जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 11, 2013

आनंदोत्सव! दीपोत्सव! फराळोत्सव! फटाकेत्सव!


यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो. त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच. खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही. आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव. पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे. अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव. 

हे झाले मायदेशाचे. जे पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे-वेगळे प्रकरण आहे. दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद. मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परदेशी आलो ते एका छोट्याशा गावात. सुदैवाने तिथे इतक्‍या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या, की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही. दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे. अगदी रांगोळ्या, तोरणे, फराळाची देवाण-घेवाण, विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ, पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे, मुलांचे-मोठ्यांचे फुलबाज्या, भुईचक्र व नळे उडवणे, आम्हा बायकांची पैठण्या, दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग. आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती. बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे. 

हे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले. मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले. तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना. कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला. आता हेच पाहा नं, बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी. पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल, वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ. 

मग काय, घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये. हरकत नाही. दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच. ओघाने फराळही आलाच की. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत:च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएट-बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....(का ते कळले नं... "लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम...') लाडू खायचेच. तशात लेक म्हणाला, " आई, डबा भरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव.'' मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र-मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले. प्रत्यक्ष शुभेच्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल, फटाक्‍यांची आतषबाजीही लुटता येईल. दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल. 


तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. " !!! ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत !!! " 

( इसकाळ मधे छापून आलेला लेख )

Monday, November 4, 2013

* !!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!! *

                           
                        माझ्या सगळ्या वाचकांना व मित्रमैत्रिणींना 

                         * !!! दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा !!! *  


                                                   

                                           क्रोशे कमळ 


Saturday, April 13, 2013

अचानक कुठल्याश्या वळणावर भेटलेल्या व्यक्तिमत्वास.........


जखम संपते तिथे शब्द सुरू होतात. शब्द संपले की स्वर साकारतातस्वर नेहमीच धावतात शब्दांपाठी. वेडे अर्थ शोधण्यासाठी. अर्थ गवसताच आरोह-अवरोह ज्ञात होतो....

आणि मग सुरू होतं एक आक्रंदन!


शब्द हरवताना सूर उगवतातमनाच्या सर्व व्यथा, स्वरांच्या एवढ्या समर्थ वैभवातही असतात पराधीन, पोरक्या आणि सर्वस्वी अनाथ

तुला वाचलं आणि मन विषण्ण झालंकाळाच्या गर्तेत जिवानीशी गाडलेले माझे कोवळे स्वर, अचानक थडग्यातून उठलेल्या आत्म्यासारखे माझ्या पुढ्यात उभे राहिलेविजेसारखी लख्ख चमकून गेलीस क्षणभर माझ्या ढगाळ आभाळातअंधाराला विजेचीच जखम व्हावी तसे आतल्या जखमेचे सांकळते रक्त तुझ्या शब्दातून क्षणभरच टपटपले

जशी जशी ओळ येत गेली, तशी तशी तू लिहीत गेलीस. रोजच्या प्रवाहातून काहितरी टिपत गेलीस...

का ही उदासिनता?

का ही अस्वस्थता?

का हा प्रक्षोभ?

का?

स्वतःतच गुरफटलेल्या तुझ्या दूरच्या यातनापथावर माझे डोळे वळण्यासाठी तुझ्या शब्दांची वेदना माझ्यापर्यंत पोचावी लागली. 


नाहीतर,

तुझे दूरस्थ क्षितीज आजवर मी दूरूनच पहात आले होतेतुला स्वर आवडतात असे तूच म्हणालीस
पण हाच का तो सुरांचा लगाव

खर सांगू, 

स्वरांना ओळीत सजवताना थिटी पडलीत तुझ्या प्रारब्धातील अक्षरेस्वतःच्या लेखणीतून वर्षणाऱ्या स्वतःचं समाधान करणाऱ्या आत्मसंतुष्ट काहीशा बटबटीत शब्दांवर सावरीत आहेस तू आपल्या मनाचा पराभूत तोल

तुझ्या लिखाणमध्ये जितकी तू आहेस तितकी कदाचित तुझ्यापाशीही नसशील. तुझ्या शब्दाशब्दांत सांकळलेली तुझी प्रतिमा कदाचित तू ओळखली नसशील, 

कारण

खोल अंतर्यामी धुमसणारी तुझी व्यथा तुझ्या शब्दांनीच शोषून घेतलीयमी हे सांगितलेलं कदाचित तुला आवडणार नाही पण मग 

ही तगमग, ही अस्वस्थता, शाश्वत की अशाश्वत.


कारण सुखाला तसे फार काही लागत नाही....


तगमगत्या कातरवेळी व्याकूळ जीवाला बिलगणारी आवडत्या गीताची लकेर.... 

एका स्नेहळ स्पर्शानं कोंडलेल्या जीवाला फुटणारे आसवांचे पाझर.... 

कुणाच्या आश्वासक डोळ्यांनी दुखऱ्या जीवावर घातलेली मायेची फुंकर... 

सुखाला तसे फार काही लागत नाही

फक्त

ते लाभण्यासाठी उभा जन्म उन्हात घर बांधावे लागतेउन्हात बांधलेलं घर कुणा आगंतुकाची वाट पहात असतं. गीताचे हळवे, लडीवाळ सूर घराच्या गवाक्षातून कधीकधी झिरपत येतातउन्हात बांधलेलं घर टक्क डोळ्यांनी वाट पहात असतं. आसमंताची नीरव शांतता भेदीत मन गाणे गुणगुणू लागतं. घर शांत होतंडोळे मिटून घेतंदुःखालाच मग आपलसं करावे लागतेजगाच्या अरीष्टांपासून दूर ठेवावं लागतेदुःखच फक्त आपलं असतंसरत्या संध्येच्या कातरक्षणी सोबत असते ती फक्त त्याचीच. दुःखालाच मायेने जवळ केलं तर त्याचे काटेरी सल बघता बघता गळून पडतात आणि स्वरांचा गोड सुवास त्याला येऊ लागतोत्या ओतप्रोत गंधांच्या संगतीत आयुष्याची संध्याकाळही कधी उलटून जाते

कारण 

आयुष्य तसं कधीच कुणासाठी थांबत नाही. ते पुढेच जात असतंआपल्या गतीनेगतीला पारखी होतात ती आपलीच पावलं. त्या अडखळत्या, चाचपडत्या पावलांना आयुष्यच ओढून नेते आपल्या मागे. कधी संथपणे, कधी फरपटत, निर्दयपणे खेचत

काळाच्या शर्यतीत मृतात्म्यांना भाग घेता येत नाही

पावलापावलागणिक दमछाक झाली तरी या शर्यतीत धावावेच लागते ते जित्या जीवांनाडोळयातले आसू पुसण्यापूर्वीच इथे तापल्या सळीने डोळे कोरडे होतात. आणि हरवलेली बुबुळे नकळताच स्थिरावू लागतात, सभोवार पाहू लागतात

सोबतीसाठी.... 

संगत मिळते तीही या शर्यतीत रखडणाऱ्याउरी फुटतानाही धावणाऱ्या जीत्या जीवांचीच.


शब्दांच्या वाटेवर तुझे गाव जेव्हां लागले तेव्हां पाय थबकले नाहीत तरी हृदय मात्र थांबलं होतंतुझी व्यथा, तुझी खंत, उभी राहिली माझ्यासमोर मालकंसाच्या अवरोहात उतरणाऱ्या गांधारासारखी....

तुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास ओळी वाचल्या तेव्हा गळ्यातील स्वरांच्या ज्योतीसाठी मीही क्षणभर स्थिरावले होते

तुझ्या मनीचे पाखरू काना, मात्रा आणि वेलांट्यात पाय अडकून पडले आहेतुझ्या शब्दांनी तुझ्या व्यथेचे डोळे झाकले असले तरी आवाज नसलेले आंधळे हुंदके मला स्पष्ट एकू येत आहेततुझ्या अबोल डोळ्यांच्या आत किती डोहांचे काळेशार पाणी आतल्याआत हिंदकळते आहे

आत्ताच बोलून घे, पोट उकलून... उद्या कदाचित उशिर होईल.. 

कदाचित उद्या असणारही नाही........(माझ्यातल्या मलाच......... )

Wednesday, March 13, 2013

आपण करायचं का हे ?

पंकजच्या ब्लॉगवरून ही संपूर्ण पोस्ट  कॉपी-पेस्ट केलेली आहे: 

आपण करायचं का हे

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.
लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.

AmteFamily
त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.
नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.
आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.
Screen area1-001
Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?
आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.
https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform
आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !
टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.
http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/

 ******
 हेमलकसाच्या लोकबिरादारी प्रकल्पाची अजून काही माहिती आणि फोटो इथे आहेत.

Thursday, February 28, 2013

पिंपळ...

