी आईला विचारले," आई, मीच का त्या कमळांच्याजाळ्यात पडले?" ह्याचेही उत्तर आईकडे नव्हते.

नऊमाई परीक्षा जवळ आली होती. शाळेतून आम्ही पाच-सहा जण दररोज एकत्र घरी येत असू. त्या दिवशीहीअसेच आम्ही परत येत होतो. गोव्याचे रेतीचे डंपर हे एक मोठ्ठे प्रकरण होते. सगळा रस्ता फक्त आपल्यासाठीचआहे हीच त्यांची धारणा होती. आम्ही मुले रस्त्याच्या मधून चालत होतो. लाल रंगाचा डंपर जोरात येतानादिसताच पोरे दोहोबाजूला पांगली. म्हणजे मी एकटीच एका बाजूला आणि सगळे दुसऱ्या बाजूला. डंपर जवळआला आणि अचानक मला भूत दिसावे तशी एक मोटरसायकल येताना दिसली. त्यालाही मी अचानकदिसल्यामुळे तोही गांगरुन गेला होता.डंपर माझ्याजवळून जातानाच मीही त्याच्या टपराच्या समांतर दिशेने उडतअसल्याचे जाणवले. त्याही स्थितीत मला उडता येऊ लागल्याचा आनंद झाला. आणि दुसऱ्याच क्षणी रस्त्यानेमला झेलले होते. मोटरसायकलवाला अतिशय घाबरला होता. माझ्याजवळ येऊन तो काहीतरी विचारीतअसतानाच माझी शुद्ध हरपली. जाग आली तर मी आमच्या घरात होते. खूप मुका मार बसला होता. बरेच खरचटलेहोते. मोटरसायकलवाला डॉक्टरांना घेऊन आला. थोड्यावेळाने सगळे पांगले. पुन्हा मला तोच प्रश्न पडला. अर्थातउत्तर मिळाले नाही.

मडगावहून आम्ही फोंड्याला जायला निघालो. बसमध्ये छान खिडकीची जागा मिळाली. फोंड्याला पोहोचलो. खूपसारी माणसे उतरली. आई,बाबा भाउही उतरले. मी उतरु लागले आणि कुठूनतरी सायकलला दूधाने भरलेले कॅनलावलेला एक भय्या जवळ येताना दिसला. त्याच्याकडे पाहता पाहता माझी नजर रस्त्यावरून हटली आणिपुढच्याच क्षणी माझा पाय रस्तादुरुस्तीवाल्यांनी घातलेल्या डांबराच्या उंचसखल नक्षीत मुरगळलला आणि मीकोसळले, माझ्यावर दूधाचे दोन्ही कॅन आणि सायकलही कोसळले. मला रस्त्याला दूधाचा अभिषेक झाला. ह्यावेळी माझ्या नशिबाने मला दगा दिला. माझा पाय घोट्यात मोडला. तिन महिने प्लास्टर ठेवावे लागले. मात्रह्यावेळी मला एकही प्रश्न पडला नाही. कारण अशावेळी त्या जागी फक्त मीच असू शकते ह्याची खात्री मला पटलीहोती.

मध्ये बराच काळ गेला. छोटेमोठे अपघात घडत होते. गृहित धरल्यासारखे मी ते कानामागे टाकत होते. २०००पासून आम्ही शिकागोजवळच्या गावी राहात आहोत. ऑक्टोबर,२००५ उजाडला. मी दररोजसारखी जेवायलाघरी आले. जेवून परत ऑफिसला निघाले. आमच्या घरापासून माझे ऑफिस हा सारा तिन मिनीटांचाप्रवास.दुपारचे टळटळीत एकचे उन. गडद निळ्या रंगाची माझी गाडी. डाव्या हाताला वळण्यासाठी मी थांबलेली. आणि एक मोठ्ठा आवाज आला. माझ्या बाजूने जाणाऱ्या गाडीला कोणीतरी ठोकलेले दिसतेय असे वाटून मीवळून पाहिले मात्र..... माझ्याच गाडीला एका सेवन सीटर वॅनने ठोकले होते. गाडीचा बेल्ट माझ्या गळ्यात रुतूनरक्ताची धार लागली होती.ब्रेकवरचा पाय जोरात बसलेल्या धक्क्याने गुडघ्यात मुडपला होता. पण ह्यावेळी माझ्यानशिबाने माझी साथ सोडली नव्हती. ४५ माईल्स च्या स्पीडने ठोकूनही माझी स्टेशनरी गाडी समोरुन अंगावरयेणाऱ्या अप् कमिंग ट्राफिकच्या मध्ये ढकलली गेली नाही आणि मी वाचले. वॅन मधून एक बाई उतरली. माझ्याजवळ येऊन क्षमा मागून मला कितपत लागले आहे ह्याची चौकशी करुन ती म्हणाली, " अग, मला तुझीगाडी दिसलीच नाही." गडद निळ्या रंगाची गाडी दुपारच्या एकच्या उन्हात तिला दिसली नाही हयात तिचा काहीचदोष नाही, हे मला उमगले होते. मी मंदपणे हसून तिला म्हटंले, " असे होते कधी कधी, तू वाईट वाटून घेऊ नकोस."

