बायकोची अदलाबदली-वाइफ स्वॅप. काय क्षणभर दचकलात ना? मीही अशीच अगदी पहिल्यांदा हे पाहिले तेव्हा दचकलेच होते. चक्क दुर्लक्ष करून पुढे गेले तेही मनातल्या मनात बडबडत. आजकाल लोकांना काहीही करायचे वेड लागले आहे. काहीतरी हटके, साहसी, मूर्खासारखे आणिक बरीच बडबड करून मी तिथून चालती झाले. पण कसे असते ना, की एखादी गोष्ट करू नको असे सांगितले की लहान मूल तीच करू पाहते. अगदी तसेच मोठ्यांचेही होतेच. यात खरे तर वयाचा काहीच संबंध नसतो. शिवाय मोठ्यांना ओरडणारे तसे फारसे कोणी नसते, या फायद्याचा लाभ मी तर बाबा अनेकदा उठवत असते. आणि माझी खात्री आहे तुम्हीही उठवत असणारच. पाहिलेत, मूळ विषय भरकटला.
तर एखाद्या हट्टी मुलासारखे माझे लक्ष पुन्हा पुन्हा या बायकांच्या अदलाबदलीकडेच वळत होते. ही गोष्ट आहे २००५ मधली. झाले काय एकदा असेच टीव्हीवर ह्या चॅनलवरून त्या चॅनलवर उड्या मारत असताना एबीसीवर वाइफ-स्वॅप हा कार्यक्रम सुरू होता. प्रोग्रॅम गाइडमध्ये नाव दिसताच दोन-चार वेळा माझी पुढे गेलेली गाडी एक दिवस चांगली सरसावून हा प्रकार नक्की आहे तरी काय हे पाहण्यासाठी स्थिरावली. आणि चक्क या पाठीमागच्या संकल्पनेच्या प्रेमातच पडली. मी पाहत होते तो भाग नंबर १५ होता. म्हणजे आधी १४ भाग झाले होते. पाहताना संपूर्ण वेळ मी अगदी एका जागी चिटकून होते. नंतर मी आधीचे चौदा भाग व आजवर झालेले पाचही सीझन संपूर्ण पाहिले. बऱ्याच जणांना हा कार्यक्रम माहीत असेलच तरीही थोडी रूपरेषा देते.
मुळात ही मालिका २००३ मध्ये युकेत सुरू झाली. आणि प्रचंड प्रसिद्धी पावली. अनेक अवॉर्डस मिळालीच पण अतिशय मानाचे असे BAFTA-(ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स )अवार्ड सगळ्यात चांगला रिऍलीटी शो म्हणून मिळाले. तसेच गोल्डन रोझ हे इंटरनॅशनल रोझ डी-ऑर फेस्टीवलचे अवार्ड शिवाय युरोपमधील टेलिव्हिजन वरील टॉप मनोरंजन कार्यक्रमाचे अवार्डही मिळाले. यावरून लक्षात येईलच की ही संकल्पना किती मनांवर परिणाम करते आहे ते.
वाइफ स्वॅप ही मालिका २६ सप्टें,२००४ रोजी इथे सुरू झाली. याची संकल्पना अशी आहे की, अमेरिकेतील दोन टोकाच्या म्हणजे भौगोलिक दृष्ट्या व जीवन पद्धती या दोन्ही प्रकारे अगदी विरुद्ध ठिकाणी वास्तव्य असलेल्या व जीवन जगणाऱ्या दोन कुटुंबाची निवड करून त्या दोन्ही घरातील बायकांची अदलाबदली करायची. आता या दोन्ही बायकांनी तसेच त्यांच्या घरातल्यांनी नेमके काय करायचे याची चौकट-रूपरेषा ठरवलेली आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे बायकांची अदलाबदली झाल्यावर त्या एकमेकींचे नवरे, मुले व त्यांचे जीवन अनुभवणार. मात्र खाजगी संबंध-बेडरूम्स मात्र शेअर करणार नाहीत. नवीन घरी गेल्यावर त्या बाईच्या भूमिकेत शिरून जगायला कसे वाटते हे अनुभवतील. यातून अनेक गमतीजमती, भांडणे तर कधी कधी अती टोकाच्या घटना म्हणजे नवीन बायकोने घरच सोडून जाणे अशी नाटकेही घडतात. परंतु नंतर याबदलामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवनावर होणारे व टिकून राहणारे चांगले परिणाम होतात. कधी कधी तर कायमचेच बदल घडतात.
दोन्ही बायका एकमेकींच्या घरात दोन आठवडे राहतील. स्वतःचे घर सोडण्याआधी येणाऱ्या बायकोसाठी गाईड म्हणून एक अहवाल-पुस्तिका लिहून ठेवतील. जेणेकरून तिला हे घर, त्यातील बायको-तिचे वागणे व तिचे कुटुंबीय यांची सविस्तर माहिती मिळेल. दोन्ही बायका पहिल्या आठवड्यात नवीन घरातील स्त्रीच्या भूमिकेतच वावरणार असून, अगदी तिच्या सारखेच कपडे, राहणे, विचार तसेच तिच्या कुटुंबीयाशी असलेले तिचे संबंध, वागणूक अगदी जशीच्या तशीच तिने जगायची आहे. अगदी घरातले खर्च, सामाजिक जीवनातील तिची मिसळणूक इथपर्यंत. म्हणजेच त्याघराची जीवन जगण्याची पद्धत, त्यांचे नियम हे सगळे तिचेच आहेत असे समजून तिने वागायचे. आता हेच किती कठीण आहे पाहा. आणि दुसऱ्या आठवड्यात तिने तिचे नियम, गेल्या आठवड्यात तिला खटकलेल्या, लागलेल्या, चुकीच्या वाटलेल्या गोष्टी बदलून टाकायच्या. म्हणजे ती व तिचे कुटुंब ज्या पद्धतीने जीवन जगते आहे व ते कसे बरोबर आहे/ त्यात किती आनंद आहे / असेच जगायला हवे इत्यादी त्या नवीन कुटुंबाला करायला लावायचे. आणि त्यांनी ते करायचे.
यात सगळ्यात महत्त्वाचा नियम हा कार्यक्रम राबवणाऱ्यांनी केला आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा कोणीही आखलेल्या नियमांविरुद्ध जाणार नाही. मग कितीही त्रास झाला तरीही तो सहन करून शक्य तितके काटेकोर नियम राबवायचे. आता जेव्हा कोणीतरी उपटसुंभ, आजवर कधीही न पाहिले ली बाई घरात घुसते आणि इतक्या वर्षांचे आपले घर-नियम, मुले आणि स्वतःला ( नवऱ्याला ) बदलायला सांगते. तू कसा चुकतो आहेस ते सांगतेच वर मुलांसमोर सांगते हे पचवणे फार कठीण आहे. मग कशी नाटके, ओरडाआरडे, रडारड व कधी कधी अर्व्याच्य शिव्या वगैरे प्रकार होतात. मानापमानाची नाटकेही जोरदार रंगतात.
पण हे जरी घडले तरीही अनेकदा नव्हे ९०% वेळा दुसऱ्याने दाखवल्याने स्वतः व आपली बायकोही करत असलेल्या चुका, अतिरेकी शिस्त, मी म्हणेन तिच पूर्व, हेकेखोरपणा, आपल्या जोडीदाराबद्दलची अनास्था, गृहीत धरण्याची सवय, हिटलरशाही हे प्रकार ठळकपणे दिसतात, जाणवतात व मनाला फार बोचतात. तसेच या अतिरेकांचा तिच्या/ मुलांच्या/त्याच्या मनाला किती त्रास होतो ते कळून येते. आणि बरेचदा यात सुधारणा घडून येतात. घरात नवरा किंवा बायको क्वचित दोघेही हिटलर असतील तर प्रामुख्याने भरडली जातात ती मुलेच. अशा कुटुंबातील मुलांना आपल्या आई-बाबाबद्दल काय वाटते, जीवनात काय करावेसे वाटते इत्यादी मुद्देही समोर येऊन अतिशय चांगल्या गोष्टी, परिवर्तनेही घडतात. हीच या कार्यक्रमाची यशाची पावती आहे.
दोन आठवडे संपले की दोन्ही बायका आपापल्या कुटुंबात परत जातील परंतु जाण्यापूर्वी त्या दोघी व त्यांचे नवरे एकमेकांना एकत्र भेटतील व या पंधरा दिवसात परस्परांच्या घरातील माणसांच्या वृत्तीचा तसेच त्यात्या घरातील बाईचाही आढावा/ अनुभव/आणी अनेक चमत्कारिक गोष्टी समोरासमोर बसून सांगतील. थोडक्यात आरोप-प्रत्यारोप, तर कधी मुद्दे पटल्याने मनापासून आभार आणि झालेल्या टोकाच्या भांडाभांडीतून बोललेले घाणेरडे शब्द, नवीन बायकोला-पर्यायाने आपल्या स्वतःच्या बायकोला( यात उलटही होत असतेच शिवाय मुलेही आहेतच-जी एकतर भरडली जातात किंवा शेफारली जातात ) समजूनच ने घेण्याचा हेकेखोरपणा यासाठीची मागितलेली माफी. हे सगळे जरी असले तरी मी प्रत्येक भागात एक गोष्ट अतिशय महत्त्वाची व साधर्म्याची पाहिली आणि ती म्हणजे प्रत्येक बायको-नवरा व मुले आपल्या स्वतःच्या घराची-माणसांशी अत्यंत घट्ट बांधलेली असतात. पंधरा दिवसांनी ज्या ओढीने ते भेटतात ते पाहिले की फार फार बरे वाटते. अगदी एकच घर आजवर झालेल्या पाच सीझन मधील प्रचंड भागात असे होते की जे या बदलाबदलीनंतर मोडले. कदाचित ते मुळातच त्या दिशेने चालत होते आणि ही शेवटची काडी पडली असावी.
कोणीही मनुष्य तसेच कुठलेही घर अचानकपणे समूळ बदलू शकतच नाही. परंतु आपल्याच माणसांच्या मनात काय चालले आहे हे बरेचदा कळून येत नाही किंवा ते समजून घेण्याची गरजच वाटत नाही. मुलांनी असे म्हणजे असेच वागले पाहिजे. मी म्हणेन त्याच मार्गाने चालले पाहिजे, घरातील अमुक अमुक कामे कुठल्याही स्थितीत - मग ताप आलेला असो किंवा परीक्षा असो केलीच पाहिजेत. तर कधी फक्त धमाल करणे अशा प्रवृत्तीची माणसे कधी आयुष्य गंभीरपणे घेतच नाहीत शिवाय आपल्या मुलांनाही तसेच शिकवतात. मग होणारे त्रास अपरिहार्य असतात म्हणून ते कसे टाळता येतील. एक ना दोन, अनेक मुद्दे- माणसाच्या मनाचे कंगोरे, भूमिका यातून समोर येतात.
मी कुठेही तुलना करत नाही हे प्रथमच स्पष्ट करते. हे पाहताना वारंवार माझ्या मनात विचार आला, हे जर आपल्याकडे केले तर काय परिणाम करू शकेल? मुळात आपली कुटुंबसंस्था बळकट आहे. त्यात इथे अगदी घरटी सापडणारे टोकाचे स्वभाव आपल्याकडे कमी दिसून येतात. परस्पर सामंजस्य, आदर, मुलांच्या प्रती असलेले प्रचंड प्रेम या आपल्या जमेच्या बाजू आहेत.( याचा अर्थ इथल्या लोकांमध्ये हे गुण नाहीत असा कोणी काढू नये.) राखी सावंतचे स्वयंवर दाखवण्यापेक्षा किंवा इतर रिऍलीटी शोजच्या भ्रष्ट नक्कल करून प्रेक्षकांचा अमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा हा प्रयोग करून पाहावा. जर होम मिनिस्टरचा दीर घराघरात जाऊन त्यांना आपलेसे करू शकतो, बोलायला लावू शकतो शिवाय कोपरखळ्याही मारू शकतो तर या प्रयोगालाही प्रतिसाद मिळू शकेल. आणि समजा खरेखुरे लोक भाग घ्यायला तयार नसतील-( यात चूक काहीच नाही कारण आपण अजून तितके मोकळे, पारदर्शी होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनाची घडण पटकन बदलणे शक्यच नाहीये. तेव्हा काहीतरी खुळचटपणा न करता- आजकाल रिऍलीटीच्या नावाखाली घराघरात घुसून न्यूज चॅनलवाले जे चाळे करतात - माणूस गेलाय आणि बायकोला विचारतात तुला काय वाटते याच्या मरण्याबद्दल- किती दुर्दैव. ) तर कलाकारांना घेऊन करावा. यशस्वीही होईल. आता कोणीतरी असेही म्हणेल या प्रबोधनाची काय गरज आहे तर मग पुढे काही न बोलावे हेच योग्य.
बदल हा स्वीकारणे-पचवणे हे तुमच्या मनावरच सर्वस्वी अवलंबून असते. मानले, समजून घेतले तर अतिशय सोपे आणि हटवाद सोडला नाही तर अशक्यच. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सहभाग होणारे व आपल्यासारखे असंख्य पाहणारे- अप्रत्यक्ष सहभागी या सगळ्यांवरच याचा निश्चित व चांगला परिणाम होतो हे नक्की.
मी हा कार्यक्रम पाहिला नाही पण हा लेख वाचुन बरच कळतय. भारतात केलं तर कसं होईल याचा खरंच विचार केला तर काय काय शक्य आहे माहित नाही पण कदाचित अर्वाच्यपणा थोडा कमी असेल असं उगाच वाटतं.
ReplyDeleteअपर्णा, धन्यवाद. तू म्हणतेस तसेच मलाही वाटते की अतिरेकी अर्वाच्यपणा नक्की कमी असेल. मात्र इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही बायकोची अदलाबदली करताना दोन्ही कुटुंबे समाजात एकाच पातळीवर-म्हणजे कर्माने, पैशाने व जडणघडणीने ची मुळीच नसतात. किंबहुना ती संपूर्ण भिन्न असतील याचीच खबरदारी घेतलेली असते. आणि हाही एक अतिशय महत्वाचा मुद्दा परस्परांशी सुसंवाद-वितंडवाद घालताना असतो हे प्रकर्षाने जाणवते.
ReplyDeletebhagyashree tai,
ReplyDeleteha program aata sony tv var 'maa exchange' naavane suru jhala aahe!
pushpa
पुष्पा, ब्लॊगवर स्वागत आहे. :)
ReplyDeleteओह! मला खूपदा वाटे की आपल्याकडेही हा रिऎलिटी शो सुरू होईल. फक्त तो कितपत पचनी पडेल... ?? इथेही ही संकल्पना फारशी स्वागतार्ह वाटत नाही. फारच कमी लोकं पझिटिव्हली घेतांना दिसतात. मुळात कोणीतरी संपूर्ण तिर्हाईत व्यक्ती आपल्याशी कुठलेही टाईज नसताना एकदम वेगळीच भुमिका घेत, चटकन बोट ठेवून अमुकतमुक चुकतेय हे सांगते, तेही त्या व्यक्तिच्या विचार करण्याच्या, जडणघडणीच्या आधारावर ( ती बरोबरच सांगत असेल असे नाही किंवा ते रुचेलच असेही नाही )ते ऐकून घेणेही अनेकांना झेपत नाही. तर त्यावर विचार व अमंल हे खूपच कठिण. परंतु या संकल्पनेमागचा हेतू चांगला आहे.
आवर्जून लिहीलेत खूप आनंद वाटला. आभार. पुन्हा भेटूच. :)
patnara vichar ahe ha, gharachi kimat ghara pasun lamb gelya shivay kalat nahi te hi aanubhavle ki aaple ahe te khup chan ahe ase nakki janvel. asa aflatun reality show vyayala kharech harkat nahi
ReplyDeleteOnly mine, ब्लॉगवर स्वागत व मन:पूर्वक आभार्स!
Deleteअगदी अगदी! :)