जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, October 23, 2010

मी मायदेशी...१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.

तिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ट्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, "अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण " असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.

चोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्‍या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.

भरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का? प्लीज प्लीज...

तिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर छान लिहिले असेल. त्यामुळे भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....