जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, May 27, 2010

तडका डाळ

डाळ : आपल्याकडे बहुतांशी घरात रोज सकाळ-संध्याकाळच्या जेवणात बनवली जाणारी असून मुख्य पदार्थात गणली जाते. डाळीचे विविध प्रकार असून आकर्षक रंग व खास चवी आहेत. भरपूर प्रोटीन असलेली डाळ प्रत्येक जेवणात गरम भात/पोळी बरोबर खाल्ली जाते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो असता बहुतांशी मागवलीच जाते. लहान मुले-मोठी सगळ्यांची पसंदीदा व हमखास आवडणारी. इतर पदार्थ कसे लागतील, आपल्याला आवडतील का? त्यांच्या चवीबद्दल मनात संभ्रम असतो परंतु तडका डाळ कुठेही गेले तरी चांगलीच असते असा सर्वसाधारण अनुभव येतो. ’सेफ ’ प्रकारात मोडणारी, दगा न देणारी. ( अपवाद असतीलच )

तडका डाळ/ डाल फ्राय, ही उत्तर भारताची विशेषतः पंजाबची खासियत आहे. तूर, मूग मसूर, उडीद व चणा अशा प्रामुख्याने डाळी आपण वापरतो. या प्रत्येक डाळीला स्वत:चा एक खास स्वाद असून अनेकविध पद्धतीने त्या बनविता येतात. बरेचदा दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा या पाचही डाळी एकत्र करून चविष्ट डाळ सहजी बनवता येते.

आज आपण वेगवेगळ्या डाळींची चविष्ट-दळदार किंचित मसाल्याचा स्वाद व सुगंध देणारी अशी तडका डाळ करुयात.

साधारण तीन माणसांकरिता पुरावी.

साहित्य :

अर्धी वाटी तूर डाळ
पाव वाटी मसूर डाळ
पाव वाटी मूग डाळ ( साल काढलेली )
उडीद व चणा डाळ : दोन्ही मिळून पाव वाटी

एक मोठा टोमॅटो चिरून
एक मध्यम कांदा बारीक चिरून
२/३ कप पाणी ( जशी लागल्यास अजून घ्यावे )
१ मोठा चमचा तेल ( सूर्यफूल, सफोला, शेंगदाणा, जे आवडेल ते घ्यावे )
१ मोठा चमचा साजुक तूप
२ हिरव्या मिरच्या पोट फोडून
५/६ कढिलिंबाची पाने
२/३ लाल सुकवलेल्या मिरच्या
३/४ लसूण पाकळ्या ठेचून
चवीनुसार मीठ

फोडणीसाठी : मोहरी, जिरे, हिंग व हळद.
सजावटीसाठी : दोन चमचे चिरलेली कोथिंबीर


कृती :

डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात. प्रेशर कुकरच्या भांड्यात डाळी व दोन कप पाणी घालून मध्यम आचेवर ठेवून २ शिट्ट्या करून घ्याव्यात. कुकर निवला की डाळीचे भांडे काढून घेऊन शिजलेली डाळ चांगली घोटून घ्यावी. चांगली शिजलेली असल्याने पटकन घोटली जाते व मिळून येते.

मध्यम आकाराची कढई/पातेल्यात एक चमचा तेल घालून मध्यम आचेवर ठेवावे. तेल चांगले तापले की मोहरी घालावी. ती तडतडली की हिंग, हळद, घालून फोडणी करावी. मिनिटभराने यात चिरलेला कांदा घालून पाच मिनिटे परतावे. कांदा पारदर्शक दिसू लागला की टोमॅटो व मीठ घालून परतावे. तीनचार मिनिटांनी घोटलेली डाळ व कपभर पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. दहा मिनिटे मध्यम आचेवरच ठेवून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे.

फोडणीच्या पळीत तूप घालून मध्यम आचेवर ठेवावे. तूप तापल्यावर जिरे घालावे. ते तडतडले की थोडा हिंग घालून लसूण टाकावा. लसूण लालसर - कुरकुरीत झाला की कढिलिंब व सुक्या लाल मि्रच्या टाकून मिनिटभर परतून आच बंद करावी. लगेचच ही फोडणी डाळीवर घालून झाकण ठेवावे म्हणजे फोडणीचा स्वाद डाळीत मुरेल. वाढताना चिरलेली कोथिंबीर घालून गरमच वाढावी.

तडका डाळ वरण/सूपसदृश्य प्यायची असल्यास थोडी पातळ करावी. पोळी बरोबर लावून खायची असल्यास जराशी घट्टच असू द्यावी. दळदार राजेशाही तडका डाळ जिरा राईस बरोबर मस्तच लागते. वाटीत घेऊन नुसतीही खाता येते. चिप्स, वेफर्सना लावूनही खाता येते.

टीपा:
आवडत असल्यास सालासहीत असलेली मुगाची डाळही घालता येईल. उडदाची व चण्याची डाळ घालताना दोन्ही मिळून पाव वाटी भरेल असे प्रमाण घ्यावे. उडीद व चणाडाळ दळदार असते व या दोन्हीमुळे तडका डाळीची खुमारी अधिकच वाढते.

Thursday, May 13, 2010

भोचकपणा नुसता.....

कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे..... " असे म्हणून माझ्याकडे पाहत हळूच डोळे मिचकावत सोनेरी-लालसर रंगाची भरभरून उधळण करून आसुसून साथ देऊ लागते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याच्या शीतल लहरी, त्यावर सळसळणारी गुलमोहोराची, पिंपळाची पाने.... फांद्यांफांद्यांतून वारा बागडेल तसतसा उठणारा शीळेचा नाद..... डवरलेल्या पारिजातकाची मुक्त उधळण, जमिनीशी लगट करणारी नाजूक नाजूक शुभ्र फुले व केशर सांडणारी देठे....... सारे चराचर आल्हाददायी झालेले.......

घर अजून शांतच असते. प्रत्येकाच्या संथ, एका लयीत चाललेल्या श्वासोच्छ्वासाचे, चेहऱ्यावरील अर्ध जागृत निद्रेतील भाव - स्वप्नांच्या रेंगाळलेल्या खुणा टिपत, गुणगुणत मी स्वयंपाकघरात शिरते.....
"असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा,
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा.....
भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे,
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने,
हुंकारातून असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा... " मला कशामुळे इतके प्रसन्न वाटतेय हे शोधण्याच्या भानगडीत न पडता भरभरून हा आनंद मी स्वत:त भिनवून घेते. हो नं, न जाणो अचानक संपला तर...... आज तोही माझी साथ सोडायला बिलकुल उत्सुक नसतोच. मोलकरीण वेळेवर येते, लेकाने दप्तर रात्रीच भरून ठेवलेले असते. पहिल्या हाकेला उठून अगदी शहाण्या बाळासारखा आवरून उड्या मारत तो शाळेत जातो. रिक्षावाले काका स्वत: वर येऊन त्याला घेऊन जातात. नवऱ्याच्या शर्टाची बटणे धारातीर्थी पडलेली नसतात. आवर गं पटापट, तुला सोडतो आज स्टेशनवर असे तो मनापासून म्हणतो. एवढेच नाही तर आज डब्यात भाजी कुठली असेही विचारत नाही. मी माझ्याच नादात गुणगुणत राहते......, " गीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा, स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले, साजणा........ "

मन प्रसन्न असले की ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर, अंगावर बिलगून राहते. समोरून पाहाणाऱ्यालाही ती पोचतेच. माझा आवडता पंजाबी घालून जरा सैलसरच शेपटा, कुंकू लावून मी खाली उतरते. तोवर नवरा स्कूटर काढून गेटवर उभा असतो वाट पाहत.... आणि अचानक समोरून मैत्रीण येते. अगदी नखशिखान्तं मला न्याहाळते. मी कावरीबावरी. अशी काय पाहतेय ही......मला उगाचच वाटून जाते..... संडे इज लॉंगर दॅन मंडे झालेयं की काय..... छे! असे कसे होईल....... नाडी तर नीट बांधली होती मी..... तिचे असे माझ्या आरपार पाहणे संपतच नाही. मी वेंधळ्या हालचाली करत ओढणी सावरत चुळबुळत राहते...... ती निरखतच विचारते, " काय खास? नाही म्हणजे ऑफिसातच जाते आहेस नं? की...... बरीच रंगरंगोटी केली आहेस ती ...... "

आता माझी सटकते...... एक तर सरळ सहजपणे म्हणायचे, " अगं, कसली गोड दिसते आहेस तू आज..... एकदम मूडमें नं...... सहीच रे! माझाही दिवस आज मस्त जाईल बघ....... " पण हे शब्द तोंडातून कसे निघावे.... तोंडावर साधा पावडरचा पफ काय फिरवलाय... तर टवळी म्हणतेय रंगरंगोटी करून कुठे निघालीस........वाटते जीभेची तलवार चालवावी अन तटकन घाव घालावा...... टाकावे बोलून .... " तुझ्या तेलकट, मेणचट, सदाच दुर्मुखलेल्या मुखकमलावर इतकी लिपस्टिक बरबटवली आहेस नं ती जरा पूस गं..... कमीतकमी दहा-बारा जणींचे ओठ रंगतील....... " पण मी तिला असे टोचून मला आनंद मिळेल का? छे! उलट दिवसभर मी स्वत:ला कोसत राहीन....... मग माझा आनंद कशाला संपवा- दिवस फुकट घालवा... ( खरे तर इतके बोचरे बोल बोलायची माझ्यात हिंमतच नाहीये..... भिडस्तपणा जन्मजात मुरलेला आहे अंगात....... म्हणून मग स्वत:चीच समजूत घालून घ्यायची झालं........ ) पण आज मनही बेटे ऐकेना, " अय्या! कशी गं तू मनकवडी..... बरोबर ओळखलेस. आज नं डेट आहे डेट....... " असे म्हणून तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे व वासलेल्या तोंडाकडे पाहत मी डोळे मिचकावत पळते ती थेट नवऱ्याच्या मागे जाऊन बसते. ती अजूनही तशीच भिरभिरलेली. ते पाहून नवरा विचारतो, " काय गं, अशी भूत बघितल्यासारखी का पाहतेय ती........" " काही नाही रे....... मी ' डेटला ' चाललेय असे सांगितल्यामुळे बावचळलीये ती..... आता दिवसभर बसेल अशीच आ वासून..... तिला सोड..... चल तू.... आज मस्त गाडी पळवं...... आज मोगॅंबो खूश हैं...... "

आता काहीतरी गरज होती का तिला हा भोचकपणा करण्याची.... कुचकट कुठली...... जणू काही खास लायसन्स दिलेय असे बोलण्याचे ...... पदोपदी ही अशी माणसे सारखी ढवळाढवळ करतच असतात. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचे आणि दुसऱ्याला लागट बोलत राहायचे....एक से एक नमुने...... " बाहेर निघालीस? इतक्या उन्हाची? कुठे गं? " असेच जरा काम आहे काकू.... म्हणून टाळले की.... " हो का..... अग, काम असणारच गं.... पण इतक्या तातडीने जाते आहेस म्हणून विचारले..... नाही म्हणजे नसेल सांगायचे तर नको सांगूस हो....... मी काळजीपोटी विचारत होते.... तरी पण.... ठाण्यातच जाते आहेस की अजून....... " सोडणार नाही..... छ्ळतच राहणार......

" दुसऱ्याच्या घरात काय चाललेय हे आपल्याला कळलेच पाहिजे..... नव्हे तो आपला हक्कच आहे " असे मत बऱ्याच जणांचे असते. गंमत म्हणजे स्वत:च्या घरात काय काय घडतेय याचा मात्र यांना पत्ता नसतो आणि कळवून घ्यायची गरजही नसते. असेच एकदा एक ओळखीचे काका बिल्डिंगमधल्याच एका लहान पोराला पकडून विचारत होते, " काय रे, काल आई-बाबा भांडत होते नं तुझे? काय झालेले? मग आई रडली नं.... मला ऐकू येत होते....." तो चारपाच वर्षांचा मुलगा बिचारा रडकुंडीला आलेला..... आणि काकांची सरबत्ती चालूच.... मी चटकन पुढे होऊन लेकराला गोंजारले आणि ते बघ तुझे मित्र बोलवताहेत तुला... पळ की.... असे म्हणत काकांच्या हातून त्याचे बखोट सोडवले...... चटदिशी पळाला तो... जणू कुठल्या शिक्षेतूनच सुटला होता. बिचारा......

काकांना म्हटले, " काका, अहो काय हे...... आधीच पोरगं घाबरलेय..... तुम्हाला कशाला हव्यात नको त्या चौकश्या? किती लहान आहे तो...... इतके चैन पडत नसेल आणि धमक असेल तर जा की त्याच्या बाबाला जाऊन विचारा नं...... एवढुसा जीव बिचारा, किती भेदरला होता...... त्याला का छळतायं...... " हे ऐकले मात्र..... ते खवळलेच एकदम, " हेच नं...... आजकालची तुम्ही मुलं, फार आगाऊ झाला आहात........ का? का म्हणून नको विचारू मी त्याला........ एका बिल्डिंगमध्ये राहतो नं आपण. मग...... कळायला नको कोणाच्या घरात काय चालते ते...... काही सामाजिक जबाबदारी आहे का नाही....... विचारीन, त्याच्या बापालाही विचारीन जाऊन..... काय घाबरतो की काय मी..... " असे म्हणत ते तणतणत निघून गेले. हम्म्म..... सामाजिक जबाबदारी....... मी कपाळाला हात लावला......... डोळ्यासमोर सारखा खेटरं खाऊन परत आलेल्या काकांचा चेहरा तरळत राहिला......

काही लोक कहर असतात अगदी. सरदेसाई हे आडनाव सारस्वतांमध्ये आहे, कऱ्हाड्यांमध्ये आहे.... आणिकही कोणात असेल. दोघांचेही कुलदैवत शांतादुर्गाच. सारस्वतांमध्ये हे आडनाव जास्त फ़ेमस. दिलीप सरदेसाई, राजदीप सरदेसाई..... त्यामुळे सरदेसाई म्हणजे सारस्वतच हे समीकरण रूढ झालेयं. तर एकदा अश्याच एका मैत्रिणीशी गप्पा सुरू होत्या...... तुम्ही कुठले आम्ही कुठले....... गाव कुठले - कुलदैवत कोणते....... मी आपले सांगितले, " आम्ही नं, देवरूखजवळ एक छोटेसे गाव आहे वांजोळे म्हणून, तिथले. कुलदैवत शांतादुर्गा. " लगेच मैत्रीण म्हणे, अग ती अमुक तमुक म्हणत होती की तू तर सारस्वतच आहेस पण सगळ्य़ांना चक्क खोटे सांगतेस की मी कऱ्हाडे आहे म्हणून...... म्हणत होती, पक्की मासेखाऊ असेल ती. मी अवाक. मुळात मी चुकूनही कोणालाही जात विचारत नाही. जातपात मी मानत नाही तेव्हां पुढचे प्रश्नच मला पडत नाहीत. संवादाचा - मैत्रीचा आणि जातीचा काही संबंध आहे का? शिवाय हे असे खोटे सांगण्याने माझा कुठला फायदा होणार होता....... मासेखाऊ असेन तर अगदी छाती ठोकून सांगेन नं आहे म्हणून..... मासे खायची काय चोरी आहे का? " अगं काहीतरीच काय, मी कशाला खोटे सांगेन.... जा पाहिजे तर माझ्या सासूबाईंना विचार जाऊन........ आणि तिचे मरू दे गं पण तुलाही खरेच असे वाटते का की मी खोटे सांगतेय..... " हे विचारल्यावर मैत्रीण म्हणे, " अग अगदी तसेच नाही गं...... पण, आजकाल कोणाचा काय भरवसा द्यावा....... " मी नादच सोडला. मला काय फरक पडतो कोणी काही का समजेना ....... पण........ मन दुखलेच.

खूप दिवस मनात होते.... छानशी पैठणी घ्यावी. आता पैठणी काही रोज नेसता येत नाही... कपाटाचीच धन होणार. हे सगळे कळतेय..... पण हौस असतेच नं..... तर मी व आई गेलो पैठणी घ्यायला. गिरगाव पंचे डेपोमधून पैठणी घेतली आणि दुकानाची पायरी उतरलो तोच समोर वरच्या काकू दत्त म्हणून उभ्या....... एक तर गिरगाव पंचे डेपो हेच मुळी एक मोठे प्रकरण आहे. पैसे देऊन साडी घ्यायला गेलोय का घोडचूक करायला......... असा प्रश्न पडावा आणि आपणच आपल्याला दोन चापट्या मारून घ्याव्यात, अशी गत.... त्या दिव्यातून पार पडून घेतलेली पैठणी अजून नीट मनभरून पाहिलीही नाही तोच या काकूंचे दर्शन.......

आम्हां दोघींकडे व हातातल्या पिशवीकडे पाहत, " काय..... मायलेकी अगदी गळ्यात गळा घालून फिरतायं..... खरेदी का? वा.... वा...... काय घेतलेस गं? पाहू तरी मला......" ( खसकन माझ्या हातातली पिशवी ओढून भसकन पैठणीची घडी विस्कट्त बाहेर काढलेली पाहून माझा जीव कळवळल्याने.... न राहवून..... मी एक क्षीण प्रयत्न करत म्हटले..... ) " काकू.... अहो जरा हळू तरी..... चुरगळतेय हो...... " माझ्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत किती गं बावळट तू असा आविर्भाव चेहऱ्यावर व शब्दाशब्दात ठासून भरत, " बाई बाई...... अगं किती हा पैशाचा नास. कुठे मिरवणार आहेस तू ही नेसून..... पाहावं तेव्हा तर जीन्स मध्ये असतेस..... तुमच्या त्या अमेरिकेत का घालणार आहेस ती..... जळ्ळलं मेलं लक्षणं..... आता जाशील इथेच कपाटात ठेवून. त्यापेक्षा सिफॉन- सिल्क काहीतरी हलकेफुलके घ्यायचेस नं..... अहो भाग्यश्रीच्या आई तुम्ही तरी सांगायचेत तिला...... कसली मेली हौस.... एक नाचली की लगेच सगळ्यांची सुरवात..... शोभते का हे वागणे..... " हे बोलून काकू गायब.

किती हा भोचकपणा ........ काहीतरी गरज होती का याची? मी पैठणी नेसेन.... कपाटात ठेवीन... अमेरिकेत आणेन..... नाहीतर कात्रीने कापून त्याचे पडदे बनवेन....... तुम्हाला काय करायचयं? विचारायला आले होते का मी? किती हौसेने गेलेलो आम्ही दोघी.... तासभर पंच्यांचे टिपीकल कुचकट शेरे ऐकून ( जणू गिऱ्हाईकावर मेहेरबानीच केलीये दुकान थाटून ) त्यांना पुरून उरत घेतलेली माझी सुंदरशी पैठणी बिचारी मलूल होऊन गेलेली पाहून भडभडून आले मला. पुन्हा काकुंच्या या तोफखान्याला प्रत्युत्तर देण्याआधीच त्यांनी पलायन केलेले...... पैठणी घेऊन झाली की मस्तपैकी मंजूचा वडा चापू गं असे मनाशी ठरवून निघालेल्या आम्ही दोघी आमचाच वडा झाल्यासारख्या पाय ओढत घरी आलो.

घरातलेच आपले म्हणवणारे लोकही कधी कधी इतका अति भोचकपणा करतात नं ........ माझ्या एका दूरच्या बहिणीने माझ्या आईला फोन केला. नेमकी मीही आईकडे होते. " आज कसा गं हिचा फोन आला..... एरवी तर चुकून कधी साधी चौकशीही करत नाही.... " आईच्या मनात आधीच पाल चुकचुकलेली. दोन मिनिटे उगाच इकडचे तिकडचे काहीतरी बोलून झाल्यावर म्हणे, " मामी, अगं मी नं एका इन्शुरन्स कंपनीचे काम करतेय. उद्याच येते बघ तुझ्याकडे..... तू आणि मामा घेऊन टाका एक एक छोटिशी पॉलिसी, फक्त दहा दहा लाखांची. " मला हे काही ऐकू येत नव्हते.... पण आईच्या कपाळावरची शीर तडतडायला लागलेली पाहिली आणि समजले की काहितरी पेटलेयं........ तरी आई संयम ठेवून म्हणाली, " अगं, आम्हा दोघांची कसली पॉलिसी काढतेस आता या वयात..... ती मॅच्युअर होण्याआधीच आमची रवानगी होणार आहे इथून.... आणि रिटायर्ड माणसांकडे कुठले आले गं इतकाले पैसे....... बरं तुझ्या मामाला पेन्शनही मिळत नाही. "

हे ऐकताच आमची ही भोचकभवानी म्हणते कशी, " अगं मामी, तुम्ही गचकलात तरी मुले आहेत की... त्यांना होईल...... आणि मामाला पेन्शन नसले म्हणून काय झाले.... आत्ताच तर घर विकलेत नं तुम्ही..... मग मिळाले असतील की खोऱ्याने पैसे..... काय कुजवायचेत का आता ते..... द्या की मला त्यातले थोडे. " आमची आई सिंह राशीची........ उगाच सिंहाला डिवचू नये हेच खरे....... एकदा का तो संतापला नं की मग मात्र...... " अगं तुझा मामा दोन वेळा हॉस्पिटलात अगदी मरणाच्या मुखात होता....... इतकाले पैसे लागले ऑपरेशनला...... कसे उभे केले असतील मामीने- तिच्या मुलांनी.... आलीस का विचारायला...... ते सोड गं...... ढांगभर अंतरावर राहत होतीस साधा एक वेळेचा गोळाभर भातही आणला नाहीस शिजवून... जरा तेवढीच मामीला मदत. आणि आता पैसे कुजवायचेत का म्हणून विचारतेस तू......... आमच्या गचकण्याचे तुला काडीचेही दु:ख तर नाहीच वर सल्ले देतेस...... खबरदार पुन्हा फोन करशील तर....... " असे म्हणून आईने फोन आपटला..... आहे की नाही कमाल भोचकपणाची......

Sunday, May 9, 2010

टाको

आज फार कंटाळा आला होता. एकतर सगळी सकाळ खूप उदासवाणी गेली. हळहळ - हुरहूर - अगदी मी का नाहीये तिकडे...... असे फुरंगटून, रडक्या आवाजात म्हणूनही झाले. आत्ता किती हल्लागुल्ला असेल ना चालू... नेमकी मी मात्र या आनंदाला मुकलेय.... दुधाची तहान ताकावर... आय मीन फोनवरच्या बोलण्यावर भागवायचा प्रयत्न केला खरा पण....... होय हो मी त्याबद्दलच बोलतेयं...... आमची सकाळ म्हणजे मायदेशातली संध्याकाळ... ९ तारीख... ' मुंबईतील ब्लॉगर्स मेळावा ' होता नं आज. महेंद्र, अपर्णा, रोहन कडून एक छोटिशी पंधरा मिनिटांची झलक मिळाली आणि खूप बरे वाटले. महेंद्र, रोहन, कांचन व सगळ्या मित्रमैत्रिणींनी हा मेळावा यशस्वी केला. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!

महेंद्र, तू फोन करशीलच याची खात्री होतीच. थँक्स रे, आवर्जून लगेच फोन केलास. आता फोटो-चित्रफिती व पोस्टसची वाट पाहतेय. अपर्णा म्हणाली, मस्त वडे चापलेत.... बस ते ऐकले मात्र आणि लगेच निदान काहीतरी खादडंती तरी करावीशी वाटू लागली. पण मसालेदार, अती तिखटाचा मूड बिलकुल नव्हता. काहीतरी थोडे चिजी - जरासे मध्येच किंचित तिखट आणि फार खटाटोपही नको. काय करावे या विचारात आणि फोनाफोनीत सकाळ अशीच कंटाळत गेली. मनाचे पोट आज भरणे शक्यच नव्हते त्यामुळे ते आळसावलेले उदास असले तरी पोटाचे काय....... ते बेटे कुठले गप्प बसायला, लागले की गुरगुरायला. काय ती हुरहूर लागली आहे नं ती उपाशी पोटी नको..... मस्त भरल्या पोटी कर गं.... असे म्हणू लागताच उठावेच लागले. काय बरे करावे हा विचार करत स्वयंपाक घरात शिरले तोच समोरच टाको शेल्स दिसले. अरे वा! चलो आज टाको को थोडा मायदेशी स्टाइल मे ढालेंगे.... बस, मग काय.... बनवले फटाफट आणि मटकावलेही. चला आता भरल्या पोटी जरा तुम्हालाही खिलवावे आय मीन दाखवावे म्हटले......

वाढणी: तीन माणसांना पुरेल.

साहित्य:

६ तयार टाको शेल्स. ( सपाट बेस असलेले शक्यतो घ्यावेत )
एक मध्यम सिमला मिरची उभी पातळ चिरून
एक कांदा व एक गाजर उभे पातळ चिरून
पाच - सहा मशरूम्स उभे पातळ चिरून
मक्याचे व मटारचे कोवळे दाणे वाटीभर
अर्धी वाटी फरसबी छोटे छोटे तुकडे करून
तीन लसणाच्या पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
चार चमचे ऑलिव्ह ऑइल ( नसल्यास सनफ्लॉवर/सफोला/ शेंगदाणा कुठलेही चालेल )
तीन चीजच्या स्लाइस. ( किसलेले चीज एक वाटी )
दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा मिरपूड, एक चमचा पार्सली ( पूड ) व स्वादानुसार मीठ

थोडा चिरलेला पालक, लेट्युस व थोडीशी गाजरे घेऊन सजावट करावी.
कृती:

जरा पसरट कढई/नॉनस्टिक पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून मध्यम मोठ्या आचेवर तापत ठेवावे. तापले की लसूण, हिरवी मिरची व कांदा घालून तीन चार मिनिटे परतून त्यावर गाजर व सिमला मिरची टाकून चार-पाच मिनिटे परतावे. अर्धवट शिजले की मशरूम्स व मका-मटार-फरसबी टाकून आच मोठी करून तीन-चार मिनिटे परतावे. किंचित कमीच शिजवायचे असल्याने लगेच त्यावर तिखट, मिरपूड, पार्सली व स्वादानुसार मीठ टाकून सगळे मिश्रण एकजीव करावे. आच लहान न करता या मिश्रणावर चीजचे स्लाइस किंवा किसलेले चीज टाकावे व दोन मिनिटांनी आच बंद करावी. आता मिश्रण शक्यतो ढवळू नये.

एक एक टाको घेऊन हलकेच त्यात मावेल तितके मिश्रण भरावे . चीज जास्त हवे असल्यास वरून किसलेले चीज भुरभुरावे. आवडत असल्यास अवाकाडोचे तुकडे, सार क्रिमही घालावे. आतले सारण गरम असतानाच खायला द्यावे. चिप्स+सालसा व हे टाको, कंटाळवाण्या संध्याकाळी छान वाटतात व अगदी फटाफट होतात. रोजच्या पोळीभाजी पेक्षा थोडे जरा हटके, मुलांचे आवडते.टीपा:

मुलांच्या पार्टीसाठी एकदम हिट आयटम. त्यानिमित्ते भरपूर भाज्याही खाल्ल्या जातात. यात उकडलेला राजमा घालता येईल. तसेच चिरलेली काकडी व कैरीचे तुकडे लज्जत अजूनच वाढवतील. मात्र हे दोन्ही टाकोत मिश्रण भरल्यावर वरून घालावे. शिजवू नये. पालक दोन-तीन मिनिटे गरम पाण्यात टाकून काढून घ्यावा व टाकोवर पेरावा. बरेचदा लहान मुलांना व मोठ्यांनाही पालक आवडत नाही. म्हणून मिश्रणात टाकू नये. वाढताना विचारून वर पेरावा. मिरचीच्या तुकड्यांमुळे तिखटपणा येतो.

टाकोच हवेत असे नाही. बरेचदा अचानक हॉटेलात जायचा मूड बनतो आणि पोळ्या उरतात. अशा वेळी अशाप्रकारे मिश्रण बनवून पोळीत भरून गुंडाळी पोळी करून द्यावी. पोळीत भरण्याआधी तव्यावर अर्धा चमचा तूप टाकून पोळी दोन्ही बाजूने किंचित क्रिस्प होईल अशी शेकवून घ्यावी व मग मिश्रण भरून मस्त चीज भुरभुरून द्यावी. पोळ्या कधीनुक संपून गेल्या कळणारही नाही. आपल्याकडे बेकरीत मिळणाऱ्या पावाला अर्धे कापून, बटरचा हात लावून मस्त शेकवून घेऊन त्यात हे मिश्रण भरून ताव मारावा.

Thursday, May 6, 2010

राहिले ओठांतल्या ओठांत.....

काही गाणी अगदी मनात रुतून बसतात. आपलीच होऊन जातात. कधीही आणि कितीही वेळा ऐकली तरी तितकीच भावतात. त्यातले शब्द, संगीत, स्वर सारेच वेड लावणारे. हे गाणेही असेच..... बोल आहेत श्री. वा. रा. कांत यांचे तर संगीत दिलेय श्री. श्रीनिवास खळे यांनी आणि गायलेय माझ्या आवडत्या डॉ. वसंतराव देशपांडे यांनी.

राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझे
भेट होती आपली का ती खरी, कीं स्वप्न माझें ॥धृ॥

कापरे हे हात हातीं बावरे डोळ्यांत आसूं
आग पाण्यांतून पेटे जाळणारें गोड हांसूं
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचें तकदीर माझें ॥१॥

गर्द हिरवे पाचपाणी रक्तकमळें कुंकुमाची
खेळतांना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे, म्हटलेंस ना तूं, हें हवेंसें विश्व माझें ॥२॥

मी म्हणूं कैसें, फुला रे, आज तूं नाहींस येथें
वेल दारीं साईलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पें तोडिल्याविण, ये भरोनी पात्र माझें ॥३॥

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपली का ती खरी, कीं स्वप्न माझें ॥धृ॥

गाणे इथेच देण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जोडले जातच नाहीये. येथे ऐकता येईल. कोणाकडे हे गाणे सहजी जोडता येईल अश्या स्वरूपात असल्यास द्याल का? धन्यवाद.

Tuesday, May 4, 2010

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती. हुश्श..... मिळाली बाई एकदाची.

काय कोण जाणे पण समोर आलेली गाडी कुठल्याही कारणाने चुकणे म्हणजे ' घोर अपमान '
, लोकलशी बेईमानीच जणू. "क्या रे, इत्ता भी नही जमताय तेरेकु? कितने सालोंसे आ रही हो? ऐसे गाडी छोडनेका नहीं....... " कितीही गर्दी असो, गाडी या प्लॅटफॉर्मवरून अचानक ट्रॅक बदलून पलीकडच्या ट्रॅकवर अवतरो...... वाटेल ते झाले तरी हवी ती गाडी मिळालीच पाहिजे हा अलिखित करार होता. मीच माझ्याशी केलेला. कायमचा करार. काळ, वेळ व दुरावा या साऱ्यावर मात करणारा....... हाडीमाशी मुरलेला. आजही मी समोर आलेली गाडी चुकूनही सोडत नाही..... केलेला करार मोडत नाही.

आता समजा नसती मिळाली तरी काय मोठे बिघडणार होते..... दुसरी मागोमाग येतेच की...... बरे कोणी काही सक्तीही केलेली नाही की कोणी पारितोषिकही देणार नव्हते. पण नाही...... गाडी दिसताच कधी पावले धावू लागतात ते कळतच नाही. कशी गंमत आहे पाहा, आजही मी जेव्हां जेव्हां ठाण्यात जाते लगेच दुसऱ्याच दिवशी जाऊन पास काढते. सकाळच्या धावपळीचे - कोलाहलाचे - निवेदकांचे आवाज - त्यावरच्या माणसांच्या प्रतिक्रिया - ब्रिजवरून सुसाट धावणे, चालत्या ट्रेनमधून बरोबर गेटसमोर अलगद प्लॅटफॉर्मवर उतरणारे पाय, स्टॉलवरची लगबग, तिकीटांची लाईन, टीसी व त्याला पाहून मुद्दाम समोर येणारी किंवा हमखास पळणारी माणसे, सगळी जिवंत सळसळ आसुसून नसानसात भरून घेत निदान दादरपर्यंत तरी जातेच जाते. पासही केवळ आजवरच्या लोकलच्या कराराच्या बांधीलकीसाठी. नाहीतर अशी मी कितीवेळा जाणार असते..... फार तर दोन..... अगदीच डोक्यावरून पाणी तीनदा. पण पर्स मध्ये पास नाही म्हणजे जणू चाकातली हवाच काढून घेतल्यासारखे वाटते. कुछ तो भौत गडबड हो रहेली हैं रे चे फिलिंग देणारे...... उगाचच तुटल्यासाखे वाटत राहते.


काही सवयी जन्मजात अंगात मुरलेल्या...... लोकलचा पहिला डबा स्टेशनात शिरताच प्रतिक्षिप्त क्रियेने ओढणीची गाठ मारून पटकन ती पुढे येते, पर्स काखोटीला जाते. मंगळसूत्र चटदिशी ओढणीखाली दडते आणि कधी डब्याच्या पहिल्या नाहीतर मागच्या दरवाज्याचे हॅंडल पकडले जाते कळतही नाही. आतला रेटा उतरताच टुणकन उडी मारून एकदम आत घुसले की वीरश्री ओसरते. हे सारे करताना कुठलेही श्रम नाहीत की भीती नाही. जसे आपण बोलतो- चालतो तसेच हेही एक यावर समस्त लोकल परिवार एकमताने सहमत होईल.

रोजची गाडी तर मिळाली पण डबा चुकला होता. सेकंडमधून प्रवास करणे मला मनोमन भावते मात्र अतिरेक गर्दीमुळे नाईलाजाने मी शक्यतो पहिला वर्गच पसंत करी. फर्स्टमध्ये सगळे जरा तोऱ्यातच असतात. आता हा कसला तोरा हे मला कधीच न उलगडलेले कोडे आहे. एकेकाचे अजब प्रकार. अगदी रोजचे चेहरेही एकमेकांच्या आरपार पाहताना पाहिले की मला घुसमटून जायला होई. कोरा चेहरा आणि आक्रसून घेतलेली मने...... क्वचित एखादा दुसरा हल्लागुल्ला करणारा ग्रुपही दिसे...... नाही असे नाही...... पण त्याही चौकटीत अडकलेल्या. कोणालाही सहजी आपल्यात न सामावून घेणाऱ्या. उत्स्फूर्त होणारी शब्दांची देवाणघेवाण जवळजवळ नाहीच. मुळात फक्त तेराच सीट त्याच्या कश्याबश्या मेहरबानी खातर झालेल्या पंधरा-फार तर सोळा जागा. त्यातही सीटवर तासभर बसूनही उतरणारी आधी जागेवर उभी राहील. ओढणी-साडी नीट करेल, वरची पर्स काढेल.... आणि मग कोणाचाही स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेत दाराकडे वळेल. जणू बाकीच्या अछूत कन्या.....


कोणाची सुंदर साडी तर कोणाचा नवाकोरा पंजाबी, घातलेला मोगऱ्याच्या, चमेलीच्या कळ्यांचा घट्ट विणलेला गजरा तर कोणाच्या आकर्षक चपला........ एखादी गोडशी , नाकीडोळी रेखीव तर एखादी वेड लावणाऱ्या खळ्या गालावर अन अनेकांचे जीव त्या खळ्यांत ....... कोणाचे अपरे नाक तर कोणाचा लांबसडक शेपटा....... सगळ्याची नोंद मनात होत असते पण उघडपणे चटकन कोणी, " अगं, किती गोड दिसते आहेस गं. " असे म्हणणार नाही. एखाद्या जागेचाच दोष म्हणायचा की काय पण जरा रुक्षच मामला. अन त्या उलट सेकंडमध्ये पाहावे तर सगळे कसे भरभरून - फसफसून उतू जाणारे. मग त्या गप्पा असोत नाहीतर भांडणे असोत. कुठेही हातचे राखून काही नाही. जो भी कुछ हो पुरे दिलोजानसे....... सगळे कसे जीवनरसाने सळसळणारे. जिकडेतिकडे मोठे मोठे ग्रुप्स, त्यांचे खिदळणे, थट्टा, मध्येच खादाडी.....डोहाळजेवणे - वाढदिवस.... फेरीवाल्यांची लगबग....... मध्येच कचाकचा भांडणाचे आवाज तर कोणा गात्या गळ्यातून उमटणारी सुरेल तान....


घरातून निघताना कितीही धावपळ-तणतण झालेली असू देत. एकदा का या विश्वात प्रवेश केला की नकळत ताण हलका होतो. सगळे श्रम विसरून काहीसे हलके वाटते. तासाभरासाठी सगळ्या कटकटीतून झालेली मुक्तता. लोकलच्या तालावर..... दर स्टेशनागणिक उतरणाऱ्या - चढणाऱ्या मैत्रिणी, काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे..... एखादी नुकतेच लग्न झालेली....... लाजरी-बुजरी तर कोणी आठवा लागलेली...... अवघडून आलेली, कोणाचे स्वप्नाळू भावुक डोळे तर कोणाची चहाटळ-चावट छेडाछेडी ...... कोणाचे हळवे होऊन आसवे गाळणे तर कोणाचे घरच्यांच्या वागण्याने अगतिक होणे..... कोणाचा सात्त्विक संताप तर कोणाचा खुल्ला तळतळाट....... अनेक जणींसाठी हा सकाळचा व संध्याकाळचा लोकलचा एक तास खास स्वत:साठीचा..... हक्काचा कोपरा...... तरोताजा करणारा- भावना समजून घेणारा - ओढ लावणारा ..... जीवनरस देणारा. भले ही प्रत्यक्षात हाडामासाची नसेल पण हिला मन मात्र नक्की आहे आणि या मनाला हजारो चेहरे आहेत. अन या साऱ्या चेहऱ्यांत प्रेम - आपुलकी - स्नेह ठायीठायी समावलायं. एक आश्वस्त स्नेह.

" बाई बाई.... किती गं ही गर्दी.... कसा प्रवास करता तुम्ही दररोज कोण जाणे...... आमचा तर जीवच घाबरा होतो. लोकल समोर आली की पाय लटपटायला लागतात. गाड्यांवर गाड्या सोडत राहतो पण गर्दी काही संपत नाही. " मुंबई बाहेरच्या काही मैत्रिणींच्या या अश्या प्रश्नांवर मी नुसतीच हसते. काय आणि कसे सांगू हिला यातले रहस्य..... ते अनुभवायलाच हवे. तेही झोकून देऊन, हातचे न राखता......सर्वस्वी अधीन होऊन...... मग कितीही गर्दी वाढो...... मोटरमनचा संप होवो की पावसाने काही काळ गाड्या मंदगती चालोत-क्वचित बंदही पडोत.... का बॉम्बं ब्लास्ट होवोत...... या सगळ्यांना पुरून उरणारी, भरभरून जीवन देणारी व जीव जगवणारी, दिवसातले बावीस तास अव्याहत धावणारी........ अनेकांना हजारो करांनी आपल्यात सामावून घेत त्यांच्या जगण्याची गणिते जुळवणारी - सोडवणारी, आयुष्याचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होऊन राहिलेली प्रिय सखी ...... माझी व माझ्या सारख्या लाखों-करोडोंची लाईफलाईन...... लोकल.

फोटो जालावरून साभार.

Monday, May 3, 2010

संजीवनी....

गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. खूप रडवेली झालेली. दिवाळीच्या दरम्यान बाळ- लेक झाल्याने सध्या घरात नुसता दंगा-गडबड सुरू असलेली. लेक तर इवलीशीच आहे... ...मस्त निवांत काम. अंघोळ झाली की गुडुप. दूध प्यायले की पिता पिताच पेंगायला लागते. रात्रीही छान गाढ झोपते. कधी कधी मैत्रीण म्हणते, अगं काल चक्क हालवून हालवून उठवली गं तिला..... जाम कंटाळा आलेला...... जरा पालथी पडेल, पुढे सरकेल..... हुंकारेल, हसेल आणि रडेलही.... पण हा गोडांबा म्हणजे कुंभकर्णाची बहीण आहे नुसती....... कितीही आवाज करा, उचलून घ्या नाहीतर खाली ठेवा..... आम्हाला काही फरक पडतच नाही. आम्ही पुन्हा मुठी चोखत देवाशी गप्पा मालत हशतच लाहतोयं.....

मैत्रिणीची आई नुकतीच परत गेल्याने ही थोडीशी धास्तावलेली. जरासे उशीराच लग्न व लेकही उशीरानेच झाल्याने मनात धाकधूक असतेच. जमेल ना गं मला एकटीला...... तश्या आहेत गं जवळ एक दोघी पण आई ती आईच ना..... आमच्या रोजच्या गप्पा, इशानीचे कौतुक - लाड जोरदार सुरू असताना अचानक हिचा रडका-घाबरलेला सूर ऐकून मीही जरा हबकलेच. अगं, ईशानीला बरे नाहीये. दोन दिवस झाले, अचानक उलट्या-जुलाब. इमर्जन्सीत घेऊन गेलो गं परवा रात्री- डिहायड्रेट झाली आणि एकदम डोळेच उघडेना. घाबरून गेलो आम्ही दोघेही. आता जरा बरी आहे. श्री, दूध देऊ नका अजिबात असे डॉक्टर म्हणता आहेत. अगं तुझ्या शोमूलाही असेच झाले होते नं.... मला सांग ती तुझी संजीवनी - पेज, लगेच करते.... " तिला हो म्हटले खरे पण हा काही मायदेश नाही- इथे कोणालाही काही सांगायचे म्हणजे मला तरी भीतीच वाटते. त्यातून मैत्रीण खूप लांब अंतरावर..... समजा मी सांगितले आणि ईशानीला पेज पचलीच नाही किंवा काहीतरी अजूनच गडबड झाली तर.... नकोच बाई, डॉक्टर सांगतील तेच करू देत. पण मैत्रीण ऐकेना...... म्हणून शेवटी तिला पेजेची कृती सांगितली..... तिने लगेच केलीही. ईशानीचा डॉक्टर सुदैवाने भारतीयच असल्याने त्यानेही पेजेवर होकाराचा शिक्का उमटवला. हे ऐकताच हुश्श झाले अगदी...... आता ईशानी खूपच बरी आहे. पेज आवडीने घेतेय. या सगळ्या प्रसंगाने मला एकदम वीस वर्षे मागे नेले.

शोमू जेमतेम पावणेतीन महिन्यांचा असेल. मी आईकडेच होते. जुलै जवळ जवळ संपत आलेला. अचानक शोमूला डायरिया व उलट्या सुरू झाल्या. चोवीस तासात हे प्रमाण अतिरेक वाढल्याने शेवटी त्याला हॉस्पिटल मध्येच ठेवावे लागेल इतकी वाईट अवस्था झाली. एक तर इतके तान्हे बाळ त्यातून ओकून आणि सारखा पिळकून तो थकून गेलेला...... रडण्याचेही श्रम त्याला झेपत नव्हते इतका हल्लक झालेला. फक्त एकच चांगली गोष्ट म्हणजे तो ओकत असूनही पाणी-दूध पीत होता. केवळ त्यामुळेच डिहायड्रेट होण्यातून वाचल्याने त्याला सलाईन लावायची वेळ आली नाही. प्रभादेवीचा डॉक पेंडसे माझ्या एकदम चांगला ओळखीचा. तोच शोमूचा डॉक्टर. तो सारखा मला धीर देत होता, " अगं नको इतकी हवालदिल होऊस. हे पावसाचे दिवस आहेत नं..... शोमूचा पहिलाच पावसाळा. असे होणारच. आता शोमूला जरा जास्तच बाधलेयं हे खरेयं. घाबरू नकोस गं.....मी आहे नं.... " काय काय तो बडबडत होता. पण माझा जीव कसा शांत व्हावा.... शेवटी तीन दिवस बाळाला थकवून त्याचे दूध पूर्ण बंद करून एकदाच्या उलट्या - जुलाब थांबले.

" शोमूला कुठलेच दूध द्यायचे नाही का रे? आईचे दूध तर सगळ्यात उत्तम असते नं... मग तू तेही नको म्हणतोस म्हणजे....... काय झालेय रे त्याला? एवढुश्या माझ्या बाळाची पचनशक्तीच बिघडून गेली की काय कायमची? आता दूध नाही पाजायचे तर मग तीन महिन्याच्या बाळाला द्यायचे तरी काय? डाळीचे-भाताचे पाणीही इतक्या तान्हेपणी देत नाही. दूधच बंद तर मग वाढ कशी होणार? " प्रश्नांवर प्रश्न, उत्तरे लगेच कशी मिळावीत? मला तर काहीच समजेना...... इतक्या प्रचंड उलट्या जुलाब करून करून लेकरू बेजार झालेलं तरीही मी त्याच्याकडे पाहून बोलले-हसले की लगेच हुंकार देत क्षीण हसत होता. इतका आजारी असतानाही त्याने दूध पिणे सोडले नव्हते आणि आता कालपासून नुसता साखर-मिठाच्या पाण्यावर होता. भुकेने अगदी कळकळून गेल्याने सारखा मुठी चोखत मांडीवर पडून होता. माझ्या आईलाही काही सुचत नव्हते. सगळेजण ताणाने - जागरणाने व काळजीने अतिशय थकलो होतोच.

अचानक आई उठली आणि एक वाटी तांदूळ व अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन तिने मऊ पातळाच्या घडीवर सावलीत पसरून वाळत घातले. तीन तासांनी आईने हे वाळलेले तांदूळ व डाळ गोळा करून कढईत मंद आचेवर वेगवेगळी चांगली भाजली. दोन चमचे जिरेही भाजले. सगळे जरा निवल्यावर लगेच मिक्सरमधून काढले. अगदी पूड न करता किंचित भरड - जाडसरच दळले. एका पातेल्यात अडीच भांडी पाणी घेऊन त्यात दोन चमचे साखर व अगदी किंचित मीठ घालून मध्यम आचेवर ठेवले. पातेल्याच्या तळाशी जरासे बुडबुडे दिसू लागताच तयार केलेल्या पिठातील दोन चमचे पीठ पाण्याला लावले. आधीच पीठ धुऊन-वाळवून-भाजून तयार केलेले असल्याने लगेच शिजले. दुधापेक्षा अगदी किंचित घट्ट असा द्रव तयार होताच आचेवरून उतरवले. एकीकडे दुधाच्या बाटलीच्या बुचाचे छिद्र दाभण अगदी लालभडक तापवून घेऊन थोडेसे मोठे केले. तयार पेज कोमट होईपर्यंत सारखी मी ढवळत होते जेणेकरून त्यावर साय धरू नये. शोमूला पिता येईल इतपत निवल्यावर बाटलीत भरून ही पेज त्याला पाजली. लेकरू इतके भुकेजले होते की अक्षरश: पाच मिनिटात त्याने बाटली संपवली. खांद्यावर घेऊन पाठीवर हलकेच थोपटून दोन छोटेसे ढेकर काढता काढताच तो लुडकला. बरोबर चार दिवसांनी इतका गाढ व शांत झोपी गेलेला पाहून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.


पाच महिन्यांचा

आता ही पेज पिऊन त्याला पचते का याची चिंता होतीच. त्यामुळे मी व आई अगदी दर पाच पाच मिनिटांनी कसलाही आवाज न होऊ देता त्याच्या जवळ जाऊन दुपट्याला चाचपून पाहत होतो. ओकला तर नाही नं.... पुन्हा ढुंगीला धार लागली की काय..... शेवटी आमचे बाबा ओरडले, " अरे काय सारखे वेड्यासारखे चाचपताय. इतका गाढ झोपलाय.... मंद घोरतोय, ऐकताय नं तुम्ही दोघी. मग झोपू द्या की त्याला. ओकला- पिळकला तर तो काय गप्प बसणार आहे का? तुम्ही दोघी म्हणजे नं.... कमालीच्या घाबरट झाला आहात. त्याच्याकडे पाहत बसण्यापेक्षा पेजेची दुसरी बाटली घ्या भरायला. आता दर दोन-अडीच तासांनी पाजावे लागेल नं...... आणि जेवून घ्या गं. मी पाहतो त्याच्याकडे. " आम्हाला शोंमूजवळून हाकलून बाबा मात्र त्याच्या शेजारीच पडून राहिले....... कधीतरी त्यांचाही डोळा लागून गेला. मग काय... आजोबा आणि नातू यांची मस्त जुगलबंदी सुरू झाली. बाबांच्या तब्येतीत घोरण्याला शोमूचा मंद लयीतला प्रतिसाद...... तालावर ताल........ मी आणि आई दारात उभे राहून कितीतरी वेळ हे आनंदाचे क्षण गोळा करत राहिलो. पेज नव्हे संजीवनीच होती नं ती........ जिच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच जीवन मिळाले. पुढे शोमू साडेतीन वर्षांचा झाल्यावर दूध पिऊ लागला. तोवर या संजीवनीचा अगदी भक्त होता. दोन महिन्यातच शोमूचे गाल पडायला लागले इतके बाळसे त्याने धरले.तीन महिन्यापासून फक्त या संजीवनीवर असलेल्या शोमूचे हे काही फोटो.


आमचा बाळकृष्ण
संक्रांत
सारे लक्ष पतंगांकडे

मिश्किल हसूअशा पद्धतीने तयार केलेली पेज पचायला अतिशय हलकी असते. तान्ह्या बाळापासून ते कुठल्याही वयात देता येते. मोठ्यांसाठी थोडासा चवीत बदल करावा. चमचाभर साजूक तुपावर जिरे-हिंगाची फोडणी करून चार चमचे तयार केलेल्या पेजेची भरड भाजून स्वादानुसार मीठ घालून त्यावर गरम पाणी ओतून लापशी बनवावी. नुसते भातावरचे पाणी घेण्यापेक्षा याने जास्त ताकद राहते व शक्ती लवकर भरून येण्यास मदत होते. अतिशय पौष्टिक. लहान बाळे दूध पीत असतांनाही दिवसातून एकदातरी ही पेज पाजावी. आजकाल दुधाची ऍलर्जीही अनेक बाळांना असते त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त. डॉक्टरना विचारूनच द्यावी. शक्यतो दिवसा पाजावी, रात्री झोपताना पाजू नये.