जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, July 27, 2010

खीर...

तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.

दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला. यावेळी रंगीबेरंगी तुकड्यातुकड्यातून तिने फुले-पाने, पक्षी, सूर्य, गुंफलेले. दुकानदार म्हणाला होता, थोडी कल्पकता दाखवा. खरंय रे बाबा तुझं, माल खपायला रोज नवीन काहीतरी हवेच. पण, उपाशीपोटी कल्पकता कशी सुचावी? डोळ्यापुढे फक्त डाळभात दिसत राहतो, त्याचं काय करावं..... पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय निसतं. अन्नाशिवाय काय बी सुचना झालंय. तरी कल्पकता दाखवायलाच हवी. नाहीतर हे कामही हातातून जाईल.

तिने मान झटकली, चटदिशी दुलईची घडी घालून पिशवीत अलगद ठेवली. पदर सावरला अन पायात टाचेपाशी झिजलेली चप्पल अडकवली. " शरे, येते गं मी लगेच माघारी. तोवर अभ्यास करा बरका. उगाच रिकाम्या पोटी एकमेकींशी झोंबू नका. पोटात आग फारच भडकली तर मोठा पेला भरून पाणी प्या गं." शरीचे, हो नाही उत्तर ऐकायच्या आतच ती वाटेलाही लागली. दुकान बंद व्हायची वेळ झालेली. आज पैसे मिळाले नाहीत तर उपाशीच झोपवावे लागेल लेकरांना.

धापा टाकत दुकानात शिरली. " किती उशीर केलास? आता मी बंदच करणार होतो. पाहू दे. हां.... बढिया! ती मेहता, दोन वेळा विचारून गेली आज. आता घरी जाता जाता देतो पोचवून. तिची लेक खूश होईल. हे घे शंभर रुपये. काय झाले? बरं, हे अजून दहा घे वरती. आणि जातांना दोन दुलयांचे कापड, दोरे, लागतील ते तुकडे घेऊन जा. चटचट हात चालव जरा. पोरींना घे की मदतीला. नीघ आता. " असे म्हणून दुकानदाराने नोटा अंगावर फेकल्या आणि दिलीपला दुलयांची कापडे काढायला सांगत तो गायबही झाला.

शंभरावर दहाची अजून एक नोट. तिला खरेच वाटेना. चार दिवसांची सोय तर झाली. लेकी भुकेल्या आहेत. बाजार उठायची वेळ झालीच आहे. संपता संपता गेलं की जरा भाव पाडून मिळतोय. बरेचदा रस्त्याच्या कडेला गिऱ्हाईकांच्या हातून पडलेले चांगले कांदे-बटाटे, वांगी अन थोडेसे दबलेले-मार लागलेले तमाटेही मिळून जातात. पण उशीर झाला पोचायला तर तिच्यासारखे कोणीतरी हात मारते. आज तसे होऊन चालणार नाही, मिळायला हवेच म्हणत तिने दिलिपकडून न बघता माल उचलला. बाकीचे उद्या येऊन पाहीन रे असे म्हणत ती रस्त्यालाही लागली. जड पिशवी काखोटीला मारून ती झरझर पाय उचलत होती. आज थोडा रवा, साखर आणि अर्धा लीटर दूध घेईन. शरीला, रव्याची खीर खूप आवडते. पोरीचे डोळे लकाकतात नुसते खिरीचे नाव काढले तरी. दहा रुपये जादा मिळालेत नं. आज खीर करायचीच. इतकुश्या माझ्या पोरी पण किती समज आहे त्यांना. कधी हट्ट करत नाहीत. जितकी जमेल तितकी मदत करतात बिचाऱ्या.

देवळाला वळसा घालून जाता जाता शंकराकडे न पाहताच तिने हात जोडले. प्रदक्षिणा घातली. एक क्षण टेकावे म्हणून खांबापाशी पाठीचा कणा खेटला. डोळे मिटले. " देवा, माझं मेलीचं राहू दे रे पण पोरींवर तरी दया कर. जास्त काही नाही निदान दिसाच दोन घास तरी पानात पडू देत म्हणजे भरून पावलं. कष्टाला मी डरत नाही रे. कामं मिळू देत म्हणजे रात्रीचा दीस करून निभावीन बघ. इतक्या मोठ्या जगाच्या खटल्यात आमच्यावर लक्ष ठेव रे बाबा." असे म्हणत पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती बाजाराकडे निघाली.

बाजार जवळपास गुंडाळलाच होता. सराइतासारखी तिची नजर खाली पडलेल्या कांद्या-बटाट्यावर पडत होती. पिशवी फुगत होती. लसणाचे थोडेसे कुजलेले दोन गड्डे व लिंबेही मिळून गेली. आलं- मिरच्या, तमाटेही मिळाले. ती खूश झाली. बाजारातल्या देवीपाशी प्रसादाची नारळाची कवड होती. इकडे तिकडे पाहत देवीला नमस्कार करून अंगारा लावायचे निमित्त करून तिने ती कवड पटदिशी पिशवीत सारली. वाट्यावर लावलेली वांगी व तोंडली घासाघीस करून दोनाच्या भावात तीन वाटे तिने मिळवले.

मनोमन ती आनंदली. आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितल्यालं..... अजून जवळपास सगळे पैसे जशेच्या तशे कनवटीला होते आणि तरीही पिशवी भरलेली. देवा, लय उपकार झाले बघ तुझे. असे म्हणत वाण्याकडे जाऊन तिने रवा, साखर घेतले. डेअरीतून अर्धा लीटर दूध घेऊन ती घराकडे निघाली. डोळ्यासमोर स्टोवर मोठ्या पातेल्यात शिजत असलेली खीर व पातेल्याकडे आशाळभूतासारखे डोळे लावून बसलेली शरी अन भुकेने कळवळलेली कुसुम दिसत होती. झोपडी दिसायला लागली तशी चालण्याचा वेग अजूनच वाढला. तोच, हाकारा ऐकू आला.

" पोरी, वाईच जरा थांब गं. दोन थेंब पाणी तरी घाल तोंडात." कण्हत कण्हत कोणी बोलत होते. तिने निरखून पाहिले तर कचऱ्याच्या कुंडीपाशी एक मुटकुळं पडलेलं. त्यातूनच कण्हण्याचा आवाज येत होता. ती जवळ गेली. म्हातारी पाय पोटाशी घेऊन कलंडली होती. गेल्या आठवड्यातच हिला कुठेतरी पाहिल्याचे तिला स्मरत होते. कुठे बरं? हां, त्या मोर का कायसे नाव असलेल्या मोठ्याश्या दुकानापाशी ही भीक मागत होती.

