जाता जाता एक नजर इथेही........

Friday, September 4, 2009

समन्वय.......१

सुधाची बायको-शालिनी फक्त नावाचीच शालिनी. देखणेपणाचा व माहेरच्या सधनपणाचा तोरा सतत मिरवत राहते. आई व कुसुम या दोघींवर सुधाचा अतोनात जीव. शालिनी आली त्यावेळी कुसुमही शाळेत नोकरीला लागली होतीच. त्याच शाळेत शालिनीलाही प्रायमरी टीचरची नोकरी मिळत होती. अगदी कसलेही कष्ट न करता समोरून चालत आलेली नोकरी तिने करावी असे सुधाचे व आईचेही मत होते. पण, " नोकरी आणि मी करू? मग माझ्या माहेरीच सुखात होते की. बाबा मागितले की पैसे देत होते, घरात नोकरचाकर होते. मला मुळात तुमच्याशी लग्न करायचेच नव्हते पण आमच्या बाबांना मुलगा शिकलेला, चांगल्या बँकेत आहे आणि चार खोल्यांच्या ब्लॉकची भुरळ पडली ना. एकदाच सांगून टाकतेय, मी नोकरी करणार नाही तेव्हा पुन्हा हा विषय काढू नका. " असे खाडखाड सुनावून सुधाला बोचकारून वहिनीने नोकरी लाथाडली. मग पुन्हा कोणी तिच्या भानगडीत पडलेच नाही.

कुसूमच्या लग्नावरूनही वहिनीची सतत चिडचिड चाले. तरी बरे आजीचे दागिने होते ठेवलेले व कुसुमही पैसे जमवत होती. वडिलांचा फंडही कुसूमच्या लग्नासाठीच ठेवला होता. शालिनीचा संताप होत असे, त्या फंडावर, दागिन्यांवर माझाही हक्क आहे असे सारखे बोलून बोलून तिने सुधाला भंडावून सोडले होते. आई बिचारी सकाळी उठल्यापासून काम करीत राही. पण सूनबाईंना सासू डोळ्यासमोर नको. कुसूमच्या शाळेतल्या मैत्रिणीनेच एक चांगले स्थळ आणले व पटकन तिचे लग्नही झाले. काम ना धाम पण लग्नात जणू मीच सगळे केलेय अशा थाटात सुधाला पैठणी घ्यायला लावून शालिनी यथेच्छ मिरवली वर कुसुम गेल्यापासून दररोज घरात दहा वेळा तरी, गेली एकदाची धिंडका. सुटले बाई. असे म्हणत राहिली.

शालिनीचा सगळाच चमत्कारिकपणा होता. सुधाला दोन मुले झाली. दोन्ही मुलांना अतिलाडाने, पाठीशी घालून घालून ती शेफारून गेलीत. बाप म्हणून सुधाची काहीच किंमत नाही. बाप हा फक्त पैसे देणारा एवढेच काय ते त्यांना माहीत. आपल्या वडिलांच्या तापटपणामुळे झालेला त्रास आपल्या मुलांना होऊ नये त्यांना आपली भीती वाटू नये या प्रयत्नात असलेल्या सुधाच्या अपेक्षा फारच कमी होत्या. मुलांनी खूप शिकावे, मन लावून अभ्यास करावा. पण वहिनींना वाटे सारखा काय तो अभ्यास करायचा. पास होतात ना पोरे, मग झाले तर. सारखा टिवी नाहीतर नाक्यावर जाऊन उगाच चकाट्या पिटत उभे राहणे. बड्या बापांच्या पोरांचे पाहून पाहून सुधाकडे सारख्या मागण्या -मला सेल हवा, मला हिरो होडा हवी. पण साधे सरळ पासही होत नव्हती. कशीबशी एटीकेटी मिळवून मोठा आता सेकंड इयरला गेला होता आणि धाकटा बारावीला. महागडा क्लासही लावला होता. पैसे भरताना भारी पडत होते तरी सुधा पोराचे भले होईल म्हणून भरत होता. परीक्षा जवळ आली होती पण अभ्यासाचे नाव नाही. आज सकाळीच सुधा दोन्ही पोरांना त्यावरून रागावला तर लागलीच वहिनींनी त्यांचे नेहमीचेच अकांडतांडव करून त्याला गप्प करून टाकले. वर बाप म्हणून तुम्ही काय हो देताय पोरांना असे म्हणून टोचले होते. त्याचा अगदी उद्रेक झाला होता.

सुधा कळवळून बोलतच होता. वाटत होते, बायकोला मनापासून प्रेम करीन, सुखी ठेवीन. मला जमेल तितकी तिची हौसमौजही पुरवीन. पोरांना शिकवीन. त्यांच्या सगळ्या गरजा पुरवीन. गुण्यागोविंदाने राहून सगळ्यांनी घर आनंदी ठेवावे ही अपेक्षा करणे चूक आहे का रे? कधीतरी तरी शालिनीने जवळ घेऊन म्हणावे, " दमलात ना? खरेच किती कष्ट करता सगळ्यांसाठी. केव्हातरी स्वतःसाठीही एखादी आवडीची गोष्ट घ्या. " पोरांनी बापाची कदर करावी. स्वतःच्या उन्नतीसाठी तरी अभ्यास करावा पण नाही. सांग ना रे, फार जास्त अपेक्षा आहेत का माझ्या? त्यात ही शालिनी त्यांना अजून बिघडवतेय फाजील लाड करून. आईही थकलीये फार. त्यात तिच्या आग्रहाने हिच्याशी लग्न केले मी ही बोच तिला लागून राहिली आहे. तिची जगायची उभारीच संपलीय. माझ्यामुळे तुझ्या अडचणीत अजूनच भर पडतेय, देवा कशाला मला म्हातारीला जगवतो आहेस असे सारखी म्हणत राहते. काय करू रे. सगळ्या बाजूने पदरी निराशाच.

असेच दिवस जात होते. मोठा पोरगा एकदा गचकून का होईना पण कसाबसा बीकॉम झाला. धाकटा आता सेकंडमध्ये गेला होता. सारखी कटकट करून करून वहिनींनी सुधाला कर्ज काढायला लावून मोठ्याला हिरो होंडा घेऊन दिली होती. अरे जरा नोकरीचे अर्ज तरी कर असे सुधा म्हणाला की पोरगं काय कटकट आहे असा चेहरा करून बापाकडे पाही आणि शालिनी सारखी कोणाकोणाची उदाहरणे देत राही. " अहो, तुम्ही लावा की त्याला तुमच्या ओळखीने. ते पोर लहान आजकाल वशिल्याशिवाय काही होत नाही. तुमच्या बँकेत चिकटवण्या एवढी पण पत नाही का तुमची? " अग, आधी बँकेची परीक्षा तरी द्यायला हवी ना तुझ्या लेकाने. हे बघ मी अर्जही आणलाय. तो भरून दे रे आणि अभ्यास करून खूप मार्क्स मिळवून पास हो म्हणजे मुलाखतीचे बोलावणे आले की पाहतो ना मी. पण आधी अभ्यास तर कर. " शेवटी कशीबशी पोराने ही व एमपीएससीची परीक्षा दिली. बँकेच्या नाही परंतु एमपीएससीच्या परीक्षेत तो पास झाला. व मुलाखतीचेही बोलावणे आले.


क्रमश:

2 comments:

  1. बिचारा सुधाकर...

    सधन घरातल्या सगळ्याच मुली शालिनीसारख्या नसतात. पण आजुबाजूला असं कुठे काही दिसलं की आपणही मग नकळत म्हणून जातो "नाकापेक्षा मोती जड".

    ReplyDelete
  2. व्यक्ती तितक्या प्रकृती,दुसरे काय.
    सतीश आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !