जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 31, 2011

कोबीच्या वड्या

मुळा, कोबी, फ्लॉवर, नवलकोल सारख्या उग्र वासाच्या भाज्या बरेच जण नाखुशीने खातात. कोबीची किंचित करपवलेली, चण्याची डाळ भिजवून घातलेली भाजी कढईतून डायरेक्ट पानात वाढायची व सोबत तुपाचे बोट लावलेले गरमगरम फुलके, सुंदरच लागते. मात्र थंड झाली की जरा कंटाळवाणी होते खरी. पुन्हा गरम करून खातांनाही त्याची मूळ चव बदलतेच. मग नकोशीच होते. कोबी हा बारा महीने व मुबलक मिळतो. त्यात भरपूर ' क ' जीवनसत्त्वं तसंच ' अ ' जीवनसत्त्वं , लोह आणि कॅल्शिअम असतं. करायला सोपी व चटकन होणारी भाजी असल्याने बर्‍याच घरात आठवड्यात एकदा तरी केली जातेच. कधी चण्याची भिजवलेली डाळ घालून तर कधी बटाटा घालून. कोरडी भाजी असल्याने डब्यासाठी सोयीची होते पण थंड खावी लागल्याने ढकलावी लागते. कोबीमध्ये मिळणारी जीवनसत्त्वे पाहता तो खायला हवा. मग कधीतरी छानश्या वड्या करून खाव्या. कोबीच्या भाजीला नाके मुरडणारेही अतिशय आवडीने वड्या खातात. करायलाही सोप्याच आहेत फक्त भाजीइतक्या झटपट होत नाहीत हेही खरेच. किंचितशी योजकता दाखवली तर अगदी संध्याकाळी कामावरून आल्यावरही होऊ शकतात. रोजच्या पोळीभाजीला फाटा देऊन कोबीच्या वड्या, सूप व पुलाव असा सुटसुटीत मेन्यू एखाद्या पावसाळी संध्याकाळची खुमारी नक्कीच वाढवेल.

वाढणी : तीन माणसांकरिता

साहित्य :


तीन वाट्या किसलेला कोबी
एक वाटी बारीक चिरलेला कांदा
सव्वा वाटी भिजवलेली चण्याची डाळ
दोन टेबलस्पून डाळीचे पीठ
दोन टेबलस्पून तांदुळाचे पीठ
अर्धी वाटी ब्रेडचा चुरा
सहासात ओल्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
दोन चमचे तिखट, एक चमचा जिरेपूड, दीड चमचा धणेपूड, एक चमचा गरम मसाला, हिंग, हळद
दोन चमचे तीळ, एक चमचा साखर व स्वादानुसार मीठ
पाच ते सहा चमचे तेल ( शॅलोफ्रायसाठी )
कृती :
करकरीत ताजा कोबी किसून घ्यावा. कांदा बारीक चिरावा. ओल्या मिरच्या व भिजवलेली चण्याची डाळ वाटून घ्यावी. खोलगट भांड्यात किसलेला कोबी, कांदा, वाटलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, लिंबाचा रस, तांदुळाचे व चण्याच्या डाळीचे पीठ, ब्रेडचा चुरा, हळद, हिंग, तिखट, धणेजिरेपूड, गरम मसाला, तीळ, साखर व मीठ घेऊन एकजीव करावे. पाण्याचा एकही थेंब घालू नये. गरज पडतच नाही. शक्य तितके घट्ट भिजवण्याचा प्रयत्न करावा.

कुकरच्या भांड्यात भिजवलेले पीठ घट्ट असल्यास मुटके करून किंवा सैल झाल्यास पसरून घालावे व इडली किंवा मोदकासाठी जसे वाफवतो ( शिट्टी न लावता ) तसेच वाफवून घ्यावे. मध्यम मोठ्या आचेवर साधारण पंधरा मिनिटात होतात.जरा निवले की सारख्या आकाराच्या वड्या पाडून पसरट तव्यावर तेल सोडून शॉलोफ्राय कराव्यात. चटणी, सॉस बरोबर गरमगरम वाढाव्यात.टीपा :


भिजवलेला गोळा सैल वाटल्यास एखाद दोन ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून काढून घालावेत. ब्रेडच्या चुर्‍यामुळे वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते.
शक्यतो कोबी घट्ट व करकरीत असावा. कोबीची बाहेरील पाने अलगद सोडवून घेऊन त्यात भिजवलेला गोळा गुंडाळून वाफवल्यास कोबीच्या पानांचा वास लागतो. मी तशा पद्धतीने वाफवून घेतल्यात. परंतु नुसत्या वाफवून घेतल्यास फारसा फरक पडत नाही म्हणून कृतीमध्ये तसेच लिहिले आहे.
उकडलेला गोळा ओलसर असल्यामुळे वड्या नीट कापल्या न गेल्यास तळहातावर घेऊन त्यांना आकार द्यावा.
तीळ थोडे जास्ती घातले तर छान लागतात. हिरव्या मिरच्या सगळ्यांना झेपतील त्या प्रमाणात घालाव्यात.
लसूण व आलंही घालूनही कोबीच्या वड्या करता येतात व त्याही छानच लागतात.
चण्याची डाळ भिजवून घालावयाची नसेल किंवा तितका पुरेसा वेळ नसेल तर डाळीचे पीठ पाच ते सहा चमचे घ्यावे. तांदुळासोबत ज्वारीचेही पीठ असल्यास घालता येईल. ते दोन चमचे घालावे.


Thursday, July 28, 2011

रव्याचा केक

केक किंवा चॉकलेटमधले अंडे मला चालत असले तरी काही वेळा केक किंवा मफीन मधे अंड्याचा वास इतका प्रबळ असतो की आवडीने खाता येत नाही. बऱ्याच शाकाहारी लोकांना केक व तत्सम पदार्थामधले अंडे बिलकुल चालत नसल्याने खाता येत नाहीत. कधीकधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात. मग आग्रहाने जेवायला किंवा निदान पोटभरीचे चटकमटक असा बेत केला जातो. आयत्यावेळी ठरवल्याने एक तर शिरा किंवा खीर हेच पदार्थ गोडासाठी समोर येतात. शिरा नेहमीचाच असल्याने नको वाटतो आणि खीर ( शेवयांची - नेमक्या त्या संपलेल्या असतात ) किंवा पाहुण्यांपैकी एखाद्याला खीर हा प्रकारच आवडत नसतो. अशावेळी सगळ्यांना आवडेल असा व अतिशय हलका रव्याचा केक बेताचा चौथा कोपरा पुरा करतो. आंब्याचा मोसम असेल तर रव्याचा केक अजूनच अप्रतिम चव घेतो.

रवा केक ( अंडरहित )

साहित्य :

१ सपाट वाटी मध्यम रवा
१ सपाट वाटी साखर
सव्वा वाटी दही
काजू, बदामाचे काप, बेदाणे, इत्यादी आवडीनुसार ( सगळे मिळून दोन चमच्यापेक्षा जास्त घालू नये )
१ सपाट चहाचा चमचा वेलची पावडर
७/८ काड्या केशर (मिसळण्याआधी १५ मिनिटे चमचाभर दुधात भिजत घालून खलून घ्यावे.)
अर्धा चमचा खायचा सोडा
पाऊण चमचा तूप

कृती :

एका पातेल्यात रवा घ्यावा. त्यात साखर आणि दही मिसळावे. मिश्रण चांगले ढवळून ठेवावे. सुमारे अर्धा तास. तेव्हढ्या वेळात रवा चांगला उमलतो. हे मिश्रण साधारण श्रीखंडाइतपत घट्ट-सैल असायला हवे. त्याचा घट्ट-सैलपण मुख्यत: रव्यावर अवलंबून असतो. रवा जरा जास्त जाड असला तर मिश्रण घट्ट होऊ शकते. घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही. मिश्रण बहुधा सैल होतच नाही. दहीच पातळ असेल तर मिश्रण पातळ होऊ शकते. मग अशा वेळी पुन्हा थोडा रवाच घालावा लागतो. आणि उमलू द्यावा लागतो. मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि खललेले केशर घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यात खायचा सोडा घालावा आणि ५ मिनिटे ठेवावे. त्या ५ मिनिटात फ्राय पॅन तयार करून घ्यावे. फ्राय पॅनला तूप लावावे. हलक्या हाताने मिश्रण ढवळून संपूर्ण मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. (आवड असल्यास केकमध्ये सुकी फळे घालावी. त्यामुळे मूळ चव बदलत नाही पण दिसायला चांगले दिसते. )

गॅसवर लहान लोखंडी तवा ठेवावा. (डब्याचे झाकण किंवा तत्सम काहीही चालेल.) त्याच्यावर फ्राय पॅन ठेवावे. म्हणजे गॅसची आच फ्राय पॅनला कमी प्रमाणात आणि सगळीकडे सारखी लागेल आणि केक करपणार नाही. साधारण १५ मिनिटांत केक तयार होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. गॅसच्या शेगड्या आणि त्यांचे बर्नर लहान-मोठे असतात. अर्थात त्यांची आचही कमी-अधिक असते. त्यामुळे वेळेचा अंदाज प्रत्येकाला वेगळा घ्यायला हवा. फ्राय पॅनपेक्षा मोठ्या आकाराचे ताट त्याच्यावर उपडे घालून नंतर फ्राय पॅन त्यावर उपडे करावे म्हणजे केक अलगद निघून येईल. त्याची पहिली वाफ निघून जाईपर्यंत तो तसाच राहू द्यावा.

केकच्या चौकोनी किंवा आपल्याला पाहिजे असतील त्या आकाराच्या वड्या कापाव्या. समजा आपल्याला त्यावर काही नक्षी काढायची असेल किंवा कुणाचे नाव लिहायचे असेल तर केक पूर्ण गार होऊ द्यावा आणि नंतर नक्षी काढावी/ नाव लिहावे.
टीपा :

आंब्याचा रस घालायचा झाल्यास दही अर्धा भाग व आंब्याचा घट्ट रस अर्धा भाग असे घालावे. केक लगेचच खाऊन संपणार असेल तर आंब्याचे तुकडेही घालावेत. अप्रतिम लागतात!

केक थोडासा खरपुसच होऊ द्यावा. मात्र आचेकडे लक्ष द्यावे, पट्कन लागू शकतो. जर चुकून करपलाच तर तळाचा भाग अलगद कापून काढावा. केक करपला तरी वरच्या भागाला करपल्याचा वास लागत नसल्याने संपूर्ण केक फुकट जात नाही.
हा केक गरमगरम खायला फार चांगला लागतो किंवा गारही चांगला लागतो. केक ५/६ दिवस टिकावा म्हणून फ्रीजमध्येच ठेवावा. पण फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार मात्र खायला चांगला लागत नाही. म्हणून फ्रीजमधला केक किंचित ( अगदी किंचितच )पाणी शिंपडून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खावा. अगदी ताज्या इतकाच चांगला लागतो.( माझा हात केशराला जरा जास्तच सैल असल्याने थोडे जास्त घातले आहे. हा जो सोनसळी रंग दिसतोय तो त्याच्यामुळेच आला. वर लिहील्याप्रमाणे घातल्यास जरासा फिकट रंग येईल इतकाच काय तो फरक. )

Friday, July 22, 2011

वारली - एक शाश्वतकला

आपल्या भारतात अनेकविध पारंपरिक कला आढळून येतात. अगदी रोज दारी काढल्या जाणार्‍या रांगोळीपासून कलात्मकता व योजना दिसून येते. शिवाय परगणे, प्रांत, शहरे, राज्ये बदलत जातील तसतसा या कलांवरचा प्रभावही बदलत जातो. परंतु या पूर्वापार चालत आलेल्या कला दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहेत. सिंधुसंस्कृती, मोहंजदडो मध्ये मातीच्या भांड्यावर, मडक्यांवर काळपट रंगाने रंगवलेली चित्रे असोत, किंवा पूर्वापार सुरू असलेली बाटिक व लाकडी ठसे वापरून कापडांवर त्यांचे छाप उठवून तयार केलेली राजदरबारी आढळणारी जाजमे वगैरे कलांचा, र्‍हास झालेला आढळतो. त्यामानाने सावंतवाडीची लाकडी खेळणी, सौराष्ट्रामधले कशिदा काम - कच्छी वर्क, निरनिराळे मणी, मोती वापरून केलेली तोरणे, दागिने, हैदराबादचे मीनाकाम, बांगड्या, बिद्रीवर्क, राजस्थानी मांडणा इत्यादी अजूनही तग धरून आहेत. स्क्रीन प्रिटींगने सारा बाजार ताब्यात घेतला असला तरीही बांधणी कापडे व साड्याही आपला जम बसवून आहेत. मधुबनी, तंजावर शैलीही आपले अस्तित्व व स्थान टिकवून आहेत.

