जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, November 25, 2010

चिवट....

चाळींचे स्वतःचे खास रसायन असते. आताशा ' असायचे ' असेच म्हणावे लागेल. इतक्या अशक्य वेगाने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी सदनिका पाहून माझी मातीला नमन - णारी, चुंबणारी पावले दचकू लागतात. तिने डोळे वटारून माझ्याकडे पाहून म्हटले तर, " बेमुर्वत... तेरी इतनी मजाल की मेरे सोने देह पे तेरे इतने मलिन पैर.... तौबा... तौबा!! कोई बचाए मुझे इन मन, प्यार, स्नेह के पुजारीओंसे. अभी तक माझी चाळ, माझी माणसे, वाटीतल्या भाजीची देवघेव, काकू पटकन साखर द्या हो तिकडे गॅसवर चहा उकळू लागलाय.... ( बेवकूफ, साखर नाही ना घरात मग बंद कर की गॅस. काकूंनी काय ठेका घेतलांय. पण नाही. मिजास देखो लडकी की.... जैसे उसका हक बनता हैं काकू की शक्कर पे... और काकू के क्या कहने? वो अटकी पडी हैं पडोस धर्म, सख्खे शेजारी, सलोखा... और न जानें क्या क्या, कहानी में भी शोभा न दे ऐसें पन्नों में.... ) मध्येच अटकून पडलीत. शेवटी काय, हे मध्यमवर्गीय.... तेही गिरणगावातले, काळाबरोबर कितीही उंच उंच उड्या मारू देत, फिरून भावना, प्रेम यातच मरणार. एकेका फरशीच्या तुकड्याची किंमत मोजायची सोडून, ' किती गोत जोडलं ' ची नाणी रोज रात्री मनाच्या गाडग्यात छनछनवत उकाड्यात निवांत निजणार. "

अय्याSSS.... तरीच म्हटले, कितीही सोन्याने मढलीस तरी शेवटी निवांत निजण्यावरच आलीस की. आता कसं मला मोकळं मोकळं वाटू लागलं. अगं कितीही तू सोन्यात तोललीस ना तरीही अजून तुझ्या तळाशी धुगधुगी आहे. आणि आठवणींच्या डोहाची खोली, आकाशाला भिडणारे तुझे डोलारे मुळीच मापू शकत नाहीत. त्यावर आजही समस्त मध्यमवर्गीय गिरणगावाचीच मालकी आहे बरं.

तर अशा या आमच्या चाळीचेही स्वतःचे खास नियम, चौकटी होत्याच. आपापल्या परीने जो तो त्यात भर टाकी किंवा त्यांना वकुबानुसार छेद देई. आपसात कितीही बंडाळी माजली तरी बाहेरच्या आक्रमणांना एकजूटीने सामोरे जाऊन समस्त चाळजनांची शान आणि मानही सारे सांभाळून असत. किंबहुना घरच्यांच्या मानापेक्षाही चाळीच्या ' आन-बान-शान ' वर कुठलीही आंच येणार नाही याची खास दक्षता घेतली जाई. खरं तर, या चाळ संस्कृतीने जगण्याच्या बाराखडीत किती काय काय शिकवलेय याचा उहापोहही आताशा करोडोवावी आवृत्ती च्या पलीकडे गेलाय. फिरून नव्याने सांगण्यासारखे खरेच काही उरलेय का? असा प्रश्न पडावा.... तरीही प्रत्येक अनुभव त्या त्या वेळी व जेव्हां जेव्हां डोहातून अचानक ढवळला जाऊन पृष्ठावर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवू लागतो तेव्हां पुन्हा एकदा त्याचा जुनाच पैलू नव्याने दाखवतो. कधी आधार देतो तर कधी उभारी.... कधी समजूत काढतो तर कधी मायेची उब देतो. तर कधी जगण्याची प्रक्रिया उकलून दाखवतो. गर्भात रुजण्यापासूनच शिकलेली चिवटता पुढे आयुष्यभरही अंगी बाणव गं.... या जगात जगण्यासाठी नितांत गरजेची आहे ती . तिचे अस्तित्व मनाने नाकारले की तू संपलीस. अगदी लहानपणीच या एका प्रसंगाने न कळत्या वयातही नकळत खोलवर बिंबलेली चिवटता, आज पुन्हा एकवार पृष्ठावर आली आहे...

आमचे घर तिसऱ्या मजल्यावर रोड फेसिंग. चाळीत आतल्या बाजूची गॅलरी ' राजरोस सार्वजनिक ' असतेच. पण प्रत्येक खोलीला असलेली खाजगी गॅलरीही सार्वजनिकच असते. फक्त त्या सार्वजनिकतेला एक खाजगी पदर असतो. या वरही एकदा लिहायलाच हवेय. पण आज नको. आज फक्त बेसिकवरच भर. तर सकाळचे नऊसाडेनऊ होत होते. रविवार होता. वार कुठलाही असो पाणी तर लागतेच ना... त्यामुळे पहाटेपासून तीन मजले उतरून पहिल्या मजल्यावरील त्या भल्या लोकांच्या ( ज्यांनी उदारपणे त्यांची घरे आमच्यासाठी कायमची मुक्तप्रवेशात ठेवलेली ) साखरझोपा न मोडतील याची काळजी घेत आम्ही सारे मांजरीच्या पावलांनी पाणी भरत होतो. आठाच्या सुमारास रक्मा कोळिणीने चिंबोऱ्यांनी भरलेली पाटी दाणकन आपटून मोठ्ठा गदारोळ उडवून दिलेला. त्या वाट फुटेल तिथे पळू पाहणाऱ्या चिंबोऱ्यांची आणि रक्मेची झटापट ही माझी-भावाची हक्काची करमणूकही पार पडली होती. आईने पोहे बश्यांमधून काढायला सुरवात केली होतीच आणि अचानक धाड धाड आवाज येऊ लागला. आईने हातातले पातेले खाली ठेवत म्हटले, " अरे कोणीतरी गॅलरीचे दार बंद करा. दगडफेक सुरू झाली वाटते. " भाऊ पळतच गेला आणि दाराला कडी लावूनही टाकली. वाचताना नवल वाटेल की इतका थंडपणा... पण हा दगडफेकीचा प्रकार अक्षरशः आठवड्यातून एकदा कधीकधी तर दोनतीनदा ही चाले. अनेकदा कारणेही कळत नसत. फक्त गॅलरीत जमलेल्या विटा दगडांच्या ढिगावरून आम्ही मुले केसरबाग की नायगांवची पोरे अशी गणिते मांडत हिरीहिरीने चर्चा करायचो.

थोड्यावेळाने दगडफेक जशी अचानक सुरू झाली तशीच एकाएकी थांबलीही. पुढची दहा मिनिटे शत्रुपक्षाचा अंदाज घेण्यात गेली. उगाच एखादे ढेकूळ धडधड वाढवण्याच्या प्रयत्नात ढिसाळपणा दाखवत फुटून गेले. वंद झालेली कवाडे उघडून आत्तापर्यंत दुबकून घरात बसलेली मंडळी माना काढून डोकावू लागली. तोच प्रवेशद्वारासमोर गदारोळ माजला. " अरे, पकड पकड. सोडू नका साल्याला. बरा सापडलाय. मार मार... " कोण कोणाला पकडतोय आणि कोण तावडीतून सुटतोय हे कळेतो, तात्पुरते एकच भासणारे दोन्ही पक्ष ' चाळ अ व चाळ ब ' च्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावरील मारुतीच्या देवापुढे पोचले होते. आमच्या चाळीतल्या पोरांच्या तावडीत शत्रुपक्षातला एक शेलका मोहरा अचानकपणे सापडला होता. अपने गलीमें कुत्ता भी... इथे तर अख्ख्या ' अ आणि ब ची समस्त जनता ' पाहत असल्याने अक्षरशः शेंबड्या पोरानेही यावे आणि टपलीत मारून जावेची गत झालेली. बरं तो शत्रूही काही लेचापेचा नव्हता, इतका मार खाऊनही जमेल तसे आणि मिळेल त्याला हाणत होता. अचानक दोघातिघांनी त्याला धरला आणि तथाकथित आमच्या चाळीच्या स्वघोषित म्होरक्याने मारुतीच्या पुढचा दिवा-नारळ ठेवण्याचा दगड उचलला आणि घातला त्याच्या डोक्यात. आईने तक्षणी आम्हा दोघांच्या पाठीत रट्टा घालत आम्हाला मागे खेचले तरीही भळकन उडालेली चिळकांडी अजूनही दिसतेच. तोच पोलिसांच्या सायरनचा दूरून आवाज येऊ लागला. पाहता पाहता कानठळ्या बसतील इतका जवळ आला. आमची मुंडकी धडधडत्या काळजाने पुन्हा डोकावून पाहू लागली. तोवर डोक्यात व हातपायांवर चार पाच दगड घेऊन, मारुतीला रक्ताचा अभिषेक घालत शत्रुपक्ष अर्धमेला होऊन निपचिप पडला होता. " मेला मेला वाटत... हो ना... अजिबात हालचाल करीतच नाहीये. खरंच मेला की काय. आता पोलिसस्टेशन, साक्षीपुरावे, किती सजा होईल हो... आणि आता पुढचा हल्ला आज रात्रीच होईल बरं का... तयारीत राहा. आज सोडा वॉटर बॉटल्सचा मारा नक्कीच होणार. काचा गोळा करायची तयारी ठेवा... वगैरे महिलावर्गाची जोरदार चर्चा - ठोकताळे सुरू झाले. "

पोलिस आले. दोघे तिघे मूर्ख पित्ते पळून न जाता आपल्या किडूकमिडूक छात्या फुगवत पोलिसांसमोरही त्याच्या निपचिप देहावर उगाचच धावून जात होते. पोलिस अगदी जवळ उभे आहेत हे दिसताच तो निपचिप पडलेला देह अचानक उसळला आणि तोच दगड उचलून एका मच्छरावर धावला. पोलोसही या अचानक हल्ल्याने बावचळले. भानावर येत दोघां हवालदारांनी त्याला धरला आणि गाडीकडे नेऊ लागले तर तो जाता जाताही त्यांच्या तावडीतून सुटत शिव्यांची लाखोली अन शब्दशः लाथाळी करत होता. मी अवाक. ज्या देहात दोन मिनिटांपूर्वी धुगधुगीही नव्हती, वडाचा संपूर्ण पार, भोवतालचा फुटपाथ ज्याच्या रक्ताने माखलेला आहे अशा मरणासन्न देहात इतकी ताकद आली कुठून??? जीव किती चिवट असतो याचे जिवंत प्रात्यक्षिकच होते ते. चार दिवसात मोठ्या ताठ्याने आमच्या बसस्टॉपवर उभा त्याला पाहिला अन माझेच पाय लटपटले. तो मात्र मस्तीत हसत बाता करीत होता.

किती सहजी शिकवून गेला, जगण्याच्या लढाईचा चिवट पाठ....

Friday, November 5, 2010

मधुबनी

मधुबनी

वर्षभर घोकत होते, मायदेशी जायला मिळाले तर, " मधुबनी, वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी " सारख्या छोट्यामोठ्या गोष्टी शिकेन. " चाह हैं तो राह मिलती ही हैं ", च्या उक्ती सारखे गेल्या आठवड्यात किराणामालाच्या दुकानात अचानक आईबरोबर गेले. दुकानाच्या भिंतीवर चिकटवलेली क्लासची जाहिरात दिसली. लगेच मी त्या नंबरवर फोन केला आणि दुस‍र्य़ा दिवसापासून एकंदरीत चारदिवसाचा ( रोजचे तीन तास ) क्लास सुरू झाला.

माझे सहअध्यायी वय वर्षे तीन ते दहा या वयोगटातले. जवळपास पंधरा अठरा मुलांचा मस्त दंगा होता. काही मुलांनी त्यांच्या वयाच्या मानाने खूपच छान, सफाईदार काम केले. त्यांचे गोड गोड बोलणे, टीचर टीचर करत मध्ये मध्ये लुडबुडणे. मधूनच चालणा‍र्‍या मारामार्‍या.... थोडासा वेळ गेला की लगेच, " मॅम भूख लगी है। टिफीन खाऊं? " मग तो खाताना सांडलवंड, चिडवाचिडवी.... वेळ कसा गेला हेच कळत नसे. पेपर बॅग्ज, पाकिटे, हँडमेड पेपर, पणत्या रंगवणे, क्राफ्ट या साऱ्या गोष्टी मुलांनी आवडीने केल्या.

त्या भाऊगर्दीतही मी माझ्या परीने काही शिकण्याचा प्रयत्न केला. मधुबनीतील एक छोटेसे चित्र वर दिले आहे. अतिशय सुंदर कला आहे ही परंतु फार किचकट काम. दोन दिवसात हे एक छोटेसे चित्र मी पुरे केले. मनसुबे तर मोठे मोठे रचलेत पाहू चिकाटी कुठवर साथ देतेय... :) ही कला शिकता आल्याचे समाधान तरी नक्कीच मिळाले.
( पहिलाच प्रयत्न असल्याने अचूक व नेमकी सफाई नाही अजून हाताला... )

Thursday, November 4, 2010

हे सुरांनो, चंद्र व्हा...

शुभ दीपावली!!!

हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

या शब्दांमधली आर्तता काळजाचा ठाव घेणारीच. डोळे तुडुंब भरलेले, श्वास कोंडलेला, गळा दाटलेला तरीही मन बोलण्यासाठी स्वरांची वाट शोधणारे.... काहीसे जीवघेणे, तर कुठे तरल, भावविवश. शब्द कुसुमाग्रजांचे. या शब्दातली किमया जितकी मनाचा कब्जा घेते तितकेच अभिषेकीबुवांचे स्वर वेड लावतात. या दोहोंच्या मिलाफाची मोहिनी जबरदस्तच. स्वत:ला सुपूर्त करणेच काय ते हाती उरते.

आज दिवाळीच्या रात्री मी एकटीच झोपाळ्यावर बसलेय. दोन वाजत आलेत. दिवसभराच्या गडबड-गोंधळाने दमून व पहाटे लवकर उठायचे आहे म्हणून सारे कसे शांत झोपी गेलेत. रोज भेसूर ओरडणारी कुत्रीही कुठेशी गायब झालीत. थोड्यावेळांपूर्वी अचानक आलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे हवेत किंचितसा कंप आहे. सकाळपासूनच हुरहूर लागली आहे. दिवसभर घरात वर्दळ सुरू असल्याने पराकाष्ठेने थोपवून धरलेले मन आणि अश्रू बांध तोडून मुक्त ओघळत आहेत. त्यांना अडवण्याचा वेडा प्रयत्न मी कधीचाच सोडून दिला आहे. दाटलेला भावनांचा कल्लोळ सावरता सावरता, " हे सुरांनो, चंद्र व्हा " कानात, मनात निरंतर वाजत आहे. मनात वाजणार्‍या या स्वररूपी चांदण्यांच्या कोषात, व्याकुळतेत स्वत:ला झोकून दिलंय.... झोपाळ्याच्या एरवी काहीश्या कर्कश वाजणार्‍या कड्याही या आर्त, हळव्या स्वरांना न दुखावता त्यांच्यात विलीन होऊ पाहत आहेत.

आज मन निवेतो मी, झोपाळा व अभिषेकींचे सूर.... जणू सांगत आहेत, " मोकळी होऊन जा ग बयो, मोकळी होऊन जा.... "