Thursday, February 19, 2009

आईचे मूल!!

ऑफिसला पोचेपर्यंत शमा च्या मनात नंदाच घोळत होती. सकाळी सकाळी तिचा फोन आला होता. फारच संतापलेली वाटत होती. इतके भरभर बोलत होती की नीटसे काहीच कळेना नक्की काय घडलेय. तिला कसेबसे थोडेसे समजावले आणि संध्याकाळी येते तुझ्याकडे असे सांगून फोन ठेवला. कामाच्या रगाड्यात दिवस कुठे गेला कळलेच नाही. नेहमीच्या ट्रेनच्या धक्काबुक्कीतून उतरल्यावर भाजीपाला थोडेसे सामान घेऊन शमाने नंदाचे घर गाठले. दार नंदानेच उघडले. घरात शांतता होती. "का गं, कोणीच दिसत नाही? सगळे कुठे बाहेर गेलेत का?" ह्या शमेच्या प्रश्नांना नंदाने उत्तरे दिलीच नाहीत. मग शमेने मुद्द्यालाच हात घातला. "नंदे बस पाहू इथे आणि सांग कशासाठी चिडचिड करते आहेस ते. आणि हो मला कळेल असे बोल. सकाळी किती ओरडत होतीस गं? मला काही कळत नव्हते।"

कोंडलेल्या वाफेवरचे झाकण निघाले आणि सकाळच्याच आवेशात संतापून नंदा बोलत होती, " किती भयंकर आहे हा माझा नवरा. देवा-ब्राम्हणासमक्ष हजारभर लोकांच्या साक्षीने माझ्या आई-बाबांनी ह्याच्या हातात माझा हात दिला. ह्याच्या आई-वडिलांची सेवा केली, दीर-नणंदेचे नखरे काढले. ह्याची दोन पोरे काढली. वंश पुढे चालविला ......... " ती पुढेही बरेच काही बोलत होती. शमेचे मन मात्र तिच्या, " ह्याची दोन पोरे काढली.... " ह्या वाक्याशीच थांबले. असे काही ती बोलेल असे कधी वाटलेच नव्हते. चांगल्या संस्कारात वाढलेली, खूप शिकलेली ही माझी जवळची मैत्रीण अन हिच्या मनात हे विचार? न राहवून शमाने तिला टोकले, "का गं असे म्हणतेस? मुले ही काय फक्त त्याची आहेत का?" त्यावर आणिकच भडकून नंदा म्हणाली, " हो. जरी माझ्या पोटातून आली असली आणि मला कितीही प्रिय असली तरी त्याला हवी म्हणूनच झालीत ना? " आता मात्र शमेला तिथे थांबवेना. तिच्यातली आई अतिशय दुखावली गेली. अनेक वर्षे संसार होऊन, मुले खूप मोठी होऊनही जर असे विचार मनात येत असतील तर ह्या नात्यात काही अर्थच नव्हता. नंदाला थोडे समजावून शमा घरी जायला निघाली।