" म्हातारे, अशी इथे का गं लवंडलीस? असे म्हणत तिने म्हातारीला हालवले. अगागा, किती तापली आहेस गं. मरशील नव्ह का अशी तू. माझ्याशिवाय कोणी तुला दिसलं न्हाई व्हय हाकारायला. आधीच चुलीत खडखडाट तशात तुझी भर. काय करावं आता? तुला हितच टाकून गेले तर उद्या सरकारी गाडीतूनच जाशील हे नक्की. शिवाय ते पाप माझ्यामाथीच पडायचं. देवा, तुझ्या मनात तरी काय हाय बाबा? चल म्हातारे, ऊठ बरं. माझ्या आधाराने हळूहळू उभी राहा म्हणजे तुला माझ्या घरला घेऊन जाते. " म्हातारी हो नको म्हणण्याच्या पलीकडे गेलेली. तिला आधार देत, लळतलोंबत कशीबशी घरी आणली.

" शरे, अगं कांबंळ हंतर बिगीबिगी. आज्जी लय तापलीये. कुसे, ग्लासात पाणी भर आणि आज्जेला पाज. तोवर मी स्टोला काकडा लावते. पयला ’ चा ’ करते. लयी दिसांनी साखर आणि दूध घालून केलेला ’ चा ’ पिऊ सगळे. " असे म्हणत ती कामाला लागली. थोड्याच वेळात ’ चा ’ झाला. एकीकडे डाळतांदूळाची खिचडी व दुसरीकडे खिरीचे पातेले स्टोवर रटरटू लागले. झोपडीभर अन्नाचा दरवळ पसरला. शरी, कुसुम आणि आजीचे प्राण कंठाशी आलेले. आता लवकरच तोंडात घास पडणार हे सत्य अजूनही त्यांच्या गळी उतरत नव्हते. तोच, जरासा गोडमिट्ट दुधाळ गरम चा चार पेल्यांमध्ये तिने भरला अन लेकींच्या पुढे ठेवत आजीला बसते करून ती पाजू लागली. फुर्रर्रर्र..... फुर्रर्रर्र.... आवाज करत चौघीही मन लावून चा फुरकू लागल्या. पेले रिकामे झाले तशी खंगलेले चेहरे जरासे उजळले. आजीशी दोघी लेकी बडबडू लागल्या.

पेले धुऊन तिने पानं घेतली. पानात खिचडी, तिवर थोडासा खोबऱ्याचा चव आन वाडग्यात खीर वाढताना नवीन दुलईचे डिझाइन डोक्यात घुमू लागले. आज चौथा कोना भरला व्हता. हे ठिगळ वाईच भारी व्हतं खरं. खाणारं एक तोंड वाढवणारं. पण, जीवात अजून धुगधुगी आहे म्हटल्यावर कचऱ्यात कसं मरू द्यावं म्हातारीला. तिच्या लेकरांनी टाकली तिला म्हणून मीबी डोळे झाकायचे? नाय नाय. माझी माय असती तर राहिलीच असती नं माझ्यापाशी. पोरींनाही माया मिळल. व्हईल काहीतरी सोय. त्यो देव बसलाय नग का वरती, त्यानेच तर आज्जेला माझ्याकडे पाठवलीय. आता तोंड वाढवलंय तर जिम्मेवारी त्याचीच नव्हं का. उद्याचं उद्याला पाहू.

"चला गं पोरींनो, हे ताट आजीला द्या आधी आणि बसा आपापल्या ताटावर. " तिघींचे पटापट घास घेत चवीचवीने मिटक्या मारत हालणारे तोंड, आनंदाने लकाकणारे डोळे पाहून रिकाम्या पोटीच ती भरून पावली. जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं. काही करून यांच्या तोंडात हे दोन घास मी घालेनच. असा स्वत:शीच करार करत डोळ्यात आलेले पाणी निपटून काढत ती म्हणू लागली, " शरे, अगं खीर घे की अजून..... उद्याला नग ठेवायला. आजची येळ प्वाट भरून जेवा गं सगळी. कायमच अर्धपोटी राहायच नसतं. कधीतरी तडस लागू दे की. मन आणि प्वाट तुडुंब भरू द्या. " असे म्हणत पोरी व आजीकडे पाहत आनंदाने तिने खिरीचा भुरका मारला.

Sunday, July 25, 2010

ज्याचे त्यालाच......

आमचे चाळीतले घर होते तिसऱ्या मजल्यावर, पूर्व पश्चिम. खोल्या फक्त दोनच अन रस्त्याच्या बाजूला छोटीशी गॅलरी व आतल्या बाजूला सामायिक गॅलरी. जेमतेम २५० फरशांचा काय तो तुकडा, तोही भाड्याचा. आम्हा सगळ्यांना छप्पर देणारा-सुखात ठेवणारा, फक्त आमचाच. अजून धड उजाडलेही नव्हते. लाल-केशरी मध्येच पिवळसर तर कुठे रात्रीच्या खुणा रेंगाळणारे काळसर राखाडी रंगाचे पुंजके आपापल्या परीने आसमंत नटवत होते. सूर्याच्या आगमनाची जोरदार ललकारी देणारी किरणे ढगांमधून अवखळपणे घुसत होती. पक्ष्यांची किलबिल, चोची, पंजे घासून पुसून पंख फडफडवून नवीन दिवसाची पहिली भरारी त्यांनी मारलेली. चित्रा सिनेमाच्या शेजारीच असलेल्या रामाच्या मंदिरातल्या घंटेचा नाद अर्धवट झोपेतही जाणवत होता. रोजची ही वीस पंचवीस मिनिटे म्हणजे जाग व डोळ्यात ठाण मांडून बसलेल्या निद्रेच्या आंदोळ्यांवर झुलणारी. चराचरातील उत्फुल्लता नकळत मनात घुसून ऊठ गं म्हणत असतानाच आळसटलेल्या गात्रातील अजून दहा मिनिटे झोप हवीच ची तीव्र मागणी. पांघरुणात गुरगटून पाय पोटाशी घेऊन मी स्वत:ला त्या दहा मिनिटांच्या हवाली करतेय तोच......

तुझ्या XXX XX, XXXXX....... भास वगैरे की काय हे वाटण्याच्या पलीकडचा तारस्वरातला आवाज व गटार तरी बरे अश्या हासडलेल्या कचकचीत शिव्यांची लाखोली ऐकू येऊ लागली. मी ताडकन उठून बसले. आई, कधीचीच उठलेली होती. भाजी चिरून कणीक भिजवून ती हंडा घेऊन पाणी भरायला उतरलेली. सहावी-सातवीतली मी व दोन वर्षांनी लहान भाऊ आम्हाला उचलवेल इतक्या कळश्या बादल्यातून पाणी भरत आईला मदत करायचा प्रयत्न करायचो पण बराचसा भार आईवरच पडत असे. शिव्यांचा भडिमार चालूच होता. त्याबरोबर आता, " ए चल चल, बाहेर नीघ. घरात काय लपून बसला आहेस? माझ्या पोरीला पळवून नेऊन कुठे ठेवलीस ते सांग....... " दुसऱ्या मजल्यावरील अम्माचा आवाज वाटला. दार उघडून कॉमन गॅलरीत डोकावले तो काय दारादारातून माणसे मशेरी, दातून, ब्रश घेऊन दात घासत तमाशाई झालेली. अम्मा दुसऱ्या मजल्यावरच्या सामायिक मोरीशी उभी राहून आमच्या समोरच्याच घरातील पंजाबी खानदानाचा उद्धार करीत होती. तर अम्माची दोन्ही पोरे हातात हे भले मोठ्ठे सुरे घेऊन तिसऱ्या मजल्यावर येण्यासाठी धावत होती. बिचारी धाकटी पोर त्या दोघांना अडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत रडत होती. त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावरून संपूर्ण रात्रभर हे प्रकरण पेटत होते आणि शेवटी आता त्याचा स्फोट झाल्याचे स्पष्ट कळत होते.

काय कोण जाणे पण आमच्या चाळीचे एक वैशिष्ट्य होते. कुठलेही भांडण, तंटा-बखेडा नेहमी भल्या पहाटे किंवा रात्री दहा वाजल्यानंतरच होई. अचानक शांततेला तडा जाऊन रणांगण तयार होई. काळोखात नक्की कोणाचा उद्धार होतोय, कोण कोणामागे धावतेय आणि कोण कोणाला मारतेय तेही सुरवातीला समजत नसे. अनेकदा तलवारी, सुरे घेऊन आमच्या घरावरून एरवी अगदी शांत दिसणारे काकालोक धावताना पाहिले की माझी पाचावर धारण बसत असे. रागाला डोळे नसतात या वाक्याचा खरा अर्थ त्यावेळी लक्षात येई. ही अशी, आतल्या आत धुमसत असलेली भांडणे दंग्यांचे स्वरूप धारण करून एक दोन जणांना जिव्हारी जखमा केल्याखेरीज कधीच शमत नसत. सरतेशेवटी पोलिस येत, धरपकड होई. दोन्ही घरातली आया-बाया पोलिसांच्या हातापाया पडत, अवो काही नाही झाले. उगाच मस्तीमस्करी करताना रागवारागवी - भांडाभांडी झाली. अशी मखलाशी करत पोरांना नवर्‍यांना वाचवायचा प्रयत्न करीत. शेजारी, हे काय रोजचेच असे म्हणत तमाशा पाहत आणि स्वत:च्या घरात असे घडले की शेजाऱ्यांचा जाहीर उद्धार करत.

ही सारी रणधुमाळी माजलेली ऐकूनही यातला शत्रुपक्ष एकदम चडीचूप होता. आणि अम्माची पोरगी व पंजाबणचा पोरगा संध्याकाळपासूनच कुठेसे पळालेले. थोडक्यात मुद्देमाल गायब होता व पंजाबी घरदार कानात बोळे घालून बसलेले. सरतेशेवटी दोन तीन दिवस हे युद्ध पेटत पेटत थकून व पोरगा-पोरगी घरी अजूनही न परतल्याने, आता त्यांचे काय झालेय? या चिंतेने घेरल्यामुळे एकदाचे थांबले. कालांतराने सगळे थंडावले. पोरगी अम्माच्या समोरून राजरोसपणे येऊ जाऊ लागली. लहान बहिणीशी मोरीच्या कट्ट्यापाशी थांबून मने मोकळी होत होती. राखी पौर्णिमेला त्याच मोरीच्या कट्ट्याशी दोघा भावांनी बहिणी कडून राखीही बांधून घेतली. रंगपंचमीला जावयाने अम्माला रंग लावून पाया पडून माफी मागितली. अम्माने तोंडाने नाही पण हाताने आशीर्वाद दिला. पुढे जणू काही घडलेच नाहीच्या थाटात दिवाळीत अम्माने चक्क जावयाला व पंजाबी खानदानाला जेवायला घातले, सूटाचे कापडही दिले. चला शेवट गोड तर सारेच गोड म्हणत सगळे शेजारी जरा निःश्वास टाकते झाले.

वर्ष संपलेले. नवीन वर्षाची सुरवातच मुळी पोर व जावयाच्या कुरबुरीने झाली. आता लग्न झालेय म्हटल्यावर थोडीफार पेल्यातली वादळे उठायचीच. असे म्हणत दोन्ही वडील धाऱ्यांनी थोडे दुर्लक्ष केले. कटकटी जास्तच होत आहेत पाहून समजावणे प्रकार सुरू झाले. एक दिवस छायागीत नुकतेच संपलेले. आम्ही जेवायला बसलेलो. पंजाबी कुटुंबाचे दार व आमचे दार समोरासमोर. मध्ये चौक. दोन घास कुठे घेतले असतील अम्माच्या पोरीची किंचाळी ऐकू आली. आई ताडकन उठली. दार उघडून ती व तिच्यापाठोपाठ आम्ही बाहेर आलो. तोवर समोरच्या घरात माळा व मेन खोली यात चाललेली पळापळ, जावयाचा टिपेचा आवाज- शिव्या व मधनच बायकोला घातलेले दणके. सासूचे मध्ये पडणे... टिपीकल फिल्मी सीन सुरू होता. फरक इतकाच हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत होते.

अचानक काय झाले माहीत नाही पण घरात अर्धवट घुसलेले शेजारी, सासू, जावई सारेच घाबरून ओरडले. पाहिले तो काय, अम्माची लेक खिडकीत चढलेली. आई, अगं मंजू कुठे बसलीये पाहिलेस का? असे मी म्हणतच होते तोच मंजूने स्वत:ला खिडकीतून खाली झोकून दिले. ते कमी की काय म्हणून तिने उडी मारलेली पाहून जावईही चढला खिडकीत आणि उडी घेतो म्हणू लागला. कसे बसे त्याला खेचून खाली ओढले आणि सारे खाली पळाले. एकतर काळोख त्यात ती मागच्या गटारात पडलेली. नायलॉनच्या साडीत हवा भरल्यामुळे पहिल्या मजल्यापर्यंत पॅरॅशूटसारखी म्हणे खाली तरंगत गेले मग कांबळीच्या घराचा पत्राच मणक्यात घुसल्याने दाणकन आपटले. हे सारे रसभरित वर्णन पुढे मंजुच्याच तोंडून ऐकलेले. पुढचे वर्षभर ती हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून होती. मणका, दोन्ही पाय मोडलेले. इतकी जिगरबाज व जबरी सहनशक्ती व इच्छाशक्ती असलेली ही अम्माची पोर वर्षाने स्वत:च्या पायावर चालत घरी आली.

दोन तीन वर्षे मध्ये गेली. एकदा आमच्या घरी ती आईशी बोलत असताना मी तिला विचारले, " मंजू, अगं तू तर पळून जाऊन लग्न केलेस. तुझ्या लग्नापायी किती मोठ्ठे रामायण झाले. तुझ्या किंवा राजच्या भावांचा जीव जाता जाता राहिला इतका राडा झाला. हे होणार हे तुला माहीत होतेच तरीही तू डरली नाहीस की अम्माला बधली नाहीस. मग राजशी लग्न केल्यानंतर त्याच्यापायीच तू जीव कशी गं द्यायला निघालीस? कुठे गेले तुमचे प्रेम, जिने-मरने की कस्मे, वगैरे वल्गना..... फारच विरोधाभास दिसतो यात. " मंजूने आईकडे पाहिले व माझ्याकडे पाहत वेदनेने पिळवटल्यासारखा चेहरा करून एक सुस्कारा सोडला व म्हणाली, " अम्माच्या घरात मी किती सुखी होते हे कळण्यासाठी व जिथे माझा स्वर्ग - आनंदाचा ठेवा आहे असे वाटत होते, तो नरक आहे हे कळण्याकरता प्रत्यक्ष भोगाची गरज होती ना. दुसर्‍याच्या आनंदाने आपल्याला आनंद नाही मिळाला तरी फारसे काही बिघडत नाही परंतु तुझे दु:ख मला कळतेय, वगैरे शाब्दिक सांत्वने किती खोटी असतात हे ते भोग स्वत: भोगल्याशिवाय समजत नाही. अम्माने मी असा अविचार करून दु:ख ओढवून घेऊ नये म्हणून कितीतरी प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला होताच नं. पण तेव्हा अम्माइतकी दुष्ट-मतलबी बाई कोणी नसेल असेच मला वाटे. जाऊ दे. हा भोग मीच ओढवून घेतलाय तेव्हा भोगायलाच हवा. विनातक्रार." असे म्हणून ती निघून गेली.

किती सहजपणे जीवनाचे सत्य तिने सांगितले. दु:ख - भोग वाटून घेता येत नसतात. ते ज्याचे त्यालाच शेवटापर्यंत भोगावे लागतात. मात्र बरेचदा ते निर्माण मात्र आपणच करतो. कधी समजत असून तर कधी चक्क स्वत:ला फसवून. आंधळे होऊन. मृगजळामागे लागून. भोग त्याचा शेर पुरेपूर वसूल करूनच संपतो. कधी कधी तर माणूस आधी संपतो आणि मग तो मेल्यामुळे त्याचे भोग संपतात. पुन्हा तक्रारीलाही वाव नाही. स्वनिर्मित दु;खाची अव्याहत उठणारी आवर्तने......

मोरपिसे......

सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला. एक वर्षभर मी इतक्या हजारो मैलांवरूनही त्यांना जपले. रोजच्या रोज त्यांची निगराणी, पाणी, खते घालणे यासाठी मोलकरीणही ठेवली. वर्षभराने सुट्टीसाठी गेलो तर काय चारी हातांनी सारी सुगंध उधळत होती. पारिजातक केवढा तरी मोठ्ठा झालेला. फुलांचा आकारही किंचित वाढल्यासारखा. रातराणीने तर घरात शिरल्या शिरल्या तिच्या अस्तित्वाची जाणीव दिलेली. जाई-जुई-सायली-मोगरा, अबोली, गुलबक्षी सारी सारी भरभरून फुललेली. आईला एक कडकडून मिठी मारून मी स्वत:ला या सगळ्यांमध्ये झोकून दिले. किती तरी वेळ माझ्या झाडांना गोंजारून, त्यांच्याशी बोलून, गाल घासून ख्याली खुशाली दिली घेतली तेव्हां कुठे जरा मन निवले. घरातले सगळे मला चिडवत, हसत होते खरे पण मनातून त्यांनाही या माझ्या वेडाची, प्रेमाची कदर होती. माझी समाधी कोणीही मोडली नाही.

इथे परत यायला निघताना मात्र मी स्वत:च्या हातांनी सगळ्यांची पाठवणी केली. मी निघाल्यानंतर, माझ्या अपरोक्ष त्यांची निरवानिरव करणे सहज शक्य असूनही मी ते टाळले. वाटले, माझ्या लेकरांशी ती दगाबाजी होईल. त्यापेक्षा एकेकाला मीच घेऊन जावे, त्यांच्या नवीन माणसांची ओळख करून द्यावी. माझ्या लेकराला नीट जपा म्हणून विनंती करावी. अचानक खुडून टाकल्यासारखे- बेवारस - अनाथ भाव त्यांच्या मनात नकोत रुजायला. सगळी झाडे माझ्या मैत्रिणींनाच दिलेली त्यामुळे आता ती माझ्याकडे नाहीत हे दु:ख वगळता सारी सुस्थळीच पडली. पुन्हा तीन वर्षांनी मायदेशी गेले तेव्हां ती दिल्याघरी आनंदाने सळसळताना पाहून जीव शांत झाला. त्यांच्या बंधनातून मी नाही तरी माझ्यातून ती नक्कीच मुक्त झाली. बरं झालं. कुढली असती तर अनर्थ झाला असता.

जे झाडांनाही कळलं ते मला मात्र कधी उमजलं नाही, आजही उमगत नाहीये. असं कसं होईल? का कळतं पण मला कळवून घ्यायचंच नाहीये. नात्यांमध्ये गुंतवलेला जीव असा सहजी काढून घेता येऊ शकतो? जर उत्तर ’ नाही ’ असे असेल तर मग ते सगेसोयरे, केवळ रोजचा संपर्क-भेट नाही म्हणून दुरावलेत.....? मग माझी त्या मैत्रीतली - नात्यातली ओढ आजही तितकीच का असावी? दुराव्याने मी का कुढावं - तळमळावं? का जीवनप्रवासात एका थांब्यापासून दुसर्‍या थांब्यापर्यंतच, त्या त्या वेळेपुरतीच फक्त ती माणसे माझी - माझ्यापाशी होती? मी तर सगळ्यांना, तितकाच भरभरून जीव लावला. ’ स्व ’ला संपूर्णपणे त्यागून, मैत्रीशी प्रामाणिक राहून. मग काहींतला प्राण, जिव्हाळा हरवून कसा गेला...... का प्रत्येक नात्यातून ही अपेक्षा करणेच मुळी चुकीचे आहे. मुळात आजही तितक्याच ओढीने टिकून असलेल्या मैत्रीच्या आनंदापुढे ही खंत कशाला? हे पटलं तरीही मन दुखतं हे सत्य नाकारता येत नाही.

कदाचित, काही नात्यांत सान्निध्याची - प्रत्यक्ष बरोबर असण्याची गरज असते. तसं झालं नाही तर ती हळूहळू क्षीण होत होत विझून जातात. " कशी आहेस? काय नवीन विशेष? " "अगं, मी ठीक आहे. तूच सांग. " शरिरी दुरावण्याचा पहिला भर ओसरला की या चार दोन शब्दांच्या वाक्यांपुढे गाडी सरकतच नाही. सरकलीच तरी लगेचच ’ बाकी ’ अजून काय म्हणतायं? वर अटकते. अजूनही दोन्ही मने सीमारेषेवर घुटमळत असतात. मग क्वचित कधी दोन्ही बाजूंनी पूल सांधण्याचा प्रयत्नही होतो. पण सामायिक विषयांच्या अभावी व समोरासमोर नसण्यामुळे काहीतरी अडखळत राहते - अपुरे वाटते. रोजच्या जीवनातील समान विषय - मग त्या अडचणी असोत, की राजकारण/समाजकारण/मोलकरीण - का लोकल-बस संप/ निवडणुका/ क्रिकेट/ नवीन साड्या-कपडे/ चकाट्या-भंकस, अगदी गेला बाजार डाळी-भाज्यांचे भाव असोत....... संपल्यामुळे त्यातली तक्रार - बोच -धग- असंतोष, असहायता, गंमत, आधाराची गरज - सांत्वन, यातले कुठलेच भाव समर्थपणे पोहोचत नाहीत - भिडत नाहीत. दोष कोणाचाच नसतो पण असे घडते खरे. मित्रमैत्रिणीतच नाही अगदी घरच्यांबरोबरही. अडचणी दोन्हीं बाजूंनी असतात पण तुला काय कळणार किती त्रास होतोय ते किंवा तुझं आपलं बरय गं..... अशासारखे बोल पटकन बोलले जातात. " The grass is always greener on the other side " असेच भासत राहते.

गेलेल्या काळाचा, अंतरामुळे आलेल्या दूरीचा जबर परिणाम असतो मनावर. जालावर असलेल्या सगळ्या जोडणार्‍या साईट्समुळे एकमेकांची खबर मिळत राहते. विरोपातून, फोनवर,वरचेवर बोलणे झाले तरी शेवटी माणूस समोर असणं, त्याचे अस्तित्व जाणवणं, त्याला स्पर्श करता येणं, अत्यंत क्षुल्लक गोष्टही तातडीने व उत्साहाने ऐकवता येणं व त्याने ती मन लावून ऐकणं..... हे फार फार गरजेच आहे अस सारखं वाटत राहतं.


वेबकॅममुळे एकमेकाला दिसलो तरी त्या चेहर्‍यात मी पूर्वीचेच भाव, त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेहरा मात्र काहीसा हरवलेला..... अनोळखी, कोरडा भासत राहतो. ( कदाचित त्यालाही मी तशीच भासत असेन........ दुर्दैव ) जुने जुने विषय काढून मी नात्याला पुन्हा पुन्हा जिवंत करत राहते..... पण खरं पाहता ते बंध कधीचेच सुटलेत. नवीन नात्यात गुंतलेत आणि असं गुंतणं चुकीचं नाहीच मुळी. माझ्यावर त्यांचा जीव आहेच फक्त आता तो पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारखा. वर्षा-दोन वर्षातून कधीतरी त्या मोरपिसावरून प्रेमाने त्यांचा हात फिरतो. दोन घटका मन आठवणींमध्ये रमते - चेहर्‍यावर आनंद-हसू उमट्ते, की पुस्तक मिटून पुन्हा ड्रॉवरच्या खणात सारले जाते. यातच सारे भरून पावले असे म्हणत मी स्वत:ला मुक्त करायला हवे. वरवर हे व्यावहारिक वाटेलही परंतु कुढत-तळमळत राहण्यापेक्षा बरं.

आठवणींच्या माळेत नवीन मण्यांची भर पडेनाशी झाली की ओवलेले मणी, इतकेच का म्हणत खंतावण्यापेक्षा त्यांचं मोरपीसच करावं. मग कधीतरी कातरवेळी ते अचानक समोर येईल तेव्हां त्या सुंदर क्षणांचा पुन: प्रत्यय तितक्याच आवेगाने घेता येईल. मन सुगंधीत-पुलकित होऊन जाईल. की हलकेच फोन उचलावा अन नंबर फिरवावा....... पुढचा अर्धा तास फक्त त्या मोरपिसांचा......

फोटो जालावरून साभार.

Wednesday, July 21, 2010

मंडळी, या ताव मारायला.....

दिवसभराच्या उपासाने आता थोडेसे दमला असाल, काहींना उपास लागलाही असेल. फळे, दूध, ज्यूस इत्यादींनी पोटाला आधार मिळतो पण जिभेचे चोचले पुरवले जातच नाहीत. उपासाच्या दिवशी अगदी पहाटेपासून अर्धवट झोप व जागेपणाच्या सीमारेषेवर घुटमळणारे माझे मन इतकी अनाप शनाप स्वप्ने पाहते..... .. कसली ते कळले ना....... . एरवी ज्या पदार्थांकडे मी आवडीने सोडाच पण नाईलाजाने तरी खावा असेही पाहणार नाही तेही पदार्थ अचानक मला भलतेच चविष्ट भासू लागतात आणि ते मात्र मोठ्या ताठ्याने मला वाकुल्या दाखवतात. एकदा तर हा खेळ इतका वाईट्ट झाला की मी त्यांचा ताठा क्षणार्धात मोडून त्यांना गट्टमच करून टाकले. वर खातांना लबाड मांजरीसारखे डोळे मिटून घेतले व खाल्ल्यानंतर विठ्ठलाला नमस्कार करून पुन्हा उपास सुरू केला. इतर कोणाच्या लक्षात आले नाही पण ही लबाडी आईने लगेच पकडली. ती मला ओरडण्याआधीच मी हळूच पुटपुटले, " उपासाच्या दिवशी, स्वभावाचा तामसीपणाही निषिद्ध असतो. कोणाला रागे भरल्यास उपास मुळी फुकट जातोच वर पापही लागते. आजी बरेचदा असं काहीतरी म्हणत असे, हो ना गं आई? " असे वर आईलाच ऐकवून पसार झाले.

पण मी काय म्हणते, हे असे उगाच पोटाला-जिभेला छळणारे उपास नकोतच. त्यापेक्षा मस्त खाऊन पिऊन तब्येतीत उपास करावा. किंबहुना त्यासाठीच उपास करावा. आता आमची सकाळ - फराळाची वेळ झालीये व तुमची रात्रीच्या फराळाची. तेव्हां मंडळी, या ताव मारायला. गरम गरम भगर - दाण्याची आमटी , खिचडी, भेंडीचे भरीत, बटाट्याचा तळलेला कीसही सोबत आणतेच आहे..... दाण्याची आमटी मुद्दामहून किंचित तिखट केलीये. थोडे हासहुस झाले तर भरली केळी आहेतच. हात राखून पातेल्याकडे पाहून अनमान करत, नको बरं का..... बेत तसा साधाच आहे, बहुतेक आवडेल तुम्हाला. विठूमाऊलीचा जयघोष करत होऊन जाऊदे मनसोक्त.Tuesday, July 13, 2010

चिडचिडलेला दिवस अन घुसमटलेली, विकल रात्र......

कालपासून नुसते चाकावर गरगरतो आहोत. सकाळपासून एका मागोमाग एक लागलेल्या कामांचा फडशा पाडत शेवटी कसेबसे आम्ही संध्याकाळी पाचाला घर सोडले. शिकागो गाठेतो दहा वाजून गेले. सडक बांधकामाने तर अगदी पागल बनवून सोडलेय. पाच मिनिटाचा रस्ताही सरळ नेटका दिसत नाही. पाहावे तिथे केशरी पिंपे मन मानेल तशी घुसखोरी करत उभारलेली असतात. काही वेळा अगदी निगुतीने चादरीला टीप घालावी तशी एका रेषेत मांडून ठेवलेली. की मारा स्पीडला ब्रेक आणि आणा काटा एकदम ४५ वर. हा फ्लोरोसंट कलर भसकन डोळ्यात घुसतोच. त्यातून कामगार असले की गाडी अजूनच हळू चालते. इतके सारखे बांधकाम करूनही एक 'रोड ' धड असेल तर शपथ. मिशिगनमध्ये कुठल्याही सडकेवरून गेलात की धडामधुडूम व्हायलाच हवे. दोन दिवसात हाडे खिळखिळी. नंतर सवय होऊन जाते खरी.

मिशिगन म्हणजे ' मो-टाऊन ' ( मो-टाऊन ही उपाधी खरी मिशिगनमधील प्रचंड प्रसिध्द म्युझिक इंडस्ट्री व कलाकारांना मिळालेली आहे. एकदा यावर लिहायलाच हवे. ) तीनही बड्या मोटार कंपन्या इथेच. एकेकाळी मोठ्ठा दिमाख असलेले हे राज्य गेल्या काही वर्षांपासून पार झोडपले गेलेय. फोर्ड, क्रायस्लर व जीएम या तीनही बड्या धेंडाच्या झालेल्या पडझडीमुळे संपूर्ण मिशिगनची वाटच लागली. आता हळूहळू किंचित किंचित डोके वर काढतेय खरे पण मूळ पदावर यायला बहुदा सात-आठ वर्षे कमीतकमी. मला नेहमी वाटते, नेमके या राज्याचेच रस्ते इतके खड्डे-खुड्ड्यांचे का? का यामागेही याच मातब्बर कंपन्य़ांचा हात तर नसेल?

आजचा दिवस शिकागोत कामात कुठे संपला कळलेच नाही. कुठल्याही देशाच्या दूतावासात जाणे म्हणजे शिक्षाच. सरकारी कायदा गाढव असतो आणि कागदपत्रे संपूर्णपणे बिनडोक असतात याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर अगदी योग्य जागा. गंमत म्हणजे मी स्वत: १८ वर्षे सरकारी नोकरी केलेली असल्याने व अश्या अनेक गाढव नमुन्यांची अनेकदा भलामणही केलेली असल्याने धड मनापासून शिव्याही घालू शकत नाही. कितीही चिडचिडले तरी तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी स्थिती होत असल्याने, होणारा छळ मुकाट सोसत तटस्थ राहायची पराकाष्ठा करत राहते.

या सगळ्या वर्षांच्या गाढवपणातून एक जबरी धडा मी शिकलेय. " सरकारी कागदपत्रे कितीही हास्यास्पद-बिनडोक वाटली तरी त्यांची काटेकोरपणे व तत्परतेने पूर्तता करावी. चुकूनही कायदा कसा चुकीचा आहे व किती मूर्खासारखे हे फॉर्म्स आहेत. कसले दाखले-पुरावे मागता आहात? असे बोलू नये. उलट स्वत:ला सरकारी कार्यालयाची पायरी चढण्याआधीच दहा वेळा सांगावे, काहीही झाले तरी मी चिडणार नाही व असे का? हे कशाला आणखी हवेय? कोणी मूर्खाने कायदे केलेत? असे प्रश्न मनातही येऊ देणार नाही..... मोठ्यांदा विचारणे तर सोडाच. उगाच स्वत:चे डोके कातळावर कशाला फोडायचे नं? त्यापेक्षा कागदपत्रे मास्टर होण्याचा चंग बांधायचा. मग पाहा, डोक्याला मुळी कसलाच ताप होत नाही. चटचट फॉर्म्सचा फडशा पाडत सुटायचे. "

संयम ठेवून, म्हणतील तो कागद हाजीर करूनही शेवटी आज 'कागदपत्रे ' फक्त सुपूर्त झाली. प्रत्यक्षात हातात काहीच मिळाले नाही. आता फक्त वाट पाहायची. किती काळ.... कोण जाणे? किमान आठ ते दहा आठवडे....... त्यापुढे किती ते विचारायचेही नाही. दूतावासातील गदारोळात, एक जण रडकुंडी येऊन विचारताना ऐकले, " दीड वर्षे झाली वाटच पाहतोय. दरवेळी काहीतरी चुकतेच नाहीतर हरवतेच. आता मला नकोच आहेत ते कागद. बस झाले. माझे पैसे तरी परत द्या. " सरकार दरबारी जमा झालेले पैसे परत मागतंय हे खुळं. ती खिडकीतली बाईही भूत बघितल्यासारखी अवाक होऊन पाहत होती.

जेव्हां आपल्या आवाक्यातून, शक्यतेच्या परिघातून गोष्टी दुसऱ्याच्या कक्षेत, अशक्यता व अनिश्चिततेच्या पारड्यात झुकतात अशावेळी जितके शक्य असेल तितक्या चटकन मनाला अलिप्त करायचे. मुक्त करायचे. मी इतकी मेहनत करून, यातायात करून सगळी पूर्तता तर केली आहे पण आता हे लोक माझा फॉर्म हरवणार तर नाहीत नं? किंवा मी लावलेल्या फोटोतलाच एखादा गहाळ झाला तर? एक ना दोन.... नुसती शंकांची भुतावळ. हे मोहोळ लगोलग हटवून टाकायचे आणि ' आल इज वेल ' म्हणत बिनधास्त व्हायचे. हे मी मारे सांगतेय पण च्यामारी इतके सहजी जमले असते तर काय हवे होते. डोके नुसते भणभणलेले. कधी नव्हे ते आज मी चक्क दहा वेळा ' आल इज वेल ' असे जमेल तितका घसा खरवडून ओरडत शिट्टी मारायचाही प्रयत्न केला. शिट्टीचे जाऊ दे.... ती काही वाजली नाही पण मस्त वाटले. नचिकेतची थोडीशी करमणूकही झाली. मग त्याने कचकचून दोन तीन शिव्या हासडत खऱ्याखुऱ्या शिट्ट्या मारल्या. वातावरण मस्त सैलावले. दूतावासाला डोक्यातून वजा केले अन परतीचा प्रवास सुरू केला.

अडीच तासांनंतर जॅक्सनजवळ आलो तर रस्ता एकदम 'मस्काच ' झाला. हल्लीहल्लीपर्यंत इथेही ती आडवीतिडवी पसरलेली पिंपे होतीच की. झाले वाटते काम पुरे इथले. गाडी रोडवरून पळतेय की हवेवर उडतेय असा संभ्रम पडावा इतका गुळगुळीत व चकचकीत रस्ता. सही आहे. अरेच्या! इथे जोरदार पाऊस पडलेला दिसतोय की. नुकतीच कात टाकलेला काळाशार रस्ता या पावसामुळे न्हाहून निघाला होता. रस्त्याच्या तकाकीत कडेच्या दिव्यांचा पिवळसर व गाड्यांच्या टेललाईटचा लालभडक रंग एकमेकात मिसळत रात्रीचा डोह थोडा ढवळत होते. दोन मैल जेमतेम गेलो असू तोच अचानक धुक्याचे लोटच्या लोट चहुबाजूने अंगावर येऊ लागले. मैलो न मैल पसरलेली शेती, रस्त्याच्या दोन्ही कडांनी दुतर्फा लागलेले आकाशाला गाठणारे ख्रिसमस ट्रीज, मेपल, ओक यातले काहीच दिसेना. जणू ती झाडे तिथे कधी नव्हतीच अशी अंतर्धान पावलेली. जिकडे पाहावे तिथे धुकेच धुके. ढगांचे भलेथोरले पुंजके अलगद रस्त्यावर उतरत होते. उडत, बागडत आमच्या कारवर क्षणभर रेंगाळून, आम्हाला त्यांच्या कवेत वेढून निमिषात दुसऱ्या ढगाकडे अल्लाद सोपवून पसार होत होते. या गडद धुक्याच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत असतानाच एसडी कार्डातून लताचे स्वर्गीय स्वर ओघळू लागले....... झूम झूम ढलती रात..... पाठोपाठ, ये नयन डरे डरे ..... लड उलगडू लागली...... नयना बरसे रिमझीम......... त्या स्वरांत हरवत आम्ही मूक झालो........ दिन ढल जाये रात नं जाय... तू तो न आये तेरी याद सताये..... स्वरांचा कब्जा वाढत होता........ आंसू भरी हैं ये जीवनकी राहें, कोई उनसें कह दें हमें भूल जाये........ आठवणींचे जपमाळ हलकेच हातात आली........ भूली हुई यादों मुझे इतना ना सताओं, अब चैन सें रहने दो मेरे पास न आओं..........

पावसाने सचैल न्हाऊन कात टाकलेला काळाशार रस्ता, त्यावर लोळण घेणारे, आम्हाला कुरवाळणारे, लडिवाळ स्पर्शणारे - मिठीत घेणारे गडद धुके, पावसामुळे हवेला आलेला थंडावा त्याने मधूनच अंगावर उठणारी शिराशिरी, गात्रांना-मनाला सुखावणारा मृदगंध अन त्यात लताचे हृदयाला आरपार चिरत जाणारे स्वर..... पुढचे दोन तास गाडी मी चालवली का ती आपोआप माझ्या मनाबरोबर धावत होती........ कदाचित तीही माझ्यासारखीच भान हरपून, स्वत:ला -दुनियेला विसरून गेली असावी.

एका मागोमाग एक गाणी वाजत होती..... नकळत आठवणींच्या डोहात मी स्वतःला झोकून दिले..... काही विरलेली नाती, दुरावलेले स्पर्श, अनुभवलेले विलक्षण क्षण, चुकूनही पुनश्च ओठी न आलेले शब्द.... आवर्तनावर आवर्तने.... डोहाचा तळ जागा झाला.... ढवळला गेला.... जातच राहिला....... लता गातच होती..... आर्ततेने..... विकलपणे.... वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं....... मला घुसमटवत, हुंदकवत...... सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे.........

Sunday, July 11, 2010

जवाब आयेगा....

गेले पंधरा-वीस दिवस जालावर जवळजवळ नव्हतेच. घरात गडबड-पाहुणे आले होते. खादाडी - भटकंती - धमाल जोरदार चालली होती. एकीकडे माझे सगळे प्रिय मित्र-मैत्रिणी, स्नेही, ओळखीचे व माझ्या ब्लॉगवर आवर्जून येणारे, वाचणारे, प्रतिक्रिया देणारे, लोभ ठेवणारे खूप सारे वाचक, फेसबुकवर, ऑरकुटवर, ई-मेल्स मधून, " अगं, कुठे गायब आहेस? कशी आहेस? बरी आहेस नं? " विचारत होते. त्या साऱ्या शब्दांतून त्यांचे प्रेम-भावना पोचत होत्या. त्या पत्रांना उत्तरे देण्याची ओढ मलाही होतीच पण कधी वेळ तर कधी नेटचा अभाव यामुळे नाईलाज होत होता. खरे तर ब्लॉगवर दोन ओळींची नोट लिहायला हवी होती.... क्षमस्व. तशातच उमाचा मेसेज आला, " अगं, एक ओळ तरी लिही गं. उत्तराची वाट पाहून पाहून दमलेय मी. " या तिच्या मेसेजला मी लगेच उत्तरले अन गेली कित्येक वर्षे मनात घर करून बसलेला, ' जवाब आयेगा ' हा हिंदी चित्रपट आठवला.

आताशा हाती लिहिलेले पत्र दुर्मिळच झालेय म्हणा..... मला वाटते, बहुतेक मी तिसरीत असेन. आमच्या शाळेतून दरवर्षी मुलांना एक बालचित्रपट दाखवायला नेत. आम्हां मुलांमध्ये यावर्षी कुठला सिनेमा पाहायला नेतील यावर बरीच चर्चा सुरू होती. तसे फारसे काही कळतही नव्हते. घरातही कधीही सिनेमांची चर्चाही होत नसे. चुकूनमाकून एखादे बालनाट्य पाहायला मिळे. " जंजीर " जबरी हिट झालेला असल्याने व जागोजागी दिसणारी त्याची पोस्टर्स, तशात जया - अमिताभचे गाजत असलेले लग्न, त्यांचे फोटो- त्यावर चालणारी मोठ्यांच्यातली थोडीफार चर्चा कानावर पडत असल्याने खूपच कुतूहल होते. थोड्याच दिवसात यावर्षीच्या सिनेमाचे नाव कळले. १९६८ साली आलेला, शॉर्ट स्टोरीत मोडणारा, एक तास वीस मिनिटांचा " जवाब आयेगा ". पुढे दोन-तीन वर्षांनी मी जंजीरही पाहिला. अविस्मरणीय खराच. जंजीरबद्दल खरे तर काही बोलायलाच नको. पण माझ्यासाठी तो वेगळ्याच कारणाने अविस्मरणीय झालाय. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन. आत्ता या जंजीरच्या फाट्यावरून मूळ रस्त्यावर...... जवाब आयेगावर येते.

एकमेकांची हात धरून साखळी केलेली आम्ही सारी छोटीछोटी बच्चेकंपनी अती उत्साहात, लकाकणारे डोळे आणि बाईंच्या भाषेत ' कलकलाट ' करत सिनेमागृहात दाखल झालो. अरोरा का ब्रॉडवे मला नीटसे आठवत नाही पण संपूर्ण थिएटर फक्त शाळेच्या मुलांनीच व्यापलेले. आमच्या बरोबरच आणखीही एका शाळेची मुले असावीत. कारण वेगळेच युनिफॉर्मही दिसत होते. " अरे अरे कुठे तिकडे घुसता आहात? हा अर्धा भाग आपला आहे. चला पटापट जागा पकडा आणि घ्या बसून. " प्रभाताई-कमलताई, आम्हा सगळ्या खुशाळलेल्या-आनंदलेल्या पोरांना पकडून पकडून खुर्चीवर बसवत होत्या. आमची गडबड-गलका सुरू असतानाच अचानक दिवे मंद झाले आणि पडद्यावर जाहिराती दिसू लागल्या. एकजात सगळ्या नजरा डोळ्यात जीव एकवटून त्या पड्द्याला चिकटल्या. अन थोड्याच वेळात "
जवाब आयेगा " सुरू झाला.

तशी सिनेमाची कथा अतिशय साधीशीच आहे." एक कार्यकारी अभियंता व आपल्या दोन मुलींना घेऊन थोड्या दिवसांची सुट्टी मनवण्यासाठी जरा दूर - फारशा प्रसिद्ध नसलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जातो. तिथे त्यांच्या नोकराचा -केअर टेकरचा मुलगा - बादल व याची लहान मुलगी- मीना दोघे दोस्त बनतात. मीना बादलला लिहावाचायला शिकवते, चित्रकलाही शिकवते. दोन्ही मुले त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याबरोबर डोंगरात फिरतात-खेळतात. सुट्टी संपताच दोन्ही मुली, वडिलांबरोबर शहरात परततात. इकडे बादल मात्र मीनाशी बोलणे होत नसल्याने खूप उदास होतो. शेवटी स्वत: काढलेल्या चित्रांची वही एका पेटीत घालून त्यावर मीनाचा पत्ता टाकून तो ती पेटी पाण्यात सोडतो. सरतेशेवटी ती पेटी मीनाच्या शाळेत पोचते व तिला मिळते. त्या चित्रांच्या आधारे मीना चित्रकला स्पर्धा जिंकते परंतु बक्षीस घेतांना कबूल करते की ही चित्रे तिची नसून बादलने काढलेली आहेत. हे कळताच बादलला शहरात बोलावले जाते व अशा प्रकारे त्याचे शहराचे स्वप्न खरे होते. "

या कथेचा अर्धा भाग आनंदाचा-मजेचा व नंतरचा अर्धा भाग अतिशय व्याकूळ करणारा. शेवटची वीस मिनिटे तर मी इतकी रडले होते की डोळे भप्प सुजले. खूपच भारले गेलेलो आम्ही. नंतर बऱ्याच वर्षांनी हा लघुचित्रपट दूरदर्शनवरही दाखवला गेला.

त्यावेळी " इस्मत चुगताई व शहीद लतीफ " ही दोन नावे ठळकपणे मनावर छाप टाकून गेली. खरे म्हणजे ही दोन्ही नावे आधीच परिचयाची झालेली होतीच पण.... अरेच्या! जवाब आयेगा ही यांचाच का.... तरीच....., ही दाद आपसूक गेली. ' इस्मत चुगताई ' या अतिशय विख्यात व महान उर्दू लेखिकेने लिहिलेली पटकथा व त्यांचे पती ' शाहीद लतीफ ' यांचे दिग्दर्शन लाभलेला " जवाब आयेगा " सिनेमा. हा सिनेमा पुढे मराठी, गुजराती, बेंगॉली, आसामी, तमील, मल्यालम व कन्नडमध्येही काढला गेला. मीनाच्या भूमिकेत छोटी योगिता बाली अतिशय गोड दिसते. तिने व इर्शादने कामही मस्त केलेय. इस्मत चुगताई यांनी अनेकविध कथा, लघुकथा, कादंबऱ्या व सिनेमांच्या पटकथाही लिहिल्यात. ' गर्म हवा ' या चित्रपटाकरिता त्यांना फिल्मफेअर अवार्डही मिळाले. तसेच श्याम बेनेगल यांच्या ' जुनून 'चे संवादही त्यांनीच लिहिले होते.


जालावर मी बरेच शोधले परंतु कुठेही हा चित्रपट सापडला नाही. कदाचित तो उपलब्ध नसेलच. पाहावयास मिळाल्यास जरूर पाहा. बालचित्रपटात मोडणारा असला तरी मनाला स्पर्शून जाणारा सिनेमा. कोणाला सापडल्यास कृपया दुवा जरूर द्यावा. धन्यवाद.