या सगळ्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव टिकवून आहे ती महाराष्ट्रातील ' वारली जमातीने ' गेली ११०० वर्षे जपलेली आपली कला. वारली ही महाराष्ट्रातील आदिम जमात. श्री. भास्कर कुलकर्णी यांनी या साध्या, सुंदर, रेखीव केलेतील कलागुण हेरून ही कला समाजापुढे आणण्याचा अनन्य ध्यास घेतला. वारली कला ही स्वतंत्र असून अतिशय संयमाने रेखाटावी लागते. तेव्हा कुठे हा रेखीव व सुंदर आविष्कार जन्म घेतो. वारलींच्या मूलभूत गरजाच अतिशय कमी. जीवनाप्रती, जगण्याप्रती असलेला त्यांचा सरळ दृष्टिकोन त्यांच्या कलेतून पुरेपूर डोकावतो. ' वारली ' ही एक धर्म, प्रथा, श्रद्धा अश्या पारंपरिक गोष्टीत गुंफलेली कला. निरीक्षण, चिंतन व त्यानुसार आकलन होऊन केलेल्या प्रत्यक्ष कृतींचे प्रभावी एकत्रीकरण यांच्या आधारे कला आकार घेते.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी जेव्हां निसर्गातील गोष्टींचा, वस्तूंचाच वापर करून निसर्गाइतकीच निखळ, मोकळी भावपूर्ण चित्रे काढतात तेव्हा त्यातली निर्मळता जाणवल्याशिवाय राहत नाही. ' वारलं ' म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ' वारली ' शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग आहे. वारली चे चित्र काढताना सोपे आकार व पांढर्‍या रंगाचा आकर्षक व कल्पक वापर केलेला दिसतो. केवळ त्रिकोण, वर्तुळं, चौकोन, बिंदू, रेघा सारख्या बेसिक आकारांमधून अतिशय सहजसुंदर चित्रांचा होणारा जन्म. वारली लोकं अतिशय साधेपणाने व आनंदी वृत्तीने जगणारे असून त्यांची कलाही तितकीच साधी व आनंद देणारी. सुसंगत मांडणीतून समोर येणारे या कलासक्त समाजाचे चित्ररुपच.

वारली पाड्यात प्रत्येक घराच्या भिंतीवर आतून व बाहेरून चित्रे काढलेली दिसून येतात. शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर त्यांच्या जीवनाचे, सणांचे, देवदेवता, निसर्ग, चालीरीतींचे प्रतिबिंब मुक्तपणे चित्रित केलेले आढळते. होळी, दिवाळी, लग्ने, रोजच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी - अगदी सकाळी उठल्यापासूनच्या रोज घडणार्‍या घडामोडींची चित्रे दिसतात. पिकाची कापणी, मासेमारी, जत्रा, नृत्ये यांना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चित्रातून तेच व्यक्त केले जाते. पिकाची कापणी झाल्यावर आनंद व्यक्त करताना ' तारपा नृत्य ' केले जाते. सापा-नागाच्या वेटोळ्यासारखे दिसणारे हे नृत्य प्रसंगी आठदहा माणसांचे किंवा अगदी शंभरसव्वाशे जणांना घेऊन केले जाते. मध्यभागी तारपावादक असतो तो तारपा वाद्य वाजवत असतो. ' तारपा ' बांबूची किंवा माडाची पोकळ नळी, माडाची-ताडाची पाती, सुकलेला दुधीभोपळा, मेण व बांबूच्या चिपटीला छेद देऊन केलेल्या जिव्हाळीचा वापर करून बनवले जाते. तुतारीपेक्षा कमी बाक असलेले तारपा वाद्य देखणे आहे. उंबराचा चीक/मेण वापरून बांधणी केली जाते. दोन नळ्यांच्या मध्ये बारीकशी देवनळी असते. हे वाद्य तयार करणे व वाजवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. वाद्य वाजवताना अगदी नाभीपासून हवा भरावी लागते. जराही श्वासावरचे नियंत्रण सुटता नये. तेव्हा कुठे सुरेल सुरावट घरंगळते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत चालणार्‍या तारपा नृत्याचा प्रमुख तारपावादक असतो.

लग्न ठरले की प्रथम देवाच्या नावाने भिंतीवर रेघा ओढतात त्याला ' देवरेघ ' म्हणतात. नंतर नवरानवरीच्या नावाने रेघा ओढून घोड्यावर स्वार नवरानवरी दाखवून चौक लिहिला जातो. याला ' देव चौक ' म्हणतात. तसे पाहिले तर हे सामूहिकच चित्र असते. एकदा का देवचौक रेखाटून झाला की सगळे मिळून चित्र काढतात. वारली काढण्यासाठी वापरण्यात येणारा पांढरा रंग तांदळाच्या पेजेत डिंक मिसळून तयार केला जातो. गेरूने सारवलेल्या जमिनी, शेणाने सारवलेल्या भिंती व त्यावर पेजेच्या पांढर्‍या रंगाने बांबूच्या काड्या, चिंध्या इत्यादींचा वापर करून वारली त्यांचे जीवनच रेखाटतात. ही चित्रे साधे भूमितीचे आकार कल्पकरीत्या गुंफून जिवंत होतात. श्रद्धा, चालीरीती, रीतिरिवाज, प्रथा यांचे यथार्थदर्शन घडवणारी कला. चित्राखेरीज भिंत म्हणजे बिनकपड्याचा माणूसच. म्हणून अशा भिंतीला ' नागडी ' भिंत समजले जाते. ' पंचशिर्‍या ' हा देव पंचमहाभूतांचे प्रतीक असून त्याचा चौक कुटुंबाच्या रक्षणाकरिता चितारतात. तसेच कसलीही बाहेरची बाधा होऊ नये म्हणून ' सूर्यदेव व चंद्रदेवाची ' चित्रे काढली जातात. बहुतेकवेळी एकाच चित्रात सूर्य व चंद्र एकत्र दाखवले जातात.

पाऊस पडावा यासाठी ' कांबडी नाच ' करून वरुण देवाची प्रार्थना केली जाते. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. पेरणीनंतर पंधरा दिवस म्हणजे साधारण नागपंचमीपर्यंत हा नाच केला जातो. ' मांदल नाच ' हा कोणत्याही दिवशी व कधीही केला जातो. मात्र यात स्त्रिया भाग घेत नाहीत. परंतु या नाचाचे प्रमाण कमी होते आहे. तसेच होळी पौर्णिमेच्या आधी माघी पौर्णिमेपासूनच रोज एक छोटी होळी पेटवून नाच केला जातो. ' घोर नाच किंवा टिपरी नाच ' हा दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. कितीतरी वेळा उपाशीतापाशी राहणारे वारली नृत्यांमध्ये मात्र स्वतःला झोकून देतात. अतिशय भक्तीभावे बेभान होऊन नृत्यात रममाण होऊन जातात.

माननीय ' जीवा सोमा म्हशे ' या प्रसिद्ध वारली चित्रकाराने ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. अनेक देशांमध्ये जाऊन चित्रे काढली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. वारलीने समृद्ध केलेल्या भिंती, दालने जगभर आढळून येतात. कलेच्या केलेल्या उत्कट सादरीकरणाचा सहजसुंदर आविष्कार जगभर आपला ठसा प्रभावीपणे उमटवत आहे. ही इतकी जुनी व सुंदर कला शिकण्याचा योग गेल्या दोन वेळच्या मायदेशाच्या भेटीत आला. पहिल्यावेळी केवळ दोन तासांची जुजबी ओळख झाली मात्र गेल्यावेळी माझ्या सुदैवाने श्री. संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. म्हणतात ना, ' चाह है तो राह आपोआप समोर येऊन उभी ठाकते '. तसेच काहीसे झाले. आठच दिवसांनी परतीचे तिकीट असताना अचानक गावकरीत दोन दिवसाच्या देवधर सरांच्या वारली शिबिराची माहिती मिळाली. लगेचच धाव घेतली. सरांनी वारली कलेची समग्र माहिती देऊन वारलींच्या जीवनाची ओळख करून दिली. वारली चित्र कशी काढावीत, ते कसा विचार करतात, त्यांच्या चित्रांमध्ये यथार्थदर्शनाचा विचार नसून भिंतीच्या आतलेही दृश्य कसे दिसेल ते काढले जाते हेही समजावून दिले. सरांच्या मार्गदर्शनाची शिदोरी बरोबर घेऊन घरी परतल्यावर चित्रे काढण्याचा व हा मौल्यवान ठेवा जपण्याचा, साखळीतील एक छोटीशी कडी होण्याचा प्रयत्न.

माझ्यासारख्या सर्वसामान्य परंतु कलासक्त मनांना थोडा नेट लावून प्रयत्न केल्यास सहजी अवगत होणारी निसर्गाचा, जीवनाचा कलाविष्कार प्रभावीपणे दर्शवणारी चित्रशैली सर्जनतेची अनुभूती देऊन जाते.
तारपा नृत्य
( उपरोक्त माहिती श्री संजयसर व जालावरून संकलित )

Monday, July 18, 2011

बळी...

जोराजोरात ओरडण्याचे, धावत येणाऱ्या पावलांचे आवाज जवळ येऊ लागले तसा मंग्या मारायचा थांबला. शांतपणे उभे राहत त्याने चाकुवरचे पोत्याचे रक्त त्याच्याच शर्टाला पुसले. चाकू बाजूला ठेवून खांबाला टेकून गुडघे पोटाशी घेऊन एकटक तो पोत्याच्या भयचकित डोळ्यांकडे पाहत राहिला. शकीच्या उघड्या, वेदनेने पिळवटलेल्या डोळ्यांमधून प्राण गेल्यावरही खिळून उरलेल्या अत्याचाराच्या भयाण खुणांचा बदला मंग्याने पुरा केला होता. चांदणीला दिलेले वचन पाळले होते.

" अरे खून खून....! बापरे! किती निर्घृण हत्या आहे ही. या पोराने केली आहे? एवढुसा तर दिसतोय. किती खुनशीपणे वार केलेत. ही हरामी अवलाद अशीच निपजायची. आईबाप पापं करतात आणि ही घाण उकिरड्यावर टाकून होतात मोकळे. पकड रे त्याला. कसा पाहतोय पाहा बेरड. पळूनही गेला नाही. किती वार केलेत. इतक्या लहान मनगटात इतकी ताकद आली कुठून... ? चल रे. त्याला घेऊन चल चौकीवर आणि या पोत्याची वासलात लावा. हरामखोर मेला ते बरे झाले. फार माजला होता साला. गेली चारपाच वर्षे शोधत होतो पण कुठे लपला होता कोण जाणे. कधीतरी असाच कोथळा बाहेर येऊन मरायचा होताच. पण इतक्या लहान पोराच्या हातून... ए, मारू नको रे त्या पोराला. मी बोलतो त्याच्याशी. चहा पाजा कोणीतरी त्याला." इन्स्पेक्टर ओरडत होता. " काय रे, आईबाप आहेत का? का उकिरड्याची अवलाद तू? " मंग्याला ऐकू येत होते... मायेला कोणीतरी सांगितले असावे. उर बडवत पळत येताना दिसत होती. आता काय उपयोग येऊन. त्यादिवशी कुठे होतीस माये तू? शकी हाकारत होती तेव्हा कुठे होतीस तू माये? कुठं होतीस?

दिवसाचा, कामाचा, माराचा कोटा जवळपास पुरा होत आला होता. गेले काही दिवस एकाच विचाराने मंग्या भारला गेलेला. त्यामुळे कामात चुका होत होत्या. मार वाढत होता. मंगेशचे मन, शरीर सरावलेले. कामाबद्दल, माराबद्दल त्याची तक्रार कधीच नव्हती. ते तर जन्मापासूनच त्याच्या मागे लागलेले. चार दिवसाच्या, धड डोळेही नीट उघडून पाहू न शकणाऱ्या मंगेशच्या हाडाचा सापळा सुपात घालून त्याला व त्याच्यापेक्षा आठ वर्षाने मोठ्या शकीच्या बखोटीला धरून माय त्या दोघांची बोचकी सिग्नलच्या चौकातल्या पुलाखाली आणून आपटे. तिने व बेवड्या बापसाने रोजचे बारा तासासाठी त्या निष्पाप जीवांना भाड्याने देऊन टाकलेले. शकूची आठवण आली तशी मंगेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले. एखाद्या जीवाची कष्ट करण्याची एक सीमा असते पण शकूच्या बाबतीत सगळे नियम उरफाटेच होते.

रोज सकाळी सात वाजता सिग्नलपाशी माय सोडून गेली की ’ पोत्यादादाच्या ’ रागाच्या व चाळ्यांच्या तावडीत चुकूनही न सापडण्यासाठी ती जीव तोडून धावत राही. सिग्नल लागला रे लागला की सुपातल्या माझ्यासकट जराही न हिंदकळवता ती ते उचलून अतिशय निर्व्याज गोड हसू आणून गाडीवाल्यांपाशी जाई. इतरांसारखे लहानग्यांना चिमटे, चापट्या मारून रडवण्याचे पाप त्या निष्पाप जीवाने कधीच केले नाही. उलट माझ्या गालाला हात लावून ती खुदकन मला हसवण्याचा प्रयत्न करी. बरेचदा मी हसत असे. माझ्यासाठी तो जणू खेळच होता. माथ्यावर रणरणते ऊन, पोटात जेमतेम रडता येईल इतकेच दूध, पाणी मिळत असूनही शकूच्या मायेच्या सावलीत मी बोळकं पसरून, आ.. आ... करत हसत असे. मी असा हसलो की तीही तितकेच गोड हसत गाडीवाल्याकडे, कधी शेजारी बसलेल्या बाईसाहेबांकडे पाही. त्यांच्याही नकळत त्यांच्या खिशातून, पर्समधून रुपया, पन्नास पैसे कधीकधी तर पाच अगदी दहाही रुपये ते देऊन जात. वर किती गोड लेकरं आहेत हो. किती दुष्ट असतील यांचे आई-बाप, अशी अनेक प्रकारचे बोल, तर्क कानावर येत.

इतक्या लहान शकूला सिग्नलच्या लांबीची पुरेपूर कल्पना होती. तिचे त्या ९० सेकंदाचे गणित पक्के होते. एका गाडीपाशी चुकूनही ती पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ रेंगाळत नसे. पसरलेल्या तळव्यावर काही टेकवले जाणार असेलच तर त्याला २५ सेकंद वेळ पुरेसा आहे. माणसाचे मन द्रवणार असेल तर ते पहिल्या दहा सेकंदातच, आमचे हसू पाहून... नंतरचे १० सेकंद, शकूचे पाठीला चिकटलेले पोट व माझा सापळा पाहून कुठेतरी त्या गाडीवाल्याच्या पोटात तुटण्यासाठी व त्यापुढचे पाच हातावर नाण्याचा स्पर्श होण्यासाठी. त्यानंतर उगाच तिथे रेंगाळून हातावर काहीच पडणार नाही हा शकीचा अंदाज फारच क्वचित चुकत असे. जेव्हां तो चुके तेव्हाही ती कधीच गाडी सोडून पुढे गेलेली असे. गाडीवालाच हाका मारून पैसे टेकवी. बरेचदा रुपयाखाली नसतच ते.

तीन गाड्या झाल्या की शांतपणे ती पुलाच्या खाली सरके. सिग्नल सुटलाय, कर्कशं हॉर्न वाजता आहेत आणि मला घेऊन शकी धावतेय असे कधीच झाले नाही. मला मांडीवर घेऊन लगेच ती चार चमचे पाणी पाजी. स्वत:ही दोन घोट पिऊन घेई. शकीच्या आणि माझ्यामध्ये म्हणे दोन पोरं झाली होती मायेला. ती दोघंही गेली मरून याच सिग्नलवर. शकीच्याच सुपात. माय म्हणे दुसरं पोर मेलं तेव्हा शकी पंधरा दिवस तापली होती. तापात बरळत होती. मायेला वाटलेलं हीही ब्याद मरून जाणार आता. पण कशीबशी तगली. आठ दिवसात पुन्हा सिग्नलवर आली. तेव्हा मी नुकताच जन्मलो होतो. ती दोघे तिच्यामुळेच मेली असे शकी सारखी म्हणत असे. त्यामुळेही असेल, मायेला न सांगता थोड्याथोड्यावेळाने मला दूध पाजत असे. पैशाची विभागणी करून खिशात नीट ठेवी. दिवसभर रस्त्यावर धुळीचा, उन्हाचा, पावसाचा, मारा सोसूनही मी मजेत असे. मात्र माय न्यायला आली की ही मजा संपून जाई. आम्ही दोघं दिवसभराची वणवण करून दमलेली लेकरं नजरेस पडताच ती पहिले काय करी तर शकीच्या पाठीत सटकन एक रट्टा मारे. तिचे बखोटे धरून गदगदा हालवतं घाणेरड्या दोनचार शिव्या देऊन किती कमाई झाली हे विचारत सगळे पैसे काढून घेई. शकूच्या अखंड मेहनतीमुळे दिवसाकाठी बरेचवेळा तीस-चाळीस रुपये जमतच. कधीकधी तर पन्नासही मिळून जात. तरीही माय कधीच खूश होत नसे. शकीने आणि मी तिचे इतके कुठले घोडे मारले होते कोण जाणे पण तिने कधीच आम्हाला मायेने कुरवाळल्याचे आठवत नाही. कदाचित कदाचित तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पापे असू आम्ही. जे काय असेल ते असो. फक्त जन्म दिलेला म्हणून माय म्हणायचे तिला.

झोपडीत गेल्यागेल्या बेवडा खाऊन दिवसभर झोपलेला बाप पैशाची वाट पाहत असे. सिग्नलवर तो कधीच येत नसे. एकदा पोलिसांनी त्याला तिकडून पकडून नेल्यापासून त्याने धसका घेतला होता. तिघांची वरात झोपडीत शिरताच मायेच्या मुस्कटात खाणकन भडकवत तिच्या हातातले पैसे तो हिसकून घेई. असे झाले की माय त्याला झोंबायला लागे. ती त्याला ओरबाडी, गुद्दे मारी. एकदोन वेळा तिचे हात झटकून बापूस तिच्या पेकाटात कचकन एक लाथ घाले. एखाद्या वाळवीने पोखरलेल्या लाकडासारखी माय उन्मळून पडे. की पुन्हा एक लाथ पाठीत घालून बाप गुत्त्याचा रस्ता धरे. मला घट्ट उराशी कवटाळून शकी कोपऱ्यात थरथरत उभी असे. बाप नक्की गेला याची खात्री पटली की ती मायेपाशी जाई. मला सुपातून काढून पटकुरावर हळूच ठेवून ती मायेला हाक मारे. तिच्या पाठीवरून पोटावरून, गालावरून हात फिरवत राही. दहापंधरा मिनिटाने माय सुबकत सुबकत उठून बसे. शकीच्या इवल्याश्या बंद मुठीत माझ्या चड्डीत लपवून ठेवलेली, कधी पाचाची कधी दहाची नोट असे. जगण्याची लढाई गनिमी काव्यानेच लढायला हवी हे कोणीही न शिकवता त्या बालजीवाला उमजले होते.

कोणाकोणाच्या घरून मिळालेले बरेचदा शिळे व कधीतरी ताजे अन्न मायेने आणलेले असे. त्यातले निवडक चांगले ती बापासाठी ताटात ठेवून देई. उरलेले ती दोघींच्या पानात घेई. बाटलीत दूध भरून मला पाजल्याशिवाय शकीने कधीच घास खाल्ला नाही. हे सगळे मायेकडूनच मला कळले. माय म्हणते, मी तुला फकस्त जन्म दिला पण ती तुझी खरी माय होती. तसेच असणार. तशी शकी मला आठवतेय ती त्या पांढऱ्या पांढऱ्या चादरीखाली झाकलेली रक्ताच्या काळपट लाल रंगाने माखलेली, डोळे सताड उघडे टाकून ताठरलेली. चार वर्षाचा होतो मी. माझ्या अंगात ताप होता म्हणून मला घरीच ठेवून त्यादिवशी ती एकटीच गेली होती सिग्नलवर. तेरा वर्षाची शकू आजकाल पोत्यादादाच्या नजरेत सारखी येऊ लागली होती. पण एकतर मी सतत बरोबर असे आणि शकूही खूप हुशार होती. जगाच्या थपडा खाऊन बेरकी झालीच होती. कुठे धोका आहे हे ती बरोबर हेरी आणि भराभर दुसरा रस्ता धरी. निसर्ग हळूहळू त्याचे काम करत होता. शकूचे गाल वर येऊ लागलेले. नजरेतील चमक वाढू लागली होती. हडकलेले शरीर किंचित भरत चालले होते. त्याची गोलाई वखवखलेल्या डोळ्यांना अचूक दिसू लागलेली. आजकाल भीक मागतानाही ती काहिशी लांबच उभी राही. पोत्यादादाला अनेकवेळा पोरांना अंगाखाली घेताना पाहिलेले असल्याने ती त्याच्यापासून कायम चार हात लांब राहत असे.

पण तो दिवसच उरफाटा निघाला. माझा ताप वाढलेला. मायेलाही बरं नव्हतं. सर्दीने ती हैराण झालेली. माय घरातच आहे हे पाहून शकू मला न घेताच सिग्नलवर निघाली. आज लवकर येते हा का रे मंगेशा. उगाच चळवळ करू नकोस. गपगार पडून राहा गुमान. येताना तुझ्यासाठी खारी घेऊन येईन. असे मला सांगून ती गेली ती चादरीत गुंडाळूनच परत आली. पोत्यादादाने माझ्या निरागस, निष्पाप शकूचा लचका तोडला होता. एकदा, दोनदा, तीनदा.... पोलिसांचे शब्द कानावर पडत होते, तिने ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडावर हाताचा पंजा इतका घट्ट दाबून धरला होता की ती कधी मेली तेही त्याला कळले नाही. तो तसाच तिला ओरबाडत असताना कोणाचेतरी लक्ष गेले आणि एकच कालवा झाला. त्याच्या वजनाने छातीचा पिंजरा पिचून गेला, इवलेसे शरीर फाटून तुटून गेले. पोलीस म्हणत होते की शकूचा प्राण लगेचच गेला असावा. बरे झाले, शकी लगेच मरून गेली ते. निदान मेल्यावर तिला वेदना जाणवल्या नसतील. पोत्यादादाच्या अंगाखाली असलेल्या तिच्या देहाचे हाल तिथेच शेजारी उभे राहून कदाचित तिने पाहिले असतील. ओठांची हिंपुटी करून हमसाहमशी ती रडली असेल. माये, वाचव गं तुझ्या लेकराला या राक्षसाच्या तावडीतून असे म्हणत तिने टाहो फोडला असेल. सगळेच कसे एकाएकी बहिरे झाले गं शके? क्षणाचीही उसंत नसलेल्या सिग्नलवरच्या एकालाही तुझी किंचाळी ऐकू जाऊ नये... ओरडणारा पोचेपर्यंत पोत्या पळून गेला तो गेलाच. पोलिसांनी बरेच शोधाशोध केली पण कोणी म्हणे तो आंध्रात कुठेशी असलेल्या त्याच्या गावी पळून गेला.

शकीचे उघडे, फाटलेले डोळे दिवसरात्र माझा पाठलाग करत राहतात. कधीकधी वाटे ती माझ्यावर नजर ठेवून आहे. कुठल्याही वाईट मार्गाला मी वळू नये म्हणून ती पापणी लवतच नाही. रात्री पोटाशी पाय घेऊन झोपडीतल्या छताच्या भोकातून दिसणारी ती एकच एक चांदणी शकीच आहे नक्की. आताशा चांदणी मधूनच लाल होते. शकूच्या उघड्या डोळ्यात रक्त उतरते.... शकूला डोळे मिटायचे आहेत. शांत निजायचे आहे. ती बदला मागते आहे? बदला. जायज बदला. तिचा हक्क आहे तो. तिचे हक्काचे एकमेव माणूस म्हणून ती माझ्याकडे आशेने पाहतेय. शकूला शांत निजायचे आहे. मला तिच्या ऋणातून उतराई व्हायचे आहे. पंधरा दिवसांपूर्वी सिग्नलवर दाढी वाढवलेला एक हाडाचा सापळा दिसला. आधी माझे लक्षच नव्हते. पण तो वारंवार शकी मेली त्या जागेकडे जाऊन उभे राहून वेड्यासारखे हातवारे करत काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटत राही. डोके बडवून घेई, थोबाड फोडून घेई. मला शंका येतेय. पोत्या मला आठवतच नाही. शके, उद्या मी त्याला हाक मारणार आहे. हाक ऐकून वळला तर उद्या रातीला चांदणी उगवेल ती धवल... कोमल... स्नेहल... शांत... निर्मळ...

सत्य घटनेवर आधारित कथा आहे ही. तुकड्यातुकड्याने माझ्यापर्यंत पोहोचली. शकू सोडून ज्याने त्याने आपापल्या कर्माची फळे भोगली. परंतु, अशा प्रसंगात खरा दोषी कोण? शकू, मंग्या, पोत्या, माय-बापूस का या प्रत्येकाची परिस्थिती....??? बळी सगळेच गेले. पण हकनाक बळी गेली ती शकू आणि अन्यायाचा बळी मंग्या. म्हणायला.... अन्यायाचा, शकूच्या प्रेमाचा बदला चुकवला त्याने. पण ते केवळ म्हणण्यापुरतेच. उभे आयुष्य नासले ते नासलेच. केवळ परिस्थिती कारणीभूत असते असे बरेचदा म्हटले जाते. काही अंशी खरेही आहे ते. जनावरेही निसर्गाचा नियम शक्यतो तोडताना आढळत नाहीत. मात्र दोन पायाचे माणूस नावाचे जनावर कधी कुठल्याक्षणी कसे वागेल याचा अंदाज बांधणे अशक्यच. एका जनावरातून दुसऱ्याचा जन्म.... त्यातून तिसऱ्याचा.... साखळी अहोरात्र वाढते आहे.... वाढतेच आहे.... शेवट नसलेली... बळी घेणारी... बळी पडणारी.... जीवघेणी....

( खरी नावे बदललेली आहेत )

Sunday, July 10, 2011

मोकळीक...

जोरदार पावसाची चिन्हे दुपारपासूनच दिसत होती. अर्धा जून उलटला तरी म्हणावी तशी झड एकदाही लागली नव्हती. मेच्या शेवटास वळीव गाजावाजा करत कोसळला. पाहता पाहता चहुबाजूने काळे ढग घेरून आले. उन्हाच्या काहिलीने तापलेला वारा अचानक अंगात येऊ घातलेल्या बाईसारखा वेडावाकडा घुमू लागला. शुष्क, हल्लक पानांची स्वत:ला तुटू न देण्याची तारांबळ उडवत, भुईवरल्या कोरड्याठाक धुळीला मन मानेल तसे वारा दौडवू लागला. जिथे जिथे घुसता येईल तिथे तिथे घुसून वळीवाची दवंडी पिटू लागला. अरे तारेवरचे कपडे काढा रे, वाळवणं उचला रे, चा हाकारा कानी पडून मनांनी त्याची नोंद घेईतो मोठे मोठे टपोरे थेंब एकमेकाची पाठ धरत धरेवर कोसळू लागले. जे जे धारांच्या सपाट्यात सापडले त्या सगळ्यांना सचैल न्हाऊ घालत स्वच्छ करून टाकले. डांबरी रस्ते, झाडे, घरांच्या भिंती, गाड्या, माणसे, सारे सारे आंर्तबाह्य धुतले गेले. उन्हाचे तडाखे न सोसून अगदी कोरडीठाक झालेली डबकी, धुळभरल्या पाण्याने गढूळ भरून गेली. चातकासारखी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी धरा अचानक आलेल्या त्या टपोऱ्या थेंबांच्या लगटीने काहीशी सुखावली. पण धारा तिरप्या होत्या. धरेला ठाऊक होतं. हे सुखं काही काळाचंच आहे. चांगला पाचसहा तास दणकून धुमाकूळ घालून जसा आला तसाच पाहतापाहता वळीव बरसवणारे काळे ढग घेऊन वारा पसार झाला तो झालाच.

त्यानंतर पुन्हा सुरू झाला तो असह्य उकाडा. उगाच एक तुकडा टाकून तोंड चाळवल्यासारखे करून पावसाने पुन्हा सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. शाळा सुरू होऊन आठवडा झाला. पोरांच्या रंगीबेरंगी छत्र्यांचे, पावसाळी चपलांचे कोरेपण संपेचना. गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांना माखलेली धुळीची पुटं कोरडीठाक झाल्याने पुंजक्यापुंजक्याने गळू लागलेली. भिंतीच्या सांध्याजवळ चुकून जरी टेकलं गेलं की गुदमरायला होऊ लागलं. भिंतीचे कोरडे फूत्कार सोसेना झाले. हवेतील संपूर्ण आद्रता शोषली गेल्याने हवेलाच हल्लकपण आलेले. आजची सकाळ उजाडली तीच एक गदगदलेपण घेऊन. सूर्याच्या तापाने कळस गाठला. वाटले सूर्यही करपलाय. अंगाचा दाह त्यालाही सोसवेना झाल्यासारखा. समोर सापडेल त्या ढगाच्या पुंजक्यानं मागे तो लपू लागला. ते विरळ पुंजके त्याच्या तापाने अजूनच फाटत जाऊन सैरावैरा पळू लागलेले.

सूर्य आणि ढगांची ती पकडापकडी डेस्कवरून एकटक पाहत रमा बसली होती. ’आसमंतातली शुष्कता मोठी की अंतरंगातली... ’ याची शोधाशोध गेले काही दिवस सुरू होतीच. ’ ओलावा ’ कसा झिरपत जातो. मग ती ’ ओल ’ भिंतीतली असो की मनातली. तिला भिनून जाणेच कळते आणि जमतेही. रमेच्या मनातही अश्याच काही तीव्रतेने भिनून तिला सर्वांगी ओलेती करून अचानक हात आखडता घेत घेत शुष्क झालेल्या ओलाव्यांच्या पडलेल्या भेगा, करपट होऊन करवडलेल्या.

