जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, September 17, 2009

खिडकी......

नेहमीप्रमाणे सीएसटीला उलट बसून गेले होते. मस्त खिडकी मिळालेली. या खिडक्यांचे पण गणित आहे. दररोज लोकलने प्रवास करणारे सगळे या गणिताला सरावलेले असतात. कधी खिडकी मध्यभागी असते. त्यामुळे जेव्हा लोकल खच्चून भरते ना त्यावेळी हमखास कोणीतरी खिडकी व्यापून उभी राहते. मग कसली हवा आणि कसला नजारा. बरे तिला टोकले ना, " अगं जराशी लांब सरून उभी राहा गं " की ती इतका वाईट्ट चेहरा करून पाहील अन उगाच सरकल्यासारखे करेल. शिवाय मनात बडबडत असतेच, " एकतर आरामशीर खिडकीत बसायला हवे वर यांना वाराही हवाय. आम्ही उभ्या आहोत ते दिसत नाही वाटते. " अग बाई यासाठी तीन स्टेशने मागे जाऊन मोलाचा अर्धा तास गमावलाय हे तुला दिसत नाही.

पण जाऊ दे, हे मानसशास्त्र अजब आहे. अगदी कधी कधी तर मीही मनातल्या मनात असेच बडबडायची. विशेषतः काहीतरी त्रास झाला असेल, डोके सटकले असेल . त्यामुळे या अशा नजरांची सवयच होऊन जाते हळूहळू. दादर गेले की या नजरेच्या मालकिणीला मी बसायला देत असे. शिवाय खिडकी न अडवता उभी राहून वाराही खाऊ देई. घाटकोपरला ती उठली की आपसूक खिडकीपासून हटके उभी राही. आणि नजरेनेच विचारी आता ठीक आहे ना? यावर मीही नजरेनेच तिला थॅक्स म्हणे. या गमतीजमती नेहमीच्याच झाल्या तरीही त्यातली रंगत कमी होत नसे. मी जरी तिच असले तरी समोरची मात्र रोजच नवीन असे.

खिडकी जर सीटला लागूनच असेल तर मात्र सुखच सुख. त्यातून भुरभूर पाऊस असेल किंवा नोव्हेंबर ते जानेवारी किंचित गारवा असला की छान वाटे. अर्थात मुंबईत हा असा आल्हाददायक गारवा प्रकार कमीच. मात्र बरेचदा घामेजले असताना वारा आला की थोडे बरे वाटत असे. तर मी उलट गेले खरी पण ती गाडी नेमकी लागली कुर्ला, बोंबला. आता उतरणे भागच होते. कुर्ला गाड्या मुळात इतक्या सोडतात कशाला हा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच कायम सतावत असे. एकदा तर सह्यांची मोहीमही राबवली होती, एक ठाणा की एक कुर्ला न सोडता दोन ठाणा नंतर एक कुर्ला सोडा. शिवाय कुर्ला गाड्या अनेकदा रिकाम्या धावत आणि सगळी गर्दी ठाणा गाडीलाच. मग भांडणे, बाचाबाची ओघाने आलीच. लोकल कुठल्याही साइडची असू दे हा कायमचा चिघळणारा वाद असतोच. विद्याविहार पासून पुढच्या सगळ्यांना वाटे इतक्या गाड्या यांच्यासाठी आहेत तरी कशाला मरायला येतात आमच्या गाडीत. तर कुर्ल्यापर्यंत राहणाऱ्यांचे म्हणणे, " म्हणजे समोर असलेली गाडी सोडून द्यायची का? गाडी काय तुमच्या मालकीची आहे का? अहो कुर्ला गाडीत ना हे टिकल्या-कानातले वाले येतच नाहीत बघा,. आमचा गृप आहे या गाडीचा. " थोडक्यात कारणे अनेक आहेत आणि मुख्य म्हणजे समोर आलेली गाडी सोडायची हे कुठल्याही लोकलप्रवाश्याला न पटणारी व मानवणारी गोष्ट आहे. तेव्हा ही भांडणे होणारच.

