जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, May 31, 2009

चुर्रर्रर्रर्र...सिझलरजिन्नस

 • तीन मोठे बटाटे उकडून , दोन मध्यम बटाटे जाड सळ्यांसारखे चिरून
 • दोन गाजरे उभी जाड चिरून
 • एक मध्यम सिमला मिरची ( हिरवी ) उभे जाड तुकडे करून
 • पिवळ्या लाल रंगाची मध्यम सिमला मिरची उभे जाड तुकडे करून
 • फ्लॉवरचे मोठे तुरे-तिनशे ग्रॅम
 • दोन मध्यम टोमॅटो उभे चार तुकडे करून
 • दहा-बारा मश्रूम प्रत्येकी दोन तुकडे करून
 • एक मोठी वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी फरसबी जाड तुकडे करून
 • एक मध्यम कांदा जाड तुकडे करून
 • एक वाटी शिजलेला भात.
 • चार मोठे चमचे टोमॅटो सॉस, दोन मिरच्या मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
 • मीठ, एक चमचा जिरेपूड, तीन चमचे साजूक तूप,
  तीन चमचे तेल.

मार्गदर्शन

उकडलेले बटाटे साल काढून मळून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, एक चमचा जिरे पूड चवीपुरते मीठ घालून मळून मध्यम आकाराचे पॅटीस तयार करावे. तव्यावर अगदी जरूरी पुरते तेल सोडून शॅलोफ्राय करून घेऊन बाजूला ठेवावे. एक वाटी मोकळा शिजवलेला भात घ्यावा.

एका कढईमध्ये तीन चमचे तेल घालावे. चांगले तापले की बटाटे, गाजर, फरसबी फ्लॉवर घालून परतावे. मध्यम आच ठेवावी. पाच मिनिटांनी त्यात मश्रूम, कांदा, मका सिमला मिरची घालून पुन्हा सगळे पाच मिनिटे परतावे. नंतर त्यात टोमॅटो घालून तिनचार मिनिटे आच थोडी वाढवून परतावे. आता त्यात टोमॅटो सॉस चवीनुसार मीठ घालून परतावे. मिश्रण ओलसर झाले की त्यात शिजवलेला भात घालून हलक्या हाताने ढवळावे.

बिडाचा तवा (
सिझलर चे पॅन ) मोठ्या आंचेवर ठेवावा. त्यावर कोबीची पाने सोडवून लावावीत. नंतर त्यावर तयार केलेले पॅटीस तयार मिश्रण पसरावे. बिडाचा तवा तापला की कोबीची पाने किंचित करपल्याचा वास येऊ लागेल, मग त्यावर एक चमचा तूप टाकावे. तुपामुळे सुंदर सुवास येईलच, शिवाय खुमारी वाढेल तसेच थोडा धूर निघू लागेल. लागलीच वाढावे.

टीपा
तूप घालायचे नसेल त्यांनी चमचाभर व्हिनीगर टाकावे. परंतु तुपामुळे अप्रतिम चव येते. हे असे चुरचुरणारे, धूर येणारे सिझलर पाहुण्यांसमोर आणलेत की त्याच्या सुंदर वासाने दृष्यस्वरूपाने सगळेच खूश होतील.

Saturday, May 30, 2009

कोरल क्रोशे -The beautiful math of coral


प्रदूषणाने निसर्गाचा समतोल ढळला आहे, अव्याहत ढळतो आहेच. ह्यावर कशी मात करता येईल ही चर्चा गेली अनेक वर्षे सतत होते आहेच. ह्या प्रयत्नांनी खूप प्रमाणात जनजागृतीही झालीय. सगळ्या लोकांना किमान थियरी म्हणून तरी हे नक्की पटलेले आहे. आचरणात आणताना अजूनही आपण अनेकदा कमी पडतो परंतु जाणीव आहे. प्रदूषण सगळ्या थरात होत आहेच, हवा, जमीन, पाणी आणिही बऱ्याच गोष्टीत.

काही दिवसांपूर्वी एक सुंदर चित्रफीत पाहावयास मिळाली. पाण्यात, खास करून समुद्रात सापडणारे कोरल्स आपण बरेचदा पाहतो. प्रत्यक्षात, कधी डिस्कवरीवर. अप्रतिम रंग, आकार. एक वेगळीच मोहक नगरी आहे ही. अत्यंत आकर्षक असे हे समुद्री जीव माणसाच्या स्वार्थापायी, हलगर्जीपणामुळे दुखावले जात आहेत. काही ठिकाणी तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मासे, अनेक प्रकारचे वेगवेगळे जलचर कोरल्स हे परस्परांसाठी पूरक असल्याने ह्या सगळ्यांवर प्रदूषणाचा एकत्रित परिणाम ठळक दिसू लागला आहे. नष्ट होत चाललेल्या कोरल्सना क्रोशेच्या माध्यमातून वाचविण्याचा एक आगळाच उपक्रम Margaret Wertheim राबवीत असून जगभरातून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विणलेले काही नमुने चित्रफीत सोबत दिली आहेच. जरूर पाहा. धन्यवाद.


चित्रफीत येथे पहा:

Friday, May 29, 2009

फक्त तीस रुपयांसाठी...

आमच्या काश्मीरच्या ट्रीपमध्ये खूप मजा येत होती पण त्याचबरोबरीने बऱ्याच घटनाही घडत होत्या. युसमर्ग पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी खिलनमर्गला जायचे ठरले. सकाळी लवकर उठून आवरले. वीरनने केलेल्या सुंदर नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही सगळे बस घेऊन खिलनमर्गच्या पायथ्याशी पोचलो. सासू-सासरे व मामा-म्हणजे आमच्या ट्रीपचे संचालक ह्यांनी आधीच पाहिले असल्याने तुम्ही जाऊन या आम्ही इथेच बाजारात भटकतो. असे म्हणून ते गेले. राहिलो आम्ही तीन फॅमिलीज. टोळेकाका व काकूही तिनचार वेळा जाऊन आले होते परंतु त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यामुळे ते दोघे, आम्ही दोघे व जयवंत फॅमिली- अनिल, शुभा व त्यांची चार वर्षाची जुळी गोड मुले-अभिषेक व अभिजित.

टोळेकाका म्हणाले मी व कमू घोड्यावरून जाणार आहोत. बाकी आम्हा सगळ्यांना स्लेजचा (
Sledges ) अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही आमच्या आसपास रेंगाळत असलेल्या स्लेजवाल्यांशी बोलू लागलो. काश्मीरमध्ये फक्त काहीच महिने पर्यटक येत असल्याने जोतो जास्तीत जास्त कमाई करण्याच्या मागे. तरीही भोवती स्लेजवाल्यांची गर्दी असूनही त्यांनी आम्हाला अजिबात भंडावले नाही की एकमेकांशी हमरीतुमरीवर आले नाहीत. आम्हाला चार जणांची गरज होती. ज्यांच्याशी आम्ही भाव केला तेवढेच स्लेजवाले बोलत होते. बाकीचे शांतपणे उभे राहिले. नवऱ्याला मुळातच घासाघीस करणे ह्या प्रकाराचा तिटकारा असल्याने त्याने दोन मिनिटात दोघांना बुक केले. चाळीस रुपये प्रत्येकी आणि स्वखुशीने टीप द्यायची. अनिल मात्र बराच वेळ हो नाही करत होता. शेवटी आम्ही जे ठरवले त्याच भावाने त्यानेही दोघांना ठरवले. एवढे होईतो ऊन बरेच चढले.

टोळेकाका व काकू घोड्यावरून निघाले आणि आम्ही सगळे चालत, उड्या मारत. त्यावर्षी प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने खिलनमर्ग संपूर्णपणे मढले होते. अगदी पायथ्याशी असलेल्या बस स्टँडही बर्फाने माखला होता. पांढराशुभ्र भुसभुशीत चमकणारा बर्फ अतिशय सुंदर दिसत होता. त्यामुळे थंडी असूनही छान आल्हाददायक वाटत होते. मी दोघा अभींना बोटाला धरून अक्षरशः उंडारत होते. स्लेजवालेही आमच्याबरोबर चढत होतेच. तासाभरात आम्ही सगळे अगदी वर जाऊन पोचलो. खूप उंच चढ आणि हळूहळू विरळ होत जाणारा ऑक्सिजन ह्याने दमलो, घामेजलो. बर्फात चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या घामाचे फोटो काढून झाले. मग तो गोठतो का पाहूया म्हणून दोन मिनिटे टेकलो. सकाळचा नाश्ता कधी जिरला तेही कळले नाही. प्रचंड भूक व तहान लागलेली. पाणीही आणले नव्हते- त्यावेळी ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल्सचे पेव फुटलेले नव्हते. आता काय करावे, असे म्हणत असतानाच..

नवऱ्याला थोडी दूरवर एक छोटिशी झोपडी असल्यासारखे वाटले. तो पळतच पाहायला गेला. मोठ्ठे स्माईल घेऊन परत आला व म्हणाला , " चला पटकन सगळे, देवानेच पाठवलेय त्याला आपल्यासाठी. " पोरे तर केव्हाच पळाली, आम्हीही मागोमाग पोचलो. पाहतो तो काय अगदी नवरा म्हणाला तसेच होते. एक काश्मिरी छोले व बटाट्याचे परोठे तयार करून बसला होता. ह्या दोहोंचा सुंदर वास आसमंतात पसरला होता. पोटातली खवळलेली भूक तोंडावाटे टपकायला लागली. अहाहा!! आज आमचे लक फारच जोरावर होते तर. त्याने अगदी अगत्याने सगळ्यांना भरभर वाढले. बर्फावरच बसून चवीचवीने आम्ही सणसणीत छोले व लुसलुशीत तुपाने माखलेल्या परोठ्यांचा समाचार घेतला. त्याच्याकडे पाणीही होते त्यामुळे अजूनच शांती झाली. त्यावर अमृततुल्य मसालेदार चहा पिऊन तृप्त झालो. फक्त सात-आठ माणसांना पुरेल इतकेच अन्न त्याने बनविले होते. ते आम्ही संपवल्याने तोही खूश होऊन पैसे घेऊन निघून गेला. माझ्या नवऱ्याने त्याला अंमळ जास्तच पैसे देऊ केले. इतका आनंद कद्रूपणे वागून कधीही फेडायचा नसतो हे त्याचे म्हणणे बरोबरच होते.

