जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 30, 2009

सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम......

" अग मेल्यांनो काय खीखी लावलीये गं कधीपासून? बरं खिदळताय तर संपूर्ण बत्तिशी दाखवा. तिथे कशाला चोरी मारी करताय? रोजचं मेलं कोणीतरी माझ्या जपाच्या वेळी तडमडत असतं. एकही दिवस मनासारखा जप काही होत नाही. " आजी करवादत होती. आम्ही सगळे तोंड दाबून लांब पळून गेलो. मग दुपारी आजोबा जेवायला आले तशी मी हळूच विचारले, " आजोबा, मला एक प्रश्न पडलाय. आम्ही सगळ्यांनी खूप चर्चा केली पण.... . तसे प्रश्न अजून एका माणसाला विचारू शकतो पण तो विचारल्यावर उत्तर मिळणार नाही्च मात्र जे हातात असेल त्याने मार मिळेल म्हणून कोणाचीच हिंमत नाही. तुम्ही विचाराल का?" आजोबांनी हळूच आजीकडे नजर वळवली आणि लागलीच माझ्याकडे पाहत डोळ्यांनीच विचारले.... प्रश्न हिच्याबद्दल आहे का? मीही लागलीच होकारार्थी मान हालवली तसे आजोबांनी, " चिंगे, आज दुपारचे जेवण सुखासुखी होण्याची लक्षणे बिलकुल दिसत नाहीयेत. विचार विचार तू.... नाहीतरी आता बिगूल वाजलाच आहे. तेव्हा होऊन जाऊ दे. "

हे ऐकताच आजीने हातातले चांदीचे तुपाचे सतेले दाणकन आपटले आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तिचा अवतार पाहून अर्धी बच्चेकंपनी टेबलाखाली गेली. मी आणि आत्तेभाऊ तग धरून होतो. आईचा-काकूचा चेहरा ताणला गेलेला, आत्या टेबलाखाली हाताने नको नको च्या खुणा करत होती. मी गावचेच नसल्यासारखी शांतपणे वरण भात कालवायला सुरवात केली. वर आजीला म्हटले, " आजी अग तूप वाढ ना. विसरलीस का?" " चिंगे, तू आजोबांना काय विचारणार होतीस ते विचार आधी मग मिळेल तूप. अगोचर झालीय कारटी. अजून दहावं ही लागलं नाही पण सगळ्यांना घेऊन दिवसभर खीखी-खूखू चालूच. आता का वाचा बसलीये? विचार म्हणते ना. " आमची आजी अतिशय प्रेमळ पण आता तिला नेमकी शंका आलेली .... ही कारटी नक्कीच काहीतरी आपल्याबद्दलच अगोचरपणा करू पाहत होती. मग ती बरी सुखासुखी जेवू देईल मला. तोवर आजोबा आपले मस्त तब्येतीत जेवत होते.
माझी छोटी न कळती भावंडेही आपल्याच तालात होती.

आता सुटका नाही तेव्हा कर नाही तर डर कशाला या आवेशात मी एका दमात आजोबांना विचारले, " आजोबा, देवाचा जप करताना आजूबाजूला काय चालले आहे हे कसे कळते हो? डोळे तर बंद असतात ना? आणि ते चित्त का काय ते देवापाशी मग स्वयंपाकघरात कोणी हळूच साय खाल्ली, कोणी खिदळले का कुचकुच केली, स्वयंपाकीणकाकू पाच मिनिटे उशिराने आल्या तर ते कसे बरे कळते? म्हणजे आम्हाला आपले रोजचे रट्टे द्यायचे संध्याकाळी शुभंकरोती-पाढे म्हणताना...... मेल्यांचे सगळे लक्ष पडवीत कोण आलेय, आज जेवणात काय गोड आहे यात लागलेले. मग चुकतीलच ना पाढे. आम्ही तर इतके लहान आहोत तरी आम्हांला रागे भरतात आणि स्वतः मात्र देवासमोर पाटावर बसून सगळ्यांवर बारीक लक्ष वर खेकसतही राहायचे. याला काय जप म्हणतात का? " पुढे काय रामायण घडले असेल ते मी वेगळे सांगायला नकोच. माझ्यामुळे सगळ्या मुलांना दुसऱ्याच दिवशी केलेल्या पॉट आइसक्रीम मधले खारट आइसक्रीम दिले गेले. मोठी मोठी टपोरी जांभळे उतरवली गेली आणि मोजून फक्त दहा दिली गेली. सगळ्यात कहर म्हणजे पत्र्याच्या थियेटरमध्ये सगळे सिनेमाला गेले पण आम्हाला मात्र घरी वॉचमन कडे सोपवून.


हा प्रश्न मला आजही सुटलेला नाही. मी अशी अनेक माणसे पाहिलीत, स्वतःवरही हे प्रयोग करून पाहिलेत. पण नेमके असे का होते याचे समर्थनीय उत्तर मिळत नाही. अशाच एक जरा लांबच्या आजी जपाची माळ घेऊन बसायच्या, त्याही बरोबर माजघर आणि स्वयंपाकघर याच्या मधल्या तबकडीत. कुठेही जरासे खुट्ट जरी वाजले की यांचा पट्टा सुरू. पुन्हा हातातल्या जपमाळेचे मणी ओढणेही चालूच. अगदी मेल्या, रांडेच्यापासून सगळ्या शिव्याही देत असत त्याच वेळी. अनेकदा लक्षनामाचा संकल्प सोडलेला असे. तो पुराही करत सात दिवसात.... पण तो हा असा.....
, आहे ना गंमत.

आता या नाम:स्मरणांत खरे मनोभावे नाव किती वेळा बरे घेतले असेल आजींनी? शिवाय याचा गाजावाजा तो किती. जो तो वचकून. कधी कधी हे आठवले की मी जपाची माळ घेऊन बसते. वाटते इतक्या गंमती पाहिल्यात तेव्हा आपण आपले मन-चित्त एकाग्र करून फक्त १०८ वेळा देवाचे नाव घेऊ शकतो का ते पाहावे. अगदी प्रामाणिकपणे सांगते.... जेमतेम दहा जास्तीत जास्त पंधरा मणी... की लागलीच मन लागते भरकटायला..... की पुन्हा स्वतःलाच एक थप्पड मारून त्याला पकडून जागेवर आणते व पुन्हा पहिल्यापासून सुरवात करते..... पण उपयोग शून्य. ये रे माझ्या मागल्या चालूच. " सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम, देह प्रपंचाचा दास, हाच एक नेम, फिरे अंतराळी आत्मा, सोडूनि देह सारा.... " असेच माझे होऊ लागते.

कुठल्या कुठल्या आठवणी अचानक उफाळून येऊ लागतात. ध्यानी मनीही नसलेली माणसे समोर उभी ठाकतात. अगदी लहानपणी केलेल्या खोड्या.... हट्ट... आठवणीतून आठवणी..... कधी चांगल्या घटना...... तर कधी दुःखदायी प्रसंग. काही गोष्टी कायमच्या हद्दपार झाल्यात असे वाटू लागलेले असते नेमक्या त्याच वाकुल्या दाखवत, " मी बरे अशी विसरू देईन तुला " असे म्हणत राहतात. वाटले की जपमाळ घेऊन बसलो ना की असे होत असेल. दुसरे काहीतरी करून पाहावे. मग ते केंद्रबिंदूकडे एकटक पाहणे प्रकार सुरू केले. तिथे तर मन अजूनच रानोमाळ भरकटू लागले. तोंडाने काही म्हणायचे नाही आणि थोड्यावेळाने आपण नक्की काय पाहत होतो याचा विसर पडावा इतके वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे बिंदू जिकडे तिकडे दिसू लागायचे. तशात मनाने कधी कोंकणातले घर गाठलेले असायचे तर कधी भूमितीचा दहावीचा तिमाहीचा पेपर. गेली अनेक वर्षे हे असे प्रयत्न करणे मी थांबवलेले नाही आणि आताशा मनाचे भरकटणे फारच वाढू लागलेय. त्याचेही बरोबरच आहे ना. आजकाल त्याचे कुरण फारच विस्तारलेय. कसले सात समुद्र घेऊन बसलात हे बेटे इतरांनाही पकडून आणू लागलेय स्वतःबरोबर.

वार्षिक परीक्षा सुरू असली की या भरकटण्याला तर उत येत असे. धडेच्या धडे पानेच्या पाने उलटून होत मग घड्याळ्याच्या आवाजाने डोळे खाडकन उघडत.... बापरे! तासभर गेला. काय काय वाचले आणि किती लक्षात आहे ते पाहावे तर या ओळींवरून डोळे फिरले होते यावरही विश्वास बसत नाही. मग पळापळ.
पुढे पुढे ऑफिसमध्ये कुठले लेक्चर, सभा वगैरे असली ना की हटकून हे भरकटणे घडत असे. अनेकदा समोरचा मनुष्य काय बोलतोय ते ऐकत त्याला हो हो म्हणत निरीक्षण सुरूच. बोलण्याची लकब, उभे राहण्याची ढब. काही खास अंगविक्षेप. मला वाटते आजीकडूनच नकळत हे इतके पक्के धडे मिळालेले आहेत की आता ते सहजी अंगात भिनून गेलेय. चला काहितरी फायदा झालाच आहे म्हणायचा. आपण बोलतोय आणि समोरच्याचे डोळे एकटक आपल्यावर खिळलेत की समजून जावे हा भरकटलाय..... जसे तुम्ही आता वाचता वाचता आपल्याच कुठल्याश्या आठवणीत घुसला आहात. तुम्ही तसे आणि मी पोस्टच्या विषयापासून भरकटायला लागायच्या आत थांबतेच........

Sunday, November 29, 2009

गोळ्यांची कढी

जिन्नस

  • एक वाटी डाळीचे पीठ
  • दोन चमचे तांदुळाचे पीठ
  • दोन चमचे तिखट, दोन चमचे धने-जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला
  • एक वाटी घट्ट गोड दही
  • दोन-तीन तमालपत्रे, दोन लवंगा, चार मिरे, छोटा तुकडा दालचिनी, दोन लाल सुक्या मिरच्या
  • आल्याचा छोटा तुकडा व दोन लसूण पाकळ्या ठेचून, मूठभर कोथिंबीर चिरून
  • दोन चमचे तेल व दोन चमचे तूप
  • जिरे, हिंग, हळद, मीठ

मार्गदर्शन

डाळीच्या( बेसन ) व तांदुळाच्या पिठात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिंग, धने-जिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला व दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून जरूरीपुरते पाणी घालून घट्ट भिजवावे. पसरट भांडे घेऊन त्याला किंचित तेलाचे बोट लावून घट्ट भिजवलेल्या गोळ्याचे रोल करून घेऊन वाफवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. किंवा छोट्या गोटीएवढे गोळे करून घेऊन वाफवावेत. एकीकडे घट्ट दह्याला अर्धा चमचा डाळीचे पीठ लावून घुसळून ठेवावे.

एका पातेल्यात तूप घालून त्यावर जिरे, लवंगा, मिरे, दालचिनी, तमालपत्र व ठेचलेले आले-लसूण घालून मिनिटभर परतावे. नंतर त्यावर हिंग, हळद व सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्यावे. त्यावर घुसळलेले दही, चवीनुसार मीठ व आवडेल इतके पाणी घालून ढवळून वाफवलेले गोळे घालून झाकण ठेवून एक सणसणीत उकळी आणावी. गरम गरम वाढावे.

टीपा
ही कढी खूप पातळ करू नये. तसेच हळद गोळ्यांमध्येही घातलेली असल्याने फोडणीत जरा कमीच घालावी. दही आंबट असल्यास आवश्यकतेनुसार साखर घालावी. कढी आंबट असू नये. तितकीशी छान लागत नाही.

Friday, November 27, 2009

जगातली सगळ्यात महागडी जाहिरात व या वर्षिची बेस्ट जाहिरात विजेतीही........

जगातली सगळ्यात महागडी जाहिरात व या वर्षिची पारितोषिक विजेती........

This is the world's most costly Advertisement and the winner of this year's best Ad of the world.It took 606 takes and re-takes to make this commercial and the total cost was $ 6.2 million for this 90 second commercial. You could probably make a movie for that kind of money!Everything is real with no graphics used and still look at the precision. The team that made this commercial won many awards.

Wednesday, November 25, 2009

घाव.....


२६/११, झालेला घाव आजही तितकाच खोल व ताजा आहे. कधीही न भरून येईल अशी झालेली अपरिमित हानी. १६६ जणांनी गमावलेले प्राण व यातनांचे लाखो-करोडो अप्रत्यक्ष बळी. रोजचेच असुरक्षित जीवन, तरीही पुन्हा ठाम उभे मुंबईकर. ढिसाळ सुरक्षा, गाफील शासन, तुंबड्या भरू राजकारणी व सामना करणारे निधड्या छातीचे वीर. सगळ्यावर प्रचंड उहापोह गेले वर्षभर झाला आहे व पुढेही होत राहील. निष्पत्ती शून्य. हा घाव ताजा म्हणावा तर आधीचेच अजून........ प्रत्येक हल्ल्यानंतर केलेल्या त्याच त्याच चर्चा, खटले व प्रयत्नांची आश्वासने. ऐकून मने विटलीत आता. क्रुरता व शूरता यांची परिसीमा. निरपराधांचे बळी व त्यांचे प्राण वाचवताना स्वप्राणांचे बलिदान करणारे बहाद्दर. आपल्या परीने जोतो झगडला व आजही झगडतो आहे. पण कुठवर....आणि कधीपर्यंत......???

या काळ्याकुट्ट दिवशी शहीद झालेल्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
( गीत: कुसुमाग्रज अनाम वीरा )

आवडले मला.........




थबकून मजपाशी दखल, घेणे आवडले मला
धारेच्या विरुद्ध पोहणे, झगडणे आवडले मला

जीवनाचे सत्य दु:खच, लोकांनी ऐकवले सदा
दु:खात सुखाचे क्षण, शोधणे आवडले मला

पानगळती सांगत राहिली, थंडीचे आगमन
तशात भुंग्याचे फुलांवर, झुलणे आवडले मला

केव्हांतरी चांदण्यांत माझ्या, काळरात्र आली
क्षणिक चंद्राचेही असे, रुसणे आवडले मला

बरेचसे थकलेलेच जीव, काही सुगंधित शरीरे
अत्तराहून सुंदर धर्मबिंदू, श्रम आवडले मला

घर जिच्यामुळे उजळलेले, तीच निघे घर बांधाया
उंबरठ्यावर कपाळ तिचे, चुंबणे आवडले मला

नाती जुळतील नाती तुटतील, जीवनाच्या प्रवाहात
माझ्या आपल्यांसवे नीत, फिरणे आवडले मला

Tuesday, November 24, 2009

नगण्यतेत समावलेले जीवन.......

मानवी मनाची सगळ्यात आवश्यक गरज म्हणा, इच्छा म्हणा....." कोणीतरी माझी विचारपूस करेल, आठवण काढेल. आवर्जून तू कसा आहेस हे विचारेल. मनापासून मी जसा आहे तसा माझा स्वीकार करेल. " जोवर ही चाहत-इच्छा पुरवली जात नाही तोवर तो सतत प्रयत्नशील असतो. जाणूनबुजून त्याकरिता झटतो. सामान्यपणे प्रत्येक माणूस जीवनात यासाठी झगडताना दिसतो. क्षेत्र कुठलेही असू देत, स्वीकाराच्या मागे माणूस हात धुऊन लागतो. तसे मागे लागणे आवश्यक आहेच. पण त्याचा अतिरेक झाला की लक्ष्य भरकटते.

शब्द हे जितके धारदार असतात तितकीच किंबहुना थोडी जास्तच उपेक्षा खोलवर आघात करते. ’ अनुल्लेखाने मारणे ’ हा आजकाल सार्वत्रिक बोकाळलेला एक प्रवाह आहे. जाणीवपूर्वक व संगनमताने एखाद्याला वगळायचे, टाळायचे. काही वेळा व काही माणसांकरिता हा मार्ग स्वीकारावाच लागतो. नाहीतर त्या अतिरेकी प्रवृत्ती आपला ताबा घेऊन गुलाम बनवू पाहतात. परंतु बरेचदा हा मंत्र सरसकट वापरला जातो व याचे बळी वारंवार बदलत असतात. या प्रवृत्तीचा सर्रास आधार घेणारे स्वत: मात्र त्याचीच शिकार असतात. माणूस एकवेळ टोचरे बोल सहन करेल....कारण त्यांना प्रत्युत्तर करता येते. किमान संवाद होतो.

परंतु उपेक्षा मनाला ढासळवते. तुमचे अस्तित्वच जेव्हां नाकारले जाते तेव्हां मन कोसळते. कोणालाही माझी कदर नाही. मी येथे असूनही साधी माझी दखलही त्यांनी घेतली नाही. मला टाळले, का? पुन्हा या ’ का ’ चे नेमके उत्तर मिळत नसतेच. वारंवार असे झाले की असंतोष खदखदू लागतो. मग हे दुखावलेले मन स्वत:चे अस्तित्व दाखवण्याच्या मागे लागते. कधी कष्टाने-त्यागाने, कधी सामान्य मार्गाने तर कधी वाम मार्गाने. प्रत्येक माणूस समाजात राहू इच्छितो-केंद्रस्थानी राहू पाहतो. हे सगळ्यांना जमतेच असे नाही. मग असंतुष्ट मने उदास होतात, तक्रारखोर होतात, धुमसत राहतात. स्वतः सोबत जवळच्यांचाही छळ करतात.

याचे कारण शोधण्याचा आपल्याच मनात प्रयत्न केला तर जाणवते की माझे जीवन हे लोकांधीन आहे. दुसऱ्याने मला आपले म्हणावे असे जोवर मला सारखे वाटत राहते तोवर खरे तर मीच स्वतःला त्यांच्या स्वाधीन करून टाकलेय हे मला समजतच नाही. इतरांनी मला आपले म्हणावे किंवा नाकारावे हेच जर माझ्या जगण्याचे बळ-आधार असेल तर मग अश्या जगण्याने ' मला ' काय मिळेल? थोडी तारीफ, माफक प्रसिद्धी, कदाचित थोडे पैसे, त्याहून पुढे अगदी गेलोच तर सत्ता-बक्षिसे, पुरस्कार-मानचिन्हे..... बस. या सगळ्यांनी त्या त्या क्षणांपुरता आनंद मिळेलही परंतु यावर अवलंबून राहत जीवन जगण्याचे वरपांगी प्रयत्न म्हणजे केवळ दु:खाची सुरवात. या मानपत्रांनी मनातला असंतोष दूर होईल का? का आजच्या पूर्णतः व्यावहारिक बनलेल्या जगाची सौख्याची हीच मानदंडे आहेत व ती मिळवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता.

रोजच पहाटे आभाळ सोन्याची उधळण करते. एक विलक्षण प्रसन्न अनुभूती चराचरांत भरून राहते. किरणांकिरणांतून जीवनरस सूर्य ओतत राहतो. पक्षी पंखात नवा दम घेऊन भरारी घेतात. प्राजक्त दवासारखां डवरून सुगंध पसरवत टपटपत राहतो. मुक्या कळ्या मनमोकळ्या उत्फुल्ल हसू लागतात. झाडे-वेली हिरव्या-पोपटी पानांमधून जीवनाचा रंग दाखवत राहतात. फुलाफुलावर गुंजारव करणारे भुंगे-मोहक फुलपाखरे नाचत-बागडत राहतात, परागकण पेरत राहतात. सगळ्यांमध्ये जीवन मनापासून जगण्याची असोशी दिसते. या सगळ्यांच्या केंद्रभागी निसर्ग आहे. उडणे हा पक्षांचा केंद्रबिंदू तर उमलणे हा फुलाचा. कोणी नोंद घेवो न घेवो फुले फुलतीलच, पक्षी उडतीलच. निसर्गाची ही मुक्त उधळण सतत आपल्या समोर असते. पण त्याची नोंद किती जण घेतात? यांतील कोणी कधी संपावर जाते का? पक्षांचे कूजन बेसूरा आलाप गाते का? खरे तर यांची हेळसांड/अहवेलनाच जास्त केली जाते तरीही हे आपला मूळ गुणधर्म सोडत-बदलत नाहीत. निसर्गाचा हा देखणा उत्सव रोजचाच म्हणत आपण त्याची उपेक्षाच करतो. त्याचा तोल ढासळवत राहतो अन मग जेव्हां तो आपली उपेक्षा करतो तेव्हां त्याच्या रौद्ररूपाने बोटे मोडत राहतो.

मग आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षांचा आपण इतका का बाऊ करत बसतो? आठवून् आठवून दु:ख ताजे करत राहतो....डोळ्यांवाटे सांडत खंतावत राहतो. ते सारे क्षण जीवन बरबाद.... पुन्हा पुन्हा बरबाद. इतके फुकट घालवण्याएवढे क्षण आपल्यापाशी आहेत का हा विचारही डोकावत नाही. दुःखाचा उत्सव एकदाच काय तो मनवून त्याला संपवून टाकणे म्हणजे स्वतःला लोकांकडून कुरवाळून घेण्याचे थांबवणे. इतका त्याग मग तो स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक असला तरी तो सहजी/कळूनही नजरअंदाज केला जातो. ह्या कुरवाळून घेण्याचीच हाव वाढते. अरेरे! बिचारा! यासारखे शब्द सुखावू लागतात. हळहळण्याकरीता तरी लोक आपली आठवण काढतात म्हणून वारंवार दु:ख मांडले जाते. जळवेसारखे जीवनाला चिकटलेले स्वनिर्मित दु:ख.

जगातले सर्वश्रेष्ठ मानपत्र कुठल्याही पक्षाला द्या, दुसऱ्याच दिवशी तो आपले घरटे सोडून जाईल. त्या पुरस्काराने त्याचे उडणेच जखडले गेले तर राहिलेच काय त्याच्यापाशी? सागरात प्रत्येक क्षणी एक लाट जन्म घेते......पाहता पाहता उच्चतम बिंदूवर आरूढ होते....अन निमिषार्धात किनाऱ्याशी ती फुटलेली असते. अशा असंख्य नगण्य लाटा वर्षोंनवर्षे तितक्याच ओढीने उठत आहेत -विरत आहेत. ह्या लाटा किती तरल आहेत. आपण का इतके जडशीळ बनू पाहतो आहोत?

कोणी माझी आठवण ठेवली आहे...कोणी मला त्यांच्या वर्तुळात घेतले आहे याने नेमके ’ मला ’ काय सुख मिळते? का ह्यातच जगण्याचे सुख सामावलेले आहे ही आपल्या मनाची पक्की समजूतच आपण करून स्वत:ला जखडून ठेवले आहे. जीवनपथावर खरे तर आपण थोडेसे रांगतो.......थोडीशी धूळ उडते. त्यातच आपले मन रमून जाते. अजून चालायला सुरवातही केली नाही तोच ते खुंटते. कालांतराने धूळ बसते पण आपण तिथेच, रुतलेले. चालणेच संपले मग नवीन धूळ उडणारच कशी? तोवर अनेक अपराधही आपण करून चुकलेले असतोच. मग त्या अपराधांच्या सावलीत बसून आपल्यासारख्याच आत्ममग्न जीवांशी या थिजलेल्या धुळीची चर्चा करत बसतो-संपून जातो. हेच, जर मुळातच या धुळीने माखण्यास आतूर असलेली आपली नजर आपण वारंवार स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकेल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व चाल लाभेल. किमान नको ते दु:ख ओढवून घेण्याची प्रक्रिया थांबेल.

Monday, November 23, 2009

भरली केळी



जिन्नस

  • तीन -चार केळी - मध्यम पिकलेली असावीत
  • चार चमचे ओले खोबरे
  • एक चमचा तूप
  • चार चमचे साखर
  • दोन मिरी, दोन लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा, चिमुटभर वेलची पूड
  • काजू, बदाम, बेदाणा, पिस्ता--- एकुण दोन चमचे सुका मेवा

मार्गदर्शन

बरेचदा केळी घरात आणली जातात पण खाल्ली जात नाहीत. तशीच लोळत पडतात, जास्ती पिकली की फेकून दिली जातात. कधीकधी अचानक गोड खावेसे वाटते. पण फार सोपस्कार करायची इच्छा नसते-कंटाळा येतो. आणि पदार्थ फार जडपणा आणणारा नको असतो. अशावेळी अगदी दहा मिनिटात होणारी व छान लागणारी भरली केळी करून पाहा.

मध्यम पिकलेली चार केळी साल काढून प्रत्येकी दोन तुकडे करून घ्यावी. एका पसरट पातेल्यात (नॉन स्टिक पॅन) चमचा भर तूप घालावे. तूप तापले की लवंगा, मिरे व दालचिनी तुकडा टाकून मिनिटभर परतावे. त्यावर सुका मेवा टाकून दोन-तीन मिनिटे परतून हलक्या हाताने केळी टाकावीत. लागलीच खोबरे व साखर घालून केळी मध्यम आचेवर चार मिनिटे परतावे. त्यावर वेलची पूड टाकून आंच किंचितशी वाढवून केळी जराशी खरपूस झाली की लागलीच उतरवावे. गरम किंवा गार जसे आवडेल तसे खावे.


टीपा

केळी किंचित कचरट असताना केल्यास मध्ये चीर पाडून खोबरे भरावे व अगदी हलकेच ढवळावे. राजेरी केळ्यांची जास्त चांगली होतात.

Sunday, November 22, 2009

पुणेरी पाट्या....


मला विरोपात आल्या. एकदम सही आहेत. तुम्हालाही हसू येईलच.





















Thursday, November 19, 2009

आस....

आताशा मन माझे का असे शांतशांत
न कळे जाणवे का जीवघेणा एकांत
थांबेल कधी शोधणे, मिळेल का जीवा दिलासा
कसे सांगू तुला, किती आहेस तू हवासा

का नयन माझे धुंडती दशदिशां तुज
असता समीप तव स्वर्ग दिसे मज
चहूकडे शोधते मी कुठे लागेल चाहूल तुझी
कसे सांगू जीवलगा, किती आहे आस तुझी

केवळ धडकण्याकरिता का हृदय माझे स्पंदते
तरीही श्वासावर माझ्या का असती तुझेच पहारे
जीव माझा वणवण शोधे का तुझाच सहारा
कसे सांगू प्रिया तुज, तूच एकमात्र आसरा

असे माझे जगणे का माझेच आता नाही उरले
माझ्या आठवात परी का तुझेच श्वास उसासले
आता तरी तुझ्या अंतरात घर माझे वसावे
अन मी स्वतःला तुझ्यावर मुक्त उधळून द्यावे

Wednesday, November 18, 2009

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........

डॉ. हिरेमठांनी ऑपरेशन झाल्या झाल्या बाहेर येऊन आईला व मला सगळे व्यवस्थित झाल्याचे सांगितले. अर्ध्या पाऊण तासात तुझ्या बाबांना अती दक्षता विभागात हालवतो. आता अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही दोघी पहाटेपासून एक मिनिटही इथून दूर गेला नसाल, जा जरा चहा तरी घेऊन या. मी तुमच्या दोघींपैकी कोणालाही इथे भरती करून घेणार नाही, तेव्हां पळा. असा प्रेमळ दम देऊन डॉक्टर पुन्हा बाबांकडे गेले. बाबा अजूनही ऑपरेशन थियेटर मध्येच होते.

रूबीच्या अँजोप्लॅस्टी व ग्राफी जिथे होते त्या विभागातच आम्ही पहाटेपासून बसलो होतो. आजूबाजूला आमच्यासारखीच धास्तावलेली, विमनस्क मने होती. सात तास एकाच कॉरीडॉरमध्ये वावरणारे अनेक जीव व त्यांच्या मनातील विचारांची आवर्तने राहून राहून दिसत होती. कोणीही फारसे कोणाशी बोलत नव्हते. तरीही मनातला कोलाहल, येणारे आठवणींचे उमाळे, मनातल्या मनात मागितली जाणारी माफी, चुकांची कबुली, स्वतःला दिलेली दूषणे. हा विचारही नको असे मन म्हणत असले तरी अपरिहार्यपणे सारखा समोर उभा ठाकलेला प्रश्न, जर काही भयंकर घडलेच तर पुढे काय? नाही नाही असे काही होणार नाही असे म्हणत पुन्हा पुन्हा झटकलेली मान, गालावर मारलेल्या चापट्या.

सूर्य उगवला, कोवळी उन्हे अवतरली, हळूहळू उन्हाचा ताप वाढू लागला. पाहता पाहता आग ओकू लागला. निसर्ग दिवसाच्या वर येण्याबरोबर स्वतःची रूपे बदलत होता. पण त्याची दखल इथले एकही मन घेत नव्हते. काहींची बरीच माणसे अवतीभोवती असल्याने ती लगबग करीत कॉफी/चहा आणत होती. बळजोरीने एकमेकांना पाजत होती. तर काहींचे नातलग आता आपल्याला किती भार पडतोय याचा अंदाज घेत होती. पाय फार अवघडले म्हणून मी उठून फेऱ्या मारू लागले. या कॉरीडॉरला लागूनच एक बऱ्यापैकी मोठी गच्ची आहे. बाथरूम्स, प्यायच्या पाण्याचे तीन-चार नळ. टेबले-खुर्च्या, सिमेंटचे चौकोनात बांधलेले कट्टे, गरम चहा-कॉफी व बिस्किटे आणि डाव्या हाताला एक उघडीच -अर्ध्या भिंती वर छप्पर व आत तीन बाजूंनी बांधून काढलेले सिमेंटचे कट्टे असलेली एक खोलीसदृष्य जागा आहे. गच्चीत बरीच गर्दी होती. काळजीचे स्वर हळूहळू कुजबुजत होते. चर्चा सुरू होत्या.

चालता चालता मी या डाव्या कोपऱ्यातल्या कट्ट्यावर टेकले. डोळे मिटले. गदिमांचे, " सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातून, कोण आवडे अधिक तुला? " हेच गाणे सकाळपासून ऐकू येते होते. बाबांच्या अनेक छोट्याछोट्या गोष्टी आठवत होत्या.... मन गाण्यातील शब्दांबरोबर हिंदोळे घेत होते तोच एक घुसमटलेला- उरी फुटलेला हुंदका आला. क्षणभर वाटले भास झाला. सगळेच जण एकाच बोटीत असल्याने पटकन आवाजाचा माग लागेना. तोच पुन्हा आवाज आला. कोपऱ्यात एक म्हातारे बाबा गुडघ्याला कवळ घालून डोके खुपसून बसले होते. उमाळ्यावर उमाळे येऊन गदगदून रडत होते. आवाज बाहेर फुटू नये म्हणून टॉवेलचा बोळा तोंडाशी धरला होता.

गावाकडून आले असावेत. शेतकरी कदाचित. अगदी फाटकी शरीरयष्टी होती. कधीकाळी पांढरा असलेला सदरा व धोतर आता कळकट झाले होते. पायाला मोठ्याला भेगा होत्या. रापलेला रंग अन राठ खरखरीत हात त्यांचे काबाडकष्ट दाखवत होते. आजूबाजूला कोणीच दिसेना. एकटेच असावेत. कोण बरे असेल यांचे इथे ऍडमिट? त्यांचे घुसमटून घुसमटून रडणे थांबतच नव्हते. त्यांना तसेच सोडूनही जाववेना पण पुढे होऊन बोलावे का न बोलावे? त्यांना अजून त्रास तर होणार नाही.... काही समजेना. शेवटी उठले आणि चहावाल्याकडून चहाचा एक ग्लास घेतला. बाबाच्या समोर जाऊन मांडी घालून बसले. तसे त्याने पटकन वर पाहिले. ओतून आलेले डोळे, फाटलेले मन अन सुकलेले ओठ जरासे थरथरले. नुसताच कण्हल्यासारखा कुठल्याश्या यातनांच्या डोहातून आल्यासारखा एक आवाज तोंडातून निघाला.

माझ्या मनात बाबांच्या आठवणींचा पूर, बाबांचे ऒपरेशन सुखरूप पार पडू देत चा जप त्यात यांचा हा स्वर सगळे बांध तोडून गेला. अश्रू वाहू लागले. आईसमोर एकदाही मी आसवे तरळूही दिली नव्हती. डोळे न पुसताच मी विचारले, " बाबा चहा घ्याल का? तुमच्या आजारी माणसासाठी तुम्हाला निदान काही दिवस तरी जगायलाच हवे ना? घ्या नं.... " असे म्हणत मी त्यांच्या हातावरून हात फिरवत राहिले. डोळे पुसून त्यांनी चहा घेतला. मला हातानेच सुखी राहा गं बाय असे म्हणून पुन्हा नजर खाली लावून बसले. ते पाहून मी हलकेच निघाले. आईशेजारी येऊन बसले. त्या सत्तरीच्या आसपास असलेल्या बाबांचे कोण असेल बरे इथे हा प्रश्न रेंगाळतच राहिला. नंतर बराच वेळ मी पुन्हा बाहेर गेले नाही आणि ते बाबा मला आसपास दिसले नाहीत.

डॉक्टरांनी बळजोरीने आम्हा दोघींना तिथून बाहेर काढल्यावर आम्ही खाली आलो. रूबीच्या गेटमधून आत शिरल्या शिरल्या कँटिन आहे. चहा-कॉफी व वडा, इडली-सांबार, समोसे, पुरी-भाजी सारखे पदार्थ तिथे मिळतात. सारखा माणसांचा राबता असतोच. आईला एका कट्ट्यावर बसवून मी कॉफी घेऊन आले. बाबांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले होते. मी आणि आई आनंदात होतो. कॉफी घेत एकीकडे मी भरभर तीनचार फोन केले. आम्ही दोघी पुन्हा वर जायला निघालो. येताना एका झाडाखाली पाय पोटाशी घेऊन बसलेली तीन मुले-साधारण पंधरा-बारा-आठ असे वय असेल. बावरलेले- हरवलेले खिन्न चेहरे, वाट पाहणारे-आपले माणूस शोधणारे डोळे. मला एकदम बाबाची आठवण आली.... ही पोरे त्याचीच कोणी असतील का? अजूनही त्या बाबाचे कोण आजारी आहे तेही कळले नव्हते.

वर जाताना पुन्हा लक्ष गेले त्या मुलांकडे आणि समोरून बाबा येताना दिसला. ती त्याचीच नातवंडे होती. मी व आई आणि बाबा एकाचवेळी त्या मुलांपाशी पोचलो. बाबाला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. त्याला पाहून पोरे तटकन उठून उभी राहिली. सगळ्यांकडे एकवार पाहून तिघांना त्याने त्याच्या मिठीत कवटाळले. दोन्ही लहान पोरे बावरून गेली पण मोठ्याला कळले होते," आज्या आरं बोल की, आमचा बाबा........ आमचा बाबा बरा आहे ना?" आज्याने त्यांना तसेच घट्ट जवळ घेत खाली बसवले. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत डोक्याला डोकी लावत चौघे धुळीत अनवाणी पायांनी, बोडक्या डोक्याने उकिडवे बसले. आज्याने डोळ्यातले पाणी मुठीने पुसले अन म्हणाला, " पोरांनो बापूस ग्येला तुमचा. ग्येला माझा पोर ग्येला रं पर तुम्ही डरू नका. मी तुमचा आज्या अजून जिता हाय. आता माय बी म्याच अन बापूस बी म्याच. एकडाव किती रडायचं ते प्वाटभर रडून घ्या. नंतर अजाबात कोणी बी डोळ्यातून पाणी काढायचं न्हाय. तुमच्या बापसाचे तेवढेच श्वास लिवलेले होते. पर तुमचा पुरा जलम जायचा आहे. रडत बसून त्यो निभनार न्हायी तवा सारखं डोळं गाळून जमायचं न्हायं. त्यो त्याच्यावाटचे भोग काढून गेलाय आपले अजून बाकी हायेत. मी येतोच त्याला घेऊन मग जाऊ सांगाती घरला. घाबरू नगा तुमच्या आज्यांच्या काळजात अजून ताकद हाय. समदं होतंय. " असे म्हणत तोही पोरांसोबत असहाय आक्रोश करू लागला.

मी, आई व अजून काही जण हे ऐकत होतो. सारेच हेलावलेले, रडत होते. पोरांच्या पाठीवरून हात फिरवून बाबाला नमस्कार करून मी व आई वर आलो. जिने चढताना जाणवत राहिले एक जीव जगला होता तर एक जीव अनेक जीवांना पोरके करून अनंतात विलीन झाला होता.

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत

अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?........ गदिमांचे शब्द अन बाबूजींचा आवाज माझे काळीज चिरत राहिला.

Tuesday, November 17, 2009

गुगलबाबाची चित्तरकथा.....

गुगलबाबाची गेल्या अकरा वर्षाची चित्तरकथा-प्रवास या चित्रफितीत सादर आहे. जरूर पाहा.


येथेही पाहता येईल.

Monday, November 16, 2009

ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर.........

अरुंधती आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली. सेक्शनचे हळदीकुंकू होते. नेहमीचा तो पंजाबी नको बाई, आज जरा साडी नेसीन. मनासारखे आवरून निघायचे तर घरातली कामे आवरून स्वतःसाठी अर्धा तास तरी हवाच ना. आयत्यावेळी काहीतरी उदभवते म्हणून अजून थोडा वेळ असू दे हाताशी म्हणून अजूनच लवकर उठून आवरायला सुरवात केली. डबेडुबे झाले. बाईही वेळेवर आली. लेकीची रिक्षाही आज पाच मिनिटे लवकरच आली. नवऱ्याला आज नेमके उलट दिशेला जायचे असल्याने रिक्षा घ्यावी लागेल एवढाच काय तो घोळ होता. पण त्याची फार चिंता नको करायला. रोज तर पाहतो आपण खाली उभ्याच असतात रिक्षा. एकीकडे आवरत अरूचे स्वतःशीच बोलणे सुरू होते.

सुंदरशी अबोली रंगाची चंदेरी तिने अगदी मन लावून नेसली. मस्त शेपटा त्यावर एकच नाजूकसे गुलाबाचे फुल टाचले. नेहमीची पर्सही बदलली. रात्रीच सगळ्यांना द्यायचे वाण, फुले व पेढे तिने पिशवीत भरून ठेवले होते. पुन्हा एकदा आरशात डोकावून स्वतःलाच मस्त अशी पावती देत खूश होऊन आज तिने उंच टाचेच्या चप्पल घातल्या. खांद्यावर पर्स एका हातात पिशवी व दुसऱ्या हातात कुलूप घेऊन ती दारापर्यंत पोचली आणि आठवले, " दूध राहिलेच की आत टाकायचे. ओटा आवरला तेव्हां गरमच होते जरासे. बरे झाले आठवले नाहीतर संध्याकाळी पनीरच करावे लागले असते. " असे पुटपुटत साडीचा घोळ, पर्स, पिशवी, कुलूप सांभाळत एकीकडे रिक्षा असेलच ना खाली हा विचार करत घाईघाईत ओट्याशी आली. कुलूप पिशवी धरलेल्या हातात घेत तिने दुधाचे भरलेले पातेले एका हाताने उचलले. फ्रीजचा दरवाजा कुलुपाच्या हाताने कसाबसा उघडला खरा पण दूध तापवले तेव्हां अगदी उतास चालले होते. त्यामुळे पातेल्याची कड ओशट झालेली. पटकन आत ठेवावे म्हणून ती वाकली तोच भांडे हातातून सटकले. लीटरभर दुधाचा फ्रीजला, जमिनीला व अरूच्या साडीला अभिषेक झाला.


तिथेच भांडे आपटून अरू दुधाच्या ओघळांमध्येच पिशवी-पर्स रागाने फेकून देऊन फतकल मारून बसली. जिवाचा संताप झाला होता अगदी. आता हा सगळा पसारा आवरायला हवा, असेच टाकून जाता येणारच नाही. गेले तर संध्याकाळी मुंग्यांचे थैमान असेल जिकडे तिकडे. शिवाय आता अंघोळ किमान हातपाय स्वच्छ धुवायला हवेत. इतक्या सुंदर साडीची लागलेली वाट, सकाळपासून उत्साहात असलेले मन कोमेजून गेले. पाहता पाहता अरू रडायलाच लागली. नेहमीची ट्रेन तर सोडाच अजून एक तासानंतरचीही मिळणार नव्हती. म्हणजे लेटमार्क किंवा हाफ डे. ऑफिसमध्ये सगळ्या कश्या मुरडत असतील. साड्यांची, वाणाची चर्चा रंगेल आणि नेमकी मीच या सगळ्या आनंदाला मुकणार. अरूचे रडू थांबेचना.......

चरफडत, बडबडत अरूने आवरायला घेतले. किती घाई करावी माणसाने. तरी नेहमी आई ओरडते, " जरा शांतपणे करत जा गं. घाईने काम केले ना की हमखास घोळ होतो. आणि असा काय वेळ वाचतो त्यातून? उलट त्रासच होतो. एकातून दुसरे काम निर्माण होते म्हणजे दुप्पट वेळ वाया जातोच वर मनस्ताप. " पण मी तिचे ऐकले तर ना..... आता जर ओट्यावर कुलूप, पिशवी ठेवली असती तर येव्हांना ट्रेनमध्ये असते ना मी. मूर्ख, वेंधळी कुठली.

हे असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत बरेचदा घडतात. अगदी साध्याच गोष्टीतही वेळ व श्रम वाचू शकतात. आणि घाई केली की काम बिघडतेच बरेचदा. आपल्या मनाची धारणा झाली आहे की घाई असली की आपण काम भरभर करतो. पण तुम्ही घड्याळ लावून पाहा, शांतपणे ( मनाचा शांतपणा ) केलेले काम व घाईने ( मनात घाई-गडबड, आवरा पटापट.... डोक्यात असंख्य विचार ) केलेले काम यात फारसा वेळेचा फरक पडत नाही. उलट पक्षी अनेकदा घाईघाईने केलेले काम एकतर अर्धवट केले जाते किंवा त्यातून पुन्हा दुप्पट काम निर्माण होते. किंवा गडबडीने आपण काहीतरी वेगळेच करतो आणि पुनश्च हरी ओम करायची वेळ येते.

अगदी साधी उदाहरणे, समजा ऑफिसमधून दमून घरी आलोय. नेमके मागोमाग नोंदवलेले किराणासामान येऊन पडलेय. आता रात्रीची जेवणे, मधून मधून मुलांचे गृहपाठ, नवऱ्याचे आणिकच काहीतरी, त्यात आवडती एखादी मालिका- आता या मालिकांमध्ये असते काय रोज वेगळे हा प्रश्न असला तरी संपूर्ण दिवसातून किंचितसा टीवी पाहावा असे वाटणारच ना? मध्येच एखादा वेळखाऊ फोन असतोच ........ या हाणामारीत शेवटची काडी असते हे किराणासामान. बरे त्याची निरवानिरव झोपण्याआधी करणे भागच आहे. नाहीतर सकाळपर्यंत साखर, डाळी, रवा जिकडे तिकडे तुरुतुरु पळताना दिसतील.

घरातले सगळे कधीचेच झोपायला पळालेले त्यामुळे चडफडत आवरायला घेतले जाते. साखरेचा डबा काढून साखर भरताना थोडीशी तरी सांडतेच. मग डाळींचा नंबर, रवा, पोहे करत करत एकदाचे सुस्थळी पडले की सांडलेल्या कणांकडे काणाडोळा करत आपण झोपायला जातो. सकाळी मस्त मुंग्यांचा सुकाळ आणि सारखे पायाला लागत राहते. पण रात्रीच फक्त एक मिनिट खर्च करून वर्तमानपत्राचे एक पान पसरून त्यावर सगळे डबे ठेवून हे भरले असते तर किती सोपे झाले असते? निदान झाडून घेतले असते तर.... आता सकाळी या मुंग्यांना आवरता आवरता नाकात दम आला ना? भाजी चिरली हातासरशीच डेखे, साली उचलून टाकल्या, चहा केल्या केल्या चोथा पाणी टाकून साखरेचा अंश घालवून टाकला, कपबश्या विसळून निथळत ठेवल्या. जेवायला ताटे घेण्याआधीच ओटा आवरून घेतला तर स्वत:चेच बरेचसे काम होऊन जाते.

हातासरशी काम करून टाकावे व एका कामातून दुसरे काम निर्माण होता नयेच ही सवय मनाला प्रयत्नपूर्वक लावली की अंगवळणी पडते. सुरवातीला थोडा त्रास होतो खरा. पण एकदा का सवय लागली की आपण नकळत वस्तू जागच्या जागी ठेवू लागतो. त्यामुळे आपला किती वेळ तर वाचतोच त्याहिपेक्षा चिडचिड, मनस्ताप टळतो. नेलकटरचे काम झाले की पडले तिथेच असे केले की दुसऱ्याला लागले की तो शोधतोय घरभर... मग आरडाओरडा..... अरे कोणी रे घेतले होते? एक वस्तू जागच्याजागी मिळेल तर शपथ. काय घर आहे का कबाडखाना? पाहिलेत..... किती शब्द आले पाठोपाठ.

आमचे बाबा नेहमी म्हणतात, " अरे तुम्ही आंधळे आहात असे समजा. एकदा वस्तूची जागा ठरवून घेऊन नंतर त्याच जागी ती नेमाने ठेवत चला. मग कशी हरवते तेच पाहू आपण. पण नाही. तुम्ही फेकणार कुठेही आणि मग चिडचिडही तुम्हीच करणार. " खरेच आहे की. आळशाला दुप्पट व कृपणाला तिप्पट सारखीच गत आपली. बरेचवेळा नखे कापायला घेतली की हमखास ती इकडेतिकडे उडतात. आपणही फक्त समोर दिसणारी उचलतो. पण जर अंघोळ झाल्यावर नखे कापली तर ती मऊ पडलेली असतात मग अशी उडत नाहीत.

बाहेरून आलो की चप्पल-बूट दाराशी, कसेही उलटेपालटे पडलेत. किती वाईट दिसते अन जागाही जास्ती व्यापते. अंघोळ झाली की ओल्या टॉवेलचे बोळे पडलेत.....
वह्यापुस्तके, वर्तमानपत्राची पाने बेवारश्यासारखी विखुरलेली. किल्ल्या हरवणे हा तर रोजचा घोळ असतो अनेक घरांमध्ये. नेहमीची भरायची बिले- टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी ..., पासबुके, अगदी पासपोर्टही शोधणारी मंडळी पाहिलीत. महत्त्वाची कागदपत्रे अगदी जपून ठेवावी म्हणून ठेवायची पण कुठे ठेवली तेच नेमक्या वेळी आठवत नाही. मग संपूर्ण घर खाली येते. शेवटी जीव खाऊन एकदाचे सापडते आणि ते घेऊन तो माणूस जातो निघून. घरात उरलेले मात्र पसारा आवरत बसतात. अश्या आवरा आवरीत बरेचदा अनेक हरवलेल्या वस्तू व काही आठवणीही सापडून जातात, जाता जाता निदान तेवढे तरी सुख. अर्थात त्या युरेका युरेका झालेल्या गोष्टी पुन्हा हरवायला वेळ लागतच नसतो.

विजेच्या लपंडावाला आजकाल आपण सरवलोत. आता इनव्हर्टरही आलेत. पण जेव्हां सटीसामाशी दिवे जात होते ( हे सुख माझ्या सुंदरश्या बालपणाबरोबरच संपलेय ) तेव्हां अंधारात जिकडेतिकडे ठेचकाळत मेणबत्ती व काड्यापेटी शोधण्याची धमाल सर्कस चालत असे. हल्ली बरेचजण मेणबत्ती फ्रीजमध्येच ठेवतात त्यामुळे सापडतात पटकन. तशात पोरगंही आपल्यावरच गेलेले. उजाडत शाळा असल्याने मग त्या अंधारात ते दप्तर भरू लागते. पण वह्यापुस्तके, कंपास-रंगपेटी मन मानेल तसे उंडारून दमून कुठल्या कुठल्या कोपऱ्यात माना टाकून पडलेले. ते कुठले सापडायला बसलेत. की मग आईचे करवादणे बाबावर, " कारटा अगदी तुमच्या वळणावर गेलाय. रोजची हाणामारी आहे ही. अहो उठा आणि शोधा जरा त्याची पुस्तके." हे ऐकले की बाबा वैतागून उठणार आणि त्याच्या हाताला प्रथम लागणार तो कार्ट्याचा कान. मग तो पिळून कार्टे बोंबलू लागले की त्याला घेऊनच शोधाशोधीला लागणार.

शनिवार रवीवारी मान मोडून लेकाचे शाळेचे प्रोजेक्ट करायचे. लेक एकदम खूश. आईलाही समाधान काहीतरी मनापासून केले. नीट जपून ठेव रे, मंगळवारी न्यायचे आहे ना शाळेत. मंगळवार उजाडतो. अर्धवट झोपेतच लेक निघतो , " अरे निघालास कुठे?तुझे प्रोजेक्ट नाही घेतलेस ते. बरं थांब मीच आणते. कुठे ठेवलेस रे?" लेकाला काही आठवत नसते. " अग माझ्या खणात असेल, नाही काल चिनू आला होता त्याला दाखवून मी कुठे बरं ठेवले.... अंअंआँ..... " करत शेवटी लेक गळा काढतो. माझे प्रोजेक्ट हरवले आता बाई मला ओरडणार. शेवटी संपूर्ण बिल्डिंगला कळते इतका आरडाओरडा होतो. एकदाचे सापडते ते दिवाणाच्या खाली सारलेले. मग लेकाला एक फटका देत त्याच्या हाती सोपवले जाते. हीच तयारी आदल्या रात्री केली असती तर..... दिवसभर सकाळी सकाळी लेकाला मारल्याची बोच तरी लागली नसती जीवाला.

या एपिसोडची दर दोन दिवसांनी पुनरावृत्ती ठरलेली तरीही कार्टे काही सुधारत नाहीच. त्याची तरी काय चूक हो. काही दिवस त्याच्या मागे लागून कामे वेळच्यावेळी व नीटपणे करावीत, मग कसे फायदे होतात हे शिकवण्याएवढी व करवून घेण्याएवढी फुरसत व सहनशक्ती आपल्यात उरतच नाही ना.

सकाळी उशीर होणे ठरलेलेच असते, त्यात उगाच कोणाचा तरी डोके खाणारा फोन येतो. मग कसेबसे आवरून खाली उतरून स्कूटरला लाथ मारावी तर ती थंडच. मग वाकडी करा, पुन्हा पुन्हा लाथाडा पण ती तिचा बथ्थडपणा सोडत नाही. अरे करेलच काय तिचा खाऊ तुम्ही दिलाच नाही ना. जाईल पेट्रोलपंपापर्यंत असे म्हणून तिला तशीच रात्री तुम्ही दामटलेली असते. आता ऐनवेळी ती तुमचा घात करते. पुन्हा सकाळी पंपावर रांग लावायची म्हणजे....... आमच्या बिल्डिंगमध्ये हा पेट्रोलचा खडखडाट नित्य नेमाने घडत असतो. कोणी तरी जर रोजचे पाच लीटर पेट्रोल आणून ठेवले ना तर मस्त धंदा होईल त्याचा सकाळी सकाळी. हा पण तो ते आणिलंच हे गृहीत धरून अनेकजण अजूनच सोकावतील. वर जर एक दिवस त्याने हा हक्काचा घास पाजला नाही ना तर त्यालाच धोपटून काढतील........ हाहाहा....

पोरीबाळींचे-बायकांचे डूल, पिना, रुमाल...सारखे काहीतरी हरवतच असते. अनेकदा ड्रेस असतो तर ओढणी गायब. आजकाल ऎक्सेसरीजही किती लागतात. त्याने अजूनच घोळ वाढतोय. बसल्याजागी घड्याळ, बांगड्या काढले जाते. नेमके कोणीतरी हाक मारते की उठून पळाली, ते राहिले तिथेच. सेलफोन हरवणे हा तर रोजचा घोळ झालाय. सेल आहे तर चार्जर गायब, कधी दोन्ही गायब. चष्मा हरवणे हा काळाचे बंधन नसलेला अव्याहत चालणारा आवडता खेळ आहे. विसरभोळे कपाळावर चढवून शोधतात ही गंमत खरीच पण अक्षरशः: जिथे जाऊ तिथे चष्मा विसरून येणारे लोक अगदी आपल्याच घरात असतात. आजकाल तर जागोजागी चष्मे पेरून ठेवले जातात. मग बरेचदा घरात एकदम तिनचार चष्मे दिसू लागतात. हौसेने कॅमेरे घेतले जातात. थोडे दिवस तोच नाद लागतो. मग हळूहळू ते मागे पडते. एखादे दिवशी अचानक टूम निघते, चला ट्रीपला जाऊयात. " अहो, तुमचा तो प्रेमाने घेतलेला एवढा भारी कॅमेरा घ्या बरं का." हो हो म्हणत पाहायला जावे तर बॅटरी फूस्स... मग काय दिवसभर उद्धार ऐकून घ्यावा लागतो. शिवाय जीवाला फार चुटपूट लागते ती वेगळीच.

काही जण अगदी काटेकोरपणे कुठे काय ठेवलेय, माळ्यावर काय, बेडमध्ये काय, अगदी फडताळापासून लिहून काढतील. पण ज्या डायरीत लिहितील तीच ऐनवेळी गायब. मग तिची शोधाशोध सुरू. मधल्या काळात आपण नेमके काय हवेय म्हणून डायरी शोधतोय तेच विस्मरणात जाते की मग त्याची शोधाशोध. ...... आयुष्यातील अर्धा वेळ असा शोधाशोधीत चाललाय. गंमत म्हणजे आजकाल तर कॉम्प्युटरवरही शोधाशोध चालू असते. गुगलबाबावरची नाही काही.... आपणच सेव्ह केलेल्या फोटो, डॉक्युमेंटस, उतरवलेले बरेच काही.... कुठल्या फोल्डरमध्ये ठेवलेय अन तो फोल्डर कुठे दडलाय..... ढुंढो ढुंढो रे साजना आपले चालूच.

थोडक्यात काय जरासे शांतपणे व वेळच्यावेळी कामे करण्याची सवय अंगी बाणवली तर खूप सारा वेळ मिळेल. डोक्यात सारखा कसलातरी भुंगा घोंगावत राहणार नाही. ऐनवेळी होणारी धावपळ, आपल्याबरोबर घरादाराला कामाला लावणे टळेल. बिपी वाढणार नाही. येणारी सून-जावई, " किती चांगले वळण लावलेय तुला आई-बाबाने " असे म्हणत शाबासकी देतील. ( वर धाकाने तेही कदाचित सुधरायचा प्रयत्न करतील. हे जरा अतीच झाले का?
) मग आवडीचे काही, अगदी टीवी पाहण्यापासून, वाचन असो, पोरांबरोबर खेळणे...... जे आनंद देईल ते करता येईल. झोपाळ्यावर बसून संगीतात तल्लीन होता येईल. अगदी काहीच नाही तर निवांत ताणून नक्की देता येईल.

Saturday, November 14, 2009

कुमरी.....

आज बालदिन. आईकडून अनेक बऱ्यावाईट घटना ऐकल्यात. आज का कोण जाणे सकाळपासून सारखी कुमरीच आठवत होती. वाटले तिलाच लिहावे. आमची आई सिंह राशीची.... अतिशय मानी, तडफदार आणि आमचे बाबा वृश्विक. आता तुमच्या लक्षात आले असेलच. आमच्या घरात कायम फटाके फुटत असतातच. बाबांचे डंख मारणे अन वर मीठ चोळल्यासारखे हसणे आणि ते पाहून आई संतापली की म्हणणे , " अग मी नुसती गंमत करत होतो. ही उगाचच रागावते. जिथेतिथे हिचा सिंह आडवा येतो. " हे ऐकले की सिंह अजूनच गरजायला लागतो........ .

माझ्या आईच्या काही आठवणी.......

मी वर्षाची असतानाच वडील गेले. आई नेहमी म्हणायची हिला ओवाळून द्या फेकून म्हणजे होतील ते बरे. तिचे बिचारीचे बरोबरच होते. मी झाले आणि एकाएकी वडील आजारी पडले. पदरात आठ मुले व एक पोटात. मी जेमतेम वर्षाची होत होते. माझ्याच येण्याने वडिलांना असाध्य रोगाने ग्रासलेय हा आईचा त्यावेळचा त्रागा. अडतीस( १९३८ ) साली कॅन्सरवर मात करणारे-थोडेतरी जीवन वाढेल असेही औषध उपचार वडिलांना मिळाले नाहीत. अन ते वर्षभरात गेलेच.

आई आणि आम्ही सगळे अक्षरशः उघड्यावर पडलो. मरत नव्हतो म्हणून जगत होतो अशी परिस्थिती ओढवली. वडील असताना सुखाच्या राशींवर विराजमान आमची आई घरच्यांनीच होते नव्हते ते लबाडीने लुटल्याने पदरात आठ मुलांना घेऊन देशोधडीला लागली. मला तर काहीच कळत नव्हते. होता होता आम्ही सारे नाशिकला आलो. एका मोठ्या वकिलांच्या वाड्यातल्या दोन खणी जागेत आईने पोरांना घेऊन संसार मांडला. डोक्यात एकच, पोरांना जगवायचे. खूप काही कळत नसले तरी आपण भिकारी नाही. एकवेळ उपाशी राहून दिवस काढू पण कधीही कोणापुढे हात पसरायचा नाही हे त्या वयातही माझ्या मनाने पक्के गिरवलेले.

हे वकिलकाका त्यांच्याच असलेल्या शेजारच्या वाड्यात राहायचे. काकू फारच चांगल्या होत्या. त्यांचा माझ्यावर फार जीव होता. आईला नेहमी म्हणायच्या, " हे तुमचे शेंडेंफळ भारी लाघवी आहे हो. " मी त्यांच्याकडे सारखी जात असे. एखादा दिवस गेले नाही तर त्या हाका मारून मारून बोलावत. आईला विचारीत राहत, " अहो राधाक्का आमची पोर कुठे दिसत नाही ती. करमत नाही हो तिला पाहिल्याशिवाय. हे सुद्धा जेवायला आले तेव्हा विचारीत होते-का गं आज सिंधू दिसत नाही ती. द्या बरं पाठवून. " असे असले तरी जेवणाची वेळ झाली, नुसती कपबशी जरी वाजल्याचा आवाज ऐकला की मी लागलीच तिथून घरी निघून येई. वय वर्षे फक्त पाच. पण माझ्या मनात नेहमी आईचा मान असे. उद्या यांनी आईला हिणवून ऐकवता नये, " राधाक्का तुमची लेक आमच्याकडे खाते पिते. " वकिलीण काकू बरेचदा म्हणत, " अग, जेव ना आमच्याबरोबर. " पण मी ताठ मानेने सांगे, " काकू अहो आई वाट पाहत असेल ना? गरम गरम भाकऱ्या अन वांग्याची भाजी करून, मी जाते हं का. नाहीतर आईला वाईट वाटेल. " प्रत्यक्षात घरी अनेकदा अन्नच नसे.

असेच दिवस जात होते. आईच्या जीवाची घालमेल, दिवस दिवस कसली कसली कामे आणून आमच्या तोंडी घास कसा घालता येईल याची विवंचना तिचे जीवन संपवत होती. एक दिवस मी काकूंच्या घरी बसले होते. तेवढ्यात एक माझ्याच एवढी मुलगी आली. तिला पाहून काकूंनी त्यांच्या मुलीस हाक मारून म्हटले की, " अग आली बरं का कुमारिका. चला आता वाढायला घ्या. " हे एकले आणि मी खाली पळून आले. घरी आल्या आल्या आईला विचारले, " आई अग आत्ता ना काकूंनकडे एक मुलगी आली. अगदी माझ्याचएवढी आहे. त्या म्हणाल्या अग कुमरी आली बरं का.... " आईला काही कळेना ' कुमरी ' म्हणजे काय? मग ती जेवायला आली आहे हे ऐकल्यावर म्हणाली, " हात वेडे, कुमरी नाही काही. कुमारिका म्हण. अग आज मंगळवार आहे ना, त्यांच्याकडे दर मंगळवारी कुमारिका येते हो जेवायला. " हे ऐकले आणि मन अतिशय दुखले, जीवाला लागले माझ्या. पण मी काहीच बोलले नाही.

दोन दिवस गेले. काकूंनी गुरवारी संध्याकाळी हाक मारून आईला विचारले, " राधाकाकू, अहो सिंधूला बरे नाही का? दोन दिवसात पोर फिरकलीच नाही. " आईलाही जाणवले होते की मी काकूंकडे गेले नाहीये. " विचारते हो पोरीला. असेल तिच्या नादात, पाठवतेच. " असे म्हणून आईने मला हाक मारली. " शिंदा ( आई लाडाने मला शिंदाच म्हणत असे), का गं बाय गेली नाहीस काकूंकडे? " " आई, मी आता कधीही काकूंकडे जाणार नाही. तू मला सांगितलेस तरीही जाणार नाही. " " अग पण काय झाले एवढे? कोणी ओरडले का तुला?" मी चिमुरडी असले तरी भयंकर अभिमानी होते हे आईला माहीत होते. " आई मीपण कुमरीच आहे ना गं? मी काकूंकडे रोज जाते. चुकूनही कधीही त्यांच्याकडे जेवाखायला थांबत नाही. मग कुमरी म्हणून त्यांनी मला का नाही बोलावले? आता मी कधीच जाणार नाही त्यांच्याकडे. " हे ऐकले आणि आईने आधी मला हृदयाशी कवटाळले. मग माझी समजूत काढत म्हटले, " अगं ते कोकणस्थ, आपण देशस्थ ना. मग त्यांना कोकणस्थ कुमारिकाच हवी असेल म्हणून नसेल हो तुला बोलाविले. तू रागावून बसू नकोस त्यांच्यावर. "

पुन्हा थोड्यावेळाने काकूंनी आईला हाक मारून विचारले माझ्याबद्दल. आई म्हणाली, " अहो ती ना रूसलीये. तुम्ही तिला सोडून दुसरीच कुमारिका बोलावली ना त्याने ती रागावली आहे तुमच्यावर." " अग बाई, असे झाले का? बरं बरं मी काढेन हो तिचा राग." असे काकू म्हणाल्या. सकाळ झाली. शुक्रवार होता. सकाळीच काकू घरी आल्या. " राधाकाकू, अहो आज आमच्याकडे शुक्रवारची कुमारिका म्हणून सिंधूला पाठवा हो जेवायला. " असे आमंत्रण देऊन माझे गाल कुरवाळून गेल्या. आई म्हणाली, " काय शिंदाबाई, आता जाणार का? " मी ताडकन सांगून टाकले, " आई, त्यांची कुमरी मंगळवारीच झाली आहे. आज त्या उगाचच मला बोलवत आहेत. मी मुळीच जाणार नाही. " आणि मी गेलेच नाही. त्यानंतर मी त्यांच्या घरी कधीच गेले नाही.

आज मागे वळून पाहते तेव्हा वाटते की त्यांनी काही मुद्दामहून असे केले नसेल. तो काळ वेगळा होता. अगदी कोकणस्थ व देशस्थांतही फरक होत असे. पण मी पडले सिंह राशीची, मला अपमान कसा सोसावा? म्हटले तर घटना अतिशय छोटीच आहे. परंतु लहानमुलांनाही फरक कळतोच व जिव्हारीही लागतो.

Thursday, November 12, 2009

पुरेसे बोलके......

या जवानात मला आपण सारे सामावलेले दिसतो

आणि म्हणे ह्यांचे चरण दिसले तर धन्यभाग माझे म्हटले जाते....... वर्षभर उपाशी ठेवा या गोळ्याला
किती उद्दाम असावे माणसाने.......

यावर मी विश्वास ठेवू इच्छित नाही............ हे खोटे असू देत-पण दुर्दैवाने खरे आहे
तुम्ही सुद्धा? का?

आमच्याच देशात राहतात, खातात व आमच्याच छाताडावर नाचतात.......
आणि सगळे मतांचे भिकारी यांचेच लांगूलचालन करतात............

आशा आहे असे पुन्हा चुकूनही घडणार नाही


एका स्वतंत्र काश्मीर हवे असे म्हणणाऱ्याने आपल्या माननीय राष्ट्रपतींचे हे चित्र अतिशय अतिरंजित करून मांडले गेलेले पाहिले. लिहिले होते, " हे काश्मिरी माणसा भारताकडून-भारतीयांकडून तुला हेच मिळणार आहे." पद्धतशीर भावना भडकवणे याला म्हणतात. माननीय राष्ट्रपतींना स्वप्नातही वाटले नसेल त्यांच्या या फोटोचा वापर असा होऊ शकेल. ही जी रायफल( AK-47 ) त्यांच्या हातात दिसते आहे ती एका मिलिटंट( Assault Rifle, allegedly recovered from Militants ) कडूनच काढून घेतलेली आहे. हे मात्र लिहिणारा विसरलेला दिसतोय.