पहिली भेग न कळत्या वयातली, मग दुसरी, मग तिसरी.... प्रत्येकवेळी नवी आशा, नवा ओलावा. प्रत्येकाचा शेवट मात्र ठरलेला. पुन्हा उभारी. नव्याने मांडलेले गणित. आधीच्या भेगांच्या अनुभवाची उजळणी करून आखलेला रस्ता. डोळ्यात तेल घालून दिलेला पहारा... इतकुशीही चूक होऊ नये म्हणून दक्ष राहून केलेल्या वेगळ्याच चुका. तरीही शेवट ठरलेलाच..... का? का? उत्तर शोधूनही मिळत नाही... समोर दिसत राहतात त्या कातडीवरच्या फाकत चाललेल्या चौकटी. डोळ्याखालची वर्तुळं..... आणि साचलेला, ओरबाडणारा असह्य एकांत!

दुपार तापू लागली तसतसे कुठुनसे काळेकुट्ट ढग एकामागोमाग एक जमू लागले. पाहता पाहता आभाळ गच्च भरून गेले. सूर्याची भेदकता निष्प्रभ झाली. काळ्या ढगांची आक्रमक दाटीवाटी, सौदामिनीचे त्यांना कडाडून छेदत लखलखणे, पाठोपाठ तिला दाद देत त्यांचे रोरावतं येणे. मधूनच एखाद्या काळ्याकुट्ट ढगाला सोनेरी किनार लावत धडपडत डोकावणारा सूर्य. जीवन घेऊन बरसणाऱ्या थेंबांच्या आगमनाची वर्दी देण्याचा लाडका खेळ या साऱ्यांनी मांडलेला. ढगांनमधून मोकळे होते होत थेंब बरसू लागले. खिडकीत उभे राहून पापणीही न लववता रमा सृष्टिची धडपड पाहत होती. आजूबाजूला चाललेल्या गडबड गोंधळाचे स्वर कानावर पडत होते पण त्यात ती कुठेच असणार नव्हती. असेही तिला कोणीही गृहीतही धरले नव्हते.

" अगं, रमा कधीपासून खिडकीला चिकटली आहे. पाहिलेस का? "

" हो. पाहतेय. तिचे बरे आहे गं. कोण आहे घरी वाट पाहणारं? नाही वेळेवर पोचली किंवा मी म्हणते अगदी एखादा दिवस गेलीच नाही घरी तरी कुठली चिल्लीपिल्ली रडणार आहेत का नवरा वाट पाहणार आहे? तिच्या मर्जीची ती मालक. नाही तर आमची कुतरओढ पाहा. या मेल्या पावसालाही आताच कोसळायला हवे का? जरा संध्याकाळची लोकं गाड्यांमध्ये चढू देऊन अर्ध्या रस्त्याला लागू देत म्हणावं मग काय तो पड रे. पण नाही. चल चल, रमेसारखी मोकळीक नाही आपल्याला. " मैत्रिणींचे म्हटले तर सत्य म्हटले तर कुचकट भाव दर्शवणारे स्वर कानावर पडत होते.

’मोकळीक’.... खरेच!

आपल्याला काय सगळीच मोकळीक.

ना विचारणारं कोणी ना वाट पाहणारं कोणी.

पाशच नाहीत.

जे होऊ घातलेले, त्यांची घट्ट वीण घालणं आपल्याला कधी साधलंच नाही.

पण हा दोष माझा एकटीचा कसा?

तेही तितकेच कारणीभूत असूनही पराभूत मीच.

असं कसं?

खोल खोल, ओढाळ डोह मनात काठोकाठ भरून वाहत असतानाही भेगा कश्या पडत होत्या त्याचं कोडं कधी सुटलंच नाही.

आज पुन्हा एकदा टपोरे थेंब आसुसून कोसळणार आहेत!

आज पुन्हा एकदा धरेला मोकळीक मिळणार आहे!

तप्त गात्रे सुखावतील. तरारतील.

माझं मन चातक पक्षी झालंय...

पुन्हा एक दान पडू दे पदरात. फाटलेल्या ओठांना मिळू दे ती ओढाळ ओलसर उष्ण उब...

माणसांच्या या अथांग समुद्रात कुठेसा हरवलेला, माझा असलेला एखादा धागा त्या उलगडत जाणाऱ्या थेंबांच्या लडीला धरून माझ्या केसांवरून ओघळत अलगद मनात उतरू दे!

या धरेसारखेच मलाही तृप्त होऊ दे!

मॅडम, सगळे गेले कधीच. तुम्हीही निघा म्हणजे कुलूप लावून मलाही सटकायला. गाड्या बंद पडतील आता कधीही. चला चला.

हो हो. निघालेच बघ! तूही नीघ. घरी बायकोपोरं वाट पाहत असतील.

लिफ्टची वाट न पाहता लगबगीने चार जीने उतरत तिने गेट गाठले. छत्र्यांची लगबग, चपलांची धावपळ. लोंढे येत होते, भरभर गेट रिकामे होत होते. छातीभरून रमाने एक मोठा श्वास घेतला. ओढणी सावरली, पर्स खांद्याला लावून तिने छत्रीच्या बटणावर बोट दाबले. फटकन आवाज करत मिटलेल्या तारा मोकळे होण्यासाठी झेपावल्या. रमेला त्यांनी छत्राखाली घेतले. क्षणार्धात प्रत्येक तारेतून मोती घरंगळू लागले. किंचित गारवा चढलेली हवा, रंगीबेरंगी छत्र्यांवर आपटत उडणारे इंद्रधनू तुषार.... रमेला रमवू लागले. बंद पिंजऱ्यात कोंडलेली रमा त्या कोसळणाऱ्या लडींना धरून वरवर जाऊ लागली. घट्ट मिटलेले, भेगाळलेले ओठ मुक्त हसू लागले. पुन्हा एकवार नव्या आशेच्या लाटेवर तिने स्वत:ला झोकून दिले....... अपरिचिताच्या दिशेने झेपावत धरेसारखी ती मोकळी मोकळी होत गेली.... पाशाच्या भिंतीत गुदमरण्यासाठी!