जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 20, 2012

ही निकामी आढ्यता का?

तसे अनेकांनी वेगवेगळ्या मन:स्थितीत माझ्यावर राज्य केलेय. मोह घातलाय. हसवलेय, रडवलेय... काहूर माजवलेय. विषण्ण केलेय. स्तब्ध केलेय. खांडेकर, खानोलकर, कर्णिक, पेंडसे, नवरे, माडगूळकर, ह.मो., केशवसुत, अत्रे-कुमार, कुसुमाग्रज, दळवी, पुलं, नेमाडे, तांबे, करंदीकर, माधव ज्यूलियन, गो. नि., पाडगावकर, पु. भा. भावे, बोरकर, आरती प्रभू, रवींद्र भट, वपु, सुशि, इंदिरा संत, विभावरी शिरुरकर, मतकरी, शांताबाई, इनामदार, रणजित देसाई, बहिणाबाई, इरावतीबाई, गौरी, सानिया, ग्रेस, सुरेश भट, नांदगावकर, महानोर... यादी न संपणारीच. या सगळ्यांची पुस्तके म्हणजे रत्न आहेत. तिही डागहीन. निखळ भिडणारी. अंतरंगी उतरत जाणारी.

वाचता वाचता मनात सहजी उमटत जाणारे हे भाव....

शब्दामाजी जगण्याचा प्रत्यय येई 
शब्दातूनी होतसे अंतरंग घडाई 
सुटावी अनन्य मोहाची चढाई
आत्म्याची देवापाशी मुक्ताई...


या सगळ्यांचीच मोहिनी अखंड असली तरी काहींची निर्विवाद अर्निबंध सत्ता माझ्या मनावर नेहमीच अधिराज्य करून आहे. जितके वाचावे तितक्या लडी उलगडत जाव्यात, विविध भाव समोर यावेत... परंतु ही ही माणसेच आहेत. प्रत्येक जीवाच्या जगण्याला अनेकविध पदर असतात... असणारच... हे गृहीत धरल्यानंतरच त्या शब्दातली सखोलता किंचितशी समोर येईल. आरती प्रभूंच्या अनेक कवितांनी असेच माझ्यावर गारुड केले आहे. त्यातलीच एक ही... नेहमीच भावलेली...

ही निकामी आढ्यता का?

ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी

आरती प्रभूंच्या कवितांमध्ये, शब्दांमागल्या गर्भित अर्थाने, जीवनाच्या क्वचित देखण्या व नेहमीच भीषण भयानकतेनं भरलेल्या स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत राहतो. या जगाचे हे विचित्र वरपांगी सोकॉल्ड सुखी जीवन - लपलेले दुभंगलेपण... पवित्रतेत दडलेली अपरिहार्य अपवित्रतता... सुखामाजी दडवलेले दु:ख, फसवणूक. मानवी मन आणि निसर्गाची निरनिराळी रुपे यांची अचूक उत्कट सांगड..... डोहाचा तो हिरवागुढ गडद घट अन त्याच्या तळाशी मनातली सर्वोच्च ( मानलेली ) दु:खे, काळजाचा लचका तोडणारी सत्ये.... आणि काठावर ओठांच्या घट्ट बंद महिरपीखाली सुखाचा अंगरखा घालून वावरणारी ज्याची त्याची तोल सावरण्याचा प्रयत्न करणारी दुबळी कुडी...

या छोट्याश्या जगण्यातही कितीदा ही कुचकामी आढ्यता सर्वत्र दिसत राहते. निसर्गालाही दाद द्यायची जिथे तयारी नाही तिथे मानवी संबंधाची ती काय तमा. मनाची कवाडे, डोळ्यावर झापडे( अहंमची ) लेऊन बंद केलीत. आपणच आपल्याला निकामी करत चाललोत. कशालाही दाद देणे ही प्रतिक्षिप्त क्रिया सहज उत्स्फूर्त उमटणेच दुर्मिळ झालेय. केवळ सुदैव म्हणून या सुंदर जगात आपण आलोत. उत्कट सुंदरतेचा आस्वाद तितक्याच उत्कटतेने घेण्यातही होत असलेला हिमटेपणा विषण्ण करणारा आहे. या घररूपी मैफिलीची सजावट केवळ तुमच्याच हाती असूनही क्षुद्रश्या कपाळावरील आठीची ( अहंमची ) मिजास जोपासती मने कवीला खटकतात.

दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायुचे घट

नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

किती यथार्थ शब्द आहेत... दाद देणे हे हि गाण्याहून आहे ( का ) दुर्घट... कवीचा खडा सवाल. गुंफणे गजरे दवांचे आणि वायुचे घट.... पुढे जाऊन दिलेला हा अशक्य दाखला.

खरेच साधेल का कधी त्या अर्धमावळत्या चंद्राच्या अन पहाटेच्या पहिल्या प्रहराच्या साक्षीने अलगद उतरलेल्या तृणपात्यावरील त्या पवित्र दवमोत्यांची माला बांधणे... कवीच्या आत्यंतिक तरल मनाची साक्ष देणारे हे शब्द.

पुढे ते म्हणतात... " नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा..." अनेकदा माणसाचे मन सरड्यासारखे सगळे रंग धारण करेल परंतु नम्रता ही मुळातच असावी लागते. ती प्रयत्नाने रुजवता येते... जोपासता येते. परंतु हा प्रयत्न उभा जन्म करावा लागतो. ज्याला या नम्रतेचा सूर उमगला त्याला जीवनाचे महत्त्व अन स्वत:ची क्षुद्रता जाणवेल. अन तोच स्वत:ला समर्पित करून जीवनाशी मनाची सारी कवाडे उघडून संग करेल.

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा

काय विलक्षण भाव आहेत हे. जे चांदणे आकाशी नांदते आहे... जे सदैव अप्राप्यच आहे ते केवळ पाण्यावर उतरलेय म्हणून ओंजळीत वेचता येईल? कदाचित येईलही. निदान तसा आभास तरी निर्माण करता येईल अन स्वत:चीच समजूतही घालता येईल. काळोखात चिमटीत धरलेला पारा पाहायला तिमिर छेदणारा उजेड नाहीच तिथे. तिथे हे शक्य आहेच. मनाचा  आगळाच रंग !

या दोन्ही.. " पाण्यावरील चांदणे वेचणे अन काळोखात पारा धरू पाहणे... " विलक्षण तरल प्रवाही प्रतिमा ! कवीच्या समर्थ प्रतिभेची स्फटिकेच जणू. जे अप्राप्य आहे तेच धरू पाहण्याचा अट्टाहास करता सहज समोर असलेले विसरण्याचा दुर्लक्ष करण्याचा विचित्र अनाकलनीय मनुष्य स्वभाव.

पुढे ते म्हणतात, ज्योतीतला त्यागमय प्रकाश... स्व(ता :) ला पणाला लावून जीवनाचा गाभारा उजळण्याची क्षमता इतकी सहजी कोणाला साधत नाही कारण त्यासाठी नुसता प्रकाश असून भागत नाही तर अंतर्यामी झोकून देऊन तम छेदण्याचा भाव असायला हवा.

" सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा... " प्रवाहाबरोबर पोहणे अशक्य. जीव विद्ध झालाय जगाचे फटकारे सोसून. प्रत्येक श्वासामागले-शब्दामागले सत्य ती कडवट घुसमट आहे. विलक्षण तरल वृत्तीमुळे कवीच्या संपूर्ण शरिरी व अशरीरी जाणिवा एकमेकीत तादात्म्य पावल्यात. प्रतिमांची ही देखणी बोली आरतींच्या सगळ्या कवितांची... कवी मनाची शब्दाशब्दातून साक्ष देत राहते. गारुड करते राहते.

येथे ऐकता येईल
 

Tuesday, November 13, 2012


 
!!!   दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा   !!!
 
 
 
 
दिवाळी येणार, अंगण सजणार
 
 
दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !


रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
 

सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
 

देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटातूट
चंद्र ज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !गीत
-
संगीत
-
स्वर
-
चित्रपट
-
 
 
 

Tuesday, November 6, 2012

रव्याचे लाडू

दिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएटबिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....( का ते कळले नं... " लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम... :) " ) लाडू खायचेच. घरभर पणत्या, कंदील, माळांची रोषणाई...  आजी-आई, पहाटे उठवून तेल-उटणे लावून, न्हाऊमाखू घालत. की लगेच फटाके उडवायला आम्ही मुले पळायचो. मागोमाग त्या दोघींनी अतिशय उत्साहाने प्रेमाने केलेल्या फराळाचे ( बेसनाचे, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळे, चिवडा, चकली, कडबोळ्यांनी... ) भरलेले ताट... आधी डोळे तृप्त होत मग गप्पांमध्ये ताट कधी फस्त होई कळतही नसे. आताशा आजी वरून पाहतेय.... आई करायला तय्यार पण अंतराचा टप्पा कसा पार करायचा या चिंतेत. तसे कुरियर करता येईलही पण त्या फेडेक्स/ डिएचएलमधून कशी व्हावी ' ती ' अनुभूती.... सगळीकडे समझोता एक्सप्रेस धरावीच लागते. आठवणी आहेतच आणि त्या तश्याच नाही तरी जमतील तश्या ताज्या करणे आपल्याच हाती आहे. :)

चला तर फराळाचा श्रीगणेशा रव्याच्या लाडूने करूयात... :)

 ' रव्याचा लाडूखरं तर सोप्पा. गणित सहज जमून जाते....  ज्याला जमते त्यालाच. बहुतांशी भाजण्यात फारसा घोळ होत नाही. पण जर का पाक थोडा जरी अल्याड किंवा पल्याड झाला... की फज्जा ! गुलाबजामचा पाकही होता नये आणि गोळीबंदही होता नये. गोळीबंद झाला की भगरा हमखास ठरलेला. लाडू वळता वळेनासा होऊन जातो. मग तुपाची भर... दुधाचे हबके असे करत करत चुकलेल्याची गाडी वळत्यावर आणावी लागते. म्हणून शक्यतो पहिल्याच फटक्यात जमवायचाच.

वाढणी : मध्यम आकाराचे वीस-बावीस लाडू होतील.

साहित्य :

तीन वाट्या बारीक रवा

अडीच वाट्या साखर

पाऊण नारळाचा चव

एक वाटी पातळ केलेले तूप

आठ दहा वेलदोड्याची पूड

थोडे बेदाणे

कृती :

पातळ केलेल्या तुपात रवा मध्यम आचेवर खमंग भाजावा. एकीकडे वेलदोड्याची पूड करून घ्यावी. रव्याचा रंग थोडासा तांबूस दिसू लागला की खवलेले खोबरे घालून नीट एकत्र करून मिश्रण पुन्हा भाजावे. खोबरे गरम रव्यात घालताच रवा एकदम फुलल्यासारखा दिसू लागेल. खोबर्‍यातला ओलेपणा पूर्णतः जाईल इतके पक्के मिश्रण भाजायला हवे.

एका भांड्यात साखर घेऊन त्यात वाटीभर पाणी घालून एकतारी पाक करावा. पाक करताना गॅस समोरून हालू नये. साखर विरघळली की चार -पाच  मिनिटातच किंचित किंचित बुडबुडे येऊ लागतील. अजून दोन मिनिटांनी दोन बोटांमध्ये पाकाचा थेंब घेऊन तार येतेय का पाहावे. पाक पक्का एकतारी झाल्यावर एखादा मिनिटभर आंचेवर ठेवून बंद करावा. उष्णतेमुळे गॅस बंद केला तरी प्रक्रिया होत राहते. तशी व्हायला हवी म्हणून मिश्रण लगेच घालू नये. दोन-तीन मिनिटांनी घालावे.

वेलदोड्याची पूड भाजलेले खोबरे-रव्याचे मिश्रण पाकात घालून एकत्र करून ठेवावे. दर पंधरा-वीस मिनिटांनी मिश्रण पुन्हा नीट एकत्र करावे. तीनेक तासात लाडू वळता येण्यासारखे होईल. वळायला घेण्याआधी हे मिश्रण खूप मळून घ्यावे. मिश्रण मळल्यामुळे हलके होऊन तूप सुटते. चुकून पाक दोनतारी झाला तरीही मळल्यामुळे लाडू वळले जातात. मग प्रत्येक लाडवाला बेदाणे लावून लाडू वळावा. बेदाण्यासोबत बदाम काजूचे छोटे काप किंवा पूडही घालता येईल. ( ऐच्छिक )टीपा :

लाडूंसाठी बारीक रवा घ्यावा. उपम्याचा घेऊ नये. उपम्याचा घेतला तरी लाडू चांगलेच होतात चवीला पण थोडे जाडेभरडे दिसतात.
लाडवात पेढे ( कुस्करून घ्यावेत ) किंवा खवा ( मोकळा करून घ्यावा ) घालायचा झाल्यास चमचाभर तुपावर भाजून घेऊन रवा-खोबर्‍याबरोबरच पाकात घालावा. मात्र यासाठी पाक दोनतारी करायला हवा.

रवा भाजताना आंच नेहमीच मध्यम ठेवावी. जेव्हा थोडा शांतपणे वेळ असेल तेव्हाच करायला घ्यावा. घाईघाईने उरकून टाकू नये... बिघडण्याची शक्यता दाट.

लाडू बिघडलाच तर थोडे तूप गरम करून घालून मळून वळता येतो का ते पाहावे. पाक कमी ( कच्चा ) झालेला असेल तर थोडासा रवा तुपावर भाजून घेऊन घालावा.

पाक गोळीबंद झाला आहे असे वाटले तर पाण्याचा एक हबका मारून वितळवून घेऊन एकतारी पक्का पाक करावा. मगच मिश्रण घालावे. हे फार सोपे चटकन करता येते. त्यामुळे पुढले संकट टळते.

Monday, November 5, 2012

फारा दिवसांनी पुन्हा एकदा...


 
सहा महिने झाले.... काहीच लिहिले गेले नाही. ब्लॉग शांतशांत झाला. सुरवातीला, लिहूच आठदहा दिवसात असे म्हणता म्हणता महिना उलटला. दिवस त्यांच्या गतीने पसार होत राहिले आणि ब्लॉगचे वाट पाहणे सुरू झाले.... त्याचे पान काही केल्या उलटेना. आधीच दंततोड्याची सलगी संपायची चिन्हे नव्हतीच.... तश्यांत व्हायरल इन्फेक्शन होऊन एकदम १०४ ताप चढला. घसा पूर्ण सुजलेला... एक थेंब पाणीही गिळता येईना झालेले. डॉक्टर म्हणाले की विषमज्वराची सुरवात आहे आणि व्हायरल ब्रॉंकाईट्स नेही जोरदार हल्ला केला आहे. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल हो. माझी तर एकदम तंतरलीच...., " नको हो... दोन दिवस घरीच औषध द्या नं... थोडासा तरी उतरेल की. नाहीच उतरला तर मग माझी शरणागती. होईन बापडी दाखल."   माझा केविलवाणा प्रयत्न. डॉक्टर थोड्याश्या अनिच्छेनेच तयार झाले खरे, पण दिवसातून चार वेळा त्यांना रिपोर्ट करायचा आणि पूर्ण झोपून राहायचे... या अटीवर.   माझ्यात तर डोळे उघडून पाहायचेही त्राण नव्हते. कसे कोण जाणे तापाला माझी दया आली आणि त्याने १०४ वरून १०२ वर उडी घेतली. मग पुढचे पंधरा दिवस तब्येतीत वेळ घेऊन १०१ - १०० पुन्हा १०१, पुन्हा १००.... मग ९९... एक पाऊल पुढे तर दोन मागे असा मनसोक्त खेळ करून तापाने तोंड काळे केलेमात्र जाताना आठवणीने माझ्यातली संपूर्ण शक्ती, उत्साह आणि चव घेऊन तो गेला. महिनाभर मुंगीच्या कणकण जमवण्याच्या अथक प्रयत्नासारखे लढून तापाला फितूर झालेले माझे योद्धे परत आणले.
 
 हे सगळे इतके सांगायचे कारण, या सहा महिन्यात माझ्या मित्रमैत्रिणींनी, ब्लॉग वाचकांनी मेल लिहून, फोन करून, टिपण्या टाकून... सतत माझ्यामुक्याझालेल्या ब्लॉगची-माझी आवर्जून विचारणा केली. सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. तुमचा लोभ, प्रेम आहेच... असेच राहू देत. एखादी गोष्ट फार काळ थांबली की सुरवात कुठून करायची इथे पुन्हा गाडे अडते. माझेही काहीसे असेच होतेय. हात थांबला तरी गेल्या सहा महिन्यात जीवन सुरूच होते. घटना... अ‍ॅक्शन... रिअ‍ॅक्शन... मन... विचार... खल... चर्चा... पुन्हा विचार.... थोडक्यात काय... डोक्यातल्या खोक्यात भर पडतच होती. त्यांचा निचरा झाल्यानेबळी तो कान पिळीची गत येऊन ठेपली. कधीही कुठेही अचानकबळीच्याडरकाळ्या ऐकू येऊ लागल्या.... तर कधी दबले हुंदके... मुसमुसणे. या सगळ्याचा गूढ काळपट हिरवा डोह होण्याआधी हातपाय मारयला हवेत ची जाणीव जोर धरू लागली.
 
' सॅंडीने च्यामारिकेत आल्या आल्या दणका दिला. आता ओसरलेय सारे... पुन्हा वारे पूर्ववत वाहू लागलेत. मात्र थंडीने एकदम जोर धरलाय. अधूनमधून पाऊस आणि अशक्य मळभ. म्हणजे, ’ आधीच उल्हास तश्यांत फाल्गुन मास ’. डिप्रेशन दबा धरून बसलेय.... घराबाहेर. त्याला घराबाहेरच थोपवण्यासाठी आणि डो-खोक्यात नवीन भर पडण्यासाठी कप्पे रिकामे करायला घ्यायला हवेत... तेही लगेचच. म्हणून लिहायला बसले खरी.... पण.... मनाची गती हातांना झेपेना... पुन्हा शांतता... पुन्हा प्रयत्न.... आणि अचानक बोटे वेगळ्याच वळणावर जाऊ लागली. गेले काही महिने लिखाण थांबलेले तसं गेली काही वर्षे पेन्सिलही थांबली होती. एकदम हुक्की आली, आज पुन्हा प्रयत्न करावा. जसे येईल तसे... ढेपाळता... पांढर्‍यावर चार रेघा ओढाव्यातच.... लगेच कागद समोर घेतला आणि.....