लेकाला मुलाखतीचे बोलावणे आलेले पाहून सुधाकरला आनंद झाला. निदान लेकाने थोडेतरी गांभीर्याने घेतलेले दिसतेय. आता थोडी नशिबाने साथ दिली तर नोकरीही मिळेल. मग पोर लागेल मार्गाला. मुलाखतीच्या दिवशी लेकाला बेस्टलक व थोड्या सूचना देऊन सुधा बँकेत आला. दिवसभर थोडा अस्वस्थ होता खरा पण आशावादी होता. जरा लवकर जातो रे आज म्हणून चार वाजताच घरी गेला. सुधाकरने घरी पोचल्या पोचल्या पोराला विचारले, " काय मग? मुलाखत छान झाली ना? होणारच रे, मला अगदी खात्री आहे बघ. हा जॉब तुलाच मिळणार. " असे म्हणत त्याने पोराला जवळ घेतले. तशी पोराने अंग चोरून स्वतःला बाजूला केले आणि आईकडे पाहून तू सांग ना अशा खाणाखुणा करू लागला.
सुधाला समजेना हे काय चालले आहे. " अरे काय खुणावतो आहेस तिला? मला सांग ना काय ते. "
तसे शालिनी पोराला ढकलत म्हणाली , " अरे सांग बाबा, त्यांना सांगितल्याशिवाय काय होणार आहे का? "
" पपा, नाही म्हणजे मुलाखत बरी झाली. खरे तर फार काही विचारलेच नाही मला. उगाच फार्स केला असावा त्यांनी. पत्र येईल तुम्हाला घरी असे म्हणून वाटेला लावले. बाहेर आलो तर काही मुलाखतीला आलेले म्हणत होते की हे सरकारी खाते आहे बाबा, इथे सगळे काही देण्याघेण्यावर चालते. आता दीडशे पोस्टसाठी मुलाखतीला तीन हजार लोक बोलावलेत. जो मलिदा चारेल त्याचा नंबर लागेल. हे ऐकून मी तर निराशच झालो. "
" अरे असे निराश होऊन कसे चालेल? आणि सगळीकडे पैशानेच काम होते असे नाही. धीर धर. "
" आहा रे! ऐका आमच्या रामाची वचने. अहो कुठल्या जगात वावरताय? आजकाल पैशाशिवाय काही होत नाही. कसली गुणवत्ता घेऊन बसलाय तुम्ही. तो काय सांगतो आहे ते ऐका जरा नीट. " शालिनीने मध्येच तोंड घातले.
" पपा, मी तिथून निघतच होतो तर एक जण आला माझ्याकडे आणि म्हणाला, काय कसा झाला इंटरव्ह्यूव्ह? अहो कसाही झाला तरी पैशाशिवाय काही काम होणार नाही बघ. आहे का तयारी? बोल. म्हणून मी विचारले की किती पैसे द्यावे लागतील तर त्याने सां..... "
त्याचे असे चाचरणे पाहून पुन्हा एकदा शालिनी डाफरली, "बाई बाई किती पोर घाबरते तुम्हाला. मीच सांगते. त्या माणसाने सांगितलेय की दोन लाख द्या लागलीच कॉल काढतो. एकदा का सरकारी नोकरीत चिकटला की जन्माचे कल्याण होईल पोराचे. तेव्हा आता तुम्ही अजिबात खुसपट काढू नका. ताबडतोब पैशाची सोय करा. "
" अरे, काय वेडबिड लागलेय का तुम्हाला? कोण कोणीतरी माणूस येऊन तुला सांगतो दोन लाख द्या की नोकरी देतो आणि तुम्ही विश्वास ठेवता? तो तर लहान आहे गं पण शालिनी तुला तरी कळतेय ना? शिवाय इतकी मोठी रक्कम मी कुठून आणू? अजून धाकट्याचे शिक्षण व्हायचे आहे. अडीअडचणीला थोडा पैसा हवा ना जवळ, आता तो जर असा घालवला तर... आणि एवढे करून नोकरी मिळणारच आहे कशावरून? "
" तुम्हाला ना नन्नाचा पाढा वाचायचे बरोबर कळते हो. तुमच्या वशिल्याने बँकेत लावलेत का पोराला? नाही ना? मग तो काही तरी प्रयत्न करतोय तर करू दे ना. आणि फंडातून काढा की पैसे. बहिणीच्या लग्नासाठी कसे काढलेत? हं बरोबरच आहे, माझा पोर आहे ना तो. " असे म्हणत शालिनीने चिडचिड करायला सुरवात केली.
" अग, काय बोलतेस? माझाही मुलगाच आहे ना तो. बँकेची परीक्षा पास झाला असता तर मी प्रयत्न करणार होतोच. साहेबांजवळ बोलूनही ठेवले होते. आणि फंडातून पैसे मी काढणार नाही. आपल्या म्हातारपणाचा आधार आहे तो. "
" मला माहीतच होते तुम्ही काही करणार नाही. थांब रे मी माझे दागिने विकून तुला पैसे देते. मग मला म्हणू नका कशाला विकलेस म्हणून. आणि पाहा तुम्ही मिळेलच त्याला ही नोकरी. " असे म्हणत शालिनी फणफणत आत गेली.
" मी कशाला म्हणू बाई तुला काही, तुझे दागिने तू वीक नाहीतर ठेव. काय करता ते विचार करून करा म्हणजे झालं. " प्रथमच सुधाने त्याचा निर्णय बदलला नाही.
शालिनी तणतणली तरी तिची काही हिंमत झाली नाही दागिने विकण्याची. घरात दररोज या विषयावरून कटकट होत होती. एक दिवस सकाळीच सुधा तयारी करत असताना फोन आला. पोराने घेतला. त्याच माणसाचा होता. काय ठरले, लवकर काय ते करा. लिस्ट आठ दिवसात लागणार आहे. शेवटचे दोन दिवस उरलेत. झाले पुन्हा जोरदार बोलाचाली झाली. सुधाने दाद दिली नाही. पोरगा रागारागाने घराबाहेर निघून गेला. तशी चिडलेली शालिनी सुधाकरच्या हातात डबा देताना म्हणाली, " तुम्ही असेच अडेलतट्टूसारखे वागत राहा. तुम्ही असेतो माझ्या पोराचं भलं होणार नाही. " हे बोल सुधाच्या जिव्हारी लागले.
सुधा बँकेत आला आणि माझ्याकडे येऊन रडायलाच लागला. दोन लाख रुपये द्या नोकरीला लावतो असे कोणीतरी सांगतो आणि हे विश्वास ठेवतात त्यावर. यांनी काय दुनिया पाहिली आहे, उद्या हा माणूस पैसे घेऊन पळून जाईल मग काय करायचे? मी देत नाही म्हणून मला दररोज वाटेल तसे बोलत राहतात. अगदी जगणं कठीण करून टाकलंय रे माझं. सकाळी सकाळी फार बिपी वाढलं रे शालिनीची मुक्ताफळे ऐकून. बरे तर बरे आई कुसुमकडे गेलीये.
मी सुधाला समजावत राहिलो अरे होईल सगळे नीट. एकदा का पोराला नोकरी लागली ना की हे वादळ निघून जाईल. तू तुझी प्रकृती बिघडवून घेऊ नकोस. वहिनींचा स्वभावच आहे असे काहीतरी बडबडण्याचा, सोडून दे. धीर धर. नामस्मरण करत राहा. मी हे सुधाला समजावत होतो पण त्यातला फोलपणा मलाही जाणवत होता. सुधा तर कुठेतरी शून्यात नजर लावून बसला होता. त्याच्या मनात नक्की काय चालले होते कोण जाणे.
क्रमश:
कथा झकास आकार घेते आहे. आता शेवट कसा करता याची उत्सुकता लागली आहे. तुम्ही अगदी सहज लिहीता, त्यामुळे वाचताना मस्त वाटते.
ReplyDeleteheera,आवर्जून कळवलेत. आभार.
ReplyDelete