माणसाचं मन रोजच्यारोज उत्साहानं नवनवीन गोष्टी शोषत राहते. जोमाने आजूबाजूला घडणार्‍या घटनांवर विचार करत राहते. तितक्याच तगमगीने मागे होऊन गेलेल्या घटनांवर पुन्हा पुन्हा स्वतः:ची शक्ती असे का घडले ची कारण मीमांसा शोधत कष्टी होण्यात घालवते. असह्य जखमांचे क्षण कुपीत भरून खोल खोल डोहात भिरकावून दिल्यावरही पुन्हा एकदा नवीन कुपी आकार घेऊ लागते तेव्हां अगदी अजिबात गरज नसताना ओढवून घेऊन त्या जुन्या निद्रिस्त क्षणांचे पापुद्रे उलगडून तितक्याच असहाय्य वेदना जगण्याचा प्रयास हट्टाने करत राहते.  गिरणीचा पट्टा कसा अव्याहत दळण दळत राहतो. बहुतांशी गव्हाचाच भुगा... कधी जास्ती कोंडा तर कधी कमी कोंडा. का कोण जाणे आपल्या जेवणातला पोळी हा महत्त्वाचा पदार्थ असूनही भाकरीचा मायाळू बाज तिला नाही. म्हणूनही असेल पण कुठल्याही धान्याची भाकरी मनाशी जास्त जवळीक साधून असते खरी. गिरणीच्या पट्ट्याला ही मधूनमधून वेगळेपण लागतेच. कधी ज्वारीबाजरीचे मायाळू कण, तांदुळाचे शुभ्र एक प्रकारचा तलम भास देणारे राजस कण, सणासुदीला भाजणीचे खमंगपण, कधी चुकार साबुदाणा वगैरे उपासाचे चोचले. पट्टा सुरूच. मनाचेही दळण असेच. दिवस रात्र सुरूच. अगदी झोपेतही ते विसावत नाही. प्रयत्न करूनही थांबत नाही. थांबवता येत नाहीच.

ठाण्याच्या घरी हातात चहाचा मग घेऊन मागल्या गॅलरीत मनाची पाटी कोरी ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत मी बसते. आजकाल जागोजागी उंच उंच बिल्डिंग उभारल्यामुळे आकाशाचा मुठीत मावेल इतकाच तुकडा दिसतो अशी एकीकडे तक्रार करणारे मन त्या वाहत्या तुकड्यातून इतक्या अनंत गोष्टी टिपू पाहते की गिरणीच्या पट्ट्याची गती धापा टाकू लागते. मुठीत मावणार्‍या आकाशात भरारी घेणारे मन, डाव्या व समोर दिसणार्‍या रस्त्यावर चोहोबाजू न्याहाळणारे मन, आसपासच्या खिडक्यांमधील वेगवेगळ्या मनांच्या आंदोलनांचा अदमास घेणारे मन, एक नं दोन... हे सारे टिपून घेत असतानाच समांतर धावणारी माझ्याही मनाची अजब खेळी. शक्य तितके मन कोरे ठेवण्याचा चुकार प्रयत्न आजही हाणून पडलेला दिसल्यावर तो खुळा प्रयास सोडून मी स्वत:ला स्वाधीनच करून टाकलेले. खाली डोकावून पाहत होते तर दुसर्‍या मजल्यावरील दातेकाकूंच्या गॅलरीशेजारील पाइपाला धरून एक छोटेसे पिंपळाचे रोप जीव धरू लागलेले. जेमतेम फूटभर उंचीचे रोपटे. त्यावर चार कोवळी पाने नुकतीच जन्मलेली दिसत होती. लाल तांबूस तपकिरी रंगांची ती नाजूक पानं दिसेल तितके जग किलकिल्या डोळ्यांनी असोशीने पाहत हसत होती. मन तिथेच घुटमळू लागले.... मनाला लगाम घालत नजर हटवली तरी हे हट्टी ते बेटे ऐकतेय थोडेच... पुन्हा त्या कोवळ्या जीवाभोवती रुंजी घालू लागले... अन हे काय...

अरे हो हो... इतक्या घाईने कुठे पळत सुटलेय आता. जरा अंधुक अंदाज येऊ लागलेला. गेल्या मायदेशीच्या फेरीत बसलेली एक जीवघेणी ठेच पुन्हा एकवार वर आलीये. आजचा फेरा ’ राधाक्काच्या ’ परसातल्या पिंपळाच्या पारावर... नक्कीच. तोच दिसतोय, माझा आवडता ’ अश्वत्थ ’. पिंपळाची कोवळी लुसलुशीत फिकट चॉकलेटी रंगाची तकतकणारी पालवी किती वेळ मी निरखत राहायची. नाजूकपणे अल्लाद बोटे फिरवून त्या कोवळिकीला स्वत:त उतरवत राहायची. पारावर बसून लोंबकळते पाय वाहणार्‍या वार्‍यासंगे व डोलणार्‍या पिंपळाच्या पानांसंगे तालात हालवतं जराश्या जून पानांची पिंकाणी करून वाजवण्यात किती किती आनंद होता. हे सगळं कुठेसं हरवून गेलय आजकाल. छोटी छोटी सुखं, संवाद विरत चाललेत.

वाड्याच्या उंचीच्यापेक्षा आणि त्यातल्या माणसांपेक्षाही सर्वार्थाने मोठा प्रेमळ पिंपळ. अपार उत्साहाने सळसळणारा. वार्‍यासंगे डोलणारा, टाळ्या वाजवणारा माझा लाडका पिंपळ. सूर्याची उगवती कोवळी किरणे अंगाखांद्यावर लेऊन पाराशेजारी असलेल्या देवळातल्या भूपाळीसंगे हलकेच झुलणारा. सकाळ चढू लागली की किरणांची मृदुता आग ओकू लागे. मग पिंपळाच्या सळसळीलाही जोर येई. जणू वाड्याला कामाला लावण्याची जबाबदारी स्वखुशीने घेतलेली होती त्याने. दुपार कलली की पोरंटोरं शाळेतून परतू लागत. पहिली धाव पाराकडे. दप्तर फेकून दमलेली लेकरं टेकत. पिंपळाला कोण आनंद होई. शक्य तितके स्वत:ला झुकवत पोरांशी प्रेमळ लगट करी. कधीमधी पोरं उगाच पानं ओरबाडत, खोडाची साल काढत. पोरांचा खोडसाळपणाही आजोबांच्या मायेने कानामागे टाकून देई. पोरं पळाली घरी की वाड्यातल्या आज्या वाती वळत सुखदु:खाचे गूज एकमेकींना सांगत. अगदी मन लावून तो ऐकत राही. ऐकताना निर्विकार, स्थितप्रज्ञाचा आव आणून वाड्यातल्या एकेका घराचा खरा आरसा पाहत राही. कधी गूज आनंदाचे तर कधी अश्रूंची बरसात घेऊन येणारे. या सगळ्या सुना म्हणून वाड्यात आल्या तेव्हांपासून आपल्या अंगाखांद्यावर विसावल्या. यांची सगळी स्थित्यंतर आपण पाहिलीत. पोरींनो, अगं मी आहे बरं भक्कम उभा तुमच्यासाठी. जे आपले नव्हते नं त्यासाठी टिपं गाळूच नका. सुखं दु:खं असं काही नसतंच मुळी. हे भोग आहेत असंही म्हणू नका. जीव कष्टी झाला की इतरांकडे पाहायला शिका. आता हेच पाहा नं, शब्दांना भावना आहेत का? नाहीतच. नुसती अक्षरांची जुळणी केलेली. पण जेव्हां त्यात तुम्ही स्वत:ची सुखदु:ख भरता तेव्हां ते तुमच्या आनंदाने हसतात / तुमच्या दु:खाची ओझी वाहतात. जीव गुंतवूनही निर्विकार राहायला शिका गं माझ्या लेकींनो. माझा योगी पिंपळ लेकींची समजूत काढत असलेला.

दिवेलागण होई. अंगणात धुडगूस घालणारी लेकरं, आज्या, क्वचित सुना, लेकी घरी जात. तिन्हीसांजेची किंचितशी आलेली मलूलता, उदासीनता समईच्या प्रकाशाने उजळून निघे. घाईघाईने कोणीतरी येऊन देवळातली पणती लावून जाई. लेकरांच्या शुभंकरोती, परवाच्यांच्या तालावर वाड्याचा आत्मा डोलू लागे. कामावर गेलेले बाबाही नुकतेच परतू लागलेले असत. घराघरातून चुली धूर ओकू लागत. सुग्रास ऊन ऊन अन्नाचा दरवळ आसमंत भरू लागे. पणतीच्या मंद सोबतीने पिंपळही काहीसा शांत होई. दिवसभराच्या सळसळीने किंचित दमलेला पिंपळ त्याच्या लेकरांच्या घराघरातील सौख्याचा हलकेच अदमास घेऊ लागे. चुलीशेजारी दिसणारा लालबुंद रसरसलेला मायाळू भाव साठवून घेई. मायेच्या प्रेमाची उतरलेली चव चाखून तृप्त होणारी पोटं, ढेकरांचे पावती देणारे आवाज कानावर येत. चुलीवर पाणी पडे, पोतेरे चढे. निरवानिरव झाली की अंथरुणे पडत. हळूहळू रात्र गडद होऊ लागे. आपापल्या वाट्याच्या श्रमाने दमलेली पोरं, आया, बाबा, आज्या, आजोबा आजच्या दिवसाची सांगता करू लागलेली. त्यांच्यासंगे वाडाही डोळ्यात नीज भरू लागे. निरव शांतता. गाढ झोपेत डोळ्यांत स्वप्न भरू पाहणार्‍या मनांचे एका लयीतले श्वास खोल्यांखोल्यांतून ऐकू येऊ लागत. त्यांना स्वप्नांच्या आंदोलनावर अलवार झुलवत ठेवून पारावर विसावलेल्या कुत्र्यांना कुशीत घेऊन पिंपळही वरकरणी स्तब्ध होई. मन मात्र टक्क जागे... आठवणींची जपमाळ ओढू लागे.

आजही पुन्हा एकदा पिंकाणी करून आईसंगे ’ राधाक्काच्या ’ आठवणींची पोतडी उघडावी म्हणून धाव घेतली होती पण हे काय... पार तर जाऊदे पण पिंपळही दिसेना. डोळे बंद करून पाहतेय की काय मी. काहीतरीच गं. बंद नाही... डोळे फाडून फाडून पाहतेय पण एकही ओळखीची खूण दिसेना. जणू आख्खा वाडाच हरवलाय. ओह्ह्ह... ही टोलेजंग इमारत वाड्याच्याच जागी उभी आहे. अरे बापरे! हे कधी घडले? तरीच आई सारखी म्हणत होती, " तू नको बरं हट्ट करूस क्षेमकल्याणी वाड्यात जाऊ " चा. फार जीव कष्टी होईल तुझा. तू ओढीने मारे निघालीस बालपणीचे लोभस, निखळ आनंदाचे क्षण पुन्हा एकदा जगायला. पण तिथे आता संपूर्ण अनोळखी जग उभे आहे.  मी कुठली ऐकायला. आईला ओढत घेऊनच गेलेले. माझ्या बालपणाच्या खुणा मिरवणारा माझा प्रेमळ पिंपळ जमीनदोस्त झालेला. जणू तो कधीही तिथे नव्हताच. प्रगतीच्या सगळ्या भौतिक सुखसोयी पुरेपूर लेऊन उभी असलेली इमारत माझ्या पिंपळाचा अन वाड्याचा आत्माच गिळून निर्विकार तटस्थ उभी होती.

हे इतकं अनपेक्षित होतं माझ्यासाठी. सहनच होईना. माझ्याबरोबर अनेक मने आजूबाजूला कष्टी होऊन बसलेली दिसू लागली. जीव गुदमरला. राधाक्काच्या आठवणींच्या पोतडीत अजून एक भर... मन माघारी पळू लागलेले. काहीही उरलेले नाही तुझे आता इथे. राधाक्का गेली, वाडा पाडला, पिंपळही उखडला. आता पुन्हा असा हट्ट धरु नको बरं... असं म्हणत पाऊल उचलले तोच अजूनही जेमतेम तग धरुन असलेल्या, जागांच्या गगनाला भिडलेल्या भावानुसार स्वत:ला आक्रसून घेतलेल्या देवळाच्या मागल्या भिंतीतून त्या सिमेंटच्या आत्माहीन जंगलात एक नाजुकसे पिंपळाचे इवलेसे रोपटे जिद्द धरुन डोकावत होते. जणू माझ्या पिंपळाचा आत्मा घेऊन आलेले भासले. वाटले माझी तगमग त्याला कळलेलीच. म्हणूनच मला आश्वस्त करायलाच जणू इवलाली पाच सहा कोवळी पाने हसत होती. बयो, मी आहेच बरं. इथेच आहे. नको उगा राग धरूस. शेवटी ही ही आपलीच माणसे गं! इतके शिकवले तुला, विसरलीस का? भावनांचे, प्रेमाचे, गुंतल्या जीवाचे ओझे वाहू नकोस. माझ्यासारखी सगळ्यात असूनही नसल्यासारखी राहा बयो! असून नसल्यासारखी राहा! रुजत राहा अन रुजवत राहा!