मन बेचैन झाले होते. आपले मूल ही जाणीवच किती सुखदायी, कोमल आहे. लग्न झाल्यावर काही काळाने तिला-त्याला ह्या सुखाची ओढ वाटू लागते. दोघांच्या अस्तित्वाच्या खुणा ज्यात प्रकर्षाने दिसतील असे आपले तिसरे कुणी असावे ही ओढ. निसर्ग नियमानुसार आईला बाळाचा प्रत्येक श्वास अनुभवता येतो. स्त्रीला मिळालेले अलौकिक वरदानच हे. ह्या सुखाला पुरुषाला मुकावे लागते. जन्म देताना वेदनांना सामोरे जावे लागते. त्यातही आनंद असतो असे म्हणता येणार नाही कारण शेवटी वेदना ही वेदनाच असते. पण त्यात निर्मितीचा, आपल्या बाळाच्या जन्माचा आनंद इतका असतो की ह्या वेदना आई धीराने सोसते. पुन्हा पुन्हा सोसते. बाळाच्या जन्मानंतर अनेक गोष्टींनी ती सुखावते. आई झाल्याचा आनंद, नवऱ्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम, कृतज्ञता, एकटीने वेदना सोसाव्या लागल्या म्हणून मुकपणे स्पर्शाने मागितलेली क्षमा अशा अनेक गोष्टींनी ती भरून पावते. आपल्या बाळाचा मुलायम स्पर्श, निरागस हसू, त्याला जवळ घेतल्यावर येणारे संमिश्र वास. सुख सुख ते काय असते अजून?

अग नंदे, लग्नाआधी फसवणुकीतून, मोहाला बळी पडून, जोर-जबरदस्तीतून अनेक मुली माता बनतात. त्यातल्या काही मुलींना तरी गर्भपाताचा मार्ग नक्की मोकळा असतो. पण त्या तसे करीत नाहीत. कारण ते मूल आईच्या हृदयात जन्माला आलेले असते. ते आता फक्त तिचे असते. जन्मलेले मूल अपरिहार्यपणे वंशवृद्धीही करीत असेल पण ते त्याच्या जन्माचे प्रयोजन नक्कीच नसते. किमान आईसाठी तरी नसतेच नसते. खरे तर मूल कोणाचे हा प्रश्नच चुकीचा आहे. मूल हे संपूर्ण घरादाराचे असते. आईचा हक्क जास्त कारण बाळाच्या रुजण्यापासून मोठे होईपर्यंत सगळ्या प्रक्रियांमध्ये सर्वात जास्ती वाटा तिचा आहे. मात्र ह्याचा अर्थ तिने ते उपकारास्तव जन्माला घातले आहे असा असतो का? नवऱ्यासाठी मूल काढले म्हणजे नाईलाजाने एखादे देणे दिल्यासारखेच झाले. आपल्या आईच्या तोंडून हे उदगार मुलाने एकले तर? नवऱ्याची कितीही मोठी चूक असली तरीही मुलांच्या अस्तित्वाचा त्यात बळी जाऊ नये एवढे तारतम्य आईच्या रागाला असलेच पाहिजे.प्रेम, वात्सल्य व त्यागमूर्ती असलेल्या आईची खरी प्रतिमा तिने कधीच डागाळू देऊ नये कारण ह्या नात्याला इतर कुठल्याही भावना स्पर्शू शकत नाहीत. आईच्या नजरेत मूल हे फक्त तिचेच असते.

जिव्हारी लागलेले सोळा सोमवार .


वार्षिक परीक्षा आटोपली. महिनाभर आधीच मी माझा भाऊ आजी-आजोबांकडे जाऊन काय काय मज्जाकरायची त्याचे मनोरे रचत होतो. त्यामुळे आईची बोलणीही खात होतो. आधी अभ्यास करा धडपणे, नाहीतरयावर्षी मूळीच नेणार नाही. असे आणि बरेच काही. आम्हीही घाबरून पुन्हा पुस्तकात डोके घालत असू. शेवटीआमचा अंत पाहून तो दिवस आला. रेल्वेत बसलों आणि दरमजल करीत आमच्या गावी येऊन पोहोचलो. आजीचेघर म्हणजे मोठा बंगला. मागे पुढे प्रचंड अंगण. फुले,फळे, शोभेची झाडे, पाहातच राहावे. खेळणें, खाणें आणि मस्तलोळणे. आजीकडे गडीमाणसे खूप होती. प्रत्येक कामाला माणूस होते. मला फार मजा वाटे. काहिही म्हणायचाअवकाश लागलीच कोणीतरी लगबगीने येई आणि करी. मुंबईच्या लहानश्या तिन खोल्या, खालून पाणी भरणे, सारेकाही आपणच करणे ह्या पार्श्वभूमीवर ही चैन आम्हाला आवडत असे. सगळ्यांना आम्ही नातवंडांनी लळा लावलाहोताच त्यामुळे तेही आनंदाने सारे काही करीत.