मग भरल्या पोटी तृप्त मनाने आम्ही दोनतीन तास तिथे हुंदडलो. बर्फाचे गोळे फेकून मारामारी केली. लोळलो, पडलो-झडलो. पुन्हा उठून तेवढ्याच उत्साहाने खेळलो. करता करता चार वाजले. आता खाली उतरायला हवेय नाहीतर बस जायची हे लक्षात आले. हा सगळा वेळ स्लेजवाले बाजूला बसून आमची गमत पाहत होते. त्यांना दररोजचीच सवय असल्याने एकीकडे त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. आम्हाला निघालेले पाहून एक एक जण प्रत्येकाकडे आला. टोळेकाका-काकू तोवर निघालेही होते. स्लेजवरती बसताना स्लेजवाला पुढे बसणार आणि एका माणसाने त्याच्या मागे त्याला घट्ट धरून बसायचे की तो घसरत आपल्याला खाली घेऊन जातो. ह्यात स्पीड चांगलाच जाणवतो. खूपच धमाल येते. आधी कधीच असे केलेले नसल्याने पडायची थोडी भीती असते खरी पण हे स्लेजवाले एकदम तरबेज असतात. शिवाय त्यांना बक्षिसी हवीच असते त्यामुळे ते अगदी सांभाळून नेतात.

आम्ही सगळे एकेकाच्या मागे बसलो. अनिल-शुभा प्रत्येकी एक अभी घेऊन बसले. निघालो. मी तर अगदी जीव मुठीत घेऊन बसलेली. प्रथम त्या स्लेजवाल्याचे जाकीट धरलेले. एकदा का स्लेजने स्पीड पकडल्यावर कसले जाकीट धरतेय त्या स्लेजवाल्याला घट्ट धरले. नवरा खोखो हसत होता. म्हणाला, " मी तुला आधीच सांगितले होते की त्याला मिठी मारून बस. पण तू वेडाबाई... " खूपच जोरात चाललो होतो पण स्लेजवाला तयारीचा असल्याने मज्जा आली. मी आणि नवरा खाली येऊन पोचलो. दोघेही खूश होतो. नवऱ्याने आमचे दोघांचे रु.ऐंशी व बक्षिसी म्हणून अजून रु.पन्नास वर इतके पैसे देऊन स्लेजवाल्याला मोकळे केले. वर मिळालेल्या पन्नास रूपयाने तो फारच खूश झाला. तोवर अनिल-शुभा व पोरेही येऊन पोचली.

माणसे जरी चार असली तरी स्लेजवाले दोनच होते त्यामुळे त्यांनाही ऐंशीच रुपये द्यायचे होते. ते त्यांनी दिले व वर वीस रुपये बक्षिसी दिली . तिथेच आजूबाजूला आमचे स्लेजवालेही होतेच शिवाय गिऱ्हाईक मिळवण्यासाठी म्हणून बसलेले जवळजवळ चाळीसपन्नास जण होते. अनिलच्या स्लेजवाल्याने जाऊन आमच्या दोघांना विचारले तुम्हाला किती रे मिळाली बक्षिसी? आता आम्ही पन्नास दिल्याने ते आनंदात होते त्यांनी अगदी नोटा नाचवून दाखविल्या. ( आजच्या काळात पन्नास रुपयात एवढा आनंद होऊ शकतो का हा प्रश्न पडेल काही जणांना पण वीस-बावीस वर्षांपूर्वी पन्नास रुपये खूप जास्त होते. ) झाले, ते दोघेजण पळत अनिलकडे गेले आणि म्हणू लागले, " साबजी देखो ना आपके साथवाले साबजीने पचास रुपये दिये हैं, आपभी दिजीये. हम खूश हो जायेंगे." काश्मिरी लोकांचे हिंदी आणि मुंबईचे हिंदी म्हणजे एकदम दोन टोके. त्यांना सतत मान द्यायची आणि दुसऱ्याकडून घ्यायची सवय. आणि इकडे मुंबईत आम्ही टिपीकल बंबईया हिंदीवाले, पटकन अरेतुरे वर येणारे.

अनिल म्हणाला, प्रथमच ठरले होते बक्षिसी देताना जबरदस्ती नाही करायची. जे खुशीने देऊ ते घ्यायचे. त्याने पन्नास दिले म्हणजे मी पण द्यायला पाहिजे हे तू कोण सांगणार. मला वीसच द्यायचेत ते मी दिलेत तेव्हा तुम्ही जा आता. बाचाबाची सुरू झाली. स्लेजवाले हटून बसले आणि अनिलही ऐकेना. नवरा मध्ये पडून म्हणाला की कशाला वादावादी करतोस देऊन टाक नाहीतर मी देतो. तर अनिलला तेही पटेना. अनिल एकदम अरेतुरे करून जोराजोरत बोलत होता.

अभिषेकच्या बुटात बर्फाचा मोठा गोळा बराच वेळ राहिल्याने त्याच्या टाचेची संवेदनाच गेली होती. मी आणि शुभा हाताने टाच घासून उब आणण्याचा प्रयत्न करीत होतो. पाहतापाहता तिथे बसलेले सगळे स्लेजवाले अनिल व नवऱ्याभोवती गोळा झाले. माझ्या मनाने लागलीच अशुभ संकेत द्यायला सुरवात केली. शुभाला म्हटले, " अग, आपण दुसऱ्याच्या गावात आहोत, त्यात इथे एकही माणूस दिसत नाहीये ह्यांच्याशिवाय. काहीतरी विपरीत घडले तर फार मोठी भानगड होऊन बसेल. तू तरी सांगून बघ." तिने नुसतेच हात झटकले व म्हणाली, " काहीही उपयोग होणार नाही. तो माझे ऐकणार नाही उलट आणिकच चिडेल. तू शांत राहा. मला ह्याची सवय आहे. " तिला असली तरी मला नव्हती त्यामुळे मी नवऱ्याकडे धाव घेतली.

तोच अनिलने त्याच्याही नकळत दररोजच्या सवयीने शिवी दिली. गुजरातीत वेडा अश्या अर्थाची. ते ऐकले मात्र, सगळे स्लेजवाले हातातल्या स्लेज घेऊन मारण्याच्या तयारीत अंगावर येऊ लागले. त्यांच्यात एक जण थोडा वयस्कर होता त्याने तरुण पोरांना कसेबसे थोपवत माझ्या नवऱ्याला म्हटले, " साबजी, आपके मित्रको समझाईये. ये काश्मीर हैं, बंबई नही. पैसा नही मिले कोई बात नही मगर ये गालीगलोच नही किजीयेगा. यहा ये सब नही चलेगा, देख रहे हो ना? ये बच्चे आप सबको काटकर उपर फेंक देंगे किसी को कुछ पता नही चलेगा. बालबच्चे औरते साथ लेकर ऐसे तमाशा नही करते. समझाईये उन्हे."

दोन क्षणात इतकी भयंकर स्थिती ओढवली होती की आम्ही सगळे थरथर कापू लागलो. अनिलला गप्प बस एकदम असे म्हणत नवऱ्याने स्लेजवाल्यांना पैसे देऊन, " भैय्या माफ करना, हमलोगोंकी हिंदी ऐसीही हैं. इसमे आप लोगोंका अनादर करने का हमारा कोई इरादा नही था " असे सांगत क्षमा मागितली. तेव्हा कुठे ते सगळे पांगले. दोन्ही पोरांना कडेवर घेऊन पळतच बसस्टँड गाठला. ह्या सगळ्या रामायणातही अभिषेकच्या टाचेवर त्यातल्याच एका स्लेजवाल्याने दिलेली रम टाकून चोळल्याने त्याच्या पायात जान आली होती. बसमध्ये बसलो आणि पोचलो एकदाचे हॉटेलवर तेव्हा कुठे जीवातजीव आला.

माझा नवरा नेहमी म्हणतो, परक्या ठिकाणी जाऊन माणसाने नेहमी तारतम्य आणि सामंजस्य ठेवून वागावे. उगाच छोट्याछोट्या गोष्टींमध्ये अडेलतट्टूपणा करू नये. त्या स्लेजवाल्यांचे थोडे चुकलेच होते परंतु कधी कधी प्रसंग पाहून चूक का बरोबर ह्या तात्त्विक वादात न पडता पटकन ताण मोकळा करून टाकावा. त्यात लहान मुले व बायको बरोबर आणि घरापासून इतके दूर. नेव्हर. फक्त तीस रूपयांसाठी जीव गमवायची वेळ आली होती.

Thursday, May 28, 2009

मेथीची गोळा भाजी.जिन्नस

 • मेथीची जुडी ( मध्यम )
 • तीन चमचे बेसन
 • पाच/सहा चमचे दही (थोडेसे आंबट असल्यास उत्तम )
 • आठ/दहा लसूण पाकळ्या, चार सुक्या मिरच्या, दोन चमचे तिखट
 • चार चमचे तेल

मार्गदर्शन

मेथीची पाने व कोवळ्या काड्या खुडून स्वच्छ धुऊन कुकरला दोन शिट्या करून शिजवून घ्यावे. थोडेसे थंड झाले की मिक्सरमधून काढावे. ह्या वाटलेल्या गोळ्यात, दही, बेसन, दोन चमचे लाल तिखट व चवीपुरते मीठ घालून चांगले घोटावे. जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण घालून मध्यम आचेवर ठेवावे, ढवळत राहावे. घट्ट वाटल्यास एक भांडे पाणी टाकावे. मिश्रण खदखदू लागले की गॅस कमी करून झाकण ठेवावे. पाळीमध्ये तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापले की नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला लसूण व लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. लसूण किंचित करपला की ही खमंग चुरचुरीत फोडणी तयार भाजीवर ओतावी. गरम भाकरी बरोबर मेथीची गोळा भाजी अप्रतिम लागते.

टीपा

वाफाळता भात त्यावर मेथीची भाजी व पोह्याचा पापड, मस्त.

Wednesday, May 27, 2009

अशीही एक वटपौर्णिमा.

नेहा-अजयचे नुकतेच लग्न झालेले. लाडात वाढलेल्या नेहाचे सासरीही कोडकौतुक होत होते. लग्न होण्याआधीच मुलासाठी वेगळा ब्लॉक घेऊन ठेवल्यामुळे राजा-राणीचा संसार सुरू झाला. दोघेही नोकरी करत होती. स्वयंपाक प्रकार फारसा नव्हताच. रास्तही होते. प्रेमाचे फुलपाखरी दिवस पुरेपूर सार्थकी लागत होते. अजय समजूतदार होता, आई व नेहा ह्या दोघींनाही नीट हँडल करीत होता. आईचा टोकाचा आग्रही स्वभाव जाणून होता. बाबांसारखे वाद नको म्हणून गप्प राहणे इतके दिवस चालून गेले असले तरी आता नेहमीच तसे करता येणार नव्हते. नेहा आपल्याच विश्वात रमणारी व कोणालाही मुद्दामहून खेटायला न जाणारी होती.

सगळे आलबेल असताना एके दिवशी आईचा फोन आला. " आम्हाला दोघांना आता एकटे राहायचे नाही व तुम्हाला मोठे घर घ्यायचे आहे. तेव्हा आमचे घर विकून टाकू व तुम्हाला हवे तिथे मोठा फ्लॅट घेऊ पण बरोबर राहू. " झाले. नेहा वैतागली, संतापली, बिथरली. सहा महिन्यापूर्वी तर अगदी गोडगोड बोलत होत्या, " अग वेगळे राहिल्याने सगळ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहील व भांड्याला भांडी आपटणार नाहीत. आम्हाला मोठे घर हवे हे निव्वळ निमित्त, शिवाय येताजाता उपकार ऐकावे लागतीलच."

बाबा व अजय गोंधळले. अजय बाबांच्या मागे लागला काहीतरी तोडगा शोधा. बाबा म्हणाले तुझ्या लग्नाआधी मोठ्या शिताफीने तुझ्या आईला तिच्याच अहम च्या खोड्यांत अडकवून तुम्हाला वेगळे राहायला द्यायला वळवले होते. पण तिच्या समोर आम्हाला मोठे घर घ्यायचे आहे हे नेहाने दोन-तीनदा बोलून स्वत:च धोंडा पाडून घेतला आहे. आता कठीण आहे बाबा. नेहमीप्रमाणे आईने आपला हेका पूर्ण केला व दोन महिन्यातच दोन घरे एका मोठ्या घरात एकत्र नांदायला लागली.

इतके दिवस सुनेचे कोडकौतुक करणाऱ्या अजयच्या आईला नेहाची प्रत्येक गोष्ट खटकू लागली व ती बाबांचे डोके खाऊ लागली. बाबा आपल्या परीने वेळप्रसंग पाहून कधी सुनेची तर कधी बायकोची बाजू घेऊन घरात सामंजस्य टिकून राहावे म्हणून प्रयत्न करीत होते. एकीकडे स्वत:चे राहते घर हिच्या हट्टापायी विकून टाकले ह्याचा खेदही होत होता. इकडे नेहा जास्तीतजास्त वेळ बाहेर राहू लागली. घरी आले की जणू तुरुंगात आल्यासारखे वाटे. काहीही केले तरी दोन डोळे सतत पाठलाग करीत असतात ही जाणीव तिला छळू लागली. काही दिवस तिने सासूबाईंना खूश करायचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. उलट किती नाटकी आहे भवानी, इत्यादी शेलके रिमार्क्स ऐकायला मिळाल्यावर नाद सोडून दिला.

नेहाच्या आईला थोडीफार कल्पना आलेली होतीच. तिच्या परीने ती नेहाला सबुरीने घे, दुर्लक्ष कर. साध्या साध्या गोष्टींमध्ये काहीतरी वाकडेच आहे हे शोधू नकोस असे सांगत असे. पण नेहा त्रास करून घेतच होती. अजय बरोबरही आजकाल चांगला संवाद घडत नव्हता. आईने आज अमुक केले तमुक केले हे ऐकून अजय वैतागू लागला होता हेही तिला दिसत होते. इकडे आईही मध्येच त्याला पकडून नेहाची गाऱ्हाणी करी. तुझा काहीही कंट्रोल नाही म्हणूनच ती माझ्याशी असे वागते असे सारखे त्याला बोलू लागली. इकडे आड तिकडे विहीर अशी अजयची अवस्था होऊ लागली होती.

तशात वटपौर्णिमा आली. सुनेचे आधीचे सण अगदी कौतुकाने साजरे करणारी बायको बिलकुल हालचाल करत नाही हे पाहून न राहवून बाबांनी विचारले, " अहो, विसरलात का? वटपौर्णिमा आहे उद्या. " त्यावर फणफणत, " माहिती आहे बरं का, अजून मी विसरभोळी नाही झालेय. नशीब माझे. नाहीतर काय काय अंगाला चिकटवले असतेत कोण जाणे. जाणार आहे मी फेऱ्या मारायला. तुम्हाला नकोच असेन पण मी बरी सोडेन तुम्हाला. " ह्या माऱ्याने बाबांनी कोपरापासून हात जोडून, " अग बाई, विषय कुठून कुठे नेतेस गं? अग मलाही तूच हवीस, दुसरी तुझ्यापेक्षा कजाग निघाली तर ... " असे म्हणून मोठ्याने हसून बाबांनी वातावरण थोडे हलके करायचा प्रयत्न केला. आणि नवल म्हणजे चक्क आई हसल्या.

" बरं, बरं. कळतात हो मला तुमचे टोमणे. मग मघाशी कशाला आठवण करून देत होतात? " " अग, नेहाची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना? मग तिला साडी किंवा काहीतरी दागिना घेणार आहेस की नाही? का आधीच आणूनही ठेवले आहेस? तसे तुझे नियोजन अचूक असतेच म्हणा. " बाबांनी अजूनच चढविले. " हे बघा, मघाशीच माझ्या लक्षात आले होते ही संभाषणाची गाडी कुठे वळणार आहे ते. तुम्ही मला हरभऱ्यावर चढवताय हेही समजतंय मला. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. मी नेहाला द्यायला काहीही आणलेले नाही आणि आणणारही नाही. आणि ती कार्टी कुठे पुजणार आहे वडाला. उलट मलाच कसा मूर्खपण करताय म्हणून दोन शब्द सुनावेल. " असे म्हणून आई तिथून उठून गेल्या. बाबा हताशपणे बसून राहिले.

रात्री नेहा-अजय खूप उशीरा आले. सगळी संध्याकाळ आई करवादत राहिल्या, " बघा, ना लेकाचा पत्ता ना सुनेचा. ठरवून गेली असतील हादडायला. अजयने नाही तरी नेहाने नको का कळवायला? एक तर मरमर कष्ट करून ह्यांच्यासाठी गरम जेवण करून ठेवायचे आणि हे जेवून आले तर पुढचे दोन दिवस ते शिळे तुकडे आम्ही गिळायचे. ते काही नाही आज येऊच देत, चांगली खरड काढते. तुम्ही त्यांची बाजू घ्याल तर खबरदार. " आज ही बाई गप्प बसणार नाही ह्याची खात्री वाटल्याने बाबांना फार अस्वस्थ वाटायला लागले. नेहा-अजय आले तोवर बाबांचे बिपी फारच वाढले होते.

अजय-नेहाला पाहिल्याक्षणी आईंनी तोंड सोडले, " अरे किती वेळ? साधा एक फोनही करता येत नाही का तुम्हाला? काय गं नेहा, तो सेलफोन नुसता मिरवायला घेतला आहेस का? " काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असा विचार करत नेहा वळली तोच तिची नजर बाबांवर गेली. " बाबा, अहो बाबा असे का बघताय? अरे अजय बघ रे, बाबांना बरे नाहीये का? " असे म्हणत जवळजवळ धावतच ती बाबांजवळ पोचली. अजयही पाहू लागला. आईंना वाटले की वाद वाढू नये म्हणून बाबा ढोंग करताहेत. त्या एकदम ओरडून म्हणाल्या, " काही झालेले नाही त्यांना. मेली सदानकदा सुनेची बाजू घेत राहा. मीच काय ती वाईट आहे ह्या घरात. " इकडे तोवर बाबांची शुद्ध हरपली होती. ते पाहिल्यावर मात्र आई घाबरल्या." अग बाई म्हणजे हे ढोंग करत नव्हते तर, माझे मेलीचे लक्षच नाही गेले." हे सगळे आपल्यामुळेच झालेय ह्या जाणीवेने त्या हवालदील झाल्या.

नेहाने पटकन पाणी आणून बाबांना पाजण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तशी तिने तिच्या डॉक्टर मित्राला फोन लावून बिपी वाढले असावे त्यानेच बहुतेक बाबा बेशुद्ध पडले असावेत हे सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे बाबांना गाडीत घालून सगळेजण त्याच्या हॉस्पिटलमधे गेले. लागलीच उपचार मिळाल्याने बाबांना थोड्याच वेळात शुद्धही आली. बिपीही खाली येत होते. आता काही धोका नव्हता. आजची रात्र राहू दे इथेच उद्या सोडतोच घरी असे डॉक्टरने सांगितल्यानंतर नेहाने अजय व आईला घरी जाण्यास भाग पाडले व ती स्वतः बाबांजवळ बसली.

हा सगळा वेळ आई खूप कष्टी झाल्या होत्या. किती वेळा मला हे समजावून सांगतात पण मी माझेच म्हणणे रेटत राहते. स्वतःचाच हेका चालवण्याच्या स्वभावाने सगळ्यांना त्रास देते. उद्या मला जर काही झाले तर नेहा सोडाच माझा पोटचा मुलगाही प्रेमाने धावायचा नाही. काल आलेली पोर पण नुसते बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून तिला कळले, खरे तर मला कळायला हवे होते. हे दोघे आले नसते तर ह्यांचे काही खरे नव्हते. उद्याची वटपौर्णिमा कशी केली असती मी. प्रत्येकाच्या स्वभावात दोष असायचेच.

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर... , माझे असेच चालले आहे हल्ली. सारखे नेहा कुठे तावडीत सापडतेय हेच मी शोधत असते. कुचकट बोलून पोरीला भंडावून सोडलेय, आता तर ती माझ्याकडे पाहात सुद्धा नाही. मग तिला वाटेलच ना,
माय म्हण् ता म्हण ता
होट होटाशी हो मिळे
सासू म्ह ण ता म्ह णता
गेला तोन्डा वते वारा ... , ह्या अश्या ओव्या नुसत्या तोंडपाठ. काय उपयोग त्यांचा, डोक्याचे झालेय भूसकट. पण आता नाही. थोडक्यात निभावलेय. ह्यापुढे सगळ्यांना आपण हवेसे कसे वाटू हेच पाहायचे. होईल थोडा त्रास सुरवातीला पण आता बदलायलाच हवे. कोण जाणे पुन्हा अशी संधीही मिळेल न मिळेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजताच डॉक्टरने बाबांना घरी सोडले. बाबांना घरी आणून चहा देऊन बेडवर झोपवून खोलीबाहेर पडणाऱ्या नेहा-अजयला आईंनी हात धरून बसवून घेतले. सोनेरी बुट्ट्यांची हिरवीकंच गर्भरेशमी सुंदर साडी व स्वतःची सोन्याची वाकी नेहाला देऊन तिची ओटी भरली. आग्रहाने नेहाला साडी नेसायला लावून स्वतःच्या हाताने वाकी घातली. आईच्या नजरेतला बदल पाहून नेहा-अजयच काय पण बाबाही चकित झाले. तशी आई पटकन म्हणाल्या, " अरे तुम्ही सगळे असे भूत बघितल्यासारखे का पाहताय माझ्याकडे? नाही म्हणजे मी थोडी खडूसपणे वागते... बरं खूपच खडूसपणे वागते. पण आता मी नेहाची आई होऊन दाखवते की नाही ते पाहाच. आणि नेहा हे मी मनापासून सांगतेय बरे का. "

हे ऐकून नेहाला खूप आनंद झाला. शिवाय वाकी आणि साडीचा आनंदही होताच भरीला. एकदम मोकळेपणाने तिने प्रथमच आईंना मिठी मारली व म्हणाली, " आज मला माझे, माझ्या माणसांच्या प्रेमाने भरलेले घर मिळाले. चला आपण दोघीही जाऊन वडाला नमस्कार करून येऊ. म्हणजे ह्या बापलेकांना आपल्यापासून जन्मोजन्मी सुटका नाही आणि आपल्या दोघींनाही एकमेकीपासून, खरं ना? "

त्या दोघी हसत हसत गेल्या आणि बाबा तटकन उठून बसले. तसा खो खो हसत अजय म्हणाला, " अहो जरा हळू. बरं नाहीये ना? बाबा, मानले तुम्हाला. काय जबरी नाटक केलेत. नेहा तर नेहा पण चक्क आईही फसली. आणि खरं सांगतो, अहो सुरवातीला तर मीही फसलो होतो. तुम्ही डोळा मारलात म्हणून. कमाल म्हणजे त्या नेहाच्या मित्राला-डॉक्टरलाही पटवलेत. आता ह्या दोघी निदान काही वर्षेतरी आपल्याला सुखाने जगू देतील. अर्थात मातोश्रींचा काही भरवसा नाही पण काही काळ तरी ..." बाबा आनंदाने मान डोलवत नुसतेच गालातल्या गालात हसत राहिले.

Tuesday, May 26, 2009

नकळत केलेले धाडस

लहानपणापासून अनेकवेळा आई-बाबांनी सांगितलेले, नाकासमोर चालायचे. उगाच इकडेतिकडे पाहायचे नाही. रस्त्यात कोणी भांडत असेल, मारामारी सुरू असेल तर क्षणभरही रेंगाळायचे नाही. ते म्हणतात ना चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकूनही जायचे नाही. हे मनावर ठळकपणे बिंबलेले आहे. पण कधीकधी अचानक समोर घडत असलेली घटना नजरेआड करताच येत नाही. अन नकळत हस्तक्षेप केलाच जातो.

माझे सासर घाटकोपरला आहे. लग्न झाल्यावर काही वर्षे आम्ही सगळे तिथे राहत होतो. आमचा मुलगा तान्हा असताना मी बरेचवेळा जेवणे आटोपली की त्याला घेऊन घराजवळ असलेल्या बागेत जात असे. बाग बरीच मोठी व छान ठेवलेली होती. संध्याकाळी तर फार गर्दी असे. बागेच्या मागच्या भागात तुरळक जोड्याही बसलेल्या आढळत. हे प्रमाण तसे डोळ्यात भरण्यासारखे नव्हते शिवाय बागेत दोन रखवालदारही असत. काही आक्षेपार्ह दिसल्यास ते लागलीच योग्य ती कारवाई करत.

रात्री साडेआठ नंतर बरीच शांतता असे. बाळाला घेऊन मी जाई तेव्हा माझ्यासारखे काही लहान बाळे घेऊन नियमित येणारे लोक होते. थोड्या ओळखी झालेल्या. कधी त्यांच्याबरोबर जुजबी गप्पा करून मी फेऱ्या घालत असे. बाळालाही आवडत होते. एक दिवस एक साधारण सोळासतरा वर्षाची मुलगी एका मुलाबरोबर सिमेंटच्या बेंचवर बसलेली दिसली. त्यांच्या अगदी डोक्यावरच म्युन्सिपालीटीचा दिवा होता. म्हणजे चांगले प्रकाशात बसले होते. मुलगी खाली मान घालून अंग चोरून बसली होती. मुलगा अखंड बोलत होता. लांबून मी जवळजवळ पंधरा मिनिटे त्यांना पाहत होते. तेवढ्या वेळात तिने एकदाही मान वर केली नाही की एक शब्दही बोलली नाही. कमाल झाली! असे काय बोलत असेल तो मुलगा हा प्रश्न मला सतावू लागला. पण बरेच वाजले होते आणि बाळ पेंगू लागल्याने मी घरी आले.

आल्याआल्या नवऱ्याला सांगितले. तो म्हणाला, " अग असेल काहीतरी. तू नको विचार करत बसू. " मलाही झोप येत होती शिवाय उद्याची थोडी तयारी आणि ऑफिसचे काही कामही आटपायचे होते त्यामुळे मी तिला तात्पुरते डोक्यातून काढून टाकले. लागोपाठ तिनचार दिवस मला बागेत जाता आले नाही. फारच चुटपूट लागली. त्या मुलीला नक्कीच त्रास दिला जातोय असेच मन सांगत राहिले. चार दिवसाने नेहमीच्या वेळी मी जरासे घाईनेच बागेत गेले. भरभर सगळीकडे नजर फिरवली पण ती कुठेच दिसली नाही. अरे! अजून आली नाही का? किंवा तिला काही त्रास नसेलच. नवरा म्हणतो तसे काही नसेल, उगाच मला भासले असेल. बरे झाले. मी सुटकेचा निःश्वास टाकला. तोच,

जरा काळोखात काहीतरी हालचाल दिसली. पाठोपाठ दबके हुंदके ऐकू येऊ लागले. बाळ कडेवर असल्याने मला तिकडे अंधारात जायला थोडी भीती वाटू लागली. नेमकी बागेतही अगदी तुरळक माणसे होती. रखवालदारही दिसेनात. कोणाला तरी हाका मारून काय चालले आहे हे पाहायला सांगावे म्हणून चक्क रस्त्यावरून चालणाऱ्या दोघातिघांना मी हाका मारल्या. पण त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. शेवटी मी जोरात हाक मारून विचारले, " कोण आहे रे तिकडे? काय चालले आहे? " तसे रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. अंधारातून दोन मुले बाहेर आली आणि माझ्याकडे पाहत निघून गेली.

मी पुढे जाऊन पाहिले तर माझी शंका खरीच ठरली. तीच होती. पाय पोटाशी घेऊन गवतावर पडली होती. तिला उठविले आणि बेंचवर आणून बसविले. लाइटच्या उजेडात तिचा चेहरा नीट दिसत होता. पोरांनी तिला चांगलेच थोबाडले होते. ओठातून थोडे रक्तही आले होते. चुचकारून, धीर देऊन तिला बोलते केले. तिने सांगितले की त्यातला एक तिचा प्रियकर आहे. मागच्या झोपडपट्टीत राहतो. सतत गुंडागर्दी करतो. ही नुकतीच अकरावीत गेली होती. घरची गरिबी असली तरी सगळे ठीक होते. सारखे हिच्या मागेमागे जाऊन, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर असे म्हणून म्हणून त्या पोराने हिलाही त्याच्यावर प्रेम आहे असे वाटण्यास भाग पाडले होते.

गेले काही दिवस तिचा शारीरिक फायदा उठवायला सुरवात केलेली. तिने जे काही सांगितले त्यावरून , चाळे करताना ह्याने मित्राला सांगून फोटो काढले होते. आणि आता ते तिला दाखवून हा तिचा प्रियकर घाणेरडे धंदे करायला भाग पाडू पाहत होता. ती दाद देत नाही हे पाहून दोनतीन दिवस दररोज ही अशी मारहाण सुरू होती. मी तिला म्हटले, " अग आता तुला कळले ना, मग तू येतेस कशाला रात्रीची इथे? आणि आईवडीलांना सांग. ते ओरडतील तुला हे नक्की असले तरीही तेच तुला ह्यातून सोडवतील ना. " तिला पटले नाहीच. घरी मी कुठल्या तोंडाने सांगू? आता मला जीवच द्यावा लागेल. असे म्हणत रडत ती गेली. मला तर काहीच सुचेना.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या ओळखीच्या ऑफिसरना मी हे सगळे सांगितले. ते आधी आर्मी मग पोलिसखात्यात काम करून आमच्या डिपार्टमेंटला आले होते. त्यांनी घाटकोपरला असलेल्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करून ह्या प्रकरणात लक्ष घालायला सांगितले. इन्स्पेक्टरने मला नेहमीच्या वेळी बागेत यायला सांगून ते तिथे साध्या वेषात उपस्थित असतीलच असे आश्वासन दिले. प्रश्न होता की ती मुलगी आणि ती मुले आज येतील का नाही.

सुदैवाने मी पोचले त्यावेळी ते सगळे तिथे होतेच. बागेच्या गेटवरच इन्स्पेक्टर आणि काही पोलीस साध्या कपड्यात उभे होते. बाळामुळे त्यांनी मला ओळखले आणि सरळ त्या गुंडाशी जाऊन बोलायला सुरवात कर असे सांगितले व सगळे पोलीस पांगले. मी धडधडत्या हृदयाने त्यांच्या दिशेने निघाले होते, पण मला पाहिल्याबरोबर तो गुंड व त्याचा मित्र एकदम माझ्या अंगावर आले. घाणेरड्या शिव्या देत धमक्या देऊ लागले. ती मुलगी खूप मोठ्याने रडत होती. तिच्या मित्राने माझा हात धरला आणि सुरा दाखवून म्हणाला, " चल फुटायचे बघ. पुन्हा जर इथे दिसलीस ना तर ... " बाळ कडेवर आणि तो सुरा पाहून आजूबाजूला पोलीस आहेत हे माहीत असूनही माझी बोबडीच वळली.

पण हे सगळे असे झाले हे पोलिसांच्या पथ्यावरच पडले. क्षणात सगळ्यांनी त्या तिघांना घेरले. त्या दोघांना तिथेच चांगले तुडविले व घेऊन गेले. इन्स्पेक्टरांनी जाताना माझे आभार मानले , म्हणाले ह्याला कधीपासून शोधतोय. तडीपार केला आहे पाच वर्षासाठी. कुणकूण होतीच इथे फिरतोय ह्याची. तुमच्यामुळे सापडला. आता गेला बाराच्या भावात. पोरीला थोडा धाक दाखवून घरी पाठवून दिले त्यांनी. पुढे त्याचे काय झाले मी विचारले नाही. पण त्या मुलीची सुटका नक्कीच झाली होती. ह्या घटनेला एकोणीस वर्षे होऊन गेलीत. ती मुलगी सुखात असेलच. नकळत केलेल्या धाडसाने एका पोरीची वाताहात टळली ह्याचे समाधान मिळाले.

Monday, May 25, 2009

बये, हळू चाल ग...

एक काळाशार वेदनाडोह
माझ्या आस्तीत्वाला व्यापून,
अन रंध्रारंध्राना फुटलेले वेदनांकुर
माझं जिवंतपण तीक्ष्ण करताना
एक विषण्ण एकटेपण मला बिलगून
-----
सयामी जुळ्यासारखं------!
अंतर्ताटव्यातून तू
उखडून चुरगाळलेल्या फुलपाकळ्या
तुझ्या स्पर्शाशी जवळिक साधून होत्या म्हणून
माझ्या हृ्दयाशी कवटाळल्यात मी......!
खर सांगू ___
त्या वेदनाच जोजवतात नि जगवतात मला
पोसतात माझा वेदनोत्कट आत्मबिंदू
तुझं सुख त्या वेदनांतूनच एकवटलेलं...
...... ‌
साठवलेलं
खर ना बये?
मला माहित आहे गं... सारं सारं माहित आहे
कारण ___
तुझ्या रोमांरोमांतून मी भिनलो आहे.
तुझा श्वास - निश्वास हुंकारतो-फुलतो-
-
तो माझ्या हृ्दयस्पंदनांतून.
माझं दुखरं ... जखमी भावविश्व __
___
हाच आनंद आहे ना तुझा?
मग बये,
मुळीच फुंकर घालू नकोस त्या क्षतांवर
भूतदया म्हणूनही.
उलट तुझं माझ्या दुःखातून आकारलेलं सुख __
अबाधित राहावं म्हणून ____
___
रंध्रारंध्राना रक्तकळ्या फुलवीन मी!
रोमारोमाला एकेक अश्रुपिंड निर्माण करीन माझ्या ___!!
कारण तुझ्या सुखासाठीच माझ्या बये,
__
मी नावाच्या कुडीत मनःपूर्वक प्राण फुंकला ___
__
कोणा एका कातर विवक्षित क्षणाने!!
बये __ प्रीतीचा क्रूस पाठीवर अन
स्मृतीचे तुझ्या कफन पांघरून
आहे दुरूनच तुझ्यावर नजर रोखून
मी एक वेडागबाडा.
माझ्यातून ठिबकणाऱ्या रक्तठशांना
तुझ्याविषयी विलक्षण ममत्व,
त्या पायघड्यांवरून तू बिनदिक्कत ___
___
चालत जा .......!
कारण तुझ्यासाठीच अंथरलेत
मी ते रक्तगालिचे.
तुझे मखमल मृदू पायतळ जपण्यासाठी
पण तरीही कधी ठेचकाळलीस
तर त्या रक्तठशांतून बिंदूबिंदूत ___
__ उमलतील
वेदनांची अश्रूपिंड
अन कळवळून हुंकारतील ते
___
बये, हळू चाल ग, हळू चाल .... !!!

Sunday, May 24, 2009

तू बघून घे शेवटचे ह्याला...

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला की काही वर्षेतरी आम्ही आजोबांकडे जात असू. मग दोन महिने धमाल. यावेळीही जायचे ठरले होते. मी तिसरीत आणि भाऊ पहिलीत. जायचे नक्की झाले असले तरी तिकिटे आधीच बुक करावीत हा प्रकारच नव्हता. तशात सुट्या सुरू झाल्यामुळे गाड्यांना तोबा गर्दी उसळे. तरीही नेहमी सगळे जमून जाई त्यामुळेही असेल आमचे बाबा रिझर्वेशन करीत नसत. शिवाय जर काही कारणाने जाणे लांबले तर उगाच कटकट नको हेही एक कारण होतेच.

परीक्षा संपली. जायची तयारी झाली. बाबा सुटी नसल्यामुळे येणार नव्हते. आईने त्यांच्यासाठी थोडे कोरडे पदार्थ बनवून ठेवले आम्हाला प्रवासात खायला लाडू-चिवडा केला होताच. शिवाय शेंगदाण्याचे घट्ट पिठले, दशम्या लसणीची कोरडी चटणीही घेतली होती. बहुतेक आम्ही नागपूर एक्सप्रेसने जात असू. तेव्हा ती बारा साडेबाराच्या दरम्यान सुटत असे. संध्याकाळी मनमाडला पोचे. आजोबांनी पाठविलेली गाडी तयार असेच. तिच्याने रात्रीच्या जेवणाला आम्ही रावळगावला घरात पोचलेले असू.

घरातून निघेतो साडेअकरा झालेले होते. त्यावेळी आम्ही दादरला(पूर्वेला ) राहात होतो. घरापासून स्टेशन चालत पंधरा मिनिटे. भरभर स्टेशन गाठले. पाहिले तर तिकिटाला रांग होती पण सरकत होती. तिकिटे मिळाली. फक्त दहाच मिनिटे उरली होती गाडी लागायला. आम्ही पळतच प्लॅटफॉर्मवर पोचलो पोचलो गाडी लागतच होती. हल्ली मी बऱ्याच वर्षात रिझर्वेशन करता प्रवास केलेलाच नाही पण अजूनही हा प्रकार होत असेलच. यार्डातूनच हमाल/कुली गाडीत चढून काही सीटस अडवून येतात. मग जसे लोक येतील तसे त्यांच्याशी थोडीफार हुज्जत घालून भाव पटला की सीटस विकत असत.

बाबा जवळजवळ धावत्या गाडीतच चढले. मला फार आश्चर्य वाटत असे ज्याज्यावेळी मी बाबांना असे पाही. एकदम धाडशी प्रकार वाटे तो. पुढे वीस वर्षे मीही दररोज हेच करणार आहे हे तेव्हा माहीत नव्हते ना. बाबांनी पाहिले एक हमाल संपूर्ण एक कंपार्टमेंट अडवून बसला आहे. त्याच्याशी भाव करत बाबांनी एक सलग तीन सीटस असलेल्या बर्थवर आमच्या बॅग्ज ठेवल्या. तोवर आम्हाला खिडकीमधून आईने चढविले होते. त्यावेळी खिडक्यांना मधले गज नव्हते. सर्रास बायका मुले, सामान खिडक्यांमधून चढविले जाई. आमच्या मागोमाग आईने बॅग्जही ढकलल्या ती दरवाज्याकडे गेली.

इकडे मी आणि भाऊ सीटसवर टेकलो. बाबा हमाल ह्यांच्यात हुज्जत चालूच होती. तो बाबांकडे तिस रुपये मागत होता आणि बाबा म्हणत होते की मी फक्त दहा रुपये देईन. ह्या सीटस तुझ्या नाहीत तरीही तुझेही पोट आहे म्हणून. तो अजिबात ऐकेना. तोवर इतर सीटस साठीही लोक आलेलेच होते. बाबांचे ऐकून तेही त्याच्याशी भांडू लागले. आईही येऊन पोचली. डब्यात फारच आरडाओरडा चालू झाला होता. मी आणि भाऊ घाबरून रडकुंडीला आलो होतो. गाडी सुटायची वेळ जवळ येत होती आणि हे भांडण संपतच नव्हते.

बाबाही आता फारच रागावले होते. हमाल ऐकत नाही असे पाहून त्यांनी बखोटीला धरून त्याला सीटवरून उठवले आणि आईला बसवले. एकूण आठ सीटस मिळून हमालाचे फारच नुकसान होणार होते. आणि हे सगळे केवळ बाबांमुळे. गाडी सुटली तशी हमालाने कोण देईल तितके पैसे घेतले. इकडे बाबांनीही आईला सगळे झाले ना नीट आता मी उतरतो असे म्हणून आमचे पापे घेऊन उतरायला निघाले. तोच तो हमाल एकदम दातओठ खाऊन बाबांच्या अंगावर धावून आल्यासारखे करून आईला म्हणाला, " तू जा आता गावी. मी बघतोच ह्याला उद्या. दररोज.०४ फास्ट पकडतो तीन नंबरवरून, माहीत आहे मला. कापूनच टाकतो साल्याला. तू बघून घे शेवटचे ह्याला. " असेम्हणून तो गेलाही उतरून.

तोवर गाडीही बरीच पुढे आली होती. आता प्लॅटफॉर्म संपणार अशी वेळ आल्याने बाबांनाही उडी टाकावीच लागली. बाबा आईला खुणा करून काहीतरी सांगत होते पण गाडीने वेग घेतल्याने काही कळले नाही. आई रडायलाच लागली. तो जे काही बोलून गेला त्याचे गांभीर्य कळायचे आम्हा मुलांचे वय नसले तरी तिला समजत होते. आत्तासारखे सेलफोन तर सोडाच साधा फोन ही आमच्या घरी नव्हता. त्यासाठी पोस्टात जाऊन ट्रंककॉल बुक करावा लागे. मात्र आजोबांकडे घरी फोन होता. त्यामुळे जर बाबांनी फोन केला तरच त्यांची खुशाली आम्हाला कळली असती. परंतु हे सारे करणाऱ्यातले आमचे बाबा नव्हतेच( अजूनही नाहीत ) मुळी.

डब्यातले सगळे आईची समजूत घालू लागले. " अहो ताई, घाबरू नका. तो उगाच धमकी देऊन गेलाय. बहुतेक सगळेच आठच्या आसपास लोकल पकडतात ना मग काहीतरी टाईमींग फेकले त्याने तोंडावर. तो काहीही करणारनाही. एवढा वेळ कुठेय त्याच्याकडे. तो गेला असेल आता दुसऱ्या गाडीत सीट अडवायला. तुम्ही धास्तावून जाऊ नका. " आईला हे कसे पटावे? आता रडून तरी काय होणार आहे असे वाटून असेल काही वेळाने ती शांत झाली. आम्ही दोघे तर केव्हाचेच खिडकीत रमलो होतो.

सगळे सुरळीत होऊन रात्री आजोबांकडे पोचून जेवणे झाल्यावर आईने आजोबांना सगळे सांगितले. आई तेव्हाही रडतच होती. पुढे तीन आठवड्यानंतर बाबांचे कार्ड आले. मी मजेत आहे काळजी, करू नकोस. तो हमाल पुन्हा मला कुठे दिसलाही नाही.( ह्या वाक्याखाली Underline केले होते. ) तेव्हा तू आनंदात राहा. हे वाचल्यावर कुठे आईचा जीव जरा थाऱ्यावर आला. अजूनही हा प्रसंग आठवला की तो हमाल मला दिसतो आणि त्याचे ते दातओठ खात अंगावर धावून येणे.....

Saturday, May 23, 2009

पालक कॉर्न राईस • पालकाची मध्यम जुडी
 • एक मध्यम कांदा एक टोमॅटो बारीक चिरून
 • एक वाटी मक्याचे कोवळे दाणे
 • चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आले बारीक चिरून
 • छोटा दालचिनीचा तुकडा, तीन लवंगा, पाच/सहा मिरे.
 • अर्धा चमचा शहाजिरे, चार तेजपत्ता, एक चमचा तिखट चवीनुसार मीठ
 • एक वाटी तांदूळ
 • तीन चमचे तेल, तूप ( वाढताना )

मार्गदर्शन

भात मोकळा शिजवून ( कुकरला लावू नये ) घ्यावा. पालकाची पाने व कोवळ्या काड्या धुऊन गरम पाण्यात तिनचार मिनिटे बुडवून मिक्सरवर वाटून घ्यावे. कढईत तेल घालावे. तापले की त्यावर खडा मसाला ( लवंगा, मिरे, दालचिनी, शहाजिरे, मसाला वेलची व तेजपत्ता ) परतावा. त्यावर आले-लसूण, कांदा, टोमॅटो व मक्याचे दाणे घालून मध्यम आचेवर परतावे. अर्धे भांडे पाणी घालून झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी वाटलेला पालक, लाल तिखट, चवी नुसार मीठ व अर्धे भांडे पाणी घालून सगळे मिश्रण एकत्र करून लागलीच झाकण ठेवावे. सात/आठ मिनिटाने आच बंद करावी. वाढताना गरम भात त्यावर गरम भाजी व एक चमचा साजूक तूप घालून कालवून वाढावे.

टीपा

साजूक तुपामुळे भाताची खुमारी अतिशय वाढते. खाणारा खूश होऊन जातो. पालक कुकरला लावू नये, लावल्यास सुंदर हिरवागार रंग येणार नाही.

Friday, May 22, 2009

ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे...

सेल वाजला, तूच होतास.

संध्याकाळी नेहमीच्या जागी, येतेस ना?

हो, येईन.

संध्याकाळ झाली, नेहमीच्या जागी तू उभाच होतास. दूरून दोन मिनिटे न्याहाळले तुला. कुठेतरी खोल अस्वस्थ वाटलं, आजकाल हे वारंवार होतंय. काहीतरी हरवतंय, पण नेमकं काय?

अग किती उशीर? मला वाटलं येतेस का नाही.

म्हणजे ह्यालाही काहीतरी सलतंय का? मी येणार नाही असं आजवर कधी झालं नाही मग ह्याच्या मनात का डोकावला हा विचार?

तू भेट म्हणालास, म्हणून आलेय मी.

ये बसू इथेच, खूप बोलायचेय.

बस म्हणतोस, बरं बसते.

आता हा काय बोलणार आहे?

अरे! हा तर आठवणी घेऊन बसलाय. जुन्या, काळजात रुतलेल्या, हळव्या, कोसळणाऱ्या ... भर माध्यानी बोडक्या झाडा खाली गार गार वाटतंय म्हणणारे आपण, मुसळधार पावसात माझ्या ओढणीचा आडोसा शोधणारा तू..... गर्दीत तुझा हात घट्ट धरणारी मी.

माझा श्वास कोंडलाय.

हे काय ऐकू येतयं. ‌.. सांज सभोती दाटून येई... नेमकी हीच ओळ. का?

कुठल्याही नात्याची कशी अचानक सुरवात होते. आपण प्रवाहात धारेला लागतो. पुढे काय आहे नशिबात हे सुरवातीलाच कळलं असतं तर, अनेक प्रश्न उद्बभवलेच नसते. पण असं नाही होत हेही छानच आहे म्हणा, नाहीतर अनेक ' ' च्या बाराखडीतील शब्दांच्या मागील भावांना आपण गमावून बसलो असतो. 'अनपेक्षित भेटीतला आनंद ', अचानक, अघटित.... अन बरेच काही.

हा आठवणींना कुरवाळतोय. अग त्यावेळी आपण हे का नाही केले? किती वेड्यासारखे वागलो नाही आपण, हा अखंड बोलतोय. नकळत मीही पुन्हा मागे गेलेय. पहिली भेट, कधी बरं... मग दुसरी, चालूच आहेत अव्याहत. भेटीची ओढ, आसुसलेपण होतेच. पण केव्हातरी ते संपून गेलं. छातीतली धडधड विरून गेली. तरीही भेटत होतोच आपण काहीतरी कारण काढून. जणू स्वतःलाच पटवत होतो, आहे अजूनही धुगधुगी आहे.

अनेक निरर्थक शब्द. पोकळ वांझोटे शब्द.

आपली साथ संपत आल्याच्या ठळक खुणा दर्शविणारे आणि म्हणूनच स्वतः बापुडवाणे झालेले केविलवाणे शब्द.

तू अजूनही बोलतोच आहेस परंतु तुझा चेहरा विदीर्ण झालाय. तुलाही जाणवलंय , ह्या नात्याची नाळच तुटली आहे. सांधणं शक्य नाही आता... त्यालाही खूप उशीर झालाय. तरीही तुझा क्षीण प्रयत्न. पण हे काय, तुझ्या शब्दांचे बुडबुडे हवेबरोबर दूर चाललेत. गेले, फुटले...
विरले ...

सारं संपलंय, बघ ते आर्त स्वर सर्वव्यापी झालेत...

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे

ऐकतो आहेस ना? पाचोळा वाजे... तुलाही कळलंय रे. आता काही बोलू नकोस. आठवणींना मोजू नकोस. ह्या खेळातला प्राण विझला आहे. शांत राहा. कधीकाळी सुंदर असलेल्या आपल्या नात्याला अलवार जपून ठेव.

गाव मागचा मागे पडला

पायतळी पथ तिमिरी बुडला

ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे...

Thursday, May 21, 2009

लोकलच्या गमतीजमती -पळा पळा ते सुटलेत...

सहसा संध्याकाळी मी स्लो लोकलच घेत असे. खिडकी पकडून सीएसटीला उलट जायचे. बहुतेक ती ठाणाच लागे. मग तासभर निवांत. लोकलमध्ये आणि निवांत? हो तर. अहो दररोजच्या सवयीने अनेक गोष्टींची मूलभूत संकल्पनाच बदलते म्हणतात ना, तसेच आहे हे. किमान अर्धा तास गाढ झोप आणि काही वेळ परोपकार असे होईतो उतरायची वेळ येतेच. ही झोप सगळी संध्याकाळ उत्साहात घालवण्यासाठी गरजेची असल्याने मी चुकवत नसे. पण कधीकधी घाई असली की नाईलाजाने फास्ट लोकलकडे पळावेच लागे.

फास्ट लोकल म्हणजे त्या त्या भागातील बायकांची मक्तेदारी. काहींच्या मते गाडी थांबते ना मग आम्ही चढणारच, मग जवळ जायचे असो का लांब. तर काहींच्या मते तुम्हाला खंडीभर गाड्या आहेत कशाला मरायला येता इथे? आधीच उभे राहायलाही जागा नाही आणि ह्यांना दादरला जायलाही फास्ट लोकल लागते. हा वाद कधीही संपणारा आहे. चूक कोणाचीच नाही, तरीही काढायचीच म्हटली तर लांब जाणाऱ्यांना थोडे झुकते माप द्यावे लागेल. पण हा विषय पुन्हा कधीतरी.

मी धावतपळत जाऊन बदलापूर लोकल पकडली. दररोजच्या बायकांनी ही कोण आगंतुक आलीय असे भाव डोळ्यात आणून एकमेकीकडे पाहिले. मला लवकरच उतरायचे होते शिवाय आत जाऊन कोणा लांब जाणारीची जागा अडवायची माझी इच्छाही नव्हती. काय भरवसा नंतर इतकी गर्दी होईल की ह्या बाया मला जातील घेऊन पार डोंबिवलीपर्यंत ही भीतीही होतीच. मी दाराजवळच थांबले. सीएसटीलाच गाडी भरली होती. त्यातही लागलीच विणकाम, वाचन, काल गप्पा जिथे थांबवल्या तिथूनच पुढे चालू केल्या. फेरीवाल्यांनची वर्दळ सारे सारे जोरात सुरू झालेले. गाडी सुटली. पाच मिनिटात भायकळा आले. उतरणारे कोणीच नव्हते, त्यामुळे हल्ला बोल करीत तीनही दरवाज्यातून मुसंडी मारून सैन्य घुसले. भराभर आपापल्या मैत्रिणी शोधून स्थिरावलेही.

गाडी सुटणार तोच एक कोळीण भली मोठी टोपली घेऊन दाराजवळ आली. मालाच्या डब्यापर्यंत तीला पोचणे शक्य नव्हते म्हणून बायकांच्या डब्याकडे तिने मोहरा वळवला होता. कोळणीच्या पाटीतल्या पाण्याचा एक थेंब जरी अंगावर पडला तरी काय होते ह्याचा अनुभव अनेक जणांनी घेतलेला असेलच. त्यातून डब्यात मुंगीलाही जागा नाही अशी परिस्थिती झालेली. तिला पाहताच सगळ्यांनी एकच कालवा केला. दाराशी उभे असणाऱ्यांची जबाबदारी असते अशावेळी खिंड लढवायची. त्यांनी अगदी जोर लावून प्रयत्न केला. पण कोळीण हार मानणारी थोडीच होती. तिने फक्त म्हटले, " बायांनो गप रावा, नाहीतर पाटीतले पाणी टाकीन अंगावर. चला, सरा बाजूला. येऊ दे मला आत. " सगळ्या भरभर सरकल्या. उगाच कोण हिच्या तोंडाला लागणार असे म्हणत पुन्हा आपापल्या गप्पात रमल्या. कोळिणीने पाटी उतरवली. हुश्श.. करेतोच दादर आले.

दादरला उतरणारे आणि चढणारे ह्यांची नेहमीची हाणामारी होत बायका डब्यात घुसू लागल्या. पुढे असलेल्या दोघीतीघी मागच्या रेट्याने ढकलल्या जाऊन हिच्या मध्येच ठेवलेल्या पाटीवर आपटल्या. त्यांना उठायला मिळेतो गाडी सुटली. डबा खच्चून भरला. दोन्ही दाराच्या मधल्या जागेत गोंधळ माजला होता. कसेबसे सावरत कोणाच्यातरी आधाराने पाटीवरून उठताना झाकण सरकले. तोवर कोळणीने खास शेलक्या, समस्त बायकांनाच काय पुरषांनाही लाज वाटेल अशा शिव्या घालत सगळ्यांचा उद्धार करून झाला होताच. तिचेही बरोबरच होते. कारण पाटीत काय आहे हे फक्त तिलाच माहीत होते ना.

झाकण सरकले मात्र, पाटीतले दोन तीन खेकडे भर्रकन बाहेर आले. चांगले हाताच्या पंज्याएवढे मोठे होते. अगदी पाटीला खेटून असणारीला प्रथम दिसले. ती घाबरली आणि तिने दूर होण्यासाठी म्हणून जी हालचाल केली त्याने पाटीचे झाकणच पूर्ण निघाले. तोवर आजूबाजूच्या बायकांनाही पत्ता लागला होता. त्यात भर म्हणून कोणीतरी ओरडले, " अग बाई, खेकडे सुटलेत की. " झाले एकच रण माजले. जवळजवळ वीसपंचवीस खेकडे पाटीबाहेर पडून इतस्ततः पळत होते. साड्या, पंजाबी सावरत बायका बेंचवर चढून उभ्या राहू लागल्या. इकडे कोळणीचा जीव खालीवर होत होता, " मुडदा बशविला तुमचा. अग कशाला इतके नाचकाम करताय? तुम्ही आग लागल्यावाणी बोंबलताय अन माझे खेकडे तुम्हाला घाबरून पळू लागलेत. गप रावा जरा. आत्ता धरून आणते की सगळ्यांस्नी. "

शेजारीच असलेल्या पुरषांना काही दिसत नसले तरी किंचाळणे ऐकू येत होते. त्यांना वाटत होते की कोणीतरी सुरा घेऊन घुसलाय किंवा बेवडा दिसतोय. ते तिकडून विचारत होते काय झालेय, का ओरडताय? पण त्यांना सांगणार कोण, जोतो खेकडे शोधण्यात गुंतलेला. जाणो अंगावरच चढायचा आणि नांगी मारायचा. शेवटी एकदाचे घाटकोपर आले. उतरणाऱ्या सुटलो म्हणत पळाल्या.

मात्र उतरताना त्यांनी त्यांचे काम चोख केले, " गाडीत खेकडे सुटलेत गं बायांनो, सांभाळा. " हे ऐकले मात्र कोणी चढलेच नाही. तोवर काही खेकडे पकडून कोळणीने पाटीत कोंबले होते. हळूहळू बेंचवर उभे असलेल्या बायका खाली उतरत होत्या. पण सारखे वाटे काहीतरी वळवळतेय की पुन्हा किंचाळणे अन लागलीच कोळणीचे करवादणे ही जुगलबंदी सुरू झाली. कमीतकमी आठदहा खेकडे ह्या कालव्यात नक्कीच डब्यात पसरले होते.

ठाणा आले आणि मीही धूम ठोकली. पुढे काही दिवसतरी नक्कीच हे निसटलेले खेकडे बायकांना पळवत असले पाहिजेत.

Wednesday, May 20, 2009

आता मी नाही बदलू शकत स्वत:ला

नेहमीप्रमाणे मैत्रिणींचे स्नेहसंमेलन भरले होते. सगळ्याजणी उत्साहात चिवचिवत होत्या. छान छान खादडंती होतीच बरोबर. जोडीला थोड्या खमंग, चुरचुरीत मधूनच जरा गंभीर गप्पा रंगल्या होत्या. एका मैत्रिणीची बहीण तिची लहान मुलगीही आज आमच्यात सामील झाले होते. मुलगी-वेदा, खूपच गोड होती. दोन छोट्याश्या वेण्या कानावर घातलेल्या. गोबरे गाल, मिस्कील चमचमणारे डोळे. पाहता क्षणीच उचलून घ्यायचा मोह व्हावा अशी चुणचुणीत पोर. सगळ्या तिचे कौतुक करीत होत्या. अगदी बाळांनाही कौतुक बरोबर समजते, मग ही सोनुकली तर तशी कळती होती. निरनिराळे लाडिक भाव, मध्येच आर्जव करीत सगळ्यांकडून लाड करून घेत बागडत होती.

करता करता कोणीतरी तिला म्हणाले, " वेदा, छानसा नाच करून दाखव ना गं. " पठ्ठीने क्षणभर विचार केला, सगळ्यांवरून एक नजर फिरवली आणि अगदी मोठ्या माणसासारखे म्हणाली, " उहूं, मी नाही करणार आत्ता. माझा बिलकुल मूड नाहीये. " तिचे ते मान वेळावून किंचित गाल फुगवून नकार देणेही खरे तर गोडच दिसले. काही जणी तिला लाडीगोडी लावू लागल्या, पण ती जाम ऐकेना. तिच्या आईला थोडा राग आला. ती म्हणाली,
"
वेदा, फार लाडूकपणा नकोय. कसला आलाय मूडबिड? कर बरं पटकन एक छानसा डान्स. "
"
अग पण आई, खरंच माझा मूड नाहीये ना, मग का करू? "
आई वैतागली, " वेदा, मूड नाहीये तर आण त्याला. जरा बदल स्वतःला. उगाच हट्टीपणा नको करूस. "
"
का म्हणून मी बदलू? मी नाही जा. आता ह्या वयात मी नाही बदलू शकत स्वतःला. अनेक वेळा तू, आपला बाबा, आजोबा-आजी मला जोरात सांगत असता ना, वेदा चूप कारटे, आता ह्या वयात आम्ही नाही बदलू शकत. मग मलाच का म्हणून जबरदस्ती करतेस? " कमरेवर हात ठेवून एका दमात ही मुक्ताफळे ऐकवून वेदाबाई नाकाचा शेंडा उडवून फतकल मारून बसल्या. डान्स नाही तरी पण सगळ्यांची मस्त करमणूक झाली. वेदाच्या आईने कपाळाला हात लावला. ही पोर जाईल तिथे काहीतरी अक्कल पाजळेल असे म्हणू लागली. मग इतर गप्पा चहामध्ये सगळे रंगले. थोड्यावेळाने जोतो घरी गेला.

खरेच वेदाचे काय बरे चुकले होते? जे वाक्य अनेक वेळा तिच्या कानावर सगळ्या वयाच्या माणसांच्या तोंडून पडले होते तेच तिने बोलून दाखविले होते. आजोबा नेहमी म्हणतात, " मी आता सत्तरीला आलो, आता ह्या वयात मला स्वतःला बदलणे जमणार नाही. तेव्हा मी असाच वागणार. तुम्हाला झेपले तर ठीक नाहीतर मला काही घेणंदेणं नाही. " आजीचे तिसरेच, ती म्हणणार, " हो गं बाई, आधी सासू-सासरे होते, त्यांची बोचरी शिकवण ऐकली. मग आमचे ' हे ' तुझे आजोबा गं, जमदग्नीचा अवतार, सारखी मेली वसवस. त्यांच्या धाकाने सतत स्वतःला बदलवले. आता मात्र माझे वय झालेय. मी अशीच वागणार. मला हवे तेच करणार. "

बाबाचे तर काय, तो सदानं कदा कामात. नाहीतर त्या कसल्याश्या मार्केट हां..... आईला ऐकलेय एकदा बोलताना, " तुमच्या त्या सट्टाबाजारात कशाला पैसे उडवताय? मेली दमडी मिळणार नाही पण आहे तेही फुंकताय. " म्हणजे काय ते मला काही कळले नाही. हां आजीला ऐकले होते एकदा आजोबांना सांगताना, " अहो, चहा किती वेळ फुंकताय? गारढोण झाला की पुन्हा म्हणाल, दे गरम करून. " पण हे बाबाचे फुंकणे काहीतरी वेगळे दिसतेय. आई ज्याअर्थी बाबाला ओरडतेय त्याअर्थी नक्कीच काहीतरी वाईट्ट असणार. तर कसा लागलीच ओरडला आईवर, " फुकटची बडबड नकोय. कळत तर काही नाही. हे बघ, मी हे लग्नाआधीपासून करतोय आणि तुला माहीतही होते. उगाच मला बदलवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी आहे हा असा आहे आणि असाच राहणार आहे. "

आईही किती वेळा म्हणत असते, " मी लहानपणापासून अशीच आहे किंवा माझ्या माहेरी असे नाहीये बाई. जे माझ्या अंगात रुळलेय ते मी तुमच्या घरात आले म्हणून बदलू म्हणता? मुळीच नाही. का म्हणून? तुम्हाला नसेल जमत तर बोलू नका पण उगाच सल्ले नकोत. "

आता हे असे अनेक वेळा एकच वाक्य कानावर पडल्यावर घरातली लहान मुलेही तेच बोलणार. शब्दशः अर्थ समजत नसला तरी त्यांना एवढे नक्कीच समजते की प्रत्येकजण स्वतःला हवे तेच करणार असे म्हणतोय. मग कोणाला ते आवडो, त्रास होवो किंवा राग येवो. कुठल्याही वयासाठी हे वाक्य योग्य आहे असे मला अजिबात वाटत नाही. " मी आहे हा असा/अशी आहे आणि असाच राहणार. आता ह्या वयात मी बदलणार नाही स्वतःला. " ह्या वाक्याने आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीची, प्रेमाची, आस्थेची, मदतीची सगळ्यांत मुख्य म्हणजे इतरांच्या मनात आपण हवेसे असण्याची प्रक्रियाच खुंटवून टाकतो. कधी ह्यातून उद्दामपणा, कधी अनास्था तर कधी स्वतःवरचा संपूर्णपणे ढासळलेला विश्वास आणि त्यातून आलेली वरवरची बेफिकरी डोकावते. काहीजणांना मी खडूस आहे हे दाखवण्यात धन्यता वाटत असते, तर काहीजण स्वतःला बदलवणे हे कमीपणाचे आहे असे समजून आनंदाचा रस्ताच बंद करून टाकतात.

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीत आपला हेका सोडून किमान समोरचा काय सांगतोय ते ऐकले तरी खूप चांगले बदल घडू शकतात. सगळ्यांना आपण हवेसे वाटू शकतो. हा माणूस अडेलतट्टू नसून समजूतदार, सांभाळून घेणारा, मदतीस तयार अशी प्रतिमा आपसूकच तयार होते. हे सारे खोटेपणाने करायचे नसून समरसून करायचे आहे. आणि कुठे लोकांसाठी करायचे आहे? सगळे आपलेच आहेत ना?

माझ्या वडिलांनी कधी आम्हा मुलांना उचलून घेतले नाही मग मी का माझ्या नातवंडांना घेऊ? ह्याने काय होईल, तुम्ही तुमच्या नातीचे बाळपण, तिने तुम्हाला मारलेली घट्ट मिठी, तिच्या न्हाऊमाखू घालून उदवलेल्या जावळाचा, दुधाचा, ओकऱ्या लाळेचा गंध ह्या साऱ्याला मुकाल. तिची इवली इवली तुमच्या तोंडात जायचा प्रयत्न करणारी बोटे. तुम्ही तीला ठो दे ठो दे म्हटले की मोठे बोळके पसरून तोल नीट सावरता येत नसल्याने धाडकन ती डोके तुमच्या कपाळावर आपटेल. तुम्ही बुवा कुक करत चेहरा लपवलात की लकलकणारे डोळे तुम्हाला शोधतील आणि तुम्ही भोक केले की खुदकन हसतील. थोडी मोठी झाली की बोट धरून दुडुदुडू पळेल. असे कितीक प्रसंग, रूपे तुमच्या समोर येतील तिची. आजी-आजोबां वाचून तिला चैन पडणार नाही पण हे कधी होईल तुम्ही प्रथम तिला उचलून छातीशी धरले तरच ना?

बायकोची फार ओढाताण होतेय खरी, पण आमच्या घरात कधी कोणी स्वयंपाकघरात काम केले नाही . मग मी कशाला करू? पुन्हा सगळे म्हणतील बायकोच्या आज्ञेत आहे अगदी आणि नावे ठेवतील. पण अशाने बायको दुखावेल. तिला शारीरिक त्रास तर होईलच, त्याहीपेक्षा जास्त मनात कष्टी होईल. शिवाय नोकरी, प्रवासात फुकट जाणारा वेळ ह्यातून जे काही तास घरात घालवतो त्यात ती सगळा वेळ चुलीपाशी नाहीतर मुलांपाशी. मग मदत करता करता तिच्या अवतींभोवती राहून थोड्या गप्पा होतील. सगळ्यांशी संवाद साधता येईल.

जसा माणूस मरेपर्यंत शिकतच असतो तसेच माणसाने आयुष्यभर काळानुसार बदलणाऱ्या नवनवीन संकल्पनांसाठी, आपल्या माणसांच्या आनंदासाठी स्वतःला बदलत राहायला हवे. जीवनातले दररोज सहजगत्या मिळणारे छोटे छोटे आनंद ह्यातच सामावलेले आहेत. प्रयत्न करायला काय हरकत आहे? झाला तर फायदाच होईल, नुकसान नक्कीच होणार नाही.