जाता जाता एक नजर इथेही........

Monday, September 28, 2009

मनापासून मनापर्यंत......

ना ओळख ना कधी पाहिलेले तरीही अनेकदा समोरच्याच्या मनाशी संवाद साधता येतो. तुम्ही म्हणाल हे तर सगळ्यांनाच साधते. बरोबर पण बरेचदा आपण किंवा समोरचा मूक संवाद करतो आणि तोही अगदी नेमका. अन मग आश्चर्य वाटत राहते. जणू काही हा माझे मनच वाचतोय की काय असा संभ्रम निर्माण होतो. हे असे संवाद वेळ-काळ, वय, देश, स्थळ, प्रवृत्तीतील भेद, धर्म, वंश-रंग सगळ्यांच्या परे आहेत. एकवेळ व्यक्त संवादात यातील काही गोष्टींचा आपल्याला नको असला तरी परिणाम होतोच. कुठे मन साशंक होते तर कधी आडदांड देह पाहून कचरते-अगदी उगाचच. तर कधी वाटते नकोच यांच्या फंदात पडायला..... मात्र मूक संवादांचे तसे नसते. ते इतक्या चटकन अन अनपेक्षित घडतात अन नेमके दुसऱ्याच्या मनापर्यंत जाऊन पोचतात.

आमच्या जुन्या गावी एके दिवशी संध्याकाळी लेक व नवरा दोघेही आपण ऑलिव्ह गार्डन मध्ये जेवायला जायचे का आज असे म्हणू लागले. मी नुकतीच ऑफिसमधून आले होते. जेवण खरे तर तयार होते. फक्त पोळ्या करायच्या की जेवायला बसायचे. काहीतरी ऑफिसमध्ये कटकट झालेली त्यामुळे माझा मूड गेलेला होता.
ऑलिव्ह गार्डन हे या दोघांचे एकदम आवडते ठिकाण. तसे मलाही तिथल्या गार्लिक ब्रेडस्टीक्स, आल्फ्रेडो सॉस व सॅलड आवडते. पण बेसिकली मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने अगदी तीन-चारच पदार्थातून मला काहीतरी घ्यावे लागते. त्यात माझा मूड गेलेला असला ना की मग त्या न्यूडल्स म्हणजे मला वळवळणाऱ्या गांडुळांसारखी वाटू लागतात. सॅलडला कधीही घासपूस न म्हणणारी मी काय ते गवत खायचे असे म्हणू लागते. एरवी मला न्यूडल्स-सॅलड आवडतात. त्यातून दोनवेळा व्हेज डिश आहे असे म्हणून शिंपल्यांचा सॉस व हॅमचा बारीक भुगा असे प्रकार घडल्यामुळे माझा वैतागात भर पडलेली. वरकरणी काही न दाखवत मी बापलेकांना तुम्ही दोघेच जा ना प्लीज आणि माझ्यासाठी सॅलड घेऊन या तोवर मी जरा कामे आवरते पुन्हा सकाळी साडेसातला निघायचे ना असे हसून म्हणत पटवायचा प्रयत्न केला. पण आज लेक अगदी हटूनच बसला होता. त्याने हाताला धरून गाडीत बसवले. नवरा खूश. एरवी मी त्याला ऐकले नसते पण लेकापुढे नाईलाज झाला होता.

ऑलिव्ह गार्डन मध्ये पोचलो. मधलाच दिवस त्यात आठ वाजून गेलेले त्यामुळे जरा गर्दीचा भर ओसरला होता. पटकन जागाही मिळाली. या दोघांनी मुद्दामहून मला छळायलाच इथे आणलेय असे मला सारखे वाटत होते त्यामुळे मी अजिबात बोलत नव्हते की हसत नव्हते. चेहरा एकदम ताणलेला आणि हुप्प करून बसले. यांचे आवडते पदार्थ आले, बरोबर सॅलड- माझ्यासाठी. उगाच चिवडल्यासारखे करत मी बसून होते. लेक अगदी उत्साहाने त्याच्या बॉक्सिंगच्या वार्म अप व प्रॅक्टिसच्या स्टोरीज सांगत होता. एरवी मला इतके आवडले असते ऐकायला. मी सतत त्याच्या मागे असते दिवसभरात काय काय केलेस ते सांग म्हणून. आणि आत्ता तो सांगत होता तर मी मन बंद करून घेतले होते.

असे असले तरी आपल्या आजूबाजूला काय घडतेय हे नकळत आपण टिपत असतोच. येतानांच मी पाहिले होते, आमच्या पुढच्या टेबलवर एक मोठी अमेरिकन फॅमिली बसली होती. तीन मुले, आई-वडील, आजी व आजोबा. त्यांच्या एका मुलीचा वाढदिवस होता म्हणून ही सगळी मंडळी आली होती. त्यांच्या जोरदार गप्पा, धमाल सुरू होती. मध्येच एकदा आजोबांनी मागे वळून माझ्या लेकाचे बॉक्सिंगचे वार्म अप ऐकून काही प्रश्नही विचारले होते वर चल आपण दोघे कुस्ती खेळूयात असे म्हणून आव्हानही दिले. एकदोनदा त्या मुलांच्या आईची व माझी नजरानजर झाली. ती हसली मीही हसल्यासारखे केले खरे पण चिडचिडीमुळे हसू चेहऱ्यावर उमटले नव्हतेच त्यामुळे ते तिच्यापर्यंत पोचणे शक्यच नव्हते.

एकदाचे या दोघांचे खाऊन संपले मग माझा अंत पाहून बील आले ते पे करून आम्ही निघालो. आमच्या मागोमागच ही अमेरिकन फॅमिलीही बाहेर आली. आमच्या दोघांच्याही गाड्या शेजारी शेजारीच होत्या. बरोबरच चालल्यासारखे आम्ही सगळे गाड्यांच्या दिशेने निघालो. डोळ्याच्या कोपऱ्यातून मला जाणवले की मुलींची आई माझ्याकडेच पाहतेय. पण मी लक्ष दिले नाही. ती कशाला पाहील माझ्याकडे हाही विचार होताच मनात. गाडीपाशी पोचले आणि दार उघडताना का कोण जाणे तिच्याकडे पाहिले आणि काय सांगू, जणू दबा धरून बसल्यासारखी मी कधी तिच्याकडे पाहतेय याची ती वाटच पाहत होती. तिच्या नजरेशी नजर भिडताच तिने टम्म फुगलेल्या पुरीसारखे गाल फुगवले आणि दोन्ही हात कमरेवर घेऊन दोन्ही पाय जोरात आपटले. तिचा तो आविर्भाव पाहिला आणि इतका वेळ धरून ठेवलेला माझ्या रागाचा फुगा फुटला आणि मी जोरात हसू लागले
. तशी ती माझ्यापाशी आली व मला मिठी मारली. माझ्या पाठीवर थोपटले व हात हालवून बाय करत निघूनही गेली. नवरा व लेकही जोरात हसत होतेच शिवाय तिच्या गाडीतलेही सगळे हसत होते.

प्रत्यक्ष एका शब्दाचाही संवाद न घडता हा किती मस्त किस्सा घडला.


असेच एकदा आम्ही नेहमीप्रमाणे वॉलमार्टात नेहमीच्या भाजीपाला-दूध वगैरेसाठी गेलो होतो. थंडीची चाहूल लागलेली होती. फॉलची जॅकेट्स ज्याच्या त्याच्या अंगावर चढवलेली. खोगिरे चढवायला सुरवात झाली ह्या कल्पनेनेही अर्धी अधिक मंडळी वैतागलेली. खरेदी झाली, नवऱ्याचे ओरडून झाले- अरे हे काय बागेत फिरताय काय, आवरा पटापट. रांगेत उभे राहून बील देऊन झाले. कार्ट ढकलत दारापाशी आलो. तिथेच थांबून जॅकेट घालत होते तोच माझ्या पुढ्यात मोठ्ठा किल्ल्यांचा जुडगा पडला. चांगल्या सात-आठ किल्ल्या होत्या शिवाय मोठी किचेन. कोणाची आहे म्हणून मान वर केली तर पुढ्यात एक भरभक्कम सहा फूट चार-सहा इंच उंच साडेतीनशे पाउंडाची गोरी अमेरिकन उभी होती. आता या इतक्या मोठ्या देहाला खाली वाकून जमिनीवर पडलेला जुडगा उचलणे शक्यच नव्हते. शिवाय नेहमीच्या मदत करण्याच्या सवयीप्रमाणे पटकन मी वाकून तिला उचलून देणार( म्हणजे हे विचार माझ्या मनात आले की तिला उचलून द्यावे ) तोच तिने माझे विचार वाचल्यासारखे हाताने नो नो असे सांगत मला थांबवले. आम्ही दोघीही दारात उभ्या. तिच्या देहापुढे मी म्हणजे तिनका. मध्ये किल्ली. मागे बरीच गर्दी जमली. सगळे पाहत होते आता पडलेली किल्ली हा अगडबंब देह कसा उचलणार.