आम्ही पोहोचेतो राञ झाली. त्यामुळे गेल्या गेल्या गरम गरम साधंच पण रूचकर जेवण जेवून मी आजीच्याकुशीत झोपीही गेले. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी उजाडले त्यावेळी सकाळचे दहा वाजून गेले होते. स्वयंपाकघरातूनछान छान वास येत होते. पटकन तोंड धुवून मी ओट्यापाशी गेले आणि लक्षात आलें की नेहमीच्यास्वयंपाकिणबाई नाहीत ह्या. मग आजीला विचारल्यावर कळाले, अक्कांना आताशा होत नाही त्यामुळे ह्यांना नेमलेआहे. त्यांचे नांव शालीनी होते. सगळे त्यांना शालूताई म्हणत. गोऱ्या, घाऱ्या डोळ्यांच्या, शेलाटा बांधा. स्वभावानेगरीब होत्या. पोरांचे पोट भरण्यासाठी हा मार्ग पत्करावा लागलाय हेही कळाले.एके काळी स्वतःच्या घरीनोकरचाकर असणाऱ्या शालूताईंना हे दिवस पहावे लागत होते. पण त्या स्वाभिमानी होत्या, दिराकडे जातास्वतःच हिमंतीने प्रयत्न करीत होत्या.का कोण जाणे त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटू लागली. आमचीहळूहळू चांगली गट्टी जमली.त्यामुळे कधीमधी आजीचा ओरडाही खावा लागू लागला. "खेळायचे सोडून कशालासारखे स्वयंपाकघरात लुडबूडत असतेस ?" असेच दोन-तिन आठवडे गेले. आम्ही पोरे उंडारत होतो. पानमळ्यातले जेवण,अंगणातील भेळ,पॉटमधले किंचित खारट आईस्क्रीम, उसाचा रस.... .मज्जाच मज्जा.

सकाळी सकाळी घरात गोंधळ-गडबड ऐकू आला म्हणून डोळे चोळत चोळतच गेले, तर दररोज पूजा करायलायेणारा नारायण रडवेला होऊन आजीला सांगत होता," देवाशपथ नैवेद्याची वाटी काल इथेच ठेवली होती, पण आजती दिसत नाहीये." आमची आजी खूप प्रेमळ, दयाळू होती पण चोरी म्हटंले की मग माञ ती एकदम रूद्रावतारधारण करीत असे. नारायण आमच्याकडे खूप वर्षे काम करीत असल्यामुळे आजीला त्याचा संशय नव्हताच. इतरही सारेजण जुनेच होते, फक्त शालूताई नवीन. त्यात दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आजीकडे दोनशे रूपये मागितलेहोते. मग काय आजीने त्यांना सगळ्यांसमोर विचारले, " खरे खरे सांगा, घेतलीत का तुम्ही?" ह्या साऱ्या प्रकारामुळेत्या खूपच भेदरून गेल्या होत्या.त्यात आजीने चोरीचा आळ घातलेला पाहून त्या कोलमडूनच पडल्या. त्यांनीपरोपरीने आजीला विनवले पण आमच्या आजीला काही पटले नाही. अचानक घडलेल्या ह्या घटनेने घरातसगळेजण दु:खी झाले. माझी मनोमन खाञी होतीच, शालूताईं असे काहीही करणे शक्यच नाही. दुसऱ्याच दिवशीआई आणि काकू ह्यांचे बोलणे कानावर पडले, शालूताईंनी खडीसाखरेचे सोळा सोमवार धरल्याचे. मला काहीचउमगले नाही म्हणून आईला विचारले तर प्रथम एक धपाटा मिळाला, "कारटे, मोट्या माणसांची बोलणी ऐकायलाहवीत." त्याकडे दूर्लक्ष करून मी पुन्हा विचारल्यावर कळाले की ती हरवलेली वाटी मिळून आपल्यावरील आळजावा म्हणून शालूताई सोमवारी दिवसभर उपवास करणार होत्या आणि राञी फक्त एक खडिसाखरेचा दाणा आणिएक भांडे पाणी पिणार होत्या. हे एकल्यावर मला तिथे राहावेसेच वाटेना. गरीबाच्या अपमानाची देवाघरी मांडलेलीफिर्यादच होती ती.

पाहता पाहता सुट्ट्या संपत आल्या. शाळांचे वेध आम्हा मुलांना लागले. निघताना मी शालूताईंच्याही पाया पडले, तशी डोळे पुशीत मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, " दिवाळीला येशिल ना?" आम्ही निघालो, पुन्हा चक्र सुरू झाले, नविन मैञिणी, परीक्षा ह्या साऱ्यात शालूताई मागे पडल्या. एकेदिवशी शाळेतून घरी आले तर आई रडत होती. मीघाबरून गेले, आता काय झाले? आईने शालूताईंचे पञ वाचायला दिले. त्यांनी लिहीले होते, नैवेद्याची वाटी त्यांचेसोमवार पुरे झाल्यावर चार-पाच दिवसातच सापडली. आमचा देव्हारा मोठा होता, देवाचे टाक ठेवण्याकरिताऊतरत्या पायऱ्या होत्या. त्याखाली गेली होती. पुढे असेही लिहिले होते, तुम्ही मायलेकींनी माझ्यावर दाखविलेल्याविश्वासाबद्दल आभारी आहे. आमच्या आजीने त्यांच्यावर आळ घातल्याबद्दल त्यांची माफीही मागितली होती. त्यावर एवढे होऊनही तुम्ही मला कामावरून काढून टाकल्यामुळे माज्या पोराबाळांचे हाल झाले नाहीत, ह्याचेचउपकार मी विसरू शकत नाही असे म्हणून त्यांनी आजीचे आभारच मानले होते.

चला शेवट गोड तर सारेच गोड. माञ माझ्या जीवाला त्यांचे ते सोळा सोमवार जिव्हारी लागलेत. शालूताईंचाविदिर्ण चेहरा डोळ्यासमोर येतो आणि परिस्थितीचे चटके जीवनात काय काय दाखवतात ह्याची जाणीव होते.

मेदुवडे.जिन्नस

 • सव्वा वाटी उडीद डाळ
 • एक वाटी मुग डाळ
 • आठ/दहा मीरे
 • अर्धपेर आले
 • तीन हिरव्या मिरच्या.
 • दहा/बारा कडिपत्त्याची पाने.
 • एक मध्यम(मोठ्या कडे झुकणारा) कांदा
 • मूठभर कोथिंबीर
 • मीठ अंदाजाने
 • काजूचे तुकडे.

मार्गदर्शन

उडीद डाळ आणि मुगडाळ एकत्रित करून भिजत घालावी.
सहा तासाने कांदा चार भाग करून नंतर उभा चिरावा. आल्याचेही उभे पातळ काप करावे. मिरच्याही बारीकचिराव्यात. कडिपत्त्याच्या पानांचे तुकडे करावेत. कोथिंबीर चिरून घ्यावी. मीरे मिक्सर मधून काढावे. अर्धेवटतुटतील इतपतच बारीक करावेत. काजू खोबऱ्याचे तुकडे करून घ्यावेत.
ही तयारी झाल्यावर भिजलेली डाळ वाटावी. कमीतकमी पाण्यात वाटण्याचा प्रयत्न करावा. गॅसवर तेल घालूनकढई ठेवावी. आंच मध्यम पेक्षा जास्त ठेवावी. प्रथमच तेल व्यवस्थित गरम होऊ द्यावे म्हणजे वडे तेल पीतनाहीत. आता वाटलेली डाळ वरील सगळे साहीत्य एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून एकाच दिशेने तिन/चारमिनीटे फेटावे. हातावरच थोडे दाबून वडे तेलात सोडावे. तांबूस रंगाचे झाले की काढावे.

टीपा

मुगाची डाळ जवळजवळ बरोबरीने घातल्यामुळे वडे अजिबात तेल शोषत नाहीत. अतिशय हलके चविष्ट होतात. नेहमीच्या मेदूवड्यांनपेक्षा जास्त खाता येतात. गरम गरम वडे गरम सांबार नंतर वाफाळता चहा.

काजू खोबऱ्याचे तुकडे उपलब्धता आणि आवडीनुसार घालावे. वडे खाताना मीरीचे तुकडे बारीक चिरलेलीमिरची दाताखाली येते तेव्हां मस्त वाटते.

झटपट आप्पेजिन्नस

 • रवा इडली पाकिट-गीटस चेच घ्यावे. (दुसऱ्या कोणाचे घेतल्यास छान होत नाहीत. तसेच नुसते इडली अथवा डोसा घेतल्यास ही चांगले होत नाहीत.)
 • एक मध्यम कांदा बारीक चिरावा.
 • दोन/तीन हिरव्या मिरच्या बारीक चिराव्यात.
 • दहा/बारा कडिपत्त्याची पाने तुकडे करून घ्यावीत.
 • एक इंच आले किसून घ्यावे.
 • काजू तुकडे करून घ्यावेत. ( नाही घातले तरी चालतात. )
 • तीन चमचे तेल.
 • तिनशेदहा मिली लीटर पाणी.

मार्गदर्शन

एका पातेल्यात रवा इडली चे पाकिट ओतावे. त्यात कांदा, मिरच्या, आले, कडिपत्ता, काजू आणि पाणी घालूनव्यवस्थित एकजीव करून दहा/बारा मिनीटे ठेवावे. गॅसवर आप्पे पात्र ठेवावे. प्रत्येक खळग्यात तिनचार थेंब तेलघालावे. (तेवढे तेल पुरते. ) पात्र नीट गरम झाले की एक चमचा मिश्रण प्रत्येक खळग्यात ओतावे. झाकणठेवावे.आंच मध्यम असू द्यावी. चार मिनीटांनी झाकण काढून आप्पे उलटावे.सोनेरी रंग येतो. उलट्यावर झाकणठेवू नये. चार-पाच मिनीटांनी काढावेत. गरम गरम चटणी बरोबर वाढावेत.

टीपा

हे आप्पे आयत्या वेळी ठरवून हि करता येतात आणि चवदार लागतात. कमीत कमी तेल लागते. संध्याकाळी गरमगरम खावेसे वाटते त्या साठी योग्य आणि झटपट होतात.

कथा गर्दीची

चुकता वाजणारा गजर आजही वाजला. सकाळचे सहा वाजत होते. पाच मिनीटांनची डुलकी गेल्याच आठवड्यातलेटमार्क देऊन गेली होती. बाप रे! नकोच ती आठवण सकाळी सकाळी असे म्हणत शमा उठली. सात वाजेतोलेकाला उठवून, लाडीगोडी लावीत कसेबसे आवरून शाळेत पाठविले. तो आनंदाने जाणे तिच्या दिवसभराच्यामन:शांतीसाठी गरजेचे होते. नवऱ्याला उठवून चहा देत ती एक डोळा घड्याळाकडे ठेवीत भराभर कामे आवरतहोती. आठ-वीस ला ती दोघेही बाहेर पडली. चला आज वेळेवर ऑफिसला पोहचणार ह्याची खाञी पटली. रिक्शाकरून स्टेशन गाठलें. एक कान अनाँन्समेंटकडे ठेवीत ब्रीज चढताना तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबडदिसतेय. तेवढयांत एक लोकल आली. चला सुटले. ऊगाच घाबरलो आपण. दुसऱ्यांच क्षणी हे सुख हिसकून घेतलेत्या अनॉन्सरच्या दिलगिरीच्या शब्दांनी. ती लोकल तिन तास उशिरा अवतरली होती. सगळ्यां प्लॅटफॉर्मस वरचीगर्दी पाहून तिच्या आनंदाचे बारा वाजलेच होते, किमान बारा वाजेतो तरी पोहोचता आले तर बरे होईल असे मनाशीम्हणत ती चार नंबरवर उतरली. प्रत्येकवेळी तेवढयाच हिरिरीने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नांना अखेरीस यश येउनरडतखडत एक वाजता सेक्शन मध्ये पोहोचली. युद्ध खेळल्यामुळे सकाळच्या छान आवरण्याचा पुरता अवतारझाला होता. सेक्शनमध्ये मधोमध साहेब उभे होते. तिच्या आधी पाच/दहा मिनीटांच्या फरकानी इतर कलिग्जयेऊन पोहोचले होते. साहेब त्या सगळ्यांनची चंपी करित होते. हाणामारी करून कसेबसे येऊन टेकलेल्या साऱ्यांनाजाम वैताग आला होता. तिला पाहताच सगळयांनी हिला विचारा म्हणत कल्ला केला. साहेबांचा माझ्यावर अमंळजास्तच विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होता आणि असुयापण. साहेबांचा मोहरा तिच्याकडेवळताच अभावितपणे शब्द गेले , तर काय! इतकी गर्दी होती की माझे डोळेसूद्धा चेंगरले. दोन मिनीटे भीषणशांतता पसरली आणि एकदम सगळे जोरजोरात हसू लागले. साहेबांनी धन्य आहात असे हातवारे करितसगळ्यांना मस्टर दिले आणि चहा मागविला. पहा बाई, खरे बोलले तर .........

Wednesday, February 18, 2009

सुस्वागतम!!!

नमस्कार मंडळी,

सहर्ष स्वागत!

मनात अनेक विचार नेहमीच पिंगा घालत असतात, त्यांना मुक्तपणे मांड्ता यावे म्हणून हा खटाटोप!