जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 22, 2010

सोलकढी

गेल्या महिन्याभरात रोहन, महेंद्र, अपर्णाने त्यांच्या भेटीच्या, गोमांतकी खादाडीच्या मला जळवणाऱ्या सुरस कथा पोस्टताना हटकून सोलकढीचे फोटो टाकले. त्यात भर मनमौजीनेही टाकली. सोलकढीवर माझे खास प्रेम आहे. पुण्याला बेडेकरांची मिसळ खायला गेले की सोलकढीची थंड बाटली पाठोपाठ हवीच. मी मासेखाऊ नसल्याने कुठे जेवायला गेलो असता हातासरशी सोलकढीची वाटी काही समोर येत नाही. तुकडी, चिकन बरोबर कशी सोलकढी आपसूक. मालवण, सिंधुदुर्ग सारख्या खास खास हाटेलात शाकाहारी थाळीतही येते म्हणून मी हटकून तिथे जातेच.

गेल्यावेळी देवरुखात एका एकदम साध्याश्या दिसणाऱ्या खानावळीत जेवायला गेलो असता इतर पदार्थ जरा डामाडौल असल्याने मी खट्टू झालेली. अचानक मालकाने आरोळी दिली, " काय रे दिन्या, पाहुण्यांना सोलकढीची वाटी विसरला काय? " ससा कसा कान टवकारतो तसे सोलकढी हा शब्द कानावर पडताच माझी नजर, कान, जीव सगळे दिन्याकडे धावले. तोही तसा चपळ होता. चटदिशी चार वाट्या घेऊन आला. " ए, अरे त्यांच्या पानाशी नको सगळ्या माझ्याजवळ ठेव आणि त्यांना घेऊन ये आणखी. " असे म्हणत मी हावरटासारख्या चारही वाट्या ओढून घेतल्या व जेवण बाजूला सारून मन लावून घोट घोट ते अमृत प्याले. अगदी ताज्या ताज्या खवलेल्या नारळाच्या दाटसर दुधाची, गडद आमसुलांमुळे आलेला गुलाबी रंग व आंबटाला अचूक तोललेली, अप्रतिम सोलकढी होती ती. नशीब लागते हो, कधी कधी अगदी रद्दड ठिकाणी अवचित असे घबाड लागते हाताला.

इथे येतांना मी चक्क विळीही घेऊन आलेय ती केवळ ताजा फोडलेला नारळ खवून सोलकढी करता यावी म्हणून. पण हाय रे दैवा! नारळ मेले कुजकेच निघतात. फ्रोजन खोबरे मिळते पण त्याची सोलकढी करण्यासाठी बरेच बाळंतपण करावे लागते. शिवाय त्यावर तवंग येणार नाहीच अशी खात्री देताच येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे टिनचे नारळाचे दूध वापरणे. दगडापेक्षा वीट बरी इतपतच असले तरी काहीच नसण्यापेक्षा टिनचे दूध धावते. थोडे तंत्र नीट हाताळले तर प्रिझर्वेटीवचा वास पुढे येत नाही. शिवाय करायला अतिशय सोपी व चटकन होणारी.वाढणी: माझ्यासारखी हावरी असेल तर एकालाच पुरेल... नाहितर तिघांना पुरावी.

साहित्य:

आठ-दहा अमसुले ( रंग येत नसेल तर दोन चार अजून घ्यावीत )
एका नारळाचे दूध( एक टिन:
दोन ओल्या मिरच्या चिरून
पाच-सहा लसूण पाकळ्या चिरून ( खूप मोठ्या असतील तर तीन पुरेत )
एक चमचा जिरे पूड/अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
चमचाभर साखर ( साखरेचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी/जास्त करावे. गूळही वापरता येईल )
दोन चमचे कोथिंबीर

कृती:
नारळ फोडून खवून घ्यावा. प्रथम एक भांडेच पाणी घालून खोबरे मिक्सरमधून काढावे व नंतर पिळून दूध काढावे. पुन्हा खोबऱ्यात भांडभर पाणी घालून फिरवावे व पिळून काढावे. एकंदरीत चारदा असे करून दूध काढून एका पातेल्यात घ्यावे. हे करतांनाच अर्ध भांड गरम पाणी घेऊन त्यात अमसुले भिजत घालावीत. दूध काढून झाल्यावर लसूण, मिरच्या व जिरे वाटून घ्यावेत व दुधाला लावावेत. त्याच मिक्सरच्या भांड्यात अमसुलेही भिजवलेल्या पाण्यातच वाटून घेऊन गाळणीने गाळून ते पाणी दुधात घालावे. स्वादानुसार मीठ व साखर घालावी. आता हे सगळे मिश्रण एकजीव करावे, कोथिंबीर भुरभुरावी व शक्यतो थंडच द्यावी. मसालेदार व जड जेवणामुळे हमखास पित्ताचा त्रास होतो त्यावर हमखास उपयोगी.

सोलकढी गरमही छान लागते. वरील सगळी कृती करून झाली की मध्यम आंचेवर ठेवून सारखे ढवळत राहावे. कढ आला की आंचेवरून उतरवावी. फुटू देऊ नये.

त्याचप्रमाणे गरम किंवा गार सोलकढीला फोडणीही देतात व तीही मस्तच लागते. फोडणी देतांना पळीत एक मोठा चमचा तूप घ्यावे, गरम झाले की जिरे टाकावेत. जिरे तडतडले की लगेच दुधात फोडणी घालावी.

टिपा:

साखरेचे प्रमाण किती आंबटपणा हवा आहे यावर ठरवावे. सोलकढी अती आंबटढोक करू नये. टिनच्या दुधाची सोलकढी करताना टिनमधले दूध पातेल्यात ओतून घेऊन आधी चांगले हालवावे. बरेचदा खोबऱ्याचा साका वर घट्ट होऊन बसलेला असतो व खाली पाणचट द्राव दिसतो. हालवून घेतल्यावर तो टिन हेच प्रमाण घेऊन दुप्पट पाणी घालावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच. शक्यतो टिनच्या दुधाची सोलकढी गरम करावी व तिला फोडणीही द्यावी म्हणजे इतर कुठलाही वास येणार नाही.

Thursday, June 17, 2010

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.

कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर. चार टाळकी एकत्र येऊन इतक्या मोठ्या माझ्या भारतमातेला जेरीस आणत आहेत आणि तिची लेकरे - आम्ही, किडामुंगीसारखे मरण्यापलीकडे काहीच करत नाही.

ज्या दिवशी हल्ला होतो तो सारा दिवस व नंतरचे मोजून चार-सहा दिवस मिडियावाले, घटनेचा चोथा चोथा करून चघळत राहतात. मेलेल्या माणसांच्या नातेवाईकांना, आईला, मुलाला, " कसे वाटतेय तुला? आत्ता तुझ्या मनात नेमके काय चालले आहे? " सारखे भावना-सहानुभूती तर दूरच पण साधे प्रसंगाचे तारतम्यही न ठेवणारे प्रश्न विचारून झालेल्या जखमा आणिकच ओरबाडतात. मरणारे असहायपणे मरून जातात. उरणारे, आज वाचलो रे असे म्हणत चर्चा-आकांत करतात. ( यात मी ही आलेच ) ती चार टाळकी, " कैसे हिंदुस्तानमे घुसके हिंदुस्तानके सिनेमेही खंजीर भोका " चा जल्लोष करतात, अन दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीला लागतात.

पण, यावर वर्षोनवर्षे मी काय करतेय? हे भ्याड वार थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही म्हणून, तडफडाट. हल्ले झाल्यावर सरकार ज्या पद्धतीने स्वत:चे समर्थन करते त्याचा, संताप संताप. एखादा-दुसरा अतिरेकी चुकून पकडला गेलाच तर, " आम्ही बाबा सहिष्णू....... शत्रू असला तरीही न्यायदेवता सगळ्यांना सारखीच असते ना? त्यांनी बेमुर्वतपणे - क्रूरपणे, आमच्या लहान लहान मुलांनाही मारले असेल हो पण आपण त्याला संधी नको का द्यायला? जे काय व्हायचं ते न्यायाने झालं पाहिजे...... " म्हणून त्याला अगदी फुलासारखे जपून कोर्टात महिनोंन महिने केस चालवून, जनतेचाच पैसा वापरून तिच्याच सहनशक्तीचा पुरा अंत पाहून झाला की एकदाची शिक्षा सुनावली जाते........ की, तिची अंमलबजावणी होण्याआधीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना पळवून न्यायचे आणि बदल्यात याला सोडा म्हणायचे. हिंदुस्तानामध्ये प्रत्येक जीवाची वेगवेगळी असलेली किंमत त्यांनी बरोबर हेरली आहे. गरीब हजारोंनी मेले तरी कोणाला काही फरक पडत नाही पण या गरीबांनीच अतिशय मूर्खपणे महान बनवलेला एखादा नेता किंवा त्याचा जावई / साला.... यांचा जीव फार मोलाचा असतो. हे पाहून आलेली, उद्विग्नता.

आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट. त्यांच्या दुर्दैवाने त्यांची नेमकी नको तिथे ड्युटी लागली. मग निदान स्वतःचा जीव वाचवण्याकरिता तरी दोन हात करणे भागच आहे नं? आता, एके फोर्टी सेव्हन समोर साले कुठलेही तमंचे घेऊन येतात. आमचे बच्चे खेळण्यासाठीसुद्धा हातात धरणार नाहीत ते. त्यात वरती मारे बुलेटप्रूफ जॅकेटं घालतात. ज्यांना आधीच स्वार्थाची मोठाली भगदाड पडलेली..... ना ना.... पाडलेली आहेत. कोणी? काय राव, काहीही विचारता? हेच की तुमचे मायबाप राज्यकर्ते. स्वार्थकारण कशात करावे आणि कशात करू नये याचे नियम कोणी शिकवलेलेच नाहीत नं. स्वत:च्या आईलाही विकायला मागे पुढे न पाहणारे, तुम्हाला सोडतील की काय? तर, ही तुमची नेतेमंडळी खोकेच्याखोके पचवून मस्त एसीत बसून ( इलेक्ट्रिसिटीचे बील.... आता त्याचे काय मध्येच? ते कोण भरणार? पागल झालात की दारू ढोसून आलात? कोणाची टाप लागून गेलीये हे विचारण्याची. ) तमाशा पाहत बसतात. मग एकदा का तमाशा पुरा पेटला की खुर्ची बचावण्यासाठी, " अरेरे! काय हे घडतेय. आमची गरीब बिचारी जनता, आमचे शूर जवान.... मेले, मारले गेले " म्हणून गळे काढतात. नंतर मेणबत्त्या, मूक श्रद्धांजल्या वगैरे वाहून झाल्या की डोळ्यावर कातडे ओढतात. त्यातूनही कोणी अतीच आदळाआपट केलीच तर, " वेगवेगळी चक्रेही प्रदान होतात नं? नुकसान भरपाईही दिली जाते नं? कधी व किती ते मात्र नाही विचारायचे...... मग अजून काय हवेय??? "

कुठलाही आतंकवादी हल्ला होण्याआधी ( म्हणजे आधीचे हल्ले होऊन काही काळ लोटल्यानंतर ) व पुन्हा नवीन हल्ला झाल्यानंतर आपल्या मायबाप सरकारची मुक्ताफळे ऐकून ऐकून तर कान किटलेत. जनतेला किती मूर्ख बनवायचे याला काही लिमिट राहिलेलेच नाही. हल्ला होण्याआधी म्हणायचे, " जनतेने संयमाने व धैर्याने वागावे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. पूर्ण बंदोबस्त असून घुसखोर लगेच पकडले जातील.
तरीही अतिरेकी कुठल्याही मार्गाने सहजपणे घुसतातच. आम्ही आमच्या भूमीच्या कणाकणाचे रक्षण करू. जमेल तितकी जमीन आम्ही भक्षणच करून टाकू. देशातल्या सगळ्या अतिरेक्यांवर व त्यांच्या हालचालींवर आमची कडक नजर आहे. म्हणजे ते कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे नं... मग पकडा की त्यांना. आमच्या पहाऱ्यामुळे, अतिसावधनतेने अतिरेकी कुठलाही नवीन हल्ला करू शकत नाहीयेत. कसाब आणि साथीदार पार ताजमहालात पोहोचले तरी आम्हाला भनक पण नाय बा पडली. जिथे जिथे हे हल्ले होण्याची शक्यता आहे तिथे तिथे क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कंत्राट, अमुक अमुक नेत्याच्या जावयाला दिले गेलेय. राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य व सूचना यांत उत्तम ताळमेळ आहे. हल्ला झाला की हा उत्तम ताळमेळ परस्पर विरोधी व्यक्तव्यांनी उघडा पडतो. तिथे चालणारी अतिरेकी शिबिरे बंद होत नाहीत तोवर आम्ही पाकिस्तानाशी बोलणी करणार नाही. पाकिस्तानाशी बोलणी होऊ शकतात, शेवटचा निर्णय केंद्राचा. प्रत्यक्षात होत काहीच नाही आणि ही बोलणी होऊन तरी निष्पन्न काय होणार आहे?

प्रत्यक्ष घटना घडताना/ घडून गेल्यानंतर, घटनेची जबाबदारी अमुकतमुक ने घेतली आहे.
कोणाचेही नाव टाका ना, सिद्ध थोडेच करायचे आहे. सगळे देशवासी एकजूटीने सामना करत आहेत. कुठला दुसरा पर्याय आहे का त्यांना? अतिरेक्यांना सोडणार नाही. दयामाया दाखवणार नाही. आधी पकडा तर आणि ज्यांना पकडलेय त्यांना सजाही द्या. केंद्राकडून हल्ला होणार अशी सूचना होती परंतु कधी व कोठे होणार ही नेमकी माहितीच दिली गेली नाही. पुढच्यावेळी क्रमवार पत्रिकाच हातात देऊ तोवर तुम्ही निवांत राहा. ही सगळी चूक राज्याची ( सरकारची) आहे. अतिरेकी खूप काळ हल्ल्याची तयारी करत होते. मग आमचे हेरखाते काय झोपले होते का? सगळीकडे क्लोज सर्किट कॅमेरे नाहीत व जिथे आहेत ते बरोबर काम देत नाहीत. काय सांगता? अजून कॅमेरे तिथे लटकलेले आहेत??? कमालच झाली. आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडू. कसे? सिंपल.... कोणीतरी खबर दिली, की ते इथे इथे आहेत की... काही लोकांना संशयावरून पकडलेही आहे. काहीतरीच काय. गरीब बिचारे. ते मुळी गुन्हेगार नाहीतच. पुढच्या निवडणुकीला हवीत ना त्यांची मतं..... सोडवा त्यांना ताबडतोब. यापुढे पुन्हा असा हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. ( वल्गना वल्गना.... )

बस इतकेच? मग, त्या अतिरेक्यांनी बळी घेतलेल्या निष्पाप जिवांचे काय? सामना करताना धारातीर्थी पडलेल्या पोलिसांचे काय? त्यांचा बदला कसा पुरा होणार? मी अहिंसावादी आहे, सहिष्णू आहे. तरीही मला हा '
बदला ' पुरा व्हायलाच हवा आहे. पण, तो कधीच होत नाही म्हणून होणारी, तळतळ. आधीच्या घावांवर अतिपातळसा त्वचेचा पापुद्रा ( शेवटी मन तरी कितिकाळ अरण्यरुदन करणार.... त्याचाही नाईलाजच आहे. ते बिचारे मरतमरत जगण्याचा प्रयत्न करते. ) धरायच्या आतच पुन्हा पुन्हा वार होत आहेत. त्यामुळे चिघळलेली जखम उरात घेऊन नाईलाजाने पोटाची खळगी भरण्याकरिता दुसऱ्याच दिवशी मी ट्रेन पकडते खरी पण तिच्यातून जिवंत सहीसलामत उतरेनची शाश्वती नाहीच. या जाणीवेतून आलेली, अगतिकता. या साऱ्यातून पिळवटलेली, खचलेली, क्वचित, षंढ त्वेषाने का होईना दातओठ खाणारी, कसाबला गेटवेसमोर उलटा टांगा अशी मागणी करणारीही मीच. उरात ही आग पेटलेली असली तरीही, प्रत्यक्षात त्याला एक फटकाही माझ्याच्याने मारवला जाणार नाही. पण, इतर मारत असतील ( निदान काहीजण तरी माझ्या इतके दुबळे नसतील ) ते नक्कीच पाहीन. इतके खोलवर घाव झालेत आता की " डोळ्याला डोळा " सारखीच शिक्षा त्यांना झालेली मला हवी आहे आणि माझे डोळे टक्क उघडे ठेवून ते बंद होऊ लागले तर बोटांनी जबरीने त्यांना ताणून, ती प्रत्यक्षात अमलात येताना पाहायचीही आहे. माझ्यासारख्या सामान्य - मध्यमवर्गीय - हतबल माणसाची ही नितांत गरज आहे.

हे दोन्ही सिनेमे, खोटा तर खोटा पण काही काळापुरता तो बदला पुरा करतात. बेंचखालच्या बॉंम्बने त्यांची उडणारी शकले-देहाचे चिथडे मला क्षणभर का होईना, समाधान देतात. हे घडवणाऱ्या त्या ' स्टुपिड कॉमन मॅनमध्ये ' मी स्वत:ला पाहते. वारंवार पाहू इच्छिते. ’ साधू आगाशे ’ खराच आस्तित्वात आहे यावर मला विश्वास ठेवावासा वाटतो. कदाचित काहींना हा दांभिकपणा वाटेलही..... मला नाही वाटत. किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

Tuesday, June 15, 2010

निर्व्याज स्पर्श...

मायदेशी निघाले होते. कधी एकदा आईला मिठी मारतेय असे झालेले तर एकीकडे दिडमहिना नवऱ्याच्य़ा खाण्यापिण्याची हेळसांड होणार, अगदी एकटे राहायला लागेलची चिंताही मला लागलेली. (नवऱ्याच्या शब्दात, " उगाचच नाही त्या चिंता करत राहायची तुला सवयच झालीये. येडपट आहेस अगदी. मज्जेत जायचे सोडून.... मी तर माझा पॅरोल मस्त यंजॉय करणार आहे..." ) तो मला एअरपोर्टला सोडून गेला. सगळे सोपस्कार पार पाडून मी लाउंजमध्ये बसले होते. आजूबाजूला बरीच वर्दळ होतीच. माझ्यासारखे एकटे जाणारे जरा तुरळकच होते. हळूहळू गर्दी वाढू लागली. माणसांचे अवलोकन करता करता नवरा व लेकाबरोबर फोन चालू होतेच. मला नीट ऐकू येईना म्हणून मी उठून आमच्या गेटवरतीच पण जरा दूरवर असलेल्या थोड्या निवांत कोपऱ्याकडे सरकले. पर्स व कॅरीऑन ठेवली आणि खुर्चीवर बसता बसताच चार सीट पलीकडे बसलेल्या मुलीकडे माझे लक्ष गेले.... खिळूनच राहिले.

फोन ठेवून तिला न्याहाळू लागले. बावीस-चोविसची असावी. जीन्स. पांढराशुभ्र चिकनचा जरासा अघळपघळ कुडता, पायात एक बंदांची पातळ - नाजूकशी चप्पल व उजव्या हातात चांगले दोन इंच रुंद कडे होते. केस कुरळे - थोडेसे विस्कटलेलेच. उंच असली तरी खूपच बारीक होती. अगदी पाठ-पोट चिकटल्यासारखे वाटावे अशी. नाकीडोळी रेखीव नसली तरी चटकन नजरेत भरण्यासारखी होती. आम्ही दोघी बसलो होतो तिथे जवळपास कोणीच नव्हते. त्यातून ती गेटकडे पाठ करून बसली होती. मान खाली झुकलेली व नजर जमिनीवर खिळवून एकटक पाहत बसली होती. मधूनच तिचा चेहरा अतीव वेदनेने पिळवटून जाई. काही वेळाने तिच्या प्रयत्नाला न जुमानता अश्रू गालावर ओघळू लागले. हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकवून, ओठांवर ओठ गच्च दाबून कढ जिरवायचा ती आटोकाट प्रयत्न करू पाहत होती खरी पण तिची दुबळी कुडी तिला साथ देईना. एखाद्या मोठ्या वावटळीत सापडल्यासारखी ती भिरभिरत होती.

इतके कसले जीवघेणे दु:ख तिला घेरून होते... मला फार अस्वस्थ वाटू लागले. असहायपणे तिची अवस्था मी पाहत होते. एक मन म्हणत होते, हो पुढे आणि तिचे हात हातात घे. तिला मायेच्या स्पर्शाची गरज आहे. काही बोलू नकोस का विचारू नकोस. फक्त तिला आधार दे. पण दुसरे मन थोडे कचरले. तिला आवडले नाही तर.... रागाने ती ताडकन काहीतरी बोलली म्हणजे..... त्यापेक्षा तिला मोकळे-हलके होऊन जाऊदे. निचरा झाला की बरे वाटेल. पण त्यासाठीही तिला मायेच्या-आपुलकीच्या स्पर्शाची गरज आहेच नं.... मी उठले आणि तिच्या समोरच जाऊन बसले. तोवर तिने पाय पोटाशी घेतले होते. दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट वेढून त्यावर हनुवटी टेकवून ती रडतच होती. पुन्हा पुन्हा हातांचा वेढा आवळत स्वत:ला आक्रसून घेत होती..... कोषात शिरत होती.

दोलायमान अवस्थेत मी हताशपणे तिच्याकडे पाहत असताना पलीकडे हालचाल होतेय असे वाटून लक्ष गेले. एक मुलगा बसला होता व तोही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरही हेच आंदोलन स्पष्ट दिसत होते. एकदोनदा त्याने मान झटकली. काय करू.... बोलू का तिच्याशी? अचानक तो उठून उभा राहिला.... दोन पावले तिच्या दिशेने टाकली पण पुन्हा थांबला. धपकन खुर्चीत बसून कपाळ चोळू लागला.

तोच कुठुनसे एक नुकतेच पाय फुटलेले छोटेसे बाळ दुडुदुडू धावत आमच्या दिशेने आले. एकदोनदा तोल जाऊन त्याचा धुबुक्काही झाला. पण न रडता उठून उभे राहत तोंडाने ऊं... ऊं.... आवाज करत धावून लाल लाल झालेले गोबरे गाल व अपरे नाक उडवत तो डायरेक्ट तिच्याजवळ गेला. पाय पोटाशी घेतल्याने तिची पावले त्याच्या चेहऱ्याशी समांतर आलेली. नखांना लावलेले लाल चुटुक नेल पॉलिश पाहून तो हरखला- तिथेच थांबला. इवल्याइवल्या बोटांनी तिचे पाय धरून नेलपॉलिश पकडण्याची धडपड सुरू झाली. तोच त्याच्या बाळमुठीवर दोन थेंब पडले. तशी ते थेंब बोटांनी फरफटवून त्याने वर पाहिले. हिचे गाल अश्रूंनी माखलेले. त्याला काय कळले असेल कोण जाणे पण.... तिचे रडणे त्या एवढ्याश्या जीवालाही पोचले. ओठ काढून मिनिटभर तो तिच्याकडे पाहत भोकाड पसरण्याच्या पावित्र्यात उभा राहिला. दुसऱ्याच मिनिटाला लगेच त्याने तोंडाने अगम्य आवाज काढत, हसत तिच्या गालांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू केली.


इतका वेळ हमसून हमसून रडणारी ती त्याची धडपड पाहून क्षणभर रडणेच विसरली. त्याचे तिचा कुडता ओढणे थांबेचना म्हणून तिने त्याला उचलून घेताच बाळाने तिच्या गालांवर हातांचे तळवे घासले व तिच्याकडे पाहून खुदकन हसत तिला मिठी मारून तिचे केस ओढू लागला. तितक्यात त्याची आई पळत आली व तिला सॉरी सॉरी म्हणत बाळाला खोटे खोटे रागे भरत घेऊन गेली. मला जरा वाईटच वाटले. अजून दोन-पाच मिनिटे नसती आली तर...... आम्ही दोघेही जे करू पाहत होतो तेच बाळाने किती सहजपणे केले होते. त्या क्षणी नितांत गरजेचा असलेला ' निर्व्याज स्पर्श ' देऊन जणू त्याने जादूची काडीच फिरवली होती. नंतर दोनतीनवेळा बाळ पळत पळत तिच्यापाशी आला, तिला हात लावून खिदळत पुन्हा आईकडे गेला. हा खेळ काही वेळ सुरू राहिला. ती गुंगली. हसली. वातावरण निवळले. तोंड धुऊन फ्रेश होऊन आली. कदाचित आमच्या दोघांच्या स्पर्शात ती ताकद नसावी किंवा तोकडी असावी..... म्हणूनच आम्ही थबकलो, उगाच नको ते विचार करत राहिलो. ते बाळ मात्र तिच्यात आपल्या स्पर्शाने चैतन्य फुंकून पसार झाले.

Thursday, June 10, 2010

खारे व मसाला शेंगदाणे

समुद्रकिनारी गेल्यावर ती चिरपरिचित सेंगचना ची हाक आली नाही असे कधी तरी होईल का? आमच्या चाळीत तर शेंगदाणे-चणे, शेव, कुरमुरे, चिंचोके, डाळं, काबुली चणे, कधीकधी हिरवे उकडलेले चणे, कैरी-कांदा व बरेच काही घेऊन भैय्या येत असे. असेही आपल्याकडे नाक्यानाक्यावर हा सारा माल मसाला शिगोशीग भरलेला असतो. येताजाता पावले थबकतातच. मग कधी गरमागरम खारे शेंगदाणे घे तर कधी सर्दी झालेली असली की चणे. चटणी-चिवड्यासाठी डाळ्या, कुरमुरे, भेळीचा तर साराच सरंजाम असतोच पण घरी करायचा कंटाळा आल्यास ओली व सुकी भेळही चटदिशी हाजिर होते. पापडीचा चमचा करून मस्त हासहुस करत ही आयती भेळ चापण्यातली लज्जत काही औरच. ही अशी दिवास्वप्ने मला भारीच त्रास देतात. इथे तशी पाकिटातली भेळ मिळते पण त्यातल्या चटण्या( दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मस्तच असल्या तरी ) मला खास आवडत नाहीत. बरे एकवेळ तेही चालवून घेऊ... मात्र खारे शेंगदाणे व मसाला शेंगदाणे अगदीच बेकार मिळतात. बरेचदा ते खूप जुनाट व सादळलेले असतात. मसाला शेंगदाण्याला तर एक चमत्कारिक-तेलकट वास ही येत असतो. सुरवातीला चार-पाच वेळा निरनिराळ्या दुकानांमधून आणून पाहिले पण सगळीकडे तिच रडकथा. खाऱ्या शेंगदाण्याची तल्लफ काही चैन पडू देईना तसे एक दिवस घरीच प्रयत्न केला. जमले. आता तर चुटकीसरशी खारे शेंगदाणे - मसाला शेंगदाणे ( हिरवा मसाला, लाल मसाला, किंचितश्या डाळीच्या पिठाचा हात लावलेले- कोटेड, वगैरे प्रकार ) तयार....


खारे व मसाला शेंगदाणे

वाढणी : निदान दोन माणसांना तरी एकावेळी पुरावी.

साहित्य:

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
तीन चमचे मीठ
तीन वाट्या पाणी

कृती :

शेंगदाणे, मीठ व पाणी एका काचेच्या भांड्यात एकत्र करून तीन मिनिटे मायक्रोव्हेव मध्ये वॉर्मरवर ठेवा. एकदा हालवून पुन्हा मिनिटभर ठेवा. नंतर भांडे बाहेर काढून पाच-सात मिनिटे शेंगदाणे खाऱ्या पाण्यातच ठेवून चाळणीवर टाकून सगळे पाणी काढून टाका. आता शेंगदाणे काचेच्या भांड्यात घाला व भांडे पुन्हा मायक्रोव्हेव मध्ये ठेवा. सुरवातीला तीन वेळा ४५ सेकंद ठेवायचे व प्रत्येक वेळी शेंगदाणे हालवायचे. त्यानंतर प्रत्येकवेळी ३० सेकंद असे चार वेळा व २० सेकंद ३ वेळा. जरा दमट आहेत असे वाटल्यास अजून दोन-तीन वेळा २० सेकंद ठेवावे. हा अंदाज दोनतीनदा केले की बरोबर येतो. मायक्रोव्हेव मधून काढून कोमट होईतो दम धरा. गरम खाल्ले तरी लागतील मस्तच पण थोडेसे ओलसर वाटतील. जसे जसे थंड होत जातील तसतसे अगदी टिपीकल खारे शेंगदाणे लागतील.टीपा :

मायक्रोव्हेवची वेळ अजिबात वाढवायची नाही. एकावेळी जास्ती ठेवू म्हणजे पटकन तयार होतील असा मोह झाला तरी तो अमलांत आणायचा नाही. जळून जातात. अगदी थोडा थोडा वेळ ठेवून प्रत्येक वेळी हालवावे. उद्याला हवे असतील तर शक्यतो आजच करावे. चुकून मीठ जास्त झालेय असे वाटल्यास तीन-चारवेळा ठेवून झाले की हातावर चोळावे म्हणजे जादा झालेले मीठ पडून जाईल. मायक्रोव्हेव मध्ये करायचे नसल्यास पातेल्यात जिन्नस घेऊन खळखळवून उकळून घ्यावे. पाणी काढून टाकले की पसरट पॅनमध्ये किंवा तव्यावर टाकून मध्यम मंद आचेवर परतत राहावे. आच अजिबात वाढवू नये. किमान दहा ते बारा मिनिटे लागतील सगळे पाणी आटून कोरडे होण्यासाठी. पंधरा दिवस मस्त राहतात. अजिबात सादळत नाहीत.मसाला शेंगदाणे करताना......

साहित्य :

दोन वाट्या कचे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

मार्गदर्शन :

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून वरीलप्रमाणेच उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.

टीपा :

मसाला शेंगदाणे शक्यतो पॅनमध्ये किंवा तव्यावरच कोरडे करावेत. तव्यावरच लिंबाचा रस टाकल्यामुळे आंबटपणा तर उतरतो मात्र शेंगदाणे ओले होत नाहीत. आठदहा दिवस अगदी मस्त टिकतात. ( केल्याकेल्या फन्ना न झाल्यास.... पण अशी वेळ येतच नाही. घरात कोणीही नसताना करून ठेवले तरच..... ) मसाला शेंगदाण्यात बरीच विविधता आणता येते. कधी लसूण घालून तर कधी जिरे-मिरीचे, किंचित डाळीच्या पिठाचे कोटींग चढेल असे.

Monday, June 7, 2010

जिया धडक धडक.....

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा आहे.

चित्रपट : कलियुग
मूळ गायक : राहत फतेह अली खानगाणे येथेही ऐकता येईल.

Tuesday, June 1, 2010

एक मस्त दिवस: मॅकिनॉव आयलंड

गेले तीन आठवडे नुसती गडबड चालली आहे. मायदेशातून पाहुणे आलेले. आठ दिवस त्यांच्या सरबराईत-फिरणे-गप्पा-टप्पा-जोरदार खादाडी आणि तीन पत्ती व रमीचे रात्री एक एक पर्यंत रंगणारे डाव यात गेले. शोमूही त्याला सुटी असल्याने आलेला आहेच. पाहुणे गेले, जरा कुठे दम टाकतेय तोच आला पहिला लॉग विकेंड. थंडी बरीचशी ओसरलीये. मधूनमधून थोडे अंगात येतेय अजूनही तिच्या पण आता मुळी कोणी तिला भीक घालतच नाहीये. आमच्या मागचे जंगल जिथे मिळेल तिथून भरभरून धुमारे फुटून उमलून आनंदाने सळसळतेय. जिकडे तिकडे ससे, मोठ्या मोठ्या झुबकेदार खारींचा सुळसुळाट सुरू झालाय. बदकांची फौज रोजची नवाचे टायमिंग पकडून ऑफिसात गेल्यासारखी सकाळी जाते व संध्याकाळी सहाची लोकल घेऊन परतते. अगदी घड्याळ लावून घ्यावेत इतकी वक्तशीर बदके पाहून रोज माझा अचंबा वाढतोच आहे. एरवी थंडीत काड्या झालेल्या रानाच्या मध्यातून कळपाने फिरणारी हरणे चक्क एक एकटी पार्किंग लॉट मध्येही घुटमळू लागलीत. ती ही न घाबरता. अशाच एका हरणाला पाहून दबकत दबकत काही फोटो घेत होते तर ते बेटे माझ्याकडे मान उंचावून उंचावून ऐटीत उभे राहून मस्त पोझ देऊ लागले.

पार्किंग लॉटच्या जवळ आलेले व पोझ देणारे

नेहमीप्रमाणेच आम्ही आयत्यावेळी जिथे जावेसे वाटेल तिथे जाऊ रे, या कळपात मोडणारे. त्यामुळे कुठलेच बुकिंग केलेले नव्हतेच. पहाटे उठून चार-पाच तासांच्या परिघात कुठेही जाऊ आणि रात्री उशिरा परतू हा बेत ठरला. शनीवारी नेहमीप्रमाणे आमच्या पहाटे उठण्याच्या निश्चयाला झोपेने सुरुंग लावला. एकंदरीत चार वेगवेगळ्या गजरांना दाद न देता आम्ही तिघेही मस्त गुरगुटून झोपलो. उठल्यावर पहिली पाच मिनिटे एकमेकांच्या नजरा चुकवत चुळबुळत असतानाच शोमू फुसकन हसला..... मग आम्हा दोघांनाही हसू आवरेना.

आता नऊ वाजता आवरायला घेतल्यावर जाणार कधी आणि येणार कधी.... उद्या नक्की हं का. ठरले. कुठे जायचे यावर अजूनही एकमत नव्हतेच. त्यामुळे शोमू म्हणाला, " ममा, बरे झाले आज नाही निघालो ते. नाहीतर बाबाने नं आपल्याला डेट्रॉईट डाउनटाउन दाखवून परत आणले असते. " " चल रे! उगाच काहीही काय..... " मी मारे बाबाची बाजू घेऊन बोलायला गेले आणि असे म्हणत म्हणत मी त्याच्याकडे पाहिले तर तो जणू मी हेच करणार होतो च्या आवेशात गालातल्या गालात हसत होता. शनीवारी इकडम तिकडम करताना उद्या आपण मॅकिनॉव आयलंडला जाऊया हे नवऱ्याकडून वदवून घेतले तेव्हाच संध्याकाळी कच्छी दाबेली खिलवली. शेवटी निदान तुझ्या त्या अप्रतिम झालेल्या कच्छी दाबेलीला आता जागायला हवेच नं असे म्हणत न खळखळ करता नवरा पटदिशी हो म्हणाला. आणि रवीवारी पहाटे साडेसहाला आम्ही घर सोडले.

आमच्या घरापासून मॅकिनॉव सिटी, २६५ मैल लांब आहे. साधारणपणे एखादा दहापंधरा मिनिटांचा हॉल्ट घेतला तरी साडेचार ते पाच तासात पोचता येते. मॅकिनॉव सिटी हे गाव खूपच छोटेसे आहे. साधारणपणे हजारभर लोकांची वस्ती असलेले गाव पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की जिवंत होते. Emmet व Cheboygan या दोन काउंटींनी बनलेल्या या गावात उन्हाळ्याचे चार महिने प्रचंड संख्येने पर्यटक येतात. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की हे छोटेसे गाव एकदम कात टाकते व लोकांच्या स्वागताला झडझडून सज्ज होते. मॅकिनॉव आयलंड ला जाणाऱ्या फेरी इथूनच सुटत असल्याने व प्रत्यक्ष आयलंडवर राहणे व खाणे तसे जरा महागडे असल्याने बहुतांशी पर्यटक इथे राहणेच पसंत करतात. त्यामुळे इथे अगदी लेकच्या काठावर प्रचंड हॉटेल्स आहेत. Michilimackinac किल्ला, मॅकिनॅक ब्रिज, मॅकिनॅक पॉंईंट लाइट व शॉपिंग मॉल आणि भरपूर रेस्टॉरंट्स इथे आहेत.

मॅकिनॅक आयलंड हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेले मॅकिनॅक काउंटीतील एक अतिशय सुंदर शहर आहे. फक्त ७०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या बेटावर कुठल्याही वाहनास परवानगी नाही. बहुतांशी सगळे लोक एक तर घोडे, सायकली किंवा पायीच चालतात. फक्त इलेक्ट्रिक व्हिलचेअर्स व आणीबाणीच्या सेवांसाठी लागणाऱ्या वाहनांना परवानगी आहे. मॅकिनॉव सिटीतून आयलंड वर येण्यासाठी फेरीची सोय केलेली आहे. अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत ही सेवा दर अर्ध्या तासाने अखंड सुरू असते. बऱ्याच(३) कंपन्यांच्या फेरी बोटस आहेत व अनेक छोटे छोटे धक्केही बनवलेले आहेत. मोठ्यांसाठी २४ डॉलर व लहानांसाठी १२ डॉलर हा दर पडतो. जालावर तिकिटे घेतल्यास तीनचार डॉलर्स वाचू शकतात. तसेच वेगवेगळी ग्रुप पॅकेजेसही उपलब्ध आहेत, त्याचाही खूप फायदा होतो. तेव्हा थोडा अभ्यास करून जावे हे फायदेशीर व वेळ वाचवणारे आहे. फेरीतून आयलंडकडे जाताना खूप मजा येते. फेरीच्या मागे मोठ्या पिसाऱ्यासारखे पाणी उडत असते. एकीकडे मॅकिनॉव ब्रिजची शोभा तर समोर दिसणारे मॅकिनॉव बेट. हिरवट-निळे-गर्द निळे, तळ दाखवणारे स्वच्छ पाणी व आजूबाजूला येजा करत असलेल्या इतर फेरीमुळे उठणाऱ्या मोठ्या लाटा, अंगावर उडणारे तुषार...... पाच तास ड्राइव्ह करून आलेला थकवा इथेच संपतो व मन ताजेतवाने होऊन जाते.


मॅकिनॉव ब्रिज

फेरी व धक्का

मागे उडणारा फवारा

दिपगृह

समोर दिसणारे मॅकिनॉव आयलंड

दिपगृह

एकंदरीत ५.६ चौरस माइल्सच्या या बेटाचा ४.४ मैलाचा भाग जमिनीचा असून १.२ मैल पाण्याने व्यापले आहेत. फेरीतून उतरल्या उतरल्या एकच एक लांबलचक मेनरोड, त्यावरील दुतर्फा दुकाने, निरनिराळे खाण्याचे धाबे, लोकांची चहलपहल, सायकली, घोडे, बग्ग्या पाहताच डोळ्यासमोर माथेरान येते. जवळपास ७५% आयलंडचा भाग व्यापून असलेल्या स्टेट पार्कमध्ये अनेक लहान मोठे ट्रेल्स आहेत. एखादा दिवस हाताशी असेल तर निदान एखादा तरी ट्रेल अवश्य करण्यासारखी जागा आहे. हाताशी सायकली असतील तर अजूनच जास्त मजा येते. इथले घोडे पाहात राहावे असे आहेत. काहीसे बुटके परंतु अतिशय बलवान. त्यांच्या पायांचा बळकटपणा व आकारमान पाहून थक्क व्ह्यायला होते. मात्र त्याचबरोबर इथे सगळीकडे पडलेल्या घोड्याच्या प्रचंड लिदी व त्यांचा आसमंतात भरून राहिलेला भयानक गंध अतिशय त्रास देतो. काहीवेळाने आपल्या नाकातले केस जळून गेले आणि फुफ्फुसं याच वासाने पूर्ण पावन झाली की हा भयंकर वास त्रास देईनासा होतो. तरीही जाताना रुमालावर प्रफुल्लित करणारे-शक्यतो फुलांच्या वासाचे परफ्यूम भरपूर ओतून बरोबर घेऊन जा.

आयलंडवर भाड्याने सायकली मिळतात तसेच तुम्ही स्वत:ची सायकलही आणू शकता. मात्र फेरीतून ती आणताना सायकलीसाठी आठ डॉलर मोजावे लागतात. संपूर्ण बेट तुम्ही घोडागाडीच्या बग्गीतून फिरू शकता. एकदा तिकीट घेतले की तुम्ही कुठेही उतरा कितीही वेळ थांबा, समोरून येणारी कुठलीही दुसरी बग्गी पकडून पुढच्या ठिकाणी जा असे करू शकता. त्यातल्या त्यात कमी दमवणारी व वेळ वाचवणारी व आखलेली ही बग्गीची टूर घ्यावीच. म्हणजे एका दिवसातही बरेच काही बघता येते. बग्गीच्या टूरचे तिकीट सर्वसाधारणपणे मोठ्यांसाठी २३ ते २५ डॉलरच्या आसपास व लहानांसाठी ९ डॉलर इतके आहे. बरेचदा जालावर डिस्कॉऊंट कुपनेही उपलब्ध असतात ती जरूर घेऊन जावीत. काही पैसे नक्कीच वाचू शकतात. ग्रुप तिकिटेही उपलब्ध असतात. आपण आपल्याला हवा तितका वेळ प्रत्येक स्पॉटवर घालवू शकतो. तेव्हा उगाचच घाईने ठिकाणे पाहावी लागत नाहीत.

आयलंडवरील मेनरोड

जागोजागी केलेली सुंदर बाग

बग्गीचे घोडे

मॅकिनॉव आयलंड

आयलंडवरील एका महागड्या हॉटेलचा चढ

हॉटेल
सुरवातीलाच Surrey Hills Museum लागते. ब~याच जुन्या वस्तू, ऐतिहासिक बग्ग्या, त्याकाळचे अग्निशामक दलाचे सामान व भेटवस्तूचे दुकान आहे. शिवाय जर थोडेसे काही खायला हवे असेल तर तेही इथे घेता येते. तिथून निघालो ते Wings of Mackinac Butterfly Conservatory ला पोहोचलो. आयलंडवर असलेले हे फुलपाखरांचे गार्डन अतिशय प्रसिद्ध आहे. एका वातावरण संतुलित केलेल्या घुमटात शेकडो फुलपाखरांना उडताना, आपल्या अंगा-खांद्यावर अगदी विश्वासाने अलगद विसावताना पाहून मस्त वाटते. जवळपास २०० हून जास्ती जातींची फुलपाखरे इथे आढळतात. कितीही वेळ या सुंदर फुलपाखरांच्या संगतीत घालवला तरी मन भरतच नाही. पण नाईलाज असतो. बाहेर पडताना चारचार वेळा खात्री करून घेतली.... न जाणो एखादे फुलपाखरून बिलगूनच राहिलेले असायचे. तिथेच एक छोटेसे गिफ्ट शॉपही आहे. सुंदर सुंदर फुलपाखरे ( मेटलची/काचेची ) व अनेकविध शोभेच्या व आठवणी ठेवणाऱ्या गोष्टी तिथे मिळतात.

फुलपाखरे


जिकडेतिकडे फुललेली सुंदर सुंदर फुले

तिथून पुढे सरकलो ते दगडाची कमान- आर्च रॉक या प्रसिद्ध जागेवर पोहोचलो. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते ते. लाईमस्टोन मधून नैसर्गिकरीत्या तयार झालेली ही कमान व अथांग पसरलेले विविध रंग-छटा धारण केलेले पाणी. कितीतरी वेळ अविचल उभी होते. वाऱ्याच्या लहरींबरोबर मनालाही मी सोडून दिलेले...... अगदी कुठलाही व कोणाचाही विचार मला त्याक्षणी नको होता. हवी होती केवळ शांततेची अनुभूती. जवळजवळ तासभर तिथे रेंगाळून निघालो ते फोर्टच्या दिशेने.

आर्च रॉककडे जाताना

कमान

कमानीतून दिसणारा नजारा

कमानीतून डोकावताना

मॅकिनॅक आयलंडवर पाहण्यासारख्या ठळक ठिकाणात ’ मॅकिनॅक किल्ला ’ प्रामुख्याने मोडतो. मुळात ब्रिटिशांनी अमेरिकन रिव्होल्युशनरी वॉरच्या वेळी बांधलेला हा किल्ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पंधरा वर्षे ब्रिटिशांच्याच ताब्यात होता. १८१२ मध्ये, मिशिगन व ह्युरॉन लेकवरील ताब्यासाठी झालेल्या युद्धाची छावणी इथेच होती. १८०० शतक संपत असताना इथे यूएस मिलिटरीने तळ ठोकला तो १९०० शतक संपेस्तोवर होता. आता हा संपूर्ण किल्ला म्युझियम, मॅकिनॅक आयलंड स्टेट पार्क व नॅशनल ऐतिहासिक लॅंडमार्क म्हणून ओळखला जातो. इथे निरनिराळे शोज आयोजित केले जातात. तोफांची सलामीही दिली जाते. त्याकाळी राहत असलेल्या लोकांची घरे, त्यातील सामान-अगदी स्वयंपाकाच्या भांड्यापासून ते काचसामाना पर्यंत व कपड्यांपासून ते जोडे, पलंग, कपाटे, अगदी न्हाणीघरही येथील म्युझियम मध्ये पाहावयास मिळते. किल्ला पाहावयास कमीतकमी तीन ते चार तास हवेतच. अन्यथा नुसतेच भोज्ज्याला हात लावून आल्यासारखे वाटेल. येथे संध्याकाळीही शोज आयोजित केले जातात. मात्र ते कधी सुरू आहेत हे आधी पाहून जायला हवे. शिवाय त्यासाठी शक्यतो आयलंडवर राहिलेले बरे. फेरी उशीरापर्यंत असतात परंतु तोवर खूप थकून जायला होते.

किल्ल्यातील आयोजित शोमधील एक दृष्य

बग्गी

मॅकिनॅक फोर्ट

फेरी घेऊन परत सिटीत आलो व तिथे असलेल्या इटालियन रेस्तारॉमध्ये जेवलो. खरे तर खूप दमलो होतोच. शिवाय परतीचा पाच तासांचा प्रवासही डोळ्यासमोर दिसत होता त्यामुळे फारसे न रेंगाळता निघालो. आधीही एकदा आम्ही हे सगळे केले होते व त्यावेळी तीन दिवस राहिलोही होतो त्यामुळे ही एक दिवसाची सहल शक्य झाली. प्रथमच व एकदाच जाणे शक्य असल्यास किमान दोन-तीन दिवस हाताशी ठेवूनच जायला हवे. सिटीत राहण्यासाठी असलेली बरीचशी हॉटेल्स लेकच्या काठाशी असल्याने बीचवर आहेत. प्रत्येकाकडे स्वत:चा काही खाजगी भाग आहे. दुपारी पाणी जरा कोमट झाले की काठाकाठाने डुंबण्यात खूप गंमत येते. अतिशय स्वच्छ व नितळ पाणी लडीवाळपणे अंगाखांद्याला गोंजारत राहते. मग वाळूत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर जरासे विसावून एक मस्त डुलकी काढायची.... बरेच लोक तर तासनतास इथे पहुडलेले असतात.

लांबलचक किनारा

खेळणारी - पहुडलेली मंडळी


इटालियन रेस्टॉरंट

सूर्य अस्ताला गेल्यावर सिटीतच असलेल्या कसीनोचा खणखणाट उत्तर रात्रच नव्हे तर तांबडे फुटेस्तोवर ऐकू येत असतो. इतका वेळ नाही तरी किमान थोडासा वेळ तरी इथे डोकवाच. निकल-डाईम-क्वार्टर काहीतरी खेळाच. अगदी ऐशींच्याही पुढे असलेल्या आजीआजोबांच्या सुरकुत्यांमधून दिसणारी या खणखणाटाची झिंग व त्यांचा उतू चाललेला प्रचंड उत्साह आणि जबरी स्टॅमिना तुम्हीही थोडीसा अनुभवाच. मात्र पैशाचे गणित पक्के ठेवा. जिते तो सिकंदर और हारे तो भी न हो फिकर...... बस इतना खयाल रखना और बस मजेही मजे लुटना...... . असा हा एक मस्त दिवस व तितकेच प्रेक्षणीय मॅकिनॉव आयलंड.