पिन ड्रॉप सायलेन्स झाला. एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. फोटो काढणे मला शक्य नव्हते -वाईट दिसले असते म्हणून मी काढला नाही. असता तर इथे टाकला असता. मागे दोघाचौघांनी सेल क्लिक केलेले पाहिले मी. ती शांतपणे दहा पावले मागे गेली. ओणवी होत होत हळूहळू बरोबर किल्लीवर आडवी झाली. दातात किल्ली धरून उचलली, पुन्हा हळूहळू तोल सावरत ओणवी होत होत उभी राहिली. तिला जमिनीवर संपूर्ण आडवे होणे शक्यच नव्हते. त्यामुळे ही इतकी चमत्कारिक कसरत तिने केलेली. पण आपला देह इतका मोठ्ठा आहे म्हणून इतरांनी मदत करावी ही अपेक्षा नाही की आजूबाजूला इतके लोक उभे राहून गंमत पाहत आहेत याची फिकीर नाही. माझ्या हातातून किल्ली पडली तेव्हा ती मीच उचलली पाहिजे हा साधा सरळ दृष्टिकोन. मला किल्ली खळखळवत दाखवली व हसून टाटा करून ती गेलीसुद्धा. खरेच सांगते, तिने जेव्हां मला किल्ली हालवून दाखवली ना तेव्हा माझ्या पोटात मोठ्ठा गोळा आला होता, न जाणो पुन्हा तिच्या हातून ती सटकायची अन पुन्हा एकदा ही जमिनीवर आडवी.........


एकदा दुपारची मी ग्रोसरी करायला गेले होते. बऱ्यापैकी शांतता होती. माझी खरेदी आटोपली तसे बिलाच्या रांगेत उभी राहिले. पुढचीचे आटपत आलेच होते. सामान पट्ट्यावर ठेवत असताना मागे पाहिले तर एक ऐशींपंच्च्याऐंशींच्या जरा पुढचीच कमरेत जराशी वाकलेली आजी हातात फक्त एक स्वेटर घेऊन उभी होती. मी माझ्या भरलेल्या कार्टकडे नजर टाकली, अन मनात आले की कमीतकमी वीस मिनिटे नक्की जातील या सगळ्या वस्तूंचे बिल होऊन पैसे देऊन पुढे सरकायला. तोवर एका वस्तू साठी या इतक्या वयस्कर आजीला कशाला थांबवायचे म्हणून मी तिच्याकडे पाहिले मात्र, जणू हे माझ्या मनातले विचार वाचल्यासारखे तिने खुणावले, अग तुझे आरामात होऊ दे. मी मजेत आहे. तरीही मी पुन्हा प्रयत्न करीत माझी कार्ट बाजूला घेत तिला हाता नेच पुढे जा असे खुणावले पण हसून तिने नकारार्थी मान हालवीत, डोंट यू वरी डियर मी ठीक आहे असे पुन्हा खुणावले. मग मात्र मी हसून इशाऱ्यानेच ओके म्हणत सामान ठेवायला सुरवात केली.

खरे तर लिमिटेड आयटम्स च्या रांगा ओस पडल्या होत्या. ती सहज तिथे जाऊ शकत होती. पण बहुतेक आजीबाई एकटीच असावी. एका वस्तूसाठी ती आली होती कारण ती वस्तू तिला अर्जंटली हवी म्हणून नव्हे तर त्या निमित्ताने थोडा वेळ आनंदात जाईल. चार माणसे दिसतील, त्यातील काही हसतील, बोलतील. तेवढेच दोन घटका जिवंत असल्यासारखे वाटेल. आजूबाजूच्या लोकांची लगबग, चैतन्य, वातावरणातील उल्हास ती शोषून घेत होती तिच्या उर्वरित दिवसाच्या एकलेपणावर मात करण्यासाठी. हे जाणवले आणि एकदम गलबलून आले. या भयावह वास्तवाचे चटके होरपळून काढणारे आहेत. आज हा एकलेपणा वयातीत राहिलेला नाही. कुठल्याही वयातील मग तरुण असो वा मध्यमवयीन का वयस्कर, सगळ्यांनाच छळतोय. असे अनेक लोक अनेक प्रकारे मूक संवाद साधत यावर मात करत आनंद गोळा करताना आजूबाजूला रेंगाळताना दिसतात. मनापासून मनापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे रस्ते अन नेमका भाव पोचवणारे मूक संवाद
.

