जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, February 2, 2010

केविन कार्टर१९९४, साली केविन कार्टर नावाच्या सॉउथ आफ्रिकन फोटोपत्रकाराने अत्यंत प्रतिष्ठित मानला गेलेला ' पुलित्झर पुरस्कार ’ ज्या फोटोने मिळवला तोच हा फोटो आहे. सर्व्हायवर-फीडिंग कॅम्पकडे खुरडत चाललेली ही लहान मुलगी आणि तिच्या मागेच काहीसे दूरवर तिच्या मरणाची वाट पाहत बसलेले गिधाड. तो म्हणतो की जेव्हां मला गिधाड दिसले तेव्हा चांगला शॉट मिळावा म्हणून मी अगदी काळजीपूर्वक गिधाडाचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेतली. गिधाडाने त्याचे पंख पसरावे याकरिता तब्बल वीस मिनिटे वाट पाहून हा फोटो घेतला. असे म्हटले आहे की, त्याला सांगितले गेले होते की पत्रकाराने तिथल्या लोकांना स्पर्श(कॉन्टॅक्ट ) करू नये कारण त्यामुळे कदाचित कुठल्यातरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला होऊ शकतो. फोटो काढून झाल्यावर त्याने त्या गिधाडाला पळवून लावले आणि त्या मुलीचे खुरडत खुरडत कॅम्पच्या दिशेने जाणे तो पाहत राहिला. कॅम्प जवळपास एक किलोमीटर लांब होता.

१९६० साली जन्मलेल्या केविनने आपली फोटोपत्रकारीता सॉउथ आफ्रिकेतील भूकबळींच्या जळजळीत वास्तवाच्या चित्रणानेच सुरू केली होती. पुरस्कार मिळाल्यावर स्वत:च्या आई-वडिलांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, " या फोटोमुळे मला इतर कोणाही पेक्षा जास्त प्रशंसा मिळाली. कधी एकदा तुम्हाला माझी ट्रॉफी दाखवतो असे मला झाले आहे. माझ्यासाठी ही अतिशय मौल्यवान गोष्ट असून माझ्या कामाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे. " हा फोटो प्रसिद्ध झाला पुरस्कारही मिळाला.

हळूहळू मित्र-सहकारी विचारू लागले की चांगला फोटो यावा याकरिता तू वाट कशी पाहू शकतोस तेही त्या मुलीच्या मरण यातना पाहत. तू तिला काहीच मदत केली नाहीस का? म्हणजे तूही आणखी एक गिधाडच होतास तर. का त्याहीपेक्षा भयंकर. कारण गिधाड त्याचे अन्न म्हणून पाहत होते पण तू........ यानंतर जुलै २७, १९९४ रोजी केविनने आंत्यतिक दु:ख व बोच( गिल्ट ) सहन न होऊन आत्महत्या केली. मरणापूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तो म्हणतो, " सभोवताली मरत असलेले व मरून पडलेले जीव, दाहकता, तीव्र दु:ख...... अनेक दिवस उपासाने खंगलेल्या, जखमी झालेल्या मुलांच्या विवक्षित आठवणी माझी पाठ सोडत नाहीत...... "

हा फोटो आज इतकी वर्षे लोटूनही माझ्या स्मरणातून जात नाही. केविन कार्टर या एका संवेदनशील व्यवसायाने फोटोजर्नलिस्टने सुदानमधील भूकबळींचे जळजळीत वास्तव मांडले. मला अजूनही स्पष्ट आठवतेय, हा फोटो प्रसिद्ध झाला, केविनला अत्यंत प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. केविन अतिशय आनंदात होता. परंतु या गौरवानंतर जगभरातून केविनवर अतिशय टोकाची टिका झाली. त्याच्या वर्तनाचा जाहीर धि:क्कार झाला. खूप उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. आणि फक्त तीनच महिन्यांनी ३३ वर्षांच्या केविनने आत्महत्या केली.

वस्तुतः या जगात माणूस हा कमालीचा किंवा घृणास्पद वाटेल इतका स्वार्थी प्राणी आहे. कोणी म्हणाले की जर त्याला रोगराई होईल म्हणून कोणालाही स्पर्श करू नका असे सांगितलेले, म्हणून त्याने त्या मुलीला उचलून घेतले नाही. तर काही म्हणाले की इतक्या हृदयद्रावक प्रसंगात आपल्याला रोग होईल हा विचार मनात येऊच कसा शकतो? तिथे तर असे हजारो तडफडणारे जीव होते मग तो कोणाकोणाला मदत करू शकणार होता? एक ना दोन अनेक प्रकारे वाभाडे काढले गेले. त्याचबरोबर हजारो तडफडणाऱ्या मुलांपैकी एकाचा फोटो काढला म्हणून धिक्कार करणाऱ्या किती जणांनी किमान एकदा तरी उंची रेस्टॉरन्ट मध्ये न जेवता ते पैसे गरजूंना दिले? टिका करणे फारच सोपे आहे असेही मत होतेच आणि ते सत्यच आहे.

मुळातच तो फोटो काढण्याआधीही केविन सभोवताली भूकबळीच पाहत होता. व्यवसायाचा भाग झाला तरी माणसाचे मन हे सारे पाहून अतिशय दु:खी होणारच त्यात या फोटोमुळे झालेली निर्भर्त्सना आणि आपल्या वर्तनाचा आलेला टोकाचा गिल्ट..... केवळ व्यवसायाच्या नावाआड मीही डोळ्यावर कातडे ओढले, मी स्वार्थी झालोय? या जगात इतकी टोकाची विषमता का असावी? भुकेचे दाहक सत्य. यासारखे काळीज पिळवटून काढणारे प्रश्न त्याला सोसले नसावेत. पर्यवसान फक्त ३३ व्या वर्षी आत्महत्या. परंतु या फोटोमुळे जगभरातून मदतीचा प्रचंड ओघ सुदानकडे वळला असेल. अनेक जीव जगले असतील. म्हणजे या फोटोचा हेतू ’ तो ’ नसला तरी साध्य झाला.

ते होते खरेखुरे गिधाड. ज्याला जगण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या मरणाची-मासांची गरज आहे. आज आपल्याकडे असे अनेक प्रश्न-पिडीत-शोषित जीव आहेत, ज्यांचे जिवंतपणीच लचके तोडले जात आहेत. शेतकऱ्यांचा गेली काही वर्षे चाललेला निकराचा संघर्ष - झगडा आणि प्रशासनाची- सरकारची- काही मूठभर मातब्बर प्रतिष्ठित धनदांडग्याची लचके तोडणारी गिधाडी वृत्ती. यांच्यात आणि त्या फोटोत काय फरक आहे? शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा वाढलेला डोंगर, कधी अवर्षण तर कधी पूर यामुळे न आलेले पीक. पर्यवसान गहाण ठेवलेले शेत, जमीन, दागिने सहकारी संस्थांच्या/ सावकाराच्या घशात. परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे साधनच हिरावून घेतले जातेय. घरदार उध्वस्त-पोरंबाळं भुकेकंगाल झालेले पाहून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

गाडीचे कर्ज, टिवी-फर्निचर, फ्रीज, मोठ्यामोठ्या सहली इत्यादींचे कर्ज, विम्याचा हप्ता, घराचे कर्ज यांच्या बोज्यापोटी कोणी जीव देतोय का? कारण ही कर्जे जगण्याशी निगडित नसून सुखसोयींशी निगडित आहेत. सरकार कर्जमाफी-अनुदान पॅकेजेस अशी मोठीमोठी आश्वासने देतेय परंतु त्याआधी मुळातच पडलेल्या बोज्याने तिजोरी खालीच आहे ही बोंब मारलेली आहेच. सामान्य जनतेचा पैसा हडपून काही हजार करोड रुपयांची मालमत्ता बाळगणारे राजकारणी-सत्ताधीश-उद्योगपती फक्त स्वत:ची तुंबडी भरण्यात मग्न आहेत आणि सुखनैव झोपतही आहेत.

36 comments:

 1. केविन कार्टर आणि त्याच्या या फोटो बद्दल इ-मेल फॉरवर्ड मध्ये वाचलं होतं. पण पूर्ण तपशील आत्ताच तुमचं पोस्ट वाचून कळले.

  फोटोतल्या गिधाडाचा आणि आपल्या आजूबाजूला आढळणा-या गिधाडांचा संबंध अगदी अचूक आणि वास्तवदर्शी !!

  ReplyDelete
 2. एक हृदयस्पर्शी पोस्ट आहे....केविन कार्टर वर दोषारोप करताना लोकानी त्याच्या हेतुकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले..त्याचा हेतु अगदी सार्थ होता....हे पण खरेच की त्यावेळी त्याची संवेदना कमी पडली...पण त्याच्या चित्रिकरानामुले सूडान जे भयान वास्तव तर जगापुढे आले..ही पण एक प्रकारची सेवाच आहे....
  खरेच आहे की प्रत्येक मनुष्य हा कुठे तरी एक भक्श्यकच असतो (गिधाड नव्हे.) कारण मृत जिवांवर उपजीविका करने आणि आपल्या हव्यासापोटी दुसर्याचा जीव घेणे हयात फार फरक आहे...गिधाड तरी आपले कर्मयोग करतो पण मनुष्य रूपी भक्श्यक जाणीवपूर्वक आपले कर्मयोग विसरतो..

  ReplyDelete
 3. मलाही हा फोटो बघून वाटलं होतं ... या प्रसंगी उत्तम फोटो मिळवण्यापेक्षा त्या मुलीला मदत करणं जास्त महत्त्वाचं नाही का? तांत्रिकदृष्ट्या त्याचं बरोबर आहे ... फोटो काढणं हे त्याचं काम आहे, पण अश्या प्रसंगामध्ये सुद्धा फक्त फोटो काढला म्हणजे झालं? कदाचित त्याने केलीही असेल मदत. कदाचित दिवसरात्र हीच दृष्य बघून मन मेलं असेल त्याचं. पण असं वाटतं खरं की हा फोटो काढला आणि प्रकाशित नसता केला तर तो जास्त मोठा छायाचित्रकार झाला असता.

  ReplyDelete
 4. हेरंब,प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 5. atul,केविनने त्या मुलीला उचलून कॆम्पपर्यंत न्यायला हवे होते हे निर्विवाद आहे.मुळात हा फोटो स्पर्धेसाठी काढलेला नव्हताच.असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 6. गौरी,खरे तर हा फोटो स्पर्धेसाठी नव्हता. मात्र इतका मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे सुदानचे विदारक सत्य जगापुढे ठळकपणे आले आणि त्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रत्येक वेळी फोटो पाहताना मात्र हेच वाटते की यापेक्षा त्या लेकराला उचलून तू कॆम्पकडे पळाला का नाहीस.

  ReplyDelete
 7. Tyaveli tyachyabarobar jo dusra chhayachitrakaar hota, tyachya mhananyanusar te doghe UN chya plane ne tikade gele hote aani ardhya tasat tyanna parat jaaycha hota...tevdhyaat he doghe photo kadhayala gele...tithlya mulanche aai-vadil mulanna thodyavelasathi sodun anna ghenyasathi vimaanakade gele hote...tyatlich hi mulgi hoti...hya link var aahe he...
  http://en.wikipedia.org/wiki/Kevin_Carter

  ReplyDelete
 8. काही राजकारणी-सत्ताधीश-उद्योगपती यांना गिधाडाची उपमा देणे चुकीचे आहे ... गिधाडे त्यांचे बक्षी जिवंत असताना कधीच लचके तोडत नाहीत... असे करतात 'तरस' किंवा 'जंगली कुत्रे'. ती उपमा जास्त योग्य बसते ह्या लोकांना...

  खरच आपल्या पैकी किती जण इतरांना मदत करायचा प्रमाणीक प्रयत्न करतात??? दोष देणे सोपे असते... पण आपण स्वतः काय करतोय हे शोधणे सुद्धा सोपे आहे की... आपल्याला दिसते ते फ़क्त जग.. आरश्यासमोर उभा राहिल्याशिवाय आपल्याला आपला चेहरा दिसत नाही...!!!

  ReplyDelete
 9. माझ्या एका मैत्रीणीची मैत्रीण वृत्तवाहिनीमधे वार्ताहर आहे. ती एकदा म्हणाली होती की त्यांना वार्ताहर म्हणून काम करण्याआधीच हे सांगितलं जातं की "एखाद्या घटनेची बातमी देणं हे तुमचं काम आहे. त्या घटनेचाच भाग बनणं हे तुमचं काम नाही. त्या घटनेचा भाग बनण्यासाठी (किंवा घटनेतील पिडीत लोकांना मदत करण्यासाठी) इतर अनेक प्रकारे मदत उपलब्ध होणार असते. पण ज्यांना ही घटना माहित नाही अशांपर्यंत घटना पोहोचवण्याचं काम फक्त तुम्ही करत असता."

  मला हे विचार तंतोतंत पटले. केविनने त्या मुलीला कॅम्पपर्यंत न्यायला हवं होतं हे बरोबरच आहे पण मग तो फक्त एकाच मुलीला कॅम्पपर्यंत नेऊन थांबला नसता परिणामी त्यालाही त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असता. या उलट त्याने गिधाडाला हाकलवण्याचं जे काम केलं, ते जास्त महत्त्वाचं होतं, असं मला वाटतं. केविन संवेदनशील होता म्हणूनच त्याचं मन त्याला खात राहिलं.

  ReplyDelete
 10. हा फोटो मला पण आला होता मेल मधे. पण इतकी डीटेल माहिती आजच समजली. धन्यवाद..
  खरंच खुप वाईट वाटलं या मागची कहाणी वाचतांना.
  प्रत्येकालाच स्वतःची काळजी वाटत असते. तरी पण त्या पत्रकाराने त्या मुलीला कॅम्प पर्यंत उचलुन न्यायला हवे होते....

  ReplyDelete
 11. कांचनजीच्या मतांना दुजोरा!

  ReplyDelete
 12. The PROPHET, स्वागत व अनेक आभार.
  मीही वाचलेय ते.कोणावरही ठपका-दोषारोप करताना लोकांना कसलीच पार्श्वभूमी माहीत नसते.पण त्यामुळे कधीकधी असे हकनाक बळी जातात.:(

  ReplyDelete
 13. रोहन,संपूर्ण सहमत.कुठलाही प्राणी भूक लागल्याशिवाय हल्ला करत नाही. अपवाद माणूस.:( मुळात कोणावरही आरोप करण्याआधी आपण काय करतो हे कोणी लक्षातच घेत नाही.

  ReplyDelete
 14. कांचन,सहमत आहे. पत्रकार जर असे प्रत्येक गोष्टीत स्वत:ला गुंतवत राहिले तर कदाचित दोन-तीन प्रसंगांनंतर पुन्हा पत्रकाराचे काम करण्यासाची वेळच येणार नाही. दंगलीमध्ये-मारामा~यांमध्ये पहिला बळी त्यांचाच जाईल.केविन संवेदनशील होता म्हणूनच, नाहीतर अनेक भयंकर प्रकार करणारे- हव्यासापोटी अगदी स्वत:च्या मुलांना मारून टाकणारेही लोक आहेतच की. असो. प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 15. महेंद्र,खरे आहे तुझे. सगळे वाचून-समजून घेऊनही मनात येतेच की याने त्या मुलीला सुखरूप पोचवायला हवे होते. पण त्याने गिधाडाला हकलवण्याचे काम केले हेही लक्षात घ्यायला हवेच. आभार.

  ReplyDelete
 16. आनंद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 17. TUMCHYA BAGETIL SARVA PHULE MAST. KHUP AAWDLI. ME PAN AATA KADIPATTACHE ZAD LAWNAR AAHE.

  ReplyDelete
 18. prajkta, धन्यवाद व शुभेच्छा!:)

  ReplyDelete
 19. ताई अग हे पोस्ट कालच वाचलं होतं पण मन सुन्न झालं होतं कळेचना काय प्रतिक्रीया देउ...........
  खरय गं रोहनचं आणि कांचनचंही.....याहून जास्त काय लिहू????

  ReplyDelete
 20. तन्वी, प्रतिक्रियेबद्दल आभार.:)

  ReplyDelete
 21. फोटो पाहून पोटात ढवळून आले अगदी..... इतकी असहाय्यता, दैन्य, अगतिकता....
  केविन कार्टर ने केलं ते एक प्रकारे अयोग्यच....त्या वेळी त्याची मनस्थिती काय असेल ते आत्ता आपण सांगू शकत नाही.... पण त्या फोटोने जगाला असंही जग दाखवलं....
  त्याची आत्महत्या मात्र अनाठायी होती. मनाला रुखरुख लावणारी...
  प्रश्न करायला लावणारे हे पोस्ट विचार करायला भाग पाडतं....

  अरुंधती
  --
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 22. अरुधंती, खरे आहे. ही असहायता....श्वास सुरू रहावा यासाठीची केविलवाणी धडपड आणि दुसरीकडे पैशाचा चाललेला प्रचंड अपव्यय. विषमतेचे भिषण वास्तव.

  ReplyDelete
 23. फोटो मस्त आहे, मला गिधाड आणि त्या मुलीत साम्य वाटतंय, गिधाडाचा आकार, उभं रहाणं, मुलीच काहीसं गिधाडासारखं अंग मुडपणं. हा फोटो वेगळा वाटला मला, फक्त वेदना, करूणा, क्रूरता, आक्रमकता, असहायता यापेक्षा वेगळं काहीतरी आहे या फोटोत. धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.

  ReplyDelete
 24. प्रसाद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 25. केविन कार्टरच्या आत्म्याला शांती लाभूदे. असे चित्र प्रकाशीत केल्याने ते जगाच्या समोर तरी आले. त्यात त्या केविन कार्टरची काय चूक? दुसर्‍याला उपदेश करणारे कितीजण परिस्थिती आल्यावर तसे वागतात?

  ReplyDelete
 26. काय लिहू काही कळतंच नाहीय. "केविन संवेदनशील होता म्हणूनच त्याचं मन त्याला खात राहिलं." अगदी पटतंय मला कांचन तुमचं. कोणाला एखाद्या चुकीसाठी इतकं बोलू नये कि त्या व्यक्तीला जगण असह्य होईल. त्याच्यासाठी खूप दुःख होतंय. देव त्याच्या आत्म्याला शांती देओ.

  ReplyDelete
 27. नरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तर काय,दुस~याला सल्ला द्यायला-चुका दाखवायला सगळे तयार पण स्वत:वर वेळ येताच....:(

  ReplyDelete
 28. jivanika, स्वागत व आभार. केविनच्या आत्म्याला देव शांती देवो.

  ReplyDelete
 29. भाग्यश्री, तुला एक विचारते. प्लीज राग मानू नकोस. तू खरंच इतक्या संवेदनशील मनाची आहेस कां गं? हल्ली अशी लोकं नाही गं बघायला मिळत. मागे पण तुला मी माबोवर लिहीलं होतं की तुझा ब्लॉग खूप सरळ, साधा आणि प्रामाणिक वाटतो मला. अगदी थेट काळजाला हात घालतेस. तुझ्या ब्लॉगवरच्या माझे मन बोथट.... मध्ये एक वाक्य लिहीलंयस. खरेच का आपली मने मुर्दाड झाली आहेत की आपण हे थांबवू शकत नाही म्हणून केविलवाणी झालीत? खरंय गं, खूप जाणवतं. बरंच काही करावंसंही वाटतं पण आपण कुठे कुठे पुरे पडणार असंही वाटतं. असो ही तडफड न संपणारी आहे. जरा विषयांतर.... तू वपुंचं तू भ्रमत आहासी वाया वाचलं आहेस कां?

  ReplyDelete
 30. megh, मला तरी वाटतं आपण सगळेच संवेदनशील असतो. काही जण आपसुक थोडी पुढची स्टेप घेतात. जिथे जमेल तिथे हात पुढे करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा मनात खूप असले तरी शक्य नसते किंवा त्यामागच्या कारणांनी आपण डोळे बंद करतो. आता ते सुपातले पोर...त्याचा दोष काय? पण शेवटी बळी त्याचाच जातो ना? मी मात्र रोज त्याला ओलांडून पुढे जाते.आताशा काळजावर दगड ठेवावाच लागत नाही... दगडावर आणिक एक दगड म्हणजे....
  वपुंचे लिखाण-माणसांच्या मनाचे अनेकविध कंगोरे-छटा अप्रतिम उकलून दाखवतात, अतिशय वास्तवदर्शी... मला खूप भावते ते. मी वाचलेय,’ तू भ्रमत आहासी वाया ’.

  ’एकाकीपण वेगळं,एकांत वेगळा,एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे.परिसराचं मौन म्हणजे एकांत.आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.तेव्हा तू एकांतात जा,मनसोक्त रड.जमिनीला अश्रू हवे असतात.मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील” सध्या माझी परिस्थिती अशीच असावी.... असो.
  मेघ, आवर्जून लिहिलेस....बरे वाटले.

  ReplyDelete
 31. येस्स, देअर यू आर. त्या पुस्तकातली अशी किती वाक्य लक्षात ठेवायची गं? तुझ्या ब्लॉगवर ज्या अर्थी शंकरमहाराजांचा फोटो लावलायस, त्याअर्थी साद देती हिमशिखरे पण वाचलंच असशील. असो. अशीच लिहीत रहा, छान लिहीतेस.

  ReplyDelete
 32. megh,अग हो तर.इथेही माझ्याकडे आहे ’साद देती हिमशिखरे ’
  ’व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर.’.....आजकाल असेच झालेय सगळेच.

  ReplyDelete
 33. असे लेख कितीतरी लोक वाचत असतील....पण फक्त वाचून काय होणार?
  खरी गरज आहे काहीतरी करण्याची....आणि त्या६०इ खूप काही करायला पाहिजे अस पण नाही.
  मी सूरुवात केलीच आहे....तुम्ही पण करा....
  trust me त्यातून खूप समाधान मिळत.
  जे जे शक्य असेल ते करा....पण प्लिज फक्त वाचून सोडून देउ नका...don't be just a Photographer....be a Human too.

  ReplyDelete
 34. Sam, ब्लॉगवर स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. प्रत्येकाने जो जमेल तो व जमेल तसा प्रयत्न केला तरी नक्कीच उपयोग होईल.

  ReplyDelete
 35. धन्यवाद भानस. लेख खुप सुंदर. पुन्हा एकदा विचार करायला भाग पडणारा. अणि जळजळीत सत्यावर प्रकाश टाकणारा.
  केविनच्या संवेदंशीलातेबद्दल सगळ्या जगानं शंका घेतली...पण एक फोटोग्राफर किंवा पत्रकार यांच्यापलिकडे जाउन तो नक्कीच एक संवेदनशील "माणूस" होता. अजुबजुचं दु:ख सहन न होउन आत्महत्या करणारा माणूस नक्कीच बोथट मनचा असू शकत नाही.

  आज आपण वर्तामानपत्रं, पुस्तकं इ. मधून जेव्हा प्रकाश आमटे, अभय बंग अशा लोकांविषयी वाचतो किंवा ऐकतो त्यावेळी काय करतो.."ही लोकं खरच ग्रेट आहेत राव, सलाम..." एवढं म्हणून आपणही गप्पच बसतो ना? आज गरज आहे ती कृतीशील हातांची. Sam मी आपल्याशी सहमत आहे. सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी, मीदेखील सुरुवात करत आहे...

  ReplyDelete
 36. प्रतिमा, आपले मन:पूर्वक स्वागत व आभार! :)
  बरेचदा आपण काय करणार मदत करणार कोणाला या विचारधारेने स्वत:च स्वत:ला थांबवले जाते. खरे तर मदत ही अनेक रुपात करता येते. सुरवात स्वत:पासूनच व्हायला हवी. छोट्या छोट्या गोष्टीही बदल घडवून आणतातच की.
  पुन्हा एकदा आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !