यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो. त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच. खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही. आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव. पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे. अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव.
हे झाले मायदेशाचे. जे पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे-वेगळे प्रकरण आहे. दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद. मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परदेशी आलो ते एका छोट्याशा गावात. सुदैवाने तिथे इतक्या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या, की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही. दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे. अगदी रांगोळ्या, तोरणे, फराळाची देवाण-घेवाण, विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ, पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे, मुलांचे-मोठ्यांचे फुलबाज्या, भुईचक्र व नळे उडवणे, आम्हा बायकांची पैठण्या, दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग. आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती. बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे.
हे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले. मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले. तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना. कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला. आता हेच पाहा नं, बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी. पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल, वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ.
मग काय, घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये. हरकत नाही. दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच. ओघाने फराळही आलाच की. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत:च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएट-बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....(का ते कळले नं... "लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम...') लाडू खायचेच. तशात लेक म्हणाला, " आई, डबा भरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव.'' मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र-मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले. प्रत्यक्ष शुभेच्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल, फटाक्यांची आतषबाजीही लुटता येईल. दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल.
तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. " !!! ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत !!! "
( इसकाळ मधे छापून आलेला लेख )
मस्त गं. फ़राळाचं ताट छान आहेच आणि ते वरती टी लाईट candle ला तू लावलेले चार चांद एकदम मस्त दिसताहेत. Hatts off to all the Crochet work.
ReplyDeleteकधी कधी मला वाटतं मी मायदेशात असते तर फराळ नक्की ऑर्डर केला असता इकडे देशाबाहेर आहोत तर थोडे कष्टही केले जातात :)
धन्सं गं अपर्णा! :)
Deletemast mast !!
ReplyDeletetujhya hatacha faral khayala yayala pahije ekda tujhya ghari !!
varchi creativity tar afalatunch !
:) :)
Deleteमाऊशी सहमत. ;) माझी ही हीच इच्छा आहे... तुझ्या हातचा फराळ खायचा!
ReplyDelete:) :) :)
Deletemast sajari zali ki diwali. :)
ReplyDelete@ mazi ek shanka aahe : me aaj baryach diwasannatar post lihili mhaje agadi 3 warshanantar, pan ti marathi blogwar publish hot nahiye. Marathi blogcha logo sudhha me lawlela aahe. purvi mazya post lagechach publish vyayachya pan ata me aathawadyapasun prayatna kertiye, lihileli post marathi blogchya mukhya panawar disatach nahi. :( kahi margadarshan karu shakal ka...?
धन्यवाद अनामिक! उत्तर द्यायला प्रचंड उशीर झालेला आहे. माफी असावी. बहुतेक आपला वरिल उल्लेखलेला प्रश्न कधीच सोडवला गेला असेल व आपल्या पोस्ट नक्कीच दिसू लागल्या असतील. :)
Deleteआहेस कुठे?
ReplyDeleteआहे आहे. :) अरे, खुपच दिवसात किबोर्डवर बोटे चालवलीच नाहियेत. :( आता जरा स्वत:लाच रागवायला हवंय. :) तु कसा आहेस?
Deleteआज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात आपल्या या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. जरुर वाचा:
ReplyDeletehttp://prabhunarendra.blogspot.in/2016/04/blog-post_27.html
अनेक धन्यवाद. अगदी आठवण ठेवून दखल घेतलीत. खुप छान वाटले. :) आपले म्हणणे अगदी खरंच आहे. ब्लॊगपोस्ट या जास्त व्यक्त होतात, भावना पोचवतात. :)
Deleteअनेक धन्यवाद. अगदी आठवण ठेवून दखल घेतलीत. खुप छान वाटले. :) आपले म्हणणे अगदी खरंच आहे. ब्लॊगपोस्ट या जास्त व्यक्त होतात, भावना पोचवतात. :)
Delete