जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, April 27, 2010

काळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने - स्नेहल भाटकर

गेले काही दिवस १९७५ ते १९९० या कालावधीतील, त्यातही ७५ ते ८२-८३ पर्यंत अगदी सारखी ऐकलेली काही गाणी मनात घोळत आहेत. १९७५ च्या आधीही ही कानावर पडत होतीच. आमच्या आईचा गळा अतिशय सुरेल. तिच्या ऐन उमेदीच्या दिवसात नाशकामध्ये ती - पूर्वाश्रमीची सिंधू भट आणि माझी कै.सौ.मंदामावशी प्रती " लता व आशा " म्हणून प्रसिद्ध होत्या. आईने अनेक नाटकातही कामे केलेली.( १९५२ ते १९६२ ) पुढे लग्न होऊन ती मुंबईस आल्याने व मी व भाऊ झाल्यावर तिचा नाट्यक्षेत्राशी-स्पर्धांशी, प्रत्यक्ष संबंध कमी झाला असला तरी जात्याच गोड असलेला गाता गळा तिला चैन पडू देत नसे. घरात ती नेहमीच गात असे, अजूनही गुणगुणत असते.

काही गाणी आईची परमप्रिय होती. अगदी त्यांच्यावर जीव जडल्यासारखी हटकून ती म्हणायचीच म्हणायची. बैजू बावरातले " मोहे भूल गये सावरीयां..... " हमारी याद आयेगी मधले " कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आएगी... ’ " फरियाद मधले, " हाले दिल उनको सुनाना था..... " त्याच चित्रपटातले, " देखो बोल रहा हैं पपीहा... " हे गाणे. सुमन कल्याणपूर या आईच्या अतिशय लाडक्या होत्या व आहेतच. मराठी सुगमसंगीत, भावगीतं, भक्तिगीते-भजने तर अहमिकेने वर्णी लावत असत. " तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती.... " " मज नकोत अश्रू घाम हवा..... " इथेही सुमन कल्याणपूरच. काही गौळणीही ती हटकून म्हणे, " रात्र काळी घागर काळी..... " " वारिया ने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले..... " या माझ्या अगदी तोंडपाठ झालेल्या होत्या. आईचा सुमधुर गळा, फिरत या सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली असली तरी जसे जमेल तसे भसाड्या तर भसाड्या आवाजात मी नेहमी रेकत असे. अगं नको गं त्या सुंदर सुरांचा जीव घेऊस असे म्हणत मी गाऊ नये म्हणून आई लगेच गुणगुणू लागे अन माझा हेतू साध्य होई.

या व अशासारख्या गाण्यांची मोहिनी आजही तितकीच कायम आहेच पण यातले संगीतकार मात्र काळाच्या ओघात हरवून गेलेत. त्यांची काही गाणी अजरामर झाली असली तरी त्यांचे नाव अनेकांना माहीतही नसेल-आठवत नसेल. मला व्यक्तिश: कमीत कमी वाद्ये वापरून, शब्द व सुरांच्या ताकदीचा पुरेपूर व अप्रतिम संगम साधत केलेली गाणी अतिशय भिडतात. वाद्यांचा अतिरेक, त्यांचा टीपेचा-बोल व सुरांच्या पुढे येणारा कल्लोळ फार त्रास देतो. अशीही काही गाणी निश्चित चांगली आहेतच पण निदान मला तरी ती फारशी मोहवत नाहीत.

आई गात असलेल्या गाण्यांमध्ये जसे सुमन कल्याणपूर असतेच तसेच दत्ता डावजेकर, सुधीर फडके, प्रभाकर जोग, बाळ माटे, भास्करबुवा बखले... यांची बरीच नाट्यपदे ती म्हणत असे. यशवंत देवांचे, " दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी " हे मधुबाला जव्हेरी यांनी गायलेले एक अतिशय आर्त गाणे. " त्यांचेच विसरशील खास मला दृष्टिआड होता... " हे सुधा मलहोत्रांनी गायलेले गीत.... पुढे आशाने ही गायले. वसंत प्रभू यांची, ’" आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? व प्रेमस्वरूप आई " ही दोन गीते आई अत्यंत आर्ततेने, हृदय पिळवटून गात असे.... गाणे संपता संपता ती व मी दोघीही रडू लागत असू. चितळकरांच्या आम्ही दोघीही अगदी भक्त. "
मलमली तारुण्य माझे, रूप पाहता लोचनी, हे राष्ट्र देवतांचे, हाऊस ऑफ बॅंबू..... " त्यांची तर अजून कितीक गाणी.... भाऊ-बीज या चित्रपटातले श्री. वसंतकुमार मोहिते यांनी संगीतबद्ध केलेले व आशा ने गायलेले, " वेड्या बहिणीची रे वेडी माया.... " या गाण्यावरही तिचा खास जीव होता. श्री. श्रीकांत ठाकरेचे संगीतबद्ध केलेले, " शोधिसी मानवा राउळी मंदिरी.... व अधीर याद तुझी, जाळीतसे रे दिलवर.... " हृदयनाथांचे संगीतबध्द, " जिवलगा, राहिले रे दूर घर माझे! " जितकी सांगेन तितकी थोडीच.....


या साऱ्या तिच्या आवडत्या गाण्यांमध्ये " संगीतकार स्नेहल भाटकरांची " व त्यातही त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलेली गाणी, " आमुची वसने दे श्रीहरी.... " व " तुझ्या कांतिसम रक्तपताका ...... " तसेच " नको बावरुनि जाऊ नियतीच्या भयाने...... " " सगळी सुमनजींनीच गायलेली " चित्रपट : अन्नपूर्णा(१९६८), " मानसी राजहंस पोहतो..... ज्योत्स्ना भोळेंनी गायलेले " चित्रपट: भूमिकन्या सीता( १९५८), " लाविते गं सांजदिवा...... आशा भोसले " चित्रपट: या मालक( १९६४ ) आणि ही बरीच आहेत... पण आता मी आठवतेयं तर वासुदेव भाटकर व सुमन कल्याणपूर यांच्या बहुतांशी सगळ्याच रचना प्रामुख्याने आई गाई. त्यामुळे श्री. वासुदेव भाटकर या नावाने-संगीतकाराने माझ्या मनातही घर केले. काळाच्या ओघात - चकाकत्या बेगडी दुनियेत हरवलेल्या काही अत्यंत प्रतिभावान व्यक्तींपैकी भाटकरबुवा हे एक.

२९ मे, २००७ ला मी मायदेशात होते. भाटकरबुवांच्या निधनाची अतिशय दुख:द बातमी आली आणि अनेक गाणी झरझर डोळ्यासमोर येऊ लागली. कधीही त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला नव्हता तरी सतत आईच्या तोंडून व आकाशवाणीवरही ऐकलेल्या गाण्यांचा पगडा जबरदस्त होता, त्यामुळे निदान अंत्यदर्शन तरी घ्यावे म्हणून मी अगदी आमच्या दादरच्या घराच्या मागेच असलेल्या त्यांच्या निवासस्थानी गेले. ( किर्ती महाविद्यालया जवळ ). त्यांना पोचत नसली तरी एक प्रकारे प्रत्यक्ष आदरांजलीच होती ती.

नोव्हेंबर २००६ मध्ये त्यांना ’ महाराष्ट्रभूषण ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु नेमके आदल्याच दिवशी हॉटेल मध्ये ते पडल्याने स्ट्रेचरवरून त्यांनी हा सन्मान स्वीकारल्याचे पेपरात वाचले होते. संगीतकार स्नेहल भाटकर यांचे खरे नाव वासुदेव गंगाराम भाटकर होते. आमच्या प्रभादेवीतील पालखीवाडीत १७ जुलै १९१९ साली त्यांचा जन्म झालेला. त्यांच्या आईचा गळा खूप गोड होता. श्रीकृष्ण संगीत महाविद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतलेले. १६ जून १९३९ रोजी ते एचएमव्ही मध्ये पेटीवादक म्हणून कामाला लागले. सतत चालणारी भजनी मंडळातील भजनांचा खासा पगडा त्यांच्या सगळ्या जीवनावर होता. भाटकरबुवा म्हणूनच ते सर्वत्र ओळखले जात.

केदार शर्मा यांनी सुहागरात या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वासुदेव हे नाव बदलून त्यांच्या मुलीच्या स्नेहलता या नावावरून त्यांचे स्नेहल हे नामकरण केले. राजकपुरने प्रथमच नीलकमल या चित्रपटामध्ये नायकाचे काम केले व त्याच्या तोंडी असलेले गाणे-काही ओळी या भाटकरांनी गायल्यात व संगीतही त्यांचेच होते. अनेक मोठ्या मोठ्या गाजलेल्या कलाकारांचे पदार्पणाच्या चित्रपटाचे संगीत बी. वासुदेव म्हणजेच भाटकर यांचेच. मधुबाला, नूतन, गीताबाली, तनुजा, शोभना समर्थ, कमला कोटणीस.....
अतिशय साध्या - सोप्या परंतु मन जिंकून घेणाऱ्या व पुन्हा पुन्हा भावणाऱ्या चाली त्यांनी दिल्या. " कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी’...... " या मुबारक बेगम च्या आवाजातील गीताने तर त्यांना अजरामरच केले. आजही या गाण्याची मोहिनी कमी झालेली नाही. लता आजही अतिशय खंतावत असेल पण..... हे गीत मुबारक बेगमच्याच नशिबात होते.

शोभना समर्थ यांच्या छबीली(१९५९) या चित्रपटात त्यांनी नूतनला गायला लावले. "
ऐ मेरे हमसफर....... " नूतनची मी ठार वेडी आहे तश्यांत चक्क तिच्या आवाजातील गाणे...... अप्रतिम! सारे श्रेय भाटकरांचेच व " लहरों पे लहर, उल्फत हैं जवॉं.... " हीच ती दोन गाणी. वासुदेव-सुधीर या जोडीतील वासुदेव म्हणजे भाटकरबुवा व सुधीर म्हणजेच बाबुजी. रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला या दोघांनी मिळून संगीत दिलेय. रुक्मिणी स्वयंवरमध्ये, " कुहु कुहु बोल गं, चंद्रमा मनात हसला गं व धाडिला प्रीतीदुत माझा देईल का गं मान " ही गाणी बाबूजींच्या पत्नी सौ. ललिता फडके यांनीच गायलेली आहेत.

भाटकरबुवा हे अतिशय साधे-सरळ म्हणूनच अजातशत्रू होते. त्यामुळे या मोहमयी सृष्टीतही अनेक खास मित्र जोडून होते. त्यांचे, " सुहागरात, गुनाह, हमारी याद आयेगी, नीलकमल, हमारी बेटी, प्यासे नैन, सी.रामचंद्र यांच्या 'संगीता ' चित्रपटातील कव्वाली...... त्याप्रमाणेच " चिमुकला पाहुणा, मानला तर देव, रुक्मिणी स्वयंवर, बहकलेला ब्रह्मचारी, नंदकिशोर, अन्नपूर्णा, तुका झालासे कळस मधील संत तुकारामांची रचना- काय तुझे उपकार पांडुरंगा व उंचनिंच कांही नेणे भगवंत.... त्यांनीच गायल्याही आहेत. " तसेच काही नाटकांचे संगीतही अतिशय गाजलेय. मराठी चित्रपट सृष्टीत व पुढे दूरचित्रवाणीवरही काही काळ समोर असलेले अभिनेता श्री. रमेश भाटकर हे त्यांचेच चिरंजिव. अनेक मनांमध्ये आजही जिवंत असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांना माझी ही भावपूर्ण आदरांजली.

फोटो, संदर्भ व दुवे जालावरून साभार.

12 comments:

 1. स्नेहल भाटकरांची ओळख मला आधि रमेश भाटकरचे वडील अशी झाली होती, पण पुढे जेव्हा त्यांची काही गाणी कानावर पडली आणि बाबांनी सांगितले की ही गाणी स्नेहल भाटकरांची आहेत तेव्हा मला वाटतयं मी त्यांना खऱ्या अर्थाने ओळखू लागले.... आणि आजच्या तुझ्या या पोस्टमुळे तर बरीच माहित नसणारी गाणी कळली... आता ऐकते एक-एक....

  आता नासिकला गेल्यानंतर काकुंना गाण्याचा आग्रह मात्र नक्की करणार मी!!!

  ReplyDelete
 2. अप्रतिम लेख. उल्लेखलेली गाणी वाचता वाचता त्यांचे सूर मनात रेंगाळू लागले.

  तुम्हीही ‘कभी तनहाईयों में’, ‘ऐ मेरे हमसफ़र’, आणि नूतनच्या फॅनक्लबमध्ये आहात तर!

  -विवेक.

  ReplyDelete
 3. मी ह्यातली काही गाणी ऐकली आहेत आणि मला आवडतातही. पण भाटकरांविषयी काहीच माहिती नव्हती. मस्त लेख आहे. धन्यवाद!

  ReplyDelete
 4. मस्त लेख, बर्‍याच गोष्टी माहीत नव्हत्या. कभी तनहाईयों में, लहरोंपे लहर ही माझ्याही आवडीची गाणी आहेत.

  ReplyDelete
 5. तन्वी, रमेश भाटकर हा चित्रपट-दूरचित्रवाणीवर समोर दिसत असल्याने तसेच होणार.:) मात्र खरे तर रमेशचीच ओळख आजही स्नेहल भाटकरांचा चिरंजिव अशीच.

  आईला आग्रह करच गं. हल्ली एकंदरीतच ती थकलीये पण निदान गुणगुणेल तरी. :)

  ReplyDelete
 6. विवेक, हो तर...नूतन हे नाव कानावर-मनात आले तरी एक निरालस,सुंदर,भावोत्कट,तरल.... लावेन तितकी विशेषणे कमीच... व्यक्तिमत्व माझा ताबाच घेऊन टाकते.:)

  अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 7. विद्याधर,काही गाणी आजही ऐकू येतात व भावतातही. न ऐकलेलीही कधी ऐकून पाहा...आवडतील खचितच. आभार.

  ReplyDelete
 8. गुरुदत्त, स्वागत व अनेक आभार. :)

  ReplyDelete
 9. अतिशय सुंदर पोस्ट. अनेक विसरलेली गाणी पुन्हा आठवली.

  आणि माझ्या बाबतीत पण सेम तन्वीसारखंच झालं होतं. "अरे हे रमेश भाटकरचे वडील" असंच सांगितलं होतं मला. पण नंतर त्यांची गाणी ऐकायला लागलो आणि हि एवढी सुंदर गाणी त्यांची आहेत हे समजल्यावर त्यांच्या मोठेपणाचा प्रत्यय आला.

  ReplyDelete
 10. हेरंब,मला नं रमेश भाटकर कधीच फारसा अपिलींग वाटला नाही. फार पडेल चेह~याचा आणि अभिनय म्हणजे... जाऊ दे नं... भाटकरबुवा ग्रेटच. काय एक से एक गाणी आहेत.

  ReplyDelete
 11. अरे ही पोस्ट माझ्याकडून वाचायची राहून गेली होती.....ही गाणी अगदी मनातली आहे....

  श्री ताई मला तुझा विरोपाचा पत्ता हवा आहे....खाली माझा पत्ता देतोय त्यावर पाठव....ठांकू.

  yogesh.mundhe@gmail.com

  ReplyDelete
 12. योगेश, विरोप पाठवलाय रे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !