दिवसभर सुधाकरच्या मनात शालिनीचे सकाळचे वाक्य पुन्हा पुन्हा घाव घालत होते. गेली इतकी वर्षे या माझ्या माणसांसाठी मी सतत झटतो आहे. मला जे जे शक्य आहे ते ते सगळे त्यांना द्यायचा मी आटोकाट प्रयत्न केला. सगळ्यांनी एकमेकांची कदर करावी, सलोखा-प्रेम असावे, हसतखेळत समन्वय साधून राहावे म्हणून नेहमीच स्वतःला दुय्यम स्थानावर ठेवले. पण काय मिळाले? आज तर तुम्ही असाल तोवर पोरांचे भले होणार नाही असे शालिनी म्हणाली. ती खूप उथळ, तापट आहे पण इतकी वर्षे माझ्याबरोबर राहून माझ्याविषयी तिच्या मनात हे असेच विचार येतात. हरलो मी. आई तू सांगितलेस त्याप्रमाणे मी सतत वागलो गं पण बायको-पोरांशी समन्वय साधू शकलोच नाही. हरलो, खचलोय मी आता.
विचारांनी सुधाची पाठ सोडलीच नाही. शालिनी म्हणते त्याप्रमाणे मी नसलो तर पोराला लागलीच माझ्या जागेवर बँकेत नोकरी मिळेल. त्याचे आयुष्य मार्गाला लागेल. माझा फंड-इन्शुरन्स शालिनीला मिळेल. पैसे नीट गुंतवले तर तिला पुरतील. ब्लॉक आहेच तेव्हा ती काळजी नाही. पुढे त्यांचे नशीब आणि ते. नाहीतरी आता मी अजून कितीही जगलो तरी वेगळे काहीच घडवण्याची ताकद माझ्यात नाही. ह्या अश्या उलटसुलट विचारात संध्याकाळ झाली. सुधाकर घरी जायला निघाला. स्टेशनवर पोचण्यासाठी नेहमीच रेल्वेचे रूळ ओलांडून जावे लागे. दूरून पाहत होता. ट्रेन धडधडत आली. एक क्षण आणि संपेल सगळे. झोकून टाक. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जीव दिला तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत. अपघातच वाटला पाहिजे. पण माझा हा इतका मोठा, केवळ कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय त्यांना कधीच कळणार नाही. साधे रूळही नीट ओलांडता आले नाहीत असेच म्हणत राहतील.
आणि आई, तिचे काय होईल? आता या वयात हे जीवघेणे दुःख तिला देण्याचा अधिकार कोणी दिला मला. शालिनीला आज जी मुले आई आई करत आहेत उद्या कशावरून त्यांच्या बायका आल्यावर त्रास देणार नाहीत. तिला सांभाळायची जबाबदारी माझीच आहे ना. नाही नाही हा सुटकेचा मार्ग चुकीचा आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाने असे आततायी वागून स्वतःची सोडवणूक करत बायको-पोरांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. धीर धर सुधाकर, आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात. शांतपणे घरी जा. देवावर विश्वास ठेव.
असेच पंधरा दिवस गेले. नेहमीप्रमाणे सुधाकर बँकेत आला. आल्या आल्या शिपायाने सांगितले, " साहेब अहो लवकर जा. दिक्षितसाहेब कधीपासून तुमची वाट पाहत आहेत. " दिक्षितसाहेब? अरे मी तर वेळेवरच आलोय. मग आज सकाळी सकाळी साहेब इतक्या लवकर कसे आलेत? असे म्हणत सुधाकर साहेबांकडे गेला. त्याला पाहताच , " अहो सुधाकर आलात का? बसा बसा. हे तनेजासाहेब कधीपासून माझ्या डोक्यावर बसलेत. अरे बाबा मोठे क्लाएंट आहेत आपले. काय झाले त्यांच्या कामाचे? हे पाहा तनेजासाहेब तुमचे लोन ऍप्लिकेशन सुधाकरकडे दिलेले आहे. एकदा का त्याने हरी झंडी दिली की चेक तुमच्या हातात पडलाच समजा. कळलं ना. फोन करतो तुम्हाला. या आता. सुधाकर, काय ते बघून घ्या आणि दोनतीन दिवसात रिपोर्ट करा. "
सुधाकरने मान डोलवली आणि तनेजाला घेऊन स्वतःच्या केबिन मध्ये आला. तसे तनेजाने, " सुधाकरसाहेब आता सगळे तुमच्या हाती आहे. मी पुढची कामे घेऊन बसलोय. हे पाच कोटीचे लोन ताबडतोब पास व्हायला हवेय साहेब नाहीतर माझे दिवाळे निघेल. तुम्ही फक्त नुसता इशारा करा साहेब सगळे होऊन जाईल. दिक्षितसाहेबांचे-तुमचे..... " त्याला अडवत सुधाकर म्हणाला, " तनेजासाहेब, मी पाहतो ना आता. साहेबांना रिपोर्ट द्यायचाय लवकरात लवकर. तेव्हां....., कळवतोच मी आपल्याला. " सुधाकर कामाला लागला तसे खांदे उडवत तनेजा गेला. पुढचे दोन दिवस सुधाकरला उसंत मिळालीच नाही. अनेक गोष्टींची शहानिशा करायची होती. प्रपोजलची सत्यता, जामिनदारांची पत, धंद्याची स्ट्रेंथ त्यात तनेजा बँकेचा जुना क्लाएंट होता. रात्री आठ पर्यंत थांबून सुधाकरने रिपोर्ट पूर्ण केला.
