जाता जाता एक नजर इथेही........

Friday, October 30, 2009

अपुन भी हायटेक.........


स्पर्धेचे जग आहे राजे हो. यात टिकाव धरायचा तर सबकुछ हायटेक मंगताय. गुणवत्ता हवीच- उसके बिना बिलकुल नही चलेगी धंदेकी गाडी. आकर्षक मांडणी-चकचकाट-नेटकेपणा हवा तोही डोळ्यात भरण्यासारखा. गुणवत्तेबद्दल लोकांना भरवसाही वाटायला हवा आणि दामपण खिशाला परवडला पाहिजे. हे तंत्र अगदी या धंद्यातसुद्धा घुसलेय म्हणजे खरेच कमाल झाली. आता हाच पाहा नं किती धोरणी. पुण्यातील हिंजे्वाडी- आयटी एरिया. जसा एरिया हायटेक तसाच याचा गोळाही हायटेक बनवलाय याने. नाव तर एकदमच भारी..... ' गो ग्रीनच्या ' हातात हात मिळवून म्हणतोय पाहा ' गो गोला '.

आवर्जून लिहिलेय नैसर्गिक रंग, मिनरल वॉटरचा बर्फ व हायजेनिक हँडलिंग. म्हणजे ' नको बाई, कसले रंग असतील, कुठल्या पाण्याचा बर्फ आणि शी... नाकातोंडात बोटे घालून त्याच बोटाने........... " हे असे म्हणून नाक मुरडून न फिरकणाऱ्या लोकांनाही मोह पडावा. पहिलीच ओळ आहे, ” जगातला स्वच्छ गोळा ’. आहे की नाही पर्फेक्ट मार्केटिंग,. ते ' Go gola ' असे लिहिलेय की पटकन गुगलबाबाचीच आठवण यावी. तेच पेज घेतलेय. तुमच्या डोळ्यांना सवयीचे. खाली उजव्या कोपऱ्यात म्हणतोय ’ Yummy Search ’ गिऱ्हाईक खेचणार हा नक्की. इसको बोलते हैं धंदेका कसब. इंटरनेटचे जग आहे हे बरोबर ओळखलेय त्याने. कोणी न कोणी आपला स्टॊलसकट फोटो खेचणार आणि मग बस दुनियाभर घुमते रह जाओगे. नकळत मीही केलीच ना त्याची जाहिरात.... " क्या साब आपुनभी हायटेक है और पर्यावरण की मदद मनसे कर रहा हूं. सबसे अहम बात, आपका यांदो में बसा बचपन सेहत का खयाल रखते हुये आपको कुछ पल लौटा रहां हूं....... गो गोला. "

Thursday, October 29, 2009

” हे माझे काम नाही ’ पारितोषिक -- हुर्रेर्रेर्रेर्रे........


२००९ या वर्षासाठीचे ' हे माझे काम नाही- Not my job Award ' या विषयाचे पारितोषिक जाहीर झालेय.

तुम्हाला काय वाटते कोणी जिंकले असेल बरं.....???

इंडियन नॅशनल हायवे डिपार्टमेंट पेंटिंग डिव्हिजन यांनी

हा फोटो पाहा..... हसू आले ना? मीही खूप हसले. हसू ओसरल्यावर मन दुखले. जे सत्य आहे तेच टिपलेय खरे. कबूल करताना खूप वाईट वाटते परंतु आपण असेच आहोत. हे माझे काम नाही, ज्याचे आहे तो करत नाही असे म्हणत सहज शक्य असलेल्या गोष्टीही आपण करत नाही. सरळ डोळेझाक करतो आणि चालू पडतो. बाकी रेषा ओढणारा किती हुशार पाहा.... तेवढ्या भागात रेघ ओढलीच नाही असे केलेले नाही. अगदी बरोबर वळण घेतलेय....पण ते झाड जरासे आततरी ढकलावे....ऊंहू....ते माझे काम नाही.....

Wednesday, October 28, 2009

निचरा.......

" अहो, जरा एक मिनिट ...."
मी वळून पाहिले तर साधारण साठीच्या जवळ पोचलेल्या बाई आमच्या रुममध्ये डोकावत मला बोलवत होत्या. रुबीमध्ये बाबांची काल दुपारीच अँजोप्लॅस्टी झाली होती. तेव्हापासून बाबा अर्धवट गुंगीतच होते. पायावर वजन ठेवलेले. चोवीस तास पाय हालता नये. रात्री आईला जबरदस्तीने काकूच्या घरी पाठवून मी बाबांचा पाय धरून बसून होते. इथला आयसीयू वॉर्ड बराच मोठा आहे. पार्टिशन्स घालून केलेल्या रूम्सही प्रशस्त आहेत. अगदीच एक माणूस जेमतेम शेजारी उभा राहील अशी अवस्था नाही. सोबत थांबणाऱ्यासाठीही पडता यावे म्हणून छोट्या कॉटस आहेत. स्टाफही बरा आहे. शेवटी कुठेही गेले तरी थोडे डावे-उजवे असायचेच.

डाव्याबाजूच्या रूम मध्ये एक तरुण मुलगा होता. त्याला झोपेचे इंजेक्शन दिल्याने तो गाढ झोपलेला. उजव्याबाजूच्या रूममध्ये आजी होत्या. ब्याऐंशी-पंच्यांऐंशीच्या. रात्रभर ओरडत होत्या. आयसीयूमधली रात्र ही वॉर्डमधल्या रात्रीपेक्षा खूपच वेगळी असते. अतिशय चमत्कारिक थंड शांतता भरून राहिलेली. कुठेतरी नकळत भीती प्रवेशते. मंद दिवे, एसी बऱ्यापैकी जोरात सुरू असतो. नऊच्या आसपास सगळ्यांना शेवटचे डोस दिले, बिपी चेक केले, चार्ट भरले की नर्सेस-रात्रपाळीचे डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स, वॉर्डबॉय/बायका सगळ्यांचा राबता जवळपास थंडावतो.

पेशंट आपापल्या खोल्यांत अर्ध-पूर्ण गुंगीत आणि सोबतची माणसे आपल्या माणसांची बिकट अवस्था पाहत लवकर बरे वाटू दे चा जप करत कधी सकाळ होते ची वाट पाहत बसलेली. एक बरे आहे की इथली सकाळ साडेचारलाच होते. काकड आरतीला जसा देवाचा गाभारा धुपाच्या-फुलाच्या सुवासाने, समया-पणत्यांच्या उजेडाने लख्ख उजळून निघतो. संपूर्ण चराचरांत पक्षांची किलबिल, सुर्याची कोवळी लालस किरणे, अल्हाददायी प्रसन्नता भरून राहते ना तशीच आयसीयूतली सकाळ मला भासते. रात्रीचा थिजलेला थंडपणा एकदम संपतो आणि लगबग सुरू होते. रात्रीत कुठल्याश्या कोपऱ्यात दबा धरून बसलेल्या काळाला जणू ही लगबग हुसकावून लावते, पळ रे. आता इथे तुला थारा नाही. डॉक्टरांनी अथक परिश्रमाने व ज्ञानाने नवा श्वास फुंकलाय या जीवांमध्ये. काळरात्र संपलीये आता. हे ऐकले की काळ मनातल्या मनात छद्मीपणे हसतो. तेवढ्यापुरते घे जगून आज पण माझ्यावाचून तुला सुटका नाही असे म्हणत तोंड काळे करतो. पाहतापाहता वर्दळ वाढू लागते अन मग हे सारे विचार आपसूक मनाच्या तळाशी ढकलले जातात.

माझेही असेच काहीसे झालेले, बाबांचा पाय हालू नये म्हणून मी रात्रभर घट्ट धरून बसून होते. सोबत ही विचारांची आवर्तने. मनाने व शरीरानेही थकले होते. त्यात पूर्ण रात्र आजींचा हाकारा सुरू होता. एकच नांव त्या सारख्या घेत होत्या. अक्षरशः धोशा लावला होता. रात्रीची भयाण शांतता त्यांच्या त्या आर्ततेने व्हिवळत असलेल्या सुराने अजूनच गडद झालेली. बाबांच्या विचारांबरोबरच वात झालेल्या अवस्थेत असणाऱ्या आजींच्या मनात काय इतके सलतेय हा विचार माझी पाठ सोडत नव्हता. ही ज्योती कोण असावी आणि ती इतकी जवळची असेल तर आत्ता का बरे आजींजवळ नाहीये. तशातच या कोण बरे बाई मला हाक देत आहेत असे वाटून मी त्यांना आत या ना म्हणत रूममध्ये बोलावले.

त्या आत आल्या. बाबांकडे पाहत त्यांनी खुणेनेच कसे आहेत आता असे विचारले. मी बरे आहेत असे खुणावले. तसे चांगलेय चांगलेय असे म्हणत एकदम त्याजवळ आल्या. हळू आवाजात म्हणू लागल्या, " फार त्रास झाला नं तुम्हाला? माफ करा हो. रात्रभर त्या बरळत होत्या तेही मोठ्यामोठ्याने. पण मी तरी काय करणार. त्यांचे तोंड तर बंद करू शकत नाही. शिवाय त्यांना कळतही नव्हते काही. आता जरा वातातून बाहेर आल्यात. कॉफी पाजलीये मी नुकतीच. स्पंजींगही झालेय. थोडी तरतरी आलीये त्यांना. म्हणून आले पटकन तुम्हाला सॉरी म्हणायला." " अहो कशाला इतके कानकोंडे होताय. आजींना काही असे ओरडायची हौस आहे का? ज्या ज्योतिताईंचे नांव त्या घेत होत्या ना त्यांना भेटायचे असेल." तसे मला थांबवत त्या म्हणाल्या, " अहो मीच ती ज्योती. माझेच नाव घेत होत्या त्या. आज पस्तीस वर्षे माझ्या नावाने शंखच करीत आहेत पण तो कमी पडलाय की काय म्हणून या अर्धबेशुद्धीतही अखंड माझाच जप चालू. असेल डोक्यात काहीतरी सुरू. आपली सून किती वाईट आहे, कशी तिला अक्कलच नाही.... जाऊ दे. तुम्ही म्हणाल त्या इतक्या आजारी पडल्यात आणि मी हे काय बोलतेय. तेही आपली काही ओळखदेख नसताना."

पाहू गेले तर म्हणणे बरोबरच होते. पण कुठल्याही व्यक्तव्यामागे खूप मोठी कारणे-अनुभव असतात. दोन मिनिटांच्या संभाषणावर व दिसणाऱ्या परिस्थितीनुसार कोणासंबंधीही अंदाज बांधू नयेत की मते बनवू नयेत. सगळ्यात महत्त्वाचे चुकूनही सल्ले देऊ नयेत व ताशेरेही ओढू नयेत. अशी लिबर्टी कधीही कोणी घेऊ नये हे माझे ठाम मत आहे. मी नुसतेच त्यांच्या हातावर थोपटले. तसे त्या म्हणाल्या, " थोडा त्रास देऊ का हो तुम्हाला? तुमचे बाबा अजून झोपलेत ना म्हणून विचारतेय, जरा आजींकडे लक्ष ठेवाल का? मी पटकन घरी जाऊन त्यांच्यासाठी लापशी करून आणते. त्यांना खूप आवडते. प्लीज. " " अहो जा ना आणि उगाच लावतोड करत पळत येऊ नका. सगळे आहेत आजूबाजूला. आता माझी आईही येईलच मग मी आजींजवळ बसेन तुम्ही या आवरून. " असे म्हणून मी होकार दिला. त्याही आजींना मी येतेच पटकन, काही लागले तर ही आहेच असे सांगून निघाल्या.

दोन मिनिटे आजींशी बोलून आई आली की येतेच तुमच्याजवळ असे म्हणून मी उठतच होते तोच आई आलीही. तिला घरी कुठले चैन पडायला. बाबांची गुंगी कमी झालेली होती. स्पंजिंग सुरू होते. आई म्हणाली तू थांब आजींजवळ मी आता पाहते बाबांचे. पाच मिनिटे शांततेत गेली तोच आजींनी एकदम मुद्द्यालाच हात घातला. त्यांची अँजियोग्राफी झालेली होती. जरा हबकल्या होत्या पण मुळचा कणखर स्वभाव असावा. " अग भिंतीलाही कान असतात हे तर पार्टिशन. हळू आवाजात बोललात तरी मी ऐकले तुमचे बोलणे. ( आजी मी तर काहीच बोलले नाही हो. अर्थात हे मी मनातच बोलले. ) खरे सांग, मी रात्रभर ज्योती ज्योती करत होते का? जळळलं मेलं लक्षण. ( आता हे जळ्ळलं मेलं लक्षण नक्की कोणाला होतं... सुनेला की स्वतःला??? विचारता नये हे असे प्रश्न हे खरे तरी मनात येतातच ना. शिवाय हे असे न सुटलेले प्रश्न फार छळत राहतात नंतर
) ऐकले मी त्यावर ज्योती काय म्हणाली ते. " आता ज्योतीची बाजू घ्यावी तर मला या सासू-सुनेचे काहीच माहीत नाही. काहीच न बोलावे तर आजींना वाटायचे मी एकतर दुर्लक्ष करतेय किंवा काय जहांबाज सासू दिसतेय गरीब बिचाऱ्या सुनेला छळतेय आणि वर आव आणतेय असे म्हणत त्यांना दुष्ट ठरवतेय.

आजींशी यावर मी काय बोलू हे मला समजेना. पण आजींना माझ्या प्रतिसादाची गरज नव्हतीच. आजी आवेगाने बोलू लागल्या, " अग अशी सून मिळायला खरेच भाग्य लागते. पण मला मेलीला हे उमगायला इतकी वर्षे जावी लागली. हे नेहमी म्हणायचे, " कुंदाबाई, अहो दुसऱ्याची लेक आपल्या पोराला सुख लाभावे, घरात नातवंडाची किलबिल असावी. म्हातारपणी लेकीच्या मायेने आपले दुखणे-खुपणे पाहावे अन आता उतारवयात उरलेले जिभेचे चोचले पुरवावेत म्हणून आणलीत. पण तिला लेकीची माया देणे तर दूरच राहिले हो किमान ती आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग आहे हे समजून वागा जरा. किती घालून पाडून सारखे बोलत असता. माझ्या आईने तुला दिलेला त्रास तू तिच्यावर का काढते आहेस? विसरलीस का स्वतःचे दिवस? अग परक्याची पोरं ती. एकही दिवस तिच्यासाठी आपण काही केलेले नाही की खस्ता खाल्ल्या नाहीत तरीही तिच्याकडून तुझ्या अपेक्षा किती. कुंदा, आधी प्रेम लावावे मग आपोआप समोरून प्रेमच मिळते. ते मागावे लागतच नाही. जरा समजून घे."

पण मी कधी ऐकले नाही यांचे म्हणणे. नेहमी ज्योतीला धारेवर धरले. अगदी क्षुल्लक गोष्टीतही तिचा मानसिक छळ केला. हेच भांडे का घेतलेस? ही भाजी अशी का केलीस? पहाटे पाचला उठून सगळा स्वयंपाक करून ती कामावर जाई पण मी चुकून तिला म्हटले नाही की तू फक्त तुमच्या दोघांचा डबा करून जा बाकीचे मी आवरेन नंतर. जणूकाही ज्योती येईतो आमच्या घरात जेवण होतच नव्हते. फार वाईट वाटते पण लेक आणि ती जरा दोन मिनिटे बोलत आहेत असे दिसले ना की मला राग येत असे. लागलीच त्यांच्या मध्ये तोंड घालून एकतर लेकाला किंवा ज्योतीला तरी काहीतरी लागट बोलून त्या दोघांचा मूड मी घालवत असे. कधी पोरीला नावाजले नाही की दिवस असताना तिच्या आवडीचे दोन घास वाढले नाहीत. माझ्या सासूबाईंनी मला केलेला जाच मी ज्योतीकडून फेडून घेत राहिले. हे गेले अन मी एकटी झाले. त्या एकटेपणाचा त्रासही बिचाऱ्या माझ्या सुनेलाच झाला. मी जास्त दुराग्रही झाले. जरा काही मनाविरुद्ध होतेय असे वाटले तरी त्रागा करू लागले, मोठ्याने रडू लागले. मी एकटी आहे हे पाहून माझी सून आता मागच्या सगळ्या जाचाचा वचपा काढेल ही भीती माझ्या मनात खोलवर बसली होती. त्यात आजूबाजूचेही असतातच गं कान भरायला.

पण गेल्या काही महिन्यांपासून मला स्वतःचाच फार राग येतोय. खूप छळले मी पोरीला. आता देवाने थोडेसे दिवस द्यावेत मला म्हणजे मी सुधारीन चूक. तू म्हणशील, म्हातारीला मृत्यूचे भय वाटतेय त्यात आता अंथरुणावर खिळायची वेळ आली तर हाल होतील म्हणून मी खोटेपणाने वरवर पश्चात्ताप झाल्यासारखे बोलतेय. तसे नाही गं, खरेच नाही. जीव जायच्या आधी ज्योतीची क्षमा मागायची आहे. तिला मायेने जवळ घ्यायचेय. गेलेली वर्षे मी तिला परत देऊ शकत नाही पण जाण्याआधी तिच्या मनातली तगमग तरी कमी करेन. हे सगळे तिला सांगायचा मी खूप प्रयत्न केला पण मेली जीभ लुळीच पडते. मन घाबरते, ज्योतीला यातही माझा काहीतरी हेतू आहे असे वाटले तर.... तू सांगशील का तिला हे सारे? जीव फार कासावीस झालाय. तिला कोणीतरी सांगायला हवे गं. तू ओळखीची नाहीस तरीही सगळे बाहेर आले कारण एकच की हे माझ्यासाठी तू रचून-बनवून तिला सांगत नसून खरेच मला असे वाटतेय हे नक्की तिला उमजेल. तशी अतिशय समंजस व हळवी आहे ती. म्हातारीला घेईल समजून.पुन्हा मीच अपेक्षा करतेय ....."

हे वाक्य पुरे होतेय तोच ज्योती आत आली. " आई, मी काही संत नाही की देव नाही. मला तुमच्यामुळे प्रचंड त्रास झालाय तो असा पुसला जाणार नाही की भरूनही निघणार नाही. असे असले तरी वाईट गोष्टी लक्षात ठेवून आधीच निसटून गेलेल्या माझ्या चांगल्या दिवसांमध्ये मी अजून भर मात्र मी घालणार नाही. आजपासून पुन्हा नव्याने सुरवात करूयात. चला ही गरम गरम लापशी खा बरं आधी. खूप वेळ बोललात, धाप लागलीये तुम्हाला. मी ऐकलेय सगळे. तेव्हा आता जीवाची तडफड करू नका आणि पटकन बरे होऊन घरी या. " असे म्हणत ज्योतीताई आजींना भरवू लागली तशी मी दोघींची तंद्री न मोडता हलकेच निघून बाबांकडे आले. आईनेही बरेचसे ऐकले होतेच त्यामुळे तिने," काय गं? ठीक आहे ना आजींना आता?" असे विचारताच मी नुसती हसले.

दोन दिवसांनी बाबांना स्पेशलरूममध्ये हालवले आणि आजींनाही दुसरीकडे. निघताना त्या दोघींचा निरोप मी घेतला. अचानकपणे मी त्या दोघींच्या जीवनातील फार महत्त्वाच्या व हळव्या क्षणांची भागीदार बनले. अप्रत्यक्षपणे त्या दोघींमधला दुवा झाले. आजींच्या वागण्यात मूलग्रामी बदल घडला असेल असे मला वाटत नाही. शिवाय त्यांनी कितीही सांगितले की मी म्हातारी झालेय-एकटी पडलेय म्हणून हा पश्चात्ताप नाही तरीही ज्योतीताईंना कुठेतरी हे वाटणारच आणि बोचणारच. हा बसलेला पीळ सहजी सुटणारा नसला तरी किमान काही हळवे तंतू त्या दोघींमध्ये निर्माण होतील. जात्या जीवाला थोडा दिलासा व ज्योतीताईंना इतक्या वर्षांनी का होईना सासूबाईंना माझी किंमत कळली याचे ओझरते सुख मिळेल अशी आशा आहे.

Monday, October 26, 2009

ताई, आतां फुडलं विलेक्शन कधी व्हईल हो......

" ताई, अवो आता फुडलं विलेक्शन कधी व्हईल हो? " माझी मोलकरीण मला विचारत होती. आधीच माझं डोकं सटकलेलं. त्यात मी एकदा दुर्लक्ष केलं, कोणी मला हाक मारीत नव्हतं तरी उगाचचं आले आले म्हणत तिच्यासमोरून पळ काढला. मला भीती वेगळीच, वड्याचा राग वांग्यावर निघायचा आणि ती अर्धे घासलेले भांडे दाणकन सिंकमध्ये आपटून " कशापायी आरडताय? मला न्हाई झेपायचं, मी चाल्ली . " म्हणत सरळ निघून जायची. आणि मग दुसरी बया मिळेतो धुणी-भांडी-केरवारे---जाऊदे बाई, कामे संपतात का कधी? पण ही बया हा माझा अनुल्लेख समजेल तर ना. ती पेटलेलीच. आताच तर इलेक्शन संपलेय. गेला महिनाभर नुसते रण माजले होते. त्याचा धुरळा अजून उडतोच आहे तोवर हिला पुन्हा विलेक्शन कशाला हवे झालेय हे काही मला समजेना.

१९९६ -१९९८-१९९९ अशी तीन लागोपाठ लोकसभेची इलेक्शन्स व मध्ये मध्ये विधानसभा झालंच तर ऑफिसच्या सोसायटीचे, आमच्या बिल्डिंगच्या कार्यकारिणी सभेच्या निवडीचे, आमच्या ठाणे जनता बँकेचे अशी एकावर एक इलेक्शने होऊन होऊन मी भयंकर बेजार झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ९९च्या इलेक्शनची मेली कुठच्या कोपऱ्यात आलेली ड्युटी करून जीव मेटाकुटीला आलेला. ठाणे निवासी म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कुठेही फेका. आता ठाणे जिल्हा केवढातरी मोठा. पालघरच्या माणसाला भिवंडीला टाकतील, भिवंडीवाल्याला ठाण्यात तर ठाण्यातल्याला मरत पाठवतील वसईला. हा असा घोळ घालण्यामागे काय कारण दडलेय हे आयोगवालेच जाणोत, आम्हा सगळ्यांना मात्र यातून त्यांना मिळणारा आसुरी आनंदच दिसत असे. उठा लेको पहाटे दोन वाजता आणि सुटा ज्या मिळेल त्या वाहनाने. जाऊ दे, विषयांतर होतेय. काय करणार फार छळ केलाय ना या प्रकाराने.

एकतर लेकरू लहान त्यात हे लोकांच्या दारोदारी जाऊन नावे गोळा करा, सारखे निरनिराळ्या ट्रेनिंगना जा आणि मग या दोन दिवसांच्या ड्यूट्या व मागून येणारी मतमोजणी. शनीवार-रवीवारही आमची ड्युटी सुरूच. शिवाय ह्या मतमोजणीच्या वेळी फारच गोंधळ चालत. बाहेर ही माणसे, त्यांचा आरडाओरडा. आम्ही आत कडीकुलपात. लवकर संपले तर बरे नाहीतर रात्रही तिथेच. पुन्हा ते कुठल्या एरियात आहे यावरही अनेक प्रकार अवलंबून असत. इलेक्शन तर आटोपले होते पण ही ड्युटी लागलेली होतीच. त्यामुळे अजून संपूर्ण मुक्ती मिळालेली नव्हती.
आता ह्या सगळ्या ताणाचा, वैतागाचा राग माझ्या बाईवर निघू नये म्हणून मी तिच्या प्रश्नाला बगल देऊ पाहत होते. पण हिचे टुमणे काही संपेना.

" ताई, अहो ऐका तरी. कोण बी हाकारत नाहीये तुम्हास्नी. कधी व्हईल म्होरलं विलेक्शन? "

" का गं, तुला कशाला हवेय इलेक्शन? दोन दिवसांपूर्वीच तर मत देऊन आलीस ना? निदान रिझल्ट तरी लागू दे की. " मी अगदी सौम्य आवाज ठेवून हसू आणत तिला विचारले.

" अवो मत देऊन आल्ये की. पर त्येचा काय उपेग? गेल्या वर्साला त्याच्या दोन वर्स मागं बी दिल्यालंच न्हवं का मत. मग त्याउप्पर झालीच की दोन विलेक्शनं. म्हनूनशान तर कवाधरून विचारून राह्यली न्हवं का तुम्हास्नी की आता म्होरलं कधी व्हईल."

च्यामारी! हिला काय खेळ वाटतोय की काय? आपलं तुरतुर जायचं, नांव सांगायचं, नखाला शाई लावून घ्यायची, घड्या घालायच्या, डब्यात कागद सारला की सार्थक झाल्यासारखं घरी यायचं असाच आविर्भाव. पुन्हा त्या दिवशी कोणाकडेही कामाला जायचं नाही. खाडा तोही हक्काचा. तुम्हास्नी सरकारं सुट्टी देतंय नव्हं का? मग आम्हास्नीपण त्येच काम करायचंय म्हटल्यावर सुटी नग का? काय बोलणार यावर. तरी मी तिला यावेळी सुनावलंच, " मला सुटी आहे का? नाही नां, मग तुला पण मिळणार नाही. " त्यावर, " ताई, तुमचं आक्शी बरुबर हाये परं असं एकाकडे जायाचं अन दुसरीकडे खाडा असं नाय बा जमायचं मला. त्या समद्या बाया मला लय बडबडतील. तव्हां म्या काही यायची न्हाई. " असे म्हणून ही सरळ चालती झालेली.

आता मला फार उत्सुकता लागली. ही इतके वेळा का विचारत्येयं पुढचे इलेक्शन कधी. " सुनिताबाई अगं मला कळू दे तरी तू का विचारते आहेस ते? तिकडे लोकसभेत आणि इकडे विधानसभेत कोणी का येईना तुला काय गं फरक पडतोय? सांग बरं आपला मुख्यमंत्री कोण आहे? बघ तेही तुला माहीत नाही. " मला मध्येच तोडत ती म्हणाली, " अवं ताई, मला काय करायचंयं, त्यो म्येला कोणी बी असनां. तुम्ही म्हणता ते आक्शी बरूबरं. मला काय बी फरक पडत न्हाई. आव जनतेला फरक पडावा म्हणून ह्ये लोकं कधी काही करत्याल इतकी वेडी आशा बाळगायला म्या काही भाबडी न्हायं. त्यांचा सगळा जीव खुर्चीत अन पैक्यात. गरीबाच्या टाळूवरचं लोणी खातील अनं माड्या चढवतील. पर हिकडे डाळींचा कहार झालाय, राशन दुकानात काय बी गावनां झालंय. इज न्हाई की पियाचं पाणी नाही पर ह्यास्नी तुझं माझं करण्यावाचून अन एकदुसऱ्याची लफडी-भालगडी काढण्यावाचून फुरसत मिळेल तव्हा ना. जाऊ दे वं ह्याचं काय बी दुःक नाय मला. अवो हे रोजचंच हाये. पर तरी बी मला विलेक्शन आवडतात."

" पुन्हा तेच. आता हे सारं तुला कळतंय ना मग तरी पुन्हा पुन्हा कशाला हवेयं गं तुला इलेक्शन? "

" ताई, चला बरं माझ्या घरी आत्ता. न्हाई म्हणू नगा. घोटभर च्या घ्या. चांगलं आलं घालून करत्ये. चला.. "

मला हो नाही म्हणायला न देता सुनिताबाई चक्क हाताला धरून तिच्या घरी घेऊन गेली. एका खोलीच्या मध्ये भिंत घालून दोन खोल्या केलेल्या. झोपडी असली तरी वर कौल होती व अर्ध्या पक्क्या भिंती होत्या. स्टूल देऊन बसवले. मी पाहत होते, स्वयंपाकाच्या जागेत एक उंच फडताळ होते. त्यात सगळे पितळेचे चकचकीत डबे नीट लावलेले खाली स्टीलची ताटं-वाट्या-पेले.... पाहता पाहता लक्षात आले की सगळे काही सेटच्या स्वरूपात होते. एकदम डझनावारी. हंडे, बादल्या, स्टीलचे पिंप,टेबल फॅन, फ्रीज,टीव्ही ही होता. तोवर चहा झाला. मला चांगल्या भारी कपात देऊन म्हणाली , " घ्या. पाहा जमतोय का तुम्हास्नी?
ताई आता कारनं दाखवत्ये ती पाहा. हे जे सगळे डझनावारी पेले, भांडी दिसताहेत ना ती गेल्याच्या गेल्या विलेक्शनला ती बाई नव्हती का हुबी तिन्ये दिली. शिवाय मला साडीबी मिळाली व्हती. म्या काही शिक्का मारला नाही तिच्या नावाफुडे. पर चांगली व्हती. बिचारी त्या वक्ताला पडली. या वक्ताला पुन्हा आलती हात जोडत अन ह्यो फॅन व रोख पैसे देऊन गेली. या वक्ताला मात्र मी तिच्याम्होरच शिक्का मारल्याय. असं करत करत तिने बरेच काही मला दाखवले. हे अमुक ने दिले ते अमूकने.

शिवाय म्हणाली की मोठ्या दोन्ही पोरांना कामबी मिळाली. ह्येच की घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो/पत्रक/ विलेक्शनची कार्डे वाटायची. भिंतीवर कागदं चिकटवायची. उमेदवार आला की त्याच्या नावाचा जय करत बोबंटायचं. दुसऱ्याच्या सभेला जाऊन याच्या नावाचा जयजयकार करायचा. खायलाप्यायला त्योच घालत होता वरून चांगलं पैसेबी मिळत होतं. अवं असं बी ही पोरं नुसती माझ्या जीवावर बसून खात्यात. वर मारामाऱ्या, शिवीगाळी करत फिरत्यात.... नुसता मेला कहार मला. त्यापरीस ह्ये ब्येस नव्हं का? जितक्ये जास्त उमीदवार उभे राहतील तितका आम्हांस्नी फायदा होतोय.

अन ताई गंमत सांगू का, अवं मेल्यं एकबी कामाचं न्हाई. त्येंना वाटतंय त्ये मतांसाठी गोड गोड बोलून आम्हास्नी गंडवत आहेत त्ये समजत न्हाई. परं यांचं बारसं ज्येवलयं म्या. तिकडे मतदान केंद्रावर जावंच लागतंय हो, यांच्ये पंटर लोक असतात ना पहाऱ्यावर आमच्या. पर आत जाऊन म्या सगळ्यांवर शिक्का मारून ठेवत्ये. मरा तिकडे. कोनालाच बी माझं मत म्या द्यायाची न्हाई. असं मी काही येकली नाही करत आम्ही समदेच करतुया. माल मिळतो ना तो घ्यायाचा बस. अवं ह्या चोरांची लंगोटी न्ह्यायी परं तिचं सूत तर हाती लागतंय अन वर बदाबदा सगळी आपटतातच. मग जो सत्तेवर येईल त्यास्नी कंचातरी बवाळ खडा करून खाली खेचत्यात की पुन्यांदा विलेक्शनची जत्रा भरतेय. की आमच्या दारात तोंडावर जनतेचा कळवळा, माणुसकी फासून, ग्वाड ग्वाड बोलत कांबळी-पैकं घेऊन हात जोडूनशान वोटांची मागनी करत उभं राहतंय. काय ? म्हनून मला पंचाईत पडलीये की आता म्होरलं विलेक्शन कधी व्हईल. "

यावर मी काय बोलणार,. " अग चहा झकास झालायं गं. उद्या ये वेळेवर " असे म्हणत मी घरी आले. " लोकशाहीचे " किती सोपे गणित आहे तिचे. आपल्या जीवनात, कोणीही आले - गेले त्यामुळे काहीही फरक कधीच पडणार नाही हे सत्य तिला पटवून घ्यावे लागलेलेच नाही कारण ते मुळी तिला मान्यच आहे. नाहीतर आपण. दरवेळी मनात कुठेतरी अपेक्षा ठेवून प्रयत्न करतो. नवीन माणसे, नेतृत्वबदल, तरुण रक्त, पक्षाचे धोरण एक ना दोन गोष्टींना बळी पडतो व नेते निवडून देतो. निवडून आलेले नवीन काही चांगले करणे सोडाच उलट होते तेही बिघडवून टाकतात. आणि आधीच्यांपेक्षाही जास्त स्वतःची तुंबडी भरतात. शेवटी असाहयपणे उघड्या डोळ्यांनी चाललेला आणखी मोठा गोंधळ, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार पाहत पुन्हा पुन्हा त्यावर हिरीरीने वांझ चर्चा करत संताप संताप करत राहतो. पुढच्या इलेक्शन पर्यंत.


Saturday, October 24, 2009

मलाच पाहिले मी.......

स्वतःलाच बरबाद होताना पाहिले मी
सभोवताली गुन्हे होताना पाहिले मी

नसा नसांमध्ये रक्त बनून जो वाहत होता
त्यास पाण्यासारखे वाहताना पाहिले मी

मोठेपणाशी माझी करू नका तुलना
स्वतःला वावटळीत भिरभिरताना पाहिले मी

समजत होता जो मला माझ्यापेक्षा जास्त
त्यालाही नाराज होताना पाहिले मी

गैर जे त्यासंबंधी काय तुमच्याशी बोलू
सावलीलाही माझी साथ सोडताना पाहिले मी

Friday, October 23, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........सफळ संपूर्ण.

कालच्या धावपळीने सगळेजण अतिशय दमले होते तरीही सकाळी सातसव्वासातला उठले. आता फक्त दीड दिवस उरला होता. उद्या रात्री घरी जायला निघायचे होते. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणे पाहायला हवीच या यादीत मोडणारी असल्याने वेळाचे नियोजन करणे जरूरीचे होते. चारमिनार, सालारजंग म्युझियम, नेहरू झूऑलॉजिकल पार्क व ’ लाद ’ नावाने प्रसिध्द -बांगड्या व मोत्यांचा बाजार हे पाहायचे व वेळ उरलाच तर मग अजून एकदोन ठिकाणे पाहू असे ठरले. " चला आवरा पटापट तोवर महाराज नाश्ता बनवेल तो खाऊ आणि प्रथम चारमिनार पाहू. " असे मामांनी सांगताच जोतो आवरू लागला. पावणेनऊला महाराजने तिखटमिठाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी व दही असा भरपेट व मस्त नाश्ता दिला. तो खाऊन आम्ही निघालो.

जुन्या हैदराबादच्या मध्यभागी मोहम्मद कुली कुतुब शहाने महामारीपासून मुक्त केल्याबद्दल अल्लाचे आभार मानण्यासाठी १८० फूट उंची असलेला चारमीनार १५९१ मध्ये बांधला असून जमिनीपासून याची उंची १८० फूट इतकी आहे. प्रत्येक खांब हा १६० फूट उंचीचा आहे. इस्लामच्या प्रथम चार खलिफांचे प्रीत्यर्थ हे चार खांब असून चार मजले आहेत. सगळ्यात वरच्या मजल्यावर ४५ मोठी दालने नमाज पढण्यासाठी असून शुक्रवारच्या नमाजाकरिता येणाऱ्या खूप लोकांकरिता मोठा छज्जा आहे. लाईम स्टोन व ग्रॅनाइटचे संपूर्ण बांधकाम असून कझिया पद्धतीचा उत्कृष्ट नमुना आहे. जवळपास १५० पायऱ्या चढून वर गेल्यावर हैदराबाद शहराचा मनोरम नजारा पाहता येतो. मीनारांच्या आत अप्रतिम कोरीवकाम आहे. आवर्जून पाहावे असाच आहे. याच्या आसपासच हैदराबादचा अतिप्रसिद्ध बाजार भरतो. आई व सगळ्या काकूंना या बाजारात खूप काही घ्यायचे होते.

आम्ही गेलो तेव्हा आजच्या अतिप्रसिद्ध बिर्लामंदिराचे बांधकाम सुरू होते. संपूर्ण संगमरवरात बांधलेले हे मंदिर पुन्हा जायचा योग येईल त्यावेळी जरूर पाहायला हवे.नेहरू झूऑलॉजिकल पार्क प्रचंड मोठे असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस त्याच्यासाठी ठेवावा. आज सालारजंग म्युझियम व बायकांची खरेदी करूयात असे म्हणत सगळे म्युझियम कडे निघालो. सालारजंग म्युझियमची स्थापना १९५१ साली झाली असून एकंदर ७८ खोल्यांमध्ये जवळपास ४०,००० वेगवेगळ्या वस्तू, शिल्पे, दुर्मिळ पुस्तके, कुराण, वेगवेगळ्या देशातील उत्तमोत्तम पेंटिंग्ज, पुतळे व मोजताही येणार नाहीत इतकी लढाईस उपयुक्त हत्यारे- रत्नजडित तलवारी, ढाली, चिलखते, लोखंडाचे मुकुट, जोडे आणि अनेकविध गोष्टी पाहायला मिळाल्या. खूप मोठी दालने व अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहता पाहता अंधार पडला. खूप विविध घड्याळेही पाहायला मिळाली. एकात प्रत्येक तासाचे टोले द्यायला एक माणूस खाडकन दरवाजा उघडून येई व टोले देऊन गायब होई. तर दुसरीकडे एक कोंबडा येत असे व चोचीने लंबकावर प्रहार करी. हे टोले पाहायला आम्ही ताटकळत उभे होतो. मस्त मजा आली. अजूनही प्रचंड संख्येने टांगलेल्या तलवारी, भाले , ढाली मला चांगल्याच लक्षात राहिल्यात. थोडी भीतीच वाटली होती त्या पाहताना. तलवारींच्या मुठीवर व जांबियांच्या म्यानावर जडविलेले पाचू, नील व माणके मनात घर करून राहिलीत.

चला चला बांगड्या-मोती बाजार वाट पाहतोय हो आमची असा समस्त महिलामंडळाने धोशा लावला तसे मामा म्हणाले, " अरे आल्यासरशी तुम्हीही घ्याकी पाहून मग तिथेच म
स्त चाटच्या गाड्यांवर खाऊ-मजा करू. आजची आपली शेवटची रात्र आहे हे लक्षात आहे ना?" खायचे नाव निघाले तसे काकामंडळही निघाले. " अतिचेंगटपणा करू नका गं, काय त्या बांगड्या, मोतीबिती घ्यायचे त्या घ्या पटापट. कितीही भाव केलात तरी ते तुम्हाला गंडवणार आहेतच. " कधी नव्हे ते गायतोंडे काकांनी खोचक पवित्रा घेतला आणि लागलीच सगळ्यांनी त्यांची री ओढत आटपा बरं का लवकर अशी ताकीद दिली. " अरे कमाल झाली अजून पोचलोही नाही त्याआधीच सुरवात. हे पाहा तुम्ही वेगळे फिरा आम्ही लेकींना घेऊन फिरतो. दीड तासानेजिथून वेगळे झालो तिथे भेटू." असे शेट्येकाकूंनी सांगून टाकले. सगळ्या पोरांना बाबांनी सांभाळायचे व पोरींना आयांनी अशी वाटणी झाली आणि ' लाद बाजारात ' आम्ही घुसलो.

अलीबाबाचा खजिनाच दिसावा अशीच माझी तरी अवस्था होती. काय पाहू आणि काय काय घेऊ. एरवी कधीही फारसे काहीही हट्ट करून न मागणारी मी आईला जे दिसेल ते घे ना गं म्हणू लागले लाखेच्या आरशाचे छोटे तुकडे जडविलेल्या सुंदर रंग व वेगवेगळी नक्षी असलेल्या बांगड्या, डझनावारी बांगड्यांचे सेट्स, मोत्याच्या नाजूक बांगड्या, तिनचार रंगातील मोत्याच्या बांगड्या, गळ्यातले व कानातली. जरदोजी काम केलेले शरारा, साड्या, घागरे-चोळ्या डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. जिकडेतिकडे नुसता लखलखाट होता. पेट्रोमॅक्सच्या मोठ्या मोठ्या बत्त्यांचा पिवळा प्रकाश बांगड्या व इतर दागिन्यांवर पडून त्या अशा काही चकचकत होत्या की कोणीही प्रेमात पडावे. पूर्ण सहलीत आमच्या आईने फारसे काही घेतले नव्हते इथे मात्र तिने मनापासून खरेदी केली. मला चार चा एक असे तीन सेट्स घेतले. स्वतःला आठचा एक असे चार व आम्हा दोघींना मिळून सुंदरसा मोत्यांचा एक सेट घेतला. जरदोसी काम केलेली मोरपिशी रंगाची घागरा- चोळीला घेतली. पुढे चांगली चार-पाच वर्षे मी कितीतरी वेळा ती घालून मिरवत होते. आमच्या आजीसाठीही आईनेगदी हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या सात खड्यांच्या कुड्या घेतल्या. ही खरेदी करू तितकी थोडीच होती पण पैसे खूप कमी असल्याने सगळ्या काकूंनी आवरती घेतली शिवाय परतायची वेळही झाली होतीच.

मग तिथेच चाट, बिर्याणी, नवाबी सब्जबहार सोबत कुलचा व नंतर खास हैदराबादी रसमलाई खाऊन खरेदीच्या आनंदात परतलो.

सुंदर बांगड्या व घागरा-चोळी माझ्यासाठी घेतली आहे या आनंदामुळे
मला झोपच येईना. दर पाच मिनिटाने मी बांगड्या व ड्रेस पाहत होते. माझ्या अंथरुणाशेजारीच मी खरेदीची पिशवी ठेवली होती आणि तिचे बंद हातात घट्ट धरूनच केव्हातरी झोपून गेले .

आज रात्री घराकडे परतायला निघायचे होते. सकाळी सगळे जरा लवकरसेच उठले. संपूर्ण दिवस नेहरू झूऑलॉजिकल पार्क साठी ठेवला असला तरी आरामात आवरून चालण्यासारखे नव्हते. पार्क सकाळी नऊला उघडतो तेव्हा आपण त्या दरम्यानच तिथे पोचलो तर बरेच काही पाहता येईल असे मामांनी सांगितल्यामुळे कोणीही रेंगाळले नाही. अगदी राजेकाकू व नाईककाकूंनीही आज धोबीघाट न करता पटकन आवरले. महाराजने आज लवकर उठून साधा डोसा व मसाला डोसा बनवला होता. त्याचा सुगंध संपूर्ण धर्मशाळेभर पसरला होता. काल रात्री इतके पोट फुटेस्तोवर जेवलेले कधीच पचले होते. महाराजने वर्दी देताच सगळे जण डोसामय होऊन गेले. " आत्ताच भरपेट खाऊन घ्या रे म्हणजे बाहेर जेवायला नको. संध्याकाळी जेवून निघू काय." इति मामा.सुतार पक्षी


रसना अगदी तृप्त झाल्यावर आम्ही निघालो. साडेनऊला पार्कमध्ये शिरलो. १९६३ साली बांधलेले एकंदर ३०० एकर जमिनीवर पसरलेले हे प्रचंड मोठे पार्क आहे. जवळजवळ १५०० जातींचे पशू-पक्षी-फुलपाखरे-सरपटणारे जीव असून खास आकर्षण म्हणजे ' लायन सफारी ' ' टायगर सफारी ' ' बेअर सफारी ' व ' बटरफ्लाय सफारी '. आज आम्ही मुले फार खूश होतो. इथेही लहान मुलांची टॉय ट्रेन आहे. या सगळ्या सफारी राईडस केल्या व ट्रेनमध्येही बसलो. सीताफळे म्हणजे अगदी जीव की प्राण आहे माझे. नेमके पार्कच्या गेटवर सीताफळांची रास होती. आम्ही सगळ्यांनी खूप सारी घेतली व दिवसभर तीच खात होतो. मामांनी दोनतीन वेळा म्हटलेही, " अरे दोन-तीनच खा बरकां, नाहीतर त्रास होईल. " पण कोणी लक्ष दिले नाही त्यांच्याकडे. असेही उद्या तर घरीच जायचे होते आणि सीताफळाने कोणी आजारी पडते का?

हत्ती, सिंह, वाघ, खूप वेगवेगळे पक्षी त्यांची घरटी, अनेकविध आकर्षक फुलपाखरे-त्यांची विलक्षण रंगसंगती व डिझाइन्स पाहून अचंबित होत होतो. माकडे, अस्वले, सोनेरी हरणे, कोल्हे, लांडगे, रानडुकरे गणतीच नाही इतके प्राणी आहेत इथे. तीच तऱ्हा पक्षांची. संध्याकाळी पाच वाजता पार्कच बंद होणार म्हणून नाईलाजाने निघालो.


धर्मशाळेत पोचल्यावर सगळी मोठी माणसे सामान आवरू लागली. मी, भाऊ, चित्रा, गिरीश, नीलिमा, नितू, अशोक व रवी तिथेच लंगडी, लपाछपी खेळण्यात रमलो. सात वाजत आले तसे जेवायला चला रे च्या हाका येऊ लागल्या. सीताफळे व पाणी याशिवाय काहीच खाल्ले नव्हते दिवसभरात व पायाचे तुकडे पडतील इतके चाललो होतो. त्यामुळे खूप भुकेजलेलो. महाराजने शेवटच्या दिवसाचे म्हणून खास जेवण बनवले होते. हैदराबादी शाही पुलाव, कोफ्ता करी, दही वडे व सेवयां.

जेवताना सगळे काका महाराजला म्हणू लागले, " अरे बाबा तू इतके सुंदर जेवण जेवायची सवय लावलीस आता घरी गेले की फार जड जाणार आहे रे. घरी कोण देणार हे आम्हाला तिथे आपला नेहमीचे मुळमुळीत भाजी-पोळी व ताक भात." आता हे ऐकल्यावर महिलामंडळ गप्प थोडेच ना बसणार होते. मग झाली जुगलबंदी सुरू.
महाराज मात्र खुशीत होता. मेहनतीचे चीज झालेले. त्याने आवरायला घेतले तसे सगळे पांगले. नऊला धर्मशाळेला रामराम करून स्टेशनवर पोचलो. गाडी लागलेली होतीच. रिझर्वेशनही होते. पोटोबा पूर्ण पॅक असल्याने आता कधी ब्रह्मानंदी लावतो असे झाले होते सगळ्यांचे. आपापल्या जागा पकडून बर्थवर उश्या- पांघरुणांची जमवाजमव होईतो गाडी सुटली सुद्धा. आम्ही चाळीस जण असल्याने अर्धा डबाच प्रत्येकवेळी आम्ही व्यापत असू. मग इकडून तिकडे बोलायचे म्हणजे ओरडूनच बोलावे लागे. पडल्यापडल्या मोठ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. कान लावून ऐकत होते पण मध्येच कधीतरी झोप लागून गेली.

जाग आली तीच कापी कापीच्या आरोळ्यांनी.
या मद्रासी फिल्टर कॉफीचा सुगंध खासच असतो. एकतर आम्हाला कधी कोणी चहा-कॉफी पिऊ देत नसत. त्यामुळे आज कॉफी मिळणार ही पर्वणीच होती. " आई, मला पण हवी गं कॉफी.... " अरे पण हे काय.... शब्द बाहेरच येईनात नुसतीच हवा. घसा पूर्ण बसला होता. मी मुकी झालेले. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण हवेशिवाय काही निघेना म्हटल्यावर मला रडूच कोसळले. आई पाहत होती आणि हसत होती. मग तिने मला जवळ घेतले व म्हणाली, " अग कालच्या सीताफळांचा परिणाम आहे हां. नको घाबरू तू काही मुकी झालेली नाहीस. " तिचाही आवाज काही नेहमीसारखा नव्हताच पण निदान आईला बोलता तरी येत होते. लागलीच चित्रा, अशोक, नीलिमा, गिरीशकडे पळाले तर काय मज्जाच मज्जा. सगळेच फुसफुसत होते. कोणालाच बोलता येत नव्हते. तरी मामांनी सांगितलेले की जास्ती सीताफळे खाऊ नका...... पण ऐकले असते तर ना. काका-काकू मंडळींनाही बाधले होते पण बोलत होते सगळे.

पाहता पाहता सहल संपत आली. पुणे गेले तसे सगळेच खूप हळवे होऊ लागले. गेले एकोणतीस दिवस आम्ही चाळीसजण लगातार एकमेकांबरोबर होतो. सुरवातीला काही थोड्या ओळखीचे तर काही पूर्ण अनोळखी आणि आज एका घरातले होऊन गेलेलो. लहान वयात इतर कुठलीही टेन्शन्स, विचार नसतात ना. मनसोक्त हुंदडता येतं, कोण काय म्हणेल हा विचारही शिवलेला नसतो. छोट्या छोट्या गोष्टींतला मोठ्ठा आनंद व क्षुल्लकशा कारणाने वाहिलेल्या गंगायमुना....:) इतकी सारी माणसे व प्रत्येकाची निराळी तऱ्हा तरीही एक महिना सगळेजण एकमेकाला सांभाळून घेत होते. कुरबुरी झाल्याच-साहजिकच आहे पण कोणीही ताणून धरले नाही. गोखलेकाकू-गायतोंडे आजींमुळे गाड्या चुकल्या. अचानक मुक्काम करावा लागला पण सगळ्यांनी सहकार्य केले तेही मनापासून. वेळप्रसंगी अगदी एकमेकांच्या बॅग्ज उचलण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत मदती केल्या गेल्या. मामांनी कधीच प्रोफेशनल दृष्टिकोन ठेवला नाही. सगळेच त्यांच्या घरचेच होतो व त्यांनी अगदी प्रेमाने जास्तीत जास्त सोयी, खाण्यापिण्याची चंगळ पुरविली. हॅटस ऑफ मामा. खूप खेळलो, हुंदडलो. आजही यातले काही मित्र-मैत्रिणी आवर्जून आठवण काढतात/मेल करतात. हीच तर खरी कमाई .

दादर आले. सगळे भराभर उतरले. हो ना नाहीतर जावे लागायचे पुढे. भरल्या अंतःकरणाने सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्या सहलीचे पाहू नंतर पण निदान महिन्याभरात सगळे पाच गार्डन मध्ये भेटू आणि मस्त भेळीचा बार उडवू असा ठराव एकमताने पास झाला व आपापल्या घरी निघालो. एक महिना सहल व इतकी दूरवर आणि अनेक ठिकाणे, या सगळ्यांचा एकूण खर्च किती आला असावा?? काही अंदाज मंडळी?किती म्हणताय? चार-पाच हजार.... तुम्हाला हो काय वाटतेय- त्यापेक्षा जास्त? हा... हा..... अंदाज चुक्याच तुम्हारा. फक्त रुपये २,२००/-
आम्हा चार जणांचे एकूण रुपये १,७००/- मामांना आगाऊ दिले होते. ट्रीपच्या मध्ये थोडी गडबड झाल्याने अजून रु.१००/- वर दिले व खरेदी-खाणे-पिणे मिळून वर रु.४००/- खर्च झाले. आमच्या बाबांकडे पै न पै चा हिशेब लिहिलेला आहे. गेल्या वर्षीच्या मायदेशाच्या भेटीत या डायऱ्या काढून त्यातले खर्चाचे आकडे पाहून आई-बाबा व मी खो खो हसत होतो. खरेच वाटत नाही मला. आजकाल चाळीस माणसांना घेऊन एकवेळचे ' शिवाप्रसाद ' ला जेवायला गेलो तर सात-आठ हजार पुरतील का नाही कोण जाणे. आणि आम्ही फक्त बावीसशे रुपयांत तीस दिवस धमाल केली. असा दुर्मिळ योग पुन्हा येणार नाही पण सहलीचा आदर्श ठरावा अशी ही आमची सहल अविस्मरणीय झाली.


हे तेरा भाग आवर्जून वाचणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार. प्रवास वर्णने वाचणे बरेचदा कंटाळवाणे होते त्यात हे इतके लांबलचक. सांभाळून घेतलेत-प्रोत्साहन दिलेत खूप आनंद वाटला.

फोटो जालावरून
समाप्त.