जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, September 3, 2009

समन्वय........


अरे, सदैव यांच्याच सुखाचा विचार करतोय. माझ्या आवडीच्या अगदी क्षुल्लक गोष्टींनाही मी मागे सारून प्रथम कुटुंबाला प्राधान्य देत आलोय. " सुधाकरा, लग्न म्हणजे पोरखेळ नव्हे. स्वतःला विसरून जावे लागेल, आधी बायको-मुलांचे सुख मग भविष्याची तजवीज आणि त्यातूनही काही उरलेच तर तुझ्या वैयक्तिक गोष्टी. एकदा का गृहस्थाश्रम स्वीकारलास की प्रामाणीकपणे मार्गक्रमणा कर. अरे बाबा, संसार त्यागावरच टिकतो. तू म्हणशील अग बहुतेकवेळा हे सगळे मुलींना सांगितले जाते, मग तू मला का वारंवार सांगते आहेस? संसारात दोन्ही चाके महत्त्वाची. एक तर ती परकी पोर तिचे घरदार सोडून येणार तशात तिच्यावर किती अपेक्षा लादायच्या? त्यागाचाही समन्वय हवा. नवरा हाच फक्त काय तो आपला आहे असे वाटत असताना त्याने आश्वासक साथ दिली ना की मग बाई संसार समरसून करते. गृहलक्ष्मी आनंदी असेल की घर नेहमीच उजळलेले असते. "आईने सांगितलेले वाक्य कोरून ठेवलेय मी मनावर.

माझे वडील एकदम जमदग्नी. कधी आणि कशावरून संतापतील याचा भरवसाच नव्हता. आई, मी व कुसुम, अरे एवढेच काय आजीही कायम धास्तावलेली. ते घरात नसले की सगळ्यांचे चेहरे खुललेले. हसतखेळत गोष्टी, गप्पा चालत. आई व आजीही छान असायच्या. एकदा का ते घरी आले की सगळे एकदम चिडीचूप. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरे. जेवणात जरा काही डावे उजवे झाले की ताट ढकलून चालू पडत. मग त्या दिवशी आई त्यांच्या मिनतवाऱ्या काढून काढून थकून जाई. पण हा माणूस कधी जेवायला येत नसे. शिजवलेले अन्न तसेच गारगोटी होऊन जाई. आख्ख्या घरादाराला उपास. आजीचे वय झाले होते रे, तिला उपास निघत नसे. कुसुमही खूप लहान होती. बिचारी मुसमुसून रडत राही. मग चोरून आई त्या दोघींना खायला घाली. पदराखाली कधी चार पोळ्या व चटणी दडवून नेई तर कधी गॅलरीत कागदात भाजी-पोळी बांधून ठेवी अन मग हळूच आजी व कुसुम जाऊन खात. मी मात्र कधीही आईने खाल्ल्याशिवाय घास खाल्ला नाही.

तसे वडील वाईट नव्हते रे. पण पक्के पुरूषप्रधान संस्कृतीचे पुरस्कर्ते. आमचे आजोबाही म्हणे तसेच होते. पण तो काळ तरी वेगळा होता. आजी नेहमी म्हणत असे, आप्पा तर आजोबांच्याही चार पावले पुढेच आहे. शंकराचा अवतारच जणू. सून माझी फार सोशीक आहे म्हणून चाललीत ही थेरं. याच्या धाकाने मेलीबिलीना मग कळेल हो त्याला. वडलांना दररोज रात्री अमृतांजन लावायला आवडे. त्यांच्या कुठल्याही गोष्टीला हात लावायला आम्हाला बंदी होती. एकदा माझ्या हातून बॉल खेळताना त्यांची अमृतांजनची बाटली फुटली. ते घरी आल्यावर आता काय होईल या भीतीने मी अर्धमेला झालो होतो. आजीही घाबरून गेली. रात्र झाली आणि वडलांनी अमृतांजनची बाटली घ्यावी म्हणून नेहमीच्या जागी न पाहताच हात घातला पण तिथे काहीच नव्हते. झाले. इतक्या जोरात ओरडले. आईने सांगितले की अहो स्वच्छता करत होते तर चुकून हात लागून पडली आणि फुटली. रागावू नका. पुन्हा नाही असे होणार. तिचे वाक्य पुरे व्हायच्या आत खाणकन तिच्या एक कानशिलात बसली होती. इतकी जोरात मारले होते की माझी आई भेलकांडली रे. पण एक शब्दही काढला नाही तोंडातून. मला डोळ्याने चूप बस म्हणून खुणावत राहिली.

असे कितीक प्रसंग आले, सगळ्यांनी सोसले. पण नेहमीच एकमेकांचे राहिलो. हे सारे लक्षात ठेवून लग्न करावे असे मनाने घेतले तेव्हाच स्वतःशीच करार केला. माझ्यामुळे घरात नेहमीच आनंद नांदेल असाच मी वागेन. आईने फार भोगलेय, तिला सुखी ठेवीन. त्याचबरोबर बायकोलाही जपेन. पण म्हणतात ना रे देव काही वेगळेच योजत असतो रे. आणि नवरा-बायकोच्या जोड्या बनवतानाही त्याचा काही अजबच प्रकार आहे. भिन्न स्वभावाच्या लोकांचीच एकमेकांशी का गाठ बांधली जाते हे कोडे काही सुटणारे नाही. कदाचित म्हणूनच संसार होत असतील. थोडक्यात एकाच्या त्यागावर दुसऱ्याची मजा हेच समीकरण त्यातल्यात्यात यशस्वी होत असावे.

सुधाकर, माझा मित्र कळवळून बोलत होता. फार अस्वस्थ झाला होता. सुधा माझा बँकेतला सहकारी. आम्ही लागलो एकाच दिवशी. पंचवीस वर्षे झाली त्याला. पहिल्या दिवसापासूनच आमचे सुर जुळले. सुधा अतिशय गरीब, कामसू व प्रामाणिक. कधी कोणाकडून पाच पैशाची अपेक्षा नाही की कामात चुकारपणा नाही. नाकासमोर चालणारा, आहे त्यात समाधान मानणारा. बँकेच्या परीक्षा देऊन ऑफिसर झालो दोघेही. पगारही बरे आहेत. मध्यमवर्गीय माणसाला थोडीशी मौज करत जगता येईल इतपत पैसे नक्कीच मिळतात. आमची लग्नेही एकाच वर्षात झाली. सुधाची बायको -ओळखीतलीच होती. दिसायला चांगलीच देखणी. सुधाच्या मानाने जरा वरचढच प्रकरण. शिवाय सधन घरातून आलेली. सुधाचा आधी नकारच होता. नको रे बाबा हा नाकापेक्षा मोती जड. पण आईच्या आग्रहाने शेवटी तयार झाला आणि " शुभमंगल सावधान " पार पडले.

क्रमश:

3 comments:

  1. छान लेख !!

    सुधाकरचे बरेचसे do's and don'ts आम्हालाही कधीतरी उपयोगी पडतील :)

    एक तर ती परकी पोर तिचे घरदार सोडून येणार तशात तिच्यावर किती अपेक्षा लादायच्या? हे जर मुलीच्या नवर्‍याबरोबरच सासूलाही समजलं तर... कदाचित सासू हा शब्द आई या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जाईल.

    ReplyDelete
  2. पुढे काय ची उत्सुकता लागली आहे. मस्त रंगतेय गोष्ट. पण हरी नारायण आपट्यांच्या काळातली वाटतेय.

    ReplyDelete
  3. सतीश, अरे सुधाकरच्या आईचे वाक्य आहे ना हे प.:)पण सगळ्याच अश्या नसतात हेही खरेच.
    सुरवात बरी वाटतेय हे पाहून धीर आला. :)आभार.

    आशाताई, अनेक आभार. हेहे, थोडीशी जुन्या थोडीशी नव्या काळातली...प्रयत्न करतेय.तुमच्या कमेंटमुळे उत्साह वाढला.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !