जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 1, 2010

एक मस्त दिवस: मॅकिनॉव आयलंड

गेले तीन आठवडे नुसती गडबड चालली आहे. मायदेशातून पाहुणे आलेले. आठ दिवस त्यांच्या सरबराईत-फिरणे-गप्पा-टप्पा-जोरदार खादाडी आणि तीन पत्ती व रमीचे रात्री एक एक पर्यंत रंगणारे डाव यात गेले. शोमूही त्याला सुटी असल्याने आलेला आहेच. पाहुणे गेले, जरा कुठे दम टाकतेय तोच आला पहिला लॉग विकेंड. थंडी बरीचशी ओसरलीये. मधूनमधून थोडे अंगात येतेय अजूनही तिच्या पण आता मुळी कोणी तिला भीक घालतच नाहीये. आमच्या मागचे जंगल जिथे मिळेल तिथून भरभरून धुमारे फुटून उमलून आनंदाने सळसळतेय. जिकडे तिकडे ससे, मोठ्या मोठ्या झुबकेदार खारींचा सुळसुळाट सुरू झालाय. बदकांची फौज रोजची नवाचे टायमिंग पकडून ऑफिसात गेल्यासारखी सकाळी जाते व संध्याकाळी सहाची लोकल घेऊन परतते. अगदी घड्याळ लावून घ्यावेत इतकी वक्तशीर बदके पाहून रोज माझा अचंबा वाढतोच आहे. एरवी थंडीत काड्या झालेल्या रानाच्या मध्यातून कळपाने फिरणारी हरणे चक्क एक एकटी पार्किंग लॉट मध्येही घुटमळू लागलीत. ती ही न घाबरता. अशाच एका हरणाला पाहून दबकत दबकत काही फोटो घेत होते तर ते बेटे माझ्याकडे मान उंचावून उंचावून ऐटीत उभे राहून मस्त पोझ देऊ लागले.

पार्किंग लॉटच्या जवळ आलेले व पोझ देणारे

नेहमीप्रमाणेच आम्ही आयत्यावेळी जिथे जावेसे वाटेल तिथे जाऊ रे, या कळपात मोडणारे. त्यामुळे कुठलेच बुकिंग केलेले नव्हतेच. पहाटे उठून चार-पाच तासांच्या परिघात कुठेही जाऊ आणि रात्री उशिरा परतू हा बेत ठरला. शनीवारी नेहमीप्रमाणे आमच्या पहाटे उठण्याच्या निश्चयाला झोपेने सुरुंग लावला. एकंदरीत चार वेगवेगळ्या गजरांना दाद न देता आम्ही तिघेही मस्त गुरगुटून झोपलो. उठल्यावर पहिली पाच मिनिटे एकमेकांच्या नजरा चुकवत चुळबुळत असतानाच शोमू फुसकन हसला..... मग आम्हा दोघांनाही हसू आवरेना.

आता नऊ वाजता आवरायला घेतल्यावर जाणार कधी आणि येणार कधी.... उद्या नक्की हं का. ठरले. कुठे जायचे यावर अजूनही एकमत नव्हतेच. त्यामुळे शोमू म्हणाला, " ममा, बरे झाले आज नाही निघालो ते. नाहीतर बाबाने नं आपल्याला डेट्रॉईट डाउनटाउन दाखवून परत आणले असते. " " चल रे! उगाच काहीही काय..... " मी मारे बाबाची बाजू घेऊन बोलायला गेले आणि असे म्हणत म्हणत मी त्याच्याकडे पाहिले तर तो जणू मी हेच करणार होतो च्या आवेशात गालातल्या गालात हसत होता. शनीवारी इकडम तिकडम करताना उद्या आपण मॅकिनॉव आयलंडला जाऊया हे नवऱ्याकडून वदवून घेतले तेव्हाच संध्याकाळी कच्छी दाबेली खिलवली. शेवटी निदान तुझ्या त्या अप्रतिम झालेल्या कच्छी दाबेलीला आता जागायला हवेच नं असे म्हणत न खळखळ करता नवरा पटदिशी हो म्हणाला. आणि रवीवारी पहाटे साडेसहाला आम्ही घर सोडले.

आमच्या घरापासून मॅकिनॉव सिटी, २६५ मैल लांब आहे. साधारणपणे एखादा दहापंधरा मिनिटांचा हॉल्ट घेतला तरी साडेचार ते पाच तासात पोचता येते. मॅकिनॉव सिटी हे गाव खूपच छोटेसे आहे. साधारणपणे हजारभर लोकांची वस्ती असलेले गाव पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की जिवंत होते. Emmet व Cheboygan या दोन काउंटींनी बनलेल्या या गावात उन्हाळ्याचे चार महिने प्रचंड संख्येने पर्यटक येतात. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की हे छोटेसे गाव एकदम कात टाकते व लोकांच्या स्वागताला झडझडून सज्ज होते. मॅकिनॉव आयलंड ला जाणाऱ्या फेरी इथूनच सुटत असल्याने व प्रत्यक्ष आयलंडवर राहणे व खाणे तसे जरा महागडे असल्याने बहुतांशी पर्यटक इथे राहणेच पसंत करतात. त्यामुळे इथे अगदी लेकच्या काठावर प्रचंड हॉटेल्स आहेत. Michilimackinac किल्ला, मॅकिनॅक ब्रिज, मॅकिनॅक पॉंईंट लाइट व शॉपिंग मॉल आणि भरपूर रेस्टॉरंट्स इथे आहेत.

मॅकिनॅक आयलंड हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेले मॅकिनॅक काउंटीतील एक अतिशय सुंदर शहर आहे. फक्त ७०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या बेटावर कुठल्याही वाहनास परवानगी नाही. बहुतांशी सगळे लोक एक तर घोडे, सायकली किंवा पायीच चालतात. फक्त इलेक्ट्रिक व्हिलचेअर्स व आणीबाणीच्या सेवांसाठी लागणाऱ्या वाहनांना परवानगी आहे. मॅकिनॉव सिटीतून आयलंड वर येण्यासाठी फेरीची सोय केलेली आहे. अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत ही सेवा दर अर्ध्या तासाने अखंड सुरू असते. बऱ्याच(३) कंपन्यांच्या फेरी बोटस आहेत व अनेक छोटे छोटे धक्केही बनवलेले आहेत. मोठ्यांसाठी २४ डॉलर व लहानांसाठी १२ डॉलर हा दर पडतो. जालावर तिकिटे घेतल्यास तीनचार डॉलर्स वाचू शकतात. तसेच वेगवेगळी ग्रुप पॅकेजेसही उपलब्ध आहेत, त्याचाही खूप फायदा होतो. तेव्हा थोडा अभ्यास करून जावे हे फायदेशीर व वेळ वाचवणारे आहे. फेरीतून आयलंडकडे जाताना खूप मजा येते. फेरीच्या मागे मोठ्या पिसाऱ्यासारखे पाणी उडत असते. एकीकडे मॅकिनॉव ब्रिजची शोभा तर समोर दिसणारे मॅकिनॉव बेट. हिरवट-निळे-गर्द निळे, तळ दाखवणारे स्वच्छ पाणी व आजूबाजूला येजा करत असलेल्या इतर फेरीमुळे उठणाऱ्या मोठ्या लाटा, अंगावर उडणारे तुषार...... पाच तास ड्राइव्ह करून आलेला थकवा इथेच संपतो व मन ताजेतवाने होऊन जाते.


मॅकिनॉव ब्रिज

फेरी व धक्का

मागे उडणारा फवारा

दिपगृह

समोर दिसणारे मॅकिनॉव आयलंड

दिपगृह

एकंदरीत ५.६ चौरस माइल्सच्या या बेटाचा ४.४ मैलाचा भाग जमिनीचा असून १.२ मैल पाण्याने व्यापले आहेत. फेरीतून उतरल्या उतरल्या एकच एक लांबलचक मेनरोड, त्यावरील दुतर्फा दुकाने, निरनिराळे खाण्याचे धाबे, लोकांची चहलपहल, सायकली, घोडे, बग्ग्या पाहताच डोळ्यासमोर माथेरान येते. जवळपास ७५% आयलंडचा भाग व्यापून असलेल्या स्टेट पार्कमध्ये अनेक लहान मोठे ट्रेल्स आहेत. एखादा दिवस हाताशी असेल तर निदान एखादा तरी ट्रेल अवश्य करण्यासारखी जागा आहे. हाताशी सायकली असतील तर अजूनच जास्त मजा येते. इथले घोडे पाहात राहावे असे आहेत. काहीसे बुटके परंतु अतिशय बलवान. त्यांच्या पायांचा बळकटपणा व आकारमान पाहून थक्क व्ह्यायला होते. मात्र त्याचबरोबर इथे सगळीकडे पडलेल्या घोड्याच्या प्रचंड लिदी व त्यांचा आसमंतात भरून राहिलेला भयानक गंध अतिशय त्रास देतो. काहीवेळाने आपल्या नाकातले केस जळून गेले आणि फुफ्फुसं याच वासाने पूर्ण पावन झाली की हा भयंकर वास त्रास देईनासा होतो. तरीही जाताना रुमालावर प्रफुल्लित करणारे-शक्यतो फुलांच्या वासाचे परफ्यूम भरपूर ओतून बरोबर घेऊन जा.

आयलंडवर भाड्याने सायकली मिळतात तसेच तुम्ही स्वत:ची सायकलही आणू शकता. मात्र फेरीतून ती आणताना सायकलीसाठी आठ डॉलर मोजावे लागतात. संपूर्ण बेट तुम्ही घोडागाडीच्या बग्गीतून फिरू शकता. एकदा तिकीट घेतले की तुम्ही कुठेही उतरा कितीही वेळ थांबा, समोरून येणारी कुठलीही दुसरी बग्गी पकडून पुढच्या ठिकाणी जा असे करू शकता. त्यातल्या त्यात कमी दमवणारी व वेळ वाचवणारी व आखलेली ही बग्गीची टूर घ्यावीच. म्हणजे एका दिवसातही बरेच काही बघता येते. बग्गीच्या टूरचे तिकीट सर्वसाधारणपणे मोठ्यांसाठी २३ ते २५ डॉलरच्या आसपास व लहानांसाठी ९ डॉलर इतके आहे. बरेचदा जालावर डिस्कॉऊंट कुपनेही उपलब्ध असतात ती जरूर घेऊन जावीत. काही पैसे नक्कीच वाचू शकतात. ग्रुप तिकिटेही उपलब्ध असतात. आपण आपल्याला हवा तितका वेळ प्रत्येक स्पॉटवर घालवू शकतो. तेव्हा उगाचच घाईने ठिकाणे पाहावी लागत नाहीत.

आयलंडवरील मेनरोड

जागोजागी केलेली सुंदर बाग

बग्गीचे घोडे

मॅकिनॉव आयलंड

आयलंडवरील एका महागड्या हॉटेलचा चढ

हॉटेल
सुरवातीलाच Surrey Hills Museum लागते. ब~याच जुन्या वस्तू, ऐतिहासिक बग्ग्या, त्याकाळचे अग्निशामक दलाचे सामान व भेटवस्तूचे दुकान आहे. शिवाय जर थोडेसे काही खायला हवे असेल तर तेही इथे घेता येते. तिथून निघालो ते Wings of Mackinac Butterfly Conservatory ला पोहोचलो. आयलंडवर असलेले हे फुलपाखरांचे गार्डन अतिशय प्रसिद्ध आहे. एका वातावरण संतुलित केलेल्या घुमटात शेकडो फुलपाखरांना उडताना, आपल्या अंगा-खांद्यावर अगदी विश्वासाने अलगद विसावताना पाहून मस्त वाटते. जवळपास २०० हून जास्ती जातींची फुलपाखरे इथे आढळतात. कितीही वेळ या सुंदर फुलपाखरांच्या संगतीत घालवला तरी मन भरतच नाही. पण नाईलाज असतो. बाहेर पडताना चारचार वेळा खात्री करून घेतली.... न जाणो एखादे फुलपाखरून बिलगूनच राहिलेले असायचे. तिथेच एक छोटेसे गिफ्ट शॉपही आहे. सुंदर सुंदर फुलपाखरे ( मेटलची/काचेची ) व अनेकविध शोभेच्या व आठवणी ठेवणाऱ्या गोष्टी तिथे मिळतात.

फुलपाखरे


जिकडेतिकडे फुललेली सुंदर सुंदर फुले

तिथून पुढे सरकलो ते दगडाची कमान- आर्च रॉक या प्रसिद्ध जागेवर पोहोचलो. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते ते. लाईमस्टोन मधून नैसर्गिकरीत्या तयार झालेली ही कमान व अथांग पसरलेले विविध रंग-छटा धारण केलेले पाणी. कितीतरी वेळ अविचल उभी होते. वाऱ्याच्या लहरींबरोबर मनालाही मी सोडून दिलेले...... अगदी कुठलाही व कोणाचाही विचार मला त्याक्षणी नको होता. हवी होती केवळ शांततेची अनुभूती. जवळजवळ तासभर तिथे रेंगाळून निघालो ते फोर्टच्या दिशेने.

आर्च रॉककडे जाताना

कमान

कमानीतून दिसणारा नजारा

कमानीतून डोकावताना

मॅकिनॅक आयलंडवर पाहण्यासारख्या ठळक ठिकाणात ’ मॅकिनॅक किल्ला ’ प्रामुख्याने मोडतो. मुळात ब्रिटिशांनी अमेरिकन रिव्होल्युशनरी वॉरच्या वेळी बांधलेला हा किल्ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पंधरा वर्षे ब्रिटिशांच्याच ताब्यात होता. १८१२ मध्ये, मिशिगन व ह्युरॉन लेकवरील ताब्यासाठी झालेल्या युद्धाची छावणी इथेच होती. १८०० शतक संपत असताना इथे यूएस मिलिटरीने तळ ठोकला तो १९०० शतक संपेस्तोवर होता. आता हा संपूर्ण किल्ला म्युझियम, मॅकिनॅक आयलंड स्टेट पार्क व नॅशनल ऐतिहासिक लॅंडमार्क म्हणून ओळखला जातो. इथे निरनिराळे शोज आयोजित केले जातात. तोफांची सलामीही दिली जाते. त्याकाळी राहत असलेल्या लोकांची घरे, त्यातील सामान-अगदी स्वयंपाकाच्या भांड्यापासून ते काचसामाना पर्यंत व कपड्यांपासून ते जोडे, पलंग, कपाटे, अगदी न्हाणीघरही येथील म्युझियम मध्ये पाहावयास मिळते. किल्ला पाहावयास कमीतकमी तीन ते चार तास हवेतच. अन्यथा नुसतेच भोज्ज्याला हात लावून आल्यासारखे वाटेल. येथे संध्याकाळीही शोज आयोजित केले जातात. मात्र ते कधी सुरू आहेत हे आधी पाहून जायला हवे. शिवाय त्यासाठी शक्यतो आयलंडवर राहिलेले बरे. फेरी उशीरापर्यंत असतात परंतु तोवर खूप थकून जायला होते.

किल्ल्यातील आयोजित शोमधील एक दृष्य

बग्गी

मॅकिनॅक फोर्ट

फेरी घेऊन परत सिटीत आलो व तिथे असलेल्या इटालियन रेस्तारॉमध्ये जेवलो. खरे तर खूप दमलो होतोच. शिवाय परतीचा पाच तासांचा प्रवासही डोळ्यासमोर दिसत होता त्यामुळे फारसे न रेंगाळता निघालो. आधीही एकदा आम्ही हे सगळे केले होते व त्यावेळी तीन दिवस राहिलोही होतो त्यामुळे ही एक दिवसाची सहल शक्य झाली. प्रथमच व एकदाच जाणे शक्य असल्यास किमान दोन-तीन दिवस हाताशी ठेवूनच जायला हवे. सिटीत राहण्यासाठी असलेली बरीचशी हॉटेल्स लेकच्या काठाशी असल्याने बीचवर आहेत. प्रत्येकाकडे स्वत:चा काही खाजगी भाग आहे. दुपारी पाणी जरा कोमट झाले की काठाकाठाने डुंबण्यात खूप गंमत येते. अतिशय स्वच्छ व नितळ पाणी लडीवाळपणे अंगाखांद्याला गोंजारत राहते. मग वाळूत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर जरासे विसावून एक मस्त डुलकी काढायची.... बरेच लोक तर तासनतास इथे पहुडलेले असतात.

लांबलचक किनारा

खेळणारी - पहुडलेली मंडळी


इटालियन रेस्टॉरंट

सूर्य अस्ताला गेल्यावर सिटीतच असलेल्या कसीनोचा खणखणाट उत्तर रात्रच नव्हे तर तांबडे फुटेस्तोवर ऐकू येत असतो. इतका वेळ नाही तरी किमान थोडासा वेळ तरी इथे डोकवाच. निकल-डाईम-क्वार्टर काहीतरी खेळाच. अगदी ऐशींच्याही पुढे असलेल्या आजीआजोबांच्या सुरकुत्यांमधून दिसणारी या खणखणाटाची झिंग व त्यांचा उतू चाललेला प्रचंड उत्साह आणि जबरी स्टॅमिना तुम्हीही थोडीसा अनुभवाच. मात्र पैशाचे गणित पक्के ठेवा. जिते तो सिकंदर और हारे तो भी न हो फिकर...... बस इतना खयाल रखना और बस मजेही मजे लुटना...... . असा हा एक मस्त दिवस व तितकेच प्रेक्षणीय मॅकिनॉव आयलंड.

31 comments:

 1. खूपच सुंदर जागा दिसते आहे ही. फोटो पण अप्रतीम आले आहेत. तो कमानिचा फोटो पण खूप आवडला. :) फुलपाखरं १२ महिने असतात का? की ठराविक वेळेसच असतात?

  ReplyDelete
 2. वा! मस्त वर्णन, सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या, लाँग विकेंड सार्थकी लागला तुमचा.

  ReplyDelete
 3. तरीच म्हणतोय ... आहात कुठे.. खुपच मज्जा सुरू आहे तर.

  सर्व फोटो मस्त.. फूलपाखरे आणि ख़ास करून डोक्यावर बसलेले तर मस्तच. :)

  ते नेढ़ म्हणजे कमान नैसर्गिक आहे ना??? मस्त आहे.

  आणि हो ... जिते तो सिकंदर और हारे तो भी न हो फिकर - पक्का US atitude... हेहे... :)

  ReplyDelete
 4. जाम सही आहे गं ही जागा... तुझ्या डोक्यावर बसलेल्या फुलपाखराचा फोटो मस्तच गं!!!

  अशीच मजा करत रहा आणि सुंदर सुंदर फोटू टाकत जा!! :)

  ReplyDelete
 5. महेंद्र,अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे हे. फुलपाखरं नेहमीच असतात. घुमटातले टेंपरेचर कंट्रोल केलेले आहे.

  ReplyDelete
 6. सोनाली, हो गं. मस्त मज्जा आली. फ्रेश फ्रेश.:)

  ReplyDelete
 7. रोहन, अरे छोटे-मोठे ट्रेल्स खूप आहेत तिथे.तुला खूप आवडेल. फुलपाखरे इतकी धीट आहेत नं किंवा त्यांना विश्वास वाटतो... त्यामुळे ती सारखी आपल्या भोवती भोवती असतात. फार जपून पावले टाकावी लागतात. ती कमान नैसर्गिकच आहे. चुनखडीतून झालेली. अप्रतिम नजारा.
  अरे कसला US attitude.... अजून डॉलर-रुपयाचा हिशेब सुटत नाही...:D.

  ReplyDelete
 8. तन्वे, अगं धमाल आली. अजून खूप फोटो आहेत. तुला पाठवते. शिवाय चित्रफितीही टाकतेयं. वेळ मिळाला तर पाहा गं. :)

  ReplyDelete
 9. amchi trip athavli....chan jaga ahe fakt ghda perfume sodun. Amhi cycle ne sagli chakkar marli hoti...maja yete.. phto chan

  ReplyDelete
 10. अरे वा !! मस्तच आहेत फोटोज.. खुपच सुंदर.. फुलपाखरांचे तर सगळ्यांत छान..
  त्या बेटावर लोकं राहतात का? म्हणजे स्थानिक लोकं आहेत का? दुकानं, शाळा, घरं असं काही आहे का?

  आता कळलं तुझ्या आधी नाही म्हणता म्हणता शनिवारी शब्दबंधच्या बैठकीला अचानक हजर राहण्याचं रहस्य ;)

  ReplyDelete
 11. फ़ोटो आणि वर्णन दोन्ही छान..मस्त सफ़र घडवलीत मॅकिनॉव आयलंडची...

  ReplyDelete
 12. माधुरी,सायकलवर चक्कर मारायला मजा येते पण इतका चढ आहे गं की दमून जायला होते. आणि तो वास मात्र अगदी असह्य होतो गं.

  ReplyDelete
 13. हा हा...हो नं, म्हणून तर जमून गेले रे. हेरंब, अरे राहतात नं तिथे लोक. शाळाही आहे. सगळ्या सोयी आहेत तिथे परंतु अतिरेक थंडीमुळे खूपच कमी लोक कायमचे राहतात तिथे.एकदा तरी जायलाच हवे असे ठिकाण आहे.:)

  ReplyDelete
 14. देवेंद्र,धन्यवाद.:)

  ReplyDelete
 15. सही आहे गं हे बेट, फ़ोटो आणि वर्णन...फ़ुलपाखरं तर अप्रतिम...की-वेस्टला एका अशाच ठिकाणी फ़ुलपाखरं पाहिली होती त्याचीच आठवण झाली...
  आणि इथले घोडे कसले धष्टपुष्ट असतात नं???" काही वेळाने आपल्या नाकातले केस जळून गेले आणि फुफ्फुसं याच वासाने पूर्ण पावन झाली की हा भयंकर वास त्रास देईनासा होतो"....हा हा हा.....

  ReplyDelete
 16. सही, काय मस्त जागा आहे अप्रतिम, सगळे फोटो खूपच सुंदर आले आहेत, न सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस जायचं न काय पहायचं याच एकदम व्यवस्थित वर्णन केलंय तू.
  थोडक्यात Long weekend जोरदार साजरा झालाय तर .... आमच्या सारखा लोळत पडून नाही :)

  ReplyDelete
 17. ती व्हिडिओची लिम्क आम्हालापण पाहिजे

  ReplyDelete
 18. एकंदरीत चार वेगवेगळ्या गजरांना दाद न देता आम्ही तिघेही मस्त गुरगुटून झोपलो. he he he अगदी सेम पिंच


  फ़ोटो काय जबरीआहे्त ! कमानिचा फ़ोटो भन्नाट. आणि बग्गीचे घोडे खरे आहेत की खोटे?

  ReplyDelete
 19. अपर्णा, खूप मस्त ठिकाण आहे हे.कधी या बाजूला आलीस तर जरूर जा.:)

  ReplyDelete
 20. अमृता, अगं आमचाही लॉंग विकांत लोळूलोळूच होणार होता...:D.शनीवार धारातिर्थी पडल्यावर अगदी निश्चय करून रवीवारी उठले म्हणून गेलो.:)

  ReplyDelete
 21. शिनू, हा हा... अगं सुटी आणि लवकर उठणे... म्हणजे अशक्य टॉर्चर.:D घोडे कसले जबर आहेत पाहिलेस नं...चुकून कोणी टापांखाली आला तर गच्छंतीच... चित्रफिती टाकते गं दोन-तीन दिवसात. धन्यू गं.:)

  ReplyDelete
 22. एकदम झकास दिसते आहे जागा! सप्ताहांत सार्थकी लागला म्हणायचा!
  आणि हो, फोटो एकदम डेडली...फुलपाखरं...!

  ReplyDelete
 23. फोटो आणि वर्णन एकदम सुंदर ताई, तरीच तू नव्हती इकडे जालावर..

  ReplyDelete
 24. विद्याधर, हो नं... विकांत मस्त सार्थकी लागला. :)
  मग... काय चाललय़ं? मज्जाच मज्जा... दिवस इतके भर्रकन उडून जातील आणि पाहता पाहता तुझी निघायची वेळ.... :(
  Enjoy...

  ReplyDelete
 25. आनंद, अरे मस्त धमाल केली.:)

  ReplyDelete
 26. wow! photo pharach bahardar! :)

  ReplyDelete
 27. me, ब्लॉगवर आपले स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 28. wow! बघुनच छान वाटले. फोटू पण सुंदर आलेत.

  ReplyDelete
 29. धन्यवाद मीनल.:)

  ReplyDelete
 30. सॉलीड वाटतंय गं हे बेट. मला तो बग्गीचा प्रकार आवडला. तुला किती छान फोटो मिळालेत फुलपाखराचे, इथे मी एका पतंगाचे फोटो काढू पहाते तर धड फोटो येत नाही. सुट्टी एंजॉय केलीस.

  ReplyDelete
 31. कांचन, हो गं. सुट्टीत धमाल केली. अजून खरे तर बरेच सुंदर फोटो आहेत शिवाय चित्रफितीही. कधी मुहुर्त लागतोय कोण जाणे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !