जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 28, 2013

पिंपळ...

माणसाचं मन रोजच्यारोज उत्साहानं नवनवीन गोष्टी शोषत राहते. जोमाने आजूबाजूला घडणार्‍या घटनांवर विचार करत राहते. तितक्याच तगमगीने मागे होऊन गेलेल्या घटनांवर पुन्हा पुन्हा स्वतः:ची शक्ती असे का घडले ची कारण मीमांसा शोधत कष्टी होण्यात घालवते. असह्य जखमांचे क्षण कुपीत भरून खोल खोल डोहात भिरकावून दिल्यावरही पुन्हा एकदा नवीन कुपी आकार घेऊ लागते तेव्हां अगदी अजिबात गरज नसताना ओढवून घेऊन त्या जुन्या निद्रिस्त क्षणांचे पापुद्रे उलगडून तितक्याच असहाय्य वेदना जगण्याचा प्रयास हट्टाने करत राहते.  गिरणीचा पट्टा कसा अव्याहत दळण दळत राहतो. बहुतांशी गव्हाचाच भुगा... कधी जास्ती कोंडा तर कधी कमी कोंडा. का कोण जाणे आपल्या जेवणातला पोळी हा महत्त्वाचा पदार्थ असूनही भाकरीचा मायाळू बाज तिला नाही. म्हणूनही असेल पण कुठल्याही धान्याची भाकरी मनाशी जास्त जवळीक साधून असते खरी. गिरणीच्या पट्ट्याला ही मधूनमधून वेगळेपण लागतेच. कधी ज्वारीबाजरीचे मायाळू कण, तांदुळाचे शुभ्र एक प्रकारचा तलम भास देणारे राजस कण, सणासुदीला भाजणीचे खमंगपण, कधी चुकार साबुदाणा वगैरे उपासाचे चोचले. पट्टा सुरूच. मनाचेही दळण असेच. दिवस रात्र सुरूच. अगदी झोपेतही ते विसावत नाही. प्रयत्न करूनही थांबत नाही. थांबवता येत नाहीच.

ठाण्याच्या घरी हातात चहाचा मग घेऊन मागल्या गॅलरीत मनाची पाटी कोरी ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत मी बसते. आजकाल जागोजागी उंच उंच बिल्डिंग उभारल्यामुळे आकाशाचा मुठीत मावेल इतकाच तुकडा दिसतो अशी एकीकडे तक्रार करणारे मन त्या वाहत्या तुकड्यातून इतक्या अनंत गोष्टी टिपू पाहते की गिरणीच्या पट्ट्याची गती धापा टाकू लागते. मुठीत मावणार्‍या आकाशात भरारी घेणारे मन, डाव्या व समोर दिसणार्‍या रस्त्यावर चोहोबाजू न्याहाळणारे मन, आसपासच्या खिडक्यांमधील वेगवेगळ्या मनांच्या आंदोलनांचा अदमास घेणारे मन, एक नं दोन... हे सारे टिपून घेत असतानाच समांतर धावणारी माझ्याही मनाची अजब खेळी. शक्य तितके मन कोरे ठेवण्याचा चुकार प्रयत्न आजही हाणून पडलेला दिसल्यावर तो खुळा प्रयास सोडून मी स्वत:ला स्वाधीनच करून टाकलेले. खाली डोकावून पाहत होते तर दुसर्‍या मजल्यावरील दातेकाकूंच्या गॅलरीशेजारील पाइपाला धरून एक छोटेसे पिंपळाचे रोप जीव धरू लागलेले. जेमतेम फूटभर उंचीचे रोपटे. त्यावर चार कोवळी पाने नुकतीच जन्मलेली दिसत होती. लाल तांबूस तपकिरी रंगांची ती नाजूक पानं दिसेल तितके जग किलकिल्या डोळ्यांनी असोशीने पाहत हसत होती. मन तिथेच घुटमळू लागले.... मनाला लगाम घालत नजर हटवली तरी हे हट्टी ते बेटे ऐकतेय थोडेच... पुन्हा त्या कोवळ्या जीवाभोवती रुंजी घालू लागले... अन हे काय...

अरे हो हो... इतक्या घाईने कुठे पळत सुटलेय आता. जरा अंधुक अंदाज येऊ लागलेला. गेल्या मायदेशीच्या फेरीत बसलेली एक जीवघेणी ठेच पुन्हा एकवार वर आलीये. आजचा फेरा ’ राधाक्काच्या ’ परसातल्या पिंपळाच्या पारावर... नक्कीच. तोच दिसतोय, माझा आवडता ’ अश्वत्थ ’. पिंपळाची कोवळी लुसलुशीत फिकट चॉकलेटी रंगाची तकतकणारी पालवी किती वेळ मी निरखत राहायची. नाजूकपणे अल्लाद बोटे फिरवून त्या कोवळिकीला स्वत:त उतरवत राहायची. पारावर बसून लोंबकळते पाय वाहणार्‍या वार्‍यासंगे व डोलणार्‍या पिंपळाच्या पानांसंगे तालात हालवतं जराश्या जून पानांची पिंकाणी करून वाजवण्यात किती किती आनंद होता. हे सगळं कुठेसं हरवून गेलय आजकाल. छोटी छोटी सुखं, संवाद विरत चाललेत.

वाड्याच्या उंचीच्यापेक्षा आणि त्यातल्या माणसांपेक्षाही सर्वार्थाने मोठा प्रेमळ पिंपळ. अपार उत्साहाने सळसळणारा. वार्‍यासंगे डोलणारा, टाळ्या वाजवणारा माझा लाडका पिंपळ. सूर्याची उगवती कोवळी किरणे अंगाखांद्यावर लेऊन पाराशेजारी असलेल्या देवळातल्या भूपाळीसंगे हलकेच झुलणारा. सकाळ चढू लागली की किरणांची मृदुता आग ओकू लागे. मग पिंपळाच्या सळसळीलाही जोर येई. जणू वाड्याला कामाला लावण्याची जबाबदारी स्वखुशीने घेतलेली होती त्याने. दुपार कलली की पोरंटोरं शाळेतून परतू लागत. पहिली धाव पाराकडे. दप्तर फेकून दमलेली लेकरं टेकत. पिंपळाला कोण आनंद होई. शक्य तितके स्वत:ला झुकवत पोरांशी प्रेमळ लगट करी. कधीमधी पोरं उगाच पानं ओरबाडत, खोडाची साल काढत. पोरांचा खोडसाळपणाही आजोबांच्या मायेने कानामागे टाकून देई. पोरं पळाली घरी की वाड्यातल्या आज्या वाती वळत सुखदु:खाचे गूज एकमेकींना सांगत. अगदी मन लावून तो ऐकत राही. ऐकताना निर्विकार, स्थितप्रज्ञाचा आव आणून वाड्यातल्या एकेका घराचा खरा आरसा पाहत राही. कधी गूज आनंदाचे तर कधी अश्रूंची बरसात घेऊन येणारे. या सगळ्या सुना म्हणून वाड्यात आल्या तेव्हांपासून आपल्या अंगाखांद्यावर विसावल्या. यांची सगळी स्थित्यंतर आपण पाहिलीत. पोरींनो, अगं मी आहे बरं भक्कम उभा तुमच्यासाठी. जे आपले नव्हते नं त्यासाठी टिपं गाळूच नका. सुखं दु:खं असं काही नसतंच मुळी. हे भोग आहेत असंही म्हणू नका. जीव कष्टी झाला की इतरांकडे पाहायला शिका. आता हेच पाहा नं, शब्दांना भावना आहेत का? नाहीतच. नुसती अक्षरांची जुळणी केलेली. पण जेव्हां त्यात तुम्ही स्वत:ची सुखदु:ख भरता तेव्हां ते तुमच्या आनंदाने हसतात / तुमच्या दु:खाची ओझी वाहतात. जीव गुंतवूनही निर्विकार राहायला शिका गं माझ्या लेकींनो. माझा योगी पिंपळ लेकींची समजूत काढत असलेला.

दिवेलागण होई. अंगणात धुडगूस घालणारी लेकरं, आज्या, क्वचित सुना, लेकी घरी जात. तिन्हीसांजेची किंचितशी आलेली मलूलता, उदासीनता समईच्या प्रकाशाने उजळून निघे. घाईघाईने कोणीतरी येऊन देवळातली पणती लावून जाई. लेकरांच्या शुभंकरोती, परवाच्यांच्या तालावर वाड्याचा आत्मा डोलू लागे. कामावर गेलेले बाबाही नुकतेच परतू लागलेले असत. घराघरातून चुली धूर ओकू लागत. सुग्रास ऊन ऊन अन्नाचा दरवळ आसमंत भरू लागे. पणतीच्या मंद सोबतीने पिंपळही काहीसा शांत होई. दिवसभराच्या सळसळीने किंचित दमलेला पिंपळ त्याच्या लेकरांच्या घराघरातील सौख्याचा हलकेच अदमास घेऊ लागे. चुलीशेजारी दिसणारा लालबुंद रसरसलेला मायाळू भाव साठवून घेई. मायेच्या प्रेमाची उतरलेली चव चाखून तृप्त होणारी पोटं, ढेकरांचे पावती देणारे आवाज कानावर येत. चुलीवर पाणी पडे, पोतेरे चढे. निरवानिरव झाली की अंथरुणे पडत. हळूहळू रात्र गडद होऊ लागे. आपापल्या वाट्याच्या श्रमाने दमलेली पोरं, आया, बाबा, आज्या, आजोबा आजच्या दिवसाची सांगता करू लागलेली. त्यांच्यासंगे वाडाही डोळ्यात नीज भरू लागे. निरव शांतता. गाढ झोपेत डोळ्यांत स्वप्न भरू पाहणार्‍या मनांचे एका लयीतले श्वास खोल्यांखोल्यांतून ऐकू येऊ लागत. त्यांना स्वप्नांच्या आंदोलनावर अलवार झुलवत ठेवून पारावर विसावलेल्या कुत्र्यांना कुशीत घेऊन पिंपळही वरकरणी स्तब्ध होई. मन मात्र टक्क जागे... आठवणींची जपमाळ ओढू लागे.

आजही पुन्हा एकदा पिंकाणी करून आईसंगे ’ राधाक्काच्या ’ आठवणींची पोतडी उघडावी म्हणून धाव घेतली होती पण हे काय... पार तर जाऊदे पण पिंपळही दिसेना. डोळे बंद करून पाहतेय की काय मी. काहीतरीच गं. बंद नाही... डोळे फाडून फाडून पाहतेय पण एकही ओळखीची खूण दिसेना. जणू आख्खा वाडाच हरवलाय. ओह्ह्ह... ही टोलेजंग इमारत वाड्याच्याच जागी उभी आहे. अरे बापरे! हे कधी घडले? तरीच आई सारखी म्हणत होती, " तू नको बरं हट्ट करूस क्षेमकल्याणी वाड्यात जाऊ " चा. फार जीव कष्टी होईल तुझा. तू ओढीने मारे निघालीस बालपणीचे लोभस, निखळ आनंदाचे क्षण पुन्हा एकदा जगायला. पण तिथे आता संपूर्ण अनोळखी जग उभे आहे.  मी कुठली ऐकायला. आईला ओढत घेऊनच गेलेले. माझ्या बालपणाच्या खुणा मिरवणारा माझा प्रेमळ पिंपळ जमीनदोस्त झालेला. जणू तो कधीही तिथे नव्हताच. प्रगतीच्या सगळ्या भौतिक सुखसोयी पुरेपूर लेऊन उभी असलेली इमारत माझ्या पिंपळाचा अन वाड्याचा आत्माच गिळून निर्विकार तटस्थ उभी होती.

हे इतकं अनपेक्षित होतं माझ्यासाठी. सहनच होईना. माझ्याबरोबर अनेक मने आजूबाजूला कष्टी होऊन बसलेली दिसू लागली. जीव गुदमरला. राधाक्काच्या आठवणींच्या पोतडीत अजून एक भर... मन माघारी पळू लागलेले. काहीही उरलेले नाही तुझे आता इथे. राधाक्का गेली, वाडा पाडला, पिंपळही उखडला. आता पुन्हा असा हट्ट धरु नको बरं... असं म्हणत पाऊल उचलले तोच अजूनही जेमतेम तग धरुन असलेल्या, जागांच्या गगनाला भिडलेल्या भावानुसार स्वत:ला आक्रसून घेतलेल्या देवळाच्या मागल्या भिंतीतून त्या सिमेंटच्या आत्माहीन जंगलात एक नाजुकसे पिंपळाचे इवलेसे रोपटे जिद्द धरुन डोकावत होते. जणू माझ्या पिंपळाचा आत्मा घेऊन आलेले भासले. वाटले माझी तगमग त्याला कळलेलीच. म्हणूनच मला आश्वस्त करायलाच जणू इवलाली पाच सहा कोवळी पाने हसत होती. बयो, मी आहेच बरं. इथेच आहे. नको उगा राग धरूस. शेवटी ही ही आपलीच माणसे गं! इतके शिकवले तुला, विसरलीस का? भावनांचे, प्रेमाचे, गुंतल्या जीवाचे ओझे वाहू नकोस. माझ्यासारखी सगळ्यात असूनही नसल्यासारखी राहा बयो! असून नसल्यासारखी राहा! रुजत राहा अन रुजवत राहा!

Thursday, February 14, 2013

गाजर हलवा


थंडी आली की खूपश्या गोष्टी ओघानेच येतात. वातावरणात एक सुखद उल्हासदायी, चित्त उत्फुल्ल करणारा गारवा भरून असतो. नेहमीच, कुठल्याही वेळी तितकीच तरतरी देणाऱ्या चहाची महती काय ती वर्णावी. तरीही थंडीत सकाळी सकाळी झोपाळ्यावर झुलत आले, गवती चहा व वेलदोडा घालून केलेला चहा कोवळ्या उन्हात शाल लपेटून पिण्यातली लज्जत भारीच! कपाटात मागे ठेवलेले स्वेटर, शालींना त्या निमित्ते हवा लागते. थंडीत लग्नाचे आमंत्रण आले की मला खूप आनंद होतो. एरवी उकाड्याने जरीची साडी नेसली तरी तिचे सुखं मिळत नाही. थंडीत मात्र छान मिरवता येते.

उन्हाळ्यात घामाच्या धारांनी बेजार झाल्याने खाण्याची वासनाच कमी होऊन जाते. त्याचे सगळे उट्टे थंडीत पुरेपूर भरून काढता येते. हुरडा, निखार्‍यावर भाजलेले बटाटे, कांदे, ज्वारीबाजरीची गरम गरम भाकरी, लसणाची चटणी, वांग्याचे भरीत, वाफाळती कढी, खास खांदेशी झुणका, डाळबाटी... उंधियो, घरी बनवलेले पॉटमधले किंचित खारट खारट आइसक्रीम... यम्म! थंडीत नेमेची येणारा दिल्ली मटार... त्याच्या गरम गरम तिखटमिठाच्या करंज्या. अप्रतिम!   संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, गुळाची पोळी.. अहाहा!

अश्या या गुलाबी थंडीत गुलाबी रसाळ गाजरांची बाजारात लयलूट असते. एरवी पाणी मारून तजेला आणायचा प्रयत्न केलेली गाजरे कुठे आणि ही रसरशीत गाजरे कुठे. गेल्या आठवड्यात इंडियन स्टोअर मध्ये गेले तर समोरच होती. त्यांचा गुलाबी तजेला लक्ष वेधून घेत राहिला. मग काय आणावीच लागली. गाजर हालवा म्हटलं की मला अगदी लीला चिटणीस, निरुपा रॉयपासून रती अग्निहोत्री पर्यंतच्या सगळ्या ' माँ ' ओतप्रोत माया गाजर हलव्याच्या वाटीत भरून ' बेटा ' ला खिलवताना दिसतात. हिंदी सिनेमाच्या अतिरेकी ' गाजर हालवा झिंदाबाद ' मुळे कधीकधी जरा अतीच गुडीगुडी वाटणारा ' गाजर हालवा ' खरेच खास लागतो.

वाढणी : 

मध्यम आकाराच्या आठ वाट्या... आता या आठ माणसेही खाऊ शकतात किंवा दोघेच मटकावू शकतात.

मी यावेळी गाजर हालवा पूर्णपणे मायक्रोव्हेव मध्ये केला आहे. म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार व मायक्रो नुसारचीही कृती देतेय. मायक्रोमध्ये केल्यामुळे महत्त्वाचा फायदा : जळण्याची, खाली लागण्याची भीती शून्य. बॅचलर्सनाही सहज करता येईल अशी सुटसुटीत कृती.


साहित्य :

गुलाबी-लालसर रंगांची रसरशीत गाजरे एक किलो

चार चमचे तूप

पाव किलो साखर

दोन कप दूध किंवा एक वाटी खवा किंवा स्विटन कंडेंस मिल्क चा एक टीन

काजू, बदाम, बेदाणे, पिस्ते ( ऐच्छिक ) तीन चमचे

वेलदोड्याची पूड एक चमचा

कृती :

पारंपरिक :

गाजराचे साल काढून स्वच्छ धुऊन घेऊन किसावीत. जाड बुडाच्या भांड्यात तूप व गाजराचा कीस घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटे ठेवावा. झाकण काढून नीट हालवून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावा. दूध घेणार असाल तर कोमट दूध घ्यावे. फ्रीजमधले काढून घालू नये. दहा मिनिटांनी कोमट दूध घालून मिश्रण नीट हालवून पुन्हा दहा मिनिटे शिजू द्यावे. आता कीस हालवताना मऊसर लागू लागेल. साखर घालून पुन्हा दहा मिनिटे शिजू द्यावे. आंच मध्यमच ठेवावी. दूध संपूर्ण आटले की काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे व वेलदोड्याची पूड घालून एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. गाजर हालवा गरम, रूम टेंपरेचर आणि थंड केलेला... कसाही सुंदरच लागतो.  

खवा घालायचा असल्यास हाताने जरा मोडून मोकळा करून घ्यावा. स्वीटंड कंडेंन्स मिल्क घालणार असल्यास साखर आधी घालू नये. बरेचदा वेगळी साखर घालायची गरज पडतच नाही. म्हणून कंडेंन्स मिल्क घातल्यास चव घेऊन पाहिल्या शिवाय वरून साखर मिसळू नये. अन्यथा अती गोड होईल.

मायक्रोव्हेव कृती :

गाजरे किसून घेतल्यावर मोठ्या मायक्रोव्हेव सुरक्षित काचेच्या भांड्यात कीस व तूप एकत्र करून पाच मिनिटे ठेवावे. नंतर हालवून पुन्हा पाच मिनिटे. असे चार वेळा करावे. प्रत्येक वेळी मिश्रण हालवायलाच हवे. वीस मिनिटांनी दूध/ कंडेंन्स मिल्क/ खवा मिसळून पाच मिनिटे, असे तीन वेळा ठेवावे. आता मिश्रण हालवून कितपत शिजले आहे याचा अंदाज घ्यावा. छान मऊसर लागत नसल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. आता त्यात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे व वेलदोड्याची पूड घालून हालवून पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. लुसलुशीत, लालसरगुलाबी तुकतुकीत गाजर हालवा तयार.टीपा :

गाजरे घेताना ती ताजी व रसरशीत आहेत हे पाहून घ्यावे. गाजरे जर चांगली नसतील तर हालवा छान लागणार नाही.

फॅट फ्री : दूध, कंडेंन्स्ड मिल्क, इवॅपोरेटेड मिल्क यातले काहीही घातले तरी हालवा तितकाच चविष्ट होतो जितका खव्याने होईल.

तूप जास्ती घालू नये. अजिबात गरज नसते.

पारंपरिक / मायक्रोव्हेव कसाही करा, पाणी जराही घालू नका. अगदी पाण्याचा वरून हबकाही नाही. गाजराचा कीस हा संपूर्णपणे वाफेवर शिजवायचा आहे. म्हणूनच आंच कमी व झाकण ठेवून संयमाने शिजू द्यावा.