गाडीतून उतरले शेजारीच ठाणा होती लागलेली. पाहिले तर सीएसटीलाच खच्चून भरली होती. कसली खिडकी अन कसला वारा. गाडी सुटत आली होती. इकडून-तिकडून बायका आपली पर्स, ओढण्या-साड्या सांभाळत आक्रमण करीत होत्याच. माझी चलबिचल होत होती. चढू का पुढच्या ठाणासाठी थांबू, म्हणजे पुन्हा १५ मिनिटे नक्की फुकट जाणार. आधीच उशीर झालेला. घरी पोचेतो साडेसात नक्की. म्हणजे आजचे तळवलकर चुकणार. डोळ्यासमोर इन्स्ट्रक्टरचा चेहरा आला, बापरे! नकोच. शिवाय या आठवड्यात एक दांडी झाली आहे. त्यात त्या मेल्या डायरीत दररोज लिहावे लागते , आज काय व किती खाल्ले. मग दोन दांड्या व एक प्लेट वडा खाल्ला असे दिसले की ती इतकी जोरात डाफरेल की मला वाटू लागते मरो ते जीम आणि वजनाचा काटा. सुखाने दोन घासही ही बया खाऊ देईना. शिवाय वर हिचे हे ओरडणे ऐकायला भरमसाठ पैसेही मोजा. वजन तर तिथल्यातिथेच आहे. पुन्हा दोष माझ्या त्या छोट्याश्या वड्यांचा. एका मिनिटात इतके विचार घोंघावले म्हटल्यावर ती खच्चून भरलेली ठाणा पकडणेच भाग होते. जेमतेम दरवाज्यातून आत वळतेय तोच गाडी सुटली.

ठाण्यापर्यंत जायचे असल्याने तासाभराची निश्चिंती होतीच. तेव्हा उगाच दरवाजा-मधला पॅसेज इथे गर्दी करण्यापेक्षा आत जावे निदान हातातली बॅगतरी वर ठेवता येईल असे म्हणत आत वळले तोच, " ए जोशी जोशी, अग इकडे गं खिडकीत खिडकीत बघ. " माझे माहेरचे आडनाव जोशी. कुठूनही हे नाव कानावर आले की माझे कान लागलीच टवकारतात. कोणीतरी अगदी जिव्हाळ्याचे आपले माणूस आहे हे असे वाटते. . गर्दीत चेहरा दिसेना म्हणून पुढे जायचा प्रयत्न करत होते तोच पुन्हा आवाज आला, " भागाबाई, काय ओळखलेस का मला? " भागाबाई? फक्त माझे शाळासोबतीच या नावाने हाक मारत. कोण कोण असेल, माणिक की भारती? का वीणा, मला इतका आनंद झाला होता. त्या भरात पुढच्या दोघी-तिघींना ढकलून मी एकदाची त्या हाकांच्या मालकिणीला पाहिले. भारतीच होती. आठवी-नववी एका बेंचवर बसायचो आम्ही.

दोघीही एकमेकींना सोळा-सतरा वर्षाने पाहत होतो. आमच्यात बाह्य बदल बरेच झाले असले तरी मला माझी शाळेतली दोन वेण्या घातलेली, कधीही गाणे म्हणायला सांगितले की, " धागा धागा अखंड विणूया , विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया... " म्हणणारी, डब्यात बरेचदा कोबीची भाजी आणणारी भारतीच दिसत होती. तिने पटकन उठून माझा हात धरला. काय काय होते त्या स्पर्शात. इतक्या वर्षांनी भेटलो तरीही मैत्री तशीच जिवंत होती. म्हणत होती, " काय भागाबाई, कशी आहेस? तुझे घोड्याचे शेपूट गायब झालेय की. किती लांब व सुळसुळीत झालेत तुझे केस. मुळात होतीसच, आता अजूनच देखणी झाली आहेस. " माझे केस सरळ असल्याने व पोनी बांधलेला असला की चालण्याच्या लयीवर ते हालत असत मग काय सगळे घोड्याचे शेपूट म्हणत. बाकी दिसण्याचे कौतुक हे म्हणजे निव्वळ मैत्रिणीच्या मनातले प्रेम बोलत होते.

मग आम्ही दोघी ज्या काही सुटलो की बस. इतक्या वर्षांचा इतिहास-भूगोल फक्त एका तासात कसा भरून निघणार. कॉलेज, शिक्षण , नोकरी, लग्न-नवरा, ओघाने सासर-माहेर आलेच . मुले किती- प्रश्नच प्रश्न. या सगळ्यामागे कुठेही भोचकपणा नव्हता, असूया नव्हती. अनेक मैत्रिणींची आठवण निघाली. अग ही भेटली होती. राम पुण्याला शिफ्ट झालाय. सुभाष तर माझ्याच ऑफिसमध्ये आहे. वीणा लग्न होऊन बडोद्याला गेली. एक ना दोन , आम्ही दोघी एकमेकींना जे जे माहीत होते ते सांगत होतो. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची आठवण अपरिहार्यच होती. काही आवडते तर काही जरा.... आम्ही कोणाला वटाणा म्हणायचो तर कोणाला चिऊताई. कोणाच्या पोटातल्या चिमट्यांना घाबरायचो तर कोणाचे कसे भक्त होतो. हे सगळे भरभरून बोलत असताना गाडी धावतच होती. आज का कोण जाणे जरा जास्तच वेगाने पळाल्यासारखे वाटत होते. सिग्नलही लागले नाहीत. आमचे बोलणे तर नुकतेच सुरू झालेले.

भारती डोबिंवलीकर झाली असल्याने ती मुलुंडाला उतरून मागून येणारी कल्याण पकडणार होती. भांडूप गेले तशी मी हात अजूनच घट्ट पकडून तिला विचारले, " आता कधी भेटशील गं पुन्हा? फोन नंबर घेतलेच आहेत, मी फोन करेनच गं. पण हे असे पुन्हा पुन्हा भेटत राहूयात, खूप खूप छान वाटले. पुन्हा एकदा ते सगळे शाळेचे दिवस आठवले." तशी पटकन माझा हात सोडवत म्हणाली, " अगं बोलण्याच्या नादात लक्षातच आले नाही, थांब तुझी अतिशय प्रिय गोष्ट आहे माझ्या पर्समध्ये " असे म्हणत तिने पर्समधून फाईव्ह स्टार काढले व मला दिले. " काय, अजूनही तितकीच पागल आहेस ना? बघ गेले चार दिवस हे माझ्या पर्समध्ये आहे. मुलीने दोन वेळा हातात घेतले होते खायला पण पुन्हा ठेवून दिले, का माहीत आहे? त्याच्यावर तुझे नाव लिहिलेले होते, . माझ्या अजूनही लक्षात आहे तुझी आवड. खा गं नक्की, चल भेटूच आपण. " असे म्हणून भारती उतरून गेली.

फाईव्ह स्टार म्हणजे माझा जीव की प्राण होते एकेकाळी. अगदी बसचे पाच पाच पैसे वाचवून मी महिन्याच्या शेवटी दोन रुपये पन्नास पैशाचे एक फाईव्ह स्टार घेऊन हळूहळू चिमणीच्या दातांनी तुकडे तोडत चवीचवीने खात असे. हा अर्धा तास चालणारा माझा कार्यक्रम घरी व शाळेत जबरदस्त फ़ेमस होता. भारतीच्या अजूनही ते स्मरणात होते आणि नेमके तिच्या पर्समध्ये आज फाईव्ह स्टार होते. इतक्या वर्षांनी मैत्रीण भेटलेली, आठवणींचा मेळावा व त्यात हे फाईव्ह स्टार. मुलुंड ते ठाणा या पाच-सात मिनिटांच्या प्रवासात मी अर्धे चॉकलेट खाल्ले. अवीट गोडी होती त्यात. आमच्या भेटीचा सोहळा खिडकीने पाहिला-अनुभवला होताच. सहजच वाटले असे किती प्रसंग या खिडकीच्या डायरीत नोंदलेले असतील. आनंदाचे- दुःखाचे, कधी चिवचिवणारे- तर कधी निःशब्द. लहान मुलांची बोबडी लाडेलाडे बडबड तर कोणा बोळके झालेल्या आजीचे अनुभवकथन. कधी एखादीच्या डोळ्यातून राहून राहून ओघळणारी आसवे तर कधी भावी जीवनाचे मनसुबे. अनेक मनांच्या अगणित भावनांची मूक साक्षीदार, ‘ खिडकी ’.


10 comments:

  1. वा.. आजची पोस्ट भलतीच भावनुक झाली आहे.

    मस्त... "इतक्या वर्षांनी मैत्रीण भेटलेली, आठवणींचा मेळावा व त्यात हे फाईव्ह स्टार."

    ReplyDelete
  2. रोहन, अरे आज माझ्या बाबांनी फोनवर बोलता बोलता तुझे आवडीचे फाईव्ह स्टार आणलेय असे सांगितले.मग त्या मागोमाग अनेक आठवणी ओघाने आल्याच.आभार.

    ReplyDelete
  3. नमस्कार मॅम,

    मस्त झालाय लेख, एखाद्या लहान मुलाला बाबांनी विकत घेऊन पतंग आणला तर तितकीशी मजा येत नाही, पण कोणाचा काटलेला पतंग धावत जाऊन उड्या मारून हात उंचावून आपल्या ताब्यात घेताना जसा आनंद होतो, तसा काहीतरी मिळवल्याचा आनंद मला खिडकी पकडल्यावर होतो. पण बहुतेकदा मिळत नाहीच मला खिडकी, कोणाला धक्का न मारण्याचं, घिसाडघाईने लहानमोठं न बघून घुसखोरी न करण्याचं सौजन्य दाखवताना खिडकी सुटतेच. लहानपणी खिडकीसाठी इतकी खटपट करावी लागत नसे. खिडकीला धरून उभं राहिलं तरी चेहरा बरोबर खिडकीसमोर यायचा. मला लहानपणीचा प्रवास आठवतो आईबरोबर किंवा बाबांबरोबर डब्या शिरलो की वाट काढत थेट खिडकी गाठायचो. आईबाबा डोळे मोठ्ठे करून सांगायचे गजांना धरू नकोस पण मला तोल सांभाळता यायच नाही मी छोट्या मुठींमध्ये गज घट्ट धरून ठेवायचो, अधूनमधून मागे वळून आईबाबा आहेत ना डब्यात अशी खात्री करून घ्यायचो. स्टेशन आलं तरी खिडकी सोडायला मी तयार नसायचो. माझ्या या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. " अधूनमधून आईबाबा आहेत ना हे मागे वळून खात्री करून घ्यायचो "अगदी अगदी.चुरापाव, प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  5. छान आहे आठवण. मला माझे चर्चगेटला चढून खिडकी मिळवण्याचे दिवस आठवले.

    ReplyDelete
  6. अपर्णा प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  7. खिडकी खरच किती जिव्हाळ्याचा विषय असतो ना...बरं तिची ओढ प्रवासाच्या लांबीवर अवलंबून नसते.....
    मस्त झालाय लेख...
    बाकी मुलं झाल्यावर आपण खिडकीतून अलगद बाजूला सरकतो आणि त्याबद्द्ल वाईट वाटत नाही....
    बाकी चॉकलेट बद्दल माझे बाबा ही यावेळेस आम्ही नासिकला गेल्यावर मुलांसाठी ईतर भरपूर खाउ आणि माझ्यासाठी स्पेशल किटकॅट घेउन आले होते...त्यामुळे तुझ्या भावना समजल्या बघ....

    ReplyDelete
  8. तन्वी,आभार. हो ना, खिडकीची ओढ ही प्रवास अर्ध्या तासाचा आहे की अनेक तासांचा यावर अवलंबून नसते.इतरांची लहान मुले बहुतांशी खिडकीत असलेल्यांच्या मांडीवरच असतात.:)
    बाकी फाईव्ह स्टार....:)

    ReplyDelete
  9. मालाड ते बोरिवली जाउन परत रिटर्न घेणारे लोकंही आहेत. मालाडला पण पिक अवर मधे चढता येत नाही, तेंव्हा मी पण रिटर्न घेतो. अगदी एक्झॅक्टली तु लिहिल्या प्रमाणेच वागतात लोकं. त्याच्या नजरा अगदी बोचतात. पण त्यावर आमचाही नाईलाज असतो. जर कधी चुकुन विरार स्लो घेतली ( संध्याकाळची) तर त्या गाडितुन मालाडला उतरुच देत नाहित..
    ते फाइव्ह स्टार मला पण अजुनही खुप आवडतं. आतला तो चिकट माल्ट तोंडात घॊळवुन खायला मजा येते.लेख एकदम मस्त जमलाय.

    ReplyDelete
  10. आभार महेंद्र.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !