नवरात्र सुरू झाले, घट बसले. त्याबरोबरच उपवासही सुरू झाले. मागोमाग उपवासाचे पदार्थही आलेच की. मग काय फर्माइश आलीच, " अग, तुझा उपवास आहे ना? मग साबुदाणा वडे कर की, म्हणजे तुला खाता येतील. " ह्म्म्म, माझे नांव आणि यांचे गाव. पुन्हा काय तर तुझ्यासाठी कर.
जिन्नस
- तीन वाट्या भिजलेला साबुदाणा
- दोन मध्यम बटाटे उकडून
- एक वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी दही
- सात-आठ हिरव्या मिरच्या, तीन चमचे आल्याचा रस
- एक चमचा जिरे, दोन चमचे जिरेपूड, थोडीशी कोथिंबीर,
- एक चमचा साखर व चवीनुसार मीठ
- तळण्याकरीता तेल.
मार्गदर्शन
साबुदाणा सात-आठ तास आधी भिजवावा. भिजवताना अर्ध पेर पाणी ठेवावे, दोन तासांनी साबुदाणा मोकळा करून अंदाज घ्यावा. कोरडा वाटत असेल तर पाण्याचे दोन हबके मारून झाकून ठेवावे. वडे करायला घेताना साबुदाणा, उकडलेले बटाटे, दही, जिरे पूड, वाटलेली मिरची, आल्याचा रस, साखर व मीठ एकत्र करून मळावे. चव घेऊन पाहावी. मीठ/मिरची कमी वाटल्यास आवडीनुसार वाढवावे. नंतर कोथिंबीर व दाण्याचे कूट व जिरे घालून मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून छोटे छोटे चपटे वडे करून घ्यावेत. कढईत तेल सुरवातीलाच चांगले तापवून घेऊन मध्यम आचेवर सोनेरी रंगावर वडे तळून काढावेत. टिश्यूपेपरवर टाकून अनावश्यक तेल टिपून घ्यावे. ओल्या खोबऱ्याच्या किंवा दाण्याच्या कूटाच्या दह्यातल्या चटणीबरोबर वडे गरम असतानाच खायला द्यावेत.
टीपा
साबुदाणा हा फार लहरी आहे त्यामुळे दरवेळी एकाच दुकानातून जरी आणला तरी आपले रंग दाखवतो तेव्हा मधून मधून त्याकडे लक्ष द्यायला हवे. दह्यामुळे वडे अतिशय हलके होतात. दाण्याचे कूट खमंग असावे. मिरची किंचित जास्तच पडू दे, त्यामुळे वडे मस्तच लागतात.
काहींच्या मते उपवासाला कोथिंबीर चालते तर काहींच्या मते नाही तेव्हा ती आपल्या मतानुसार घालावी. न घातल्यास चवीत काही फरक पडत नाही.
काहींच्या मते उपवासाला कोथिंबीर चालते तर काहींच्या मते नाही तेव्हा ती आपल्या मतानुसार घालावी. न घातल्यास चवीत काही फरक पडत नाही.
आयत्यावेळी साबुदाणा वडे करायची लहर आल्यास, आजकाल आपल्याकडे अतिशय बारीक साबुदाणा मिळतो. तो भिजवतानाच थोडेसे पाणी व दह्यात भिजवावा. बाकीची तयारी होईतो छान भिजतो.
वेगवेगळे पण वडे़च सध्या करायचा बेत आहे का?? आमच्यासारख्यांनी आता कसं करायचं??
ReplyDeleteसाबुदाणा अमेरिकेत फ़ार छान मिळत नाही असं माझं मत आहे. मी खूपदा थोडातरी भारतातुन पण घेऊन येते. पण खूपदा खिचडीच बनवली जाते. हे तुमचे वडे पाहुन आता एकदा यावच लागेल. सकाळी साबुदाणा वडा आणि चारच्या चहाबरोबर ब. वडा...कशी आहे फ़र्माईश???
Aparna,kevha yetes bol?:)
ReplyDeleteNakkich karu aapan. khare aahe ithala sabudana barechda traas deto. pan shevati kiti aananaar na ga Indiatun.:(
Thanks a lot.