दिक्षितसाहेब रिपोर्ट पाहत होते. एकएक गोष्ट नजरेखालून घालता घालता त्यांचा चेहरा सैलावत गेला. चेकवर सही करून त्यांनी तनेजाच्या सेलवर फोन लावला. तनेजा सकाळीच बँकेत येऊन बसला होता. तो पळतच आला. त्याच्या हातात पाच कोटीचा चेक ठेवत साहेब म्हणाले, " तनेजा साहेब पेढे पाहिजेत बरं का. हा घ्या चेक आणि लागा आता कामाला. सुधाकरने हरी झंडी दिली आहे. " तनेजा साहेबांचे दहा वेळा आभार मानू लागला तसे साहेब पटकन म्हणाले, " अहो आभार माझे नाही, सुधाकरचे माना. त्याच्या रिपोर्टवर सगळे काही अवलंबून होते. माझ्या बँकेतला हा एकटाच असा माणूस आहे जो कुठल्याही आमिषाला बळी पडणारा नाही म्हणून तर त्याच्याकडे दिली होती ना तुमची फाइल. बरं चला आता कामाला लागा. शुभेच्छा! "
सुधाकरच्या केबिनमध्ये जाताच तनेजाने सुधाकरचे हात घट्ट धरत म्हटले, " साहेब कसे तुमचे आभार मानू सांगा? दिक्षितसाहेब एकदम कडक माणूस आहे हे ऐकून होतो. फार घाबरलो होतो. हे लोन पास झाले नसते तर मी रस्त्यावर आलो असतो. फक्त तुमच्यामुळेच काम झाले माझे. सांगा साहेब, काय करू तुमच्यासाठी? " तसे सुधाकरने त्याच्या हातावर थोपटत म्हटले, " तनेजासाहेब, अहो मी नियमांच्या बाहेर जाऊन काहीही केलेले नाही. तुमचे प्रपोजल व्यवस्थित होते. सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पडताळूनच मी रिपोर्ट दिला. माझे कामच आहे ना ते. तुम्ही दिक्षितसाहेबांबद्दल ऐकलेत ते सत्यच आहे. टेन्शनमध्ये तुम्ही काही वेडेपणा केला नाहीत हे चांगले केलेत. नाहीतर तुमचे काम कधीच झाले नसते. तेव्हा साहेब म्हणाले तसे फक्त पेढे द्यायला विसरू नका म्हणजे झाले. " पुन्हा पुन्हा आभार मानत तनेजा गेला.
त्याच दिवशी मोठा मुलगा घाईघाईत घरी आला. शालिनीला नवलच वाटले, आत्ता तासापूर्वीच तर बाहेर पडला होता आणि इतक्या पटकन हा परत कसा आला. ती त्याला विचारणार तोच, " आई आत्ता मला अजय भेटला होता रस्त्यात. अजय कुंटे, हा तोच जाड्या. माझ्या वर्गात होता बघ. आई आपण मोठ्या फसवणुकीतून वाचलोय. अग अजयसुद्धा माझ्यासारखाच एमपीएससीच्या परीक्षेत पास झाला होता आणि मुलाखतीनंतर त्यालाही असाच कोणी माणूस भेटला होता म्हणे. अजयने कर्ज काढून दोन लाख रुपये दिले त्या माणसाला. आणि काय, गेल्या आठवड्यात लिस्ट लागली तर अजयचे नावच नाही त्यात. फसवले गं त्याला. तो माणूस पैसे घेऊन पसार झाला. अजय वेड्यासारखा त्याला शोधतोय. बापरे! आई थोडक्यात बचावलो. बाबांवर किती भयंकर चिडलो होतो मी पण त्यांचेच म्हणणे बरोबर निघाले. बाबांचे कष्टाचे पैसे असे लुबाडले गेले असते तर.....
क्रमश:
आता जरा बरं वाटतय जिंकतोय सुधाकर शेवटी.........लवकर लिहा पुढचा भाग....
ReplyDeleteतन्वी, अग खूप बर वाटलं तुझी प्रतिक्रिया पाहून. आभार.
ReplyDelete