10 comments:

 1. "टम्म फुगलेल्या पुरीसारखे गाल फुगवले आणि दोन्ही हात कमरेवर घेऊन दोन्ही पाय जोरात आपटले. " हा हा ... आवडले जाम मला हे वाक्य.

  बाकी एक-सो-एक प्रसंग आहेत. क्षणासाठी घडून जातात पण कायमचे लक्ष्यात राहतात... :)

  ReplyDelete
 2. हाहाहा.... रोहन, आज लिहीतानाही मी हसतच होते. काय अविर्भाव होता रे, एकदम जबरी.:)

  ReplyDelete
 3. मस्तच आहेत अनुभव...आम्हाला दोघांनाही ऑलिव्ह गार्डन आवडते आणि मुख्य म्हणजे त्या एकाच ठिकाणी माझा नवरा फ़क्त सुप-सॅलड (आणि अर्थातच ब्रेड स्टीक्स) जेवायला तयार असतो. अर्थात आम्ही दोघं मांसाहारी असल्यामुळे मेन्युमध्ये बरेच पर्याय आहेत ...

  ReplyDelete
 4. मस्त लिहीले आहेस.....पण एक सांगू का तुला हे असे छोटे छोटे प्रसंग सगळीकडेच घडतात ...ते ज्याच्या नजरेला दिसतात आणि त्यतलं काव्य ज्याला समजतं तो खरा चिरतरूण.....तु तशीच आहेस.....

  ReplyDelete
 5. खराय तुझे म्हणे...एकटेपणा कदिहि कोणत्या होई वयात येऊ शकतोय...आणि मग त्यावर मात करण्याकरिता तो ईतर ठिकाणी मन रमावण्याचा प्रयत्न करतो...त्या आजी बाई प्रमाणे..
  .वर दिलेले सर्वे प्रसंग अगदी मजेदार आहेत आणि ते तू छान सादर ही केलेस...

  ReplyDelete
 6. टम्म फुगलेल्या पुरी सारखे गाल.. मस्त उपमा दिली आहे . खाण्याच्या वस्तुची आहे, म्हणुन रोहनला जास्त आवडली असावी. ( खोटं कशाला सांगु, मला पण आवडली :) )
  कांही प्रसंग कायमचे लक्षात रहातात.
  एक वेगळेपणा लक्षात आला, त्या बाईला अगदी सुरुवातीपासुन तुझा संताप लक्षात आला होता, आणि ती फक्त वाट पहात होती, तुला सांगायची.. कधी आणि केंव्हा तेच फक्त ठरायचं असावं. चान्स मिळाला, आणि तिने मारला सिक्सर...आपल्याकडे सरळ दुर्लक्ष करुन चालली गेली असती एखादी बाई, मला काय करायचं म्हणुन.. खरं की नाही?

  ReplyDelete
 7. " असे अनेक लोक अनेक प्रकारे मूक संवाद साधत यावर मात करत आनंद गोळा करताना आजूबाजूला रेंगाळताना दिसतात. "

  ‘काय’ गोळा करायचे समजले की जगणे अवघड नाही.. बरेचजण ‘कसे’ गोळा करायचे यात अडकुन राहुन मिळालेले गमावतात…

  काही गोष्टी मानण्यावर असतात तर काही गोष्टी माळण्यावर असतात! काही फुले ओंजळीत सुकुन जातात तर काही आयुष्यभर सुगंधात उरून राहतात!

  ReplyDelete
 8. अपर्णा,प्रतिक्रियेबद्दल आभार.
  तन्वी...अगंSSS,:).धन्यवाद.
  गणेश,आनंद वाटला तुझी प्रतिक्रिया आली.:)
  महेंद्र,हो ना. तिला मनापासून माझा मूड हसरा करायचा होता.शेवटी तिची इच्छाशक्ती जिंकलीच.:)
  निलेश, खरे आहे तुझे म्हणणे. अशीही माणसे आपण पाहतोच ना, ज्यांच्याकडे सगळे असते तरिही ती कधीही सुखी-आनंदी नसतात.सदैव दुर्मूखलेली.
  आभार.

  ReplyDelete
 9. manapasun... he manapasun lihile aahes. As usual

  ReplyDelete
 10. मधुमती खूपच मस्त वाटले तुला पाहून.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !