जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 30, 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैतन्य+संकल्प+विश्वास+मनोबल+पूर्तता+समाधान+आनंद=२०११

Tuesday, December 28, 2010

चोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...

थँक्स गिव्हिंगची धूम संपतानाच नाताळची नांदी होते. हॅलोवीनच्या भूतधुमाळी पासूनच नाताळच्या बेतांची आखणी सुरू होते. कोणी क्रूजला तर कोणी थंडीपासून काही दिवस तरी दूर पळण्यासाठी हवाई, कॅलिफोर्निया गाठायचे ठरवते. सगळीकडे उत्साहाचे, अगदी आपल्या दिवाळीची आठवण करून देणारे वातावरण. व्हाईट ख्रिसमसचे इथे फारच वेड दिसून येते. खरे तर साचलेल्या बर्फाच्या ढिगांमुळे कामांमध्ये श्रमामध्येही बरीच वाढ होते. ड्राइव्ह वे, वॉक वे कितीही स्नो पडला आणि कितीही वेडी थंडी झाली तरी स्वच्छ करावेच लागतात. ढिगारे उपसून उपसून मान, कंबर, हात पाय आणि डोके पूर्णपणे कामातून जाते. मग पाठोपाठ सर्दी, अंगदुखी आलीच. बरे हे उपसणे प्रकरण काही एक दोन वेळा करून संपत नसल्याने ही आवर्तने सुरूच राहतात. घरातल्या सगळ्यांनी आळीपाळीने मोहीम हातात घेतली तरी फत्ते होईतो सगळे गडी गारद होतातच. अशातच नाताळ पूर्व संध्येच्या पार्टीची जोरदार आखणी त्याबरहुकूम ती घडावी म्हणून धावाधाव सुरू होते. मेन्यू, टेबल सजावट, घराची सजावट, रोषणाई. गिफ्ट्स आणायला जाणे हाही एक मोठ्ठा उद्योगच. शिवाय ती गावोगावी राहणाऱ्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणे हाही एक व्यापच, तरीही सगळे आवर्जून करतात. कौतुक वाटते. ( हा व्याप पोस्टाने यावेळी बराच सुसह्य केल्याने लोकं थोडीशी निवांत खूश झालेली )

या सगळ्या सणांबरोबरच ऑक्टोपासून नवीन वर्षांची सुरवात होईतो टीव्ही वरील सिनेमे, धारावाहिक हेही सारखे आपला सूर बदलत राहतात. भुताखेतांपासून ते देवदूतापर्यंत. एकदा का थँक्स गिव्हिंग संपले की नाताळचे काउंट डाउन सुरू होते. मग काय कुठल्याही चॅनलवर जा काहीतरी खूपच भारलेले, छान छान शेवट असणाऱ्या सिनेमांची स्पर्धा लागते. देवदूत तर जणू प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यात दबाच धरून बसलेले असतात. दुःखी, गांजलेली, हताश झालेली बिचारी लोकं दिसली ( आता या वर्गवारीचे निकष देवदूतांनाही लावताना किती कटकट होत असेल ना .... ) की लगेच जादूची छडी घेऊन हे हजर झालेच समजा. इतकी वर्षे मी वाट पाहतेय पण... , तरी मागच्या जन्मी अगदी आठवणीने कमीतकमी पाप्ं केलीत. पुढचा जन्म कसलाही असू दे पण देवदूत भेटायलाच हवा. कसचे काय तो मेला नेमका मलाच वगळून पुढे जातो.

जवळपास महिनाभर या देवदूतांचा अनुल्लेख सोसून शेवटी मी बंडाचा झेंडा फडकवला. खसकन टीव्हीचा रिमोट ओढला आणि खटाखट चॅनलची कत्तल सुरू केली. नुसता ख्रिसमस, एंजल्स, फन, आनंद यासारखे शब्द पूर्ण वाचून होण्याआधीच चॅनलचा गळा घोटू लागले. बिचारे चॅनल्सही कधीकधी माझ्या या नवीन रूपाने दचकू लागलेले मला स्पष्ट दिसत होते. हॅलोवीनची कुठलीशी द्वाड, हट्टी भूताळी चुकून हीच्या अंगात घुसली की काय! पण, हाय रे दैवा! चॅनल्सनि जागोजागी तेचतेच गुडीगुडी सिनेमे दाखवण्याचा चंगच बांधलेला. ते ही हट्टाला पेटलेले आणि मीही. असे करता करता नाताळच्या पूर्व संध्येला माझ्या खाटीकगीरीने कळस गाठलेला होता. अचानक एका नावावर बुबुळे स्थिरावली. अदमास घ्यावा म्हणून दोन ओळीतल्या सारावर नजर टाकली आणि लखकन आकाश चिरणारी वीज चमकली मागोमाग जोरदार गडगडाट करत चारीबाजूने आवाज आदळू लागला. नक्की तोच सिनेमा. लाव लाव. हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊनच जाऊदे आज.

सुदैवाने सिनेमा नुकताच सुरू झाला होता. ' मेक वे फॉर टुमारो '. १९३७ साली आलेला. जवळपास विस्मरणातच गेलेला. लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेले ल्यूसी व बार्क हे जोडपे अतिशय आनंदात आपल्या लांब परंतु संपर्कात असलेल्या मुलांसमवेत आनंदात जगत असते. मुले मोठी होऊन मार्गस्थ झालेली असतात. अशातच घराचे हप्ते भरणे शक्य झाल्याने त्यांचे राहते घर बँक जप्त करते. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटते पण आता आईबाबांचे पुढे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न उभा राहतो. चार मुले तशी जवळजवळच असतात. एक जण कॅलिफोर्नियामध्ये जातो तो फारसा संपर्कात राहत नाही. चारही मुलांकडे आई वडील दोघांनाही सामावून घेईल इतकी जागा नसते. सरतेशेवटी आईने एकाकडे बाबांनी एकीकडे असे एकमेकांपासून वेगळे राहायचे असा निर्णय घेतला जातो. त्यांच्या स्वतःच्या घरातील एकमेकांच्या सोबत घालवलेली ती शेवटची रात्र.

या सुरवातीतच तीन-चार ठिणग्या आणि त्यांनी वेगवेगळी मांडलेली चूल मला दिसू लागली. ' ऊन-पाऊस', राजा परांजपे +सुमती गुप्ते, संजीव माला सिन्हाचा ' जिंदगी ' ( अजून मला माझे सुजून भप्प झालेले डोळे आठवतात... ), राजेश खन्ना+शबानाचा ' अवतार ' ( हा सिनेमा मला काय की फारसा रुचलाच नाही. ठराविक सिनेमे वगळता राजेश खन्ना मला कधीच आवडला नाही म्हणून असेल कदाचित ) आणि सरतेशेवटी आलेला ' बागबान '. खूपच लहान असताना ' जिंदगीपाहिलेला. मनात घर करून गेलेला. हॉलिवूडच्या सिनेमावरून बॉलीवूड मध्ये सिनेमा बनवतात हेच मुळी माहीत नव्हते. त्यातून आजूबाजूला काही घरांतून हे चित्र दिसू लागले होते. ' घर घर की कहानी ' च्या बलराज सहानीचा पगडा होताच तशात भर पडली ती जिंदगीच्या संजीवकुमारची.

जसजशी नको ती अक्कल वाढू लागली तशी काही गरजेच्या बऱ्याचशा नको त्या गोष्टी डोक्याचा भुगा करू लागल्या. त्यांतलीच एक ही सिनेमांची चोरी. मग काय अगदी, ’ दो आंखे बारा हाथ पासून जी पडापडीला सुरवात झाली ती पार गजनीपोत्तर ’. मात्र या गोंधळातहीबागबानहा आपल्याच घरी आपणच केलेल्या चोरीत मोडत होता. ( परवापर्यंत तरी ) एक तर अमिताभ बच्चन हेमामालिनीचीही मी चाहती. तशात त्यांची एकमेकातली केमिस्ट्री, गाणी यांचा सतत मारा होऊन होऊन, जिंदगी, अवतारची आठवण देणारा बागबान मी मन लावून पाहिला. ( एकदाच मन लावून नंतर बरेचदा अर्धा, कधीही कुठूनही सुरू होऊन संपेस्तोवर.... कारण नंतर रिमोटच गायब होऊ लागलेले... नाईलाज को क्या विलाज... ) हेमा वयाच्या मानाने किती सुंदर दिसते, तिच्या साड्या, अमिताभचे काम आणि आनुषंगिक सगळेच पूरक. हा भोपळा, ’ मेक वे फॉर टुमारोपाहताना अक्षरशः शकले शकले होऊन फुटला.

मेक वे, मधली ल्युसी ( Beulah Bondi ) मुलाकडे आल्यावर नातीच्या बरोबर नातीच्या खोलीत राहते. वयात येत असलेल्या नातीला ही सोय आवडत नाही पण तिला आजीबद्दल आपुलकी असते. सून पैसे मिळवण्यासाठी ब्रिजचे क्लासेस घेत असते. आजीला तिचे त्यातच गुंतलेपण घराकडे होणारे दुर्लक्ष आवडत नसते. ती लक्ष देत नाहीये म्हणून आपल्याकडून होईल ती मदत करायला आजी सारखी धडपडते. एकलकोंड्यासारखे एका कोपऱ्यात बसून राहणे तिला सहन होत नसल्याने ब्रिजचे क्लासेस सुरू असताना ती आरामखुर्चीत बसून झुलत राहते. त्या खुर्चीचा कुईकुई आवाज.... आजीचा ब्रिज शिकायला आलेल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न. त्यातच आलेला बार्कचा फोन. आजीचा पन्नास वर्षांच्या सहवासानंतर दूरावलेल्या बार्कबरोबरचा संवाद.... मनाला स्पर्शून जातो. सुनेची नातीची आपसातली चाललेली आजीची टोलवाटोलवी. नात आजीला घेऊन सिनेमाला जाते, तिथे तिला एके ठिकाणी बसवून स्वतः मैत्रिणींबरोबर बसते आहे असे भासवून नात गायब होते. सिनेमा संपून जातो. आजी बाहेर येऊन नातीची वाट पाहत उभी राहते. कोणा मुलाच्या गाडीतून नात उतरताना पाहते. नातीला नंतर हे सांगतेही. या मुलाबद्दल आजीच्या मनात थोडे जास्तच प्रेम असते. अचानक एके दिवशी तिला कळते की काही दिवसातच आपली रवानगी वृद्धाश्रमात होणार आहे. त्याला वाईट वाटू नये म्हणून तो काही सांगण्या आधीच आजीच त्याला वृद्धाश्रमातल्या फायद्यांबद्दल सांगून मला तिथे पाठव म्हणते. आईचा मुलाला त्रास होऊ नयेचा खटाटोप आणि मुलाचे ते उमजून असहायतेमुळे नाईलाज होऊन स्वत:लाच मनोमन दोष लावत आईला मीठी मारणे. प्रसंग जराही ओव्हर करता नेमक्या भावना पोहोचवतो.

इकडे बार्क ( Victor Moore ) न्यूयॉर्कमधील मुलीकडे पाठवले जातात. जागेच्या कमतरतेमुळे त्यांना हॉलमध्ये झोपवले जाते. आयुष्यभर कारकुनी केलेले वडील पुन्हा एकदा नोकरी शोधू लागतात. तशातच त्यांची चहा-कॉफी, थोडे जुजबी सामान इत्यादी ठेवणाऱ्या दुकानदाराशी गट्टी जमते. ( हा आपला परेश रावल ) मग एक आजीआजोबांचा फोन संवाद होतो. आजोबांना सर्दी झालेली असते. आजी सारखी काळजी व्यक्त करते, थोडीशी रागे भरते. मग एक आजीचे पत्रवाचनाचा सीन होतो. आजोबांचा चष्मा फुटलेला असतो. आजोबा दुकानदाराला पत्र वाचून दाखवायला सांगतात. तो बरेचसे वाचतो आणि मग एका ठिकाणी थांबतो आणि आजोबांना म्हणतो की तुमचा चष्मा आला की पुढचे तुम्हीच वाचा. आजोबा निघून गेल्यावर स्वतःच्या बायकोला हाक मारून म्हणतो, " मला तुला पाहायचे होते गं . " ( कंट्रोल सी कंट्रोल वि ... माझी चिडचिड सुरु... )

आजोबा सर्दीने पछाडले जातात. आजोबांच्या काळजीने आजीच्या जीवाची घालमेल सुरू होते. मुलगा सून तिला दिलासा देत राहतात. तशातच नात रात्रभर घरी येत नाही. आजी सुनेला सिनेमागृहात घडलेली घटना सांगते स्वतःला दोष लावते. सून वैतागते आणि म्हणते तुम्ही हे मला तेव्हांच सांगायला हवे होते. नवऱ्याशी भुणभूण लावते की आधी मुलीने असे कधीच केले नव्हते. पण आजी आल्यामुळे ती आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आणत नाही. इकडे मुलगी डॉक्टरला बोलावते. डॉक्टर येण्या आधी घाईने वडिलांना बेडरूममध्ये झोपवते. डॉक येतो त्यानंतरचा सगळा सिनंच फारच गमतीशीर घेतला आहे.

शेवटी आजीची वृद्धाश्रमात रवानगी जोवर थंडीचा मोसम संपत नाही तोवर आजोबांनी कॅलिफोर्नियात राहायचे असे ठरते. आजी मुलाला सांगते की कुठल्याही परिस्थितीत आजोबांना मी वृद्धाश्रमात राहायला जाणार आहे हे कळता नये. पन्नास वर्षांच्या लग्नाच्या कालखंडातले हे एकमेव सत्य त्यांच्यापासून मला लपवायचे आहे. वडील कॅलिफोर्नियाला जाण्याआधीचा एक दिवस आजी-आजोबांची भेट ठरते. ठरल्याप्रमाणे दोघे भेटतात. मग त्यांच्या आठवणीत काळ पन्नास वर्षे मागे जातो. तो गाडीचा प्रसंग घडतो. सेल्समन त्यांना छानपैकी फिरवून आणतो. गाडी आवडल्याचे पाहून मग काय विचार आहे असे म्हणतो. आजी-आजोबा तेच उत्तर देतात. त्यावर तो वैताग दाखवता हसून मी ही तुम्हाला अशीच सफर घडवल्याचे म्हणतो. पुढे ते हनीमूनच्या त्याच हॉटेल मध्ये जातात. त्याचा मालक त्याला हे कळल्यावर येऊन अगत्याने बोलतो ड्रिंक्स ऑन हॉउस म्हणून सांगतो. मग आजोबांचे आजीला घे गं तू ही म्हणून आग्रह करणे, आजीचे, ' काहीतरीच हं का तुमचे म्हणून, तिचे लाजणे. मग आजोबांनी आजूबाजूला ड्रिंक्स घेणाऱ्या बायका दाखवल्यावर लाजत लाजत होकार देणे. आजोबांची आठवणीतली वाराची गल्लत आणि आजीची कसे तुम्ही चुकताय सारखे हे दाखवणे. पुढे डान्स सुरू असलेला पाहून आजोबांचे आजीला आग्रह करणे. पण नवीन लोकांसारखे नाचता आल्याने गडबडून जाणे. नेमके हे बँडवाल्याने टिपणे आजीआजोबांच्या काळातली त्यांची चिरपरीचीत धून वाजवणे. या सारखे छोटे छोटे प्रसंग अतिशय साधेसुधे दाखवलेत.

आजीआजोबा जेवायला येणार असतात परंतु ते आल्याने इकडे मुलांची बैचेनी. आजोबांच्या ट्रेनची वेळ जवळ येत चाललेली. ती चुकतेय की काय ही भीती तर एकीकडे आईबाबांची होणारी ताटातूट मुलांना कुरतडत असते. आजोबा फोन करून सांगून टाकतात की आम्ही जेवायला येणार नाही आहोत. आजीआजोबा तो संपूर्ण दिवस स्वत: रममाण होऊन आनंदाने घालवतात. जुन्या आठवणी काढत जीवनाचे वास्तव स्विकारतात. शेवटी ठरल्याप्रमाणे आजोबा ट्रेनने कॅलिफोर्नियाला रवाना होतात आजी प्लॅटफॉर्मवर हात हालवत उभी असते आणि सिनेमा संपतो. सिनेमा पाहताना कुठेही मेलोड्रामा, भडकपणा, अतिरंजित प्रकार दिसत नाहीत. सगळ्या मुलांना आईबाबांबद्दल प्रेम असते. कुठेही कोणीही मुद्दामहून वाईट वागताना दाखवलेले नाही. १९३७ साली, त्यावेळी ओढवलेल्या जागतिक मंदीच्या काळात आलेल्या या सिनेमात डायरेक्टर Leo McCarey यांनी अप्रतिमरित्या हाताळलेला सिनेमा. अतिशय संयमाने कुठेही आक्रस्ताळेपणा करता कथानक पुढे सरकत राहते. आजीआजोबांचे आपसातले प्रेम-एकमेकांप्रती आदर ठायीठायी सहजपणे दिसून येतो. Beulah Bondi Victor Morre यांचा अभिनय खासच आहे. हे दोघेही खरेखुरे आजीआजोबा वाटतात. शेवटही गोडगोड केलेला नाही. वास्तवात जे घडण्याची शक्यता जास्त तेच दाखवले आहे. इतका जुना कृष्णधवल सिनेमा पाहताना ( आधीच्या चार चार ठिणग्या पाहून ही ... ) आपण गुंतून जातो. या सामाजिक समस्येची जाणीव खोलवर होते. बागबान सारखी अतिरंजित, आचरटपणाची छाप उमटत नाही.

रवी चोप्राने मुळातच अमिताभहेमाचे स्वतःचे घर दाखवून परतीचा मार्ग खुला करून ठेवला. तश्यांत अनाथ सलमानचे ठिगळही जोडून ठेवलेय. ही अशी अचलुन आणलेली मुलेच खाल्लेल्या मीठाला का जागतात? मुलांनाही सुरवातीपासूनच खलनायकी चेहरा देऊन टाकला. गाडीच्या प्रसंगात अपमान आणि सलमानच तिथला मालक असणे त्याची ड्रामॆटिक रिऎक्शन, हॉटेलमध्ये एकदम जंगी खातिरदारी - लगेच महाल काय सूट्स काय... इतकं पण कैच्याकै दाखवायचं म्हणजे.... :( . हेमाचे नातीच्या अंगचटीस जाणाऱ्या पोराच्या कानाखाली आवाज काढणे, लेकाला वाढदिवसाच्या दिवशी डबा घेऊन त्याच्या ऑफिसात जाणे, एखाद्या नवथर अल्लड तरुणीप्रमाणे फोनची, पत्राची वाट पाहणे. आरामखुर्चीत बसून झुलणे, अमिताभच्या हाताची उशी करणे, सरतेशेवटी लेखक नसलेल्या अमिताभने दुखडा लिहिणे आणि त्याला बुकर ऎवॉर्ड मिळणे ते पुस्तक हातोहात खपणे, पुढे सन्मान वगैरे वगैरे चा प्रवास अक्षरशः मेलो मेलो चा अतिरेक होऊन कहर करत सहनशक्ती गारद करतो. भीक नको पण या चोप्राला आवर म्हणायची पाळी आणतो. अजून किती वेळा रिमेक बनवणार... बस करा यार आता.

या सगळ्या मोरांच्या पार्श्वभूमीवर अचानक हाती लागलेला, ’ मेक वे फॉर टुमारोजरूर जरूर पाहण्यासारखाच आहे.

Sunday, December 19, 2010

कुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...

रविवारची संध्याकाळ कलत आलेली. बिल्डिंगच्या चौकात खेळणारी लहान मुले आता लवकरच आईच्या-बाबाच्या हाका येतीलच या होर्‍याने अजूनच जोर चढून ओरडाआरडा करत पकडापकडी खेळत होती. खिडकीत उभे राहून मी गुंगून त्यांचा खेळ पाहत होते. नकळत त्या मुलांच्यात ओरडत इकडून तिकडे पळणारा, खदखदून हसणारा शोमू मला दिसत होता. मी वर उभी आहे हे लक्षात येताच पळतापळता मान वर करत माझ्याकडे पाहून हात हालवून पुन्हा खेळात रममाण होणारा, क्रिकेट खेळताना स्वत: एकाच जागी उभा राहून ओरडून ओरडून मित्रांना धावडवणारा, तळातल्या आजींकडे जाऊन हक्काने पाणी व गोळ्या मागणारा.... कालचक्र मनाने भराभर उलटे फिरवायला सुरवात केलेली. तेवढ्यात बेल वाजली. तंद्री भंगली. खाली पाहिले तर खेळून दमलेली मुले- मुली बेंचवर, पायर्‍यापायर्‍यांवर कोंडाळे करून बसून गप्पा मारू लागलेली. कोण बरं आलंय असे म्हणतच मी दार उघडले तर एक दहाअकरा वर्षांची मुलगी चेहर्‍यावर गोड हसू व हातात एक वही घेऊन उभी.

"काय गं? तुला यशदा हवी आहे का? चुकून माझी बेल दाबलीस का? "

" नाही नाही. काकू, यश आणि मी बरोबरच वरती आलो. मी ना तुमच्याकडेच आलेय. "

" नाव काय गं तुझे? कोणाची तू? " मी तिला ओळखलेच नव्हते. गेली अकरा वर्षे मी सलग तिथे राहत नसल्याने बरेच नवीन चेहरे मला प्रत्येकवेळी दिसतच.

तिने तिचे नाव सांगितले. थोडे बोलून हातातली वही पुढे करून म्हणाली, " काकू, आमच्या शाळेतून ना अंधमुलांना मदत यासाठी डोनेशन जमा करायला सांगितलेय. जो जास्त डोनेशन जमवेल त्याला सर्टिफिकेट व दोन पुस्तके बक्षीस मिळणार आहेत. तुम्ही मदत कराल? "

" हो तर. दे बरं तुझी वही इकडे. " असे म्हणत मी तिच्याकडून वही घेतली. एका पानावर नीटपणे भाग पाडून सुवाच्य अक्षरात सुरवात केलेली होती. मी एक एक नाव वाचत होते. त्यापुढे दिलेले डोनेशनही वाचत होते. ५०/ १०० याशिवाय आकडे दिसतच नव्हते. क्वचित २५ चा आकडा दिसत होता. जवळ जवळ ३४-३५ नावे होती. तिच्याजवळच्या पर्समध्ये खूप पैसे जमलेले दिसत होते. माझे नाव लिहून पैसे तिच्या हातात ठेवले. ती खूश झाली. पैसे मोजून घेऊन तिने पर्समध्ये ठेवले व मला थँक्स म्हणून ती दोन पायर्‍या उतरली.

न राहवून मी तिला म्हटले, " सांभाळून जा गं. बरेच पैसे जमलेत बरं का तुझ्याकडे. सरळ घरीच जा आता. का येऊ तुला तुझ्या बिल्डिंगपाशी सोडायला. "
" नको काकू. मी जाईन नीट. " असे म्हणून उड्या मारतच ती खाली उतरली.

खिडकीतून तिला जाताना पाहत होते.... मन नकळत पुन्हा मागे गेले. माध्यमिक शाळेत नुकतेच पाऊल ठेवलेले. उगाचच कुठेतरी आपण मोठे झालोतची भावना. तिसरीतल्या भावाला बोटाशी धरून बसने एकटीनेच जाण्याची जबाबदारी. तसं पाहू गेल्या चौथी व पाचवीत फारसे काहीच बदललेले नसते. पण बालमनाचे गणित वेगळेच.

आमच्या लाडक्या देसाईबाई वह्यांचा भारा एका हाताने लीलया सांभाळत वर्गात शिरल्या. ती अशी वर्षे होती जीवनातील की, ' बाई - सर' ही दैवतं होती. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कित्येकदा मी आईलाही म्हणे, " हॆं, काय गं तुला इतकेही कसे माहीत नाही. आमच्या देसाईबाईनां या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत असते. " आई गालातल्या गालात हसे व म्हणे, " खरंच की. तुझ्या देसाईबाईंनी सांगितले की सूर्य उत्तरेला उगवतो तर तुम्ही मुले त्यालाही होच म्हणाल. " असे काहीच्याकाही आई बोलली ना की मला फार राग येई. नाकाचा शेंडा लाललाल होऊन जाई. " हो, हो. म्हणेनच जा मी. आणि बरं का, सूर्य उत्तरेलाच उगवलेला असेल बघ त्यादिवशी. " देसाईबाईंविषयी काहीही ऐकून घेण्याची माझी बिलकुल तयारीच नसे.

बाईंनी टेबलावर वह्यांचा भारा ठेवला. बाईंना कधीही, " अरे आता शांत बसा. लक्ष द्या इकडे... " वगैरे प्रकार करावेच लागत नसत. आम्ही सगळी मुले त्यांच्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असू. डोळे, कान,चित्त सारे एकवटलेले. बाईंनी बोलायला सुरवात केली, " दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपण तलासरीच्या आश्रमासाठी पैसे गोळा करणार आहोत बरं का. तुमचे तर हे पहिलेच वर्ष आहे. आता तुम्ही थोडेसे मोठे झाला आहात. तेव्हां थोडं जबाबदारीने - समंजसपणे वागायला शिकणार ना? " सगळ्यांचे एका सुरातले, " हो.. " " छान. मग आता ही मी कुपनांची पुस्तके आणलीत. प्रत्येकाने यातली दोन,तीन किंवा चार पुस्तके घ्या. जो जास्तीत जास्त कुपने खपवेल त्याला 'श्यामची आई' पुस्तक बक्षीस म्हणून दिले जाईल. आई बाबांना छळायचे नाही हं का मात्र. " सगळी मुले बाईंच्या भोवती जमली. त्यात मी ही होतेच. उत्साहाने चार कुपन पुस्तिका मी मागून घेतल्या. दहा-वीस-पंचवीस व एक रुपयाचे. तीन इंच बाय दोन इंच अशी छोटीशी पातळ कागदाची, गडद गुलाबी रंगाची कुपन पुस्तिका होती एका रुपयाची. पंचविसाचा रंग फिकट निळा, विसाचा फिकट हिरवा व दहा पैशाचे लिंबूटिंबू.

संध्याकाळी उत्साहाने चिवचिवत आईला पुस्तके दाखवली आणि मागोमाग कोणाकडून किती किती पैसे मी मिळवून आणेनची यादीही तिला ऐकवली. आईने शांतपणे सारे ऐकून घेऊन हातात एक छोटीशी पर्स देऊन गाल कुरवाळून जा म्हणाली. आमच्या चाळीत घाटीमामांच्या दोन खोल्या होत्या. त्यातली एक तर आमच्या शेजारीच होती. माझ्या मनाने कधीचाच हिशोबही करून टाकलेला. वीस व पंचवीस चे पुस्तक तर आजच संपून जाईल ही खात्रीच होती मुळी. माझे नेहमीच लाड करणारे काका-मामा-मावश्या, मी नुसते पुस्तक पुढे करायचा अवकाश लगेच ते कुपन फाडतील आणि माझ्या पर्समध्ये नाणी येऊन विसावतील. पण कसचे काय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातलीच गत झालेली. बालमनाला व्यवहारी गणित कुठले उमगायला. दोन तास फिरून फक्त तीनच कुपने फाडली गेली तीही दहा पैशाची. हिरमुसली होऊन दमून मी घरी आले. माझा चेहरा व डोळ्यातले पाणी पाहून आई काय झालेय ते समजून गेली. " अगं, दोन आठवडे आहेत अजून कुपने खपवायला. खपतील गं. लगेच डोळ्यात पाणी कशाला... " तिने समजूत काढली पण ती मनोमन जाणून होती, लेकीचे मन दुखणारच आहे.

पुढचे सारे दिवस शाळेतून आल्याआल्या मी मोहिमेवर पळे. रोज हिरमुसली होऊन परते. स्वप्नातही फक्त फेर धरून नाचणारी कुपने, चल पळ, असे उगाच खर्चायला पैसे कोणाकडे आहेत ’ असे म्हणत तोंड फिरवणारे काका किंवा कधीकधी मी एकटीनेच फक्त सगळी कुपने खपवल्यामुळे सगळ्या वर्गासमोर शाबासकी देणार्‍या देसाईबाई व असूयेने पाहणारी मुले इतकेच येत होते. दोन आठवडे कितीतरी उंबरे झिजवूनही दहा पैशाचे पूर्ण पुस्तक व विसाची तीन/पंचवीस चे फक्त एक कुपन मी खपवू शकले. सोमवार उजाडला. आज पुस्तके व मिळालेले पैसे परत करायचे होते. एक रुपयाचे एकही कुपन न खपल्याने व इतकुसे पैसे बाईंना द्यायचे.... मला रडूच कोसळले. तसे आईने हळूच एक रुपयाचे एक कुपन फाडले व पर्समध्ये रुपया ठेवला. इतका आनंद झाला मला. आईला मिठी मारून मी शाळेत गेले. बक्षीस मला मिळणे शक्य नव्हतेच. पुढे दरवर्षी हे कुपन प्रकरण माझा असाच जीव काढत राहिले. कित्येक वर्ष माझ्या स्वप्नांचा ताबा घेऊन माझा छळवादही केला त्यांनी. शोमू शाळेत गेल्यावर पुन्हा एकदा या कुपनांनी घरात प्रवेश केला. पण पोरगं मात्र याबाबतीत नशीबवान. गोडबोल्या लीलया पैसे जमवी. त्याचा तो खुशीने फुललेला चेहरा पाहून मी माझी ती भयावह स्वप्ने विसरून गेले. जणू त्याच्या रूपात मीच पर्स भरभरून पैसे गोळा करत होते.

आज तिच्या पर्समधले अडीच तीन हजार पाहून मी पुन्हा एकदा कुपनांचा मेळ घालू लागलेली. कुठे ती दहा पैशाची कुपने आणि कुठे हे शंभर रुपये.... माणसांची दानत वाढली आहे की मिळणारा पैसा?? का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे? यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे? जे काय असेल ते असो पण आजच्या मुलांना निदान दुष्ट स्वप्ने तरी पडत नसावीत....

Thursday, December 16, 2010

भगरीची खिचडी

यावेळी नवरात्र व दिवाळी मायदेशी अतिशय आनंदात झाले. नवरात्राचे नऊ दिवसांचे माझे उपास नाशिकला आईकडे असल्याने चविष्ट होऊन गेले. भगर मला तितकीशी आवडत नाही आणि सारखा साबुदाणा/बटाटा खाववत नाही. म्हणून या दोन्ही पदार्थांना फाटा दिला आणि मस्त भगरीची खिचडी केली. करायला एकदम सोपी व अजिबात घास न लागणारी. गरम किंवा गार कशीही खाल्लीत तरी छानच लागते व उपासाच्या पदार्थांनी होणारे पित्तही होत नाही.

भगरीची खिचडी

वाढणी : तीन माणसांना पोटभरीची

साहित्य :

एक वाटी भगर

अडीच वाट्या गरम पाणी

दोन मध्यम बटाटे उकडून

दोन टेबलस्पून तूप

चार हिरव्या मिरच्या

पेरभर आले

मूठभर कोथिंबीर

एक चमचा जिरे

मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट

स्वादानुसार मीठ ( आवडत असल्यास एक चमचा साखर )

एक लिंबू ( ऐच्छिक )

कृती :

कढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.

उकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाटा टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.


टीपा :

जितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.

साखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.

शेंगदाणे नसतील तर कूट घालावे.

यात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.

ओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे

हे ही ’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच। खाऊगल्लीतही असावे म्हणून....

Sunday, December 5, 2010

शेंगोळे


थंडीची चाहूल लागली की शेंगोळ्यांची हमखास आठवण येऊ लागते. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते. करायलाही अतिशय सोपे व पटकन होणारे. थोडे तिखटच करायचे व वरून साजूक तूप घालून गरम गरम मटकवायचे. अहाहा!!!

वाढणी : तीन माणसांना एका वेळेस पुरावेत.

साहित्य :

तीन वाट्या कुळथाचे पीठ
पाव वाटी गव्हाचे पीठ
पाव वाटी दाण्याचे कूट
पंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून
तिखट दोन चमचे ( सोसत असेल तर थोडे अजून घालावे )
हळद व हिंग अर्धा चमचा
चार वाट्या पाणी
नेहमीची फोडणी
चार चमचे तेल
स्वादानुसार मीठ
दोन चमचे तूप ( ऐच्छिक )
दोन चमचे कोथिंबीर

कृती :

परातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.

एक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.

टीपा :

कुळथाचे पीठ विकत आणल्यास बरेचदा कचकच येतेच. अशा पिठाचे बनवलेले शेंगोळे खाववत नाहीत. रसभंग होतो. म्हणून शक्यतो पीठ दळून आणावे.

तिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.

तूप जरूर घालावे. स्वाद व वास अप्रतिम.

शेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो ना तसे. मात्र शेंगोळ्यात आमटीसारखे पाणी नसावे.

’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच. खाऊगल्लीतही असावे म्हणून....

Wednesday, December 1, 2010

रिसीविंग एंड ला पुन्हा मीच...

ठाण्यात रिक्षावाल्यांची मक्तेदारी ' मनसे 'ने मोडून काढली. मुजोर रिक्षावाल्यांना जरब बसवली. ' मीटर जॅम ' आंदोलनाच्या बातम्यांनी ऑगस्ट महिन्याचे काही दिवस चांगलेच गाजवले. इतक्या दूरवर असून आणि रोजचा सध्यातरी या समस्येशी माझा संबंध नसला तरीही हे वाचून मी खूश झाले होते. निदान आता काही दिवस तरी सुखावह जातील. रिक्षावाले अडवणूक करणारच नाहीत, सुतासारखे सरळ चालतील, सौजन्य रिक्षा चालवतील वगैरे भ्रामक कल्पना रंगवल्या नसल्या तरी किमान काही नाठाळ दंडुकेशाहीला घाबरून तरी तेरड्याचा रंग तीन दिवस दाखवत नीट वागतील, इतकीच माफक अपेक्षा धरली होती. तशातच मायदेशाची वारी ठरली. अनेक प्रकारे आनंद झालेला त्यात मनसेनेही भर घातलेली. रिक्षा अशी हाक मारताच किंवा चक्क मला येताना पाहून रिक्षावाला आपसूक माझ्यापाशी येऊन थांबेल. मी स्थानापन्न झाल्यावर रिक्षा सुरू करून माझ्या गंतव्य स्थानाच्या घोषणेची शांतपणे वाट पाहून मी ती करताच हलकेच मीटर पाडून आनंदाने रिक्षाला गती देईल. माफक आनंद म्हटल्यावर किमान इतपत माफक स्वप्न पडणारच की...

दादरला होतो तोवर रिक्षाचा संबंध कधीच आला नाही. तुरळक अपवाद वगळता. मात्र लग्न होऊन घाटकोपरला आल्यापासून रिक्षा शिवाय माझे पाय हालेचनात. आख्खे दोन्ही बाजूचे दादर, शिवाजीपार्क, नायगाव पासून माटुंग्यापर्यंत न कुरकुरता चालणारे पाय अडेलतट्टूचे धोरण स्वीकारत जागच्याजागी उभेच राहू लागल्यावर रिक्षा ला पर्याय उरलाच नाही. मग हळूहळू ' मन ' निरनिराळी कारणे शोधून रिक्षाच्या गरजेचे हिरीरीने समर्थन करू लागले. चालल्याने बरेच फायदे होतात... व्यायाम होतो, पैसे वाचतात, मनाला व शरीरालाही ऐदीपणा जडत नाही, वगैरे वगैरे क्षीण प्रयत्नांना पद्धतशीर हाणून पाडण्यात येऊ लागले. मग मीही समंजसपणे स्वतःला रिक्षाच्या स्वाधीन करून टाकले. काही काही देणी कितीही प्रयत्न केला तरी चुकवता येतच नाहीत ती देऊनच चुकवावी लागतात. त्यातलेच हे एक असे समजून आनंदाने व नेमाने देऊ लागले.

अर्थात माझ्या प्रामाणिक व आनंदाने आदान प्रदान करण्याच्या वृत्तीला रोज लहान मोठे सुरुंग लागत व वकुबानुसार मनाला भगदाडे पडत. काही दोन-पाच मिनिटात बुजत तर काही छळ करत. काहींशी तिथल्यातिथे दोन हात करायला व समोरून आलेले लगेच परतफेड करायलाही मी शिकू लागले. काही वेळा तर काहीबाहीच तोंडातून निघून जाई. मग अजून छळवाद. चिडचिड... स्वतःवर, रिक्षावाल्यांच्या मुजोरपणावर आणि फायनली माझ्या त्यांच्यावरील अवलंबित्वावर... पण रोज मरे त्यावर किती रक्त जळवायचे?? शेवटी सहनशक्ती चा मंत्र अंगी भिनवत मी स्वतःला रिक्षा+अरेरावी ला सोपवून टाकले.

जसं पाणीपुरी म्हटली की भय्या दिसतो तसेच काहीसे रिक्षांचेही समीकरण आहे. सत्तर टक्के भय्ये आणि उरलेल्या तीस टक्क्यात मराठी, गुजराती व इतर अगदीच तुरळक. अजून मुंबईत तरी मी बांगलाबाबू, किरिस्ताव सायबा किंवा दक्षिणी अण्णा सर्रास रिक्षा हाकताना पाहिलेला आठवत नाही. आता या सत्तर टक्केवाल्यांची जवळपास पूर्णतः ( निदान सकृतदर्शनी तरी... मनातून त्यांची मुजोरी कधीच जाणार नाहीच.... ) आणि तीस टक्के वाल्यांची काही प्रमाणात तरी मनमानी, ' मनसे 'ने संपवली असेल हे गृहीत धरून मी ठाण्यात दुसऱ्याच दिवशी रिक्षाला आवाज दिला....

एरवी, " थांब रे बाबा " अशी डोळ्यात अगतिकता घेऊन हाक मारणारी मी, ' मनसेच्या राजशक्ती ' भरोसे चक्क आवाज देती झालेली ... (स्वतःचा तो खणखणीत आवाज ऐकून थोडीशी दचकलेही... उगाच आवाज ऐकन दुर्लक्षण करत निघून गेला म्हणजे.... ) पण तीर आयमीन गळ्यातून आवाज सुटलाच होता. रिक्षावाला गचकन थांबला. माझ्यापासून दहा पावलांवर. मानही वळवण्याचे कष्ट न घेता आरशातून माझ्याकडे पाहत होता. मनात पाल चुकचुकली. या पालीही फार प्रामाणिक बुवा. नेमके कुठे चुकचुकायचे हे बरोब्बर कळते यांना. चुकीच्या वेळी कधीच चुकचुकायच्या नाहीत. पावले अजूनही तितकीच अडेलतट्टू. वय वाढते तसे बरेच काही बदलत जाते असे कानांनी ऐकून आहे पण पावलांना ऐकायला येतच नाही, हा नवीन शोध त्याक्षणी सप्रमाण त्यांनी मला दाखवला. रिक्षावाला पलायनवादाचा मार्ग अनुसरेल या भीतीने पायांना दहाच पावले फक्त असे गोडीगुलाबीने पटवत मी भरभर रिक्षा गाठली आणि नेहमीचा, " तीन हात नाका चलोगे? " चा प्रश्नार्थक सूरच काय तो प्रश्नच बाद करून स्थानापन्न झाले.

" हूं... " एखादा मस्तवाल बैल कसा मातीला ढुसण्या मारत हुंहुं ... आवाज काढेल तसाच तो हूं ... कानावर आदळला. समोरच लावलेल्या मोठ्या आडव्या आरशात रिक्षावाल्याचे पानाचा तोबरा भरलेले मुखकमल दिसले आणि ' हुं ' चे रहस्य सुटले. तीन हात नाका... झटक्यात व ठसक्यात सांगून मी त्याच्यावरची नजर हटवून बाहेर पाहू लागले. मात्र कान व डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या पुढच्या पावित्र्याचा अंदाज घेत होतेच. " हुं... " पुन्हा हुं... आता काय? नाकाला चुण्या पाडत त्रासिक मुद्रेने मी त्याच्याकडे डायरेक्ट पाहिले तर..." हुं... उंहू... " सोबत हाताने, ' नाही जाणार - उतरा खाली ' चा इशारा...

सकाळचे फक्त दहा वाजलेत, म्हणजे ही जेवणाची वेळ नाही की चहाचीही वेळ नाही ( ऑफिशियली... बाकी चहाला खास काळ वेळ व स्थळही नसते. तो कुठल्याही क्षणी ' हो. कटिंग चालेल की ' मध्येच मोडतो शी मी +१ ). आत्ता गाडी रस्त्यावर आणली असेल त्यातून तीन हात नाका म्हणजे कुठले टिंबकटू ही नाही, तरीही हा चक्क उतरा म्हणतो. मनसेची भीती जाऊ दे पण त्याशिवायही याने मला नाही म्हणायचे कुठलेच कारण मला दिसत नव्हते. कुठे झक मारली आणि आवाज दिला असे मला होऊन गेले. पालींचा चुकचुकाट कल्ला करू लागला. निदान कारण तरी कळून घ्यावे म्हणून मी ( पोकळ ) उंच आवाजात त्याला विचारले, " क्यों, क्या हुआ? दस बजे हैं वो भी सुबह के और तुम ना बोलते हो... मीटर जॅम भूल गयें क्या? " नाईलाजाने तोबरा रिता करत रस्त्याला बापाचा माल असल्यागत रंगवून गर्रकन माझ्याकडे फिरत तिरसटपणे म्हणाला, " एकदा सांगून समजत नाही का? उतरा खाली. सकाळचे दहा का रात्रीचे दहा हा सवाल नसून माझ्या मर्जीचा सवाल आहे. आणि ते मीटर जॅम फक्त भय्यासाठी वापरायचे, माझ्याकडे नाही. कळलं का? " तो खरेच मला हाताला धरून उतरवायला कमी करणार नाही या भीतीने मी खेटर खाल्ल्यासारखी पटदिशी खाली उतरले. पुन्हा एकदा तुच्छतेने पाहत पीक टाकून तो निघून गेला. बापुडवाणी मी आणि बापुडवाणा रस्ता पाहातच राहिलो.

खरेच का ते मीटर जॅम फक्त भय्यासाठीच....? का फक्त त्या दोन तीन दिवसांपुरतेच असेल त्यांच्यासाठीही??? आता हे जाणून घ्यायला पुन्हा एकदा हात दाखवून अवलक्षण करणे भागच होते. ती वेळही पावलांच्या कृपेने लगेचच आली.

यावेळी मात्र ' कोरा ' आवाज काढत मी रिक्षाला ' हाक ' दिली. रिक्षा अगदी समोरच थांबली. पावले खूश. घाईघाईने बसायला उतावीळ झालेली. आधीच्या अनुभवाने मी जडशीळ उभी. " तीन हात नाका चलोगे ... ?? " " बहनजी ऐसे भी चलनाही हैं तो क्यों पुछते हों? बैठिये, जहा कहोगी लेके जाउंगा " मनाच्या आधी पावलांनी नोंद घेतली आणि मी रिक्षात बसलेही. रिक्षावाला भय्याच होता हे उघड आहेच. विचार केला जरा छेडावे... अंदाज येईल याच्या - यांच्या मनात काय चाललेय याचा.

" आपने ना नही बोला, अच्छा लगा। " मी विषयाला तोंड फोडले.
" मार खानेसे तो बच जाउंगा ना... "
" मतलब अगर डर नही होता तो ' ना ' बोलते क्या? डर तो वक्त के साथ कम होता रहेगा और जो बात मनसे नही दंडुके की वजह होती है उसका मतलब और आयू भी कम ही होती हैं। ना बोलना गलत हैं ऐसा आपको नही लगता? "
" बहनजी, मैं मानता हूं की रिक्षावालोंकी मनमानी बहोत सरचढ चुकी हैं। पर क्या सिर्फ हमही लोग मनमानी करते है? नही ना? फिर हमको ही दंडुका काहे मारत हो?? ' ठोकरे ' सिर्फ ठुकाई करना जानत हैं पर ये जानने की उसे जरुरत ना हैं की उसके अपने भी कैसे कैसे माज दिखाते हैं| उसे भी कभी देखे तो पता चलेगा... ठुकाई जात देखके नही कारण और बर्ताव देखके होनी जरुरी हैं, क्यों? "

दहा मिनिटांपूर्वीच खाल्लेले खेटर अजूनही चेहऱ्यावर रेंगाळत होतेच तोच याचा हा प्रश्न आणि तळतळ. रिसीविंग एंड ला पुन्हा मीच... आपल्यांची बाजू घ्यायची प्रबळ इच्छा मनात असूनही.....

Thursday, November 25, 2010

चिवट....

चाळींचे स्वतःचे खास रसायन असते. आताशा ' असायचे ' असेच म्हणावे लागेल. इतक्या अशक्य वेगाने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी सदनिका पाहून माझी मातीला नमन - णारी, चुंबणारी पावले दचकू लागतात. तिने डोळे वटारून माझ्याकडे पाहून म्हटले तर, " बेमुर्वत... तेरी इतनी मजाल की मेरे सोने देह पे तेरे इतने मलिन पैर.... तौबा... तौबा!! कोई बचाए मुझे इन मन, प्यार, स्नेह के पुजारीओंसे. अभी तक माझी चाळ, माझी माणसे, वाटीतल्या भाजीची देवघेव, काकू पटकन साखर द्या हो तिकडे गॅसवर चहा उकळू लागलाय.... ( बेवकूफ, साखर नाही ना घरात मग बंद कर की गॅस. काकूंनी काय ठेका घेतलांय. पण नाही. मिजास देखो लडकी की.... जैसे उसका हक बनता हैं काकू की शक्कर पे... और काकू के क्या कहने? वो अटकी पडी हैं पडोस धर्म, सख्खे शेजारी, सलोखा... और न जानें क्या क्या, कहानी में भी शोभा न दे ऐसें पन्नों में.... ) मध्येच अटकून पडलीत. शेवटी काय, हे मध्यमवर्गीय.... तेही गिरणगावातले, काळाबरोबर कितीही उंच उंच उड्या मारू देत, फिरून भावना, प्रेम यातच मरणार. एकेका फरशीच्या तुकड्याची किंमत मोजायची सोडून, ' किती गोत जोडलं ' ची नाणी रोज रात्री मनाच्या गाडग्यात छनछनवत उकाड्यात निवांत निजणार. "

अय्याSSS.... तरीच म्हटले, कितीही सोन्याने मढलीस तरी शेवटी निवांत निजण्यावरच आलीस की. आता कसं मला मोकळं मोकळं वाटू लागलं. अगं कितीही तू सोन्यात तोललीस ना तरीही अजून तुझ्या तळाशी धुगधुगी आहे. आणि आठवणींच्या डोहाची खोली, आकाशाला भिडणारे तुझे डोलारे मुळीच मापू शकत नाहीत. त्यावर आजही समस्त मध्यमवर्गीय गिरणगावाचीच मालकी आहे बरं.

तर अशा या आमच्या चाळीचेही स्वतःचे खास नियम, चौकटी होत्याच. आपापल्या परीने जो तो त्यात भर टाकी किंवा त्यांना वकुबानुसार छेद देई. आपसात कितीही बंडाळी माजली तरी बाहेरच्या आक्रमणांना एकजूटीने सामोरे जाऊन समस्त चाळजनांची शान आणि मानही सारे सांभाळून असत. किंबहुना घरच्यांच्या मानापेक्षाही चाळीच्या ' आन-बान-शान ' वर कुठलीही आंच येणार नाही याची खास दक्षता घेतली जाई. खरं तर, या चाळ संस्कृतीने जगण्याच्या बाराखडीत किती काय काय शिकवलेय याचा उहापोहही आताशा करोडोवावी आवृत्ती च्या पलीकडे गेलाय. फिरून नव्याने सांगण्यासारखे खरेच काही उरलेय का? असा प्रश्न पडावा.... तरीही प्रत्येक अनुभव त्या त्या वेळी व जेव्हां जेव्हां डोहातून अचानक ढवळला जाऊन पृष्ठावर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवू लागतो तेव्हां पुन्हा एकदा त्याचा जुनाच पैलू नव्याने दाखवतो. कधी आधार देतो तर कधी उभारी.... कधी समजूत काढतो तर कधी मायेची उब देतो. तर कधी जगण्याची प्रक्रिया उकलून दाखवतो. गर्भात रुजण्यापासूनच शिकलेली चिवटता पुढे आयुष्यभरही अंगी बाणव गं.... या जगात जगण्यासाठी नितांत गरजेची आहे ती . तिचे अस्तित्व मनाने नाकारले की तू संपलीस. अगदी लहानपणीच या एका प्रसंगाने न कळत्या वयातही नकळत खोलवर बिंबलेली चिवटता, आज पुन्हा एकवार पृष्ठावर आली आहे...

आमचे घर तिसऱ्या मजल्यावर रोड फेसिंग. चाळीत आतल्या बाजूची गॅलरी ' राजरोस सार्वजनिक ' असतेच. पण प्रत्येक खोलीला असलेली खाजगी गॅलरीही सार्वजनिकच असते. फक्त त्या सार्वजनिकतेला एक खाजगी पदर असतो. या वरही एकदा लिहायलाच हवेय. पण आज नको. आज फक्त बेसिकवरच भर. तर सकाळचे नऊसाडेनऊ होत होते. रविवार होता. वार कुठलाही असो पाणी तर लागतेच ना... त्यामुळे पहाटेपासून तीन मजले उतरून पहिल्या मजल्यावरील त्या भल्या लोकांच्या ( ज्यांनी उदारपणे त्यांची घरे आमच्यासाठी कायमची मुक्तप्रवेशात ठेवलेली ) साखरझोपा न मोडतील याची काळजी घेत आम्ही सारे मांजरीच्या पावलांनी पाणी भरत होतो. आठाच्या सुमारास रक्मा कोळिणीने चिंबोऱ्यांनी भरलेली पाटी दाणकन आपटून मोठ्ठा गदारोळ उडवून दिलेला. त्या वाट फुटेल तिथे पळू पाहणाऱ्या चिंबोऱ्यांची आणि रक्मेची झटापट ही माझी-भावाची हक्काची करमणूकही पार पडली होती. आईने पोहे बश्यांमधून काढायला सुरवात केली होतीच आणि अचानक धाड धाड आवाज येऊ लागला. आईने हातातले पातेले खाली ठेवत म्हटले, " अरे कोणीतरी गॅलरीचे दार बंद करा. दगडफेक सुरू झाली वाटते. " भाऊ पळतच गेला आणि दाराला कडी लावूनही टाकली. वाचताना नवल वाटेल की इतका थंडपणा... पण हा दगडफेकीचा प्रकार अक्षरशः आठवड्यातून एकदा कधीकधी तर दोनतीनदा ही चाले. अनेकदा कारणेही कळत नसत. फक्त गॅलरीत जमलेल्या विटा दगडांच्या ढिगावरून आम्ही मुले केसरबाग की नायगांवची पोरे अशी गणिते मांडत हिरीहिरीने चर्चा करायचो.

थोड्यावेळाने दगडफेक जशी अचानक सुरू झाली तशीच एकाएकी थांबलीही. पुढची दहा मिनिटे शत्रुपक्षाचा अंदाज घेण्यात गेली. उगाच एखादे ढेकूळ धडधड वाढवण्याच्या प्रयत्नात ढिसाळपणा दाखवत फुटून गेले. वंद झालेली कवाडे उघडून आत्तापर्यंत दुबकून घरात बसलेली मंडळी माना काढून डोकावू लागली. तोच प्रवेशद्वारासमोर गदारोळ माजला. " अरे, पकड पकड. सोडू नका साल्याला. बरा सापडलाय. मार मार... " कोण कोणाला पकडतोय आणि कोण तावडीतून सुटतोय हे कळेतो, तात्पुरते एकच भासणारे दोन्ही पक्ष ' चाळ अ व चाळ ब ' च्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावरील मारुतीच्या देवापुढे पोचले होते. आमच्या चाळीतल्या पोरांच्या तावडीत शत्रुपक्षातला एक शेलका मोहरा अचानकपणे सापडला होता. अपने गलीमें कुत्ता भी... इथे तर अख्ख्या ' अ आणि ब ची समस्त जनता ' पाहत असल्याने अक्षरशः शेंबड्या पोरानेही यावे आणि टपलीत मारून जावेची गत झालेली. बरं तो शत्रूही काही लेचापेचा नव्हता, इतका मार खाऊनही जमेल तसे आणि मिळेल त्याला हाणत होता. अचानक दोघातिघांनी त्याला धरला आणि तथाकथित आमच्या चाळीच्या स्वघोषित म्होरक्याने मारुतीच्या पुढचा दिवा-नारळ ठेवण्याचा दगड उचलला आणि घातला त्याच्या डोक्यात. आईने तक्षणी आम्हा दोघांच्या पाठीत रट्टा घालत आम्हाला मागे खेचले तरीही भळकन उडालेली चिळकांडी अजूनही दिसतेच. तोच पोलिसांच्या सायरनचा दूरून आवाज येऊ लागला. पाहता पाहता कानठळ्या बसतील इतका जवळ आला. आमची मुंडकी धडधडत्या काळजाने पुन्हा डोकावून पाहू लागली. तोवर डोक्यात व हातपायांवर चार पाच दगड घेऊन, मारुतीला रक्ताचा अभिषेक घालत शत्रुपक्ष अर्धमेला होऊन निपचिप पडला होता. " मेला मेला वाटत... हो ना... अजिबात हालचाल करीतच नाहीये. खरंच मेला की काय. आता पोलिसस्टेशन, साक्षीपुरावे, किती सजा होईल हो... आणि आता पुढचा हल्ला आज रात्रीच होईल बरं का... तयारीत राहा. आज सोडा वॉटर बॉटल्सचा मारा नक्कीच होणार. काचा गोळा करायची तयारी ठेवा... वगैरे महिलावर्गाची जोरदार चर्चा - ठोकताळे सुरू झाले. "

पोलिस आले. दोघे तिघे मूर्ख पित्ते पळून न जाता आपल्या किडूकमिडूक छात्या फुगवत पोलिसांसमोरही त्याच्या निपचिप देहावर उगाचच धावून जात होते. पोलिस अगदी जवळ उभे आहेत हे दिसताच तो निपचिप पडलेला देह अचानक उसळला आणि तोच दगड उचलून एका मच्छरावर धावला. पोलोसही या अचानक हल्ल्याने बावचळले. भानावर येत दोघां हवालदारांनी त्याला धरला आणि गाडीकडे नेऊ लागले तर तो जाता जाताही त्यांच्या तावडीतून सुटत शिव्यांची लाखोली अन शब्दशः लाथाळी करत होता. मी अवाक. ज्या देहात दोन मिनिटांपूर्वी धुगधुगीही नव्हती, वडाचा संपूर्ण पार, भोवतालचा फुटपाथ ज्याच्या रक्ताने माखलेला आहे अशा मरणासन्न देहात इतकी ताकद आली कुठून??? जीव किती चिवट असतो याचे जिवंत प्रात्यक्षिकच होते ते. चार दिवसात मोठ्या ताठ्याने आमच्या बसस्टॉपवर उभा त्याला पाहिला अन माझेच पाय लटपटले. तो मात्र मस्तीत हसत बाता करीत होता.

किती सहजी शिकवून गेला, जगण्याच्या लढाईचा चिवट पाठ....

Friday, November 5, 2010

मधुबनी

मधुबनी

वर्षभर घोकत होते, मायदेशी जायला मिळाले तर, " मधुबनी, वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी " सारख्या छोट्यामोठ्या गोष्टी शिकेन. " चाह हैं तो राह मिलती ही हैं ", च्या उक्ती सारखे गेल्या आठवड्यात किराणामालाच्या दुकानात अचानक आईबरोबर गेले. दुकानाच्या भिंतीवर चिकटवलेली क्लासची जाहिरात दिसली. लगेच मी त्या नंबरवर फोन केला आणि दुस‍र्य़ा दिवसापासून एकंदरीत चारदिवसाचा ( रोजचे तीन तास ) क्लास सुरू झाला.

माझे सहअध्यायी वय वर्षे तीन ते दहा या वयोगटातले. जवळपास पंधरा अठरा मुलांचा मस्त दंगा होता. काही मुलांनी त्यांच्या वयाच्या मानाने खूपच छान, सफाईदार काम केले. त्यांचे गोड गोड बोलणे, टीचर टीचर करत मध्ये मध्ये लुडबुडणे. मधूनच चालणा‍र्‍या मारामार्‍या.... थोडासा वेळ गेला की लगेच, " मॅम भूख लगी है। टिफीन खाऊं? " मग तो खाताना सांडलवंड, चिडवाचिडवी.... वेळ कसा गेला हेच कळत नसे. पेपर बॅग्ज, पाकिटे, हँडमेड पेपर, पणत्या रंगवणे, क्राफ्ट या साऱ्या गोष्टी मुलांनी आवडीने केल्या.

त्या भाऊगर्दीतही मी माझ्या परीने काही शिकण्याचा प्रयत्न केला. मधुबनीतील एक छोटेसे चित्र वर दिले आहे. अतिशय सुंदर कला आहे ही परंतु फार किचकट काम. दोन दिवसात हे एक छोटेसे चित्र मी पुरे केले. मनसुबे तर मोठे मोठे रचलेत पाहू चिकाटी कुठवर साथ देतेय... :) ही कला शिकता आल्याचे समाधान तरी नक्कीच मिळाले.
( पहिलाच प्रयत्न असल्याने अचूक व नेमकी सफाई नाही अजून हाताला... )

Thursday, November 4, 2010

हे सुरांनो, चंद्र व्हा...

शुभ दीपावली!!!

हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

या शब्दांमधली आर्तता काळजाचा ठाव घेणारीच. डोळे तुडुंब भरलेले, श्वास कोंडलेला, गळा दाटलेला तरीही मन बोलण्यासाठी स्वरांची वाट शोधणारे.... काहीसे जीवघेणे, तर कुठे तरल, भावविवश. शब्द कुसुमाग्रजांचे. या शब्दातली किमया जितकी मनाचा कब्जा घेते तितकेच अभिषेकीबुवांचे स्वर वेड लावतात. या दोहोंच्या मिलाफाची मोहिनी जबरदस्तच. स्वत:ला सुपूर्त करणेच काय ते हाती उरते.

आज दिवाळीच्या रात्री मी एकटीच झोपाळ्यावर बसलेय. दोन वाजत आलेत. दिवसभराच्या गडबड-गोंधळाने दमून व पहाटे लवकर उठायचे आहे म्हणून सारे कसे शांत झोपी गेलेत. रोज भेसूर ओरडणारी कुत्रीही कुठेशी गायब झालीत. थोड्यावेळांपूर्वी अचानक आलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे हवेत किंचितसा कंप आहे. सकाळपासूनच हुरहूर लागली आहे. दिवसभर घरात वर्दळ सुरू असल्याने पराकाष्ठेने थोपवून धरलेले मन आणि अश्रू बांध तोडून मुक्त ओघळत आहेत. त्यांना अडवण्याचा वेडा प्रयत्न मी कधीचाच सोडून दिला आहे. दाटलेला भावनांचा कल्लोळ सावरता सावरता, " हे सुरांनो, चंद्र व्हा " कानात, मनात निरंतर वाजत आहे. मनात वाजणार्‍या या स्वररूपी चांदण्यांच्या कोषात, व्याकुळतेत स्वत:ला झोकून दिलंय.... झोपाळ्याच्या एरवी काहीश्या कर्कश वाजणार्‍या कड्याही या आर्त, हळव्या स्वरांना न दुखावता त्यांच्यात विलीन होऊ पाहत आहेत.

आज मन निवेतो मी, झोपाळा व अभिषेकींचे सूर.... जणू सांगत आहेत, " मोकळी होऊन जा ग बयो, मोकळी होऊन जा.... "

Saturday, October 23, 2010

मी मायदेशी...१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.

तिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ट्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, "अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण " असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.

चोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्‍या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.

भरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का? प्लीज प्लीज...

तिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर छान लिहिले असेल. त्यामुळे भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....Wednesday, September 15, 2010

तो....

काठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता
एका मागून एक.... यंत्रवत,
हात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,
पाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....

आजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,
तडफडणार्‍या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,
एकाकी.... घुसमटलेला

ऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की
रस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला रोज अडवते
सावली देण्याचा त्याचा तो अट्टाहास, त्याचा जीव गुदमरून टाकते

मुसळधार पावसात भिजणारे ते गरीबाचे पोर
कोरड्या डोळ्यांनी लोकांच्या छत्र्या निरखत होते
त्याला इतके निर्विकार पाहून त्याचे डोळे का भरत होते....

आशेचा किरण ही नसलेल्या मार्गावर तो पुढे पुढे निघालाय खरा
शाश्वत सोडून पळत्याच्या मागे....
कशाची ही अगम्य ओढ? का नुसतीच फरफट?
उत्तर नाही....
तरीही, त्याचं नशीब त्याच्यामागे धापा टाकत येतच राहिले,
त्या बिचार्‍याला पर्यायच नाही.....

ही कुठली ’ भूक? ’
’ अन्न ’ हा केवळ एक शब्द आहे की, अन्न आहे आनंद
का कोण जाणे आजकाल वारंवार हा प्रश्न त्याच्या ’ भुकेला ’ तो विचारत असतो
ती फक्त हसते, तिचे ते हसणे त्याला उगीचच कुत्सित भासते....

जेव्हां उमजले त्याला की, ’ तो ’ आरसा ही आहे
स्वत:पासूनच चेहरा लपवत, स्वत:लाच चुकवत तो कुठेसा पळतो आहे
वेडाच नाहीतर काय....
काळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...

कुठले भविष्य, कोण दिशेला...
पलीकडे मायबापाचा श्वास कोंडला
अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला
मायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला

आता व्यर्थ आहे हिशेब सारा....
सांजवेळी फुटे प्राणांत गलबला
उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,

संपूर्ण रिता......

Saturday, September 11, 2010

गणपती बाप्पा मोरया ! ! !


गणपती बाप्पा मोरया ॥

Friday, September 10, 2010

कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

त्यादिवशी नेहमीसारखीच धावतपळत ट्रेन पकडली. लेडीज स्पेशल असल्यामुळे सगळे डबे आपलेच म्हणून मिळाली. अन्यथा दहा मिनिटांची फोडणी होतीच. चला आजच्या दिवसाची सुरवात छान झाली या आनंदात मी डब्यात वळले आणि खिडकीजवळची एकजण खुणावू लागली. ये इकडे. मी लगेच तिच्या दिशेने सरकले. मनात मांडे खात होतेच. घाटकोपरला उतरेल तरी किती छान होईल. अगदीच नाही नाही तर दादर नक्कीच, तरीही चालेलच की. तोच ती उठून उभी राहिली. मी एकदम चकित. तिने नजरेनेच खुणावले, " बस की आता. " मी लगेच स्वत:ला खिडकीशी झोकून दिले. तिची पर्स मांडीवर घ्यावी म्हणून तिच्याकडे पाहत पर्सला हात लावला. तशी ती म्हणाली, " अगं मी उतरतेय मुलूंडला. तू बस आरामात. " असे म्हणून ती दाराजवळ सरकली. चक्क विंडो सीट, तीही अशी अचानक लॉटरी लागल्यासारखी. पावसाचे दिवस होते. मधूनच हलकी हलकी सर येई. थोडासा शिडकावा अंगावर करत हुंदडून जाई. त्या तुषारांशी मग वार्‍याची झुळूक लगट करू लागे. थोडेसे कुंद तरीही आल्हाददायक वातावरण पसरले होते. नजर हळूहळू डब्यात फिरू लागली.

सगळ्या बायकाच असल्याने लेडीज स्पेशलमध्ये नेहमीच एक मोकळेपणा, क्वचित थोडा बिनधास्तपणाही पाहायला मिळे. आपल्याकडे कोणी रोखून पाहत असेल अशी पुसटशी शंकाही जेव्हां मनात डोकावत नाही तेव्हा आपण इतके सहज वागत असतो, त्याचा प्रत्यय हमखास लेडीज स्पेशलमध्ये पाहावयास मिळतो. मला समांतरच परंतु विरुद्ध बाजूस चौघींचा ग्रुप बसला होता. सगळ्या पस्तीस-चाळिशीच्या असाव्यात. डब्यात इतका चिवचिवाट, खिदळणे, टिकल्या-पिनांच्या डब्यांची देवाणघेवाण, मधूनच कोणीतरी खास करून आणलेला ढोकळा, इडली चटणी चा समाचार तर कोणाची क्रोशांची लढाई. या सार्‍या कोलाहलात त्या चौघींची स्तब्धता फार जाणवू लागली. काहीतरी बिनसले होते. थोडे निरखून पाहिल्यावर जाणवले, प्रत्येक जण एकमेकीची नजर चुकवतोय. आणि त्यातही खास करून एकीची तर फारच. आता मला अस्वस्थ वाटू लागले. इतकी मस्त खिडकी मिळालेली. तशात किंचितश्या गारव्याने अंगावर छान शिराशिरी उठत होती. खयालोंमे जायचे सोडून नेमके यांच्याकडे का लक्ष गेले म्हणून मी स्वत:लाच कोसायला सुरवात केली. त्यांचे काय बिनसलेय हे मी त्यांना जाऊन विचारू शकत नव्हते आणि आता हा विचार किती काळ ( ??? ) माझा पिच्छा पुरवेल या विचारानेच मी चिडचिडू लागले.

तोच नेमकी ' ती ' उठली. विक्रोळीला उतरायचे असावे तिला. उरलेल्या तिघींना तिने टाटाही केला नाही की त्यांनीही निरोपाची कुठलीच चिन्हे दाखवली नाहीत. डब्यातून मधल्या पॅसेजच्या गर्दीत मिसळताना अचानक ती म्हणाली, " नेमके काय सांगायचे असेल गं त्याला? तो गेला नं तेव्हापासून हा विचार मला सोडतच नाही. चांगलं दारात उभा राहून मला सांगू पाहत होता, तर मी चक्क दुर्लक्ष करून उद्याच्या ऑफिसची तयारी करायला घेतली. ते पाहून तो हसला आणि म्हणाला, " बरं, बरं. तू आवर, मी आलोच पान खाऊन. मग सांगतो गंमत. " आणि गेला तो गेलाच. जर मी ऐकून घेतले असते तर कदाचित आलेली ’ ती ’ वेळ टळली असती. कदाचित ’ तो ’ खालीच गेला नसता. आता सारेच संपलेय. तो गेलाय, त्याची अव्याहत बडबड शांत झाली आहे. काळ जातोय तसतसे सगळे रुळतील, मार्गस्थ होतील. सत्य स्वीकारून, पचवून पुन्हा उभारी धरतील. मीही धरेनच पण प्रश्न अनुत्तरितच राहील. काय करू गं या प्रश्नाचे आता? " त्या तिघीचे डोळे काठोकाठ भरलेले. आम्हा ऐकणार्‍यांचेही. डब्यात एक चमत्कारिक शांतता पसरली. दोन क्षणातच स्टेशन आले, ती उतरून गेली. नवी फौज ताज्या दमाने आत घुसली, भरभर स्थिरावली. आपापल्या मैत्रिणी शोधून हल्लागुल्ला सुरू झाला.

वाटले, डब्यानेही नकळत एक सुस्कारा सोडला असावा. त्या तिघी व आम्ही आजूबाजूच्या काही जणींनी आवंढा गिळला, डोळ्यातले कढ डोळ्यातच जिरवले. सामान्य अवस्थेत येण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू लागलो. मन मात्र तिच्या प्रश्नात अडकून पडले. खरेच अनेकदा आपणही असे वागतो. समोरचा उत्साहाने, आवेगात काहीतरी सांगायला येतो आणि केवळ कामे समोर दिसतात म्हणून आपण त्याचा हिरमोड करतो. कधी टीव्हीवर फालतू काही चालू असते त्यात अडकून ( खरे तर अनेकदा हे डेली सोपच सुरू असतात. कोणीतरी कोणाचा कपाटाने छळ करत असते नाहीतर कोणीतरी भेकत असते.... तद्दन फालतूपणा समजत असूनही चिडचिडून आपण टक लावून पाहत बसतो. ) मुलं काही सांगायला आली/ नवरा/बायको महत्त्वाचं बोलत असली तरी आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्यावर अकारण खेकसतो. तो विषय तिथेच थांबतो. कधीकधी असा कायमचाच थांबतो.

थोडेसे आत्मपरीक्षण केले तर जाणवते, की मी स्वत:च अश्या अनेक गोष्टी थांबवून - थोपवून ठेवल्यात. मीच काय आपण सगळेच करतो आहोत हे. असेच ऑफिसमधले ओळखीचे एक जण. मी लागले तेव्हा असतील पन्नाशीचे. मुलांची शिक्षणं होत होती. मुलीचे लग्न तीन चार वर्षात करायचे होते. सरकारी पगार तो कितीसा, त्यात सगळी मोट बांधायचा उरापोटी प्रयत्न. कटिंग घेताघेता एकदा म्हणाले, " श्री, अगं तुला सांगतो. फार फार इच्छा आहे मला एकदातरी सगळ्यांना घेऊन काश्मीरला जायची. आणि हसू नकोस बरं का पण डोक्यात एक विषय कधीपासून घुमतोय. जरा फुरसत मिळाली ना की कादंबरी लिहिणार आहे. बघशीलच तू. एकदम पर्फेक्ट प्लॉट आहे. सगळी जुळणी झालेली आहे आता फक्त झरझर कागदावर उतरवायचे. " हे लिहितेय मी आत्ता..... अंगावर शहारा आला. डोळ्यासमोर ते जसेच्यातसे आजही दिसतात मला. हे सांगताना त्यांचे लकाकणारे डोळे, भारलेला चेहरा, त्या प्लॉटमधली त्यांची गुंतवणूक ..... सारे सारे दिसतेय.

पगाराच्या दिवसाची वाट पाहणे आणि मिळाल्यावर तीस दिवसांच्या तक्त्यावर मेटाकुटीने त्याचा ताळमेळ जुळवणे यातच जीव हलका होऊ लागला. दुखणी-बहाणी, मुलांच्या मागण्या रोजचे नवीन काही होतच होते. तरीही मधूनमधून काश्मीर आणि प्लॉट यांना संजीवनी मिळत होती. एक दिवस सकाळी नेहमी माझ्या आधी येणारे ' ते ' दिसले नाहीत. दुपार झाली फोनही आला नाही. साहेबांनाही थोडे चमत्कारिक वाटले. असे कधी झालेच नव्हते. दिवस कलला, घरी जायचे वेध लागले आणि फोन वाजला...... आमचे ऑफिस तिथेच थिजले. महिन्याचा तक्ता जुळवताना आयुष्याचा आलेख ढासळला होता. एक लेखक जन्माला येण्याआधीच संपला. आजही माझे विचार त्या प्लॉटशी येऊन अडकतात. काय असेल त्यांच्या मनात?

अनेकवेळा क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीही आपण उगाचच पुढे ढकलत राहतो. ज्या सहज शक्य असतात पण वेळ कमी या एकमेव सबबीखाली छोटेछोटे संवाद, आनंद, भेटी, एखादी वस्तू राहून जाते अन मग ती राहूनच जाते. वेळेची किंमत कधी समजेल, वेळ निघून गेल्यावर.... मग तेव्हा ती समजून तरी काय फायदा. आपण सगळे हे टोक समजूनही थोडीशी सवड मिळाली की करूच या आशेवर-दिलाशावर स्वत:ला मागे टाकत जातो. सवड काही मिळत नाही, ती कधी मिळणारही नसते कारण ती काढावी लागते. हे सत्य समजून अमलात येण्या आधीच अवचित बोलावणेच येते. न टाळता येणारे बोलावणे.

अनेकदा समाज, रुढी, कर्तव्ये, लोकं काय म्हणतील हे आपल्या मनानेच उभे केलेले बागुलवु्वांचे दोर आपल्याला नाचवत असतात. कळूनसवरून आपण त्यांच्या तालावर घुसमटलेल्या मनाने नाचत राहतो. रात्री गादीवर पडलो की या छोट्या छोट्या इच्छाआकांक्षाची भूत छतावर डोकी वर काढतात. पाहता पाहता छत भरून भिंतीवर सरकतात. अन आनंदचा डायलॉग सारखा समोर येत राहतो, " ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहांपनाह, उसे न आप बदल सकते हैं और न मैं, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है, कब, कौन, कैसे उठेगा कोई नहीं बता सकता... " खरेच आपण सगळेच केवळ बाहुल्या आहोत. तो शक्तिशाली बाहुल्यांमध्ये प्राण फुंकतो अन माप भरले की क्षणात दोर कापून टाकतो. आपण म्हणतो मी हे केलं मी ते केलं, मी अमुक करेन - तमुक करेन.... खरंच का? कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

Saturday, September 4, 2010

कच्छी दाबेली

" खूप दिवस झाले कच्छी दाबेली कर गं ", नचिकेतची फर्माइश सारखी सुरू होती. मे मध्ये शोमू आला होता तेव्हां केली होती. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ताव मारला. दुसर्‍या दिवशी सहजच अपर्णाला फोन केला आणि बोलता बोलता तिला सांगितले. आधी ती वैतागली ( प्रेमाने ), नुसते सांगून जळव तू मला. खिलवणार कधी? मग म्हणाली, " अगं निदान कृती तरी टाक म्हणजे मी करेन ना. " पण आदल्या दिवशी शोमूने आधीच जाहीर केलेले, दाबेली झाल्या झाल्या लगेच आम्हाला खायला दे. नुसत्या वासानेच जठराग्नी खवळला आहे. तुझे फोटोबिटो काय ते पुढच्या वेळी करशील तेव्हां काढ. ती पुढची वेळ यायला तीन महीने जावे लागल्याने अपर्णाची इच्छा आज पुरी करतेय. ( सॉरी ) अर्थात हे फोटो पाहून ती जाम भडकणार आहेच तेव्हां आधीच माफीनामा लिहून ठेवलाय गं. जवळ असतीस तर नक्कीच खिलवली असती.

वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही )

साहित्य :

चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून

एक मोठा कांदा बारीक चिरून

एका मोठ्या डाळिंबाचे दाणे
( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी.
तीही नसतील तर मनुका घ्याव्यात. )

चिंचगुळाची चटणी एक वाटी

मूठभर कोथिंबीर चिरून

बारीक शेव वरून भुरभुरायला

चवीनुसार मीठ

पाच चमचे कच्छी दाबेली मसाला

चार/पाच चमचे बटर/तूप ( वितळवलेले )

मसाला शेंगदाणे एक मोठी वाटी भरून

दोन वाट्या पाणी

आठ पाव ( आपल्याकडचे बेकरीतले पाव असतील तर अजूनच मस्त )
( किमान आठ हवेतच. शक्यतो दोन लाद्या आणाव्यात. )कृती:

चिंचगुळाची चटणी :

दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

मसाला शेंगदाणे करताना......

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.
मसाला बनविताना :

उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून/किसून घ्यावे. एका पसरट पातेल्यात तीन चमचे तूप टाकावे. गरम झाले की लगेच कुस्करलेले बटाटे, मीठ व दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवावे. एक वाफ आली की कच्छी दाबेली मसाला घालून हालवावे. मिश्रण कोरडे होते आहे असे वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे. पुन्हा पाच मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे.

सगळे साहित्य तयार झाल्यानंतर पाव मधून कापून त्याचे दोन भाग करावेत. तव्यावर दोन चमचे बटर टाकून सगळे पाव खालून वरून शेकून घ्यावेत. नंतर लगेचच एकेका पावाच्या तळच्या भागावर बटाट्याचा मसाला पसरावा. ( दोन चमचे तरी हवाच. आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घ्यावे ) त्यावर मसाला शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर व शेव घालावी. पावाच्या वरच्या भागावरही हलकासा बटाट्याच्या मसाल्याचा थर लावून चिंचगुळाची चटणी घालून तळच्या भागावर किंचितसे दाबून ठेवावे व गरम गरमच खायला द्यावे.

टीपा :
कच्छी दाबेली तसा वेळखाऊ पदार्थ मुळीच नाही. तयार मसाला शेंगदाणे, एखादा दिवस आधी चिंचगुळाची चटणी तयार करून ठेवली तर अक्षरशः: अर्ध्या तासात काम तमाम होऊ शकेल.
कच्छी दाबेलीचा तयार मसालाच वापरावा. मी टिट-बीट दाबेली मसाला वापरला आहे. बर्‍याच कंपन्यांनाचा मिळतो पण त्यातल्या त्यात हा जास्त छान वाटला. खाताना पावही गरम हवेत व आतला बटाट्याचा मसालाही गरम हवा, त्यामुळे अजूनच मजा येते.
कच्छी दाबेली अतिरेक तिखट नसते. खट्टामीठा व थोडा तिखा अशी लागायला हवी.

लहान-मोठ्या मुलांच्या पार्टीसाठी हिट व पोटभरीचा पदार्थ.